कालाय तस्मै नमः (भाग ४ -६)

कालाय तस्मै नमः| भाग ४

आस्तनीतले साप 

श्रीपाद दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधनेच्या खोलीतून बाहेर आला. साधनेच्या वेळी त्याला काही गोष्टींचा अंदाज आला होता त्यामुळे तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. अरुंधतीच्या तब्येतीत फारशी सुधारणा नव्हती. पण वैद्यांच्या औषधांमुळे तिचा त्रास बराच सुसह्य झाला होता. तिच्या तब्येतीची बातमी एव्हाना बाकीच्यांकडे पोहोचली होती. 


झालं गेलं बाजूला ठेवून सगळेजण एकेक करत वाड्यावर येण्यासाठी तयारी करत होते. सगळे येण्यापूर्वीच अरुंधतीला काकांना काहीतरी सांगायचे होते. त्यासाठी तिने श्रीपादला तशी कल्पना दिली. तसे काकांना त्याने सांगितले. त्यांनाही अंदाज आला होता. ते अरुंधतीच्या खोलीत गेले. जिला बघताक्षणी महालक्ष्मीचा भास काकांना होत असे, ती अरुंधती अगदी कृश अवस्थेत पहुडलेली होती. पण त्या अवस्थेतही तिच्या चेहऱ्यावरचं तेज अजिबात कमी झालेलं नव्हतं. उलट एका वेगळ्या आणि विलक्षण प्रकाशाचं वलय तिच्या आसपास त्यांना जाणवलं. प्रचंड त्रास होत असतानाही ती तो हसतमुखाने सहन करत होती. 


काका शेजारीच असलेल्या खुर्चीवर बसले. डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंना त्यांनी नकळतच टिपण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते समजलेच. 
हळुवार हसत ती म्हणाली, “काका तुम्ही नात्याने जरी माझे सासरे असलात तरी तुम्ही कधीही मला सुनेसारखे वागवले नाही. मीही तुम्हाला सदैव बाबांच्या जागी मानत आले. वयाने आणि मानाने मोठे असूनही तुम्ही माझ्या अटी कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य केल्या तेव्हा तर माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. तुम्ही श्रीपादबरोबरच मलाही माझ्या साधनेबाबत मोकळीक दिली. त्यामुळेच आज खरे तर मी तुमच्याशी बोलू शकते आहे. "

"काका आपल्याशी कुठल्याही नात्यांनी जोडली जाणारी सगळी माणसं काही ना काही देवाणघेवाण करण्यासाठीच आयुष्यात आलेली असतात. काही जण आपल्या प्रगतीत वाटेकरी होतात तर काहीजण फक्त आणि फक्त अधोगती करण्यासाठी आलेले असतात. प्रत्येकाचा मुखवट्यामागचा चेहरा वेगळाच असतो तो सामान्य माणसाला सहसा लवकर समजत नाही कित्येकदा तो समजू नये अशीच त्याची म्हणजे परमेश्वराची इच्छा असते. कारण कोण कुठल्या हेतूने आले आहे हे जर आधीच समजले तर माणसाला ना सुखाची आस राहील ना तो दुःखातून सुटण्यासाठी धडपड करेल. त्यामुळे योग्य ती शिकवण मिळेपर्यंत त्याच त्याच स्वरूपाच्या व्यक्ती भेटत असतात, घटना घडत असतात. त्यातून जेव्हा काय शिकायचं हे समजतं तेव्हाच तो धडा पूर्ण होतो. "

"कालचक्र असतं ते . हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याही कुटुंबात काही अशा विघ्नसंतोषी व्यक्तींनी प्रवेश केला आहे. त्या कोण हे तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य व्यक्तीकडून समजेल. मी ती व्यक्ती नाही. पण त्या वाईट शक्तींच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीमुळे आपल्या सगळ्या कुटुंबाची खूप मोठी हानी होणार आहे. अर्थात हे सगळे त्याने ठरविल्याप्रमाणेच जरी घडणार असले तरी तुम्ही, माई, मी, श्रीपाद एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. "

"माझं जाणं हा माझा ह्यातला सहभाग आहे ह्या जन्मातील, पण माझी आणि त्या शक्तीची लढाई इथेच संपणार नाही. तिला तिच्या चुकांची जाणीव होऊन प्रायश्चित्त करण्याची एक संधी मी जाता जाता देत आहे. जर तसं झालं तर फार बरं होईल आणि मला परतण्याचा मार्ग मोकळा होईल.” 
आश्चर्य वाटून काका तिच्याकडे बघतच होते, 

तेवढ्यात ती पुढे बोलली, “माझा मृत्यू जरी मी स्वीकारला असला तरी त्यासाठी कारण ठरलेल्या व्यक्तीला आणि तिच्यासोबतच कुटुंबालाही त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. माझ्या अशा मृत्यूमुळे ह्या घरात सहजासहजी मुलीचा जन्म होणार नाही. वंशाला जरी दिवा हवा असला तरीही त्याला जगात आणण्यासाठी स्त्रीचीच गरज असते. पण हे शक्य व्हावे यासाठी त्या व्यक्तींसोबतच सर्वांनी दरवर्षी एका ठराविक वेळी कुलदैवताचे दर्शन घेऊन सर्व काही रीतीने करावे. तिथे तिची मनोमन माफी मागावी असे केले तरच ह्या घरात मुलगी जन्माला येईल. "

"तुम्ही कुटुंबप्रमुख आहात काका त्यामुळे हे करून घेणे तुमच्याच हातात आहे आणि गरजेचे आहे. ह्या गोष्टींमुळे भविष्यात घडणाऱ्या घटनांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. कदाचित बराच वेळ लागू शकतो पण होईल नक्की. अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या घरात पहिली मुलगी जी जन्माला येईल ती मी असेन काका. माझं कार्य पूर्ण होण्यासाठी मला परत यावेच लागणार आहे."  

"तसेच माझ्या मृत्यूनंतर ह्यांना आणि कैवल्यला तुम्ही इथे थांबण्यासाठी आग्रह करू नका. मी त्यांना काही विशिष्ट हेतूने दूर जाण्यास सांगितले आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला, ह्या घराला त्यांची गरज असेल ते इथे येतील. कैवल्यला भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तयार करायचे आहे त्यामुळे तो दूरच असेल. "

"तुमची पुण्याई माझ्या पुनर्जन्मातही माझ्या सोबत लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आणि माईंनी खंबीर असणं खूप गरजेचं आहे. मी मागत आहे ते खूप अवघड आहे काका माहिती आहे मला पण अशक्य नक्कीच नाही. ह्या वास्तूला तिच्यात राहणाऱ्या चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी तयार केलं आहे मी. पण त्याच्यात भर घालण्याचे काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते कसं करायचं ते तुम्हाला ठाऊक आहे. "

"माझी एक विनंती आहे ,आज मी जे काही तुम्हाला सांगितलं ते योग्य वेळ येईपर्यंत कुणालाही सांगायचं नाही. योग्य वेळ आली की तसे संकेत तुम्हाला मिळतील आणि कुणाला सांगायचं हेही कळेल. त्याच वेळी त्या वाईट शक्तीच्या प्रभावाखाली कोण आहेत आणि किती जण आहेत हेही उघड होईल. माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी कराल ना?”

अरुंधती काकांकडे बघत म्हणाली. तसे भानावर येत त्यांनी होकार दिला. ते म्हणाले, “खूप मोठी जबाबदारी दिलीस गं मला. तू माझ्या घरात सून म्हणून आलीस तेव्हाच मला तुझ्या रूपाने दैवी शक्ती च्या आगमनाची जाणीव झाली होती. वेळोवेळी तू आम्हाला सावरलंस, वाचवलंस आणि आता आमच्यासाठी स्वतःची आहुतीही दिलीस. तुझे खूप मोठे ऋण आहे आमच्या घरावर. तू जे सांगितलंस ते करून ते ऋण थोडेतरी फेडण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.” 

दिवेलागणीची वेळ झाली होती, त्यामुळे काका खोलीतून निघून सरळ देवघरात गेले. माईंचं दिवा लावून दोन्ही मुलांकडून (अरुंधतीचा कैवल्य आणि संगीताचा समीर) शुभंकरोती म्हणून घेणं सुरू होतं. क्षणभर तिथे थांबून देवाला नमस्कार करून काका बाहेर येऊन बसले. 

श्रीपाद त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, “एक विचारायचं होतं काका. खरं तर परवानगी हवी होती.”
“कशासाठी?”, काकांनी विचारलं. 

“परवा पर्यंत सगळे जण येणार आहेत पण त्याआधीच मला घरात गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. अरुंधतीची तशी इच्छा आहे शेवटची,” असं म्हणत त्याने आवंढा गिळला. काका उसनं हसतच म्हणाले, “मग त्यात विचारतोस काय? कर की. तूच करणार आहेस की नेहमीच्या गुरुजींना बोलवायचे?” 

“मीच करणार आहे तशी मी सुटीची तजवीज केली आहे.” “ठीक आहे. मग बाकी तयारी करण्यासाठी माईला सांग.” हो म्हणत श्रीपाद माईंशी बोलण्यासाठी गेला. काका पुन्हा विचारांमध्ये हरवले. 

येणारा प्रत्येक दिवस घरात आणि नात्यात खूप काही बदलून टाकणार होता, ह्याची जाणीव त्यांना क्षणासाठी अस्वस्थ करून गेली. नकळतच आकाशाच्या दिशेने त्यांचे हात जोडले गेले आणि मुखातून बाहेर पडले, कालाय तस्मै नमः| ......

कुठल्याही व्यक्तीला त्रास सहन केल्याशिवाय काहीच मिळत नाही जर एखादी गोष्ट सहज मिळत असेल तर हे नेहमी लक्षात ठेवावे की कुठेतरी कुणीतरी त्याची किंमत नक्की मोजली आहे आपल्यासाठी, आपल्यावरच्या प्रेमासाठी. 

_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग ५ 

पारायण 

पहाटेच साधना आवरून श्रीपाद खोलीबाहेर आला. माई आणि संगीताची तयारी करून झाली होती. अरुंधतीला थोडंसं बरं वाटत असल्याने ती आज लवकर उठून आवरून बसली होती. 

घरात वेगवेगळ्या पूजा , पारायणे सतत होत असत त्यामुळे त्यासाठी एक विशिष्ट जागा तयार केली होती, जिथून संपूर्ण घराकडे नजर टाकणे शक्य होत असे. आणि वाचनाचा आवाजही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जात असे. 

ह्या जागेच्या अगदी समोर एक खोली होती, जिथे अरुंधतीच्या बसण्याची व्यवस्था केली होती. तिला खूप वेळ बसून राहून ऐकणे शक्य नसल्याने झोपून ऐकता येईल अशी सोय होती. तसेच मधल्या जागेत इतरांसाठी बसण्याची सोय होती. 
           
 देवाला नमस्कार करून श्रीपादने संकल्प सोडत वाचनास सुरुवात केली. वाचनाच्या दरम्यान अरुंधतीला त्रास होऊ लागला, पण त्याची कल्पना त्याला आणि तिला स्वतःला आधीपासूनच होती. माई पूर्ण वेळ तिच्याजवळच बसून होत्या. तिच्या जीवाची होणारी तगमग त्यांना बघवत नव्हती पण दुसरा पर्याय नव्हता. 

खरे तर शक्य तेवढी नकारात्मक ऊर्जा घरातून आणि सगळ्यांमधून बाहेर पडावी म्हणून अरुंधतीनेच हा मार्ग श्रीपादला सुचवला होता. श्रीपादनेही साधना करताना त्याच्या गुरूंना साद घातली, तेव्हा त्यांनीही त्याला संमती देत असं केल्यास होणारा त्रास कमी होईल असं सुचवलं. 


शक्य तेवढं स्वतःला शांत ठेवत अरुंधती सहन करत होती. काही वेळातच वाचन पूर्ण झालं. बाकी सर्व आवरून श्रीपादही अरुंधती जवळ आला. आज तिला खूप त्रास झाला होता, पण पारायण पूर्ण होईपर्यंत हा त्रास कमी होईल अशी अपेक्षा होती. तिचा चेहरा खूप थकल्यासारखा दिसत होता पण तरीही ती समाधानी वाटत होती. थकव्यामुळे तिला झोप लागली तसा तो बाहेर पडला. 

घरातच काही गोष्टी त्याला शोधायच्या होत्या. अडगळीच्या खोलीत बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याला जे अपेक्षित होतं ते सापडलं. आज पहिलाच दिवस असूनही घरातील वातावरणात बराच फरक पडल्याचं जाणवत होतं. संध्याकाळी विजय, अशोक त्यांच्या कुटुंबासह आले.
नुकतेच बाहेरून आल्यामुळे सगळेजण आधी हातपाय धुवून मगच अरुंधतीच्या खोलीकडे आले. ती जराशी ग्लानीतच होती. तिची अवस्था बघून ललिता आणि अश्विनीला रडू आवरलं नाही, त्यांना शांत करत सर्वचजण बाहेर आले. 

विषप्रयोग केल्याची माहिती इतर कुणालाही द्यायची नाही हे आधीच ठरल्याने ह्या सगळ्यांना असाच काहीतरी आजार झाल्याचं सांगितलं होतं. सगळेचजण झालेल्या घटनेने कुठेतरी हादरले होते. सकाळ होता होता श्रीधर आणि मंदाही पोहोचले. 

आज पारायणाचा दुसरा दिवस होता. पण आज घरातील सर्व व्यक्ती हजर होत्या. काका , श्रीपाद दोघांचंही वाचताना बारीक लक्ष सगळ्यांवर असणार होतं. जरी योग्य वेळ आल्यावर ती व्यक्ती कळणार असली तरी मानवी मनाला एकदा एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण झाली की ते त्याला शांत बसू देत नाही हे इथे कळते. श्रीपादने वाचन सुरू केले तसे सगळेचजण एकेक करून येऊन बसले. माई अरुंधतीचा हात हातात घेऊन कालच्यासारख्याच आजही तिच्याजवळ बसल्या होत्या. जसाजसा एकेक अध्याय पूर्ण होत होता, आज अरुंधतीला जास्त त्रास होत होता.

 एक क्षण असा आला की अरुंधतीची शुध्द हरपली. माई आणि संगीताचा एकच गोंधळ उडाला. श्रीपाद वाचन थांबवू शकत नव्हता, पण फक्त एक सेकंदासाठी थांबत त्याने अरुंधतीकडे बघितले. तो पुन्हा वाचू लागला. सगळ्यांचं लक्ष विचलित झालं होतं. पण ह्या गोष्टीचा फायदा घेत त्या व्यक्ती तिथून निसटल्या होत्या. पण कुणीतरी त्यांना जाताना बघितलं होतं. त्यांच्या मध्ये एका बाजूला बोलणं सुरू होतं. 

पहिली व्यक्ती-- बरं झालं तिला चक्कर आली, मला बसवत नव्हतं तिथे. 

दुसरी -- हो न. हा पारायणाचा घाट का घातला ह्या लोकांनी? आधीच माहित असतं तर आपण आलोच नसतो. 

पहिली-- मग काय आता इतक्या दिवसांची मेहनत पाण्यात जाणार आपली. जाऊ दे आपल्या वाटेतला मोठा अडसर दूर होतो आहे हे काही कमी आहे का?

दुसरी--- श्रीपादचे काय करायचं? तो येईलच ना आडवा? 

पहिली-- हं बघू, त्याचंही करू काहीतरी. आता चला पटकन नाहीतर कुणाला तरी शंका येईल. 

इकडे कुणीतरी माईंसमोर पाण्याचा ग्लास धरला. माईनी तो घेत अरुंधतीला पाणी पाजून बसतं केलं. आता तिला बऱ्यापैकी शुद्ध आली होती. 

पाण्याचा ग्लास घेऊन आलेली व्यक्ती मात्र अजूनही आपण जे ऐकलं ते खरं होतं की आपला भास होता ह्या संभ्रमात होती. 


श्रीपादचं वाचन सुरूच होतं. हळूहळू पुन्हा सगळे स्थिर झाले. ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. त्या दोन व्यक्ती ही स्वतःला होणाऱ्या त्रासावर नियंत्रण ठेवत बसण्याचा प्रयत्न करत होत्या. कुणीतरी त्यांना लक्षात येऊ नये अशा पद्धतीने त्यांचे निरीक्षण करत होते. पण श्रीपाद आणि काकांना मात्र ती व्यक्ती सापडलीच नव्हती. 


नकारात्मक गोष्टी किती आणि कोणत्या थराला जाऊन व्यक्तीकडून काय काय करून घेतात हे आता लक्षात आलंच असेल. आपण जेव्हा काहीतरी बाहेरचं आहे वगैरे ऐकतो तेव्हा काय करतो? काही जण विश्वास ठेवतात, काही जण खिल्ली उडवतात. 

हा प्रत्येकाचा अनुभव आणि दृष्टीकोन असतो. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर जितका वाईट प्रभाव तंत्र मंत्र अशा गोष्टींचा असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तो विचारांचा असतो. 
चांगले विचार चांगलं वर्तन घडवून आणतात आणि त्यांचे परिणामही चांगलेच होतात. त्याउलट वाईट विचार वाईट कृतींना प्रोत्साहन देतात त्यामुळे होतं काय वाईट गोष्टी घडतात. आपण मात्र दोष त्याला देत राहतो. 


हल्लीच्याच नाही आधीच्या काळापासून हे असं होत आहे. का? कारण वाईट विचार हे आपली पाठ सहजासहजी सोडत नाहीत, चांगले विचार मनात टिकवण्यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करत रहावे लागते. 

अध्यात्म आणि विज्ञान जर हातात हात घालून आपल्या मदतीला सिद्ध असतील तर त्यांचा योग्य ठिकाणी योग्य पध्दतीने वापर करणं आपल्याला शिकलं पाहिजे. 
उदाहरण द्यायचं तर आपल्याला कधी कधी वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे असा विचार दूर सारण्याऐवजी मन अजून त्यावरच विचार करू लागतं. होतं काय? आपल्याकडूनच नकळत त्या नकारात्मक उर्जेला खतपाणी मिळतं. त्यामुळे सकारात्मक असणं आणि त्यावर टिकून राहणं खूप गरजेचं आहे. 

खूपच तात्त्विक झालं ना? पण काय करणार कथेचा गाभा असाच आहे. माणसाला जोपर्यंत स्वतःमध्ये असणाऱ्या सकारात्मक शक्तीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो कालचक्रात भरडला जातो.

चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माणसाची निवड ठरवते तो चांगला आहे की वाईट. इतरांच्या नजरेत चांगले होण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत चांगले होण्यासाठी प्रयत्न करत रहावे.
_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग ६

अरुंधतीला निरोप

पारायण सात दिवसांचं होतं. सगळा त्रास सहन करत अरुंधती रोज हट्टाने बसण्याचा प्रयत्न करत होती. आज सातवा दिवस होता. उद्यापन ही असणार होतं. 

घरातील सगळ्या स्त्रिया उद्यापनासाठी लागणाऱ्या तयारीत गुंतल्या होत्या. माई अरुंधतीच्या जवळ राहूनच छोटी छोटी मदत करत होत्या. सात दिवसात तिची तब्येत जरा नाजूकच झाली होती. पण चेहऱ्यावर असणारं तेज मात्र काहीतरी वेगळीच जाणीव करून देत होते.
 
त्या दोन्ही व्यक्तींनी आपलं काम आता काही काळासाठी थांबवलं होतं. कारण घरात सुरू झालेल्या परायणामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास काय फटका बसेल ह्याची कल्पना त्यांना त्यांच्या मार्गात मदत करणाऱ्या ‘त्या’ साधकाने दिली होती. 


सध्या तरी शांत राहून जे होत आहे त्याचं निरीक्षण करत रहा आणि मला कळवा असे त्याने सांगितलं होतं. ही व्यक्ती वयाने बरीच वृद्ध होती. आणि अघोरी तंत्र मंत्र साधनेसहच विशिष्ट औषधांचं ज्ञानही तिला होतं. तिनेच ते विष पुरवलं होतं पण ते कुणावर वापरलं जाणार आहे हे तेव्हा त्या व्यक्तीलाही माहित नव्हते. जेव्हा तिला ते कळलं तेव्हा आपण नकळतच एका दैवी शक्तीला त्रास दिला आहे हे तिला जाणवलं. म्हणूनच आता ती त्या सगळ्यांमधून अंग काढून घेत होती. ह्या दोघांना शांत राहण्यास सांगणं हे त्याचं पहिलं पाऊल होतं. 


पण जसं आधीही मी नमूद केलं आहे की खेळ सुरू जरी ह्यांच्या हातून झाला असला तरी तो किती आणि कशी वळणं घेत जाईल हे कुणाच्याही हातात उरणार नाही. 
त्या साधकाने आपल्या परीने प्रायश्चित्त करण्यासाठी सुरुवात केली होती. वाट अर्थातच खडतर असणार होती. त्याचे परिणामही त्याला दिसू लागले होते. वाड्यातले पारायण संपताच तेथील त्या दोघांना ह्या गोष्टीची कल्पना द्यायची आणि हा नाद सोडून द्या असं सांगायचं त्याने ठरविलं. 

इकडे पारायणाची सांगता झाली होती. आरती पूर्ण होऊन नैवेद्य दाखवला जात असतानाच दारावर कुणीतरी आल्याची जाणीव काकांना झाली. 

एक अत्यंत दयनीय अवस्थेतील माणूस दारात उभा होता. एका बाजूला जिथे ब्राम्हणांची पंगत बसणार होती त्या शेजारीच पण वेगळं असं आसन तात्काळ श्रीपादने मांडलं. 

माईंनी लगबगीने तिथे रांगोळीची चार बोटे ओढत ताट मांडलं. काका त्या माणसाला घेऊन आत आले. त्याला हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं आणि त्या आसनावर बसण्यास सांगितलं. तो बसताच इतरांनाही बसण्यासाठी विनंती केली. पहिला घास घेताच त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं. जेवण झाल्यानंतर श्रीपाद सर्वांना दक्षिणा देत नमस्कार करत होता. तो त्याच्या जवळ आला तसे त्याने श्रीपादला अर्ध्यातूनच उठवून मिठी मारली. त्या व्यक्तीच्या शरीराला येत असणारा सुगंध क्षणार्धात श्रीपादला जाणवला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. त्या अश्रूंचा अर्थ फक्त काकांना कळला. 


पारायण सफल झालं होतं. “कुठे आहे ती?,” त्या व्यक्तीने विचारले. श्रीपाद त्यांना घेऊन अरुंधतीच्या खोलीत गेला. आत जाताच त्याने दरवाजा बंद केला. काही वेळाने ते बाहेर पडले. काका त्यांना सामोरे गेले, तसे त्यांनी काकांकडे अत्यंत प्रेमपूर्वक बघितले. ते म्हणाले, “मला माहित आहे की हे सगळं सावरणं जमेल की नाही अशी शंका तुमच्या मनात आहे. पण काळजी करू नका. कितीही अवघड परिस्थिती निर्माण झाली तरी मी सदैव तुमच्या पाठीशी असेन. माझ्या अस्तित्वाची जाणीव वेळोवेळी तुम्हाला होत राहील. अरुंधती आणि श्रीपाद ह्या कुटुंबात आहेत ही सुध्दा माझ्या अस्तित्वाची एक खूणच आहे." काकांच्या मनातले भाव ओळखत ते पुढे म्हणाले, 


“ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या आहेत त्या घडणारच. कालचक्रात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हेच तर कालचक्राचे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यातून जर देवाची सुटका झाली नाही तर मग माणसाची कशी होणार?” 
काकांना जणू काही ते काय बोलत आहेत ते समजले. त्यांनी होकारार्थी मान डोलावली. तेवढ्यात लहानसा कैवल्य तिथे आला.

 त्यांनी त्याला उचलून घेतले तसे त्याने विचारले, “तुम्ही माझ्या बाबांचे मित्र आहात?” त्यांनी हसून उत्तर दिले, “हो आणि तुझाही मित्र आहे. पुन्हा भेटशील न मला?” त्याला खाली ठेवत त्यांनी विचारले. त्यानेही निरागसपणे “हो” असे उत्तर दिले. तसे त्याच्या डोक्यावर हात ठेवत ते काहीतरी पुटपुटले, ते कुणालाही ऐकू आले नाही. 

फक्त शेवटचे कल्याणमस्तु तेवढे श्रीपादला ऐकू आले. 

निरोप घेऊन ते घराच्या बाहेर पडले. आत येताना जी पिशवी हातात होती ती विसरलेली श्रीधरच्या लक्षात आली तसा तो ती देण्यासाठी बाहेरच्या दिशेने गेला. पण वाड्याच्या समोरची वाट पूर्ण रिकामी होती तिथे कुणीही नव्हते. वाड्यापासून मूळ रस्त्यापर्यंत जाण्यासाठी कमीतकमी पाच मिनिटांचा सरळ रस्ता होता त्याला कुठेही फाटे फुटत नव्हते. त्यामुळे तो माणूस कुठे गायब झाला ह्या विचारातच श्रीधर पिशवी घेऊन परत आला.

 प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याने काका आणि श्रीपादला बघितले. त्यांनी त्यालाच ती पिशवी उघडण्यास सांगितले. त्या पिशवीतून दोन छोट्या पादुका त्याच्या हातात आल्या. पण जशा त्या त्याच्या हातात पडल्या तसे त्याला चटका बसल्याची जाणीव झाली. त्याने पटकन त्या श्रीपादच्या हातात दिल्या. आणि तो लगबगीने आत निघून गेला. आत गेल्यानंतर त्याने थंड पाण्यात आपले हात बुडवले. मग त्या हाताकडे बघितले त्यावर एका पादुकेचा आकार हुबेहूब उमटला होता. जणू काही ते त्याला जाणीव करून देत होते की तू जे काही करायचे ठरवत आहेस ते विचारपूर्वक ठरव. त्याचे परिणाम ह्यापेक्षा भयंकर असतील. 


श्रीधरच ती व्यक्ती होता ज्याने त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. पण मग त्याला चटका का बसला? कारण ते बोलणे ऐकल्यानंतर हळूहळू श्रीधरच्या मनातही तसेच विचार येऊ लागले होते. आणि तो त्या व्यक्तींना सामील होण्याच्या मार्गावर होता. म्हणूनच त्याला ही सूचना मिळाली होती. आता त्यातून तो काय धडा घेणार की तो त्या मार्गाने जाणार हे तर येणारा काळच ठरवणार होता. 


दुसरीकडे त्या दोन व्यक्ती तशा अस्वस्थच होत्या. पण त्याचं कारण वेगळं होतं. त्या साधकाने त्यांना रात्री उशीरा भेटण्यासाठी बोलावलं होतं. घरातून निसटायचं कसं ह्यावर त्यांच्या डोक्यात विचार सुरू होते. 

रात्री निजानीज झाल्यानंतर त्या दोन्ही व्यक्ती घराबाहेर पडल्या आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या. 

तो साधक आधीच तिथे येऊन बसला होता. त्याला बघताच नकळत त्यांच्या दोघांच्या मनात चर्र झालं. त्याची अवस्थाच अशी झाली होती. 


तो बोलू लागला, “तुम्ही मला फसवून माझी मदत घेतलीत. मला दैवी शक्ती विरुद्ध वापरले म्हणून आज माझी ही अवस्था झाली आहे. नीट बघून घ्या, मी आता काही दिवसांचाच सोबती आहे. तुम्हीही हा मार्ग सोडून द्या अन्यथा तुमचे हाल माझ्यापेक्षा वाईट होतील.” 


तसे त्या दोघांच्या मधील एक जण बोलला, “इतक्या फालतू गोष्टीसाठी तू आम्हाला बोलावलंस? आम्हाला चांगलंच माहिती आहे आम्ही काय करत आहोत आणि कुणाच्या विरोधात करत आहोत. तुला नसेल मदत करायची तर नको करुस आता आम्हाला इतकं ज्ञान नक्कीच मिळालं आहे की आम्ही स्वतः पुढच्या गोष्टी करू शकतो.” 


तो फिकटसा हसला आणि म्हणाला, “अर्धवट ज्ञान नेहमीच भयंकर परिणाम करतं. पण काय करणार विनाशकाले विपरीत बुद्धी.” आणि निघून गेला. 


तो गेला त्या दिशेने बघत त्या व्यक्तीही क्षणभर तिथे थांबल्या आणि वाड्यावर निघून आल्या. त्यांना परत येताना श्रीधरने बघितले होते. पण सध्या तरी तो गोंधळात पडला होता. 

एकीकडे त्याला फायदे दिसत होते तर दुसरीकडे होणारे तोटे. 

श्रीपाद मात्र ह्या सगळ्यांमधून लक्ष काढून घेऊन अरुंधतीच्या उशाशी बसला होता. खोलीत आल्यावर त्याने त्याचे खरे रूप प्रकट केले होते. 


तो अरुंधतीच्या भेटीला आला म्हणजेच आता अरुंधतीची जाण्याची वेळ जवळ आली हे नक्की होते. जाता जाता त्याने पादुकाही दिल्या होत्या. त्याचाच अर्थ श्रीपादच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण होत आले होते. आता नवीन अध्यायाला सुरुवात होणार होती. हा अध्याय किती आणि काय काय रहस्य घेऊन येणार होता हे एक रहस्यच होते. 

हातात असणारा अरुंधतीचा हात थंड पडलेला श्रीपादला जाणवले. त्याच वेळी काकांच्या गंभीर स्वरातला तारक मंत्र त्याच्या कानावर पडला, काकांना जेव्हा जेव्हा भीती वाटत असे किंवा वाईट घटना घडणार आहे असे वाटे तेव्हा ते मनाला शांत करण्यासाठी तारक मंत्र म्हणत असत. 

नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,

जिथे स्वामीपाय तिथे न्यून काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,

उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा.

खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगू स्वामी देतील साथ,

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

काकांच्या मनातली भीती खरी ठरलेली त्यांना कशी सांगावी हेच त्याला सुचेना. 

श्रीपाद शांतपणे काकांच्या समोर येऊन पायाजवळ बसला. त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू त्यांच्या पायांवर पडले. तसे त्यांनी अरुंधतीच्या खोलीकडे धाव घेतली. थोड्याच वेळात बातमी सगळीकडे गेली. 

सगळेजण दुःखात बुडाले होते. त्या व्यक्तीही वाईट वाटल्याचे दाखवत होत्या पण मनोमन मात्र त्यांना आनंद झाला होता. असतात अशीही माणसं. 

फक्त टीव्ही मालिकेत नाही तर ह्या खऱ्या खऱ्या जगात असतात. पण खऱ्या आयुष्यात त्यांचे मुखवटे सहजासहजी उतरत नाहीत त्यामुळे समजून येत नाही. असो. 

तोपर्यंत मनाला सकारात्मक विचारांकडे वळवत रहा. कितीही दुःखं, संकटं आली तरी खचून जाऊ नका माणसाने मदत नाही केली तरी आपल्या स्वतःमध्ये वास करणारी ती शक्ती आपल्याला नेहमीच योग्य मार्ग दाखवते. तेव्हा आपल्या आतल्या आवाजाला ऐकण्याचा प्रयत्न करा. 

अवघड आहे अशक्य नक्कीच नाही. आणि स्वामी आहेत ना अशक्य ते शक्य करण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी त्यांची नावं जरी वेगळी असली तरी ते कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या मदतीला नक्की येतात. गरज असते ती स्वतःवर आणि त्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची.

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु !!! 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

comparison 2/8

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...