मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

योग्य जागा

योग्य जागा


सेशनच्या डायरीतून,


फोनची मेसेज टोन वाजली आणि मी घड्याळाकडे पाहिलं. 


आजचा  क्लायंट — समीर, वय चौतीस, एका मोठ्या आयटी कंपनीत सिनिअर डेव्हलपर. 


अपॉइंटमेंट घेताना "भेटण्याचं कारण" त्याने फक्त एक ओळ लिहिली होती: "मला वाटतं, मीच कमी पडतोय."


सेशन सुरू होताच तो समोर स्क्रीनवर दिसला.  

शर्ट इस्त्रीचा कडक, पण खांदे झुकलेले.

 खुर्चीवर बसताच म्हणाला, "मॅडम, सरळ सांगा, माझ्यात काय कमी आहे? सहा वर्षं जीव तोडून काम केलं. तरी प्रत्येक वेळी प्रमोशन दुसऱ्यालाच मिळतं."


पहिल्या पाच मिनिटांतच मला एक गोष्ट जाणवली. तो माझ्याकडे उत्तर मागत नव्हता.  तर स्वतःला दोषी ठरवून एकदाचं मोकळं व्हायचं होतं त्याला.


“ तुझ्या पूर्ण दिवसाची सुरुवात ते शेवट कसा होतो ते सांग," मी म्हटलं.

तो सांगू लागला. रात्री अकरापर्यंत थांबून तो सगळी सिस्टिम सांभाळतो. गेल्या वर्षी एक प्रोजेक्ट त्याने वाचवला, पण क्लायंटसमोरच्या सादरीकरणात श्रेय घेतलं त्याच्या मॅनेजरने. 


मीटिंगमध्ये त्याने एखादी कल्पना मांडली तर कोणी ऐकत नाही; तीच कल्पना पंधरा मिनिटांनी दुसरं कोणी बोललं की सगळे "व्वा!" म्हणतात.


 परवा मॅनेजर हसत म्हणाला, "समीर, तू टेक्निकली उत्तम आहेस रे, पण तू  'टीम प्लेअर' नाहीस."


"तेव्हा तुला काय वाटलं?"


"मला वाटलं की... बहुतेक तो बरोबरच आहे." 


तो खिन्नपणे हसला. "आजकाल रात्री झोप लागत नाही. आरशात पाहिलं की वाटतं, मी कुठल्याच कामाचा नाही."


मी त्याचा एक शब्द मनात नोंदवला: "बहुतेक." आत्मविश्वास कसा कमी होत जातो ते त्या एका शब्दात होतं. 


रोज एकच आरसा समोर धरला की माणूस तेच प्रतिबिंब खरं मानायला लागतो. आरसा खराब असू शकतो, हा विचारच तो विसरून गेला होता.


माझ्या खिडकीत दोन कुंड्या होत्या.


 एकीत मनी प्लांट, हिरवागार, पसरलेला. दुसरीत गुलाब, पानं पिवळी, एकही कळी नाही.

"समीर, त्या दोन कुंड्यांकडे बघ. काय दिसतं?"


तो गोंधळला. "मनी प्लांट मस्त आहे. पण गुलाब... जवळपास गेलेलाच दिसतोय."


"असंच मलाही वाटत होतं," मी म्हणाले. "दोन वर्षं मी त्याला खत दिलं, रोज पाणी दिलं, त्याच्याशी बोलले सुद्धा. काही उपयोग नाही. शेवटी मला वाटलं, गुलाबाला वाचवणं माझ्या हातात नाही."


त्यानंतर मी फोन काढला आणि त्याला एक फोटो दाखवला: गच्चीवर उन्हात डोलणारा, लालभडक कळ्यांनी लगडलेला गुलाब. 


"हा तोच आहे. एका रविवारी चिडून मी त्याला खिडकीतून उचलून गच्चीत ठेवलं. आठ दिवसांत पालवी फुटली. आज तो गच्चीतच असतो. ही खिडकीतली कुंडी मी मुद्दाम ठेवलीय, तुझ्यासारख्यांना दाखवायला."


तो फोटोकडे बघतच राहिला. "म्हणजे गुलाबात दोष नव्हता..."


"अहं गुलाब कमजोर नव्हता. त्याची जागा चुकीची होती."


खोलीत काही क्षण शांतता पसरली. 


मग मी त्याला समजेल अशा भाषेत सांगितलं.  प्रत्येक माणसात वाढण्याची, फुलण्याची एक नैसर्गिक ओढ असते, पण त्यासाठी योग्य वातावरण लागतं.  

माणसाला फुलायला तीन गोष्टी हव्या असतात: 

✓स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य,

✓आपण सक्षम आहोत ही जाणीव आणि ✓कुठेतरी आपण 'आपले' आहोत ही भावना. 


जिथे या तिन्हीचा अभाव असतो, तिथे कितीही हुशार माणूस असला तरी कोमेजतोच.


"पण मॅडम," तो म्हणाला, "हे सगळं सोपं वाटतं. कदाचित मॅनेजर बरोबर असेल तर?"

हा प्रश्न मला आवडला. कारण हाच प्रामाणिक प्रश्न होता.


 "म्हणूनच आपण पुरावे गोळा करू," मी म्हटलं. "भावनेवर नाही, पुराव्यांवर निर्णय घ्यायचा. मी तुला तीन प्रश्न देते. पुढच्या आठवड्यापर्यंत त्यांची उत्तरं लिही.

१. मी कुठे असताना वेळ कसा गेला कळत नाही? 

२. माझं म्हणणं कुठे न मागताच ऐकलं जातं? ३. कुठल्या कामानंतर मी थकतो, पण रिकामा झाल्यासारखा वाटत नाही?"


पुढच्या आठवड्यात समीरने तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवली. 

पहिल्या पानावर एक जुनी आठवण होती. कॉलेजमध्ये असताना त्याने एका ग्रामीण शाळेसाठी मोफत ॲप बनवलं होतं, मुलांच्या आरोग्याच्या नोंदींसाठी. 

मुख्याध्यापिका फोनवर रडल्या होत्या, "तुझ्यामुळे आमच्या मुलांचा ताप वेळेवर पकडला गेला." हे सांगताना त्याचे डोळे चमकले. 


मी गेल्या महिन्याभरात पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर उत्साह पाहिला.


"पाहिलंस?" मी म्हटलं. "तू कमी पडत नव्हतास. तू चुकीच्या मोजपट्टीने मोजला जात होतास. तिथे 'टीम प्लेअर' असणं म्हणजे श्रेय सोडून देणं असा अर्थ होता."


आम्ही पुढचे दोन महिने काम केलं. मी त्याला राजीनामा द्यायला सांगितला नाही. राजीनामा हा निर्णय नसतो, ती फक्त एक दिशा असते. आधी आम्ही त्याच्या आत्मसन्मान जागवण्याच्या दिशेने काम केलं. झोपेच्या सवयी ठीक केल्या, 'मी निरुपयोगी आहे' या विचाराला पुराव्यांनिशी आव्हान दिलं. 


मग त्याने नेटवर्किंग सुरू केलं, जुने सहकारी भेटले, आपलं काम मांडायला शिकला.


तीन महिन्यानंतर समीरने पुन्हा एकदा समुपदेशनासाठी अपॉइंटमेंट घेतली. 


सेशन जॉईन केल्यानंतर बघितलं हातात छोटी कुंडी, आत एक गुलाबाचं रोप.


"नव्या कंपनीकडून पहिला पगार आला," तो हसत म्हणाला. "हेल्थ-टेक स्टार्टअप आहे. ग्रामीण दवाखान्यांसाठी सिस्टिम बनवतोय. पहिल्याच आठवड्यात सीईओने माझी कल्पना ऐकून घेतली आणि म्हणाले, 'हे तुझं आहे, तूच कर.' मॅडम, मी रात्री अजूनही उशिरापर्यंत काम करतो, पण आता झोप शांत लागते."


"हे रोप खिडकीसाठी नाही हं," तो डोळे मिचकावत म्हणाला. "गच्चीसाठी."


त्याचं सेशन संपल्यानंतर मी बराच वेळ खिडकीतल्या त्या पिवळ्या गुलाबाकडे पाहत बसले. मीही एकेकाळी एका चुकीच्या खिडकीत सहा वर्षं कोमेजत राहिले होते, आणि 'दोष माझाच आहे' असं मानत राहिले होते. कधी कधी माणसाला स्वतःवर विश्वास ठेवायला कुणीतरी योग्य रस्ता दाखवावा लागतो.


तात्पर्य - 

कधी कधी तुमची किंमत कमी नसते; तुम्ही चुकीच्या जागी असता. योग्य मोजपट्टी आणि योग्य वातावरण मिळालं की तीच माणसं बहरतात. 

म्हणून स्वतःला दोष देण्याआधी स्वतःला प्रश्न विचारा:

👉 मी कमी आहे की माझी जागा चुकीची आहे? 

🧡आणि जागा बदलण्याआधी पुरावे गोळा करा, घाईत नाही, विचारपूर्वक.


स्वतःला शोधताना - गौरी हर्षल

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल


सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६

मी नाही म्हणाले तर? भाग 6

मी नाही म्हणाले तर? भाग 6 

प्राची , (नाव बदलले आहे)
 प्राची माझ्याकडे आली तेव्हा तिच्या मनात स्वतःच्या बाबतीत भरपूर शंका होत्या. 
कारण घरातली मोठी सून, मोठी मुलगी, दोन मुलांची आई, कर्तबगार नवऱ्याची बायको, बहिण, वहिनी वगैरे वगैरे नात्यांमध्ये वावरताना कुठेतरी तिचा स्वतः मधला चार्म हरवला आहे असं तिला पहिल्यांदा जाणवलं ते तिच्या विसाव्या एनिवर्सरीला. 
देर आये दुरुस्त आये म्हणत प्राचीने कौन्सिलिंग सेशन्स ना आणि थेरपीला सुरुवात केली. 
तिचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता ते म्हणजे इतरांची मने सांभाळणे. कधी कधी ती स्वतःसाठी मर्यादा आखायची सुद्धा. आणि त्याचे काटेकोरपणे पालनही करायची. पण लहानपणापासून मनावर जे संस्कार झाले होते ते मात्र तिला त्या सगळ्यातून अजूनही बाहेर येऊ देत नव्हते. 
परिणामी जेव्हा तिच्या शरीरावर तिच्या मनस्थितीचा परिणाम होऊ लागला, तेव्हा तिने स्वतःसाठी ठामपणे पाऊल उचलायला सुरुवात केली. 

नेमकं काय? ते तुम्हाला खाली वाचल्यावर समजेलच…

“इतरांचा आनंद ही तुमची जबाबदारी नसते.”

लहानपणापासून आपल्या मनावर ही गोष्ट खूप खोलवर बिंबवलेली असते की इतरांना खुश ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. किंबहुना हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि बऱ्याचदा या गोष्टीचा सरळ सरळ संबंध आपल्या अस्तित्वाशी जोडला जातो. 
कसा ते माहित आहे? 
जर आपण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात यशस्वी झालो तरच आपण महत्त्वाचे असतो. 

जर त्या व्यक्ती खुश असतील तर तुम्हाला खुश असण्याचा अधिकार आहे. पण जर कोणत्याही कारणाने त्या व्यक्ती दुःखी असतील तर तुम्ही तुमचा आनंद बाजूला ठेवायला हवा. आणि आधी त्यांच्या आयुष्यातील गोष्टी नीट होण्याची वाट बघायला हवी किंवा त्या गोष्टी नीट करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. 

आपणही या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी मान्य केलेल्या असतात पण लक्षात घ्या आपण इतरांचे आयुष्य नीट करण्याचा ठेका घेतलेला नसतो. आपण त्यांचे विचार, त्यांच्या निवडी आणि त्यामुळे त्यांच्या मनावर होणारे परिणाम किंवा त्यांच्या वाट्याला येणारी दुःख यांच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. 
त्यामुळे अर्थातच त्यांचा मूड सांभाळणं तुमच्या हातात नसतं. ते तुमचं काम नाही. 

आनंद म्हणजे काही गिफ्ट नाही जे छानपैकी सजवून एखाद्याला दिले. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असते आणि ती ज्याची त्यानेच उचलायची असते. 

नात्यांमध्ये बऱ्याचदा एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीकडून अशा अपेक्षा ठेवल्या जातात. आणि ज्या व्यक्तीला लहानपणापासून इतरांना खुश केलं तरच आपण आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी पात्र आहोत असं वाटत असतं त्या व्यक्ती आयुष्यभर इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला त्रास करून घेत असतात. 

आपल्या आयुष्यातही अशा काही व्यक्ती असतात ज्यांच्यासाठी आपण कितीही काहीही केलं तरी त्या व्यक्ती कधीच खुश होत नाहीत. त्या कुठल्याही गोष्टीसाठी आपलं कौतुक करत नाहीत आणि कितीही कष्ट घेतले तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे नसतात. 
परिणामी त्या व्यक्तींच्या अशा स्वभावामुळे आपल्याला मात्र वारंवार मनस्तापाला सामोरे जावे लागते. आपण कितीही आनंदाने एखादी गोष्ट पूर्ण केली तरी अशा व्यक्तींमुळे आपल्याला तो आनंद मनापासून उपभोगता येत नाही. 
 
पर्यायाने कित्येकदा आपण चिडचिड करू लागतो, स्वतःला अपराधी समजत असतो आणि आपल्या स्वतःच्या एखाद्या यशाला सुद्धा आपण मनापासून स्वीकारू शकत नाही. 

या सगळ्यावर उपाय काय असेल तर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आपण आनंदी ठेवू शकतो, खुश करू शकतो या भ्रमातून लवकरात लवकर बाहेर पडणे. 

तुम्ही तुमचे आई-वडील, तुमचा जोडीदार, मुलं, मित्र-मैत्रिणी किंवा सहकारी यापैकी कोणाच्याही आनंदासाठी जबाबदार नसता हे स्वतःच्या मनावर बिंबवणे खूप जास्त गरजेचे असते. 
मग तुम्ही काय करू शकता? 
तर 
🧡 तुम्ही त्यांच्यावर भरभरून प्रेम करू शकता 
💕त्यांना गरज असते तेव्हा तुम्ही त्यांचे सपोर्ट सिस्टीम होऊ शकता किंवा 
❣️कधी कधी फक्त त्यांची साथ सुद्धा देऊ शकता 

पण त्या व्यतिरिक्त त्यांच्या आनंदाची जबाबदारी मात्र कधीच तुमची असू शकत नाही. त्यांचा आनंद ही सर्वस्वी त्यांची स्वतःची जबाबदारी असते. 

तुमच्या आजूबाजूच्या या व्यक्तींना त्यांच्या भावना हाताळणे शिकणे कधी कधी गरजेचे असते. कारण त्यांच्या भावनांची ओझी वाहण्यासाठी तुमचा जन्म नक्कीच झालेला नसतो. 

तुम्ही तुमचं आयुष्य घडवण्यासाठी आणि ते भरभरून जगण्यासाठी जन्माला आलेले असतात. 
त्यामुळे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही इतरांना वाचवणे थांबवता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला वाचवलेले असते. 
कारण कधी कधी काही व्यक्तींना आपण मदत करण्यापेक्षा फक्त वाट दाखवण्याची गरज असते. त्या वाटेवर चालण्याची जबाबदारी ही त्यांची असते आपली नाही. तो निर्णय सर्वस्वी त्यांनी घ्यायचा असतो.

Self-Reflection Question:

१. विचार करण्यासाठी 
"गेल्या काही दिवसांत तुम्ही अशा कोणत्या व्यक्तीचा मूड किंवा आनंद सांभाळण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा बळी दिला आहे, जो शेवटी तुमच्या लक्षात आला?"
२. स्वतःला विचारायचा प्रश्न :
"इतरांना सतत खूश ठेवण्याच्या या ओझ्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या कोणत्या आवडीला किंवा स्वप्नाला मागच्या पानावर ढकललं आहे?"
३. पुढच्या पावलासाठी
"आज रात्री स्वतःला फक्त एवढंच विचारा— 'जर मी आज कोणाचेही मन न सांभाळता फक्त माझ्या स्वतःसाठी जगलो/जगले, तर मी काय करेल?”

तुम्हाला ही लेखमालिका उपयोगी ठरत असेल तर ती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. व्हाट्सअप चैनल ची लिंक शेअर करून इतरांना स्वतःमध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन द्या. 

स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 
(ऑनलाइन कौन्सिलिंग सेशन्स घेतले जातात)

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

मी नाही म्हणाले तर? भाग 5

मी नाही म्हणाले तर? भाग 5

माझ्याकडे येणाऱ्या अनेक महिलांच्या बाबतीत मी एक गोष्ट नेहमी पाहते. ती म्हणजे एखादी
स्त्री जेव्हा कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी स्वतःच्या सुखाचा, विश्रांतीचा आणि आवडीचा बळी देते, तेव्हा समाज तिला 'गुणी' आणि 'समंजस' मानतो. 

पण तीच स्त्री ज्या दिवशी स्वतःसाठी एक तास मागायला लागते, थकल्यावर "आज मी स्वयंपाक करू शकत नाही" असं सांगते, किंवा स्वतःच्या स्वप्नांचा विचार करू लागते—त्याच क्षणी लोकांचे चेहरे बदलतात. लोक लगेच टोमणा मारतात, "फारच स्वार्थी झाली आहेस आजकाल... फक्त स्वतःचाच विचार करतेस!"

पण तुम्ही कधी विचार केलाय का, की स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची काळजी घेणं म्हणजे 'स्वार्थीपणा' कसा काय असू शकतो?

जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य द्यायला सुरुवात करता, तेव्हा लोकांच्या भुवया उंचावणे साहजिक आहे. "तू बदलली आहेस", "तू आता खूप कठोर झाली आहेस", "तुला कोणाची काही काळजी वाटत नाही" अशी वाक्य बोलून दाखवली जातील. 

पण खरं काय आहे माहितीये? ज्या लोकांना तुमच्या आत्मसमर्पणाची, तुमच्या बलिदानाची सवय झाली होती, त्यांना तुमचं स्वतःवरचं हे प्रेम एका धोक्यासारखं वाटतं!

तुम्ही स्वार्थी नाही आहात—फक्त फरक एवढाच आहे की, ज्या बलिदानाच्या केंद्रस्थानी आधी ते लोक होते, तिथून आता तुम्ही स्वतःला केंद्रस्थानी आणलं आहे. आणि हीच गोष्ट त्यांना सहन होत नाही.

कारण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे:
 ✓तुमची जी ऊर्जा आधी लोकांना खूश करण्यात वाया जात होती, ती आता स्वतःसाठी वापरणे.
 ✓तुम्हाला आतून दुखवणाऱ्या मागण्यांना स्पष्ट 'नाही' म्हणणे.
 ✓स्वतःला नको असलेल्या भूमिकांच्या बंधनात अडकवून न ठेवणे.

जे लोक तुम्हाला सतत स्वतःच्या सोयीसाठी वापरू इच्छित होते, त्यांच्यासाठी तुमचा हा बदल नक्कीच त्रासदायक असणार.
त्यामुळे, लोकांनी तुम्हाला गैरसमजातून 'स्वार्थी', 'कठोर' किंवा 'संवेदनहीन' म्हटलं तर ते स्वीकारायला शिका. हा तुम्ही स्वतःमध्ये केलेल्या बदलाचा एक नैसर्गिक कर आहे, जो तुम्हाला भरावाच लागतो. 

ज्या लोकांना तुम्ही आधीसारखं तुटलेलं आणि दबलेलं पाहायला आवडत होतं, त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा धरून तुम्ही जगू शकत नाही.
खरे स्वतःवरचे प्रेम तुम्हाला अधिक अस्सल, परिपूर्ण आणि कणखर बनवते. पण यासाठी अशा लोकांना नाराज करावेच लागते, ज्यांना फक्त तुमच्या 'वापराची' आणि 'सोयीची' किंमत होती.

🤔 पण स्वतःला त्रास होतोच अशावेळी काय करायचं? 
जेव्हा जेव्हा तुमच्यावर हा 'स्वार्थीपणाचा' शिक्का मारला जाईल, तेव्हा एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा— "मी कोणाचाही विश्वासघात करत नाहीये, मी फक्त स्वतःशी प्रामाणिक राहतेय." आणि जर एखादी व्यक्ती स्वतःवर प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या सोबत उभी राहू शकत नसेल, तर ती तुमची समस्या नाही!

स्वतःवर प्रेम करणे हा स्वार्थीपणा नाही. हे तर तुमचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि खऱ्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

या 'स्वार्थीपणाच्या' टॅगला न घाबरता सामोरे जाण्याचे सोपे मार्ग:

१. 'स्वार्थीपणा' (Selfishness) आणि 'आत्म-काळजी' (Self-care) यातील फरक ओळखा:
लोकांना दुखावून स्वतःचा फायदा करून घेणे म्हणजे स्वार्थीपणा. पण स्वतःची मानसिक व शारीरिक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला वेळ देणे म्हणजे आत्म-काळजी (self care). हे दोन वेगळे मार्ग आहेत.

२. गिल्ट (Guilt) ऐवजी स्वाभिमान निवडा:
जेव्हा कोणी तुम्हाला 'बदललीस' म्हणेल, तेव्हा मनात अपराधी वाटू देऊ नका. उलट मनात म्हणा, "हो, मी माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी बदलले आहे, आणि हे योग्य आहे."

३. प्रत्येकाला खूश ठेवण्याचा अट्टाहास सोडा:
तुम्ही कितीही चांगले वागलात, तरीही जग तुमच्याकडून अधिकचीच अपेक्षा करेल. त्यामुळे सगळ्यांना खूश करण्याचा प्रयत्न सोडून स्वतःची शांतता जपा.

४. स्वतःच्या सीमांवर ठाम राहा:
जेव्हा लोक टोमणे मारतील, तेव्हा वाद घालत बसू नका. शांतपणे तुमचे काम करत राहा. तुमचे शांत राहणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे.

👉ज्यांना तुमच्या असण्याची किंमत तुमच्या त्यागावर ठरवायची आहे, त्यांच्यासाठी स्वतःला मागे खेचू नका. तुमची स्वाभिमानी पावले हेच तुमचे खरे उत्तर आहे!

तुम्हाला ही लेखमालिका उपयोगी ठरत असेल तर ती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. व्हाट्सअप चैनल ची लिंक शेअर करून इतरांना स्वतःमध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन द्या. 

स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 
(ऑनलाइन कौन्सिलिंग सेशन्स घेतले जातात)

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६

मी नाही म्हणाले तर!? भाग 4

मी नाही म्हणाले तर? भाग 4

आज लिहायला घेतल्यावर मला रोजच्या आयुष्यात घडणारं एक खूप साधं उदाहरण आठवल.
विचार करा, रविवारी संध्याकाळी तुम्हाला घरात शांत बसून पुस्तक वाचायचे आहे किंवा आराम करायचा आहे. एखादा मित्र/ मैत्रीण तुम्हाला अचानक फोन करून बाहेर भेटायला बोलावतो. तुम्ही त्याला सांगता, "आज मला जमणार नाही." पण तो लगेच विचारतो, "का रे? काही दुसरं काम आहे का?" आणि इथेच खरी धावपळ सुरू होते. आपण लगेच ५-६ कारणं द्यायला लागतो— "नाही रे, ते काय आहे ना... आज जरा डोकं दुखतंय, घरचं कामही होतं, आणि जरा कंटाळाही आलाय..."

पण तुम्ही कधी विचार केलाय का, की फक्त 'आज मला जमणार नाही' एवढं बोलणं पुरेसं का वाटत नाही? आपण घेतलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयाचं स्पष्टीकरण दुसऱ्याला का द्यावं वाटतं?

आपण एखादा निर्णय घेतो आणि लगेच तो योग्य कसा आहे, हे सिद्ध करण्यासाठी धडपडू लागतो. 'मी असं का केलं?', 'त्यामागचं कारण काय होतं?' हे सगळं सांगण्याचा ताण आपण सतत घेतो. जणू काही आपलं आयुष्य एका अदृश्य न्यायालयात चाललं आहे, जिथे आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहोत आणि बाकीचे लोक न्यायाधीश आहेत.

पण खरी गोष्ट अशी आहे की, तुम्हाला तुमच्या प्रत्येक निर्णयाचा हिशोब जगाला देण्याची अजिबात गरज नाही.

तुमचं आयुष्य म्हणजे काय लोकांसमोर सादर करायचा अहवाल (report) नाही. "मी हे करतोय/करतेय" एवढं सांगून पूर्णविराम देण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक तुमच्याकडून सतत लांबलचक स्पष्टीकरणं मागतात, त्यांना खरं तर कारणं नको असतात—त्यांना तुमच्यावर नियंत्रण हवं असतं. तुमच्या निर्णयांवर शंका घेऊन तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय काही करू शकत नाही, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयांची उगीचच सफाई देत सुटता, तेव्हा तुम्ही नकळत स्वतःला समोरच्यापेक्षा दुय्यम स्थानावर ठेवता. तुम्ही इथे कोणाची समजूत काढायला किंवा कोणाचं मत बदलायला आलेले नाही.

जर तुम्हाला सतत स्पष्टीकरणं द्यायची सवय असेल, तर एकदा स्वतःला थांबवून विचारा— "मी हे मनापासून बोलतोय, की ही व्यक्ती मला सोडून जाईल या भीतीने बोलतोय?" या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे.

तुमचं स्वातंत्र्य त्या क्षणी सुरू होतं, ज्या क्षणी तुम्ही स्पष्टीकरण देणं थांबवता आणि स्वतःचे निर्णय जगायला सुरुवात करता. ज्यांना तुमची बाजू समजूनच घ्यायची नाहीये, त्यांची खात्री पटवून देण्यात वेळ वाया घालवू नका. तुमच्या रस्त्याने चालण्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या सहमतीची गरज नाही.

शेवटी, तुमच्या निर्णयांचे चांगले-वाईट परिणाम तुम्हालाच भोगायचे आहेत; त्यामुळे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकारही फक्त आणि फक्त तुमचाच आहे.

या सवयीतून बाहेर पडण्यासाठी काही सोपे मार्ग:
१. 'नाही' नंतर पूर्णविराम द्यायला शिका:
निर्णय सांगताना वाक्याच्या शेवटी उगीचच 'कारण...' जोडू नका. "मला हे शक्य नाही" किंवा "मी हा निर्णय घेतला आहे" एवढं बोलून शांत राहा. शांतता राखल्याने तुमच्या शब्दांना वजन प्राप्त होतं.
२. 'नाही' हेसुद्धा एक पूर्ण वाक्य आहे हे स्वीकारा:
तुम्हाला प्रत्येक वेळी सबब सांगण्याची गरज नसते. तुमची इच्छा नसणे किंवा वेळ नसणे हे स्वतःमध्येच एक वैध (valid) कारण आहे.
३. 'पॉज' (Pause) घ्यायला शिका:
कोणीतरी प्रश्न विचारल्यावर लगेच उत्तर देऊन स्पष्टीकरण देण्याची घाई करू नका. २-३ सेकंदांचा ब्रेक घ्या. यामुळे तुमचा मेंदू भीतीतून उत्तर देण्याऐवजी आत्मविश्वासाने बोलण्यास तयार होतो.
४. स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहा:
समोरच्याने "पण असं का?" असं पुन्हा विचारल्यास पुन्हा नवीन स्पष्टीकरण देऊ नका. फक्त "मला आत्ता असंच योग्य वाटतंय" या एकाच वाक्याचा सौम्यपणे पुनरुच्चार करा.
५. अपराधी वाटणे (Guilt) हे स्वाभाविक आहे हे ओळखा:
जेव्हा तुम्ही स्पष्टीकरण देणे बंद कराल, तेव्हा सुरुवातीला थोडं वाईट किंवा अपराधी वाटू शकतं. पण ही भीती म्हणजे तुम्ही चुकीचं वागत आहात असा पुरावा नाही, तर तुम्ही स्वतःच्या सीमा (boundaries) जपायला शिकत आहात याचं लक्षण आहे.
ज्यांना तुमची भाषाच समजत नाही, त्यांच्यासाठी स्वतःचा अनुवाद करत बसू नका. तुमचे निर्णय आणि तुमची कृती स्वतःच स्पष्ट बोलते!
तुम्ही सुद्धा या सगळ्या समस्यांना सामोरे जात असाल तर हे लेख तुमच्यासाठी आहेत. जर तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी या गोष्टी फेस करत असेल तर हे लेख किंवा whatsapp चॅनल ची लिंक त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. 

स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 
(ऑनलाइन कौन्सिलिंग सेशन्स घेतले जातात)

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

मी नाही म्हणाले तर? भाग 3

मी नाही म्हणाले तर? भाग 3

आज मी तुम्हाला रोजच्या आयुष्यात घडणारे एक साधे उदाहरण देणार आहे.

समजा, तुम्ही एखाद्या गर्दीच्या बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये बसला आहात. तुमची हक्काची सीट आहे, पण शेजारची व्यक्ती हळूहळू सरकत तुम्हाला अगदी कोपऱ्यात ढकलू लागला. 

आणि तुम्ही सुद्धा स्वतःला त्रास करून घेऊन कसेबसे तिथे ऍडजस्ट करता. पण त्या व्यक्तीला "अहो, जरा नीट बसा ना" असं सांगायला घाबरता. का? कारण तुम्हाला वाटतं, "मी असं बोललो तर समोरच्याला राग येईल का? मी जास्त जागा घेतो आहे का?"

आपल्यापैकी बहुतेकांचं आयुष्य असंच सुरू आहे. आपण सतत स्वतःला आक्रसून घेऊन इतरांना जागा करून देतोय आणि स्वतःच्याच अस्तित्वासाठी जगाकडून परवानगी मागत आहोत. पण आता हे कुठेतरी थांबवायला हवं.

आपण प्रत्येक गोष्ट करताना वेळ 'योग्य' आहे का, हे शोधत बसतो. स्वतःचा एखादा निर्णय घेण्यापूर्वी दहा जणांचे मत घेतो आणि आपण जसे आहोत तसे जगण्याआधी लोकांकडून संमती(validation)शोधत राहतो. पण याला 'जगणं' म्हणत नाहीत; हा तर स्वतःच्याच हाताने तयार केलेला एक अदृश्य पिंजरा आहे.

जेव्हा जेव्हा तुम्ही उगाचच "सॉरी" म्हणता, स्वतःची चूक नसताना माफी मागता किंवा स्वतःच्या इच्छेसाठी इतरांच्या होकार-नकारावर अवलंबून राहता, तेव्हा तुम्ही स्वतःचे स्वातंत्र्य गमावत असता. या आयुष्याच्या नाटकात तुम्ही काही बाजूला उभे राहणारे extra नाही आहात; तुम्ही तुमच्या आयुष्याचे hero आहात. आणि Hero ने रंगमंचावर उभे राहण्यासाठी कोणाची परवानगी घ्यायची नसते!
👉 शांतपणे श्वास घेण्यासाठी, दमल्यावर विश्रांती घेण्यासाठी किंवा स्वतःचे मत स्पष्ट मांडण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही.
👉 तुम्ही स्वतःच्याच आयुष्यात पाहुणे म्हणून आलेले नाही आहात.
👉 तुमच्या इच्छा आणि तुमची स्वप्ने फक्त तुमची आहेत. ती पूर्ण करण्यासाठी कोणाच्या शिक्क्याची गरज नाही. तुम्ही या जगात आहात, हेच तुम्ही खास असण्याचं सर्वात मोठं कारण आहे.

🤔 जर उद्या कोणी तुम्हाला म्हणाले की तुम्ही 'खूप बोलता', 'खूप जास्त हायलाईट होत आहात' किंवा 'तुमचा त्रास होतोय', तर लक्षात ठेवा—चूक तुमची नाही. समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या सोयीनुसार तुम्हाला लहान करायचे आहे, ही त्यांची अडचण आहे. 

🤷🏻‍♀️कोणाच्या तरी पसंतीस उतरण्यासाठी स्वतःला लहान करून घेऊ नका. तुम्ही स्वतःला जेवढे आकुंचित कराल, तितके तुम्ही स्वतःच्याच नजरेत गायब होऊन जाल.

कधीही न मिळणाऱ्या परवानग्यांची वाट पाहणे आता बंद करा. तुमचा आवाज महत्त्वाचा आहे, तुमच्या सीमा (boundaries) योग्य आहेत आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण मोकळा श्वास घेऊ द्या.

कोणतेही स्पष्टीकरण न देता, स्वतःची हक्काची जागा तयार करायला शिका. 

लक्षात ठेवा , या जगाला तुम्ही इतरांचे ऐकून गप्प बसणारे हवे असतात असे नाही—तर जगाला तुम्ही जसे आहात, तशा तुमच्या खऱ्या रूपाची गरज आहे.

जेव्हा तुम्ही सीमा ठरवायला सुरुवात करता, तेव्हा ज्या लोकांना तुमच्याकडून नेहमी 'हो' ऐकायची सवय झाली आहे, ते अस्वस्थ होतील किंवा रागवतील. पण लक्षात ठेवा, ज्यांना तुमच्या सीमा मान्य नाहीत, त्यांना तुमचा वापर करून घेण्याची सवय झालेली असते.

तुम्ही सुद्धा या सगळ्या समस्यांना सामोरे जात असाल तर हे लेख तुमच्यासाठी आहेत. जर तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणी या गोष्टी फेस करत असेल तर हे लेख किंवा whatsapp चॅनल ची लिंक त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. 

स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सिलर
(ऑनलाइन कौन्सिलिंग सेशन्स घेतले जातात)

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

मी नाही म्हणाले तर? भाग 2

मी नाही म्हणाले तर? भाग 2

👉माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेली एक तिशीतली स्त्री(नावं आणि तपशील बदलले आहेत.) म्हणाली, "मॅडम, मी सगळ्यांसाठी सगळं करते. तरीही कोणीतरी नाराज होईल या भीतीने मला झोप लागत नाही."

🧡लहानपणी तिला एकच गोष्ट वारंवार ऐकायला मिळाली होती: "शहाणी मुलगी आहेस, म्हणून आम्हाला तुझं कौतुक." 
जेव्हा जेव्हा अभ्यासात पहिली आली, वाद घातला नाही, हट्ट केला नाही, तेव्हा घरात कौतुक आणि मायेचा वर्षाव झाला. पण जेव्हा ती चुकली, रडली किंवा नाही म्हणाली, तेव्हा घरात एक थंड शांतता पसरायची. त्या लहान मनाने एक निष्कर्ष काढला: "चांगली वागले, तरच मला प्रेम मिळतं."

मानसशास्त्रात याला आपण "सशर्त स्वीकार" (conditional regard) म्हणतो. अशा वातावरणात वाढलेली मुलं मोठेपणी प्रत्येक नात्यात नकळत परीक्षा देत राहतात. 
👉 नाही म्हणता येत नाही, 
👉 स्वतःच्या गरजा मांडता येत नाहीत, 
आणि 
👉 कुणाचा चेहरा थोडा जरी बदलला तरी "माझं काही चुकलं का?" हा विचार सुरू होतो.

✍️आमच्या कौन्सिलिंग सेशन मध्ये मी तिला एकच होम वर्क दिला: आठवड्यातून एकदा, जिथे भीती वाटते तिथे छोटंसं "नाही" म्हणायचं आणि त्यानंतर नातं टिकतं का ते पाहायचं. पहिल्यांदा ती तयार नव्हती. पण जेव्हा तिच्या मैत्रिणीने फक्त "ठीक आहे, मग पुढच्या वेळी" असं म्हटलं, तेव्हा पुढच्या सेशन ती आली आणि म्हणाली, "म्हणजे मी काही न करताही ती माझी मैत्रीण राहिली?"

हाच तो क्षण असतो जिथे बदल सुरू होतात. प्रेम कमवायचं नसतं, हे डोक्याने कळणं सोपं आहे. पण ते अनुभवाने कळायला वेळ लागतो, आणि सुरक्षित नात्यांमध्येच ते शिकता येतं.
____________________________________

💕लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली गेली, की प्रेम मिळवावं लागतं. नीट वागायचं, गोड बोलायचं, सगळ्यांसाठी हजर राहायचं, शांत बसायचं. असं केलं तरच कोणी जवळ घेईल, असं मनावर ठसवलं गेलेलं असतं. आणि मग कधी चूक झाली, तर वाटू लागलं की मला माया, काळजी, साधी हक्काची मिठी, कोणाची सोबत मिळण्याचा हक्कच नाही.

🟤 पण प्रेम हे बक्षीस नसतं. तो तुमचा जन्मसिद्ध हक्क असतो हे कोणीही सांगत नाही. त्यासाठी कोणतीही परीक्षा द्यायची नसते, आणि तुम्ही किती लायक आहात हे रोज सिद्ध करायची गरज नसते. तुम्ही माणूस आहात, आणि म्हणूनच तुम्ही प्रेमाला पात्र आहात.

🌜"प्रेम कमवावं लागतं" हा विचार म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या पायातली सगळ्यात जड बेडी असते. त्यामुळे तुम्ही अशा शर्यतीत धावत राहता, जिची अंतिम रेषा कधी येतच नाही. कोणाचं तरी लक्ष मिळवायच्या नादात दमून जाता, आणि एक साधी गोष्ट दिसेनाशी होते: जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करतात, त्यांना तुमच्याकडून काहीही नको असतं. ते तुम्हाला मोजत बसत नाहीत, गुण देत बसत नाहीत. तुम्ही जसे आहात तसे ते तुम्हाला स्वीकारतात, तुमच्या चुका, उणिवा आणि तुमच्या गुणांसह सुद्धा.

🙊जे प्रेम कमवावं लागतं, ते खरं प्रेम नसतंच. ते प्रेमाचा मुखवटा घातलेली जबरदस्ती असतं. तुम्हाला कायम कमी पडल्यासारखं आणि कोणाचं तरी देणं लागत असल्यासारखं वाटत ठेवणारा एक सापळा. हे एकदा लक्षात आलं, की ज्यांना तुमची किंमतच कळत नाही त्यांच्या मागे धावणं आपोआप थांबते. 
कोणाकडे लक्ष, वेळ मागत फिरायची गरज नाही, कौतुकाची याचना करायची गरज नाही. आवडण्यासाठी कोणताही मुखवटा चढवायला नको. तुम्ही आत्ता, आहात तसेच, पुरेसे आहात, तुमच्या गुणदोषांसह.

🤷🏻‍♀️एक लक्षात ठेवा: खरं प्रेम तुम्हाला स्पर्धेत उतरवत नाही. ते तुमचं जसे आहात तसंच स्वागत करतं.

👉तुम्ही स्वतःला विचारून पाहा: आज मी कोणासाठी ठरवून किंवा सवयीने "चांगलं" वागतोय, आणि कोणासाठी फक्त "मी" ( काहीही न करता)असू शकतो?

स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सिलर
(ऑनलाइन कौन्सिलिंग सेशन्स घेतले जातात)

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

मी नाही म्हणाले तर ? भाग 1 - गौरी हर्षल

मी नाही म्हणाले तर??? भाग 1

आपल्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणायचं असतं. पण कुठे ना कुठे आपला भिडस्त स्वभाव आडवा येतो आणि आपण होकार देऊन मोकळे होतो. त्यानंतर काय घडतं? त्यानंतर मात्र आपल्याला आपण होकार का दिला? याचा पश्चात्ताप होत असतो. आणि मग स्वतःच्या तत्त्वांना मुरड घालून किंवा इच्छांना मागे सारून आपण होकार दिलेलं काम करतो. बऱ्याचदा ही गोष्ट मनाविरुद्ध केली जाते. 
       कारण नाही म्हणताना आपल्या मनात काही शंका असतात. त्या म्हणजे मी नाही म्हणालो तर, 
✓समोरच्या माणसाला वाईट वाटेल, 
✓त्याच्या मनात असलेली माझी प्रतिमा खराब होईल 
✓आमचे नातेसंबंध खराब होतील 
✓किंवा कदाचित एखादं नातं तुटेल 
पण तुम्हाला खरं सांगू का? मनाविरुद्ध होकार दिल्याने पुढे जाऊन जेवढा तुम्हाला मनस्ताप होतो, तेवढा नाही म्हटल्याने होत नाही. 

लक्षात घ्या आपण इतरांच्या सोयीनुसार ऍडजस्ट करण्यासाठी जन्माला येत नाही. किंवा आपल्या आयुष्याचा मूळ उद्देश हा इतरांचे अहंकार सांभाळून स्वतःचे अस्तित्व धोक्यात आणणे हा नसतो. 

जेव्हा जेव्हा इतरांना नकार न देता त्यांना बरं वाटावं म्हणून तुम्ही पडती बाजू घेता, तेव्हा तेव्हा कुठेतरी तुम्ही स्वतःवर अन्याय करत असता. 

आणि खूपदा काय होतं की आपल्या खांद्यावर येऊन पडलेल्या या ओझ्याला आपण दयाळूपणा असं गोंडस नाव देतो. 
पण हा दयाळूपणा नसतो कुठे ना कुठेतरी आपण नकळत भावनिक दृष्ट्या समोरच्या व्यक्तीचा अहंकार सांभाळत असतो. 
आणि जेव्हा आपण ठामपणे नकार देतो, तेव्हा आपण आपल्या खांद्यावर गरज नसताना येऊन पडलेल्या होकाराचे ओझे दूर करतो. 
👉असं करणं अजिबात चुकीचं नसतं.उलट हे तुमच्या स्वतःसाठी सगळ्यात जास्त गरजेचं असतं. 
🍃आता एक छोटीशी गोष्ट करा.🍃
शांतपणे बसून चिंतन करा. खाली काही मुद्दे दिले आहेत त्यांचा तुम्हाला विचार करताना उपयोग होईल. 
1. मनात नसताना सुद्धा एखाद्या ठिकाणी आलेले आमंत्रण तुम्ही स्वीकारले होते. 
2. इच्छा नसतानाही तुम्ही इतरांच्या तक्रारींचा पाढा ऐकून घेतला. 

मनाविरुद्ध दिला जाणारा होकार हा नकळतच तुमच्या स्वतःच्या प्रगतीत अडथळा असतो. तर ठामपणे दिला जाणारा नकार मात्र तुमच्यासाठी नवीन दरवाजा उघडतो. ठामपणे नकार दिल्यानंतर बऱ्याचदा व्यक्तींना मनावरच ओझं दूर झाल्याची जाणीव होते. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की, तुम्ही नाही म्हटल्याने तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तींना फरक पडत नाही. 

जर एखादी व्यक्ती तुम्ही नाही म्हटल्याने राग व्यक्त करत असेल, तुम्हाला स्वार्थी असल्याचे लेबल लावत असेल तर ती व्यक्ती तुमची जवळची व्यक्ती नाही हे लक्षात घ्या. कारण मुळातच या कृतीचे मूळ कारण हे नियंत्रण गमावणे असते. आणि तुम्ही इतरांकडून नियंत्रित करण्यासाठी जन्माला आलेले नाहीत हे नक्की. 

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनाप्रमाणे श्वास घेण्याचा, जगण्याचा, निर्णय घेण्याचा शिवाय कारण नसताना माफी न मागण्याचा अधिकार असतो. 

त्यामुळे नकार दिल्यानंतर आपण वाईट व्यक्ती ठरतो हे स्वीकारणं बंद करा. बऱ्याचदा आपल्याकडून मिळणारा फायदा बंद होणार असल्याने समोरच्या व्यक्ती अशा प्रकारे त्यांची मते आपल्यावर लादत असतात. आणि तुमचे व्यक्तिमत्व हे इतरांच्या मतांवर आधारित नसते. 

सो मनाविरुद्ध गोष्ट करण्यापेक्षा ठामपणे नकार देणे ही सध्याच्या काळात अतिशय आवश्यक गोष्ट ठरलेली आहे. कारण तिचा आपल्या मनस्थितीवर, आपल्या दैनंदिन कामकाजावर खूप खोलवर परिणाम होत असतो. 

तुम्हाला सुद्धा इतरांना नकार देताना त्रास होतो का? त्यावर तुम्ही कशी मात करता? कमेंटमध्ये नक्की सांगा.
स्वतःला शोधताना - गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सिलर
(ऑनलाइन कौन्सिलिंग सेशन्स घेतले जातात)