हरलेली पिढी

#हरलेली_पिढी
#वयोगट_१५_ते_४०
हो हरलेय ही पिढी नाती सांभाळताना, आयुष्य जगताना, यशस्वी होताना. मीसुद्धा ह्यांच्यातलीच एक पण वेळोवेळी आपल्या बरोबरीच्याना कोसळताना बघतेय. काय हवंय नेमकं आम्हाला आयुष्यात?? आम्हाला नुसतं शिक्षण नको तर पहिल्या नंबरच्या हव्यासापोटी धावाधाव करायची आहे. नंतरही नुसती नोकरी किंवा बिझनेस नको तिथेही टॉप पोझिशन हवीच आहे. पुढे जोडीदार भेटतो तर त्या नात्यातही आम्हाला खूप काही हवंच आहे. आयुष्याचं कुठलंही क्षेत्र घ्या आम्हाला फक्त जिंकायचं आहे. खरं पाहता ही रॅट रेस कुणी दुसऱ्याने आमच्यावर नाही लादली आम्ही स्वतःच हिच्यात सहभागी आहोत. एखादी वस्तू दुसऱ्याकडे बघितली की जीव तोडून ती मिळवण्यासाठी आम्ही पळतो. आम्हाला सगळं काही हवं आहे पैसा, पॉवर , पोझिशन, स्टेटस आणि ते मिळवण्यासाठी आम्ही जगणं विसरतोय.
आमच्या आधीच्या पिढीनेही हे सगळं मिळवलं आहे नाही असं नाही पण त्याच्याकडे हे मिळवताना एक गोष्ट होती अन् ती म्हणजे "पेशन्स". जे आमच्या पिढीकडे अजिबात नाहीत काही अपवाद असतीलही पण बहुतांश जणांना ती इन्स्टंट ची सवय लागली आहे. मग एखादी गोष्ट नाही मिळाली किंवा ती मिळवताना अपयश आलं तर ते आम्हाला पचवता येत नाही. वास्तविक पाहता जवळचं कुणीतरी प्रत्येक वळणावर उभं असतं मदतीचा, मैत्रीचा हात पुढे करून पण आम्हाला ते स्वीकारण्यात कमीपणा वाटतो. यंग जनरेशन कडे बघत तिचं कौतुक करत मागची पिढी खूप काही आत्मसात करतेय पण ही यंग जनरेशन मात्र स्वतःच स्वतःभोवती उभ्या केलेल्या अपेक्षांच्या काटेरी कुंपणात अडकली आहे.
काय होईल एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली तर??? काय होईल एखाद्या कामात अपयश आलं तर?? काय होईल जर हातात घेतलेलं काम संपवण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर??? फार फार तर पैसा, वेळ आणि क्षणभंगुर असणार ते स्टेटस जाईल पण अशा परिस्थितीतही कुणीतरी आपल्या सोबत उभचं असतं. कुणीतरी नक्की असतं ज्यांची सगळी आस फक्त आपल्या असण्यावर अवलंबून असते मग ते आईवडील असो, जोडीदार असो किंवा इतर कुणी.
मान्य आहे जगात जगण्यासाठी पैसे, पत गरजेची असते पण ती फक्त गरज असते आवश्यकता नाही. त्यांच्या शिवायही समाधानी आणि सुखी होता येतं. कधी कळणार हे आमच्या पिढीला???
का हरतोय आम्ही ??? आमच्या आधीच्या पिढीने शून्यातून संसार उभे केल्याची उदाहरणं समोर असूनही आम्हाला मात्र समोर वाढून ठेवलेल्या भरगच्च ताटाचा आस्वादही घेता येऊ नये??? ताण येतातच पण त्यांना तोंड देण्यासाठी लागणारी आमचीच प्रतिकारशक्ती कुठेतरी कमी पडतेय.
आयुष्य परीक्षा बघणारच आहे पण त्या परीक्षेत पास नापास असं काही नसतं हे कळायला हवं. परीक्षेत येणारे अनुभव घेत जगायला शिकता आलं तर तुम्ही त्या परीक्षेत पास झालात.
आज इतर कुणी मदतीचा हात पुढे करण्याआधी ह्या पिढीने स्वतः स्वतःला मदत करण्याची गरज आहे. नाती, नोकरी, बिजनेस कुठल्याही परिस्थितीत आलेलं अपयश स्वीकारत त्यातून धडा घेत बदल घडवून आणले पाहिजेत तर आणि तरच आयुष्याला जिंकता येईल.
अजून एक छोटंसं काम माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना करता येईल ते म्हणजे स्वतःसोबत दुसऱ्यालाही motivate करण्याचं. आपल्या संपर्कातलं कुणी कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत असेल तर त्याला फक्त तू करू शकतोस हा धीर द्या. आपले दोन समजून घेणारे शब्द आणि आश्वासक स्पर्श मनातल्या नको त्या विचारांना दूर करतील. जवळच्या लोकांना तुम्ही हवे आहात ही जाणीव करून घ्या. आणि हे सगळं करताना स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. तुम्हीही महत्वाचे आहातच की. सुरुवात तर करूया स्वतःपासून, जिवलगांपासून हळूहळू . मीही करतेय तुम्हीही करा.
शुभं भवतु
#गौरीहर्षल
३०.७.२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी