कालाय तस्मै नमः (भाग १ - ३)

मनोगत 
कालाय तस्मै नमः ही माझी पहिलीच दीर्घ कथा. ह्या कथेला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळाला. 

कालाय तस्मै नमः लिहिताना एका कुटुंबाची प्रत्यक्ष कथा डोळ्यासमोर होती. पण कथास्वरुपात मांडत असताना मला अंधश्रध्देला खतपाणी घालणारी कथा नको होती. 
रहस्य कथा, भयकथा म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर जनरली जी दृश्य येतात तस काही तुम्हाला या कथेत सापडणार नाही. मग काय सापडेल? 
माणसाच्याच आत दडलेली एक वृत्ती... कधी ती चांगली असेल तर कधी वाईट किंवा अगदी दुसऱ्याचा जीव घेण्याइतकी क्रूर. 

जिथे ह्या जगात वाईट गोष्टी आहेत तिथेच चांगल्या गोष्टी ही अस्तित्वात आहेत हे मला ह्या कथेच्या माध्यमातून मांडायच होतं आणि कुठेतरी त्यामध्ये मी सफल झाले आहे अस मला वाटतं. 

कालाय तस्मै नमः ह्या कथेचा विषयच मुळात वेगळा होता. अध्यात्मिक रहस्यकथा... खरे तर अध्यात्म या विषयात इतकी रहस्य दडलेली आहेत की माणसाला एक आयुष्य पुरणार नाही. 
ह्याच वळणाने जाणाऱ्या अजूनही काही कथा लवकरच तुमच्या भेटीला आणत आहे. 
आजपर्यंत माझ्या लेखनावर तुम्ही वाचक मित्रमैत्रिणींनी जो विश्वास दाखवला तो असाच पुढेही असुदे. 

गौरीहर्षल 
सौ. गौरी हर्षल कुलकर्णी 
____________________________________

कालाय तस्मै नमः
अनुक्रमणिका (पर्व पहिले)  
   प्रस्तावना
१. आनंदाचे डोही
२. सुखाच्या हिंदोळ्यावर
३. अरुंधती आणि श्रीपादची गोष्ट
४. आस्तनीतले साप 
५. पारायण
६. अरुंधतीला निरोप
७. भूतकाळात फेरफटका
८. संमोहन
९. सरप्राइज
१०. खेळ मनाचे
११. ललिताच्या अचानक येण्यामागचे रहस्य
१२. जाणीव स्व- अस्तित्वाची
१३. कैवल्यचे आगमन
१४. साधनेतील संकेत 
१५. शेवट
१६. वाचकांशी हितगुज
१७. स्वरा आणि कैवल्य ह्या बहिणभावाच्या जोडीचा नवीन प्रवास
____________________________________


कालाय तस्मै नमः| 

प्रस्तावना 

जगात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. खरं तर वाईट असतं म्हणूनच चांगल्या गोष्टी, व्यक्ती ह्यांची किंमत माणसाला कळते.

 युगानुयुगे चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींच्या अलिखित चढाओढीवर तर जग चालते. कधी चांगल्याची सरशी होते तर कधी वाईटाची. माणसाची मनोवृत्तीही ह्या दोन्ही रंगांना दाखवते. जसं एखादा माणूस पूर्णपणे चांगला नसतो तसाच तो पूर्णपणे वाईटही नसतो. मनस्थिती कशी आहे हे नेहमी त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. 


प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणती बाजू कधी वरचढ ठरणार हे प्रत्यक्ष त्या व्यक्तीलाही सांगता येणार नाही. 
आता माणूस म्हटलं की भावनांची गुंतागुंत तर असणारच. एका बाजूला प्रेम,माया,आपुलकी,जिव्हाळा आहे तर दुसरीकडे द्वेष, राग, तिरस्कार, वैरभावनाही आहे. कुणाला तरी आजूबाजूचं सगळं जग सुंदर दिसतं तर कुणाला मात्र त्या जगाबद्दल खूप तक्रार आहे. हा प्रश्न आहे मनोवृत्तीने निर्माण केलेला. 

चांगल्यातून वाईट शोधायचं की वाईटातून चांगलं हे ठरवणं फक्त माणसाच्या हातात आहे.असो
 तर अशाच काही गोंधळातून एक दिर्घकथा साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिलाच प्रयत्न आहे पण आवडेल ह्याबद्दल खात्री आहे. 

वरती म्हटल्याप्रमाणे सुष्ट आणि दुष्ट दोन्ही शक्ती त्यांच्या वेगवेगळ्या रुपात ह्या कथेत भेटतील. प्रसंगी त्या एकमेकांना हरवण्याचा प्रयत्नही करतील. 
कालचक्रात अव्याहत सुरू असणारा खेळ इथेही खेळला जाणार आहे. फक्त तो खेळ ज्यांनी सुरू केला आहे तो संपवणे आता त्यांच्या हातात उरले नाहीये तर ते त्या "काळाच्या" हातात आहे. 

ह्या खेळात निष्पाप जीवांचे बळी जातील की तेच आपल्यामधील चांगल्या शक्तीला जागे करून खेळात उतरतील ते तर वाचल्यावरच कळेल. अर्थात ते ही त्या काळाच्याच हातात आहे.
म्हणूनच तर म्हटले जाते न "कालाय तस्मै नमः" 

म्हणजेच सगळं जग या काळाच्या अमलाखाली असतं. काळ जसा सुखाची आस लावतो तसा दु:ख विसरायलाही मदत करतो. प्रत्येकाचं आयुष्य काळाशी बांधलेलं आहे. काळ विकता किंवा विकत घेता येत नाही. काळाला दुसरा पर्याय नाही. काळ देतो आणि नेतोही. 

हिंदीत एक म्हण आहे “समय से पहले और जरुरत से ज्यादा कुछ नाही मिलता“, म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीची वेळ येईल तेव्हाच ती घडेल. वेळेच्या आधी नाही आणि नंतरही नाही. केवळ ती योग्य वेळ येण्याची वाट बघणं आपल्या हातात असतं. जेव्हा अशी वाट बघण्याची पाळी येते तेव्हा म्हणावंच लागतं “कालाय तस्मै नम:”

वाचत रहा आणि साक्षीदार व्हा सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या अतर्क्य घटनांचे. 
____________________________________
कालाय तस्मै नमः| भाग १

आनंदाचे डोही 

आज गायत्रीच्या मागे भरपूर कामं होती. असणारच कुलकर्णींच्या घरातली मोठी लेक होती ती आणि आता तिचं हवंहवंसं प्रमोशनही झालं होतं. एका गोंडस परीची आत्या झाली होती ती. गायत्री आणि तिच्या सगळ्या भावंडांच्या पिढीनंतरच्या पिढीत जन्माला आलेली पहिली मुलगी. 

खूप नवस सायास केले गेले होते मुलगी जन्माला येऊन जगावी ह्यासाठी त्यांच्या घरात सगळ्यांनीच.कारण घरात मुली जन्माला येत होत्या पण महिन्याभराच्या आतच त्या पुढच्या प्रवासाला निघून जात होत्या. शेवटी कुलदेवतेच्या आशीर्वादाने घरात मुलगी जन्माला आली आणि ती जिवंतही राहिली. आज तिच्याच बारश्याची लगबग सुरू होती. जवळपास सगळे जण आपापल्या कामातून वेळ काढून हजर झाले होते, तरीही त्यांची उणीव आज सगळ्यांनाच भासत होती.  

माई आणि काका म्हणजेच सरस्वती आणि रामचंद्र कुलकर्णी. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुलकर्णी वाड्याचे मालक. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही परंपरागत गोष्टींचे वंशज. कुटुंब तसे सुशिक्षित आणि सधन होते. माई अन् काकांना एकूण आठ मुले - ५ मुलगे ३ मुली.

माईंना म्हणजे सरस्वतीला गावात सगळेच जण माई म्हणूनच ओळखत होते. 
काकांशी लग्न करून त्या ह्या गावात आल्या आणि इथल्याच झाल्या. सासरच्यांनाच नाही तर सासरच्या गावाला आणि गावातल्या लोकांनाही त्यांनी आपलंसं केलं. स्वतःच्या सासुसासऱ्यांच्या पावलांवर पाऊल टाकत माईंनी कुलकर्णी वाड्याची माणसं जोडण्याची परंपरा कायम ठेवली होती. 
त्याही अगदी पहिल्यापासून सगळ्यांशी गोड हसून मायेने बोलणार, दारात आल्यागेलेल्या प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करणार, गावात नवीन लग्न करून आलेली कुठली सून जर माईंना भेटली तर तिला त्यांच्यात स्वतःच्या माहेरचं माणूस भेटल्याचा भास व्हायचा. गावातल्या कितीतरी बायबापड्या घरात कुरबुरी वाढल्या की गाऱ्हाणं घेऊन माईंकडे येत होत्या. 

माईसुद्धा सासुसूनेच ऐकून घेत दोघींनाही योग्य ते मार्गदर्शन करत. त्यांची बोलण्याची पद्धतच अशी होती की सासूला वाटे आपलं म्हणणं सुनेला पटवून दिलं माईंनी अन् सुनेला वाटायची सासूला समजावून सांगितले. समाधानाने एकमेकींसोबत घरी जाणाऱ्या त्या दोघींना बघणाऱ्या माईंच्या चेहऱ्यावर अजून एक घर मोडताना वाचवल्याचा आनंद असे. आणि तो आनंद त्यांना अजूनच जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा देत असे. तर अशा ह्या माई अगदी काकांना अनुरूप होत्या. काकांच्या सगळ्या चांगल्या वाईट परिस्थितीत त्या काकांच्या सोबतीने खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या आणि त्यामुळेच काका प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला आवर्जून घेत असत. 

दुसरीकडे काका म्हणजे रामचंद्र कुलकर्णी , आपल्या छोट्याशा गावात आणि नोकरीत अगदी समाधानी वृत्तीने जगणारा स्वाभिमानी माणूस. अडीअडचणीला कुणी मदत मागितली तर धावून जाणार आणि यथाशक्ती त्या व्यक्तीला मदतही करणार हे संस्कार त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केले होते आणि तेच त्यांनी आपल्या मुलांना भरभरून दिले होते. आठही मुलांना आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे करावं लागलं ते सगळं काकांनी केलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज सगळी मुलं आपापल्या क्षेत्रात कार्यरत होती. त्यांचे संसारही काकांनी योग्य वयात मांडून दिले होते. आणि काळानुसार मुलांचं लांब जाणंही मान्य केलं होतं. कारण संपत्तीच्या नावावर काकांकडे फक्त वाडा आणि त्यांची पेन्शन एवढंच होतं. त्यामुळे मुलांना जेव्हा उडण्याची संधी मिळाली त्यांनी आणि माईंनी स्वखुशीने मुलांना जाऊ दिलं होतं. 

माई-काकांचा चार नंबरचा मुलगा भास्करने मात्र पत्नी संगीता आणि मुलगा समीरसह गावातच रहाण्याचा निर्णय घेतला होता. गावातल्या शाळेतच तो शिक्षक होता. त्यामुळे त्याला माई-काकांसोबत राहून त्यांची काळजी घेणे शक्य होते. संगीताही एकत्र कुटुंबातील असल्याने इथेही माणसं सांभाळणं तिला जड जाणार नव्हतंच. उलट नवऱ्याचा निर्णय हसत हसत स्वीकारून ती त्याच्या जोडीने सगळं मनापासून निभावत होती. माईंच्या तालमीत संसाराचे धडेही गिरवत होती. माई काकांच्या सोबत असल्याने तिला समीरची कधी काळजीच करावी लागत नव्हती. कारण बाकीची नातवंडे फक्त सुट्टीत भेटत असल्याने त्या सगळ्यांच्या वाट्याची माया इतरवेळी फक्त समीरला मिळत असे. पण फक्त मायाच नाही त्याच्यावर उत्तम संस्कारही आपसूकच होत होते. 

एकूणच काय चारचौघांसारखं हे कुटुंबही सुखदुःखात एकत्र येऊन,थोड्याफार रुसव्याफुगव्यांसह पुन्हा आपापल्या मार्गाने जात आयुष्याशी जुळवून घेत होतं. पण ....

सगळी मुलं जरी लौकिकार्थाने आपापल्या संसारात रमली असली तरी काकांना मात्र कुठेतरी काहीतरी सतत राहून जातंय असं वाटत होतं. कारण कुलकर्णी कुटुंबाच्या ह्या तिसऱ्या पिढीत मुलगीच जन्माला आली नव्हती. अशातच संगीताला पुन्हा दिवस गेल्याची बातमी माईंनी ज्या दिवशी त्यांच्या कानावर घातली. नकळतच त्यांचा चेहरा इच्छापूर्ती होणार असल्याच्या आशेने उजळला. देव्हाऱ्याकडे बघून मनोमनच त्यांनी देवाचे आभार मानले. दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने सरत होते. आणि आज तो दिवस आला होता.....
मुलगी जन्माला येणं हे काकांसाठी खूपच विशेष होतं. का ते कळेलच हळूहळू. 

बारशाच्या निमित्ताने काकांची सगळी मुलं एकेक करून वाड्यावर आली होती. आता इतकं मोठं कुटुंब म्हटलं की रुसवेफुगवे भांड्याला भांडं लागणं हे ओघाने आलंच. 
त्यात ज्या गोष्टीची माई आणि काका इतकी वर्षे वाट बघत होते ती नेमकी संगीतामुळे घडली. ती गावात राहत होती म्हणून तसं त्यावरून तिला इतरांचे टोमणे ऐकावे लागतच होते. बाकीच्यांना आता मुलं होणारच नाहीत अशी काही अवस्था नव्हती पण तरीही परीक्षेत पहिल्या येणाऱ्यावर जळणं स्वाभाविकच असतं. असो.

एकीकडे बारश्याची जय्यत तयारी सुरू होती. दुसरीकडे कुणीतरी सगळ्यात विघ्न आणण्यासाठी तयारी करत होतं. 
हे सगळं झालं, पण उत्सवमूर्ती कुठे आहेत ते बघू आपण. जिच्याबद्दल सगळं होत होतं ती मात्र मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ करून झोळीत गुडूप झाली होती. तशी आता ती २ महिन्यांची झाली होती. त्यामुळे आवाज आला की कान लगेच टवकारले जात आणि मग काय एकेक कार्यक्रम सुरू. तिची आजी म्हणजे माई तिच्या अवतीभवतीच होती. 

सगळं छान घडत असताना मात्र माईंनी काकांना आपल्या मनातली हुरहूर बोलून दाखवली होती. 
बाकीचे सगळे आपल्या कुटुंबासह आले असले तरी त्यांना मात्र अजून कुणाच्या तरी येण्याची आस होती. ती व्यक्ती येईल की नाही त्यांना काहीच कळत नव्हतं. पण आजच्या दिवशी त्या व्यक्तीने इथं हजर असावं असं मात्र त्यांना राहून राहून वाटत होतं. 

आज मोठे तर मोठे पण घरातल्या लहानांचा उत्साहही ओसंडून वाहत होता. 
वाड्यात मध्यभागी जी मोकळी जागा होती तिथे बारश्याची तयारी केली होती. मध्यभागी छानसा सजवलेला पाळणा होता. आजुबाजुला सगळ्या आलेल्या पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था होती. हळूहळू लोक यायला सुरुवात झाली. काकांचा आणि माईंचा गोतावळा भरपूर होता. त्यामुळे बारसं नाही म्हटलं तरी दणक्यात होत होतं त्या काळच्या मानाने.

बाळालाही तयार करून बाहेर आणलं होतं. सगळेजण कौतुकाने तिला न्याहाळत होते. तीही टपोऱ्या डोळ्यांनी टुकुटुकु इकडे तिकडे बघत होती. बाळाच्या मोठ्या आत्याने गायत्रीने बाळाला पाळण्यात घातले. आणि सुरू करू का म्हणून विचारण्यासाठी ती माईंकडे वळली. तर माई एकटक वाड्याच्या दरवाज्याकडे बघत होत्या. माई काय बघत आहेत म्हणून सगळ्यांच्याच माना तिकडे वळल्या. 

वाड्याच्या दरवाज्यात दोन जण उभे होते. 

"श्रीपाद",माईंच्या तोंडून नकळतच हाक बाहेर पडली. 

 सहा फूट वगैरे उंच, मध्यम शरीरयष्टी, गोरापान पण रापलेला वर्ण पण वेगळ्याच तेजाने उजळलेला चेहरा आणि डोळे अगदी मनाचा ठाव घेणारे. त्यांच्या हातात हात धरून त्यांचीच छोटीशी प्रतिकृती उभी होती. माई काका दोघेही डोळ्यात येणाऱ्या अश्रूंना कसेबसे थोपवत होते. शेवटी दोघेही त्याच्या दिशेने चालू लागले. ह्या सगळ्या मध्ये एक व्यक्ती अशीही होती जिला त्या दोघांचं येणं आवडलं नव्हतं. 

कोण आहेत हे दोघे ?? ज्यांच्या येण्याने घरात जणू काही उत्साहच भरला होता. त्या दोघांच्या येण्याने वातावरणात तयार झालेली सकारात्मक ऊर्जा बाहेरून आलेल्या लोकांना ही जाणवत होती. का कुणास ठाऊक पण प्रत्येकाला असं वाटत होतं की आता आपल्या आयुष्यात खूप काहीतरी छान घडणार आहे.


कालाय तस्मै नमः| भाग २

सुखाच्या हिंदोळ्यावर

माई आणि काका त्या दोघांना डोळे भरून बघत होते. तेव्हढ्यात संगीताने आत जाऊन ओवळण्यासाठी भाकरी तुकडा आणि पाणी आणलं. माईंनी तिलाच ते करायला लावलं. आनंदाने तुकडा ओवाळून दोघांच्या पायावर पाणी घालत ती बाहेरच्या दिशेने गेली. ती परत आली तरीही ते तसेच उभे होते कारण माईंना आनंदाच्या भरात काही सुचतच नव्हते. 

भास्कर ज्याच्या लेकीचं बारसं आहे तो मागून येत म्हणाला, “दादा ये ना रे आत. तुझीच उणीव भासत होती. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय.” हसून त्याच्याकडे बघत त्याने मुलाचा हात धरूनच आत उजवा पाय टाकला. तसेच समोरच उभ्या असलेल्या माई आणि काकांना वाकून नमस्कार केला. त्या छोट्यानेही तसंच केलं तसं काकांनी त्याला पटकन उचलून घेत छातीशी कवटाळलं. 

सगळीच भावंडं आसपास गोळा झाली होती. सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू होते. का असणार नाहीत तब्बल चार वर्षांनी तो परत आला होता. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत माई जणूकाही तो खरोखरच आला आहे ह्याची खात्री करून घेत होत्या. तसा गोड हसत तो माईंना म्हणाला, “माई, अगं मी खरंच आलो आहे. तुला दिलेला शब्द कसा मोडेन मी?”
तशा त्या समाधानाने हसल्या. तरीही एक अश्रू गालावर ओघळलाच. एका हाताने माईंना जवळ घेत तो त्यांना आश्वस्त करत होता. 
 
तो ‘श्रीपाद’ माई काकांचा थोरला मुलगा. नावापुरता मुलगा होता तो त्यांचा. कारण समजूतदारपणा इतका होता की त्यांना कधीही त्याला काहीच सांगावे लागत नसे. त्याच्या वेगळेपणाची चुणूक त्याने वेळोवेळी दाखवून दिली होती. जन्मजात काही गुण त्याच्या अंगी होते. तो जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याचं वेगळं असणं जास्तच प्रकर्षाने जाणवू लागलं. त्याच्या चेहऱ्यावर असणारं तेज, धीरगंभीर भाव, बघताच समोरच्याला आश्वस्त करणारा स्वभाव, फार कमी शब्दात योग्य ते मांडण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टींमुळे वयाने मोठया असणाऱ्या व्यक्तीलाही एखाद्या गोष्टीसाठी त्याचा सल्ला घ्यायची गरज वाटत असे. कुणी विचारलं तर तो सांगतही असे. पण ह्या सगळ्यामधून शक्यतो अलिप्त राहण्याचा त्याचा प्रयत्न असे. असो. 

 श्रीपादच्या आयुष्यात पुढे एक वादळ आलं, ज्याचा परिणाम त्याच्या बरोबरच बाकी सगळ्यांच्या आयुष्यावरही थोडाफार झालाच. त्यामुळेच तो गेली चार वर्षे घरापासून दूर गेला होता. सोबत त्याचा मुलगाही होता. ज्याचं नाव होतं ‘कैवल्य’. जो अगदी हुबेहूब श्रीपादची प्रतिकृती होता, पण त्याचे डोळे मात्र त्याच्या आईची आठवण करून देणारे होते अगदी प्रेमळ. जो कोणी बघेल त्याचे सगळे त्रास, दुःख सगळं एका क्षणात विसरेल असं. 

काकांचा असा ठाम विश्वास होता की ही बापलेकाची जोडी काहीतरी वेगळी आहे. आणि त्यामुळेच त्यांनी श्रीपादला कधीही बांधून ठेवलं नाही. 

कैवल्यच्या आईच्या जाण्यानंतर श्रीपादने जेव्हा छोट्याश्या कैवल्य सोबत दूर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा काका आणि माईंनी त्याला मूक संमती दिली होती. पण श्रीपादनेही परत येण्याचं आश्वासन देत निरोप घेतला होता. आणि आज खूप महत्त्वाच्या दिवशी तो परत ही आला होता. 

सगळेच आठवणींच्या विश्वात हरवले होते. तेव्हा गायत्रीने सगळ्यांना आठवण करून दिली की बारश्याचा कार्यक्रम सुरू करायचा का? हसून मान डोलवत सगळे हो म्हणाले. बाळाला पाळण्यात घालून नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा गायत्रीने श्रीपादकडे बघितलं आणि त्यानेही मूक हसत नजरेने संमती दिली. तिने बाळाच्या कानात कुर्रss आवाज करत नाव सांगितलं. 

सगळ्यांनी उत्सुकतेने विचारलं, “काय नाव ठेवलं?” तसं तिने मोठयाने सांगितलं, “बाळाचं नाव आहे ‘स्वरा’. पण ह्या नावाचं विशेष महत्त्व म्हणजे हे तिच्या आजीआजोबांच्या नावातून तयार केलेलं आहे.” असं म्हणत तिने माई आणि काकांकडे बघितलं. सरस्वती आणि रामचंद्र ह्यांची पहिली नात म्हणून स्वरा. सगळ्यांनाच नाव खूप आवडलं. 

अल्पोपाहार झाला आणि हळूहळू आलेली पाहुणे मंडळीही आपापल्या घरी गेली. 

अचानक आलेल्या श्रीपाद मुळे आनंदात विघ्न आणण्याचा प्रयत्न सध्या तरी फसला होता. आपली निराशा लपवत ती व्यक्तीही खुश असल्याचे दाखवत सगळ्यांमध्ये मिसळून गेली. पण कुठेतरी तिच्या मनात अजून काही घोळत होते. 
तिच्या हातात वेळही कमी होता. त्यामुळे कुणाचं लक्ष नाही हे बघत ती व्यक्ती गुपचूप आतल्या बाजूला निघून गेली. 
बाकीचे सगळेजण खूप दिवसांनी भेटत होते आणि त्यातही कैवल्य बऱ्याच वर्षांनी आला होता. त्यामुळे त्याच्या मागे मागे होते. 

स्वरा मॅडम मात्र आजुबाजुला काय घडतंय ह्याच्याशी काही देणंघेणं नसल्यासारख्या पाळण्यात हातपाय आपटत स्वतःच स्वतःचं मनोरंजन करून घेत होत्या. 

श्रीपाद पाळण्याजवळ आला आणि त्याने तिला उचलून घेतले. माई काकाही जवळच उभे होते. त्यांच्याकडे बघत तो म्हणाला, “तिला दिलेलं वचन मी पूर्ण केलं काका. ह्या घरात जन्माला आलेल्या पहिल्या मुलीचं नाव तुमच्या दोघांच्या नावाने ठेवलं.” 

श्रीपाद कडून तिचा उल्लेख झाला आणि सगळ्यांनाच तिची आठवण आली. क्षणभर सगळेच हळवे झाले पण मुलांच्या गोंधळात पुन्हा सावरलेही. 

स्वराच्या निमित्ताने श्रीपाद आणि कैवल्य पुन्हा एकदा वाड्यात आले होते. आणि भविष्यातही स्वराच त्या दोघांना कुलकर्णी वाड्याशी जोडून ठेवणारा दुवा असणार होती. पण अजून तरी सगळे ह्या गोष्टी पासून अनभिज्ञ होते. आणि म्हणतात न अज्ञानात सुख असतं त्यामुळे श्रीपादसुध्दा बऱ्याच गोष्टींची कल्पना असूनही त्या सांगणं टाळत असे. शेवटी भविष्यात घडणारी गोष्ट चांगली असो किंवा वाईट ती तिच्या योग्य वेळेला उलगडण्यातच मजा असते. 

चांगल्या वाईट घटनांचे अनपेक्षित सरप्राईज नेहमीच्या मिळमिळीत आयुष्यात एक इसेन्स एड करत असतात. त्यामुळे तर माणूस आशेचा दोर धरून सगळ्या गोष्टींना सामोरा जातो. 

तर कैवल्य जरी माई आणि काकांचा पहिला नातू असला तरी त्याला घरातल्या लोकांचा सहवास फार कमी मिळाला होता. त्यामुळे बर्‍याच दिवसांनी आपल्या माणसांमध्ये येऊन त्याची कळी खुलली होती. खरंतर तिथे त्याने आईविना मुलगा अशा सहानुभूतीच्या छायेत वाढू नये म्हणूनच त्याच्या आईने म्हणजे श्रीपादच्या पत्नीने त्याच्याकडून शेवटच्या क्षणी त्याला दूर नेण्याचे वचन घेतले होते. 

कैवल्यला मानसिकदृष्ट्या हळवे होऊन चालणार नव्हते, त्यामुळे त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून घेतला गेलेला हा निर्णय अत्यंत योग्य होता. शिवाय आई नसल्यामुळे तिथे त्याच्याकडे फार व्यवस्थित लक्ष दिले जाण्याची शक्यताही कमी होती. माई काका असले तरी इतरांची मुलं घरात होती अशा वेळेला कैवल्यला झुकतं माप दिलं गेलं म्हणून घरात कलह होण्याची शक्यता होती. 

श्रीपादसोबत कैवल्य लवकरच सगळ्यातून बाहेर पडला होता . आईच नसूनही सतत सोबत असणारं अस्तित्व त्याचं व्यक्तिमत्त्व उत्तमप्रकारे घडवत होतं. 

बऱ्याच वर्षांनी भेट होत असल्याने कैवल्य सध्या घरात सगळ्यांकडून मनसोक्त लाड करून घेत होता. इनमिन 7,8 वर्षांचं लेकरू ते त्याला कुणाच्याही मनात काय विचार आहेत ह्याबद्दल काही अंदाज असण्याचा प्रश्नच नसल्याने तो आपल्या सगळ्या भावंडांमध्ये रमला होता. 

पण तिथे असणाऱ्या त्या व्यक्तीची नजर त्याच्यावर होती. त्यात कैवल्यच्या हुबेहूब त्याच्या आईसारख्या असणाऱ्या डोळ्यांमुळे त्या व्यक्तीला आपल्या कृत्याची आठवण सतत होत होती. त्या व्यक्तीला ही गोष्ट मात्र अजून कळली नव्हती की जशी ती कैवल्यावर लक्ष ठेवून आहे तसंच कुणीतरी तिच्याही हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. ज्या क्षणी त्या व्यक्तीला आपल्याकडे कुणीतरी रोखून बघतंय अशी जाणीव झाली त्या क्षणी त्या व्यक्तीने पुन्हा कामाचा बहाणा करत सगळ्यामधून काढता पाय घेतला. 

‘ती’ कोण? कैवल्यच्या आईसोबत असं काय घडलं की श्रीपाद घर सोडून निघून गेला होता? ती व्यक्ती कोण आहे आणि आता ती काय करणार? 

मिळतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं, नक्की मिळतील. पण हळूहळू - क्योंकि सब्र का फल मिठा होता है। तोपर्यंत वाचत रहा...
आणि आपल्या कथेची टॅगलाईन आहे ती विसरू नका "trust me, you get what you give" तेव्हा चांगले विचार आजुबाजुला पसरवत रहा म्हणजे चांगल्याच गोष्टी आपल्याला शोधत येतील. शुभं भवतु!!!
*******************************************
कालाय तस्मै नमः| भाग ३

अरुंधती आणि श्रीपादची गोष्ट

स्वराचं बारसं फक्त थाटामाटातच नाही तर कुठलंही विघ्न न येता पार पडलं म्हणून माई काका दोघेही समाधानी होते. त्यात श्रीपाद आणि कैवल्यच्या येण्यानेही भरच पडली होती. बारसं तसं सुट्टीच्या काळातच असल्याने सगळेजण अजून काही दिवस वाड्यातच असणार होते. त्या काळात फोन इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हते. 

मोबाईल तर अस्तित्वातच नसल्याने सगळे जण मस्त गप्पा मारत एकत्र बसले होते. बच्चेकंपनी धुडगूस घालण्यात गुंग होती. 

काका आणि श्रीपाद एका बाजूला बोलत होते. काका त्याला विचारत होते की तो आता इथेच राहणार आहे ना? त्यावर श्रीपाद म्हणाला, “काका, मी महत्त्वाच्या वेळी आपल्या लोकांसाठी नक्की येईन असा शब्द दिला होता माईला म्हणून आलो होतो. पण सध्या तरी मी इथे राहू शकत नाही. 

कैवल्य पुढच्या शिक्षणासाठी जाणार आहे पुढच्या वर्षी. त्यानंतर कदाचित २-३ वर्षांनी मी इथे कायमचा येईन. पण नक्की काहीच सांगू शकत नाही. हो पण काही गोष्टींची जबाबदारी फक्त माझ्यावर आहे. त्यामुळे वेळोवेळी मी हजर होईनच. खरं तर अरुंधती गेल्यानंतर इथे येण्याची माझी इच्छाच होत नाही पण काय करू तिनेच मला शब्दांत बांधलं आहे.” 

काकांनी त्याच्या हातावर थोपटले आणि हळूच स्वतःचेही डोळे टिपले. 

रात्री उशीरापर्यंत काका विचार करत होते श्रीपादच्या बोलण्याचा. बऱ्याच गोष्टी त्यांच्या नजरेसमोरून आत्ता घडत असल्यासारख्या सरकत होत्या.
     
‘अरुंधती’ - काकांचे जिवलग मित्र श्यामकांत जोशी ह्यांची एकुलती एक मुलगी. तीही श्रीपाद सारखीच किंबहुना जास्तच विलक्षण. भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल तिला लागते असं लोक म्हणायचे. पण ती श्रीपाद सारखी अलिप्त राहत नसे तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना मदत करत असे. तिच्या मनमिळाऊ स्वभावाला बघूनच काकांनी जोशींना गळ घातली होती तिला सून करून घेण्यासाठी. जोशींनी मात्र त्या काळातही अरुंधतीचाच निर्णय शेवटचा असेल असं सांगितलं होतं. मग तिलाच विचारलं गेलं, त्यावर तिने काकांना हो सांगितलं.

पण त्यासोबतच अत्यंत नम्रपणे हेही सांगितलं की भविष्यात तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तशाच कराव्या लागतील, काय ते मी आत्ता सांगू शकत नाही; वेळ आली की सांगेन. पण तेव्हा तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. काकांना श्रीपादच्या अशा बोलण्याची सवय होतीच त्यामुळे त्यांनी अरुंधती जे म्हणत होती त्यावर होकारार्थी मान डोलावली. 

थोड्याच दिवसांत चांगल्या मुहूर्तावर श्रीपाद आणि अरुंधतीचं लग्न झालं. अरुंधतीच्या गृहप्रवेशाने घरात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या. गायत्री, काकांची मोठी मुलगी, तिला दिवस गेल्याच कळलं. तिचं लग्न होऊन तशी दोन वर्षे उलटली होती त्यामुळे सगळ्यांना हा अरुंधतीचा पायगुण वाटला.

 श्रीधरसाठीही एक चांगलं स्थळ आलं. त्याचंही लग्न जमलं. दोन महिन्यांत लग्न झालंसुद्धा. श्रीधरनंतरच्या भास्करला गावातल्या शाळेतच नोकरी मिळाली होती. त्याच्यासाठी अरुंधतीच्याच मावसबहिणीचं स्थळ आलं, संगीताचं. ते लग्नही पक्कं झालं. अरुंधती तिच्या वागण्याने आधीच घरातल्या लहानमोठ्या सगळ्यांची आवडती झाली होती. त्यात घडत गेलेल्या घटनांनी नकळतच भर घातली. पण म्हणतात न सगळे दिवस सारखे नसतात. 
भविष्याच्या गर्भात ज्या गोष्टी होत्या त्यांची कल्पना इतरांना नसली तरी श्रीपाद अरुंधतीला मात्र होती. पण त्यांचं मात्र एकच धोरण होतं, कालाय तस्मै नमः
ही एकच गोष्ट लक्षात ठेवून ते दोघेही संसार करत होते. 
हळूहळू माई काकांची सगळी मुलं मार्गी लागत होती. पहिल्या चौघांचे संसार सुरू होत होते. त्यानंतरचे चौघेही शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात होते. 

गायत्री तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. यथावकाश तिला मुलगा झाला. 

काही दिवसातच अरुंधतीला दिवस गेल्याची बातमी घरात कळली तसे सगळेच खुश झाले. श्रीपादचा संसार मार्गी लागला म्हणून माई काका देवाचे आभार मानताना थकत नव्हते. अरुंधतीनंतर घरात आलेल्या मंदाकडे, श्रीधरच्या बायकोकडे नाही म्हटलं तरी थोडं दुर्लक्ष झालं अस मंदाचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच तिचीही बातमी कळली. तसं माईंना काय करू नि काय नको अस झालं. 

मंदाला पटलं माई दोघींनाही सारखंच वागवतात. बाळंतपणासाठी अरुंधती आणि मंदा दोघीही माहेरी निघून गेल्या. आता माई आणि काकांचा वेळ नात होईल की नातू असे तर्क लावण्यात सरू लागला. 

काही दिवसांनी अरुंधतीच्या घरून बातमी आली मुलगा झाला अशी. माई काकांनी उत्साहात सगळीकडे पेढे वाटले. मंदानेही लवकरच अजून एक नातू त्यांना दिला. तेवढ्याच उत्साहाने पुन्हा पेढे वाटले गेले. काही महिन्यात दोन्ही नातवांसह सुना घरी आल्या. घराचे गोकुळ झाले होते.
हळूहळू दोन्ही मुलं मोठी होत होती. 

काकांना अजून एक जावईही आला होता. मैथिलीचं लग्न झालं होतं. त्याचबरोबर इतर दोन मुलं विजय आणि अशोकही नोकरीत स्थिरस्थावर झाले होते. त्यांची लग्नं ठरत होती. आता फक्त रोहिणी राहिली होती कारण ती शिकत होती. 

लवकरच रोहिणीचेही लग्न ठरले. घरातले त्या पिढीतले शेवटचे लग्न त्यामुळे भरपूर उत्साहाने सगळे आले होते. मधल्या काळात भास्कर-संगीताही आईबाबा झाले होते.

लग्नाच्या काळात अरुंधतीचा चेहरा सुकल्यासारखाच दिसत होता माईंनी विचारलंही तिला पण तिने दगदगीचे कारण पुढे केले. तीच मोठी असल्याने तसंही तिच्यावर जबाबदारी जास्त होती. 

लग्न निर्विघ्नपणे पार पडले. ४-५ दिवसांत सगळे पाहुणेही पांगले. गायत्री आणि मैथिलीही सासरी निघून गेल्या. आता माई-काका, हे ५ भाऊ आणि त्यांची कुटुंबं होते. श्रीपाद आणि भास्कर गावातच राहत होते. श्रीधर नोकरीमुळे लवकरच दुसऱ्या राज्यात जाणार होता. विजय आणि अशोक दोघांनीही आपापल्या शिक्षणाचा उपयोग करून एकत्रित बिझनेस सुरू केला होता. त्यांचं दोघांचंही एकमेकांशी बऱ्यापैकी पटत होतं. त्यात त्यांच्या बायका ललिता आणि अश्विनी दूरच्या नातेवाईक असल्याने तर अजूनच भर पडली. एकाच शहरात पण जवळपासच ते दोघेही राहत होते. मुलंही नीट रहात आहेत म्हटल्यावर माई काकांना तशी काहीच हरकत नव्हती. वाडा सोडला तर त्यांची तशी काही संपत्ती नव्हती की जिच्यासाठी मुलांमध्ये वाद व्हावेत. एकूणच सगळं आलबेल होतं. 


पण म्हणतात ना की माणसाला सुखही टोचू लागतं. तसंच काहीसं झालं. छोट्या छोट्या कुरबुरींना सुरुवात झाली आणि त्यांचं रूपांतर कधी मोठ्या भांडणात झालं कुणालाच कळलं नाही. श्रीपाद आणि अरुंधतीने सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. श्रीधर त्याच्या मार्गाने तर विजय आणि अशोक त्यांच्या मार्गाने निघून गेले. ते तिघे तर निघून गेले पण त्यांच्या जाण्याने माई काकांना खूप त्रास झाला. 

सगळेजण सावरत असतानाच अरुंधती घरात चक्कर येऊन पडली. जेव्हा सगळ्या तपासण्या झाल्या तरीही काही कळेना तेव्हा तिच्या माहेरहून तिचे वडील एका वृद्ध वैद्यांना घेऊन आले. त्यांनी अगदी कसून तिची नाडीपरीक्षा केली आणि जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं. तिचा गर्भपात होऊन गर्भाशय निकामी व्हावं म्हणून एक अत्यंत दुर्मिळ प्रकारचं औषध तिला नकळतच दिलं जात होतं. जवळजवळ वर्षभरापासून हे सुरू होतं आणि आता त्याचे परिणाम शरीरावर ठळकपणे दिसू लागले होते. हे का कुणी केलं ह्यावर काहीच उत्तर कुणालाच सापडेना. हे सगळं ऐकल्यावर काका मात्र हवालदिल झाले होते. 

त्यांनी आपल्या मित्राकडे बघून नकळतच हात जोडले. पुढे ते काही बोलणार इतक्यात जोशी म्हणाले,“राम तू माफी मागू नकोस. जे घडलं आहे ते भयंकर आहे, पण असं काहीतरी होणार ह्याची कल्पना अरुने आम्हाला आधीच दिली होती.”

“धक्का तर आम्हालाही बसला आहे. पण ह्या घरात सगळे आपलेच आहेत कुणावर संशय घेणार? मुळात आता आपण त्यावर उपाय काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू.” तेवढ्यात वैद्य बाहेर आले दोघांचेही प्रश्नार्थक चेहरे त्यांनी वाचले अन् हलकेच नकारार्थी मान हलवली. इतका वेळ शांत असणाऱ्या श्रीपादने विचारले, “नाही म्हणजे काय वैद्यबुवा?”
   
 वैद्यांनी बोलायला सुरुवात केली, “अरुंधतीवर फक्त औषधांचाच परिणाम झाला नाहीये श्रीपादराव. मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला तरी स्पष्ट सांगण्याची गरज नाही. औषध कसलं विषच होतं जे दिलं होतं. पण त्या बरोबर आणखीही काही अघोरी तंत्राचा उपयोग केला गेला आहे. हे का केलं, कुणी केलं ते शोधण्याचा काही उपयोग होणार नाही. अरुंधती आता काही दिवसांची पाहुणी आहे पण तिचा प्रवास इथेच संपणार नाहीये हे तिला जितकं माहीत आहे तितकंच तुम्हाला ही माहिती आहे. बाकी काही गोष्टी फक्त अरुंधतीच तुम्हाला सांगू शकेल. तिचे उरलेले दिवस सुसह्य व्हावेत म्हणून काही गोष्टी मी सांगितल्या आहेत तेवढया मात्र नक्की करा. निघतो मी आता.” 

श्रीपाद तिरीमिरीतच आतमध्ये गेला. माई आणि संगीता अरुंधतीच्या उशाशी बसलेल्या होत्या. त्याचा आवेश बघून काही न बोलता त्या दोघीही निघून गेल्या. इतक्या वेळ थांबवलेले अश्रू आवरणे आता श्रीपादला शक्य नव्हते. नकळतच एक अश्रू अरुंधतीच्या हातावर पडला. तिने डोळे उघडून त्याच्याकडे बघितले. अन् ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. तसं तिला थांबवत त्याने पुन्हा आडवे व्हायला लावले. 
आणि तो काही बोलणार इतक्यात ती बोलू लागली, 

“थांबा आधी माझं ऐकून घ्या. तुमचा राग मान्य आहे मला, पण आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना होती. आपण फक्त संसार करण्यासाठी एकत्र आलो नव्हतो ना? हे घर, ही माणसं आपलीच आहेत, पण काहीजण चुकीच्या मार्गावर जात आहेत. त्याचा परिणाम हा होणारच होता. असो. मला तुमच्याकडे काही मागायचे आहे द्याल?” असे म्हणत ती थांबली. श्रीपादने होकारार्थी मान हलवताच ती पुढे बोलू लागली, “तुम्ही कैवल्यला हया वातावरणापासून दूर ठेवून भविष्यासाठी तयार करायचे. तसेच माझ्या अनैसर्गिक मृत्यूमुळे ह्या घरात सहजासहजी मुलगी जन्माला येणार नाही. ज्यांनी माझ्यासोबत हे कृत्य केले त्याच व्यक्तींना कुलदैवताला साकडे घालून स्वतःचे अपराध मान्य करावे लागतील मगच काहीतरी होईल.

 पण तसं झालं तरीही ते लोक सुधारतील असं नाही. त्यामुळे घरात जन्माला आलेल्या पहिल्या मुलीला तुम्ही माई आणि काकांच्या नावावरून नाव द्यायचं. कारण ते दोघेही पुण्यवान आहेत. त्यांची पुण्याई त्या नावामुळे त्यांच्यानंतरही तिच्यासोबत असेल. आणि तिला भविष्यात येणाऱ्या संकटांशी सामना करण्यासाठी बळ देत राहील. मी माझी साधना वापरून काही उपाय केले आहेत त्यातलाच हा एक आहे. तेव्हा मला वचन द्या योग्य वेळी येऊन तुम्ही हे काम नक्की कराल. काही गोष्टी मी काकांना स्वतंत्रपणे सांगणार आहे पण त्या तुम्हाला योग्य वेळीच त्यांच्याकडून समजतील. तोपर्यंत माझ्या कैवल्यला जपा. भविष्यात त्याला त्याच्या बहिणीला खूप मदत करावी लागणार आहे.”

 बराच वेळ बोलल्यामुळे अरुंधतीला धाप लागली. तसं तिला आराम मिळावा म्हणून श्रीपाद खोलीबाहेर निघाला आणि कुणाशीही न बोलता शांतपणे त्या खोलीत येऊन बसला. जिथे समोर एक मोठी तसबीर होती तिच्याकडे बघतच त्याने पद्मासन घातले आणि डोळे मिटले. 
अरुंधतीला दिलेले वचन तर श्रीपादने पूर्ण केले, पण त्या व्यक्तींबद्दल अजूनही ते दोघे कुणाला सांगत नव्हते. अरुंधतीला असं काय सांगायचं असेल काकांना त्या व्यक्तींबद्दल की अजून काही रहस्य? 

कळेल पुढच्या काही भागात तोपर्यंत वाचत रहा, तर्क लावत रहा.
_____________________________________

दररोज 3 भाग प्रकाशित होतील. तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. लवकरच नवीन भाग प्रकाशित करण्यात येतील. 

ब्लॉग लिंक शेयर करायला हरकत नाही. तुम्हीही वाचा इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु !!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

comparison 2/8

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...