गीतसप्तक भाग ५
#गीतसप्तक
मन धागा धागा
मला आवडलेलं हे अजून एक गाणं. ह्याचं प्रत्येक कडवं मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय.
१.
असे कसे बोलायचे न बोलता आता
तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
सांगा जरा असे कसे लपायचे रे आता
मन धागा धागा जोडते नवा
मन धागा धागा रेशमी दुवा
तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं.....
२.
एकटी मी दिनरात तरीही तू भोवती
हातात नाही हात तरीही तू सोबती
मन बेभान बेभान होई
मग प्रीतीला उधाण येई
मन धागा धागा ......
एका सोल्जरची बायको. दूर असूनही घरातल्या प्रत्येक वस्तूशी आणि तिच्याशी त्याच्या अबोल आस्तित्वाचं नातं आणि त्यासोबत तिची चालू असलेली रोजच्या जगण्यातली धावपळ. पदोपदी त्याची आठवण तिला अस्वस्थ करतेच पण त्याचबरोबर तिला बळही मिळतं सगळं निभावून नेण्यासाठी.
३.
रोज बहाणे नवे शोधून मी थकते
तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
क्षण आतूर आतूर झाले
रोज काहूर काहूर नवे
मन धागा धागा......
हे तिसरं आणि शेवटचं कडवं. ह्या ओळी मला ना अशी एक वेगळीच आठवण करून देतात. म्हणजे नवीन असं काहीतरी नुकतंच घडू लागलंय आयुष्यात मग ते त्याच्या असो किंवा तिच्या. आणि ते जे काही आहे ते प्रेम वगैरेंपेक्षा वेगळं आहे कदाचित ती एक नवी सुरुवात आहे एखादया नव्या कामाची, छंदाची किंवा सगळं मळभ दूर झाल्यानंतर उगवणाऱ्या नव्या दिवसाची. ज्याची नकळत आपण सगळेच वाट बघत असतो रोज. मनासारखं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असतं कदाचित तेच घडण्याची सुरुवात.......
कदाचित माझ्यासाठीही नवा अर्थ लपलेला असेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल
टिप्पण्या