कालाय तस्मै नमः (भाग ७-८)
कालाय तस्मै नमः| भाग ७
भूतकाळात फेरफटका
अरुंधतीच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असली तरी आयुष्य थांबणार नव्हते. अरुंधतीचे सर्व कार्य आटोपल्यावर महिनाभरात घरातील सर्व सोय बघून निघावे असे श्रीपादने ठरविले. तसे त्याने काकांना बोलूनही दाखवले. ते बोलणे माईंनी ऐकले आणि त्या श्रीपादला बघत म्हणाल्या, “निघावे म्हणजे? ती गेली म्हणजे तूही जाणार का तुझ्या वाटेने? कैवल्य - त्याचं काय?”
श्रीपाद माईंना समजावत म्हणाला, “माई मी जातोय म्हणजे निघून नाही जात. बदली झाली आहे माझी, खरे कारण सांगायचे त्याने टाळले. आणि कैवल्यला ह्या वातावरणापासून दूर घेऊन गेलो तरच तो सावरेल नाही तर त्याला सतत आईची आठवण येत राहील. नवीन ठिकाणी नवीन माणसांमध्ये तो गोष्टी विसरून रमेल. आणि जेव्हा जेव्हा तू मला मनापासून हाक मारशील मी नक्की येईन. ह्या घराला, तुम्हाला माझी गरज असताना मी तुमच्या सोबत असेन. आणि मलाही ह्या घरात तिच्या बाबतीत जे झाले सतत तेच तेच आठवून गुदमरून गेल्या सारखे होते. त्यामुळे तू मला परवानगी दे.”
माईंनाही मनातून त्याचे बोलणे पटले, पण आईचं काळीज होतं ते. त्यात श्रीपाद त्यांची दुधावरची साय म्हणजे कैवल्यलाही घेऊन जाणार म्हटल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. श्रीपादने जवळ घेत माईंना पोटभर रडू दिले.
गेल्या काही दिवसात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. भास्कर संगीताही श्रीपाद जाणार म्हटल्यावर थोडेसे धास्तावले. इतके दिवस तशी जबाबदारी त्यांच्यावर नव्हती, पण आता मात्र त्यांना सगळं बघावं लागणार होते. श्रीपादने त्यांनाही समजावले. जिथे जाणार आहे तिथला पत्ता आणि नंबर कळवेन काहीही गरज पडली तर कुठल्याही क्षणी तू मला कळवु शकतोस हेही सांगितले.
सगळ्या मुली काही दिवस राहून सासरी परत गेल्या होत्या. लाडक्या वहिनीच्या जाण्याने त्यांनाही घर सुने वाटत होते. श्रीधर मंदा आता परत जाणार होते. अशोक , विजयने त्यांना स्वतःकडे येण्याची गळ घातल्याने तिकडे जाऊन मग ते तसेच जाणार होते.
श्रीपाद एकेक कामं हातावेगळी करत होता. भास्करला सगळ्या गोष्टी सांगत होता. श्रीपादने नाही म्हटलं तरी माई काका , कैवल्य आणि भास्करच्या कुटुंबाचा विचार करून बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. भास्करला मदतीची गरज पडेल आणि ती त्याला कुणाकडेही मागावी लागू नये ह्याची काळजी घेण्याची कल्पना अरुंधतीची होती. त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे श्रीपादने काही गुंतवणूक केली होती. इतरांकडून त्यांना तशी फारशी अपेक्षाही नव्हती. भास्करला मात्र जबाबदारी बघूनच दडपण आले. “दादा, मला नाही जमणार रे हे सगळे. तूच बघ ना,” तो श्रीपादला म्हणू लागला. तसा श्रीपाद म्हणाला, “असं करून नाही चालणार भास्कर. माझ्या वाटणीच्या गोष्टी मी करणारच आहे. पण तू इथे आहेस म्हणजे अडीअडचणीच्या वेळी तुला हे सगळं माहिती हवं. संगीताला सगळं माहिती आहे तिची मदत घे. ती अरुंधतीचीच बहीण आहे तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत ती तुझ्यासोबत खंबीरपणे उभी असेल.” सगळी कागदपत्रे त्याच्या हातात सोपवत श्रीपादने समजावले.
श्रीपाद आणि कैवल्यच्या निघण्याचा दिवस आला. मनाला समजावत माई सगळी तयारी करत होत्या. काही दिवस अरुंधतीचे आईबाबा त्या दोघांसोबत राहणार होते. ते दोघे नेमके कुठे जाणार आहेत हे कुणालाही सांगितले नव्हते. सगळी व्यवस्था झाली की काय ते कळवतो असे श्रीपादने सांगितले होते. काकांनीही फारसे काही न विचारता होकार दिला होता पण तरीही त्यांना ते पचवणे अवघडच जात होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने श्रीपाद, कैवल्य आणि अरुंधतीचे आईबाबा निघाले. गेल्या काही दिवसांत कैवल्यच्या वागण्यात खूप बदल झाले होते. तीन-चार वर्षांचे ते लेकरू अचानक खूप समंजस झाले होते. अरुंधतीच्या आजारपणाच्या काळात त्याला तिच्यापासून दूर ठेवलं जात असल्याने कदाचित आता आपल्याला आई शिवायच रहावे लागणार ही नोंद त्याच्या बालमनाने घेतली होती. त्यामुळे बाबांनी जायचं म्हटल्यावर त्याने चुपचाप मान डोलावली होती.
श्रीपादलाही आईविना लेकरू म्हणून मिळणाऱ्या सहानुभूतीची सवय त्याला होऊ द्यायची नव्हती. ते त्याच्या आईला अरुंधतीलाही आवडले नसते. म्हणूनच तो दूर निघाला होता. येणारा नवीन प्रवास बरेच काही नवीन घेऊन स्वागतासाठी तयार होता.
इकडे काका आणि भास्कर घरी आले होते. घरी आल्यावर मोकळे मोकळे घर बघून काकांना कसेतरी झाले पण आता ह्याची सवय करून घ्यावीच लागणार होती. संगीता आणि भास्कर समीरच्या साथीने आता माई काकांना सांभाळण्यासाठी तयार झाले होते.
दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने, वर्षांमागून वर्षे जात होती. प्रत्येक सणावाराच्या दिवशी माईकाकांना दिवसभर श्रीपाद येईल असे वाटत असे पण तसे काही घडत नसे. शेवटी त्यांनी आता आशाच सोडून दिली होती. मधल्या दिवसांमध्ये घरात आणखी 'नातू' आले होते. पण ‘ती’ च्या येण्याची चाहूल कुठेच नव्हती. शब्द दिल्याप्रमाणे दरवर्षी काका सगळ्यांना घेऊन कुलदैवताला जात होते. चार वर्षे लोटली होती आणि मग संगीताने ती बातमी दिली.
संगीताची परिस्थिती नाजूकच होती. त्यामुळे तिला माहेरी न पाठवता तिच्या आईलाच माईंनी बोलावून घेतले होते. पूर्ण नऊ महिने त्या येऊन जाऊन राहत होत्या.
संगीताला डोहाळेही विचित्रच लागत होते. पण तिच्या आईला मात्र कुठेतरी ह्या सगळ्यामुळे अरुंधतीची आठवण येत होती. कारण अरुंधतीच्या जन्मावेळी तिच्या आईला म्हणजेच संगीताच्या मावशीला असेच डोहाळे होते. घरात सतत पूजा व्हावी जपजाप्य सुरू असावे, सतत मंत्रोच्चार कानावर पडत राहावेत असे तिला वाटत होते. तिने तसे बोलून दाखवताच काकांनीही यथाशक्ती सगळ्या गोष्टी करणे सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून की काय संगीताचा त्रास हळूहळू कमी झाला. तिची प्रकृतीही स्थिर झाली. आणि घराला मिळालेला तो शाप दूर होण्याची आशा काकांच्या मनात निर्माण झाली.
हे सगळं बघून त्या दोन व्यक्तींनी मात्र पुन्हा आपली तयारी सुरू केली होती. पण ह्यावेळी त्यांना प्रत्येक केलेल्या वाराचे प्रत्युत्तर लगेच मिळणार आहे ह्याची कल्पना नव्हती.
काका आणि माईंची पुर्वपुण्याई अन् अरुंधतीने दिलेल्या बलिदानाचे फळ म्हणून ‘स्वरा’ सुखरूप जन्माला आली होती. तिच्या जन्मानंतर डॉक्टरांनी काकांना भेटण्यासाठी बोलावले. डॉक्टर ओळखीचेच असल्याने काकांना समजले काहीतरी वेगळं आहे.
काका आत गेले तसे डॉक्टर म्हणाले, “काका, मी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूप वर्षांपासून ओळखतो. पण आजचा अनुभव खूप वेगळा होता. नऊ महिने जिथे मला संगीता सुखरूप राहील का नाही ह्याची खात्री नव्हती तिथे सगळं नीट पार पडणं हा चमत्कार होता. त्यात आज आम्ही ऑपरेशनची तयारी ठेवली होती. कारण कुठल्याही प्रकारचा धोका नको होता. पण आतमध्ये जाताच एक वेगळं वातावरण मी अनुभवलं. संगीताच्या आसपास कुणीतरी वावरत आहे असं मला जाणवलं. आश्चर्य म्हणजे इतर कुणालाही हे जाणवलं नाही. ते जे काही होतं ते खूप आश्वासक होतं. जणूकाही धीर देत आहे. सगळं नीट होईल घाई करू नका असे शब्द ही मला ऐकू आले. मला वाटलं मला भास झाला पण संगीताने मला नंतर सांगितले की डॉक्टर तो भास नव्हता ती माझी ताई होती. माझी आणि बाळाची सुखरूप सुटका व्हावी म्हणून ती सतत माझ्या उशाशी बसून होती. ताई म्हणजे अरुंधतीच न काका?” काकांनी डोळ्यातले पाणी टिपत होकारार्थी मान डोलावली.
डॉक्टर पुढे म्हणाले, “खरे तर मी फारसा देवावर विश्वास नाही ठेवत, पण गेले काही महिने मी जे अनुभवले त्यावरून माझा त्या सकारात्मक शक्तीवर मात्र पूर्ण विश्वास बसत आहे. बाळ आणि बाळाची आई अगदी ठणठणीत आहेत.” काका त्यांचे आभार मानून बाहेर आले.
संगीताला ज्या खोलीत ठेवले होते तिथे आले. समीर कुतूहलाने ते छोटंसं गाठोडं बघत होता. तुझी बहीण आहे असं सांगताच त्याला खूप आनंद झाला. माईंनी बाळाला काकांच्या हातात दिले. तिचे डोळे हुबेहूब अरुंधतीसारखे होते. प्रेमळ दुसऱ्याला आश्वस्त करणारे. काकांकडे बघत बाळाने हळूच डोळे मिचकावले. जणूकाही ते सांगत होतं आता मी आले आहे न आता सगळे नीट होईल. काकाही हळूच हसले.
आणि आजचा दिवस होता बारश्याचा. स्वराने तिच्या काकाला श्रीपादला घरी येण्यासाठी भाग पाडले होते. सोबत कैवल्य ही आला होता.
काका भूतकाळातून बाहेर आले. पहाट झाली होती. दूरवरून मंदिरातली काकडआरती ऐकू येत होती. सगळे घर तसे अजूनही झोपेच्या आधीनच होते.
काका मात्र जागे झाले. आन्हिके उरकून त्यांनी देवपूजा आणि पादुकांची पूजा केली. एकीकडे तोंडाने रोजची स्तोत्रे म्हणणे सुरू होते. पण आज अचानकच त्यांना संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणावेसे वाटले त्यांनी खड्या आवाजात सुरू केले,
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेनित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥१॥
पहिल्या दोन ओळी म्हणत असतानाच अजून कुणीतरी आपल्या सोबत म्हणत आहे ह्याची जाणीव त्यांना झाली. मागे वळून बघताच त्यांना समजलं, दुसरं कोण असणार - कैवल्य होता तो. गालातल्या गालात हसत काकांनी स्तोत्र तसेच सुरू ठेवले.
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् ॥३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥
॥इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम गणेशस्तोत्रं संपूर्णम् ॥
‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत देवाला नमस्कार करून ते कैवल्य जवळ आले. एवढासा तो पण अंघोळ उरकून तिथे येऊन बसला होता. काकांनी विचारले, “इतक्या लवकर का उठलास?”
“मला जाग आली आजोबा. मग तुम्ही उठला आहात हे कळले बाबांनी अंघोळीची तयारी केली होती मग काय मी आवरले आणि येऊन बसलो. तुम्ही स्तोत्र म्हणू लागलात मलाही वाटलं म्हणावं मग मी ही सुरू केले. बरोबर म्हटलं ना मी?”
“अगदी बरोबर. कुणी शिकवलं तुला?”
“आईने.”
काका क्षणभर गोंधळले. “आईने?”
“हो. ती कधी कधी माझ्या स्वप्नात येते. खूप बोलते माझ्याशी. हे तिनेच शिकवलं मला.” तेवढ्यात मागे उभ्या असलेल्या श्रीपादने त्याला हाक मारली आणि माई उठली आहे तिच्याकडे जा अस सांगितलं.
तो काकांकडे वळून पाहत म्हणाला, “ती भेटते त्याला स्वप्नात की काय मला नाही माहित, पण सगळ्या चांगल्या गोष्टी त्याला देऊन जाते. आता कदाचित नाही भेटणार. होईल त्याला सवय.” इतकंच बोलून तो निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत काका तिथेच थांबले. मग वळून पादुकांकडे बघितलं आणि हात जोडून म्हणाले, “सगळं काही तूच सांभाळ आता.....”
समोरून कितीही साधं सरळ वाटलं तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होत असते. निराशेचे क्षण येतात, मन उदास होते, सगळं नकोसं वाटतं. अशा वेळी आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्यावर सगळं सोपवून मोकळं व्हावं. मनापासून त्याला साद घालत योग्य मार्ग दाखवण्याची विनंती करावी. मार्ग नक्की मिळतो. तसे संकेत मिळतात. स्वतःला मदत करण्यासाठी आधी आपण तयार व्हावे तरच तो ही आपल्याला मदत करतो.
_____________________________________
कालाय तस्मै नमः|भाग ८
संमोहन
काही दिवस सगळ्यांसोबत घालवून श्रीपाद कैवल्यसोबत परत गेला. बाकी सगळे जणही आता आपापल्या घरी गेले. पण स्वराच्या रुपात अरुंधतीचं परत येणं अजूनही कुणी स्वीकारलं नव्हतं.
स्वरा जसजशी मोठी होत होती तसतशी तिच्या वागण्यात, बोलण्यात अरुंधतीची छाप जाणवू लागली होती. इतर मुलांना जशा गोष्टी शिकवाव्या लागतात तसे तिचे नव्हते. कधी कधी ती असं काही करायची जे ४-५ वर्षाच्या मुलाला सुचणार नाही. संगीताला लेकीचं कौतुक बघून कुठेतरी आनंदही व्हायचा पण दुसऱ्या क्षणी अरूधंतीची अवस्था आठवली की तिच्या काळजाचा थरकाप होत असे. नकळतच ती स्वराचा रागराग करत असे.
माई तिला समजावून सांगत असत की दरवेळी असंच कसं घडेल? आणि ती हुशार आहे, थोडीफार अरुंधती सारखी वागते म्हणजे ती तसंच नशीब घेऊन आली आहे असं असणार आहे का? माईंचे शब्द ऐकून तेव्हढ्यापुरता तिच्या जीवाला दिलासा मिळत असे.
पण ह्या गोष्टी - म्हणजे स्वराचा रागराग करणे आता वारंवार घडत आहेत हे बघून माईंनी काकांच्या कानावर घातले. काकाही विचारात पडले. कारण इतर सर्व नातवंडांपैकी स्वरावर त्यांचा जास्तच जीव होता. आणि इतरांना त्याचा त्रास होत असेल तर ठीक पण स्वराच्या आईला का होतोय तेच त्यांना कळेना. अशातच एके दिवशी संध्याकाळी त्यांना घरातल्या फोनवर एक फोन आला. त्यावेळी मोबाईल नव्हते त्यामुळे लँडलाईन हेच संपर्काचे साधन होते.
श्रीपादने माई काकांशी कधीही संपर्क साधता यावा म्हणून स्वतःच्या ओळखी वापरून जाण्याच्या आधी घरात फोन कनेक्शन घेतले होते. असो.
तर काका फोनवर बोलत होते म्हणजे खरं तर फक्त ऐकत होते. पलीकडची व्यक्ती कोण आहे, ती काय बोलतेय हे त्यांना जाणवलं. त्यांना जेवढा राग आला त्यापेक्षा कितीतरी जास्त धक्का बसला होता.
फोन ठेवल्यावर श्रीपादचं नाव घेत ते तिथेच बसून राहिले. काही वेळाने पुन्हा फोन वाजला रिंगच्या आवाजाने काका भानावर आले त्यांनी फोन कानाला लावला.
पलीकडून श्रीपाद बोलत होता, “काका काय झालं? मला अचानक जाणवलं की तुम्ही मला बोलवत आहात.” काकांनी आसपास कुणीही नाही हे बघून आधीचा प्रकार त्याच्या कानावर घातला. तसा तो म्हणाला, “मला शंका होतीच. पण तुम्ही काळजी करू नका. दोन दिवसांनी तुमच्याकडे एक व्यक्ती येईल. तुम्ही चौघे आणि दोन्ही मुलांसाठी काहीतरी देईल. ती वस्तू सतत तुम्हा सगळ्यांच्या शरीरावर असली पाहिजे ह्याची तुम्ही काळजी घ्या. आणि हो संगीतावर अजिबात चिडू नका तिच्या आई असण्याचा फायदा घेतला जातो आहे. आपण कुणी जर चिडलो तर ती अजून त्या लोकांच्या प्रभावाखाली जाईल. स्वराला शक्यतो लांब ठेवा. सध्या तरी तिची काळजी करण्याची गरज नाही पण बारीक लक्ष असू दे. काळजी घ्या. मी आहे काही वाटलं तर कळवा.” इतकं बोलून त्याने फोन ठेवला.
त्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती आता काकांच्या लक्षात आली होती. पण सरळ सरळ जर काही बोललं गेलं असतं तर गोष्टी हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणूनच काकांनी शांत रहाण्याचं ठरवलं.
दोन दिवसांनी श्रीपादने सांगितल्याप्रमाणे तो माणूस आला. त्याने हातातली पिशवी काकांकडे दिली आणि त्यांना सर्व काही सांगितले. इकडे तिकडे बघत असतानाच त्याची नजर एका बंद दरवाज्याकडे गेली. ते बघताच काका म्हणाले, “ती अडगळीची खोली आहे. जास्तीच नको असलेले सामान असतं तिथे.” तो त्यांच्यासोबत आत गेला मागच्या वेळी ज्या काही वस्तू श्रीपादला सापडल्या होत्या त्या त्याच ठिकाणी त्याला पुन्हा सापडल्या. त्याने त्या सोबत घेत काकांना काळजी करू नका असे सांगितले. जाता जाता घराकडे एक नजर टाकत तो काहीतरी पुटपुटला आणि काकांना म्हणाला, “सगळ्या खोल्यांमधून तुळशीपत्र घेऊन दिलेले गंगाजल शिंपडा. सगळं नीट होईल. ते पाठीशी आहेत.” देवघराच्या दिशेने नजर जाताच त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचे हसू आले आणि निरोपाचा हात वर करुन तो बाहेर पडला. तो गेल्यावर काकांनी पिशवी उघडली त्यात काही दोरे विशिष्ट वेष्टनात गुंडाळलेले होते. आणि एक छोटा गडू होता ज्यात गंगाजल होते. सर्व काही पादुकांसमोर ठेवून त्यांनी नमस्कार केला.
संध्याकाळी दिवेलगणीच्या वेळी प्रत्येकाला त्याच्या वाटेची गोष्ट त्यांनी दिली, मुलांना स्वतः बांधली. स्वरा समीरसोबत खेळण्यात गुंगली. काका तिथेच बसून तिच्याकडे बघत होते. समीरचा स्वरावर खूप जीव होता पण फोनवरून ऐकलेल्या गोष्टीनंतर काकांना कुणाचाच भरवसा वाटत नव्हता. असं काय ऐकलं होतं त्यांनी?
“संगीता, आम्ही जे सांगतोय ते कळतंय न तुला?”
संगीताच फोनवर आहे असं वाटल्याने समोरच्या व्यक्तीने थेट बोलायला सुरुवात केली होती. काकांनीही फक्त हुंकार भरत ऐकणे सुरू ठेवले. “हे बघ ती मुलगी तुला आणि तुझ्या नवऱ्याला खूप मोठया संकटात टाकेल भविष्यात. तू जरी तिला जन्म दिला असला तरी ती कोण आहे हे तुला कळलेच असेल, तेव्हा सावध राहा, तिला दूरच ठेव.”
आणि बरंच काही बोललं गेलं. बोलणाऱ्याच्या आवाजात असे काही वजन होते की काकाही काही वेळासाठी संभ्रमित झाले. संमोहित करून संगीताला वापरून घेण्यासाठी हे केले जाते आहे हे जसे काकांना लक्षात आले, तसे त्यांनी ते श्रीपादला कळवले आणि त्या गोष्टीला आळा बसला.
ही घटना घडून आता वर्षाचा कालावधी उलटून गेला होता. त्या उपायांमुळे संगीता पुन्हा पहिल्यासारखी प्रेमाने स्वराचं सगळं करत होती. काकांनी नकळतच सुटकेचा निश्वास सोडला.
इकडे शहरात विजयच्या घरी सगळे जण जमले होते. कसलं तरी प्लॅनिंग करणं सुरू होतं.
श्रीपादला आणि भास्करला त्याची पुसटशी कल्पना नव्हती. श्रीपादला फक्त ठराविक तारखेला वाड्यावर ये महत्वाचं बोलायच आहे असा निरोप श्रीधरच्या मार्फत दिला होता. तो ही गोंधळात पडला की आता काय नवीन समोर येणार. तसाही तो कैवल्यला घेऊन जाणारच होता काही कारणाने. त्यामुळे त्याने आणखी दोन दिवस जास्त सुट्टी घेत जायचं ठरवलं.
माई आणि काकांना मात्र ह्या सगळ्याचा पत्ताच नव्हता. ते त्यांच्याच विश्वात मग्न होते. पण सकाळपासून दोघांनाही कसलीतरी हुरहूर वाटत होती. काय ते काही समजत नव्हतं. शेवटी न राहवून काकांनी एकेक करून सगळ्या मुलांना फोन लावला तर कुणी ऑफिसमध्ये कुणी बाजारात कुणी मुलांच्या शाळेत असे निरोप मिळाले. शेवटी निदान सगळे ठीक आहेत अशी मनाची समजूत घालत दोघे शांत बसले.
संध्याकाळी संगीता आणि भास्करही मुलांना घेऊन कुणाच्या तरी घरी कार्यक्रम आहे म्हणून बाहेर गेले. शक्यतो वाड्यात एकटं राहण्याची वेळ माई काकांवर कधी येतच नसे. त्यामुळे आज रिकामा वाडा त्यांना अगदी खायला उठला.
दिवेलगणीची वेळ झाली म्हणून माईनी देवासमोर दिवा लावला आणि त्या कुठली तरी भाजी निवडायला घेऊन काका बसले होते तिथेच येऊन बसल्या. तेवढ्यात अचानक लाईट गेले. देवघरातील आणि तुळशीपुढचा दिवा सोडला तर मिट्ट काळोख झाला.
काकांनी दारातून बाहेर बघितले तर सगळीकडे वीज आहे असे त्यांच्या लक्षात आले. मग वाड्यातलीच कशी काय गेली? विचार करत ते आले माईही जागेवर नव्हत्या. आता ही कुठे गेली म्हणत काका आत जाऊन त्यांना शोधू लागले. अंधारात काही दिसत नव्हते त्यामुळे माईना एक दोन वेळा आवाज देऊन बघितला. पण काहीच उत्तर नाही म्हटल्यावर काका जरासे घाबरले. बाहेर जावे तर आता तुळशीजवळची पणतीही वाऱ्याने शांत झाली होती. काळोख जरा जास्तच गडद झाला.
तेवढ्यात बाहेरच्या मोकळ्या जागेत काहीतरी हालचाल होते आहे असे काकांना जाणवले. त्यांनी एकदम शांतपणे हात लांबवून बसण्याच्या जागेजवळच असणारी काठी उचलली. ते वळाले आणि एक सावली जवळून गेल्याचे त्यांना जाणवले. कुजूबुज ज्या दिशेने येत होती ते त्या दिशेने हळूहळू पुढे सरकू लागले तेवढ्यात घरात काहीतरी भांडे पडल्याचा आवाज आला. काठी धरलेला हात खाली घेत काका स्वयंपाक घराच्या दिशेने गेले. तिथे काहीच पडले नव्हते असे कसे काय झाले काकांना नकळतच भीती वाटू लागली.
ते पुन्हा बाहेर आले तुळशीजवळच पोहोचले होते तेवढ्यात वीज आली आणि समोरचं दृश्य बघताच त्यांचे डोळे विस्फारले गेले.......
काय होतं समोर? ते कळेलच पुढच्या भागात तोपर्यंत मजेत रहा चांगले विचार, चांगली माणसं ह्यांचं अनुकरण करा. मनासोबतच फोन स्वच्छ करत जा म्हणजे नकारात्मक फोटो वगैरे काढून टाका . .
_____________________________________
प्रतिक्रियांची वाट बघत आहे.
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
टिप्पण्या