मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

ट्विस्ट अँड टर्न

#ट्विस्ट_अँड_टर्न 
सिरियल्सना कितीही नाव ठेवली तरी आपण सगळे सिरियल्स, डेली सोप बघतो. त्यात रमतो, कुणी चेष्टा करण्यासाठी बघतात तर काही जण आपापल्या दुःखाना विसरण्यासाठी बघतात. पण इथे तो विषयच नाहीये. 

इथे सिरियलच्या गोष्टीतली गोष्ट आहे. म्हणजे बघा ना सगळ्या सिरियलमध्ये त्या हिरो हिरोईनला इतर पात्रांना दोन ते तीन वेळा चान्स मिळतो नव्याने आयुष्य सुरू करण्याचा. आणि तेही मेक ओव्हर सहित.

बऱ्याच जणांना हे बघायलाच जास्त आवडतं.
कारण खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही न. 

पण सध्या घडतंय की , आपल्या सगळ्यांचं आयुष्य स्थिर झालं आहे एका ठिकाणी येऊन कुणीही पुढे जात नाहीये कुणीही मागे रहात नाहीये. 

सगळे फक्त जगण्याची उमेद धरून ठेवण्याची धडपड करत आहेत. 
प्रत्येक जण आपापल्या परीने कसल्या न कसल्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करतोय.
ह्यात कधी कधी चिडचिड होतेय भांडणं, वादही होताहेत.

पण ते सगळं बाहेरच्या नकारात्मक परिस्थितीशी जुळवून घेताना होणारच. 
 
असो तर आपण बोलत होतो सिरियलसारख्या खऱ्या आयुष्यात आलेल्या ट्विस्ट आणि टर्न बद्दल. 

हा ट्विस्ट सध्या भरपूर बदल घडवतोय. 
काही गोष्टी काही माणसं नव्याने भेटत आहेत , कळत आहेत. 
स्वतःबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत.
आपल्या माणसांना पारखण्याची , ओळखण्याची एक संधीच आपल्याला मिळाली आहे.

आणि आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे मागे रेलून बसत शांतपणे फक्त निरीक्षण करायचं आहे. 

सिरीयलसारखे एकामागे एक सीन समोर येत जाणार आपण मात्र त्यातून निरीक्षण करत हवं ते घ्यायचं आहे.

आता कुणाला काय हवं हे तर जो तो ठरवणार त्यामुळे ते काही मी सांगत नाही.

पण एक सल्ला मात्र देते सिरियलमध्ये कस चांगलं घडावं म्हणून आपण वाट बघतो तसच इथेही व्हावं ही एक इच्छा आपल्याला मनात सतत जागी ठेवावी लागेल. 

आणि मग कदाचित आपल्या आयुष्याच्या डेली सोपची स्टोरी आपल्या मनाप्रमाणे लिहिली जाईल.

अन् ह्या ट्विस्ट नंतर जो टर्न येईल न तो अनपेक्षित असे चांगले अनुभव घेऊन येईल.

बघूया कितपत जमतंय ते.
तोपर्यंत मनाला गुंतवा स्वतःच्या कथेत. 
बेस्ट लक शुभं भवतु!!!
©®गौरीहर्षल

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

जिंदगी धूप तुम घना साया

#जिंदगी_धूप_तुम_घना_साया

तसे ते दोघेही कानसेन सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायचं मग त्यातल्या आवडलेल्या आणि न आवडलेल्याही गाण्यांवर चर्चा करायची. हा दोघांचा आवडता छंद सोबतीला चहा असायचाच कधी वाफाळणारा तर कधी iced टी सुद्धा पण ते मुडवर अवलंबून असे. 

आताशा दोघेही व्यापातून निवांत झाले होते. पिल्लं अजून घरट्यातून उडाली नव्हती,पण आता त्यांची विश्व निर्माण झाली होती. त्यामुळेच ह्या दोघांना स्वतःला आणि एकमेकांना देण्यासाठी हवा तसा अन् तेवढा वेळ काढता येत होता. ते ही धडपड करतच होते कारण इतक्या वर्षांच्या काळात त्यांना एकमेकांना दिलेलं पहिलं वचन निभवायचं होतं. कोणत? मनापासून जगण्याचा आनंद घेण्याचं. 

लग्नाआधी जेव्हा ते एकदाच एकमेकांना भेटले होते तेंव्हाही दोघांची चर्चा गाण्यावरच झाली होती. ते भेटले त्या हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला जगजितच्या गझल सुरू होत्या. हॉटेल मालकच फॅन होता वाटतं कारण एकसे एक गझल , गाणी कानावर पडत होती. 

त्यातच तुमको देखा तो ये खयाल आया सुरू झालं आणि एकाचवेळी दोघांनी एकमेकांकडे बघितलं. मनाची मनाला खूण पटली आणि अवघडलेपण गळून पडले. 
"मला हे गाणं प्रचंड आवडतं" दोघेही एकत्रच बोलले आणि हसलेही. 
"आपल्या आत्ताच्या प्रसंगात अगदी फिट झालं ना हे ?"
त्याचा आवाज हळवा झाला होता.
तिचेही डोळे नकळतच भरून आले. 
आपापल्या घरी दोघेही मोठे होते. दोघांचंही नशीब इतकं सारख होत की थोड्याफार फरकाने घरादाराची जबाबदारी दोघांच्याही खांद्यावर फार लवकर आली होती. मग त्यातून वाट काढताना त्यांना स्वतःसाठी वेळच उरला नव्हता. सगळ्यांचं सगळं मार्गी लावल्यावर मग त्यांचा विचार करावा अस कुणालातरी सुचलं होत तेही म्हातारपणी त्यांच्या जबाबदाऱ्या नको म्हणून. 
कुणी प्रत्यक्ष बोललं नसलं तरी त्या दोघांनाही ते जाणवलं होतं. त्या काळच्या मानाने उशीर झाला असला तरी दोघेही संसार थाटायला तयार झाले. 
आवडीनिवडी कधीच बाजूला पडून गेल्या होत्या पण एकमेकांशी मैत्री मात्र निभवायची अस ठरवत ते एकत्र आले. 
पहिल्या रात्री तो तिला बघून त्याच गझलच्या दोन ओळी गुणगुणला होता, 
तुमको देखा तो ये खयाल आया,
जिंदगी धूप तुम घना साया.....

त्याला जेव्हा जेव्हा भरून येत असे तो ह्या दोनच ओळी गुणगुणत असे हे तिला आता सरावाने कळलं होतं. तिचीही अवस्था काही वेगळी नसायची.
तशातच तिचं कॅलेंडरकडे लक्ष गेलं आजच्याच दिवशी ते भेटले होते. Iced टी घेऊन ती तो बसला होता तिथे येऊन बसली. त्याच्या हातावर हात ठेवून त्याला डोळ्यांनी आश्वस्त करत तिने म्युझिक प्लेयर सुरू केला. 
आपापल्या आवडीच्या जागी बसत दोघेही सुरात कधी गुंतले त्यांनाही कळलं नाही. 

आयुष्याच्या वेगळ्या वळणावर एकत्र आलेल्या त्या दोन जिवांसाठी सावलीची उणीव त्या शब्दांनीच तर भरून काढली होती. नकळतच ते एकमेकांसाठी घना साया कधी झाले ते त्यांनाही कळलं नव्हतं.
©गौरीहर्षल

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

ख्वाहिशे

कभी दबे पाँव जो मिलने आती है ,
कोई देख न ले जाते हुए इसलिए 
चुपकेसे चली जाती है ख्वाहिशें।
समझदारी ने कंधोपे जो बोझ रख दिया है 
वो देखके जाते जाते 
हल्केसे मुस्कुराती है ख्वाहिशें।
हमारी मुलाकात में 
मुझे मिल जाता है सुकून
न जाने कैसा,
हलका हलका लगने लगता है
उतरा हो कोई कर्ज जैसा।
५.३.२०२०
#गौरीहर्षल

समांतर

दोन समांतर रेषा आहोत आपण
एकाच दिशेने जाणाऱ्या
पण तरीही वाटा वेगळ्याच आहेत आपल्या
स्वतःच्या धुंदीत वळणाऱ्या
तू शोधत आहेस तुझ्या मनातलं सुख चौफेर
माझ्या मनात मात्र सतत आठवणींचा फेर
तुझ्या वाटेवर आहेत असंख्य व्यक्ती 
वेळोवेळी नातं टिकवण्यासाठी धावणाऱ्या
माझ्या वाटेवर आहेत सावल्या
मुखवट्या मागे लपणाऱ्या
तुला झाली आहे सवय 
खोट्यालाही  खर मानून जगण्याची
मला अजूनही आहे जुनीच खोड 
खऱ्यालाही पारखून घेण्याची
चुकून कधी आपल्या नजरा एकमेकांना भिडल्या
तर हसतो आपण सवयीने
पण तुला आणि मला ही माहिती आहे
कायमस्वरूपी वेगळे ठेवले आहे आपल्याला  नियतीने
समांतर असण्याचे आपले असे फायदे आहेत
तुझ्या माझ्या जगाचे आपापले कायदे आहेत

26.2.2020

गीतसप्तक भाग ५

#गीतसप्तक
मन धागा धागा
मला आवडलेलं हे अजून एक गाणं. ह्याचं  प्रत्येक कडवं मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय. 
१.
       असे कसे बोलायचे न बोलता आता
       तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
       डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
       सांगा जरा असे कसे लपायचे रे आता
         मन धागा धागा जोडते नवा
          मन धागा धागा रेशमी दुवा
  तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं.....
२. 
             एकटी मी दिनरात तरीही तू भोवती
               हातात नाही हात तरीही तू सोबती
                     मन बेभान बेभान होई
                     मग प्रीतीला उधाण येई
                    मन धागा धागा ......
एका सोल्जरची बायको. दूर असूनही घरातल्या प्रत्येक वस्तूशी आणि तिच्याशी त्याच्या अबोल आस्तित्वाचं नातं आणि त्यासोबत तिची चालू असलेली रोजच्या जगण्यातली धावपळ. पदोपदी त्याची आठवण तिला अस्वस्थ करतेच पण त्याचबरोबर तिला बळही मिळतं सगळं निभावून नेण्यासाठी. 

३.
                रोज बहाणे नवे शोधून मी थकते
                 तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
                    क्षण आतूर आतूर झाले
                       रोज काहूर काहूर नवे
                  मन धागा धागा......
हे तिसरं आणि शेवटचं कडवं. ह्या ओळी मला ना अशी एक वेगळीच आठवण करून देतात. म्हणजे नवीन असं काहीतरी नुकतंच घडू लागलंय आयुष्यात मग ते त्याच्या असो किंवा तिच्या. आणि ते जे काही आहे ते प्रेम वगैरेंपेक्षा वेगळं आहे कदाचित ती एक नवी सुरुवात आहे एखादया नव्या कामाची, छंदाची किंवा सगळं मळभ दूर झाल्यानंतर उगवणाऱ्या नव्या दिवसाची. ज्याची नकळत आपण सगळेच वाट बघत असतो रोज. मनासारखं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असतं कदाचित तेच घडण्याची सुरुवात.......
      कदाचित माझ्यासाठीही नवा अर्थ लपलेला असेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग ४

#गीतसप्तक
कितीक् हळवे, कितीक् सुंदर, 
किती शहाणे आपूले अंतर
हे गाणं ऐकताना मला नेहमी असं वाटत राहतं की असं समंजस मैत्रीचं नातं कुणासोबत तरी जुळवून यावं. एकमेकांना समजून घेत असतानाच एकमेकांना हवी तितकी स्पेस देणंही तितकंच गरजेचं असतं. अर्थात ही प्रक्रिया दोन्हीकडून व्हायला हवी तरच अपेक्षित असा प्रतिसाद मिळतो.
आणि हे खरं तर फक्त मैत्रीतच होण्याऐवजी प्रत्येक नात्यात व्हावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने याचा वेगळा अर्थही सुचेल कदाचित. 
पण कधी कधी स्वतःच्या असण्याचा हट्ट न धरताही बरेच जण आपल्या मनात घर करून जातात. अशा लोकांना रोज भेटण्याची,बोलण्याची गरज नसते. पण गरज पडलीच तर पहिल्या हाकेला ह्या व्यक्ती धावत येतील ही खात्री असते. अशी माणसं, अशी नाती मनापासून जपण्याची हल्ली खूप गरज पडतेय. कारण योग्य वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर ह्या व्यक्ती अलिप्त होतात त्यांच्याही नकळत. अर्थात नातं तोडणं त्यांना कधीच मान्य नसतं खरतर त्यांना जमणारच नसतं. पण मग असून अडचण नसून खोळंबा होण्यापेक्षा थोड्याश्या अंतरावरूनच ते सर्व काही बघत राहतात. व्यक्तिपरत्वे जसे स्वभाव वेगळे तसे अनुभवही. 
अगदी असाच मित्र दुसऱ्या कुणी आपल्यासाठी होण्यापेक्षा आपणच कुणासाठी होऊन बघावं. आपल्यासाठी कुणीतरी आहे ही भावनाही हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अजून धावण्यासाठी बळ देते. करून तर बघायला हवं त्यासाठी आधी  स्वतःशीच मैत्री करावी लागेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग ३

#गीतसप्तक
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
'चॉकलेटचा बंगला' कल्पनाच किती मस्त आहे ना? चॉकलेट आवडत नाही अशी फार कमी माणसं आजूबाजूला सापडतील. लहान मुलांना आपल्या पार्टीत घ्यायचं म्हटलं की मोठया ताईदादांच्या कडून हमखास दाखवलं जाणारं आमिष. 
प्रमाणाबाहेर खाल्लं तर त्याचे तोटेही आहेतच. पण आज नको त्यावर बोलायला. पूर्वी काही ठराविक चॉकलेट मिळायची आता मात्र इतके सगळे प्रकार, इतक्या सगळ्या चवी असतात की खाणारा गोंधळून जातो. 
लहान मुलांच्या मनोराज्यात हळूच शिरून लहान होऊन गेल्याचं फिलींग हे गाणं देतं. ह्या गाण्याच्या संकल्पनेशी मिळताजुळता एक धडाही होता मला. त्यात कलिंगडाचं घर होतं. भर उन्हाळ्यात अशा मस्त कलिंगडाच्या घरात आपण राहतोय ही आयडियाच भारी वाटायची खरंतर अजूनही वाटते.  किती छान असतं ना ते विश्व कसल्याच चिंता काळज्या नसतात. कुणाशी शत्रुत्व नसतं,कसलेही हेवेदावे नसतात. फक्त आणि फक्त निखळ आनंद असतो आयुष्यात. मैत्री,नाती सगळी अगदी मनापासून निभावली जातात. म्हणून तर अगदी प्रत्येकाला मोठं झालं की बालपण खुणावत असतं. जितकं निरागस मुलांचं विश्व असतं तितकंच किंबहुना त्याच्या जवळपास सुद्धा न जाणारं जग मोठेपणी त्यांना भेटतं. आणि मग हळूहळू ते छोटं मूल आत मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात स्वतःला आक्रसून घेतं. फार काही नाही करायचं पण मुलातलं मूल जपताना स्वतः मधल्या मुलालाही जपायला हवं. सगळ्या जगाला एका स्वच्छ नजरेने बघता यायला हवं. दुसऱ्या कुणासाठी नाही पण स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी तरी आनंद निर्माण करता यावा. हळूहळू का होईना बाकी परिस्थितीही बदलेल. आधी आपण तर सुरू करू चॉकलेटचा बंगला बांधायला आयुष्य तर तसंही गोडच आहे अजून गोड होईल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल