आमराईचा उत्सव

आमराईचा_उत्सव

आज सकाळपासून तिची खूप लगबग सुरू होती. ऑफिसमध्ये ही ती काहीशी गडबडीत असल्याचं तिच्या मित्रमंडळी ना जाणवलं शेवटी कुणीतरी तिला हटकलच कुठे लक्ष आहे म्हणून? मग दुपारी जेवताना बोलू असे म्हणत तिने समोरच काम संपवायला सुरुवात केली. 
सगळं मित्रमंडळ दुपारच्या वेळी ऐकण्यासाठी तयारीत बसलं होतं. ती आली मग सगळ्यांनी जेवणं उरकली. आता मात्र तिच्या जिवलग मैत्रिणी ला राहवेना. " मिथिले , अग सांग ना आतातरी " , अस म्हणत नेत्राने कोंडी फोडली. 
हलकेसे हसत मिथिला म्हटली, "अग हो तेच बोलणार आहे. गेले दोन दिवस मी कसल्या गडबडीत आहे, ह्याबद्दल तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे.  तर माझे आजोबा म्हणजे माझ्या बाबांचे बाबा गावाकडे खूप मोठे शेतकरी होते. अडीनडीला लोकांच्या हमखास उपयोगी पडत. पण त्यांना एक दुःख होतं. पाच पिढया घरात मुलगी जन्माला आली नव्हती. कारण पाच पिढ्यांआधी जन्माला आलेली मुलगी  शेतातल्या आंब्याच्या बागेतल्या विहिरीत सापडली होती. आणि त्यानंतर भरभरून आंबे देणारी ती आमराई आणि पाण्याने तुडुंब भरलेली ती विहीर कायमच्या आटल्या." हे ऐकल्यावर सुरक्षित वातावरणात वाढलेल्या सगळ्यांच्याच अंगावर भीतीने रोमांच उभे राहिले.  मिथिला क्षणभर थांबली मग पुढे बोलू लागली,"मग नंतरच्या पिढ्यानपिढ्या मुलींसाठी प्रयत्न करत राहिल्या पण मुलगी झाली नाही. माझ्या आजोबांनी मात्र उपासतापास, गुरू वगैरे करून उपाय शोधला. तो म्हणजे त्यांनी माझ्या आजीकडून ती आमराई आणि विहीर दोघींची खणनारळाने ओटी भरून घेतली. आणि वचन दिले की जर घरात सुदृढ मुलगी जन्माला आली तर तिच्याच हाताने पहिलं रोप ह्या जमिनीवर लावीन."  "मग? " नेत्राने उत्सुकतेने विचारलं. 
"मग? माझ्या आजीला जुळ्या मुली झाल्या त्या म्हणजे माझ्या दोन्ही आत्या त्या वर्षाच्या झाल्यावर त्यांच्या हाताने आजोबांनी पहिली रोपटी तिथे लावली आणि विहीरीची पूजाही केली.  त्या वर्षी पाऊसही भरपूर झाला ती विहीर तुडुंब भरली आणि रोपं रुजली . आता कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणो किंवा आणि काही पण गावात हे घडल्यानंतर मुलीचा जन्म झाला की लोकं असच स्वतःच्या शेतातही करू लागले. आणि आता तर ती एक प्रथा च बनली आहे. फक्त एक गोष्ट दरवर्षी बदलली. ती म्हणजे दरवेळेस फक्त आमराइतच नाही तर शेतातच पेरणी करताना पहिलं प्राधान्य त्या वर्षी जन्माला आलेल्या मुलीला दिल जातं. मगच पुढची कामं केली जातात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझ्यापरीने भर घालण्याचा प्रयत्न करतेय. ही कल्पना त्या भागात मुलींची होणारी हत्या थांबवण्यासाठी उपयोगी ठरली अन् फायदाही झाला. तर ह्या वर्षी मान मिळणार आहे माझ्या वहिनीला कारण आमची पिटुकली सरस्वती. त्या जोडीनेच आम्ही तिथे शाळेला काही वस्तूही देतो आहोत म्हणून मी जरा कामात व्यस्त झाले होते. ह्या निमित्ताने मी तुम्हां सगळ्यांना तिथे येण्यासाठी आमंत्रित करतेय आणि हो ड्रेस कोड आहे हं. मुलींसाठी नऊवारी आणि मुलांसाठी धोतर कुर्ता. तेंव्हा त्या तयारीने या." मिथिला इतकं बोलून थांबली तसं नेत्राने तिला मिठीच मारली. बाकी सगळेही ह्या कामासाठी तिचं अभिनंदन करू लागले. मुलीच्या जन्माचा असा उत्सव करण्याची कल्पना सगळ्यांनाच आवडली. 
#गौरीहर्षल #१६.१.२०१९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी