गीतसप्तक भाग ३

#गीतसप्तक
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
'चॉकलेटचा बंगला' कल्पनाच किती मस्त आहे ना? चॉकलेट आवडत नाही अशी फार कमी माणसं आजूबाजूला सापडतील. लहान मुलांना आपल्या पार्टीत घ्यायचं म्हटलं की मोठया ताईदादांच्या कडून हमखास दाखवलं जाणारं आमिष. 
प्रमाणाबाहेर खाल्लं तर त्याचे तोटेही आहेतच. पण आज नको त्यावर बोलायला. पूर्वी काही ठराविक चॉकलेट मिळायची आता मात्र इतके सगळे प्रकार, इतक्या सगळ्या चवी असतात की खाणारा गोंधळून जातो. 
लहान मुलांच्या मनोराज्यात हळूच शिरून लहान होऊन गेल्याचं फिलींग हे गाणं देतं. ह्या गाण्याच्या संकल्पनेशी मिळताजुळता एक धडाही होता मला. त्यात कलिंगडाचं घर होतं. भर उन्हाळ्यात अशा मस्त कलिंगडाच्या घरात आपण राहतोय ही आयडियाच भारी वाटायची खरंतर अजूनही वाटते.  किती छान असतं ना ते विश्व कसल्याच चिंता काळज्या नसतात. कुणाशी शत्रुत्व नसतं,कसलेही हेवेदावे नसतात. फक्त आणि फक्त निखळ आनंद असतो आयुष्यात. मैत्री,नाती सगळी अगदी मनापासून निभावली जातात. म्हणून तर अगदी प्रत्येकाला मोठं झालं की बालपण खुणावत असतं. जितकं निरागस मुलांचं विश्व असतं तितकंच किंबहुना त्याच्या जवळपास सुद्धा न जाणारं जग मोठेपणी त्यांना भेटतं. आणि मग हळूहळू ते छोटं मूल आत मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात स्वतःला आक्रसून घेतं. फार काही नाही करायचं पण मुलातलं मूल जपताना स्वतः मधल्या मुलालाही जपायला हवं. सगळ्या जगाला एका स्वच्छ नजरेने बघता यायला हवं. दुसऱ्या कुणासाठी नाही पण स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी तरी आनंद निर्माण करता यावा. हळूहळू का होईना बाकी परिस्थितीही बदलेल. आधी आपण तर सुरू करू चॉकलेटचा बंगला बांधायला आयुष्य तर तसंही गोडच आहे अजून गोड होईल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

comparison 2/8

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...