गैरसमज

#गैरसमज
गैरसमज आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. बऱ्याचदा ते आपण स्वतः नकळतच करून घेतलेले असतात. एखादी व्यक्ती तिचं वागणं, बोलणं जाणून घेण्यासाठी वेळ जाऊ द्यायचा असतो. पण आपण इतक्या घाईत असतो की आपल्याला पटकन माणूस कळावा असं वाटतं. आणि मग अर्धवट माहिती, अपुऱ्या संपर्काच्या आधारावरच आपण आपली समजूत पक्की करतो. बरं हे सगळं घडतंय आणि ते कुठेतरी चुकतंय असं आपल्याला जाणवतही असतं. पण आपलं मन इतकं पुढे निघून गेलेलं असत की त्याला पुन्हा मागे ओढून आणून नातं जुळवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. जवळची नाती अशाच गैरसमजांमुळे तुटतात अनेकदा. कधी कधी दोन्हीकडून गैरसमज होतात कधी कधी एका बाजूने. कधी कधी ते दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात तर कधी कुणी ते अजून वाढावे म्हणून प्रयत्न करत राहतात. नातं, माणसं दुरावण्याचं दुःख दोन्ही बाजूंना असतं पण हल्ली तर कुणाकडे वेळच नसतो. किंवा डोळ्यांवर अशी काही झापड असते की ती भविष्यात येणाऱ्या अनुभवांनीच दूर होते. मग प्रयत्न करायचेच नाहीत का? प्रयत्न तर करायचे पूर्ण शक्तीनिशी करायचे पण समोरची व्यक्ती ,तिचा प्रतिसाद याकडेही लक्ष ठेवायचे. जर तिचा प्रतिसाद सकारात्मक असेल तर आपले प्रयत्न योग्य दिशेने होत आहेत हे कळतं. आणि जर नकारात्मक असेल तर कुठे थांबायचं हेही लक्षात येतं. थोडंसं सजग आणि उघड्या डोळ्यांनी नात्याला आणि आजूबाजूच्या व्यक्तींना परखायचं सोबतच स्वतःलाही तराजूत तोलायचं. लगेच नाही जमणार पण हळूहळू निदान गैरसमज टाळण्याचं भान तरी येईल. कोण आपलं कोण परकं हे दाखवण्यासाठी वेळ तत्पर असतेच पण आपण आपलं काम चोख केलं तर आपलंच शारीरिक, मानसिक आणि आर्थिकही नुकसान टाळता येतं.
            सो, आजचा मंत्र हाच की गैरसमजाला खतपाणी घालण्याआधी परिस्थिती, व्यक्ती आणि स्वतःची वागणूक या सगळ्यांचे अवलोकन करीन.  श्रावणातील नवीन व्रत म्हणूया हवं तर 😊😊 मी तर प्रयत्न करणार आहे तुमचं काय??
आज प्रत्येकाला एक तरी क्षण भान ठेवून रुसलेली मनं वळवण्यासाठी संधी देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल
२४.७.२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी