जिंदगी धूप तुम घना साया

#जिंदगी_धूप_तुम_घना_साया

तसे ते दोघेही कानसेन सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायचं मग त्यातल्या आवडलेल्या आणि न आवडलेल्याही गाण्यांवर चर्चा करायची. हा दोघांचा आवडता छंद सोबतीला चहा असायचाच कधी वाफाळणारा तर कधी iced टी सुद्धा पण ते मुडवर अवलंबून असे. 

आताशा दोघेही व्यापातून निवांत झाले होते. पिल्लं अजून घरट्यातून उडाली नव्हती,पण आता त्यांची विश्व निर्माण झाली होती. त्यामुळेच ह्या दोघांना स्वतःला आणि एकमेकांना देण्यासाठी हवा तसा अन् तेवढा वेळ काढता येत होता. ते ही धडपड करतच होते कारण इतक्या वर्षांच्या काळात त्यांना एकमेकांना दिलेलं पहिलं वचन निभवायचं होतं. कोणत? मनापासून जगण्याचा आनंद घेण्याचं. 

लग्नाआधी जेव्हा ते एकदाच एकमेकांना भेटले होते तेंव्हाही दोघांची चर्चा गाण्यावरच झाली होती. ते भेटले त्या हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला जगजितच्या गझल सुरू होत्या. हॉटेल मालकच फॅन होता वाटतं कारण एकसे एक गझल , गाणी कानावर पडत होती. 

त्यातच तुमको देखा तो ये खयाल आया सुरू झालं आणि एकाचवेळी दोघांनी एकमेकांकडे बघितलं. मनाची मनाला खूण पटली आणि अवघडलेपण गळून पडले. 
"मला हे गाणं प्रचंड आवडतं" दोघेही एकत्रच बोलले आणि हसलेही. 
"आपल्या आत्ताच्या प्रसंगात अगदी फिट झालं ना हे ?"
त्याचा आवाज हळवा झाला होता.
तिचेही डोळे नकळतच भरून आले. 
आपापल्या घरी दोघेही मोठे होते. दोघांचंही नशीब इतकं सारख होत की थोड्याफार फरकाने घरादाराची जबाबदारी दोघांच्याही खांद्यावर फार लवकर आली होती. मग त्यातून वाट काढताना त्यांना स्वतःसाठी वेळच उरला नव्हता. सगळ्यांचं सगळं मार्गी लावल्यावर मग त्यांचा विचार करावा अस कुणालातरी सुचलं होत तेही म्हातारपणी त्यांच्या जबाबदाऱ्या नको म्हणून. 
कुणी प्रत्यक्ष बोललं नसलं तरी त्या दोघांनाही ते जाणवलं होतं. त्या काळच्या मानाने उशीर झाला असला तरी दोघेही संसार थाटायला तयार झाले. 
आवडीनिवडी कधीच बाजूला पडून गेल्या होत्या पण एकमेकांशी मैत्री मात्र निभवायची अस ठरवत ते एकत्र आले. 
पहिल्या रात्री तो तिला बघून त्याच गझलच्या दोन ओळी गुणगुणला होता, 
तुमको देखा तो ये खयाल आया,
जिंदगी धूप तुम घना साया.....

त्याला जेव्हा जेव्हा भरून येत असे तो ह्या दोनच ओळी गुणगुणत असे हे तिला आता सरावाने कळलं होतं. तिचीही अवस्था काही वेगळी नसायची.
तशातच तिचं कॅलेंडरकडे लक्ष गेलं आजच्याच दिवशी ते भेटले होते. Iced टी घेऊन ती तो बसला होता तिथे येऊन बसली. त्याच्या हातावर हात ठेवून त्याला डोळ्यांनी आश्वस्त करत तिने म्युझिक प्लेयर सुरू केला. 
आपापल्या आवडीच्या जागी बसत दोघेही सुरात कधी गुंतले त्यांनाही कळलं नाही. 

आयुष्याच्या वेगळ्या वळणावर एकत्र आलेल्या त्या दोन जिवांसाठी सावलीची उणीव त्या शब्दांनीच तर भरून काढली होती. नकळतच ते एकमेकांसाठी घना साया कधी झाले ते त्यांनाही कळलं नव्हतं.
©गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी