गीतसप्तक भाग ४

#गीतसप्तक
कितीक् हळवे, कितीक् सुंदर, 
किती शहाणे आपूले अंतर
हे गाणं ऐकताना मला नेहमी असं वाटत राहतं की असं समंजस मैत्रीचं नातं कुणासोबत तरी जुळवून यावं. एकमेकांना समजून घेत असतानाच एकमेकांना हवी तितकी स्पेस देणंही तितकंच गरजेचं असतं. अर्थात ही प्रक्रिया दोन्हीकडून व्हायला हवी तरच अपेक्षित असा प्रतिसाद मिळतो.
आणि हे खरं तर फक्त मैत्रीतच होण्याऐवजी प्रत्येक नात्यात व्हावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने याचा वेगळा अर्थही सुचेल कदाचित. 
पण कधी कधी स्वतःच्या असण्याचा हट्ट न धरताही बरेच जण आपल्या मनात घर करून जातात. अशा लोकांना रोज भेटण्याची,बोलण्याची गरज नसते. पण गरज पडलीच तर पहिल्या हाकेला ह्या व्यक्ती धावत येतील ही खात्री असते. अशी माणसं, अशी नाती मनापासून जपण्याची हल्ली खूप गरज पडतेय. कारण योग्य वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर ह्या व्यक्ती अलिप्त होतात त्यांच्याही नकळत. अर्थात नातं तोडणं त्यांना कधीच मान्य नसतं खरतर त्यांना जमणारच नसतं. पण मग असून अडचण नसून खोळंबा होण्यापेक्षा थोड्याश्या अंतरावरूनच ते सर्व काही बघत राहतात. व्यक्तिपरत्वे जसे स्वभाव वेगळे तसे अनुभवही. 
अगदी असाच मित्र दुसऱ्या कुणी आपल्यासाठी होण्यापेक्षा आपणच कुणासाठी होऊन बघावं. आपल्यासाठी कुणीतरी आहे ही भावनाही हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अजून धावण्यासाठी बळ देते. करून तर बघायला हवं त्यासाठी आधी  स्वतःशीच मैत्री करावी लागेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी