सुखी माणसाचा सदरा

#सुखी_माणसाचा_सदरा
सिग्नलला गाडी थांबली की माणसांचं निरीक्षण करण्यात मज्जा येते. कुणी मस्त हसून जात असतो, कुणी जोरजोरात फोनवर बोलताना दिवसभराचा कार्यक्रम सगळ्या जगाला ऐकवत असतो. प्रत्येकाची निराळी तऱ्हा आज मात्र दोन विरोधी दृश्य एकाच वेळी दिसली अन् कुठेतरी माणसाच्या मनोवृत्तीबद्दल आश्चर्य वाटलं.
पहिलं दृश्य 
हातगाडीवर फळं विकणाऱ्या नवराबायकोची जोडी.
दुपारची वेळ असल्याने गाडी बाजूला लावून  दोघेही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाखाली गोणपाट अंथरून जेवायला बसले होते. त्याही ठिकाणी आग्रह करून करून एकमेकांना वाढत आणि गप्पा मारत आनंदात होते. टचवूड अगदी अस वाटलं.
तर दुसरं दृश्य
जराशी जुन्या मॉडेलची चारचाकी. चालवणारे वडील आणि किती भिकारड्या गाडीत मला बसवलं आहे असा चेहरा करून बसलेले चिरंजीव. गाडी जुनी असली तरी टकाटक होती. मुलाच्या चेहऱ्यावर असणारे भाव लक्षात आल्याने वडीलही अक्षरशः सूड उगवल्यासारखे गाडी चालवत होते. कदाचित बाकी आधी काही घडलं असेल ही त्यांची मनस्थिती खराब होण्यासारखं. पण गाडीबद्दल राग आहे हे ते ज्या नजरेने इतर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या न्याहाळत होते त्यावरून कळलं. 
क्षणभरासाठी त्या गाडीसाठी वाईट वाटलं ती तर तिचं काम चोख करत होती त्यांना उन्हापासून वाचवत होती. कदाचित कित्येक वर्षांपासून तिने कितीतरी वेळा त्यांना उन्हापासून पावसापासून वाचवलं असेल अशावेळी मस्त हसरा चेहरा ठेवून तिला वागवलं तर काय वाईट. पण माणसाची खोड असते त्याला समोर असलेल्या सुखापेक्षा नसलेल्या गोष्टीचं दुःख जास्त त्रास देतं. दुसरीकडे ते साधस जोडपं मात्र आहे त्यात सुखी होतं आनंदात होतं. खऱ्या अर्थाने श्रीमंत होतं त्या क्षणी.
घर बंगला, गाडी , ट्रिप , महागड्या वस्तू, ह्या गोष्टी मागे ऊर फुटेपर्यंत धावताना कुठेतरी बरंच काही हरवतो आपण हल्ली. सोशल मीडियावर चकचकीत दिसणाऱ्या गोष्टी म्हणजेच आयुष्य हे आईवडील नकळतच मुलांमध्ये रुजवत आहेत. ह्या मॅरेथॉन मध्ये फक्त धावायचं का कशासाठी कुठे पोचायचं आहे ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच अस नाही. पण ह्या सगळ्यात सुख मात्र निसटत चाललंय. सुखाची व्याख्या ही मात्र ज्याने त्याने ठरवावी अन् ठरली तर थोडी हिंमत करावी खऱ्या अर्थाने सुखी होण्यासाठी. 
सुखी माणसाचा सदरा खरंच मिळेल का ते नाही माहीत पण प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. 
बाकी दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु!!!# गौरीहर्षल
२८.११.२०१९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी