समांतर
दोन समांतर रेषा आहोत आपण
एकाच दिशेने जाणाऱ्या
पण तरीही वाटा वेगळ्याच आहेत आपल्या
स्वतःच्या धुंदीत वळणाऱ्या
तू शोधत आहेस तुझ्या मनातलं सुख चौफेर
माझ्या मनात मात्र सतत आठवणींचा फेर
तुझ्या वाटेवर आहेत असंख्य व्यक्ती
वेळोवेळी नातं टिकवण्यासाठी धावणाऱ्या
माझ्या वाटेवर आहेत सावल्या
मुखवट्या मागे लपणाऱ्या
तुला झाली आहे सवय
खोट्यालाही खर मानून जगण्याची
मला अजूनही आहे जुनीच खोड
खऱ्यालाही पारखून घेण्याची
चुकून कधी आपल्या नजरा एकमेकांना भिडल्या
तर हसतो आपण सवयीने
पण तुला आणि मला ही माहिती आहे
कायमस्वरूपी वेगळे ठेवले आहे आपल्याला नियतीने
समांतर असण्याचे आपले असे फायदे आहेत
तुझ्या माझ्या जगाचे आपापले कायदे आहेत
26.2.2020
टिप्पण्या