कधीतरी मला हवं तसं

कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या

कितीतरी गोष्टी राहून गेल्या आहेत रे करायच्या
मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत याद्या त्यांच्या
निसटलेलं बालपण अन्  न जगलेले असंख्य क्षण
रोज एकदा तरी येऊन जाते मला त्यांची आठवण

आशेच्या झोपाळ्यावर झुलायचे अजून किती
तिथे आजूबाजूला आहेत मोडलेल्या स्वप्नांच्या भिंती
सतत त्या मला खुणावतात वेडावून दाखवल्यासारख्या  
डोळ्यासमोर येतात त्या आठवणी जखमांसारख्या

कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या

न मागता मिळेल असं काहीच नाही ह्या जगात
अन्  मागूनही मिळावं अशी अपेक्षा नाही मनात 
म्हणूनच हे मागणं करतेय, मी तुला आणि मला 
ह्यावेळी तरी देऊ संधी आपल्या त्या जगण्याला

नेमकं मला हवं आहे काय? 
खुप काही नाही फक्त एकदा,
हसायचं आहे मनापासून डोळ्यात पाणी येईपर्यंत
झोपाळ्यावर झुलायचे आहे तो आकाशी नेईपर्यंत 
साधी सोपी स्वप्नं आहेत ज्यांना लागत नाही पैसा
सोबतीला मात्र हवा आहे श्वास मला पुरेसा

खेळ आपला लपंडाव, 
तुझ्यामागे सतत चालू माझी धावाधाव 
कुठेतरी थांबून घ्यायची आहे विश्रांती
प्रवास करताना रस्ता चुकू नये ही हवी आहे खात्री
सगळं नीट होणारच आहे हे कळायला हवे
त्यासाठी आयुष्या आपले नाते जुळायला हवे

म्हणूनच म्हणते ....
कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या, 
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या,
                                     भिज ना रे आयुष्या....
#गौरीहर्षल #२.१०.२०१८


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी