गीतसप्तक भाग २
#गीतसप्तक भाग २
बस इतना सा ख्वाब है
जो भी चाहूँ वो मैं पाऊँ
जिंदगी में जीत जाऊं
चाँद तारे तोड़ लाऊं
सारी दुनिया पर मैं छाऊँ
बस इतना सा ख्वाब है
आपल्याला कळतही नसतं तेंव्हापासून आपण स्वप्नं बघत असतो. ही स्वप्न म्हणजे नक्की काय असतं तर आपल्या मनात निर्माण झालेल्या इच्छा. त्या कधी आपण उघड उघड सांगतो कधी नाही सांगत. पण हे गाणं मात्र प्रत्येकाच्याच मनात कधी न कधी येणाऱ्या इच्छा सांगतं. मलातरी आवडतं स्वप्नं बघायला काही क्षणांसाठी का होईना त्या जगात हरवून जायला.
अर्थात एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंतच तिची ओढ असते. यावरून अजून एका गाण्याची ओळ आठवली, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावेल वेड जिवा. एखादं गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जितकी जिवापाड मेहनत करतो तितकाच किंबहुना जास्त आनंद मिळतो ती गोष्ट मिळाल्यावर. तरीही स्वप्न पाहणं हे कायमच आवडत कारण स्वप्न एक आशा सतत जागी ठेवतात मनात की मिळेल 'कष्टाचं फळ' आज न उद्या नक्कीच मिळेल.
पण इथे मात्र त्या गाण्यातील हिरोला सगळं हवं असतं. अगदी चंद्र, ताऱ्यांपासून ते ऐश्वर्य, प्रसिद्धी, कौतुक सगळंच. झटपट असं सगळं मिळवण्याचा त्याचा प्रयत्न त्याला पुढे योग्य ती समजही देतो. पण आपणही कळत नकळत बऱ्याचदा देवाला मागतच असतो काही न काही. ते मिळत नाही म्हणून हताशही होऊ नये आणि प्रयत्न करणही सोडू नये.
आता काही जण हेही म्हणतील की नुसती स्वप्नंच बघायची का? तर नाही अशी स्वप्नं बघायची जी आपल्याला एक ध्येय देतील आणि तिथे पोहोचण्यासाठी सतत जागं करत राहतील. जेणेकरून वाटेत येणाऱ्या अडचणी पार करत आपण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहू. बाकी सगळं मिळालं तरी अजून हवच असतं माणसाला. ज्या दिवशी माणूस समाधानी होण्याचं स्वप्न बघून ते पूर्ण करेल तो दिवस खरा.
©गौरी हर्षल कुलकर्णी
टिप्पण्या