खरंच अस कधी


खरंच असं कधी झालं तर 
सकाळच्या पहिल्या किरणांपासून
पसरत गेला हवाहवासा वाटणारा प्रकाश 
आनंदाचा, चैतन्याचा आणि मन शांत करणारा

खरंच असं कधी झालं तर 
भरून घेताना नवासा श्वास नवीन दिवसात
सोडून गेले सगळे दुःखाचे अडकलेले क्षण
मनातून, स्मृतींतून आणि भरलेल्या त्या डोळ्यांतुन

खरंच असं कधी झालं तर 
आयुष्यात उरलीच नाही जागा
सतत दुःख वाटण्यासाठी आसुसलेल्या
नकोशा गोष्टींना, वस्तुंना आणि माणसांनाही

खरंच असं कधी झालं तर 
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला 
मिळाली एक नवी दिशा
बदलणारी, हसवणारी आणि नकळतच मळभ दूर करणारी 

खरंच असं कधी झालं तर 
जगण्याचा होऊन जाईल उत्सव
सुखा-समाधानाच्या हातात हात घालून
मनाला मिळेल उभारी पुन्हा पुन्हा आशेने जगवणारी.......

#गौरीहर्षल #२०/९/२०१८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी