शुक्रवार, २७ मार्च, २०२०

ख्वाहिशे

कभी दबे पाँव जो मिलने आती है ,
कोई देख न ले जाते हुए इसलिए 
चुपकेसे चली जाती है ख्वाहिशें।
समझदारी ने कंधोपे जो बोझ रख दिया है 
वो देखके जाते जाते 
हल्केसे मुस्कुराती है ख्वाहिशें।
हमारी मुलाकात में 
मुझे मिल जाता है सुकून
न जाने कैसा,
हलका हलका लगने लगता है
उतरा हो कोई कर्ज जैसा।
५.३.२०२०
#गौरीहर्षल

समांतर

दोन समांतर रेषा आहोत आपण
एकाच दिशेने जाणाऱ्या
पण तरीही वाटा वेगळ्याच आहेत आपल्या
स्वतःच्या धुंदीत वळणाऱ्या
तू शोधत आहेस तुझ्या मनातलं सुख चौफेर
माझ्या मनात मात्र सतत आठवणींचा फेर
तुझ्या वाटेवर आहेत असंख्य व्यक्ती 
वेळोवेळी नातं टिकवण्यासाठी धावणाऱ्या
माझ्या वाटेवर आहेत सावल्या
मुखवट्या मागे लपणाऱ्या
तुला झाली आहे सवय 
खोट्यालाही  खर मानून जगण्याची
मला अजूनही आहे जुनीच खोड 
खऱ्यालाही पारखून घेण्याची
चुकून कधी आपल्या नजरा एकमेकांना भिडल्या
तर हसतो आपण सवयीने
पण तुला आणि मला ही माहिती आहे
कायमस्वरूपी वेगळे ठेवले आहे आपल्याला  नियतीने
समांतर असण्याचे आपले असे फायदे आहेत
तुझ्या माझ्या जगाचे आपापले कायदे आहेत

26.2.2020

गीतसप्तक भाग ५

#गीतसप्तक
मन धागा धागा
मला आवडलेलं हे अजून एक गाणं. ह्याचं  प्रत्येक कडवं मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय. 
१.
       असे कसे बोलायचे न बोलता आता
       तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
       डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
       सांगा जरा असे कसे लपायचे रे आता
         मन धागा धागा जोडते नवा
          मन धागा धागा रेशमी दुवा
  तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं.....
२. 
             एकटी मी दिनरात तरीही तू भोवती
               हातात नाही हात तरीही तू सोबती
                     मन बेभान बेभान होई
                     मग प्रीतीला उधाण येई
                    मन धागा धागा ......
एका सोल्जरची बायको. दूर असूनही घरातल्या प्रत्येक वस्तूशी आणि तिच्याशी त्याच्या अबोल आस्तित्वाचं नातं आणि त्यासोबत तिची चालू असलेली रोजच्या जगण्यातली धावपळ. पदोपदी त्याची आठवण तिला अस्वस्थ करतेच पण त्याचबरोबर तिला बळही मिळतं सगळं निभावून नेण्यासाठी. 

३.
                रोज बहाणे नवे शोधून मी थकते
                 तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
                    क्षण आतूर आतूर झाले
                       रोज काहूर काहूर नवे
                  मन धागा धागा......
हे तिसरं आणि शेवटचं कडवं. ह्या ओळी मला ना अशी एक वेगळीच आठवण करून देतात. म्हणजे नवीन असं काहीतरी नुकतंच घडू लागलंय आयुष्यात मग ते त्याच्या असो किंवा तिच्या. आणि ते जे काही आहे ते प्रेम वगैरेंपेक्षा वेगळं आहे कदाचित ती एक नवी सुरुवात आहे एखादया नव्या कामाची, छंदाची किंवा सगळं मळभ दूर झाल्यानंतर उगवणाऱ्या नव्या दिवसाची. ज्याची नकळत आपण सगळेच वाट बघत असतो रोज. मनासारखं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असतं कदाचित तेच घडण्याची सुरुवात.......
      कदाचित माझ्यासाठीही नवा अर्थ लपलेला असेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग ४

#गीतसप्तक
कितीक् हळवे, कितीक् सुंदर, 
किती शहाणे आपूले अंतर
हे गाणं ऐकताना मला नेहमी असं वाटत राहतं की असं समंजस मैत्रीचं नातं कुणासोबत तरी जुळवून यावं. एकमेकांना समजून घेत असतानाच एकमेकांना हवी तितकी स्पेस देणंही तितकंच गरजेचं असतं. अर्थात ही प्रक्रिया दोन्हीकडून व्हायला हवी तरच अपेक्षित असा प्रतिसाद मिळतो.
आणि हे खरं तर फक्त मैत्रीतच होण्याऐवजी प्रत्येक नात्यात व्हावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने याचा वेगळा अर्थही सुचेल कदाचित. 
पण कधी कधी स्वतःच्या असण्याचा हट्ट न धरताही बरेच जण आपल्या मनात घर करून जातात. अशा लोकांना रोज भेटण्याची,बोलण्याची गरज नसते. पण गरज पडलीच तर पहिल्या हाकेला ह्या व्यक्ती धावत येतील ही खात्री असते. अशी माणसं, अशी नाती मनापासून जपण्याची हल्ली खूप गरज पडतेय. कारण योग्य वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर ह्या व्यक्ती अलिप्त होतात त्यांच्याही नकळत. अर्थात नातं तोडणं त्यांना कधीच मान्य नसतं खरतर त्यांना जमणारच नसतं. पण मग असून अडचण नसून खोळंबा होण्यापेक्षा थोड्याश्या अंतरावरूनच ते सर्व काही बघत राहतात. व्यक्तिपरत्वे जसे स्वभाव वेगळे तसे अनुभवही. 
अगदी असाच मित्र दुसऱ्या कुणी आपल्यासाठी होण्यापेक्षा आपणच कुणासाठी होऊन बघावं. आपल्यासाठी कुणीतरी आहे ही भावनाही हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अजून धावण्यासाठी बळ देते. करून तर बघायला हवं त्यासाठी आधी  स्वतःशीच मैत्री करावी लागेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग ३

#गीतसप्तक
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
'चॉकलेटचा बंगला' कल्पनाच किती मस्त आहे ना? चॉकलेट आवडत नाही अशी फार कमी माणसं आजूबाजूला सापडतील. लहान मुलांना आपल्या पार्टीत घ्यायचं म्हटलं की मोठया ताईदादांच्या कडून हमखास दाखवलं जाणारं आमिष. 
प्रमाणाबाहेर खाल्लं तर त्याचे तोटेही आहेतच. पण आज नको त्यावर बोलायला. पूर्वी काही ठराविक चॉकलेट मिळायची आता मात्र इतके सगळे प्रकार, इतक्या सगळ्या चवी असतात की खाणारा गोंधळून जातो. 
लहान मुलांच्या मनोराज्यात हळूच शिरून लहान होऊन गेल्याचं फिलींग हे गाणं देतं. ह्या गाण्याच्या संकल्पनेशी मिळताजुळता एक धडाही होता मला. त्यात कलिंगडाचं घर होतं. भर उन्हाळ्यात अशा मस्त कलिंगडाच्या घरात आपण राहतोय ही आयडियाच भारी वाटायची खरंतर अजूनही वाटते.  किती छान असतं ना ते विश्व कसल्याच चिंता काळज्या नसतात. कुणाशी शत्रुत्व नसतं,कसलेही हेवेदावे नसतात. फक्त आणि फक्त निखळ आनंद असतो आयुष्यात. मैत्री,नाती सगळी अगदी मनापासून निभावली जातात. म्हणून तर अगदी प्रत्येकाला मोठं झालं की बालपण खुणावत असतं. जितकं निरागस मुलांचं विश्व असतं तितकंच किंबहुना त्याच्या जवळपास सुद्धा न जाणारं जग मोठेपणी त्यांना भेटतं. आणि मग हळूहळू ते छोटं मूल आत मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात स्वतःला आक्रसून घेतं. फार काही नाही करायचं पण मुलातलं मूल जपताना स्वतः मधल्या मुलालाही जपायला हवं. सगळ्या जगाला एका स्वच्छ नजरेने बघता यायला हवं. दुसऱ्या कुणासाठी नाही पण स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी तरी आनंद निर्माण करता यावा. हळूहळू का होईना बाकी परिस्थितीही बदलेल. आधी आपण तर सुरू करू चॉकलेटचा बंगला बांधायला आयुष्य तर तसंही गोडच आहे अजून गोड होईल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग २

#गीतसप्तक भाग २
बस इतना सा ख्वाब है 

जो भी चाहूँ वो मैं पाऊँ
जिंदगी में जीत जाऊं
चाँद तारे तोड़ लाऊं
सारी दुनिया पर मैं छाऊँ
बस इतना सा ख्वाब है 
 आपल्याला कळतही नसतं तेंव्हापासून  आपण स्वप्नं बघत असतो. ही स्वप्न म्हणजे नक्की काय असतं तर आपल्या मनात निर्माण झालेल्या इच्छा. त्या कधी आपण उघड उघड सांगतो कधी नाही सांगत. पण हे गाणं मात्र प्रत्येकाच्याच मनात कधी न कधी येणाऱ्या इच्छा सांगतं. मलातरी आवडतं स्वप्नं बघायला काही क्षणांसाठी का होईना त्या जगात हरवून जायला. 
अर्थात एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंतच तिची ओढ असते. यावरून अजून एका गाण्याची ओळ आठवली, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावेल वेड जिवा. एखादं गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जितकी जिवापाड मेहनत करतो तितकाच किंबहुना जास्त आनंद मिळतो ती गोष्ट मिळाल्यावर. तरीही स्वप्न पाहणं हे कायमच आवडत कारण स्वप्न एक आशा सतत जागी ठेवतात मनात की मिळेल 'कष्टाचं फळ' आज न उद्या नक्कीच मिळेल.
पण इथे मात्र त्या गाण्यातील हिरोला सगळं हवं असतं. अगदी चंद्र, ताऱ्यांपासून ते ऐश्वर्य, प्रसिद्धी, कौतुक सगळंच. झटपट असं सगळं मिळवण्याचा त्याचा प्रयत्न त्याला पुढे योग्य ती समजही देतो. पण आपणही कळत नकळत बऱ्याचदा देवाला मागतच असतो काही न काही.  ते मिळत नाही म्हणून हताशही होऊ नये आणि प्रयत्न करणही सोडू नये.
आता काही जण हेही म्हणतील की नुसती स्वप्नंच बघायची का? तर नाही अशी स्वप्नं बघायची जी आपल्याला एक ध्येय देतील आणि तिथे पोहोचण्यासाठी सतत जागं करत राहतील. जेणेकरून वाटेत येणाऱ्या अडचणी पार करत आपण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहू. बाकी सगळं मिळालं तरी अजून हवच असतं माणसाला. ज्या दिवशी माणूस समाधानी होण्याचं स्वप्न बघून ते पूर्ण करेल तो दिवस खरा. 
©गौरी हर्षल कुलकर्णी

बिती हुई बतीयां

#बीती_हुई_बतियाँ 

                   बीती हुई बतियाँ कोई दोहराये, 
                  भूले हुए नामों से कोई तो बुलाये
ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले. खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले. 
लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं  कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले. त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.  
माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला.
जुनी खेळातली नावं, लुटुपुटूची भांडणं, रुसवे, फुगवे, भातुकली सगळं कसं आत्ता घडत असल्यासारखं नजरेसमोर नाचलं. हातातली कामं आवरत तिने आज जुने अल्बम काढले. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण आणि खूप दिवस टिकेल, पुरेल असं समाधानाचं हसू देऊन गेला तिला. खूप काही आहे आपल्याजवळ पण आपण उगाचच नवीन काहीतरी शोधत फिरतो असा विचार मनात येताच ती स्वतःशीच हसली. 
संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि मुलंही तिचं हे रूप पाहून खुश झाली. तितक्यात तिच्या जुन्या घराजवळचे कुणीतरी काका काकू भेटले आणि काय काय मस्त आठवणी सांगत होते असं नवरा म्हणू लागला. चला, मनातली तगमग योग्य मनापर्यंत  पोचली ह्या विचाराने तिला अजूनच छान वाटलं. पुन्हा एकदा ती गुणगुणू लागली.....
बीती हुई बतियाँ कोई दोहराये,
भूले हुए नामों से कोई तो बुलाये💖💖
#गौरीहर्षल
२८.१२.२०१७

टेक अ चान्स

#टेक_अ_चान्स
"Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be. "

        स्वतःच भिंतीवर चिकटवलेलं  हे वाक्य  सायलीच्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. निमित्त होतं तिच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नाचं. 
      सायली, वय वर्षे 40, सुस्वभावी  उच्चशिक्षित गृहिणी. गृहिणी हा तिचा स्वतःचा चॉईस.मुलं लहान असताना धावपळ करत राहिलो तर खूप काही सुटून जाईल असा तिचा समज होता. म्हणून तिनेच मी करेन एडजस्ट म्हणत चांगली सुरू असणारी नोकरी सोडून घरी राहायचं ठरवलं. त्यावेळी सगळ्यांनी तस तिला वेड्यात काढलं. पण आता काही वर्षांनी तिच्या मुलांना , घराला भेट देणाऱ्या प्रत्येकाला तिने घेतलेला निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागलं. 
       आता कुणी म्हणेल अस वेगळं काय केलं होतं?  खूप काही नाही पण सायली आणि तिचा नवरा राजीव दोघांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या होत्या . दोघांपैकी एक जण घरात असल्याने त्या गोष्टी त्यांना जरा नीट कार्यन्वित करता आल्या इतकंच. त्यांच्या घरात टीव्ही अजिबात नव्हता पण पुस्तकं मात्र भरपूर होती. मोबाईलचा  वापर अनिवार्यच असल्याने तो घरात होता पण वापरण्याचा वेळ मात्र ठरवलेला होता. या आणि अशा इतर लहानसहान सवयीमुळे मुलं आपोआपच वेगळ्या पद्धतीने विचार करू लागली. अर्थातच त्याचा प्रभाव इतर क्षेत्रात दिसू लागला. 
दोन्ही मुलं  स्वतःच्या आवडीनिवडी ओळखून त्या दिशेने वाटचालही करू लागली होती. असो पण आपली गोष्ट सायलीची आहे . आता मुलांची जबाबदारी कमी झाल्याने सायलीकडे खूप मोकळा वेळ असे. यावेळाच काय करावं हे काही तिला सुचत नव्हतं. अशातच तिच्या घराजवळ एक नवीन कंपनी सुरू झाली. कंपनीची मालकीण म्हणजे शेजारच्याच कॉलनीत राहणारी दीप्ती होती. गृहिणी असणाऱ्या बायकांना लक्षात ठेऊनच तिने काही नवीन पद्धती सुरू केल्या होत्या. पण नवखी असल्याने तिचा थोडाफार गोंधळ उडत असे. सायली आणि तिच्या शेजारच्या सगळ्यांना  तिथे येण्याचे आमंत्रण दिले होते. म्हणून सगळं महिला मंडळ आज लवकर काम आवरून दुपारी त्या छोटेखानी मॉल मध्ये पोहोचले. एकाच छताखाली बऱ्याच सोयी देण्याचा प्रयत्न केला होता. पण फक्त स्त्रियांसाठी अन् तेसुद्धा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी खासकरून.  परवडतील असे दर आणि बचतगट वगैरेंच्या मदतीने चालवली जाणारी दुकानं. 
सायली आणि सगळ्या जणी खूपच खुश झाल्या हे सगळं पाहून. अशातच एका ठिकाणी काहीतरी खूप गोंधळ निर्माण झाला अन् सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं. उत्सुकता म्हणून सगळ्या तिकडे वळल्या. बिल काउंटर वर गोंधळ होऊन चुकून काही झाल होतं. दीप्ती कुणाशी तरी फोनवरून येण्याबद्दल बोलत होती. पण तिथेही काहीतरी प्रॉब्लेम होत असल्याने ती जरा गडबडली होती. सायली हळूच तिच्याजवळ गेली आणि तिने मी बघू का असा विचारलं. दिप्तीला आश्चर्य वाटलं पण तिने होकार दिला. थोड्या वेळातच सायलीने बिलात झालेला घोळ सांगत काय चुकलं हेही दाखवलं आणि योग्य भाषेत काम करणाऱ्या मुलींना समजही दिली. दीप्ती हे सगळं बघत होती आणि अचानक तिने एक निर्णय घेतला. 
तिने सायलीच्या समोर पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन संभाळशील का? असा प्रश्न ठेवला. त्याच प्रश्नावर विचार करता करता सायली आज गोंधळली होती. 
संध्याकाळी राजीव आणि मुलं घरी आली तस तिने झालेला प्रसंग त्यांना सांगितला आणि काय करू असही विचारलं. त्यावर मुलं आणि राजीव अर्थातच उत्साहाने म्हटले की संधी  मिळाली आहे तर सोडू नकोस. त्यांनी गोंधळलेल्या तिला तिनेच चिकटवलेलं वाक्य दाखवलं. तिने दिप्तीला होकार कळवला. रात्री उद्या किती आणि काय आवरत निघावं लागेल याचा विचार करतच ती झोपली.
नेहमी 5च्या ठोक्याला उठणाऱ्या  तिला सकाळी मात्र उशिरा जाग आली. अस कस झालं ह्याचा विचार करत ती स्वयंपाक घरात शिरली आणि समोरच दृश्य पाहून चकित झाली. नवरा आणि मुलं सगळं आवरून नुसते तयारच नव्हते तर तिच्यासाठी नाश्ता, एक फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवला होता. ती समोर दिसताच मुलं तिला येऊन बिलगली आणि बेस्ट लक म्हणाली.  इथून पुढे मात्र सायलीला स्वतःला सिध्द करायचं होतं. ते अर्थातच ती करणारच होती. आपलं आवडतं वाक्य मनात घोळवतच सायलीच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली . 

तात्पर्य काय   तर हेच  "Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be." स्वतःला एक संधी तर देऊन बघा कोण जाणे कदाचित सुरेख अस काहीतरी  निर्माण होईल . 
#गौरीहर्षल
१७.७.२०१८

चले आओ

चले आओ इक बार फिर 
उसी मोड़ पर 
जहाँ कभी सूरज डूबा था
हमें देखते हुए
चले आओ इक बार फिर 
उसी मोड़ पर
जहाँ हमारी हँसी सुनकर 
माहौल खुश हुआ करता था
चले आओ इक बार फिर 
उसी मोड़ पर
क्योंकि
आज भी वो मोड़ 
तुम्हारी याद लिए यूँही बैठा है
खुश होनेकी चाह में
आज भी सूरज 
हमारे चेहरे की वो रोशनी ढूँढता है
फिरसे आनेकी चाह में
उम्र छीन ले गयी वो मासूमियत पर 
दिल अभीभी वहीं है
फिरसे जीने की चाह में
चले आओ बस.....
#गौरीहर्षल #१९.१०.२०१९

उधार का इतवार

उधार का इतवार
इतवार  उधार का  लगता है आजकल
पूछूँ मिले तो कहा है मेरे वो अपने पल
अजनबी रास्तो और गलियों में अपना कोई मिलता नहीं
क्या करें अपनोकी गलीसे आजकल मैं भी तो गुजरता नहीं
दरवाजे पर दस्तक मेरे नाम की तो होती है
पर खोलने के बाद मुलाकात काम से ही होती है
बचपन का इतवार लाता था मस्ती के साथ सुकूनभरे पल
आज का इतवार स्क्रीन के साथ ही होता है आंखोंसे ओझल
किसी को मिले अगर सुकूनभरा वो इतवार
मिलवाना जरूर, मुझे भी है उसका इंतजार
#गौरीहर्षल
६.१.२०२०



सामान्य

खरच छान आहे सामान्य असणं
सगळं जगच आपलं आहे असं वाटणं
हसणं, रुसणं, बोलणं , वागणं
असूनही नसणं, नसूनही असणं
कुणाला तरी आठवणीत आठवण
कुणाच्या तरी आठवणीत रेंगाळण

स्वप्नांचे इमले बांधत राहणं
पूर्ण होवो न होवो
सतत स्वप्न बघत राहणं
त्यात रमूनही वास्तवात जगणं
खरच छान आहे सामान्य असणं

असंच रहावं सगळं साधंच
स्वप्नांच्या दारावर सतत तोरण आशेच
वास्तवात न मिळणारी सुखं शोधण्यासाठी
बळ मिळत राहावं प्रकाशाचं
9.1.2020
#गौरीहर्षल

सुखाची व्याख्या

सुखाची व्याख्या असते प्रत्येकाची वेगळी
भौतिक, आत्मिक आणि निरनिराळी
कुणीतरी आनंदी असतं आनंदाच्या कल्पनेत
कुणालातरी सुख गवसतं पैश्याच्या दुनियेत
सुखाच्या शोधात सगळे धडपडत असतात
त्यातले किती जण स्वतःला सापडतात??
दुसऱ्याला आनंदात बघतात आणि होतात दुःखी
असे कसे हे जीव इतरांवर जळून होतील सुखी??
मनापासून सुखात साद हल्ली कुणी घालत नाही
दुःखात मात्र इतरांच्या सोबतीची हवी ग्वाही
सुख म्हणजे काय असतं? 
हाती न लागणारं मृगजळ
सुख म्हणजे काय असतं?
हातातलं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावपळ
सुख म्हणजे काय असत? 
कुणालाही अजूनही सापडलं नाही
तरी त्याच्या मागे आयुष्य खर्ची करणं 
माणसाने सोडलं नाही.
सुख असतं समाधानाने जगण्यात,
आपल्यासोबत इतरांना सुखी असुदे म्हणण्यात.
सुख असत लहान मुलांच्या निरागस हसण्यात, 
नको नको म्हणताना मायेने भरवलेल्या घासात.
सुख असत आपल्या माणसाच्या सहवासात,
कसलीही जाहिरात न करता घालवलेल्या क्षणात.
सुख असत आपल्याच हातात, मनात आणि विचारात,
छोटया छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्यात. 
लिस्ट तशी मोठी सुख सापडणाऱ्या जागांची 
पण 
प्रत्येकाची वेगळी असते न व्याख्या सुखाची......
#गौरीहर्षल
४.१.२०२०





दोन शब्द कौतुकाचे

#दोन_शब्द_कौतुकाचे

       निखिलने लहानपणापासून आईवडील,आजीआजोबा सगळ्यांनाच दुसऱ्याचं भरभरून कौतुक करताना बघितलं होतं. म्हणजे ते उठसुठ कुणाचंही कौतुक करायचे अस नाही. पण जो खरंच काहीतरी छोटीशी का होईना कृती करतोय त्याचं ते कौतुक करायचे. पण ते सुद्धा अस की समोरच्याच्या डोक्यात हवा न जाता तो अजून अजून चांगलं वागण्यासाठी प्रयत्न करेल.
 निखिलला कळू लागलं तसा तो सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा की," समोरचा तर आपल्या बाबतीत चांगलं बोलत नाही किंवा खूप कमी बोलतो मग आपणच अस का करायचं???"
 तेंव्हा त्याचे आजोबा त्याला समजावून सांगत की,"समोरचा आणि आपण ह्यात हाच तर फरक आहे. आपण आपल्या डोळ्यांना, कानांना, मनाला फक्त चांगलं बघण्याची, ऐकण्याची आणि करण्याची सवय लावली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला काही न काही चांगलं नक्की सापडतं. त्याचा खूप फायदा होतो बघ निखिल. आपण जेव्हा समोरच्या व्यक्ती मधून चांगलंच वाचतो न तेंव्हा आपल्याकडे फक्त चांगलंच येतं. मग त्याच्यात नी आपल्यात बाकी पातळ्यांवर किती का फरक असेना आपल्या मनात त्याच्याविषयी नको ते विचार येतच नाहीत. सो आपण खुश राहतो हा झाला आपला फायदा. आता जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टी साठी त्या व्यक्तींचं मनापासून कौतुक करतो तेव्हा नकळत का होईना ती व्यक्ती सुखावते. त्यामुळे होत काय तिच्याही मनात आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होते. आणि त्याबरोबर ती अजून चांगलं काम करण्यासाठी तयार होते आपोआपच. अर्थात हे सगळं सगळ्यांच्या बाबतीत लागू होईलच अस नाही पण आपण मात्र आपलं काम करायचं. काही जणांना आपण जेन्यूईन आहोत हे लगेच कळतं काहींना उशिरा. पण कळतं हे नक्की आणि ह्या कौतुक ट्रॅकवर राहिल्याने  आपल्या आयुष्याची गाडी मस्त चालते. कधी कधी ना माणसाला फक्त कौतुकाची गरज असते आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी. आपण फक्त न मागता देत राहायचं त्याला कुठे खर्च येतो??? तुला एक गंमतही सांगतो कौतुक करण्याची सवय लागली की तू पुढे विसरूनही जाशील कुणाला कौतुकाने काय बोलला होतास, पण हे समोरची व्यक्ती मात्र कधीच विसरणार नाही बघ. आणि कधीतरी अचानक आलेल्या वळणावर तुला ह्या कामाची फळं मिळत जातील न मागता." 
        ह्यातल्या काही गोष्टी निखिलला समजल्या काही नाही, पण आजोबांनी जे काही सांगितलं ते मात्र त्याच्या मनावर कोरलं गेलं होतं. 
जसं आपण म्हणतो की मुलं अनुकरणप्रिय असतात तसच काहीस पुढे निखिलच्या बाबतीत घडत गेलं. घरच्यांनी केलेले हे संस्कार त्याला उत्तम माणूस म्हणून उपयोगीपडत राहिले. पण आजोबांचं एक वाक्य मात्र त्याला अजूनही पटलं नव्हतं ते म्हणजे की,"अचानक आलेल्या वळणावर तुला ह्या कामाची फळं मिळत जातील न मागता."  ते कसं होणार ह्याचा विचार कधीतरी त्याच्या मनात डोकवायचाच. त्याचीही प्रचिती त्याला आलीच लवकर. काही दिवसांनी तो ऑफिसमध्ये असताना त्याला एक फोन आला की तुमच्या आजोबांना चक्कर आल्याने ते फिरायला गेले असताना पडले आणि लोकांनी त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. नेमके आईबाबा आणि आजी नसताना हे झाल्याने निखिलच्या लक्षात येईना काय करावे. तो तसाच हॉस्पिटलमध्ये पोहोचला पण तिथे जाऊन बघतो तर काय आजोबांवर आधीच उपचार सुरू केले होते. काहीतरी गुंतागुंत झाल्याने अर्जंट ऑपरेशनही करणे गरजेचे होते. त्याची प्रोसिजर पूर्ण करून डॉ फक्त निखिलच्या सहीसाठी थांबले होते. निखिल डॉ च्या केबिनमध्ये गेला आणि डॉ ना बघताच त्याला आठवले की हा तर गावी आपल्या शेजारी राहणारा सूरज तो दहावीत नको त्या मुलांच्या नादी लागला होता. हे जेंव्हा त्याच्या घरी कळालं तेंव्हा खूप मारलं होतं त्याच्या बाबानी त्याला. पण निखिलच्या आजोबांनी मध्ये पडत त्याच्या बाबांना समजावलं आणि एक संधी दे मुलाला असही सांगितलं. आजोबांच्या शब्दाखातर सुरजचे वडील तयार झाले. मग आजोबांनी सुरजला वेगळे घेऊन प्रेमाने समजावून सांगितले.काही दिवस सतत आजोबा त्याच्याशी बोलत. आजोबांच्या बोलण्याची पद्धतच अशी होती की सूरजच मन बदलून गेले. त्याने मन लावून अभ्यास केला अर्थातच मार्कही उत्तम मिळाले आणि त्याच  वर्षी बदली झाल्याने ते सगळे दुसरीकडे शिफ्ट झाले. त्यानंतर आजच तो निखिलला भेटत होता आणि तेही एका निष्णात सर्जनच्या रूपात. 
आजोबांचं ऑपरेशन उत्तमरीत्या पार पडले. निखीलसह सगळेच चिंतेत डॉ ची वाट बघत होते. डॉ सूरज समोर येताच सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तसं त्याने हसत हसत सांगितले की,"आजोबा आता ठीक आहेत काळजी करू नका. फक्त शुद्धीवर येण्यासाठी वेळ लागेल."
त्यानंतर मात्र तो आजीकडे वळला धीर गोळा करून इतका वेळ आजी कशीबशी शांत उभी होती. सूरज त्यांचे हात हातात घेऊन म्हटला, "आजी...आज मी जो काही आहे तो फक्त तुम्हा दोघांमुळे त्यावेळेस मला सावरत, वेळोवेळी कौतुक करत तुम्ही जर मला योग्य मार्गावर आणले नसते तर मी आज कुठेतरी हरवलेला असतो. मग अशा आजोबांना मी कसं बरं काही होऊ दिलं असतं?"
सगळ्यांच्याच मनाला ह्या कृतीने खूप आधार मिळाला. 
काही वेळाने आजोबा शुद्धीवर आले हे एक चांगल लक्षण होतं त्यांच्या रिकव्हरीच. थोड्याच दिवसात ते नीट फिरूही लागल्याने घरी आले. एक दिवस असच शांत बसलेले असताना त्यांनी निखिलला विचारलं, "काय रे मग मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर???" तसा निखील हसू लागला. 
      तात्पर्य काय, तर कुणी कसही असुदे, वागुदे आपण मात्र आपल्या मनाला लागलेली चांगली सवय सोडायची नाही. कळत नकळतपणे होत गेलेल्या चांगल्या कृतींचं फळ योग्य वेळी योग्य स्वरूपात मिळतच हे नक्की. 

कौतुक केलं जाणं ही खूप महत्त्वाची भावना असते प्रत्येक व्यक्तीसाठी.  कौतुक करताना ते अर्थातच मनापासून असेल तर समोरच्या माणसाला त्यातला खरेपणा जाणवतोच. तर थोडंस ट्राय करून बघू इतरांचं , त्यांच्या योग्य कामाचं कौतुक करू आणि ते ही वेळेवर. कोण जाणे कधीतरी तो वर बसलेला आपल्या नावाचा कौतुकाचा ब्लॅंक चेक कुणाहाती पाठवेल😄😄 बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! 
शुभं भवतु..
#गौरीहर्षल.  ©Gauri Harshal Kulkarni
१८.७.२०१८

नवी सुरुवात

प्रत्येक नव्या सुरुवातीला जुन्याची काळसर किनार असते
जरी पाटी कोरी केली तरी आधीच्या खुणा दाखवत राहते
पुसत राहण्याचा अट्टहास माणूस सतत करत असतो
कारण पुढे गेल्यावर परत फिरण्यासाठी मार्गच नसतो

तरीही सुरूच असतो नव्याने आयुष्य लिहिण्याचा प्रयत्न
धडपड, धावपळ , निरनिराळ्या उपायांची होतात आवर्तन
कधी कधी ही भट्टी मस्तपैकी जमून येते
त्या काळ्या किनारीची सुंदरशी नक्षी होते

लिहिणं, पुसणं हा खेळ युगानुयुगे चालणारा
माणूस मात्र  होतो फक्त तालावर नाचणारा
खेळतं कोण खेळवतं कोण हे प्रश्न विचारू नयेत असे
प्रत्येक डावाला एकच इच्छा मनासारखे पडावेत फासे

#गौरीहर्षल #१५.११.२०१८

नवीन वर्ष



जीवनातलं अजून एक वर्ष कमी होतंय
काही जुन्या आठवणींना मन मागे सारतंय

काही इच्छा न मागता आपोआप पूर्ण झाल्या
तर काही मात्र ओठांवरही नाही आल्या

काही हात सुटून गेले नकळतच काळाच्या ओघात
काही बंध नव्याने जुळले घेऊन हात हातात

कुठे कुणी उगाचच अडकलं गैरसमजाच्या विळख्यात
कुणाकुणाला मात्र सुख गवसलं नात्यांच्या घट्ट बंधनात

काही जण अजूनही गोंधळात आहेत हवं की नकोच्या
तर काहींना जमलं आहे न्हायला झऱ्यात समाधानाच्या

कुणीतरी जुन्या आठवणीत सुख शोधत बसले आहेत
काहीजण मात्र नव्या आठवणी जोडण्यात गुंतले आहेत

बरंच काही हरवूनही कुणी खूप खुश आहेत
सगळं काही असूनही कुणी खूप दुःखी आहेत

सरत्या वर्षाचा हिशोब प्रत्येक जण मांडत आहे
हात जोडून त्याच्याकडे मनातलं मागत आहे

दिवसांमगून दिवस वर्षांनंतर वर्षं अशीच सरत आहेत
माणसांमधून माणसं नकळतपणे हरवत आहेत 

सुख आणि समाधानाने भरावी ओंजळ हेच आहे साकडे
प्रत्येकाला मिळो योग्य ते मागणे येत्या प्रत्येक क्षणाकडे

#गौरीहर्षल #३०.१२.२०१८




सुरुवात तर करूया

सुरुवात तर करूया
जमलं नाही तर काय
चुकलं सगळंच तर काय
ह्या सगळ्यातून बाहेर पडून नवं काही करूया

सुरुवात तर करूया
राहून गेलेलं करण्यासाठी
पुन्हा एकदा जगण्यासाठी

सुरुवात तर करूया
स्वतःला समजून घेण्यासाठी
स्वतःला वेळ देण्यासाठी

सुरुवात तर करूया 
दुःखातुन उभं राहण्यासाठी
सुखातही जमिनीवर असण्यासाठी

खूप काही नाही करायचं
मिळालेलं आयुष्य भरभरून जगायचं
पण त्यासाठी
सुरुवात तर करूयाव
#गौरीहर्षल
#११.१.२०१९

गोडवा

गोडवा मनांचा हळव्या भावनांचा
न कळेना कुठे हरवून गेला
साद घालणारा ओलावा आवाजाचा
स्मार्टफोनच्या गर्दीत गायब झाला

माणूस अजून जिवंत आहे 
लास्ट सीन सांगू लागले
कुणाला नि कुठे भेटायचं 
स्टेटसवरून कळू लागले

जवळची आणि लांबची नाती 
लाईक वरून ठरू लागली
जन्म,मृत्यू, प्रत्येक बातमी
फेसबुकवर शेयर झाली

पूर्वीच्या काळी माणसांच्या गर्दीत 
शोधावे लागायचे आपले परके 
आता मात्र फ्रेंड लिस्टमध्ये
आपलेच झाले असतात परके 

अशीही ही अधोगती प्रगती म्हणून मिरवतेय
सगळं काही पब्लिक करण्यात माणुसकी मात्र हरवतेय 
#गौरीहर्षल #९.२.२०१९




अवघड

अवघड असतं ना स्वतःला समजावणं
प्रत्येकाच्या चौकटीत सामावून जगणं
तरीही करतात काहीजण अशी कसरत
आयुष्य जगतात स्वतःच्या मनाला मारत
जग देतं त्याला गोंडस नाव चांगुलपणाचं
मग अखंड जगावं लागतं जीवन त्यागाचं
त्यांचा त्रास कुणाला समजत नाही
समजला तरी जाणून कुणी घेत नाही
हळूहळू सवय होते अलिप्त राहून सुखी होण्याची
अन् तीही कधी कधी बळी ठरते स्वार्थी असण्याची
चांगलं वागणं इतकं अवघड होईल हे आता कळू लागतं
पण रक्तात भिनलेलं हे व्रत सोडणं आता शक्य नसतं
गौरी हर्षल

स्वतःला शोधताना

स्वतःला शोधताना
आपल्या आजूबाजूला जिवंत माणसंच राहतात हे विसरतोय का आपण? विशेष असं काही नाही पण सहजच फोनच्या गॅलरीकडे आज नजर टाकली. जास्त प्रमाणात निराश, दुःखी मनस्थिती असताना सेव्ह केलेल्या वाक्यांच्या इमेजेस सापडल्या. त्या उडवत असतानाच जाणवत राहीलं की मी एकटीच अशी नाहीये बरेच जण हेच करत आहेत. राग आला म्हणून, वाईट वाटलं म्हणून अशा इमेजेस फेसबुक किंवा वॉट्सएप च्या स्टेटसवर अडकवायच्या. ह्या मागे इच्छा एकच असते ज्याचा राग आला आहे त्याला ते समजावं आणि जगालाही कळावं की आपण वाईट मनस्थितीत आहोत. मी तर गेले कित्येक दिवस हे सगळं करतेय मलाही ठाऊक नाही. पण कुठेतरी असं वाटलं की असं केल्याने मला किंवा त्या परिस्थितीत माझ्या मते दोषी असणाऱ्या व्यक्तीला फरक पडला आहे का? तर उत्तर अर्थातच नाही असं मिळालं. का?? कारण 
१. मी किंवा समोरच्याने संवादच साधला नाही. त्यामुळे प्रश्न आहे तिथेच राहिला आणि गैरसमजांचा घडा मात्र भरत गेला. परिणामी नातं फक्त तोंडावर हसून वेळ मारुन नेण्याइतक जिवंत राहिलं. 
२. समोरच्याला माझ्या मनात काय आहे हे न कळल्याने मला मात्र जास्तच त्रास झाला. त्याचा परिणाम माझं खाणंपिणं, विचार करणं आणि एकंदरीत रुटीन लाइफ हे बिघडण्यात झाला. 
मग यावर उपाय काय??? उपाय नेहमीचा जो खूपच चावून चोथा झाला आहे तोच दुर्लक्ष करणे😝😝 हो पण यात एक गंमत मी स्वतःसाठी शोधली ती म्हणजे जेंव्हा जेंव्हा असे वाईट,दुःखी विचार मनात आले मी त्याच्या उलट विचार सगळीकडे शोधू लागले. म्हणजे सकारात्मक विचार जे मला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. फक्त एवढंच नाही तर प्रत्येकवेळी त्या मनस्थितीच्या उलट विचार शोधला आणि तो समोर आल्यावर मनात काय काय विचार येतात ते कागदावर उतरवत गेले. बदल अर्थातच लगेच नाही घडला कारण सुरुवातीला फक्त मनातली खदखद बाहेर पडत असे. पण तेही होऊ दिलं हळूहळू मात्र खदखद संपून खरंच त्या प्रसंगातून स्वतःला काय शिकायला मिळालं ते लिहिलं जाऊ लागलं. हे सगळं फक्त स्वतःपुरत बरका😝😝 पण मग 15 दिवसात लक्षात आलं की खरंच गरज आहे का किंवा असते का इतकं टोकाला जाऊन कुणाचं वागणं, बोलणं मनावर घेण्याची??? आपल्याला दुखावून समोरची व्यक्ती जर काही झालंच नाही अशा थाटात जगत असते तर आपण स्वतःला कोणत्या चुकीची शिक्षा देत असतो??  मग मात्र ठरवलं की राग येणं, वाईट वाटण हे तर होतच राहणार आहे पण दरवेळेस असं झालं की आपल्या मनाचा तो दरवाजा उघडायचा जो आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. ते ठिकाण म्हणजे आपल्या नव्या विचारांचं दालन जे प्रत्येक चुकीची, अयोग्य वाटणारी गोष्ट एका नव्या नजरेतून दाखवेल. हा सगळा प्रवास स्वतःचा स्वतःसोबतच असणार आहे त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे शोधण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. आणि इतर कुणाच्या येण्याची वाट बघत बसण्याचीही गरज नाही.  
मला तरी सापडतय बरच काही बघा तुम्हाला काही सापडतय का ?? कदाचित रोजच्या व्यवहारात हरवून गेलेले तुम्हीच सापडताल. प्रयत्न करण्यात तोटा काहीच नाही झाला तर फायदाच आहे so give it a chance. 
बाकी दत्तात्रेयार्पणमस्तु!!! 
#गौरीहर्षल
१४.७.२०१८

रिते रिते

कधी रिते रिते होऊन हरवून जाते
कधी भरलेल्या आभाळासारखे बरसते
मनाचे तर असेच असते...

कधी धरते फेर आठवणींच्या घोळक्यात
कधी शांत बसून राहते आपल्याच नादात
स्वतःच्या तालावर सगळ्यांना नाचवते
मनाचे तर असेच असते...

कधी भिजते चिंब पावसात
कधी रात्र रात्र सरते आसवात
हरवलेल्या क्षणांना आठवत राहते 
मनाचे तर असेच असते...

कधी होते लहान मूल
कधी निर्माल्यातले फूल
कोमेजूनही टवटवीत असण्याचा प्रयत्न करते 
मनाचे तर असेच असते...

©गौरी हर्षल ११.७.२०१९

पॉझिटिव्ह रहा

पॉझिटिव्ह रहा, जगा, विचार करा म्हणणं किती सोपं असतं
प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाचं मन जगण्यासाठी झगडत असतं
त्रास होतोच , वाईटही वाटत आणि रडूही येतच सर्वानाच
पण उघडपणे व्यक्त होण्यासाठी हिंमत नसते कुणालाच
जग म्हणजे कोण ?? २,४जवळचे नातेवाईक नी मित्र
कळवावं का त्यांना मनातलं सगळं लिहून खरमरीत पत्र??
प्रेम, माया, काळजी ,आपुलकी हे सगळे अनुभवायचे असते
त्यासाठी कुणाजवळ तरी व्यक्त होण्याची गरज असते
इथेच मात्र सगळं कसं झाकलं जातं बुरख्याखाली इगोच्या 
वरून दिसतो स्ट्रॉंगपणा आतून मात्र प्रचंड केमिकल लोच्या
विचारणारं कुणीच नाही भेटत तेव्हा लहान व्हावं स्वतःसाठी
स्वतःच्या सगळ्या चुका माफ करत घालावं स्वतःलाच पाठी
आपल्यासाठी इतर कुणी अस काही का करावं??
ज्याचं त्याचं सुख ज्याने त्यानेमनापासून घडवावं
बळजबरीने ओढून ताणून सुख कधी येत नसतं
प्रयत्न केला तर आपल्याच मनात सुखाचं गाव वसतं
इतरांच्या वागण्यातून सतत आनंद वेचायला शिकावं
चिडचिड आणि रागातही मनातलं मूल अलगद जपावं
करावी लागत नाही उगाच धडपड पॉझिटिव्ह होण्यासाठी
मनातल्या मनात सापडते जागा रुसल्यावर बसण्यासाठी
साधा सोपा मंत्र असतो स्वतःला स्वतःच जपण्यात
आपण मात्र वेळ गमावतो नको तिकडे धावण्यात
#गौरीहर्षल #२७.३.२०१९











गुरुवार, २६ मार्च, २०२०

खरंच अस कधी


खरंच असं कधी झालं तर 
सकाळच्या पहिल्या किरणांपासून
पसरत गेला हवाहवासा वाटणारा प्रकाश 
आनंदाचा, चैतन्याचा आणि मन शांत करणारा

खरंच असं कधी झालं तर 
भरून घेताना नवासा श्वास नवीन दिवसात
सोडून गेले सगळे दुःखाचे अडकलेले क्षण
मनातून, स्मृतींतून आणि भरलेल्या त्या डोळ्यांतुन

खरंच असं कधी झालं तर 
आयुष्यात उरलीच नाही जागा
सतत दुःख वाटण्यासाठी आसुसलेल्या
नकोशा गोष्टींना, वस्तुंना आणि माणसांनाही

खरंच असं कधी झालं तर 
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला 
मिळाली एक नवी दिशा
बदलणारी, हसवणारी आणि नकळतच मळभ दूर करणारी 

खरंच असं कधी झालं तर 
जगण्याचा होऊन जाईल उत्सव
सुखा-समाधानाच्या हातात हात घालून
मनाला मिळेल उभारी पुन्हा पुन्हा आशेने जगवणारी.......

#गौरीहर्षल #२०/९/२०१८

कधीतरी मला हवं तसं

कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या

कितीतरी गोष्टी राहून गेल्या आहेत रे करायच्या
मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत याद्या त्यांच्या
निसटलेलं बालपण अन्  न जगलेले असंख्य क्षण
रोज एकदा तरी येऊन जाते मला त्यांची आठवण

आशेच्या झोपाळ्यावर झुलायचे अजून किती
तिथे आजूबाजूला आहेत मोडलेल्या स्वप्नांच्या भिंती
सतत त्या मला खुणावतात वेडावून दाखवल्यासारख्या  
डोळ्यासमोर येतात त्या आठवणी जखमांसारख्या

कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या

न मागता मिळेल असं काहीच नाही ह्या जगात
अन्  मागूनही मिळावं अशी अपेक्षा नाही मनात 
म्हणूनच हे मागणं करतेय, मी तुला आणि मला 
ह्यावेळी तरी देऊ संधी आपल्या त्या जगण्याला

नेमकं मला हवं आहे काय? 
खुप काही नाही फक्त एकदा,
हसायचं आहे मनापासून डोळ्यात पाणी येईपर्यंत
झोपाळ्यावर झुलायचे आहे तो आकाशी नेईपर्यंत 
साधी सोपी स्वप्नं आहेत ज्यांना लागत नाही पैसा
सोबतीला मात्र हवा आहे श्वास मला पुरेसा

खेळ आपला लपंडाव, 
तुझ्यामागे सतत चालू माझी धावाधाव 
कुठेतरी थांबून घ्यायची आहे विश्रांती
प्रवास करताना रस्ता चुकू नये ही हवी आहे खात्री
सगळं नीट होणारच आहे हे कळायला हवे
त्यासाठी आयुष्या आपले नाते जुळायला हवे

म्हणूनच म्हणते ....
कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या, 
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या,
                                     भिज ना रे आयुष्या....
#गौरीहर्षल #२.१०.२०१८


तुमसे ही

#तुमसे_ही
 

गाणं तसं फुल रोमँटिक वगैरे टाइप आहे बर का ...
पण मला आपलं नेहमीची खोड आहे वेगळंच काहीतरी शोधायची ते कसं ते सांगते ....

कशाच्या तरी शोधात निघालेला एक जीव , ज्याला खूप काही हवं आहे आयुष्याकडून. अगदी टिपिकल सामान्य माणसाच्या सारखं सगळी सुखं हवी आहेत. तो ती सतत त्या वरच्याकडे मागत फिरत असतानाच त्याला अस काही गवसतं जे सहजासहजी आजवर कुणालाच मिळालेलं नाही असेच काही पहिल्या कडव्यात येते.....
ना है ये पाना
ना खोना ही है
तेरा ना होना जाने
क्यूँ होना ही है
म्हणजे ज्या शोधात  मी निघालो होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अस काहीतरी मिळालं आहे आणि ते शब्दातीत आहे. जे असूनही नाहीये आणि नसूनही आहे. 

तुमसे ही दिन होता है
सुरमई शाम आती
तुमसे ही, तुमसे ही
हर घड़ी साँस आती है
ज़िंदगी कहलाती है
तुमसे ही, तुमसे ही…

ते जे काही गवसलं आहे न ते सगळ्या चराचरात व्यापून उरलं आहे. त्याच्यामुळेच ही सृष्टी सुरळीत चालू आहे तिला जिवंतपणा, रसरशीत पणा लाभला आहे.जो आयुष्य म्हणवला जातो.

आँखों में आँखें तेरी
बाहों में बाहें तेरी
मेरा ना मुझमें कुछ रहा… हुआ क्या
बातों में बातें तेरी
रातें सौगातें तेरी
क्यूँ तेरा सब ये हो गया… हुआ क्या
इतके दिवस मी हे सगळं माझ्या अज्ञानी डोळ्यांनी बघत होतो पण आता मात्र मला त्याच्या नजरेने ह्या सगळ्याचा एक वेगळाच अर्थ कळतो आहे. जो शब्दांत मांडण्यासारखा नाहीये किंवा खरं तर तो शब्दात वर्णावा असे शब्दच नाहीयेत. निर्सगाशी समरस होणं काय हे मी अनुभवतो आहे. 

मैं कहीं भी जाता हूँ
तुमसे ही मिल जाता हूँ
तुमसे ही, तुमसे ही
शोर में खामोशी है
थोड़ी सी बेहोशी है
तुमसे ही, तुमसे ही…

मी कुठेही जातोय तिथे मला त्याच अस्तित्व जाणवत आहे. इथे अजून एक गाणं आठवलं "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया" अशीच काहीशी अवस्था. शांततेत आणि कोलाहलात सुद्धा जाणवणारे त्याचे अस्तित्व..... कालातीत असे.....

आधा सा वादा कभी
आधे से ज्यादा कभी
जी चाहे कर लूं इस तरह वफ़ा का…
छोड़े ना छूटे कभी
तोड़े ना टूटे कभी
जो धागा तुमसे जुड़ गया वफ़ा का…

त्याला मी आता वचन तरी काय देऊ , त्याच्याकडे मागू तरी काय???? फक्त जोडले गेलेले हे अव्यक्त नाते असेच चिरंतन राहूदे हीच इच्छा....

मैं तेरा सरमाया हूँ
जो भी मैं बन पाया हूँ
तुमसे ही, तुमसे ही…
रास्ते मिल जाते है
मंज़िले मिल जाती है
तुमसे ही, तुमसे ही…

तुझ्या सावलीत मी एक हिस्सा होऊन गेलो आहे , इथून पुढे रस्ते, ध्येय ह्यांची मला काळजी उरली नाही ते आपसूकच मला शोधत येतील ही खात्री आहे.
तू आहेस तिथे कमतरता कशी असेल ???? 
#गौरीहर्षल #७.१०.२०१८

अधीर मत हो मन

अधीर मत हो मन
ये दिन भी जाएंगे
हसते मुस्कुराते खुशी के पल
वापस लौट के आएंगे

तब तक तू धीरज से काम ले
खुदही खुदको थाम ले
रूककर जरा सोच कुछ समय
तभी तो थमेगा ये बिन बुलाया प्रलय

आज तू अगर रुक गया 
समझ बहुत कुछ पाएगा
आनेवाला हर दिन
खुशी भरभर के लाएगा

अधीर मत हो मन
तू ही तुझको संभाल सकता है
तेरा संयम तेरे लिए
वरदान बन सकता है 

थोड़े दिन खामोश रहके 
अपनी ताकत बढा के तो देख
हर कोई जुटा है इसी कश्मकश में 
तू जरा नजर उठा के तो देख

तू अपनी मर्जी का मालिक है
सारी दुनिया जानती है
इसीलिए तो तू खुदको रोक
ना बिना बात के कर नोंक झोंक

मिले हुए पलों में खुशियां बटोर ले 
चार दिन अपनों के साथ बाँट ले
सबकुछ अब तुझपे निर्भर है
तेरे ही हाथों में कल की डोर है

इसीलिए कहती हूँ
अधीर मत हो मन 
उम्मीद से भर दे तू
आज मेरा आँगन
#गौरीहर्षल
२५.३.२०२०

अलक

#अलक

१.  रोज तिच्या "लवकर या बाबा" कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या बाबाच्या गळ्याशी तेच शब्द येऊन अडकले. पण ती मात्र छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन आज कधी न परत येण्याच्या प्रवासाला निघाली होती. 
कारण एकच ती मुलगी होती 

२. उदया ओपन डे साठी बाबा शाळेत येणार  म्हणून रात्र तिने आनंदात घालवली. पण ते मात्र मिटिंगच कारण देत तिच्या वर्गात न येताच निघून गेले.डोळ्यातलं पाणी आवरत ती गुपचूप बसून राहिली .
कारण तेच ...

३. लग्नाचा विषय निघाल्यावर इतर मुलींसारखी तीही सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली. पण घरात होणारे आनंदी बदल तिच्या नजरेतून सुटले नाहीत. इतकी वर्ष समोर न येऊ दिलेली भावना आता मात्र प्रकर्षाने जाणवली. अन् अनेक नकोशा आठवणी डोळ्यांतून वाहू लागल्या.
कारण तेच ....

४. नवीन घरात रुळू लागल्यावर जेंव्हा तिला नणंदेची अवस्था आपल्यासारखीच आहे हे जाणवलं. तेंव्हा नकळतच तिने तिला कुशीत घेत स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. 
पण ह्यावेळी कारण वेगळं होतं 
तिने आता ठरवलं होतं कुणालाही  "नकोशी" असण्याच दुःखच होऊ द्यायचं नाही. नकळतच तिचा हात स्वतःच्या पोटावर निर्धाराने विसावला. 
कारण तेच ....

#गौरीहर्षल
#२४.४.२०१९ 

प्रश्न ही तूच उत्तरही तूच

#प्रश्नही_तूच_अन्_उत्तरही_तूच
ध्यान संपवून त्यांनी डोळे उघडले तशी ती मोठया आशेने समोर बसलेली त्यांना दिसली. तिच्याकडे बघत त्यांनी मंद स्मित केलं. आणि मग आपले गंभीर पण आश्वस्त डोळे तिच्या नजरेत मिसळत ते म्हटले, "बोल, कशाचं उत्तर हवंय?" 
थोडंस चुळबुळतच ती म्हणाली, "उत्तर नकोय मला ह्यावेळी. सुटका हवीय ह्या सगळ्यातून. चूक नसताना जे गमावलं ते तर कधीच परत येणार नाही. पण हुरहूर मात्र कायम राहील. म्हणूनच सुटका हवीय मला." 
अत्यंत प्रेमाने तिच्याकडे बघत ते बोलु लागले,"सुटका अशी मागून मिळत नसते लेकरा. तुझं नुकसान भरून येईल असं मी म्हणत नाही पण निदान येणारा काळ त्यावरच औषध असेल हे नक्की. राहिला प्रश्न तुझ्या ह्या सुटका प्रश्नाचा तर ती तुझी सध्याची मनस्थिती बोलते आहे. आत्ताच तुला सत्य कळालं आहे ते पचवणं त्यातून बाहेर पडणं ह्यासाठी मनाला वेळ लागेल. चुकार मेंढरासारखं ते अजून काही दिवस तुला त्रास देणारच. पण त्याला सतत योग्य मार्गावर आणण फक्त तुझ्या हातात आहे आणि ते तुला जमेल ह्याची मला खात्री आहे." मग थोडंस थांबून त्यांनी तिच्याकडे बघितलं कुठेतरी तिच्या मनात सुरू असलेली खळबळ जरा शांत झाली आहे ह्याचा त्यांना अंदाज आला. दीर्घ श्वास घेत ते पुढे बोलू लागले, "तुला प्रश्न पडतात आणि उत्तरं ही हवी असतात. पण तुला संयम नसतो. काही गोष्टींची वेळ ठरलेली असते त्याशिवाय त्याबाबतीत प्रत्यक्ष परमेश्वर ही ढवळाढवळ करू शकत नाही. मग अशावेळी चुकूनही होणारी चूक भयंकर महागात पडू शकते. बाकी तुला राग येईल पण नव्याने तुझ्या मनात जन्म घेतलेल्या प्रश्नांच्या बाबतीत मी इतकंच म्हणेन की योग्य वेळ आली की योग्य व्यक्ती उत्तरं घेऊन तुझ्यापर्यंत नक्की येतील. तोपर्यंत काळजी घे आणि पेशन्स म्हणजेच संयम ठेव." अस म्हणत त्यांनी पुन्हा डोळे बंद केले. पण ह्यावेळी चेहऱ्यावर गंभीर भाव नव्हते तर प्रसन्नता होती. तिचं प्रसन्नता आहेरसारखी सोबत घेत तीही तिच्या वाटेने निघाली. 
#अध्यात्मवगैरे 
©गौरीहर्षल १७.६.२०१९

सुखी माणसाचा सदरा

#सुखी_माणसाचा_सदरा
सिग्नलला गाडी थांबली की माणसांचं निरीक्षण करण्यात मज्जा येते. कुणी मस्त हसून जात असतो, कुणी जोरजोरात फोनवर बोलताना दिवसभराचा कार्यक्रम सगळ्या जगाला ऐकवत असतो. प्रत्येकाची निराळी तऱ्हा आज मात्र दोन विरोधी दृश्य एकाच वेळी दिसली अन् कुठेतरी माणसाच्या मनोवृत्तीबद्दल आश्चर्य वाटलं.
पहिलं दृश्य 
हातगाडीवर फळं विकणाऱ्या नवराबायकोची जोडी.
दुपारची वेळ असल्याने गाडी बाजूला लावून  दोघेही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाखाली गोणपाट अंथरून जेवायला बसले होते. त्याही ठिकाणी आग्रह करून करून एकमेकांना वाढत आणि गप्पा मारत आनंदात होते. टचवूड अगदी अस वाटलं.
तर दुसरं दृश्य
जराशी जुन्या मॉडेलची चारचाकी. चालवणारे वडील आणि किती भिकारड्या गाडीत मला बसवलं आहे असा चेहरा करून बसलेले चिरंजीव. गाडी जुनी असली तरी टकाटक होती. मुलाच्या चेहऱ्यावर असणारे भाव लक्षात आल्याने वडीलही अक्षरशः सूड उगवल्यासारखे गाडी चालवत होते. कदाचित बाकी आधी काही घडलं असेल ही त्यांची मनस्थिती खराब होण्यासारखं. पण गाडीबद्दल राग आहे हे ते ज्या नजरेने इतर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या न्याहाळत होते त्यावरून कळलं. 
क्षणभरासाठी त्या गाडीसाठी वाईट वाटलं ती तर तिचं काम चोख करत होती त्यांना उन्हापासून वाचवत होती. कदाचित कित्येक वर्षांपासून तिने कितीतरी वेळा त्यांना उन्हापासून पावसापासून वाचवलं असेल अशावेळी मस्त हसरा चेहरा ठेवून तिला वागवलं तर काय वाईट. पण माणसाची खोड असते त्याला समोर असलेल्या सुखापेक्षा नसलेल्या गोष्टीचं दुःख जास्त त्रास देतं. दुसरीकडे ते साधस जोडपं मात्र आहे त्यात सुखी होतं आनंदात होतं. खऱ्या अर्थाने श्रीमंत होतं त्या क्षणी.
घर बंगला, गाडी , ट्रिप , महागड्या वस्तू, ह्या गोष्टी मागे ऊर फुटेपर्यंत धावताना कुठेतरी बरंच काही हरवतो आपण हल्ली. सोशल मीडियावर चकचकीत दिसणाऱ्या गोष्टी म्हणजेच आयुष्य हे आईवडील नकळतच मुलांमध्ये रुजवत आहेत. ह्या मॅरेथॉन मध्ये फक्त धावायचं का कशासाठी कुठे पोचायचं आहे ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच अस नाही. पण ह्या सगळ्यात सुख मात्र निसटत चाललंय. सुखाची व्याख्या ही मात्र ज्याने त्याने ठरवावी अन् ठरली तर थोडी हिंमत करावी खऱ्या अर्थाने सुखी होण्यासाठी. 
सुखी माणसाचा सदरा खरंच मिळेल का ते नाही माहीत पण प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. 
बाकी दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु!!!# गौरीहर्षल
२८.११.२०१९

आमराईचा उत्सव

आमराईचा_उत्सव

आज सकाळपासून तिची खूप लगबग सुरू होती. ऑफिसमध्ये ही ती काहीशी गडबडीत असल्याचं तिच्या मित्रमंडळी ना जाणवलं शेवटी कुणीतरी तिला हटकलच कुठे लक्ष आहे म्हणून? मग दुपारी जेवताना बोलू असे म्हणत तिने समोरच काम संपवायला सुरुवात केली. 
सगळं मित्रमंडळ दुपारच्या वेळी ऐकण्यासाठी तयारीत बसलं होतं. ती आली मग सगळ्यांनी जेवणं उरकली. आता मात्र तिच्या जिवलग मैत्रिणी ला राहवेना. " मिथिले , अग सांग ना आतातरी " , अस म्हणत नेत्राने कोंडी फोडली. 
हलकेसे हसत मिथिला म्हटली, "अग हो तेच बोलणार आहे. गेले दोन दिवस मी कसल्या गडबडीत आहे, ह्याबद्दल तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे.  तर माझे आजोबा म्हणजे माझ्या बाबांचे बाबा गावाकडे खूप मोठे शेतकरी होते. अडीनडीला लोकांच्या हमखास उपयोगी पडत. पण त्यांना एक दुःख होतं. पाच पिढया घरात मुलगी जन्माला आली नव्हती. कारण पाच पिढ्यांआधी जन्माला आलेली मुलगी  शेतातल्या आंब्याच्या बागेतल्या विहिरीत सापडली होती. आणि त्यानंतर भरभरून आंबे देणारी ती आमराई आणि पाण्याने तुडुंब भरलेली ती विहीर कायमच्या आटल्या." हे ऐकल्यावर सुरक्षित वातावरणात वाढलेल्या सगळ्यांच्याच अंगावर भीतीने रोमांच उभे राहिले.  मिथिला क्षणभर थांबली मग पुढे बोलू लागली,"मग नंतरच्या पिढ्यानपिढ्या मुलींसाठी प्रयत्न करत राहिल्या पण मुलगी झाली नाही. माझ्या आजोबांनी मात्र उपासतापास, गुरू वगैरे करून उपाय शोधला. तो म्हणजे त्यांनी माझ्या आजीकडून ती आमराई आणि विहीर दोघींची खणनारळाने ओटी भरून घेतली. आणि वचन दिले की जर घरात सुदृढ मुलगी जन्माला आली तर तिच्याच हाताने पहिलं रोप ह्या जमिनीवर लावीन."  "मग? " नेत्राने उत्सुकतेने विचारलं. 
"मग? माझ्या आजीला जुळ्या मुली झाल्या त्या म्हणजे माझ्या दोन्ही आत्या त्या वर्षाच्या झाल्यावर त्यांच्या हाताने आजोबांनी पहिली रोपटी तिथे लावली आणि विहीरीची पूजाही केली.  त्या वर्षी पाऊसही भरपूर झाला ती विहीर तुडुंब भरली आणि रोपं रुजली . आता कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणो किंवा आणि काही पण गावात हे घडल्यानंतर मुलीचा जन्म झाला की लोकं असच स्वतःच्या शेतातही करू लागले. आणि आता तर ती एक प्रथा च बनली आहे. फक्त एक गोष्ट दरवर्षी बदलली. ती म्हणजे दरवेळेस फक्त आमराइतच नाही तर शेतातच पेरणी करताना पहिलं प्राधान्य त्या वर्षी जन्माला आलेल्या मुलीला दिल जातं. मगच पुढची कामं केली जातात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझ्यापरीने भर घालण्याचा प्रयत्न करतेय. ही कल्पना त्या भागात मुलींची होणारी हत्या थांबवण्यासाठी उपयोगी ठरली अन् फायदाही झाला. तर ह्या वर्षी मान मिळणार आहे माझ्या वहिनीला कारण आमची पिटुकली सरस्वती. त्या जोडीनेच आम्ही तिथे शाळेला काही वस्तूही देतो आहोत म्हणून मी जरा कामात व्यस्त झाले होते. ह्या निमित्ताने मी तुम्हां सगळ्यांना तिथे येण्यासाठी आमंत्रित करतेय आणि हो ड्रेस कोड आहे हं. मुलींसाठी नऊवारी आणि मुलांसाठी धोतर कुर्ता. तेंव्हा त्या तयारीने या." मिथिला इतकं बोलून थांबली तसं नेत्राने तिला मिठीच मारली. बाकी सगळेही ह्या कामासाठी तिचं अभिनंदन करू लागले. मुलीच्या जन्माचा असा उत्सव करण्याची कल्पना सगळ्यांनाच आवडली. 
#गौरीहर्षल #१६.१.२०१९

सोमवार, ९ मार्च, २०२०

ओळखीचा अनोळखी मित्र

Life is all about adjustment. 
प्रत्येक जण कुठेना कुठे, कशासाठी तरी, कुणासाठी तरी एडजस्ट करतच असतो. आणि एडजस्टमेंट करावी लागणार आहे हे कुठेतरी मनात फिक्स असतं. 
    पण कधीतरी काय होतं मन कंटाळलेले असते. बऱ्याच गोष्टी एकदम घडलेल्या असतात म्हणजे घरात , बाहेर, ऑफिसमध्ये काही घटना अचानकच घडतात. अशावेळी चिडचिड सुरू होते प्रत्येकाचीच मग त्यातून वाद होतात. कुणीतरी माघार घेतं अन विषय थांबवला जातो पण तो खरंच थांबतो का हो??
तर नाही मनाचा एक कोपरा त्यावर विचार करत असतो, कदाचित दुखावलेला असतो. काही जण अशा परिस्थितीत शांत बसतात म्हणजे बाहेरून तरी असच दृश्य असतं, काही जण स्वतःशीच बडबड करून चिडचिड करून मोकळे होतात. काही जण सोशल मीडियावर दर्दभरे स्टेटस टाकून मोकळे होतात तर काही जण उगाच पॉझिटिव्ह जगण्याची धडपड सुरू करतात. 
   क्षणिक दिसणारा हा त्रास मनाला मात्र खूप त्रास देत असतो. पण आपल्या कडे पद्धत असते न मनातलं कुणाजवळ बोलायच नाही मग काय करणार ?? मन बसतं आतल्याआत रडत कुढत. त्यातूनही कुणीतरी एखाद्या मित्रमैत्रिण , इतर जवळच्या व्यक्ती यापैकी कुणाजवळ तरी व्यक्त होतात. पण आपण विसरतो ही देखील माणसच असतात कधीतरी ते आपल्याला पटतील असे सल्ले देतात तर कधीतरी कुणाकडून नकळतच आपला त्रागा नको त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. मग वाटू लागतं की कुणाशी बोलायच की नाही?
मला न अशा वेळी बसमध्ये भेटलेल्या काकू आठवतात. अंदाजे 6 वर्षांपूर्वी ची गोष्ट.  मी पुण्याहून अहमदनगर ला परत येत होते. एक साध्याशा दिसणाऱ्या काकू माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्या काकू असतील 40-50वयोगटातील. सुरुवातीला मीही माझ्या नादात होते पण मग त्यांची जरा चुळबुळ सुरू झाली इकडेच बघ , तिकडेच बघ. मी ते बघून कानातले हेडफोन काढून ठेवले आणि शांत बसले. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या , ताई तुला काही सांगितलं तर ऐकशील का? मला वाटलं माझं फोनवर कुणाला तरी झापण ऐकून आता ह्या मला सल्ला देतात की काय? पण म्हटलं बघू तरी काय म्हणतात, म्हटलं बोला न काकू. तर त्या म्हणे मी अमूक ठिकाणी चाललेय तर मला नगरमधून बस मिळेल का? मी म्हटलं त्यांना मिळेल न तुम्ही शेवटच्या स्टोपला उतरा तिथे मिळेल. मग आणखी काही मिनिटे शांततेत गेली आणि काकू म्हणाल्या, माझी भावजय एडमीट आहे दवाखान्यात तिला बघायला चाललेय. उगाच विचारायचं म्हणून मी विचारलं , बर नाही का त्यांना? 
नाही तशी बरीच आहे पण साप चावला तिला शेतात कामाला गेली होती तेंव्हा पण लवकर कळलंच नाही मग आता सिरीयस आहे. तसा माझा न भावाचा काय संबंध उरला नाही बघ आठ वर्षांनी जातेय मी भावाकडे. ते पण अस झाल्याच कळलं म्हणून. मग काकूंनी एकेक करत बरेच किस्से त्रास सांगितला. सांगताना त्यांचे डोळे सतत भरून येत होते. भावजयीने आईवडिलांना त्रास दिला मग आपल्याला का येऊ नको सांगितलं हे आणि बरच काही. मनातला राग , द्वेष सगळा काही त्यांनी त्यावेळी बोलण्यातून आणि अश्रूंवाटे बाहेर काढला. मीही त्यांना मनसोक्त रडू दिलं थोडया वेळाने बस एके ठिकाणी थांबली तशा त्या उतरून फ्रेश होऊन आल्या. माझ्याकडे बघून मोकळ्या हसल्या. आधीपेक्षा आताच त्यांचं हसणं खूप मनमोकळं होत. मग माझ्या हातावर थोपटत म्हणाल्या, तू कोण , कुठली मला काय बी माहिती नाही. अन् माहिती करून काय उपयोग बी नाही कारण आपण काय परत भेटणार नाही. पण तुझ्याशी बोलून मला लई बर वाटल. किती वर्षं झाली बाकीच्याना त्रास होऊ नये म्हणून मी माझं मन मोकळं केलंच नव्हतं ते सगळं आज बोलले. का बोलले माहिती नाही कदाचित तू मला माझ्या घरच्यांना वळखत नाहीस म्हणून मला सगळं बोलणं जमलं. कारण तू ह्यातलं काय पण त्या कुणाला सांगणार नाही ही खात्री होती मला,म्हणून नवऱ्याला पण जे बोलून दाखवल नाही ते तुला सांगितलं. एवढं बोलून त्या शांत झाल्या. 
कधी कधी मनात अशा काही घटना घर करून गेलेल्या असतात ज्या आपल्या मनाला सतत टोचणी लावत राहतात पण आपण चुकनही त्या कुणाजवळ व्यक्त करू शकत नाही अशा वेळी हा काकूंचा उपाय फारच उपयुक्त ठरु शकतो. 

प्रवास सुरूच होता पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं असं का घडलं?? पुढे त्याच उत्तरही माझं मलाच सापडलं काय  माहीत आहे? आपण अनोळखी व्यक्तीशी मनातला राग , दुःख ,त्रास मोकळेपणाने बोलू शकतो कारण त्या व्यक्तीमुळे आपल्या नात्याला काही हानी होणार नाही ही खात्री आपल्याला असते. पण प्रत्येक वेळी ही अनोळखी व्यक्ती खात्रीशीर असू शकते का हो?? तर नाही मग ह्यावर काहीतरी सोल्युशन असायला हवं असं मलाही वाटत तुम्हाला काय वाटतं?? योग्य ती सावधानता , गुप्तता बाळगत व्यक्त होण्याचा एखादा पर्याय उपलब्ध झाला तर तुम्ही कराल का त्याचा वापर की नाही ?? कारण कित्येकदा आपल्याला सल्ला नको असतो हवी असते ती फक्त साथ. शांतपणे ऐकून घेणारी, मन मोकळं करू देणारी आणि जोडीला सगळं नीट होईल अशी उभारी मनाला देणारी. अशी साथ मिळाली तर??  त्यासंदर्भात तुम्हा सगळ्यांचा फीडबॅक अत्यंत आवश्यक ठरेल. नक्की सांगा. दोन्ही बाजूंनी विचार करून फायदे तोटे तुम्हाला जे वाटतात ते. 
#गौरीहर्षल 

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

यशातलं अपयश

यशातलं अपयश
चाळिसाव्या मजल्यावर असणाऱ्या त्या आलिशान पेंट हाऊसच्या फ्रेंच विंडोमधून सगळं शहर दिसत होतं. पण ते बघण्याची शुद्ध कुठे होती त्याला.
गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांचा क्रम त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होता. त्याचं हे वैभव काही एका रात्रीत आलं नव्हतं. पण लोकांना त्याच्या जवळच्या लोकांनाच अस वाटत होतं. ते लोक ज्यांनी त्याच्या पडत्या काळात त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याचे आईवडील, भाऊबहीण, मित्र सगळेच सतत त्याच्या प्रत्येक कृतीवर आक्षेप घेत ,टोमणे मारत त्याचं मानसिक खच्चीकरण करत होते. पण तो मात्र ठामपणे त्याच्या वाटेवरून चालत राहिला होता. आणि आज त्याचं फळ त्याला मिळालं होतं. पण जोडीने असतील शिते तर जमतील भुते ह्या म्हणीचा प्रत्यय ही त्याला आला होता. 
संध्याकाळी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तीच ती पाठ फिरवून निघून गेलेली सगळी नाती त्याला दिसली. 
प्रेम तर तस त्याच्या आयुष्यात आलंच नव्हतं पण जे काही आलं ते स्वार्थासाठी आहे हे लक्षात यायला त्याला वेळच लागला होता. मग असे सत्काराचे प्रसंग जसजसे वाढत गेले तसतसे त्याला लोकांचे खरे चेहरे समजत गेले. 
आज तो यशाच्या शिखरावर होता पण एकटा. आणि हे एकटेपण त्याने निवडलं नव्हतं तर समाजाने जवळच्या लोकांनी त्याच्यावर लादलं होतं. त्याने तर आटोकाट प्रयत्न केले होते आपल्या लोकांना धरून ठेवण्यासाठी वेळोवेळी मदतीला धावून गेला , जीवापाड प्रेम दिले पण सगळ्यांना फक्त त्याचा पैसा दिसत होता. त्याला गरज असताना नोकर आहेत न काळजी घेण्यासाठी असे सल्ले देत जेंव्हा जन्मदात्यांनीही काढता पाय घेतला तेंव्हा तो खऱ्या अर्थाने खचला.
चूक खरे तर त्याचीच होती पण पूर्णपणे त्याची नव्हती. लोकांची वृत्तीच अशी बनली होती. जो मदत करत आहे त्याच्याकडून शक्य तेवढी मदत मग ती कुठल्याही स्वरूपात का असेना घ्यायची आणि आपलं काम झालं की आम्ही तुम्हाला बोलावलं नव्हतं अस सांगत मनाच आणि घराचंही दार लावून घ्यायचं. 
लोक फक्त त्याच्याशीच अस वागत होते अस नाही. पण त्याच्या मनाला हे वातावरण त्यात मिसळणे जमत नव्हते. तत्वनिष्ठ वगैरे नव्हता तो उलट अगदी साधा सरळ नाकासमोर चालणारा होता. पण त्याच वृत्तीची खिल्ली उडवली जात असे तेंव्हा तो दुखवून ही काही बोलत नसे. त्याने प्रयत्नही केले पण नाहीच जमले त्याला अरे ला कारे करणे अन् जिथे जमले तिथे त्याला उद्धट कृतघ्न वगैरे विशेषणे मिळाली मग सोडूनच दिले त्याने बोलणे. एक छोटस विश्व मनात तयार करून तिथेच रमू लागला तो.  त्यातुनच त्याची कला जन्माला आली आणि त्याला अमाप यश देऊन गेली. 
आता मात्र तो शिकला होता. आज सोहळ्यात त्याने सगळ्यांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या यशाचे श्रेय स्वतःला दिले तेंव्हा उतरलेले चेहरे त्याला दिसले. क्षणभरच त्याच्या मनात अपराधी भाव आले पण लगेच तो सावरला. हसून तिथून निघून गेला. माणसात रमणारा होता तो कधी काळी पण आता तीच माणसं वाचता येऊ लागली आणि त्याच मन कुठेच रमेना. 
विचारांच्या खोल गर्तेत हरवत कधी त्याचे डोळे मिटले त्यालाही कळले नाही. सकाळी येणाऱ्या नोकराने स्वतःकडच्या चावीने दार उघडले तेंव्हा आरामखुर्चीत हसऱ्या चेहऱ्याने झोपलेला तो बघून त्याला जरा आश्चर्यच वाटले. जवळ जात त्याने हात लावला तेंव्हा कळले तो कायमचा त्याच्या विश्वात रमण्यासाठी कधीचाच निघून गेला होता.