#Why_do_I_take_things_personally?
अनिता, समुपदेशनासाठी आलेली क्लायंट...
तक्रार काय? तर तिला आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याबद्दल तक्रार होती. संभाषणाची सुरुवात झाली ती तिच्या आजूबाजूची लोकं बऱ्याचदा तिच्या बाबतीत टीका करतात किंवा टोमणे मारतात यावरून. हळूहळू केस हिस्टरी घेताना लक्षात आलं की आजूबाजूच्या लोकांनी इतर कोणाला उद्देशून काहीही बोललं तरी ते आपल्यालाच उद्देशून आहे असं अनिताला वाटत होतं. आणि मग कुठे ना कुठेतरी तिच्यामध्ये आणि त्या व्यक्तींमध्ये गैरसमजाची सुरुवात होत होती. सहाजिकच अनिता कधी सुद्धा समोरून त्या व्यक्तीला जाब विचारत नसल्याने गैरसमज खोडून काढण्याचे प्रसंग फार कमी वेळा येत होते. म्हणजे ज्या व्यक्ती तिला गैरसमज झाला आहे हे लक्षात आल्यानंतर तिच्यापर्यंत तो गैरसमज दूर करण्यासाठी येत होते. त्यांच्यासोबत तिचे नाते पुन्हा पहिल्यासारखे होत होते. पण ज्या नात्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडत नव्हती त्या ठिकाणी मात्र त्या गैरसमजाला कळत नकळत खत पाणी घातले जात होते.
मग आता इथे बोलता बोलता तिच्या स्वतःच्या लक्षात आलेली गोष्ट अशी की मी बऱ्याचदा खरं खोटं न करता गोष्टी स्वतःवर ओढवून घेते का? आणि जर असं होत असेल तर मी काय करायला हवं? why do I take things personally??
कौन्सिलिंगच्या माध्यमातून तिला मदत करता करता सुचलेले काही मुद्दे या लेखांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का? की एखाद्या व्यक्तीने कुठलीतरी कमेंट पास केली किंवा कुठल्यातरी संदर्भात एखादी टीका केली.... अन् प्रत्यक्षात त्या दोन्ही गोष्टींचा तुमच्याशी संबंध नसताना सुद्धा तुम्ही दुखावले गेलात?
किंवा आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात, ज्यांना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बाबतीत जोडून घेण्याची सवय असते. साध्या शब्दात सांगायचं झालं तर ते इतरांचं बोललेलं, वागलेलं सगळं काही मनाला लावून घेतात. अशावेळी अशा वागण्यामागची कारणे, गैरसमज वेळीच ओळखणे. त्यामुळे होणारे तोटे, त्याबाबतीत आवश्यक असलेले उपाय जसे की भावनिक लवचिकता आणि नाती जोपासण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मर्यादा ठरवणे या सगळ्यांवर काम करणे अपेक्षित असते.
आता सगळ्यात आधी आपण या मागची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून असणारी कारणे जाणून घेऊया...
१. बालपणीचे अनुभव...
एखादी व्यक्ती लहान मूल असताना ते ज्या व्यक्तींच्या सहवासात जास्त वेळ वाढते, त्या व्यक्ती म्हणजे जसे की आई-वडील, आजी-आजोबा किंवा त्यांना सांभाळणाऱ्या इतर प्रौढ व्यक्ती. या सर्व व्यक्तींच्या आपापल्या समजुती, त्यांची तत्वं, त्यांच्या वागण्याच्या पद्धती, त्या मुलासोबत व इतरांसोबत त्यांचे असणारे वर्तन यांचा प्रभाव कळत नकळत त्या लहान मुलाच्या व्यक्तिमत्वावर होत असतो.
ते लहान मूल त्याला मिळणारा नकार, होणारी टीका किंवा एखाद्या बाबतीत समोरच्याकडून हवे असणारे प्रतिसाद यावरून कुठे ना कुठेतरी प्रौढावस्थेत येताना व्यक्ती म्हणून बदलत जाते. लहानपणी त्याच्या सहवासात असणाऱ्या प्रौढ व्यक्तींनी या सर्व गोष्टींना दिलेल्या प्रतिक्रिया त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या असतात.
उदाहरण द्यायचे झाले तर जर एखाद्या व्यक्तीने लहानपणी आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून स्वतःच्या प्रत्येक कृतीसाठी टीका सहन केली असेल तर ती व्यक्ती मोठी झाल्यानंतर कळत नकळत तिच्या आजूबाजूच्या लोकांशी वागताना सुद्धा त्याच पद्धतीचे प्रतिसाद देण्यास सुरुवात करते.
२. Attachment style - संलग्नता
अटॅचमेंट थियरीनुसार आपल्या प्रत्येकाची एक अटॅचमेंट स्टाईल असते... त्यामध्ये secure, anxious, or avoidant असे काही प्रकार असतात. या सर्वांचा व्यक्ती जेव्हा इतरांसोबत संपर्कात येते तेव्हा त्याच्या वागण्यावर आणि इतरांसोबत असणाऱ्या नात्यांवर प्रभाव पडत असतो. बऱ्याचदा ही अटॅचमेंट स्टाईलही त्याच्या लहानपणीच्या अनुभवांवरती आधारित असते.
याचे सगळ्यात सोपे उदाहरण म्हणजे लहानपणी व्यक्तीचे तिच्या आई-वडिलांशी ज्या पद्धतीचे संबंध असतील कुठे ना कुठे तरी त्या संबंधांची सावली त्याच्या प्रौढवयातील नातेसंबंधांवरती पडत असते.
जेव्हा एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं प्रत्येक बोलणं मनाला लावून घेते, तिला ते सोडून देणं जमत नाही, तेव्हा त्या मागची मुख्य कारणं काय आहेत ते आपण जाणून घेतलं. आता आपण या गोष्टीच्या लक्षणांकडे वळूया...
1. Hypersensitivity to Feedback: टीके बाबत अति संवेदनशीलता
अशा व्यक्तींना इतरांकडून केली गेलेली टीका किंवा दिला गेलेला फीडबॅक सहजासहजी पचवता येत नाही. ती गोष्ट स्वीकारणे त्यांना जड जाते. आणि त्यामधूनच बऱ्याचदा त्यांचे समोरच्या व्यक्तीसोबत वाद होतात. कारण समोरची व्यक्ती कुठल्या हेतूने आपल्याला काय सांगत आहे हे अतिसंवेदनशील स्वभावामुळे त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. आणि मग नकळतच त्यांच्याकडून समोरच्या व्यक्तीला चुकीच्या प्रतिक्रिया दिल्या जातात, ते स्वतः भावनिक पातळीवर ताण अनुभवतात, आणि कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी त्यांच्या वैयक्तिक ग्रोथ साठी अडथळा ठरतात.
2. Defensive Behavior: संरक्षणात्मक पवित्रा
बऱ्याचदा अशा व्यक्ती कुठे ना कुठेतरी स्वतःच्या वागण्याचे समर्थन करत असताना त्या गोष्टींचा दोष इतरांवर टाकणे किंवा सरळ सरळ गोष्टी धुडकावून लावणे, शिवाय दुर्लक्ष करणे अशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात. अशा वागण्यामुळे कुठे ना कुठेतरी अशा व्यक्ती स्वतःला एकटं ठेवण्याकडे वळतात आणि त्यामुळे गैरसमज अजून वाढतात.
3. Emotional Reactivity: भावनिक पातळीवर प्रतिसाद -
समोरच्या व्यक्तीचे वागणे स्वतःवर ओढवून घेतल्याने बऱ्याचदा अशा व्यक्तींकडून ज्या भावनिक प्रतिक्रिया दिल्या जातात, त्यामध्ये राग येणे, वाईट वाटणे, टोकाची अस्वस्थता आणि एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्रसंगाच्या समोर येण्याने ट्रिगर होणे हे दिसून येते.
बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी मनात असलेल्या इन्सिक्युरिटीज आणि भरून न आलेल्या भावनिक जखमा यांच्याकडे बोट दाखवत असतात.
मग लोकांचं वागणं आपण स्वतःशी जोडून घेऊ नये किंवा स्वतःवर ओढवून घेऊ नये म्हणून नेमकं काय करायचं???
१. दृष्टिकोन बदलणे आवश्यक असते
आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल असुरक्षितता, निश्चित केलेला दृष्टिकोन, आणि त्यांचे स्वतःचे मत असू शकते हे आपल्याला समजायला हवे. या गोष्टी कधी होतात? तर जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण वेगळ्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे बघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नकळतच आपल्याला आपल्यासमोर आलेल्या समस्यांवरती उपाय सापडतात. शिवाय आपण इतरांकडे आणि स्वतःकडे सुद्धा तटस्थपणे बघू शकतो. यानंतर कुठे ना कुठेतरी इतरांसोबत आपली नाती सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते, शिवाय इतरांसोबत होणारे वाद सुद्धा सोडवता येतात.
२. Boundary Setting / नात्यांची मर्यादा निश्चित करणे...
ज्या नात्यांमध्ये बऱ्याचदा वितुष्ट येते किंवा वाद होतात, अशा नात्यांमध्ये मर्यादा ठरवून घेणे खूप जास्त गरजेचे असते. नात्यांमध्ये मर्यादा ठरवून घेतल्यामुळे कुठे ना कुठेतरी त्या नात्यांमध्ये संवाद वाढीस लागतो आणि गोष्टी पर्सनली घेण्याबद्दल जी मानसिकता असते त्यामध्ये फरक पडतो.
आपल्याला नेमकं काय हवं आहे हे योग्य वेळी स्पष्ट केल्यामुळे कुठे ना कुठेतरी दोन्ही बाजूच्या व्यक्ती एकमेकांशी आदराने आणि समजूतदारपणे वागू शकतात.
नात्यांमध्ये मर्यादा निश्चित केल्यामुळे त्या नात्यांमधून मिळणाऱ्या समाधान आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा फरक पडतो.
३. Growth Mindset,
आपण आपली मानसिकता म्हणजेच माइंडसेट बदलत असताना जर ग्रोथ माईंडसेट वरती काम करायला सुरुवात केलं तर कुठे ना कुठेतरी आपल्याला आपले अपयश वैयक्तिक पातळीवरती स्वीकारणे सोपे जाते. जेव्हा आपल्यामध्ये भावनिक लवचिकता वाढीस लागते तेव्हा इतरांकडून येणारी टीका आणि मिळणारे फीडबॅक सुद्धा आपण शांतपणे स्वीकारू शकतो. त्या व्यतिरिक्त व्यक्तीला बाहेरून कुठल्याही प्रकारे मोटिवेशन ची गरज पडत नाही. तो स्वतः स्वतःला कुठल्याही परिस्थितीमध्ये मोटिवेट करू शकतो. पण हे सर्व कधी घडते?? जेव्हा तो ग्रोथ माईंडसेटच्या दिशेने प्रयत्न करतो.
४. Practice Mindfulness / जागरूकता -
मांडफुलनेस ची प्रॅक्टिस करत असताना मेडिटेशन किंवा सेल्फ रिफ्लेक्शन वरती भर दिला गेल्याने व्यक्ती स्वतःचे विचार आणि त्याच्या भावना यांच्या बद्दल जागरूक होतो. इतरांशी वागत असताना, त्यांना प्रतिसाद देत असताना कुठे ना कुठेतरी आपल्या मनातली भीती आणि ट्रिगर्स या दोन्हीला हाताळत तो प्रतिसाद देऊ शकतो.
माइंडफुलनेस प्रॅक्टिसमुळे व्यक्तीला भावनिक पातळीवरती स्वतःच्या व्यक्त होण्यावर लक्ष केंद्रित करता येते.
५. Challenge Negative Beliefs/ नकारात्मक विचारांना दूर करणे.
आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार वेळीच ओळखणे आणि त्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे असते. नकारात्मक विचार दूर करत असताना बऱ्याचदा आपल्याला परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत वास्तविक पद्धतीने मूळ समस्येवर लक्ष केंद्रित करावे लागते. भावनिक पातळीवर कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद देणे थांबवण्यासाठी हे खूप जास्त गरजेचे असते.
यामध्ये आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना पुन्हा पुन्हा रिफ्रेम करणे आवश्यक असते. शिवाय आपण नकारात्मक विचारांच्या कोणकोणत्या पॅटर्न्स ना सातत्याने रिपीट करतो हे सुद्धा ओळखणे गरजेचे असते.
६. तज्ञांची मदत घेणे...
जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या पातळीवर सोडवता येत नाहीत, तेव्हा योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत मागणे गरजेचे असते.
तात्पर्य -
गोष्टी स्वतःवरती ओढवून घेण्यामध्ये बऱ्याचदा परिस्थिती, नाते, आजूबाजूच्या व्यक्ती आणि काही मानसिक गोष्टी सुद्धा समाविष्ट असतात. ज्यांचा व्यक्तीच्या भावनिक लवचिकतेवरती आणि त्याच्या स्वतःच्या अस्तित्वावरती प्रभाव पडत असतो.
हे सगळं समजून घेताना आपल्याला आपल्या मनातील चुकीच्या समजुती, स्वतःबद्दल असणारे काही ग्रह आणि इतरांसोबत आपले असणारे वर्तन या सगळ्यांच्या बाबतीत काम करावे लागते.
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींसोबत आपले नाते सुधारण्यासाठी आणि स्वतः सोबत सुद्धा आपले वागणे सुधारण्यासाठी आपण स्वतःच्या विचारांच्या पद्धती, आपली तत्वं, आपली मानसिकता म्हणजेच माइंडसेट याबाबतीत सेल्फ रिफ्लेक्शन पद्धत वापरणे खूप जास्त गरजेचे असते. कारण त्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये काय बदल करता येतील हे लक्षात येते.
एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही मानसिक त्रासाच्या बाबतीत सगळ्यात आधी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू करते, तेव्हा तिला तिच्या आयुष्यात अपेक्षित असे बदल हळूहळू दिसू लागतात.
तर अशा पद्धतीने why do I take things personally आणि स्वतःकडून गोष्टी पर्सनली घेतल्या जाऊ नयेत म्हणून काय उपाय करावे या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे.
बाकी ?
बाकी बऱ्याच गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगवेगळ्या असू शकतात. शिवाय प्रत्येकाची परिस्थिती सुद्धा वेगवेगळी असते. पण ते पुन्हा कधीतरी.... तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे...
स्वतःला शोधताना _ गौरी हर्षल 1 / 2025
गौरी हर्षल कुलकर्णी
एम ए क्लीनिकल सायकॉलॉजी आणि समुपदेशन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा