comparison 2/8

आपल्या आयुष्यात आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात, ज्यांना दुसऱ्यांना कुठल्याही गोष्टीत यश मिळालं तरी पोटात दुखतं. मग अगदी त्या स्वतः रनिंग रेस मध्ये पहिल्या आल्या असल्या आणि दुसरी व्यक्तीची लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिली आली असली, तरी त्यांना दुसऱ्याच्या लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिलं येण्याने त्रास होत असतो. आणि तो त्रास त्या व्यक्त सुद्धा करत असतात. पण आपल्या असं करण्याने इतर लोक दुखावली जात आहेत हे त्यांच्या गावी सुद्धा नसतं. कधी कधी चुकून आपण सुद्धा असं वागतो बर का...

यामध्ये जी दुखावलेली लोक असतात ना? ती मात्र बऱ्याचदा स्वतःला एक प्रश्न विचारत असतात, की माझ्या यशाने या समोरच्या व्यक्तीच्या यशात किंवा आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये. मग हिला एवढा त्रास का होतोय?? तर त्याचं मुख्य कारण फक्त एवढंच असतं की त्या व्यक्ती स्वतःचा आयुष्य दुसऱ्यांबरोबर सातत्याने कम्पेअर करत असतात. 
त्यांना दुसऱ्याच्या आनंदात, यशात सहभागी व्हावेसे वाटत नाही. अर्थात यामुळे कोणाचाही यश किंवा आनंद कमी होत नाही. पण जनरली जर आसपासच्या लोकांना गोष्टी पर्सनली घ्यायची सवय असेल तर त्यांना मात्र फार त्रास होतो. जिला आपण जवळची व्यक्ती समजत आहोत. ती आपल्या आनंदात, यशात सहभागी होत नाहीत याचं दुःख होतं.  

या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट काय असते माहित आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही विशिष्ट गोष्टी घडण्याची वेळ ठरलेली असते. शिवाय थोड्याफार फरकाने जे काही घडत असतं ते सारखंच असतं. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मधल्या वेळात प्रत्येक माणूस सारख्याच स्थित्यंतरातून जात असतो. काही जण पूर्व संचितामुळे हे टप्पे लवकर पार करतात तर काहीजणांना वेळ लागतो इतकंच. 

शिक्षण, नोकरी, लग्नं, मुलं, संसार या इतरांशी तुलना करण्याच्या गोष्टी नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून इतरांसोबत आपल्या आयुष्याची तुलना करण्यापेक्षा आपण काल काय होतो आणि आपण आज काय आहोत याची तुलना केलेलं जास्त चांगलं राहिलं. 

तसही या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण करत असल्याने त्यामध्ये नावीन्य असं काहीच नाही. ही गोष्ट तुम्ही आज करत आहात, ती तुमच्या आधी कोणीतरी केलेली आहे आणि तुमच्या नंतर सुद्धा कोणीतरी करणार आहे. मग यात कसलं आलं वेगळेपण?? 

ते वेगळेपण आपल्याला आणावं लागतं... कसं?? स्वतःमध्ये योग्य पद्धतीने बदल घडवून... स्वतःच्या स्वप्नातलं आयुष्य घडवण्यासाठी कष्ट घेऊन... 
इतरांशी तुलना करून रडत बसण्यापेक्षा आपण आत्ता ज्या टप्प्यावर आहोत तो टप्पा एन्जॉय करणं जास्त महत्त्वाचं. ती फेज महत्त्वाची...
तुम्ही जर शिकत आहात, तर नुसतं शिकायचं म्हणून न शिकता ते अंगी बाणवण्याचा आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. 
तुमचं जर शिक्षण पूर्ण झालं असेल तर आपलं भविष्य घडवण्यासाठी काय करता येईल त्यावर विचार करून कृती करायला घ्या. 
तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भातली आपली कौशल्य तपासून पहा आणि नवीन काही शिकण्याची गरज असेल तर ते शिका. 
तुम्ही जर सिंगल असाल तर एकटे असताना सुद्धा भरभरून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. 
जर तुमचं लग्न झालं असेल किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर त्या रिलेशनशिप मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवणीत राहाव्यात म्हणून प्रयत्न करा. 
थोडक्यात काय तर स्वतःवरती कठोर परिश्रम घेण्याची फक्त तयारी ठेवू नका तर ते परिश्रम घ्यायला सुरुवात करा. इतरांच्या टाईमलाईन, कव्हर पेज, प्रोफाइल पिक्चर, स्टोरी, आणि whatsapp स्टेटस कडे बघून स्वतःच्या आयुष्याला कमी लेखू नका. 

कारण इथे प्रत्येकाची टाईमलाईन आणि डेडलाईन सुद्धा वेगवेगळी आहे...
लक्षात घ्या आपल्या आयुष्याची प्रश्नपत्रिका आपल्यालाच सोडवायची आहे. 
जाता जाता एकच सांगते, कोणी आपल्यापुढे गेलं आहे म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि कोणी मागे राहिले आहे म्हणून वाईट सुद्धा वाटून घेऊ नका. आपण काल काय होतो आणि आज काय आहोत याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
२/८





टिप्पण्या

नीता म्हणाले…
खुपच छान सांगतेस. पण आपण त्यांच्या सुखात आनंदात सहभागी असलो तरी काही जण अहंकार, गर्वाने आपल्याला कमी लेखतात त्याबद्दल पण लिह ना ग.
प्रज्ञा म्हणाले…
खूप सुंदर. Comparison स्वतः शी करायला पाहिजे हा खूप छान विचार आहे.
अनामित म्हणाले…
Khup chan
अनामित म्हणाले…
खूप छान वाटलं वाचून , समजून घेऊन. कधी कधी खूप आनंदी आहोत असं वाटतं , pn he social media तुम्ही म्हणालात तसं , ते बघून वाटतं अरे यार आपण तर बोअर लाईफ जगतोय , आणि विनाकारण फियास्को होतो. आता हळू हळू कळतंय की ते सगळं दिखाऊ असतं. जे आपल्या आजूबाजूला आहे तेच सगळं खरं आणि म्हणूनच छान असतं.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी