ओळखीचा अनोळखी मित्र

Life is all about adjustment. 
प्रत्येक जण कुठेना कुठे, कशासाठी तरी, कुणासाठी तरी एडजस्ट करतच असतो. आणि एडजस्टमेंट करावी लागणार आहे हे कुठेतरी मनात फिक्स असतं. 
    पण कधीतरी काय होतं मन कंटाळलेले असते. बऱ्याच गोष्टी एकदम घडलेल्या असतात म्हणजे घरात , बाहेर, ऑफिसमध्ये काही घटना अचानकच घडतात. अशावेळी चिडचिड सुरू होते प्रत्येकाचीच मग त्यातून वाद होतात. कुणीतरी माघार घेतं अन विषय थांबवला जातो पण तो खरंच थांबतो का हो??
तर नाही मनाचा एक कोपरा त्यावर विचार करत असतो, कदाचित दुखावलेला असतो. काही जण अशा परिस्थितीत शांत बसतात म्हणजे बाहेरून तरी असच दृश्य असतं, काही जण स्वतःशीच बडबड करून चिडचिड करून मोकळे होतात. काही जण सोशल मीडियावर दर्दभरे स्टेटस टाकून मोकळे होतात तर काही जण उगाच पॉझिटिव्ह जगण्याची धडपड सुरू करतात. 
   क्षणिक दिसणारा हा त्रास मनाला मात्र खूप त्रास देत असतो. पण आपल्या कडे पद्धत असते न मनातलं कुणाजवळ बोलायच नाही मग काय करणार ?? मन बसतं आतल्याआत रडत कुढत. त्यातूनही कुणीतरी एखाद्या मित्रमैत्रिण , इतर जवळच्या व्यक्ती यापैकी कुणाजवळ तरी व्यक्त होतात. पण आपण विसरतो ही देखील माणसच असतात कधीतरी ते आपल्याला पटतील असे सल्ले देतात तर कधीतरी कुणाकडून नकळतच आपला त्रागा नको त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. मग वाटू लागतं की कुणाशी बोलायच की नाही?
मला न अशा वेळी बसमध्ये भेटलेल्या काकू आठवतात. अंदाजे 6 वर्षांपूर्वी ची गोष्ट.  मी पुण्याहून अहमदनगर ला परत येत होते. एक साध्याशा दिसणाऱ्या काकू माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्या काकू असतील 40-50वयोगटातील. सुरुवातीला मीही माझ्या नादात होते पण मग त्यांची जरा चुळबुळ सुरू झाली इकडेच बघ , तिकडेच बघ. मी ते बघून कानातले हेडफोन काढून ठेवले आणि शांत बसले. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या , ताई तुला काही सांगितलं तर ऐकशील का? मला वाटलं माझं फोनवर कुणाला तरी झापण ऐकून आता ह्या मला सल्ला देतात की काय? पण म्हटलं बघू तरी काय म्हणतात, म्हटलं बोला न काकू. तर त्या म्हणे मी अमूक ठिकाणी चाललेय तर मला नगरमधून बस मिळेल का? मी म्हटलं त्यांना मिळेल न तुम्ही शेवटच्या स्टोपला उतरा तिथे मिळेल. मग आणखी काही मिनिटे शांततेत गेली आणि काकू म्हणाल्या, माझी भावजय एडमीट आहे दवाखान्यात तिला बघायला चाललेय. उगाच विचारायचं म्हणून मी विचारलं , बर नाही का त्यांना? 
नाही तशी बरीच आहे पण साप चावला तिला शेतात कामाला गेली होती तेंव्हा पण लवकर कळलंच नाही मग आता सिरीयस आहे. तसा माझा न भावाचा काय संबंध उरला नाही बघ आठ वर्षांनी जातेय मी भावाकडे. ते पण अस झाल्याच कळलं म्हणून. मग काकूंनी एकेक करत बरेच किस्से त्रास सांगितला. सांगताना त्यांचे डोळे सतत भरून येत होते. भावजयीने आईवडिलांना त्रास दिला मग आपल्याला का येऊ नको सांगितलं हे आणि बरच काही. मनातला राग , द्वेष सगळा काही त्यांनी त्यावेळी बोलण्यातून आणि अश्रूंवाटे बाहेर काढला. मीही त्यांना मनसोक्त रडू दिलं थोडया वेळाने बस एके ठिकाणी थांबली तशा त्या उतरून फ्रेश होऊन आल्या. माझ्याकडे बघून मोकळ्या हसल्या. आधीपेक्षा आताच त्यांचं हसणं खूप मनमोकळं होत. मग माझ्या हातावर थोपटत म्हणाल्या, तू कोण , कुठली मला काय बी माहिती नाही. अन् माहिती करून काय उपयोग बी नाही कारण आपण काय परत भेटणार नाही. पण तुझ्याशी बोलून मला लई बर वाटल. किती वर्षं झाली बाकीच्याना त्रास होऊ नये म्हणून मी माझं मन मोकळं केलंच नव्हतं ते सगळं आज बोलले. का बोलले माहिती नाही कदाचित तू मला माझ्या घरच्यांना वळखत नाहीस म्हणून मला सगळं बोलणं जमलं. कारण तू ह्यातलं काय पण त्या कुणाला सांगणार नाही ही खात्री होती मला,म्हणून नवऱ्याला पण जे बोलून दाखवल नाही ते तुला सांगितलं. एवढं बोलून त्या शांत झाल्या. 
कधी कधी मनात अशा काही घटना घर करून गेलेल्या असतात ज्या आपल्या मनाला सतत टोचणी लावत राहतात पण आपण चुकनही त्या कुणाजवळ व्यक्त करू शकत नाही अशा वेळी हा काकूंचा उपाय फारच उपयुक्त ठरु शकतो. 

प्रवास सुरूच होता पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं असं का घडलं?? पुढे त्याच उत्तरही माझं मलाच सापडलं काय  माहीत आहे? आपण अनोळखी व्यक्तीशी मनातला राग , दुःख ,त्रास मोकळेपणाने बोलू शकतो कारण त्या व्यक्तीमुळे आपल्या नात्याला काही हानी होणार नाही ही खात्री आपल्याला असते. पण प्रत्येक वेळी ही अनोळखी व्यक्ती खात्रीशीर असू शकते का हो?? तर नाही मग ह्यावर काहीतरी सोल्युशन असायला हवं असं मलाही वाटत तुम्हाला काय वाटतं?? योग्य ती सावधानता , गुप्तता बाळगत व्यक्त होण्याचा एखादा पर्याय उपलब्ध झाला तर तुम्ही कराल का त्याचा वापर की नाही ?? कारण कित्येकदा आपल्याला सल्ला नको असतो हवी असते ती फक्त साथ. शांतपणे ऐकून घेणारी, मन मोकळं करू देणारी आणि जोडीला सगळं नीट होईल अशी उभारी मनाला देणारी. अशी साथ मिळाली तर??  त्यासंदर्भात तुम्हा सगळ्यांचा फीडबॅक अत्यंत आवश्यक ठरेल. नक्की सांगा. दोन्ही बाजूंनी विचार करून फायदे तोटे तुम्हाला जे वाटतात ते. 
#गौरीहर्षल 

टिप्पण्या

Swapnali C Jadhav म्हणाले…
Khar aahe yogya veli mann mokal zale pahije
Ashwini D.G म्हणाले…
असा साथी सगळ्यांना हवा असतो...आणि मला तो भेटलाय सुद्धा
Smita Mane म्हणाले…
खरयं आपण आपल्या जवळच्या माणसांसमोर नाही मोकळे होत. लेख छानच

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी