स्वतःला शोधताना

स्वतःला शोधताना
आपल्या आजूबाजूला जिवंत माणसंच राहतात हे विसरतोय का आपण? विशेष असं काही नाही पण सहजच फोनच्या गॅलरीकडे आज नजर टाकली. जास्त प्रमाणात निराश, दुःखी मनस्थिती असताना सेव्ह केलेल्या वाक्यांच्या इमेजेस सापडल्या. त्या उडवत असतानाच जाणवत राहीलं की मी एकटीच अशी नाहीये बरेच जण हेच करत आहेत. राग आला म्हणून, वाईट वाटलं म्हणून अशा इमेजेस फेसबुक किंवा वॉट्सएप च्या स्टेटसवर अडकवायच्या. ह्या मागे इच्छा एकच असते ज्याचा राग आला आहे त्याला ते समजावं आणि जगालाही कळावं की आपण वाईट मनस्थितीत आहोत. मी तर गेले कित्येक दिवस हे सगळं करतेय मलाही ठाऊक नाही. पण कुठेतरी असं वाटलं की असं केल्याने मला किंवा त्या परिस्थितीत माझ्या मते दोषी असणाऱ्या व्यक्तीला फरक पडला आहे का? तर उत्तर अर्थातच नाही असं मिळालं. का?? कारण 
१. मी किंवा समोरच्याने संवादच साधला नाही. त्यामुळे प्रश्न आहे तिथेच राहिला आणि गैरसमजांचा घडा मात्र भरत गेला. परिणामी नातं फक्त तोंडावर हसून वेळ मारुन नेण्याइतक जिवंत राहिलं. 
२. समोरच्याला माझ्या मनात काय आहे हे न कळल्याने मला मात्र जास्तच त्रास झाला. त्याचा परिणाम माझं खाणंपिणं, विचार करणं आणि एकंदरीत रुटीन लाइफ हे बिघडण्यात झाला. 
मग यावर उपाय काय??? उपाय नेहमीचा जो खूपच चावून चोथा झाला आहे तोच दुर्लक्ष करणे😝😝 हो पण यात एक गंमत मी स्वतःसाठी शोधली ती म्हणजे जेंव्हा जेंव्हा असे वाईट,दुःखी विचार मनात आले मी त्याच्या उलट विचार सगळीकडे शोधू लागले. म्हणजे सकारात्मक विचार जे मला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. फक्त एवढंच नाही तर प्रत्येकवेळी त्या मनस्थितीच्या उलट विचार शोधला आणि तो समोर आल्यावर मनात काय काय विचार येतात ते कागदावर उतरवत गेले. बदल अर्थातच लगेच नाही घडला कारण सुरुवातीला फक्त मनातली खदखद बाहेर पडत असे. पण तेही होऊ दिलं हळूहळू मात्र खदखद संपून खरंच त्या प्रसंगातून स्वतःला काय शिकायला मिळालं ते लिहिलं जाऊ लागलं. हे सगळं फक्त स्वतःपुरत बरका😝😝 पण मग 15 दिवसात लक्षात आलं की खरंच गरज आहे का किंवा असते का इतकं टोकाला जाऊन कुणाचं वागणं, बोलणं मनावर घेण्याची??? आपल्याला दुखावून समोरची व्यक्ती जर काही झालंच नाही अशा थाटात जगत असते तर आपण स्वतःला कोणत्या चुकीची शिक्षा देत असतो??  मग मात्र ठरवलं की राग येणं, वाईट वाटण हे तर होतच राहणार आहे पण दरवेळेस असं झालं की आपल्या मनाचा तो दरवाजा उघडायचा जो आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. ते ठिकाण म्हणजे आपल्या नव्या विचारांचं दालन जे प्रत्येक चुकीची, अयोग्य वाटणारी गोष्ट एका नव्या नजरेतून दाखवेल. हा सगळा प्रवास स्वतःचा स्वतःसोबतच असणार आहे त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे शोधण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. आणि इतर कुणाच्या येण्याची वाट बघत बसण्याचीही गरज नाही.  
मला तरी सापडतय बरच काही बघा तुम्हाला काही सापडतय का ?? कदाचित रोजच्या व्यवहारात हरवून गेलेले तुम्हीच सापडताल. प्रयत्न करण्यात तोटा काहीच नाही झाला तर फायदाच आहे so give it a chance. 
बाकी दत्तात्रेयार्पणमस्तु!!! 
#गौरीहर्षल
१४.७.२०१८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी