यशातलं अपयश

यशातलं अपयश
चाळिसाव्या मजल्यावर असणाऱ्या त्या आलिशान पेंट हाऊसच्या फ्रेंच विंडोमधून सगळं शहर दिसत होतं. पण ते बघण्याची शुद्ध कुठे होती त्याला.
गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांचा क्रम त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होता. त्याचं हे वैभव काही एका रात्रीत आलं नव्हतं. पण लोकांना त्याच्या जवळच्या लोकांनाच अस वाटत होतं. ते लोक ज्यांनी त्याच्या पडत्या काळात त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याचे आईवडील, भाऊबहीण, मित्र सगळेच सतत त्याच्या प्रत्येक कृतीवर आक्षेप घेत ,टोमणे मारत त्याचं मानसिक खच्चीकरण करत होते. पण तो मात्र ठामपणे त्याच्या वाटेवरून चालत राहिला होता. आणि आज त्याचं फळ त्याला मिळालं होतं. पण जोडीने असतील शिते तर जमतील भुते ह्या म्हणीचा प्रत्यय ही त्याला आला होता. 
संध्याकाळी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तीच ती पाठ फिरवून निघून गेलेली सगळी नाती त्याला दिसली. 
प्रेम तर तस त्याच्या आयुष्यात आलंच नव्हतं पण जे काही आलं ते स्वार्थासाठी आहे हे लक्षात यायला त्याला वेळच लागला होता. मग असे सत्काराचे प्रसंग जसजसे वाढत गेले तसतसे त्याला लोकांचे खरे चेहरे समजत गेले. 
आज तो यशाच्या शिखरावर होता पण एकटा. आणि हे एकटेपण त्याने निवडलं नव्हतं तर समाजाने जवळच्या लोकांनी त्याच्यावर लादलं होतं. त्याने तर आटोकाट प्रयत्न केले होते आपल्या लोकांना धरून ठेवण्यासाठी वेळोवेळी मदतीला धावून गेला , जीवापाड प्रेम दिले पण सगळ्यांना फक्त त्याचा पैसा दिसत होता. त्याला गरज असताना नोकर आहेत न काळजी घेण्यासाठी असे सल्ले देत जेंव्हा जन्मदात्यांनीही काढता पाय घेतला तेंव्हा तो खऱ्या अर्थाने खचला.
चूक खरे तर त्याचीच होती पण पूर्णपणे त्याची नव्हती. लोकांची वृत्तीच अशी बनली होती. जो मदत करत आहे त्याच्याकडून शक्य तेवढी मदत मग ती कुठल्याही स्वरूपात का असेना घ्यायची आणि आपलं काम झालं की आम्ही तुम्हाला बोलावलं नव्हतं अस सांगत मनाच आणि घराचंही दार लावून घ्यायचं. 
लोक फक्त त्याच्याशीच अस वागत होते अस नाही. पण त्याच्या मनाला हे वातावरण त्यात मिसळणे जमत नव्हते. तत्वनिष्ठ वगैरे नव्हता तो उलट अगदी साधा सरळ नाकासमोर चालणारा होता. पण त्याच वृत्तीची खिल्ली उडवली जात असे तेंव्हा तो दुखवून ही काही बोलत नसे. त्याने प्रयत्नही केले पण नाहीच जमले त्याला अरे ला कारे करणे अन् जिथे जमले तिथे त्याला उद्धट कृतघ्न वगैरे विशेषणे मिळाली मग सोडूनच दिले त्याने बोलणे. एक छोटस विश्व मनात तयार करून तिथेच रमू लागला तो.  त्यातुनच त्याची कला जन्माला आली आणि त्याला अमाप यश देऊन गेली. 
आता मात्र तो शिकला होता. आज सोहळ्यात त्याने सगळ्यांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या यशाचे श्रेय स्वतःला दिले तेंव्हा उतरलेले चेहरे त्याला दिसले. क्षणभरच त्याच्या मनात अपराधी भाव आले पण लगेच तो सावरला. हसून तिथून निघून गेला. माणसात रमणारा होता तो कधी काळी पण आता तीच माणसं वाचता येऊ लागली आणि त्याच मन कुठेच रमेना. 
विचारांच्या खोल गर्तेत हरवत कधी त्याचे डोळे मिटले त्यालाही कळले नाही. सकाळी येणाऱ्या नोकराने स्वतःकडच्या चावीने दार उघडले तेंव्हा आरामखुर्चीत हसऱ्या चेहऱ्याने झोपलेला तो बघून त्याला जरा आश्चर्यच वाटले. जवळ जात त्याने हात लावला तेंव्हा कळले तो कायमचा त्याच्या विश्वात रमण्यासाठी कधीचाच निघून गेला होता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी