दैव देतं आणि कर्म नेतं

#दैव_देतं_आणि_कर्म_नेतं ©®गौरीहर्षल

#सत्यघटनेवर_आधारित

(काही वर्षांपूर्वी मी ज्या डॉक्टरांकडे प्रॅक्टिस करत होते तिथे समुपदेशनासाठी एक कुटुंब आलं होतं. कुटुंब म्हणण्यापेक्षा एक भाऊ आपल्या बहिणीला घेऊन आला होता. त्या कुटुंबाचा अनुभव मी कथास्वरूपात शेयर करत आहे. 
कथा रूपांतर करताना व्यक्तींची नावे,घटना,प्रसंगात आवश्यक ते बदल केले आहेत.)


महाराष्ट्रातल्या एका गावात राहणारे एक सुखी,सधन चौकोनी कुटुंब. 
सुलेखा आणि पांडुरंग देशमुखांना दोन मुलं थोरला दिलीप,धाकटी शैलजा. इमानेइतबारे आपलं शेत सांभाळत सरळमार्गाने संसार करणाऱ्या देशमुखांनी दोन्ही मुलांवर अतिशय उत्तम संस्कार केले होते. मुलगा दिलीप शिकून सवरून नुकताच एका कंपनीत नोकरीला लागला होता. मुलगी शैलजा आत्ता कुठे पदवीच्या पहिल्या वर्षांत होती. 

दिलीप चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला होता आणि ही बातमी समाजात पसरण्यास फारसा वेळ लागला नाही. कधी उघडपणे तर कधी आडून आडून वधुपित्यांकडून चौकशी केली जाऊ लागली. पण दिलीपला पर्मनंट झाल्याशिवाय लग्न करायचे नव्हते. मुलाचा विचार योग्य आहे हे लक्षात आल्याने देशमुखांनीही फारसा जोर लावला नाही. 

वर्षभरात दिलीपला त्याचं काम बघून कंपनीकडून पर्मनंट झाल्याची ऑर्डर दिली गेली. आता मात्र त्यानेही वडिलांच्या इच्छेचा मान राखत लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी संमती दिली. वधुसंशोधनाला सुरुवात केली गेली. एकामागून एक स्थळं बघणे सुरू झाले. नेहमीप्रमाणे काही मुलींना एकत्र कुटुंब नको होतं,तर काहींना शहरातच राहायचं होतं. ह्या आणि अशा कारणांमुळे होकार- नकार सत्राचा अनुभवही देशमुख कुटुंबाने घेतला. 

शेवटी त्यांचा शोध शेजारच्या गावातून आलेल्या पाटील कुटुंबातील सवितावर येऊन थांबला. 

जसा दिलीप तशीच सविताही दिसायला चारचौघींसारखीच होती आणि शिक्षणही जेमतेमच होते. दिलीपच्या मानाने सविता त्याच्यासाठी योग्यच होती. दोन्ही कुटुंबाचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच असल्याने लवकरच सुपारी फोडली गेली. आणि दोन महिन्यांनी लग्न करून सविता पाटीलची सविता दिलीप देशमुख होत सविताने गृहप्रवेश केला. 

सुलेखाताई आणि शैलजाने अगदी उत्साहाने घरात सविताचे स्वागत केले. शैलजाला वाटले की वहिनी आली म्हणजे आता आपल्याला एक जवळची मैत्रीण मिळाली. 
शैलजा तशी स्वभावाने फार बुजरी आणि लाजाळू असल्याने बाहेरच्या जगाशी तिचा फारसा संबंध आला नव्हता. घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर एवढंच काय ते ती बाहेर पडत असे. आईबाबा आणि दादा म्हणजे दिलीप हेच तिचं विश्व. तीही घरात सगळ्यांची लाडकी होती. आता तिने सवितालाही आपल्या भावविश्वात जवळची जागा दिली होती. 

पण हा पणच सगळ्या गोष्टींच्या मध्ये आडवा येतो न.....

सविताच्या माहेरी तिच्याव्यतिरिक्त अजून तिची थोरली बहीण आणि धाकटा भाऊ होते. बहिणीचं लग्न सविताच्या सहा महिने आधी झालं होतं. आणि भाऊ नोकरीच्या खटपटीत होता. आर्थिक परिस्थिती बरी असली तरी खाणारी तोंड पाच असल्याने थोडीफार ओढाताण होतच होती. त्यातच सविता जरा जास्तच हट्टी होती. मनासारखं झालं नाही तर तिचा थयथयाट ठरलेला असे. पण इतक्या वर्षात तिला किती महत्व द्यायचं ते माहेरच्यांना कळून चुकलं होतं. 

दिलीपच्या स्थळाबद्दल सगळी चौकशी केल्यानंतरच सविताला घरच्यांनी लग्नासाठी तयार केलं होतं. छोटं कुटुंब,फारशी जबाबदारी नाही हे बघितल्यावरच सविताने लग्नाला होकार दिला होता. नाहीतर तिच्या आडमुठ्या स्वभावामुळे वैतागून आधी आणलेल्या सगळ्या स्थळांनी समोरून नकार कळवला होता. 

ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी वरती बांधलेल्या असतात तसच काहीसं दिलीप आणि सविताच्या बाबतीत झालं होतं. सविताच्या स्वभावाचा वरवर अंदाज देशमुख कुटुंबालाही देण्यात आला होता पण बाकी सगळ्या गोष्टी अनुकूल असल्याने नवीन ठिकाणी नवीन माणसात आल्यावर स्वभावही बदलेल असं वाटून त्यांनी होकार कळवला होता. 

पहिले काही महिने सविताने आणि घरातही सगळ्यानी एकमेकांना समजून घेत काढले. इतर कुणाला नाही पण दिलीपला मात्र सविता प्रचंड हट्टी आहे हे लक्षात आले होते. पण आपल्यामुळे आणि आपल्या बायकोमुळे घरात इतरांना त्रास नको म्हणून तो बऱ्याचदा सविताची बाजू सावरून घेत असे. 

पण एके दिवशी मात्र सविताच्या खऱ्या स्वभावाची झलक त्याला आणि इतर तिघांनाही बघायला मिळाली. आणि त्यांना आपण कशाला आमंत्रण दिले आहे ह्याचा अंदाज आला. 

शैलजा आणि दिलीपने त्यांच्या आईला वाढदिवसानिमित्त सरप्राईज द्यायचे ठरवले होते आणि त्यामुळे त्यांची घरात इतर कुणालाही न सांगता गुपचूप तयारी सुरू होती. काही तरी कामानिमित्त सासूबाई सोबत बाजारात गेलेल्या सविताने दिलीप आणि शैलजाला बाजारात बघितले पण ती हाक मारणार तोपर्यंत ते दोघेही दिसेनासे झाले. तिने लगेच दिलीपला फोन लावला आणि विचारले. जसे तिने त्या दोघांना बघितले होते तसे शैलजानेही त्या दोघींना बघितले होते. सविताला आत्ता कळले तर आईलाही सरप्राईज कळेल म्हणून दिलीपने काही तरी कारण सांगून वेळ मारून नेली. पण दुसरीकडे सविताच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू झालं होतं. 

घरी आल्यावरही दिलीपच्या डोक्यातून बाजाराचा विषय निघून गेला असल्याने सविताला सांगण्याचा विसर पडला. 
दुसऱ्या दिवशी आईबाबांना बाहेर पाठवून दिलीप आणि शैलजा वाढदिवसाची तयारी करू लागले. शैलजाने वहिनीला सगळं सांगून तयारीसाठी मदत करायला बोलावले होते. 
सविताला आता सगळे समजले होते पण तिला वगळल्याचा राग तिच्या मनात घर करून बसला होता. दिलीपने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा त्याला तो दिवस साजरा करणे महत्त्वाचे वाटले. शेवटी त्याने सविताला विनंती केली आणि तो तयारी करू लागला. 

संध्याकाळी घरी आल्यावर मुलांनी केलेली तयारी बघून सुलेखताईना खूप आनंद झाला. मन मारून सविताही सगळ्या गोष्टींत सहभागी झाली होती. 

पण दिलीप आणि शैलजाच्या नात्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे बदलला होता. 

सगळेजण आनंदाने जेवणासाठी बसणार तोच सविता कडाडली," शैलजा, कसं वागायचं हेपण मी तुला शिकवायचं का? बाहेर तर एकत्र फिरताच तुम्ही पण आता घरातपण तू सतत माझ्या नवऱ्याच्या आसपास घुटमळत असतेस. मी किती दिवस झाले सगळं बघतेय पण इतर कुणालाच तुझं वागणं ,बोलणं खटकत नाही. त्यांना चालत असेल पण मला नाही चालणार हे असलं वागणं.", सविताचं बोलणं ऐकून दिलीपसहित सगळ्यांनाच धक्का बसला. 

शैलजाला तर काय बोलावं तेच सुचेना कळायला लागल्यापासून ज्या भावाचं बोट धरून चालायला सुरुवात केली त्या आपल्या दादाबद्दल आणि आपल्याबद्दल वहिनी असा विचार करते हे तिला पटतच नव्हतं. 

शेवटी प्रसंग बघून पांडुरंगराव मध्ये बोलले,"सुनबाई , शब्द सांभाळून बोलत जा. आपण कधी ,कुठे कुणावर कसले आरोप करत आहोत ह्याच भान ठेवा. आमच्या मुलांवर आम्ही उत्तम संस्कार केले आहेत त्यामुळे ते असलं काही वागू शकतात ह्यावर आमचा विश्वास नाही. तुमचा कदाचित गैरसमज झाला असेल असं आम्हाला वाटत त्यामुळे आता ह्या दोघांशी बोलून तुम्ही हे सगळं मिटवा. परत असल्या खालच्या थराला गाठून काही बोलू नका. आल्या दिवसापासून तुमचं तुसड वागणंही आम्हाला दिसत आहे पण आम्ही तुम्हाला सतत संधी दिली. त्यामुळे असल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा संसारात लक्ष घाला.सगळ्यानी जेवणं उरका आणि मगच ताटावरून उठा.", त्यांच्या ह्या शब्दापुढे बोलण्याची हिम्मत कुणातही नव्हती. सगळ्यानी खाली मान घालून दुखावल्या मनानेच जेवणं केली. जेवण होताच कशालाही हात न लावता सविता फणकाऱ्याने खोलीत निघून गेली. ती गेली तसा इतका वेळ आवरून धरलेला शैलजाचा बांध फुटला ती आईच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडू लागली. 

दिलीपने कसंबसं आई आणि बहिणीची माफी मागितली तो वडिलांच्या दिशेने वळला तर त्यांनी त्याला खड्या शब्दांत सविताला नीट समजावून सांगायला सांगितले. 

तो स्वतःला सावरत खोलीत आला आणि सविताशी एकही शब्द न बोलता भिंतीकडे तोंड करून झोपला. पुढचा पूर्ण आठवडा घरात कुणीही कुणाशी बोलत नव्हते पण सविताला त्यामुळे काही फरक पडत नव्हता. 

मग एके दिवशी तिच्या वडिलांचा सासरी फोन आला आणि त्यांनी सविताला कुठल्या तरी सणासाठी माहेरी पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार तिचा भाऊ येऊन तिला घेऊन गेला. बहिणीच्या सासरच्यांनी केलेलं थंड स्वागत बघून त्याला शंका आली पण वयाने लहान असल्याने त्याने काही विचारलं नाही. घरी आल्यावर मात्र त्याने ही माहिती आईच्या कानावर घातली. आईने मात्र सविताला खोदून खोदून विचारलं तेंव्हा तिने झालेली गोष्ट सांगितली. आईने कपाळावर हात मारून घेत सविताला चार गोष्टी सुनावल्या आणि सोबतच तिच्या संशयी स्वभावाला आवर घालण्याचा सल्लाही दिला. सवितानेही आईच्या हो ला हो करत मान डोलावली. 

काही दिवस माहेरी राहून सविता सासरी परत आली. ह्यावेळीही दिलीपने सुट्टी न मिळाल्याचे सांगत आणून सोडायला सांगितले. शेवटी भाऊच सोडायला तयार झाला. मस्त माहेरपण एन्जॉय करून सविता भावासोबत सासरी पोहोचली. 

दारातच घरातून हसण्याखिदळण्याचे आवाज कानावर पडले. दारात बऱ्याच चपलाही होत्या. आत गेल्यावर कळलं की सुलेखताईंच्या दोन भाच्या कुटुंबासह जाता जाता धावती भेट घेण्यासाठी अचानक आलेल्या होत्या. त्या आल्याचे कळल्यावर दिलीपही सुट्टी घेऊन घरी आला. दिलीपला कामावरून घरात आल्याचे बघताच सविताला पुन्हा एकदा राग आला. सगळ्या पाहुण्यांकडे दुर्लक्ष करून ती खोलीत निघून गेली. बिचाऱ्या भावाला काहीच न सुचल्याने तो तसाच एका कोपऱ्यात उभा राहिला होता. शेवटी शैलजाने त्याला बसायला सांगितले. दिलीपने पुन्हा एकदा सविताच्या हातापाया पडत तिला पाहुण्यांसमोर नीट वागण्याची विनंती केली. सविताचा अहंकार सुखावला पाहुणे आणि तिचा भाऊ पाहुणचार घेऊन निघून गेले. 

रात्री दिलीपच्या खोलीतून वाढलेले आवाज ऐकू आले तसं सुलेखताईंनी दार वाजवलं. सविताने रागातच दार उघडलं आणि ती बाहेर आली. ह्यावेळी तिने पुन्हा तेच सगळे आरोप दिलीप आणि शैलजावर केले. 


सुलेखताईंनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करताच तिने त्यांच्यावरही आवाज चढवला आणि शैलजा आणि तिच्या बाबांबद्दलही नको नको ते बरळू लागली. हे सगळं ऐकल्यावर आता मात्र देशमुखांपैकी कुणालाही काहीच सुधरेना. सुलेखाताई उभ्या जागीच डोकं धरून बसल्या. पांडुरंगराव सुन्नपणे सगळ्यांकडे बघत होते. तेवढ्यात दिलीपने मात्र पुढे होत जोरदारपणे सविताच्या कानाखाली मारली आणि मागून शैलजाचा आवाज त्याला ऐकू आला. ती अस्ताव्यस्तपणे फरशीवर कोसळली होती. तो तिच्या दिशेने धावला. 

शेजाऱ्यांना मदतीला घेऊन आईबाबांना सोबत घेत दिलीपने शैलजाला दवाखान्यात एडमीट केले. तिथे तिच्या काही तपासण्या करण्यात आल्या. जबरदस्त मानसिक ताण आणि धक्का बसल्याने शैलजा बेशुद्ध पडली होती. 

ती शुद्धीत आल्यावरच अजून काही प्रॉब्लेम आहे का ते कळू शकत होते. दुसऱ्या दिवशी शैलजा शुद्धीवर आली पण तिची मनस्थिती पूर्णपणे बिघडली होती. भाऊ आणि वडिलांना ती आपल्या जवळपासही फिरकू देत नव्हती. शेवटी सुलेखाताईनी शेजारच्या एका मुलीच्या मदतीने तिचं सगळं आवरलं. ती इतर कुणाशीही काही बोलायला तयार नव्हती. मुलीची अवस्था बघून आईवडिलांनाही धक्का बसला होता पण आत्ता तिला सावरणे गरजेचे होते. 

दिलीपने बहिणीची अवस्था बघितली आणि त्याला सविताचा प्रचंड राग आला. त्याने तिरिमिरीतच तिच्या वडिलांना फोन लावला आणि तिला घेऊन जायला सांगितलं. 

फोनवरचा दिलीपचा आवाज ऐकून पाटील कुटुंबीय हादरले होते ते दोघेही सविताच्या सासरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसले ते आपल्या मुलीच्या वागण्याने उध्वस्त झालेले एक सुखी कुटुंब. 

सविताच्या आईला सगळं खरं कळताच त्यांनी सगळ्यांच्या समोर तिच्या कानाखाली वाजवली. कारण आपल्या मुलीच्या स्वभावाचा त्यांना पूर्णपणे अंदाज होता. त्यांनी तिला तशी जाणीवही सतत करून दिली होती पण आज सविताने स्वतःच्या हाताने सगळं उध्वस्त केलं होतं. 

सविताला तिच्या आईवडिलांनी कायमचं माहेरी आणलं होतं. दिलीपच्या घरच्यांनी डिव्होर्ससाठी कोर्टात केस दाखल केली. केस बरेच वर्ष चालणार होती कारण कोर्टातही सविताने तेच घाणेरडे आरोप लावले होते. 

ह्या सगळ्या गोष्टींचा खोलवर आणि जास्त वाईट परिणाम मात्र शैलजाच्या आयुष्यावर झाला. तिला त्या सगळ्यातून सावरण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली. तिचा नात्यांवर आणि माणसांवर आता पुन्हा सहजपणे विश्वास बसत नव्हता. 

सांगायचं तात्पर्य हे की माणसाची मनोवृत्ती त्याच्या सोबतच इतरांचेही न भरून येणारं नुकसान करत असते. 

तुम्हाला काय वाटतं?

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

तळटीप - कथा कशी वाटतेय ह्यावर चर्चात्मक किंवा तुमच्या अनुभवाच्या प्रतिक्रिया नक्की द्या. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी