शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

कालाय तस्मै नमः भाग ९ ते ११

कालाय तस्मै नमः| भाग ९

सरप्राईज

 अंगणात छानपैकी टेबल मांडलं होता. त्याच्या पलीकडे सगळी नातवंडं हातात Happy birthday चे एकेक अक्षर स्वतःच्या मोडक्या तोडक्या अक्षरात लिहिलेले बोर्ड घेऊन उभी होती. मागे सगळी मुलं मुली त्यांच्या जोडीदारासोबत उभे होते.  

माईही त्यांच्या ह्या सरप्राईज मध्ये सामील होत्या. आज तारखेने अन् दुसऱ्याच दिवशी तिथीने काकांचा 75 वा वाढदिवस होता. त्याचीच गुपचूप तयारी करून सगळे जण जमा झाले होते. काकांसाठी जसे ते सरप्राईज होते तसे सकाळपर्यंत माईंसाठीही होते. पण सकाळी भास्कर ला आलेला फोन माईनी उचलला आणि पलीकडून अशोकचा आवाज आला की अरे आम्ही सगळे शेजारच्या पाटलांच्या वाड्यात आलो आहोत तुम्ही कधी पोहोचत आहात. अजून सगळी तयारी करायची आहे. ते ऐकल्यावर माईनी त्याला रागातच विचारले, मग काय माईना सामील करावेच लागले. 

शेजारच्या वाड्यात तसेही कुणी नसायचे त्यामुळे सगळ्यांना तिथे तयारी करणे सोपे झाले. रात्री उशिरापर्यंत जागून सगळे जण गप्पा मारत होते. बऱ्याच वर्षांनी सगळ्या मुलां-नातवंडांना आजूबाजूला बघून काकांनाही छान वाटत होते. शेवटी गायत्री सगळ्यांना ओरडली,"अरे उद्याही बरेच काम आहे चला झोपा आता." तसे सगळेजण एकेक करून झोपायला गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकरच उठले होते. घरात पूजा होणार होती. आणि संध्याकाळी बाहेर एक हॉल घेऊन ओळखीच्या लोकांसाठी मेजवानी होती. त्याचे आमंत्रण, तयारी हेच सगळे जण करत होते. तिन्ही मुली सकाळीच माई काकांच्या खोलीत आल्या. हातात सामानाच्या पिशव्या होत्या. 

गायत्री म्हणाली, “काका, हे आम्हा तिघींकडून तुमच्या दोघांसाठी संध्याकाळी घालून या.” काका काही बोलणार तेवढ्यात धाकटी रोहिणी म्हणाली, “आधी उघडून तर बघा म्हणजे आम्हालाही कळेल तुम्हाला आमचं गिफ्ट आवडलं का?” माईंसाठी पैठणी आणि काकांसाठी धोतर कुर्ता होता, ते ही खास तयार करून घेतलेले. त्यासोबतच काकांसाठी सोन्याची चेन होती. 

मैथिलीही म्हणाली, “काका तुम्ही दोघांनी आजपर्यंत आमच्यासाठी जे केलं आहे ही काही त्याची परतफेड नाही. दरवेळी हक्काने तुमच्याकडून घेताना वाटायचं आपणही द्यावं. मग सहजच ही कल्पना आली आणि आम्ही तिघीही पैसे जमवत राहिलो. आणि त्यातून हे घेतले. हे पैसे आमचे आहेत तुमच्या जावयाचे नाहीत त्यामुळे अजिबात काही मनात येऊ देऊ नका. आणि हो आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत बाकी काही नको. आता पटकन तयार होऊन या.” 


दुपारपर्यंत पूजा आटोपली, सगळ्यांची जेवणेही झाली. तोपर्यंत चार वाजतच आले होते. श्रीपाद आणि श्रीधर आता सगळ्यांना स्पेशली महिलामंडळाला आवरण्यासाठी घाई करू लागले. कार्यक्रम जरी ७ वाजता असला तरी वेळ तर लागणार होताच. छानपैकी आवरून सगळेजण हॉलवर पोहोचले. पाहुणे आधीच येऊन पोहोचले होते. 

माई आणि काकांसाठी दरवाजातून ते बसण्याची व्यवस्था केलेल्या जागेपर्यंत मस्त पाकळ्यांनी पायघड्या घातल्या होत्या. सगळं बघताना काकांना अगदी भारावून गेल्यासारखं झालं होतं. आप्तेष्ट, मित्रमंडळी कौतुकाने सगळा सोहळा बघत होते.

श्रीधर, विजय आणि अशोकनेच जवळपास सगळं ठरवलं होतं. काकांच्या जवळची असणारी मंडळी त्यांच्याबद्दलच्या मजेशीर आठवणी सांगणार होते. मुलांनी लहानपणीचे किस्से सांगितले. सुनांनी आणि नातवंडांनी मिळून एक छोटेसे नाटुकले सादर केले. 

सगळे झाल्यानंतर ओळखीचेच एक गायक त्यांची कला सादर करणार होते. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. सगळ्यात शेवटी सगळे जण निवांत बसलेले असताना अशोकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत स्टेजकडे बघण्यास सांगितले. मागे असणाऱ्या भिंतीवर एक मखमली पडदा लावलेला होता ज्याचे अनावरण काका करणार होते. त्याने माई आणि काकांना स्टेजवर बोलवले. 

बसलेल्या जागेपासून ते स्टेजवर जाण्यासाठी सगळी नातवंडं त्यांना नेण्यासाठी आली. स्टेजवर आल्यावर काकांनी रिबीन ओढत पडदा सरकवला.

 एक सुरेख कोलाज होतं हाताने तयार केलेले. घरातील प्रत्येकाचे फोटो त्यात होते. सोबतच एक छानसा अल्बम होता जो सगळ्या मुलांनी काकांना दिला. त्यात काकांच्या लहानपणापासूनच्या आठवणी होत्या फोटोरूपाने. नकळतच काकांचे डोळे भरून आले. मग काकांनीही आपल्या काही छान आठवणी,बालपणीचे किस्से सांगितले. शेवटी माईंच्या आवाजातले एक सुरेल गाणे सादर होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. 

सगळे दिवस सारखे नसतात दुःखामागून सूख आणि सुखामागून दुःख ह्यांच्यामुळे तर जगण्याची आस कायम राहते. तसेच चांगलं आणि वाईट ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

कुठलीही व्यक्ती कधीच पूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. ते सर्वस्वी परिस्थितीवर आणि निर्णयावर अवलंबून असते. माणसं चुकतातच, मग ते कुठल्याही नात्यात असुदे, कुठल्याही वयाचे असुदे. पण चुकांमधून योग्य तो धडा घेत जो पुढे जातो तो शहाणा ठरतो. 
  
   हे लिहिण्याचं कारण आपल्या कथेतही वाईट व्यक्ती आहेत पण त्या सतत २४ तास तशाच नसतात. त्यांच्याही आयुष्यात असे काही क्षण येतात जिथे काही वेळासाठी का होईना त्यांना आपण चुकीचं वागतोय ह्याची जाणीव होते. आणि नकळतच ते चांगलं वागून जातात. ह्यालाच तर काळाचा महिमा असं म्हणतात ना. 

आपल्या आजूबाजूला सुद्धा असे अनेक जण असतात. आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळी मध्ये जे इतरांच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. पण अश्या लोकांना कित्येकदा स्वतःच्या वागण्याची जाणीव होते. आणि ते चांगलही वागतात. 
मग आपणही त्यांना तोडून टाकत नाहीच जसे आहेत तसे स्विकारत जगत असतोच. 

इथेही सगळं छान झालं म्हटल्यावर ललिताच्या पोटात दुखत होतच. तिच्या धुसफूस करण्याचा परिणाम अश्विनीवरही झाला होता. ती ही काही न काही खुसपट काढून कार्यक्रम नासवण्याचा प्रयत्न करत होती. पण ह्या वेळी अशोकनेच सगळी परिस्थिती बघत त्या दोघींनाही दमात घेतले होते. 

श्रीपादवर त्याचा कितीही राग असला तरी माई आणि काका त्याचे जन्मदाते होते. आणि त्यांच्या आनंदावर त्याला विरजण पाडायचे नव्हते. 

मुलं सुना , लेक जावई , नातवंडं ह्या सगळ्या गोतावळ्यात माई आणि काकांना खुश बघून अशोक आणि त्याच्या जोडीला श्रीधरलाही कुठेतरी काही वेळासाठी आपल्या वागण्याची लाज वाटली होती. 

"ललिता, अश्विनी आज इथे कसलाही तमाशा व्हायला नकोय. माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि तो आनंदातच साजरा झाला पाहिजे. तुम्हाला दोघींनाही त्रास होत असेल तर मी तुम्हाला गाडी आणि ड्रायव्हरची सोय करून देतो. तुम्ही आपापल्या माहेरी निघून जा. मी आणि विजय मुलांना घेऊन नंतर थेट आपल्या घरी येऊ.", अशोकनेच त्या दोघींना सांगितलं. 

आता अशोकच असं म्हणत आहे म्हटल्यावर त्या दोघींनाही काही बोलता आलं नाही. मन मारून का होईना हसतमुख चेहऱ्याने त्यांना त्या सगळ्यात सामील व्हावे लागले. 

आणि आधी नाईलाजाने सहभागी झालेल्या त्या दोघीही नकळतच सगळ्यात मिसळून गेल्या. 

रात्री झोपताना राहून राहून आजचा दिवस काकांच्या डोळ्यांसमोर येत होता. ह्या सगळ्या आठवणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवण्याचा निर्णय घेत त्यांना झोप लागली. 
बऱ्याच दिवसांनी आपल्या माणसांसोबत एक मनासारखा दिवस सगळेच जगले होते. आजच्या दिवसाने सगळ्यांना आठवणींचा एक मोठा खजिना दिला होता. 

काकांना कित्येक दिवसांनी असं शांत झोपलेलं बघून माईंना बरं वाटलं. त्याही काही वेळातच निद्रेच्या आधीन झाल्या. 

श्रीपादला मात्र कुठेतरी हे सगळं जसं दिसत आहे तसेच कायमस्वरूपी राहणार नाही ह्या गोष्टींची जाणीव झाली होती. शेवटी मानवी स्वभावाला औषधं नसते. पण अरुंधती गेल्यापासून तो ह्या सगळ्या गोष्टींकडे त्रयस्थपणे बघत होता. 

कैवल्यची जबाबदारी तर त्याची होतीच पण भविष्यात स्वराचीही जबाबदारी त्यालाच घ्यावी लागणार होती. 

त्रयस्थपणे निरीक्षण करून तो सतत सगळ्यांच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. जेणेकरून त्यांच्या स्वभावातील खुनशीपणाचा अंदाज बांधता येईल. आणि त्याच्या परीने काही गोष्टींना आवर घालता येईल. 

असो तर इथेही अशाच काही क्षणांमुळे सगळ्या वाईट गोष्टींचा विसर सगळ्यांनाच पडला. आणि दिवस आनंदात गेला. पुढचा दिवस त्याचं रहस्यमय गाठोडं घेऊन तयारीतच होता. 
_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग १०

खेळ मनाचे 

वाढदिवस साजरा झाला. एक दिवस थांबून सगळे आपापल्या घरी परत गेले. कुणी आनंदाची शिदोरी घेऊन तर कुणी दुसऱ्याचं नीट का सुरू आहे ह्या दुःखात. 

माणसाचं मन मोठं विचित्र असतं. त्याला स्वतःच्या समोरचं हात पसरून बोलावणारं सुख दिसत नाही, दुसऱ्याच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टी खुणावतात. त्या बघून त्याचा इगो सुखावतो. मग मनातून नकळतच तो हा खेळ सुरू करतो. आपल्याच जवळच्या माणसांचं चांगलं झालेलं बघून दुःखी होण्याचा. पण त्याला हे कळत नाही की जे आपण दुसऱ्याच्या बाबतीत घडू दे असं म्हणत आहोत त्याला आपल्याही नकळत आपल्याच आयुष्यात आपण बोलवत आहोत. 

कर्म ही गोष्ट तो पूर्णपणे विसरतो, जे देऊ तेच परत मिळणार. ही खूप महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे बघू या जमतंय का ते.

आता गणपतीतच सगळे जण एकत्र येणार होते. तोपर्यंत प्रत्येकाची आपापली कामं होती, जबाबदाऱ्या होत्या. सगळी छोटी मुलंही आपसात काय मज्जा करायची हे ठरवून मोकळी झाली होती. 

स्वरा आता घरात एकटी मुलगी नव्हती. तिच्यानंतर तिघींचा जन्म झाला होता. त्यामुळे आपल्यालाही खेळायला कुणीतरी आहे म्हणून ती खुश असायची. लहान मुलं निरागस, निष्पाप असतात. 

कपट, ईर्षा, राग हे सगळं ती हळूहळू अनुकरणातून शिकतात. आपले आईवडील कुणाच्या समोर कसे वागतात आणि मागे कसे वागतात ह्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं. काही वेळा प्रश्न विचारतात तर कधी कधी ते स्वतःच उत्तर शोधून काढतात. पण ह्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं. इथेही असंच काहीसं घडत होतं. मुलांच्याही नकळत मुलांना आपल्याच भावंडांशी वैरभावनेने वागण्याची तालीम मिळत होती. 

श्रीधर-मंदा, विजय-ललिता, अश्विनी-अशोक ह्याचं मनातून जरी एकमेकांशी पटत नव्हतं तरी ते ठरवून एकत्र येत होते. ह्यामागचा हेतू अर्थातच अजून कुणीही बोलून दाखवला नव्हता. सध्या तरी 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असं होतं. पण लवकरच काहीतरी घडणार होतं ज्यामुळे ह्या सगळ्यांची आयुष्यं एक यु टर्न घेणार होती. 

त्या दोन व्यक्ती गेले बरेच दिवस शांतपणे सगळं बघत होत्या. त्यांना जी तयारी करायची होती ती जवळपास पूर्ण झाली होती. पण पुढचा प्लॅन अंमलात आणण्यासाठी त्यांना अजून काही जणांना आपल्या कटात सामील करून घ्यावे लागणार होते. तसे त्यांचे चाचपणे सुरू होते. आणि तो दिवसही आला जेव्हा त्यांना त्यांचा तिसरा साथीदार मिळाला होता. त्याला सगळी योजना त्यांनी समजावून सांगितली. जमेल तशी त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघावी लागणार होती. ह्यावेळी हा खेळ कसा खेळला जाणार आहे हे अजून गुलदस्त्यातच होते. 

श्रावण आला तशी सणांची रेलचेल सुरू झाली. वाड्यावरही माई उत्साहात सगळं काही करत होत्या. पण हल्ली त्यांची तब्येत फारशी साथ देत नव्हती. संगीता जबरदस्ती त्यांना आराम करायला लावत होती. पण माईंचं काही एका जागी बसणं होत नसे. अशातच गणपती जवळ आल्याने दुप्पट उत्साहाने त्या हे करू ते करू म्हणू लागल्या. शेवटी काकांनी रागावून त्यांना सक्तीची विश्रांती घेण्यास भाग पाडले. 

दोन दिवस आधीच बाकीच्या सुना आणि नातवंडं येणार होती. काकांच्या लेकीही ह्या वर्षी येणार होत्या. मुलं मात्र नंतर येणार होती गणपती गौरीच्या दिवशीच विसर्जित होणार असल्याने कुणी बसण्याच्या दिवशी तर कुणी विसर्जनाच्या दिवशी येणार होते. एकंदरीत वातावरण छान होते. पण त्या सगळ्याचा मागे हलक्या पावलाने अजून कुणीतरी येणार होते की आले होते?

बाप्पाचं आगमन झाले तसा घरात एक वेगळा उत्साह होता. एकीकडे त्याच्या येण्याने सगळं नीट होईल अशी अपेक्षा होती तर दुसरीकडे कुणीतरी आपलं जाळं पसरवत होते.
 
घर जरी मोठे असले तरी सगळे एकत्र आल्यानंतर ओसरीतच झोपत असत. तेथेच अंथरूण घातल्यावर मुलांची दंगामस्ती सुरू झाली. सगळे जण मुलांना एकेक करून पकडून झोपवण्याचा प्रयत्न करत होते. कुणीतरी मात्र कधी हा गोंधळ संपतोय ह्याची वाट बघत होते. कारण आजच त्यांचा प्लॅन सुरू होणार होता. थोड्याच वेळात सगळे निद्रेच्या आधीन झाले. 

एक भयंकर शांतता जाणवू लागली. त्या तिघांनाही आता काम संपवण्यासाठी घाई झाली होती. पण ह्यावेळी कुणीतरी बघू नये अशा व्यक्तीने त्यांना बघितलं होतं. ते त्यांच्यामधील एकाच्या लक्षात आलं होतं. इतर दोघांना कळू न देता त्या बघणाऱ्याचा काटा काढायचा असे त्याने स्वतःशीच ठरवले. 

रात्रीच्या अंधारात त्या तिघांची खुसफूस सुरू होती. सगळ्यात मोठी व्यक्ती होती तिने विचारलं, “झालं का सगळं सांगितल्याप्रमाणे?” दुसरीने मान डोलवत हो असं. उत्तर दिलं. एक खुनशी हास्य एकाच वेळी त्यांच्यासह अजून काही चेहऱ्यांवर उमटलं. 

"ह्यावेळी जर आपला प्लॅन यशस्वी झाला तर बरंच काही साध्य होईल." पहिली व्यक्ती

"पण कशावरून मागच्या वेळेस जशी अरुंधती आडवी आली तसा ह्यावेळी श्रीपाद येणार नाही?" , दुसऱ्या व्यक्तीने आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. 

"असं नाही होणार , कारण सध्या श्रीपाद त्याच्या मुलामध्ये गुंग आहे. त्यामुळे आपण त्याच्या नाकाखाली काय करत आहोत हे त्याच्या सहजासहजी लक्षात येणार नाही. आणि जोपर्यंत त्याच्या लक्षात येईल, तोपर्यंत आपलं सावज आपल्या ताब्यात आलेलं असेल.", पहिली व्यक्ती ज्या आत्मविश्वासाने म्हणाली ते बघून इतर दोघांना आता आपलं काम १००%पूर्ण होणारच अशी खात्री पटली. 

पण माणूस जसं ठरवतो तसच कधीही घडत नाही. व्यक्ती चांगलं वागणारी असुदे किंवा वाईट वागणारी असुदे, नियती प्रत्येकाचा प्लॅन फिस्कटवण्यासाठी तयारीत बसलेली असते. 

चांगल्या किंवा वाईट कुठल्याही मार्गावर यश इतक्या सहजपणे ओंजळीत येऊन पडत नाही. 

कृतीमध्ये, कष्टांमध्ये सातत्य असेल तरच गोष्टी घडतात. 

त्या तिघांचं बोलणं ऐकणार्या व्यक्तीला त्या तिघांच्याही मनात खदखदत असणाऱ्या रागाचा, द्वेषाचा अंदाज आला होता. पण उघडपणे समोर गेलं तर त्याने गोष्टी नको त्या थराला जाण्याची शक्यता होती म्हणून ती व्यक्ती शांत बसून सगळं ऐकत होती. 

उद्याची सकाळ कुणाच्या तरी आयुष्यात बरेच काही बदल घडवून आणणार होती. 
हे सगळं शांतपणे बघणाऱ्या त्या व्यक्तीने मात्र नकळतच वरती बघून हात जोडले आणि कालाय_तस्मै_नमः| म्हणत सगळं काही त्याच्यावर सोपवलं. 

त्या तिन्ही व्यक्ती आता घरातले सगळे झोपले होते तिथे आल्या. सगळी मुलं गाढ झोपेत होती. त्यातच त्यांचं टार्गेटही होतं. जगातल्या छक्क्या पंजाची कल्पना नसलेलं ते लेकरू आपल्याच स्वप्नातल्या विश्वात रमून झोपेतच खुदूखुदु हसत होते. उद्यापासून आपल्या आयुष्यात काय होणार आहे ह्याची काडीमात्र खबर त्याला नव्हती. पुढे काय होणार हे येणारी वेळच सांगू शकत होती...

वरवर पाहता आपल्याला बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य खूप छान चाललं आहे असं वाटतं पण खरी परिस्थिती काही वेगळीच असते. कुणीतरी आयुष्यभर भरल्या घरात एकटे असते. कुणीतरी सगळी भौतिक सुखं पायाशी असूनही त्यांचा उपभोग घेऊ शकत नसते. 

अशी बरीच दुःख असतात जी उघडपणे सांगता येत नाहीत पण ती व्यक्तीच्या मनावर नकळत आघात करत असतात.
 हा सुडाचा खेळ कशासाठी? 

काहीवेळा माणसाकडे पैसा तर भरपूर असतो पण ते नसतं ज्याच्यासाठी तो जगत असतो. अशा गोष्टी ज्या पैशांनी विकत घेता येत नाहीत. आणि त्या मिळवण्यासाठी स्वतःच्या वाईट स्वभावाला मुरड घालणे ह्या लोकांना शक्य नसते. म्हणून मग मनात सुडाची भावना जागी होते आणि कधी व्यक्ती तिच्या प्रभावाखाली जातो त्यालाही कळत नाही. 

तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या जर कुणी आपल्यावर जळत असेल तर दुर्लक्ष करा किंवा आपल्याला कुणाबद्दल असे वाटत असेल तर मनोमन त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा. ईर्षेपोटी कधीही कुणाचं वाईट चिंतू नका.
_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग ११

ललिताच्या अचानक येण्यामागचे रहस्य

वाड्यावर नेहमीप्रमाणे आता दिनक्रम सुरू होता. पण माईंमध्ये झालेला बदल काकांना जाणवला होता. हल्ली त्या जास्त वेळ स्वरासोबत घालवत होत्या. सतत तिला काही न काही सांगत होत्या. पाचच वर्षाचं ते लेकरूही जमेल तसं सगळं समजून घेत होतं. काकांना अंदाज आला होता पण त्यांना नेमकं काय घडलं आहे ते माईंच्या तोंडून ऐकायचं होतं. 

गणपती होऊन काही दिवस झाले होते. त्यामुळे आता तसा निवांत वेळ होता दोघांकडे. अशातच एके दिवशी विजय आणि ललिता त्यांच्या जुळ्या लेकींसह - सई आणि जुई - गडबडीत आले होते. विजयला एका मोठ्या कामासाठी काही दिवसांसाठी परदेशी जायचं होतं. तसा तो आधीही गेला होता त्यामुळे ह्याचवेळी अचानक त्याने बायको मुलींना इकडे आणून सोडलं तेव्हा काकांना जरा आश्चर्यच वाटलं. 

इथे माईंच्या अस्वस्थतेमध्ये मात्र भर पडली होती. का कुणास ठाऊक पण ललिताचं वावरणं काकांनाही विचित्र वाटत होतं. पण पुरुष माणूस, त्यात सासरे, मग कसं बोलणार म्हणून ते गप्प होते. कारण ललिता तशी फारशी घरच्या लोकांमध्ये मिसळणारी नव्हती. ती सगळ्यांशीच फटकून वागत असे. माहेरच्या संपत्तीचा आणि स्वतःच्या सौंदर्याचा जरा जास्तच गर्व होता तिला. पण एकत्र कुटुंब असल्याने फारशी वेगळी वागणूक तिला कधी कुणी दिली नव्हती. ती माई काकांशीही कामापुरतंच बोलत असे. ते ही तिच्यापासून थोडेसे दूरच राहायचे. मुलाचा संसार नीट चालावा हीच त्यामागे त्यांची इच्छा असायची. पण ह्यावेळी मात्र तिच्या वागण्यात फारच बदल झाला होता. तो वरून चांगला दिसत असला तरी चांगला भासत नक्कीच नव्हता. 
     

माईंना आपल्याला काही तरी सांगायचे आहे हे काकांना जाणवले होते. पण माई बोलण्यासाठी आसपास आल्या की ललिता काहीतरी काम काढून तिथेच घुटमळत असायची हेही त्यांच्या लक्षात आले. शेवटी त्यांनी माईंना एका ओळखीच्या कडे भेटायला जायचे आहे असे सांगून बाहेर निघण्याचे ठरवले. दोघेही निघणार तेवढ्यात आतून जिवाच्या आकांताने मारलेली किंकाळी ऐकू आली. माईंच्या छातीत धस्स झाले. त्या वेगाने घराच्या आतल्या बाजूला गेल्या तर जुई डोक्यावर पडली होती. आजूबाजूला रक्ताचा सडा होता. ललिताने रडत रडत जुईला उचलले आणि बाहेर आली. परंतु बाहेर येताना तिने जर तोंड उघडले तर मग काय होईल कळले ना असा कटाक्ष माईंकडे टाकला. 

माईंचं लक्ष जाताच त्यांचा चेहरा भीतीने काळवंडला. जुईला डॉक्टर कडे नेण्यात आले. टाके पडले होते अन् रक्तही बरेच गेले होते. माई तिच्या उशाशी बसून होत्या. मनात विचार करत होत्या की काय कमी पडतंय म्हणून ललिता अशी वागते आहे? त्या रात्री त्या तिघांनी जे काही केलं ते बघितल्यावर मला खात्रीच वाटत नव्हती की माझ्याच घरात ही माझीच लेकरं अशी एकमेकांना पाण्यात बघत असतील. पण ललितातर स्वतःच्या लेकीच्याही जीवावर उठली आहे मग माझ्या स्वराचं काय होईल? आधीच तिचं असामान्य असणं तिच्या आईबापालाच सहन होत नाही. 

संगीता आणि भास्कर एके दिवशी स्वराबद्दल बोलत होते ते चुकून माईंच्या कानावर पडल होतं. भास्करला स्वराच्या जन्माला येण्याचा फारसा आनंद नव्हता त्याला तर दुसराही मुलगाच हवा होता. आणि संगीता, तिला आपल्याच लेकराच्या गुणांबद्दल प्रॉब्लेम होता. त्यावेळी ती कुणाच्याही प्रभावाखाली नव्हती. तर ते तिचे विचार होते.


आपल्या समाजात अशी बरीच कुटुंब सापडतील, जिथे बाहेर दाखवताना मुलगी आमच्यासाठी खूप स्पेशल आहे असं दाखवलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असते. ते शेवटपर्यंत कुणालाही कळत नाही. असो. 

इथे मात्र ह्या दोघांच्या मनात स्वराबद्दल असणारे विचार इतरांच्या पथ्यावर पडले होते, कारण नकळतच त्यांच्या करणीला बळ मिळाले होते. आणि आता त्यांना फक्त ह्या दोघांचे हेच विचार सतत तेल घालून पेटवत ठेवायचे होते. 


माईंनी मनाशी काहीतरी ठरवत आधी हे सगळं काकांच्या कानावर घालायचे ठरवले. त्या घाईने काकांच्या खोलीत आल्या. काका काहीतरी लिहिण्यात गुंतले होते. ते बघून माई मागे फिरल्या तेवढ्यात काका म्हणाले, “सरस्वती जे बोलायचं आहे ते बोल. आत्ता कुणीही घरात नाहीये.” बोलताना कुणीही ह्या शब्दावर त्यांनी दिलेला जोर माईंच्या लक्षात आला. 

शब्दांची जुळवाजुळव करत माईंनी काकांना त्या रात्री घडलेला प्रसंग सांगितला. त्या रात्री तीन व्यक्ती होत्या पण मला मात्र फक्त ललिताचाच चेहरा दिसला हेही त्या म्हणाल्या सोबतच इतर दोन व्यक्ती मध्ये एक पुरुष होता हेही त्यांनी सांगितले. 

काका काहीसे विचारात पडले. मग म्हणाले, “असं काहीतरी होणार ह्याची कल्पना होती मला. श्रीपादनेही सांगितलं होतं. पण त्याचं म्हणणं आहे की आपण सध्या काही करू शकत नाही. आपण फक्त स्वरावर लक्ष ठेवून तिला उत्तमोत्तम संस्कार देऊ शकतो. आणि आपल्याला जे काही ज्ञान आहे ते तिच्यापर्यंत पोहोचवू शकतो. ही तिची लढाई आहे जी बरीच वर्षे चालणार आहे. आपण आज आहोत उद्या कदाचित नसू. तेव्हा आपले संस्कारच तिला बळ देतील आपल्याच माणसांपासून सुरक्षित राहण्यासाठी.” 

शेवटच्या वाक्यावर माईंनी चमकून काकांकडे बघितले. तसे काका म्हणाले, “प्रत्येक जण आपलं नशीब स्वतः घडवत असतो. जसं आपली वयाने मोठी असलेली लेकरं स्वतःच्या नशिबाशी खेळ करत आहेत, तशी आपली ही लहानशी पोर सगळ्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करेल. तिला खूप सोसावे लागणार आहे. त्यासाठी आपले आशीर्वाद तिला नेहमी तयार करतील. एकटी असूनही ती सगळ्या वाईट गोष्टींना भारी पडेल. 
तिच्यासारख्या खूप मुली आहेत, मुलगेही आहेत जे स्वतःच्याच घरात, माणसात हे सगळं भोगतात अशा सगळ्यांसाठी स्वरा नकळतच आदर्श होईल बघ. 
तू अजिबात काळजी करू नकोस असं मी म्हणणार नाही, पण ह्या काळजीचा उपयोग तू स्वराला घडवण्यासाठी कर. आपण कितीही थकलो असलो तरी ही जबाबदारी पार पडल्याशिवाय आपल्याला सुट्टी मिळणार नाहीये.”

 काका हसत हसत म्हणाले. माईही मान डोलवत हसून खोलीतुन बाहेर पडल्या. काळजीचे सावट तसेच असले तरी त्यांच्या मनातल्या भीतीची जागा आता विश्वासाने घेतली होती. विश्वास होता त्याच्यावर ज्याने सगळ्यांना घडवले आहे. सईसोबत खेळत असणाऱ्या स्वराकडे बघून माईंना जाणवलं की ही पोर आयुष्यात इतरांना कधीही निराश करणार नाही. पण आपल्याला तिला स्वतःला सांभाळायला शिकवायचे आहे. 


स्वरामध्ये अस वेगळं काय होतं? तसं बघायला गेलं तर काहीच नव्हतं. हो अगदी सामान्य रंग, किडकिडीत तब्येत होती. पण तिचा स्वभाव मात्र खूप गोड होता. तिच्यावर थोडंसंही प्रेम करणाऱ्या माणसाला ती खूप जीव लावायची. इतकी लहान असतानाही ती आईबाबा चिडचिड करू नये म्हणून हट्ट करत नसे. 

माई आणि काकांसोबत मात्र ती मनातलं सगळं बोलत असे. त्यांनी तिला तिच्या आवडत्या देवबाप्पाला ही सगळं सांगायची सवय लावली होती. पण हेच समजुतदार असणं तिच्यासाठी शत्रू ठरलं होतं. कारण तिच्या सगळ्या बहिणी, भाऊ दिसायला देखणे होते तरीही त्या सगळ्यांमध्ये हे ध्यान मात्र लक्ष वेधून घेत असे. आणि हीच गोष्ट इतरांना खटकत असे. त्यांना भीती वाटत असे की ही मुलगी भविष्यात आपल्या मुलांना जड जाईल.

 प्रत्यक्षात मात्र सगळी मुलं आपल्या ह्या बहिणीशी प्रेमाने वागत असत कारण त्यांच्या मनाला अजून असल्या भावनांचा स्पर्श झाला नव्हता. पण पुढेही त्या सगळ्यांच्या स्वराबद्दलच्या भावना अशाच असणार का हे येणारी वेळ आणि परिस्थितीच सांगणार होती. 

प्रत्येक जण आपल्या आयुष्यात एक लढाई लढत असतो. कधी स्वतःशी, कधी जवळच्या लोकांशी, कधी समाजाशी. आपण मात्र समोरून दिसणारे चित्र बघूनच त्या त्या व्यक्तीवर एक शिक्का मारून मोकळे होत असतो. ते म्हणतात न काय ते judgemental होतो.

 व्यक्तीसमोर अवघड परिस्थिती मध्ये कोणते पर्याय होते, त्याने ते का निवडले, कसे निवडले आपल्याला काहीच माहीत नसते. म्हणून लगेच कुठलाही निष्कर्ष काढू नये. कारण प्रत्यक्षात कोण काय सहन करत आहे ह्याची आपल्याला काडीमात्र जाणीव नसते. कधी कधी फक्त सोबत कुणीतरी आहे एवढा विश्वास द्यावा बास.
____________________________________
प्रतिक्रियांची वाट बघत आहे. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु !!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

कालाय तस्मै नमः (भाग ७-८)

कालाय तस्मै नमः| भाग ७

भूतकाळात फेरफटका

अरुंधतीच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असली तरी आयुष्य थांबणार नव्हते. अरुंधतीचे सर्व कार्य आटोपल्यावर महिनाभरात घरातील सर्व सोय बघून निघावे असे श्रीपादने ठरविले. तसे त्याने काकांना बोलूनही दाखवले. ते बोलणे माईंनी ऐकले आणि त्या श्रीपादला बघत म्हणाल्या, “निघावे म्हणजे? ती गेली म्हणजे तूही जाणार का तुझ्या वाटेने? कैवल्य - त्याचं काय?” 

श्रीपाद माईंना समजावत म्हणाला, “माई मी जातोय म्हणजे निघून नाही जात. बदली झाली आहे माझी, खरे कारण सांगायचे त्याने टाळले. आणि कैवल्यला ह्या वातावरणापासून दूर घेऊन गेलो तरच तो सावरेल नाही तर त्याला सतत आईची आठवण येत राहील. नवीन ठिकाणी नवीन माणसांमध्ये तो गोष्टी विसरून रमेल. आणि जेव्हा जेव्हा तू मला मनापासून हाक मारशील मी नक्की येईन. ह्या घराला, तुम्हाला माझी गरज असताना मी तुमच्या सोबत असेन. आणि मलाही ह्या घरात तिच्या बाबतीत जे झाले सतत तेच तेच आठवून गुदमरून गेल्या सारखे होते. त्यामुळे तू मला परवानगी दे.” 

माईंनाही मनातून त्याचे बोलणे पटले, पण आईचं काळीज होतं ते. त्यात श्रीपाद त्यांची दुधावरची साय म्हणजे कैवल्यलाही घेऊन जाणार म्हटल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. श्रीपादने जवळ घेत माईंना पोटभर रडू दिले.
 गेल्या काही दिवसात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. भास्कर संगीताही श्रीपाद जाणार म्हटल्यावर थोडेसे धास्तावले. इतके दिवस तशी जबाबदारी त्यांच्यावर नव्हती, पण आता मात्र त्यांना सगळं बघावं लागणार होते. श्रीपादने त्यांनाही समजावले. जिथे जाणार आहे तिथला पत्ता आणि नंबर कळवेन काहीही गरज पडली तर कुठल्याही क्षणी तू मला कळवु शकतोस हेही सांगितले. 


सगळ्या मुली काही दिवस राहून सासरी परत गेल्या होत्या. लाडक्या वहिनीच्या जाण्याने त्यांनाही घर सुने वाटत होते. श्रीधर मंदा आता परत जाणार होते. अशोक , विजयने त्यांना स्वतःकडे येण्याची गळ घातल्याने तिकडे जाऊन मग ते तसेच जाणार होते. 

श्रीपाद एकेक कामं हातावेगळी करत होता. भास्करला सगळ्या गोष्टी सांगत होता. श्रीपादने नाही म्हटलं तरी माई काका , कैवल्य आणि भास्करच्या कुटुंबाचा विचार करून बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. भास्करला मदतीची गरज पडेल आणि ती त्याला कुणाकडेही मागावी लागू नये ह्याची काळजी घेण्याची कल्पना अरुंधतीची होती. त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे श्रीपादने काही गुंतवणूक केली होती. इतरांकडून त्यांना तशी फारशी अपेक्षाही नव्हती. भास्करला मात्र जबाबदारी बघूनच दडपण आले. “दादा, मला नाही जमणार रे हे सगळे. तूच बघ ना,” तो श्रीपादला म्हणू लागला. तसा श्रीपाद म्हणाला, “असं करून नाही चालणार भास्कर. माझ्या वाटणीच्या गोष्टी मी करणारच आहे. पण तू इथे आहेस म्हणजे अडीअडचणीच्या वेळी तुला हे सगळं माहिती हवं. संगीताला सगळं माहिती आहे तिची मदत घे. ती अरुंधतीचीच बहीण आहे तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत ती तुझ्यासोबत खंबीरपणे उभी असेल.” सगळी कागदपत्रे त्याच्या हातात सोपवत श्रीपादने समजावले.


श्रीपाद आणि कैवल्यच्या निघण्याचा दिवस आला. मनाला समजावत माई सगळी तयारी करत होत्या. काही दिवस अरुंधतीचे आईबाबा त्या दोघांसोबत राहणार होते. ते दोघे नेमके कुठे जाणार आहेत हे कुणालाही सांगितले नव्हते. सगळी व्यवस्था झाली की काय ते कळवतो असे श्रीपादने सांगितले होते. काकांनीही फारसे काही न विचारता होकार दिला होता पण तरीही त्यांना ते पचवणे अवघडच जात होते.  

दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने श्रीपाद, कैवल्य आणि अरुंधतीचे आईबाबा निघाले. गेल्या काही दिवसांत कैवल्यच्या वागण्यात खूप बदल झाले होते. तीन-चार वर्षांचे ते लेकरू अचानक खूप समंजस झाले होते. अरुंधतीच्या आजारपणाच्या काळात त्याला तिच्यापासून दूर ठेवलं जात असल्याने कदाचित आता आपल्याला आई शिवायच रहावे लागणार ही नोंद त्याच्या बालमनाने घेतली होती. त्यामुळे बाबांनी जायचं म्हटल्यावर त्याने चुपचाप मान डोलावली होती. 

श्रीपादलाही आईविना लेकरू म्हणून मिळणाऱ्या सहानुभूतीची सवय त्याला होऊ द्यायची नव्हती. ते त्याच्या आईला अरुंधतीलाही आवडले नसते. म्हणूनच तो दूर निघाला होता. येणारा नवीन प्रवास बरेच काही नवीन घेऊन स्वागतासाठी तयार होता. 

इकडे काका आणि भास्कर घरी आले होते. घरी आल्यावर मोकळे मोकळे घर बघून काकांना कसेतरी झाले पण आता ह्याची सवय करून घ्यावीच लागणार होती. संगीता आणि भास्कर समीरच्या साथीने आता माई काकांना सांभाळण्यासाठी तयार झाले होते.
    

 दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने, वर्षांमागून वर्षे जात होती. प्रत्येक सणावाराच्या दिवशी माईकाकांना दिवसभर श्रीपाद येईल असे वाटत असे पण तसे काही घडत नसे. शेवटी त्यांनी आता आशाच सोडून दिली होती. मधल्या दिवसांमध्ये घरात आणखी 'नातू' आले होते. पण ‘ती’ च्या येण्याची चाहूल कुठेच नव्हती. शब्द दिल्याप्रमाणे दरवर्षी काका सगळ्यांना घेऊन कुलदैवताला जात होते. चार वर्षे लोटली होती आणि मग संगीताने ती बातमी दिली. 


संगीताची परिस्थिती नाजूकच होती. त्यामुळे तिला माहेरी न पाठवता तिच्या आईलाच माईंनी बोलावून घेतले होते. पूर्ण नऊ महिने त्या येऊन जाऊन राहत होत्या. 

संगीताला डोहाळेही विचित्रच लागत होते. पण तिच्या आईला मात्र कुठेतरी ह्या सगळ्यामुळे अरुंधतीची आठवण येत होती. कारण अरुंधतीच्या जन्मावेळी तिच्या आईला म्हणजेच संगीताच्या मावशीला असेच डोहाळे होते. घरात सतत पूजा व्हावी जपजाप्य सुरू असावे, सतत मंत्रोच्चार कानावर पडत राहावेत असे तिला वाटत होते. तिने तसे बोलून दाखवताच काकांनीही यथाशक्ती सगळ्या गोष्टी करणे सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून की काय संगीताचा त्रास हळूहळू कमी झाला. तिची प्रकृतीही स्थिर झाली. आणि घराला मिळालेला तो शाप दूर होण्याची आशा काकांच्या मनात निर्माण झाली. 

हे सगळं बघून त्या दोन व्यक्तींनी मात्र पुन्हा आपली तयारी सुरू केली होती. पण ह्यावेळी त्यांना प्रत्येक केलेल्या वाराचे प्रत्युत्तर लगेच मिळणार आहे ह्याची कल्पना नव्हती.  

काका आणि माईंची पुर्वपुण्याई अन् अरुंधतीने दिलेल्या बलिदानाचे फळ म्हणून ‘स्वरा’ सुखरूप जन्माला आली होती. तिच्या जन्मानंतर डॉक्टरांनी काकांना भेटण्यासाठी बोलावले. डॉक्टर ओळखीचेच असल्याने काकांना समजले काहीतरी वेगळं आहे. 
      

काका आत गेले तसे डॉक्टर म्हणाले, “काका, मी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूप वर्षांपासून ओळखतो. पण आजचा अनुभव खूप वेगळा होता. नऊ महिने जिथे मला संगीता सुखरूप राहील का नाही ह्याची खात्री नव्हती तिथे सगळं नीट पार पडणं हा चमत्कार होता. त्यात आज आम्ही ऑपरेशनची तयारी ठेवली होती. कारण कुठल्याही प्रकारचा धोका नको होता. पण आतमध्ये जाताच एक वेगळं वातावरण मी अनुभवलं. संगीताच्या आसपास कुणीतरी वावरत आहे असं मला जाणवलं. आश्चर्य म्हणजे इतर कुणालाही हे जाणवलं नाही. ते जे काही होतं ते खूप आश्वासक होतं. जणूकाही धीर देत आहे. सगळं नीट होईल घाई करू नका असे शब्द ही मला ऐकू आले. मला वाटलं मला भास झाला पण संगीताने मला नंतर सांगितले की डॉक्टर तो भास नव्हता ती माझी ताई होती. माझी आणि बाळाची सुखरूप सुटका व्हावी म्हणून ती सतत माझ्या उशाशी बसून होती. ताई म्हणजे अरुंधतीच न काका?” काकांनी डोळ्यातले पाणी टिपत होकारार्थी मान डोलावली. 

डॉक्टर पुढे म्हणाले, “खरे तर मी फारसा देवावर विश्वास नाही ठेवत, पण गेले काही महिने मी जे अनुभवले त्यावरून माझा त्या सकारात्मक शक्तीवर मात्र पूर्ण विश्वास बसत आहे. बाळ आणि बाळाची आई अगदी ठणठणीत आहेत.” काका त्यांचे आभार मानून बाहेर आले. 

संगीताला ज्या खोलीत ठेवले होते तिथे आले. समीर कुतूहलाने ते छोटंसं गाठोडं बघत होता. तुझी बहीण आहे असं सांगताच त्याला खूप आनंद झाला. माईंनी बाळाला काकांच्या हातात दिले. तिचे डोळे हुबेहूब अरुंधतीसारखे होते. प्रेमळ दुसऱ्याला आश्वस्त करणारे. काकांकडे बघत बाळाने हळूच डोळे मिचकावले. जणूकाही ते सांगत होतं आता मी आले आहे न आता सगळे नीट होईल. काकाही हळूच हसले.

आणि आजचा दिवस होता बारश्याचा. स्वराने तिच्या काकाला श्रीपादला घरी येण्यासाठी भाग पाडले होते. सोबत कैवल्य ही आला होता. 

काका भूतकाळातून बाहेर आले. पहाट झाली होती. दूरवरून मंदिरातली काकडआरती ऐकू येत होती. सगळे घर तसे अजूनही झोपेच्या आधीनच होते. 

काका मात्र जागे झाले. आन्हिके उरकून त्यांनी देवपूजा आणि पादुकांची पूजा केली. एकीकडे तोंडाने रोजची स्तोत्रे म्हणणे सुरू होते. पण आज अचानकच त्यांना संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणावेसे वाटले त्यांनी खड्या आवाजात सुरू केले, 

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । 
भक्तावासं स्मरेनित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥१॥

पहिल्या दोन ओळी म्हणत असतानाच अजून कुणीतरी आपल्या सोबत म्हणत आहे ह्याची जाणीव त्यांना झाली. मागे वळून बघताच त्यांना समजलं, दुसरं कोण असणार - कैवल्य होता तो. गालातल्या गालात हसत काकांनी स्तोत्र तसेच सुरू ठेवले. 

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् । 
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च । 
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् ॥३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । 
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः । 
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । 
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् । 
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् । 
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

॥इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम गणेशस्तोत्रं संपूर्णम् ॥

‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत देवाला नमस्कार करून ते कैवल्य जवळ आले. एवढासा तो पण अंघोळ उरकून तिथे येऊन बसला होता. काकांनी विचारले, “इतक्या लवकर का उठलास?”   

“मला जाग आली आजोबा. मग तुम्ही उठला आहात हे कळले बाबांनी अंघोळीची तयारी केली होती मग काय मी आवरले आणि येऊन बसलो. तुम्ही स्तोत्र म्हणू लागलात मलाही वाटलं म्हणावं मग मी ही सुरू केले. बरोबर म्हटलं ना मी?”   
“अगदी बरोबर. कुणी शिकवलं तुला?”  
“आईने.”  

काका क्षणभर गोंधळले. “आईने?” 

“हो. ती कधी कधी माझ्या स्वप्नात येते. खूप बोलते माझ्याशी. हे तिनेच शिकवलं मला.” तेवढ्यात मागे उभ्या असलेल्या श्रीपादने त्याला हाक मारली आणि माई उठली आहे तिच्याकडे जा अस सांगितलं. 

तो काकांकडे वळून पाहत म्हणाला, “ती भेटते त्याला स्वप्नात की काय मला नाही माहित, पण सगळ्या चांगल्या गोष्टी त्याला देऊन जाते. आता कदाचित नाही भेटणार. होईल त्याला सवय.” इतकंच बोलून तो निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत काका तिथेच थांबले. मग वळून पादुकांकडे बघितलं आणि हात जोडून म्हणाले, “सगळं काही तूच सांभाळ आता.....” 

समोरून कितीही साधं सरळ वाटलं तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होत असते. निराशेचे क्षण येतात, मन उदास होते, सगळं नकोसं वाटतं. अशा वेळी आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्यावर सगळं सोपवून मोकळं व्हावं. मनापासून त्याला साद घालत योग्य मार्ग दाखवण्याची विनंती करावी. मार्ग नक्की मिळतो. तसे संकेत मिळतात. स्वतःला मदत करण्यासाठी आधी आपण तयार व्हावे तरच तो ही आपल्याला मदत करतो.

_____________________________________

कालाय तस्मै नमः|भाग ८

संमोहन 

काही दिवस सगळ्यांसोबत घालवून श्रीपाद कैवल्यसोबत परत गेला. बाकी सगळे जणही आता आपापल्या घरी गेले. पण स्वराच्या रुपात अरुंधतीचं परत येणं अजूनही कुणी स्वीकारलं नव्हतं. 

स्वरा जसजशी मोठी होत होती तसतशी तिच्या वागण्यात, बोलण्यात अरुंधतीची छाप जाणवू लागली होती. इतर मुलांना जशा गोष्टी शिकवाव्या लागतात तसे तिचे नव्हते. कधी कधी ती असं काही करायची जे ४-५ वर्षाच्या मुलाला सुचणार नाही. संगीताला लेकीचं कौतुक बघून कुठेतरी आनंदही व्हायचा पण दुसऱ्या क्षणी अरूधंतीची अवस्था आठवली की तिच्या काळजाचा थरकाप होत असे. नकळतच ती स्वराचा रागराग करत असे. 

माई तिला समजावून सांगत असत की दरवेळी असंच कसं घडेल? आणि ती हुशार आहे, थोडीफार अरुंधती सारखी वागते म्हणजे ती तसंच नशीब घेऊन आली आहे असं असणार आहे का? माईंचे शब्द ऐकून तेव्हढ्यापुरता तिच्या जीवाला दिलासा मिळत असे. 

पण ह्या गोष्टी - म्हणजे स्वराचा रागराग करणे आता वारंवार घडत आहेत हे बघून माईंनी काकांच्या कानावर घातले. काकाही विचारात पडले. कारण इतर सर्व नातवंडांपैकी स्वरावर त्यांचा जास्तच जीव होता. आणि इतरांना त्याचा त्रास होत असेल तर ठीक पण स्वराच्या आईला का होतोय तेच त्यांना कळेना. अशातच एके दिवशी संध्याकाळी त्यांना घरातल्या फोनवर एक फोन आला. त्यावेळी मोबाईल नव्हते त्यामुळे लँडलाईन हेच संपर्काचे साधन होते. 

श्रीपादने माई काकांशी कधीही संपर्क साधता यावा म्हणून स्वतःच्या ओळखी वापरून जाण्याच्या आधी घरात फोन कनेक्शन घेतले होते. असो. 

तर काका फोनवर बोलत होते म्हणजे खरं तर फक्त ऐकत होते. पलीकडची व्यक्ती कोण आहे, ती काय बोलतेय हे त्यांना जाणवलं. त्यांना जेवढा राग आला त्यापेक्षा कितीतरी जास्त धक्का बसला होता. 

फोन ठेवल्यावर श्रीपादचं नाव घेत ते तिथेच बसून राहिले. काही वेळाने पुन्हा फोन वाजला रिंगच्या आवाजाने काका भानावर आले त्यांनी फोन कानाला लावला.


 पलीकडून श्रीपाद बोलत होता, “काका काय झालं? मला अचानक जाणवलं की तुम्ही मला बोलवत आहात.” काकांनी आसपास कुणीही नाही हे बघून आधीचा प्रकार त्याच्या कानावर घातला. तसा तो म्हणाला, “मला शंका होतीच. पण तुम्ही काळजी करू नका. दोन दिवसांनी तुमच्याकडे एक व्यक्ती येईल. तुम्ही चौघे आणि दोन्ही मुलांसाठी काहीतरी देईल. ती वस्तू सतत तुम्हा सगळ्यांच्या शरीरावर असली पाहिजे ह्याची तुम्ही काळजी घ्या. आणि हो संगीतावर अजिबात चिडू नका तिच्या आई असण्याचा फायदा घेतला जातो आहे. आपण कुणी जर चिडलो तर ती अजून त्या लोकांच्या प्रभावाखाली जाईल. स्वराला शक्यतो लांब ठेवा. सध्या तरी तिची काळजी करण्याची गरज नाही पण बारीक लक्ष असू दे. काळजी घ्या. मी आहे काही वाटलं तर कळवा.” इतकं बोलून त्याने फोन ठेवला. 

त्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती आता काकांच्या लक्षात आली होती. पण सरळ सरळ जर काही बोललं गेलं असतं तर गोष्टी हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणूनच काकांनी शांत रहाण्याचं ठरवलं. 


दोन दिवसांनी श्रीपादने सांगितल्याप्रमाणे तो माणूस आला. त्याने हातातली पिशवी काकांकडे दिली आणि त्यांना सर्व काही सांगितले. इकडे तिकडे बघत असतानाच त्याची नजर एका बंद दरवाज्याकडे गेली. ते बघताच काका म्हणाले, “ती अडगळीची खोली आहे. जास्तीच नको असलेले सामान असतं तिथे.” तो त्यांच्यासोबत आत गेला मागच्या वेळी ज्या काही वस्तू श्रीपादला सापडल्या होत्या त्या त्याच ठिकाणी त्याला पुन्हा सापडल्या. त्याने त्या सोबत घेत काकांना काळजी करू नका असे सांगितले. जाता जाता घराकडे एक नजर टाकत तो काहीतरी पुटपुटला आणि काकांना म्हणाला, “सगळ्या खोल्यांमधून तुळशीपत्र घेऊन दिलेले गंगाजल शिंपडा. सगळं नीट होईल. ते पाठीशी आहेत.” देवघराच्या दिशेने नजर जाताच त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचे हसू आले आणि निरोपाचा हात वर करुन तो बाहेर पडला. तो गेल्यावर काकांनी पिशवी उघडली त्यात काही दोरे विशिष्ट वेष्टनात गुंडाळलेले होते. आणि एक छोटा गडू होता ज्यात गंगाजल होते. सर्व काही पादुकांसमोर ठेवून त्यांनी नमस्कार केला. 

संध्याकाळी दिवेलगणीच्या वेळी प्रत्येकाला त्याच्या वाटेची गोष्ट त्यांनी दिली, मुलांना स्वतः बांधली. स्वरा समीरसोबत खेळण्यात गुंगली. काका तिथेच बसून तिच्याकडे बघत होते. समीरचा स्वरावर खूप जीव होता पण फोनवरून ऐकलेल्या गोष्टीनंतर काकांना कुणाचाच भरवसा वाटत नव्हता. असं काय ऐकलं होतं त्यांनी? 


“संगीता, आम्ही जे सांगतोय ते कळतंय न तुला?”
संगीताच फोनवर आहे असं वाटल्याने समोरच्या व्यक्तीने थेट बोलायला सुरुवात केली होती. काकांनीही फक्त हुंकार भरत ऐकणे सुरू ठेवले. “हे बघ ती मुलगी तुला आणि तुझ्या नवऱ्याला खूप मोठया संकटात टाकेल भविष्यात. तू जरी तिला जन्म दिला असला तरी ती कोण आहे हे तुला कळलेच असेल, तेव्हा सावध राहा, तिला दूरच ठेव.” 

आणि बरंच काही बोललं गेलं. बोलणाऱ्याच्या आवाजात असे काही वजन होते की काकाही काही वेळासाठी संभ्रमित झाले. संमोहित करून संगीताला वापरून घेण्यासाठी हे केले जाते आहे हे जसे काकांना लक्षात आले, तसे त्यांनी ते श्रीपादला कळवले आणि त्या गोष्टीला आळा बसला. 

ही घटना घडून आता वर्षाचा कालावधी उलटून गेला होता. त्या उपायांमुळे संगीता पुन्हा पहिल्यासारखी प्रेमाने स्वराचं सगळं करत होती. काकांनी नकळतच सुटकेचा निश्वास सोडला. 

इकडे शहरात विजयच्या घरी सगळे जण जमले होते. कसलं तरी प्लॅनिंग करणं सुरू होतं. 

श्रीपादला आणि भास्करला त्याची पुसटशी कल्पना नव्हती. श्रीपादला फक्त ठराविक तारखेला वाड्यावर ये महत्वाचं बोलायच आहे असा निरोप श्रीधरच्या मार्फत दिला होता. तो ही गोंधळात पडला की आता काय नवीन समोर येणार. तसाही तो कैवल्यला घेऊन जाणारच होता काही कारणाने. त्यामुळे त्याने आणखी दोन दिवस जास्त सुट्टी घेत जायचं ठरवलं.

माई आणि काकांना मात्र ह्या सगळ्याचा पत्ताच नव्हता. ते त्यांच्याच विश्वात मग्न होते. पण सकाळपासून दोघांनाही कसलीतरी हुरहूर वाटत होती. काय ते काही समजत नव्हतं. शेवटी न राहवून काकांनी एकेक करून सगळ्या मुलांना फोन लावला तर कुणी ऑफिसमध्ये कुणी बाजारात कुणी मुलांच्या शाळेत असे निरोप मिळाले. शेवटी निदान सगळे ठीक आहेत अशी मनाची समजूत घालत दोघे शांत बसले. 

संध्याकाळी संगीता आणि भास्करही मुलांना घेऊन कुणाच्या तरी घरी कार्यक्रम आहे म्हणून बाहेर गेले. शक्यतो वाड्यात एकटं राहण्याची वेळ माई काकांवर कधी येतच नसे. त्यामुळे आज रिकामा वाडा त्यांना अगदी खायला उठला. 

दिवेलगणीची वेळ झाली म्हणून माईनी देवासमोर दिवा लावला आणि त्या कुठली तरी भाजी निवडायला घेऊन काका बसले होते तिथेच येऊन बसल्या. तेवढ्यात अचानक लाईट गेले. देवघरातील आणि तुळशीपुढचा दिवा सोडला तर मिट्ट काळोख झाला. 

काकांनी दारातून बाहेर बघितले तर सगळीकडे वीज आहे असे त्यांच्या लक्षात आले. मग वाड्यातलीच कशी काय गेली? विचार करत ते आले माईही जागेवर नव्हत्या. आता ही कुठे गेली म्हणत काका आत जाऊन त्यांना शोधू लागले. अंधारात काही दिसत नव्हते त्यामुळे माईना एक दोन वेळा आवाज देऊन बघितला. पण काहीच उत्तर नाही म्हटल्यावर काका जरासे घाबरले. बाहेर जावे तर आता तुळशीजवळची पणतीही वाऱ्याने शांत झाली होती. काळोख जरा जास्तच गडद झाला. 

तेवढ्यात बाहेरच्या मोकळ्या जागेत काहीतरी हालचाल होते आहे असे काकांना जाणवले. त्यांनी एकदम शांतपणे हात लांबवून बसण्याच्या जागेजवळच असणारी काठी उचलली. ते वळाले आणि एक सावली जवळून गेल्याचे त्यांना जाणवले. कुजूबुज ज्या दिशेने येत होती ते त्या दिशेने हळूहळू पुढे सरकू लागले तेवढ्यात घरात काहीतरी भांडे पडल्याचा आवाज आला. काठी धरलेला हात खाली घेत काका स्वयंपाक घराच्या दिशेने गेले. तिथे काहीच पडले नव्हते असे कसे काय झाले काकांना नकळतच भीती वाटू लागली.

 ते पुन्हा बाहेर आले तुळशीजवळच पोहोचले होते तेवढ्यात वीज आली आणि समोरचं दृश्य बघताच त्यांचे डोळे विस्फारले गेले.......

काय होतं समोर? ते कळेलच पुढच्या भागात तोपर्यंत मजेत रहा चांगले विचार, चांगली माणसं ह्यांचं अनुकरण करा. मनासोबतच फोन स्वच्छ करत जा म्हणजे नकारात्मक फोटो वगैरे काढून टाका . . 
_____________________________________
प्रतिक्रियांची वाट बघत आहे. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

कालाय तस्मै नमः (भाग ४ -६)

कालाय तस्मै नमः| भाग ४

आस्तनीतले साप 

श्रीपाद दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधनेच्या खोलीतून बाहेर आला. साधनेच्या वेळी त्याला काही गोष्टींचा अंदाज आला होता त्यामुळे तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. अरुंधतीच्या तब्येतीत फारशी सुधारणा नव्हती. पण वैद्यांच्या औषधांमुळे तिचा त्रास बराच सुसह्य झाला होता. तिच्या तब्येतीची बातमी एव्हाना बाकीच्यांकडे पोहोचली होती. 


झालं गेलं बाजूला ठेवून सगळेजण एकेक करत वाड्यावर येण्यासाठी तयारी करत होते. सगळे येण्यापूर्वीच अरुंधतीला काकांना काहीतरी सांगायचे होते. त्यासाठी तिने श्रीपादला तशी कल्पना दिली. तसे काकांना त्याने सांगितले. त्यांनाही अंदाज आला होता. ते अरुंधतीच्या खोलीत गेले. जिला बघताक्षणी महालक्ष्मीचा भास काकांना होत असे, ती अरुंधती अगदी कृश अवस्थेत पहुडलेली होती. पण त्या अवस्थेतही तिच्या चेहऱ्यावरचं तेज अजिबात कमी झालेलं नव्हतं. उलट एका वेगळ्या आणि विलक्षण प्रकाशाचं वलय तिच्या आसपास त्यांना जाणवलं. प्रचंड त्रास होत असतानाही ती तो हसतमुखाने सहन करत होती. 


काका शेजारीच असलेल्या खुर्चीवर बसले. डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंना त्यांनी नकळतच टिपण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते समजलेच. 
हळुवार हसत ती म्हणाली, “काका तुम्ही नात्याने जरी माझे सासरे असलात तरी तुम्ही कधीही मला सुनेसारखे वागवले नाही. मीही तुम्हाला सदैव बाबांच्या जागी मानत आले. वयाने आणि मानाने मोठे असूनही तुम्ही माझ्या अटी कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य केल्या तेव्हा तर माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. तुम्ही श्रीपादबरोबरच मलाही माझ्या साधनेबाबत मोकळीक दिली. त्यामुळेच आज खरे तर मी तुमच्याशी बोलू शकते आहे. "

"काका आपल्याशी कुठल्याही नात्यांनी जोडली जाणारी सगळी माणसं काही ना काही देवाणघेवाण करण्यासाठीच आयुष्यात आलेली असतात. काही जण आपल्या प्रगतीत वाटेकरी होतात तर काहीजण फक्त आणि फक्त अधोगती करण्यासाठी आलेले असतात. प्रत्येकाचा मुखवट्यामागचा चेहरा वेगळाच असतो तो सामान्य माणसाला सहसा लवकर समजत नाही कित्येकदा तो समजू नये अशीच त्याची म्हणजे परमेश्वराची इच्छा असते. कारण कोण कुठल्या हेतूने आले आहे हे जर आधीच समजले तर माणसाला ना सुखाची आस राहील ना तो दुःखातून सुटण्यासाठी धडपड करेल. त्यामुळे योग्य ती शिकवण मिळेपर्यंत त्याच त्याच स्वरूपाच्या व्यक्ती भेटत असतात, घटना घडत असतात. त्यातून जेव्हा काय शिकायचं हे समजतं तेव्हाच तो धडा पूर्ण होतो. "

"कालचक्र असतं ते . हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याही कुटुंबात काही अशा विघ्नसंतोषी व्यक्तींनी प्रवेश केला आहे. त्या कोण हे तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य व्यक्तीकडून समजेल. मी ती व्यक्ती नाही. पण त्या वाईट शक्तींच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीमुळे आपल्या सगळ्या कुटुंबाची खूप मोठी हानी होणार आहे. अर्थात हे सगळे त्याने ठरविल्याप्रमाणेच जरी घडणार असले तरी तुम्ही, माई, मी, श्रीपाद एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. "

"माझं जाणं हा माझा ह्यातला सहभाग आहे ह्या जन्मातील, पण माझी आणि त्या शक्तीची लढाई इथेच संपणार नाही. तिला तिच्या चुकांची जाणीव होऊन प्रायश्चित्त करण्याची एक संधी मी जाता जाता देत आहे. जर तसं झालं तर फार बरं होईल आणि मला परतण्याचा मार्ग मोकळा होईल.” 
आश्चर्य वाटून काका तिच्याकडे बघतच होते, 

तेवढ्यात ती पुढे बोलली, “माझा मृत्यू जरी मी स्वीकारला असला तरी त्यासाठी कारण ठरलेल्या व्यक्तीला आणि तिच्यासोबतच कुटुंबालाही त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. माझ्या अशा मृत्यूमुळे ह्या घरात सहजासहजी मुलीचा जन्म होणार नाही. वंशाला जरी दिवा हवा असला तरीही त्याला जगात आणण्यासाठी स्त्रीचीच गरज असते. पण हे शक्य व्हावे यासाठी त्या व्यक्तींसोबतच सर्वांनी दरवर्षी एका ठराविक वेळी कुलदैवताचे दर्शन घेऊन सर्व काही रीतीने करावे. तिथे तिची मनोमन माफी मागावी असे केले तरच ह्या घरात मुलगी जन्माला येईल. "

"तुम्ही कुटुंबप्रमुख आहात काका त्यामुळे हे करून घेणे तुमच्याच हातात आहे आणि गरजेचे आहे. ह्या गोष्टींमुळे भविष्यात घडणाऱ्या घटनांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. कदाचित बराच वेळ लागू शकतो पण होईल नक्की. अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या घरात पहिली मुलगी जी जन्माला येईल ती मी असेन काका. माझं कार्य पूर्ण होण्यासाठी मला परत यावेच लागणार आहे."  

"तसेच माझ्या मृत्यूनंतर ह्यांना आणि कैवल्यला तुम्ही इथे थांबण्यासाठी आग्रह करू नका. मी त्यांना काही विशिष्ट हेतूने दूर जाण्यास सांगितले आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला, ह्या घराला त्यांची गरज असेल ते इथे येतील. कैवल्यला भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तयार करायचे आहे त्यामुळे तो दूरच असेल. "

"तुमची पुण्याई माझ्या पुनर्जन्मातही माझ्या सोबत लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आणि माईंनी खंबीर असणं खूप गरजेचं आहे. मी मागत आहे ते खूप अवघड आहे काका माहिती आहे मला पण अशक्य नक्कीच नाही. ह्या वास्तूला तिच्यात राहणाऱ्या चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी तयार केलं आहे मी. पण त्याच्यात भर घालण्याचे काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते कसं करायचं ते तुम्हाला ठाऊक आहे. "

"माझी एक विनंती आहे ,आज मी जे काही तुम्हाला सांगितलं ते योग्य वेळ येईपर्यंत कुणालाही सांगायचं नाही. योग्य वेळ आली की तसे संकेत तुम्हाला मिळतील आणि कुणाला सांगायचं हेही कळेल. त्याच वेळी त्या वाईट शक्तीच्या प्रभावाखाली कोण आहेत आणि किती जण आहेत हेही उघड होईल. माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी कराल ना?”

अरुंधती काकांकडे बघत म्हणाली. तसे भानावर येत त्यांनी होकार दिला. ते म्हणाले, “खूप मोठी जबाबदारी दिलीस गं मला. तू माझ्या घरात सून म्हणून आलीस तेव्हाच मला तुझ्या रूपाने दैवी शक्ती च्या आगमनाची जाणीव झाली होती. वेळोवेळी तू आम्हाला सावरलंस, वाचवलंस आणि आता आमच्यासाठी स्वतःची आहुतीही दिलीस. तुझे खूप मोठे ऋण आहे आमच्या घरावर. तू जे सांगितलंस ते करून ते ऋण थोडेतरी फेडण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.” 

दिवेलागणीची वेळ झाली होती, त्यामुळे काका खोलीतून निघून सरळ देवघरात गेले. माईंचं दिवा लावून दोन्ही मुलांकडून (अरुंधतीचा कैवल्य आणि संगीताचा समीर) शुभंकरोती म्हणून घेणं सुरू होतं. क्षणभर तिथे थांबून देवाला नमस्कार करून काका बाहेर येऊन बसले. 

श्रीपाद त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, “एक विचारायचं होतं काका. खरं तर परवानगी हवी होती.”
“कशासाठी?”, काकांनी विचारलं. 

“परवा पर्यंत सगळे जण येणार आहेत पण त्याआधीच मला घरात गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. अरुंधतीची तशी इच्छा आहे शेवटची,” असं म्हणत त्याने आवंढा गिळला. काका उसनं हसतच म्हणाले, “मग त्यात विचारतोस काय? कर की. तूच करणार आहेस की नेहमीच्या गुरुजींना बोलवायचे?” 

“मीच करणार आहे तशी मी सुटीची तजवीज केली आहे.” “ठीक आहे. मग बाकी तयारी करण्यासाठी माईला सांग.” हो म्हणत श्रीपाद माईंशी बोलण्यासाठी गेला. काका पुन्हा विचारांमध्ये हरवले. 

येणारा प्रत्येक दिवस घरात आणि नात्यात खूप काही बदलून टाकणार होता, ह्याची जाणीव त्यांना क्षणासाठी अस्वस्थ करून गेली. नकळतच आकाशाच्या दिशेने त्यांचे हात जोडले गेले आणि मुखातून बाहेर पडले, कालाय तस्मै नमः| ......

कुठल्याही व्यक्तीला त्रास सहन केल्याशिवाय काहीच मिळत नाही जर एखादी गोष्ट सहज मिळत असेल तर हे नेहमी लक्षात ठेवावे की कुठेतरी कुणीतरी त्याची किंमत नक्की मोजली आहे आपल्यासाठी, आपल्यावरच्या प्रेमासाठी. 

_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग ५ 

पारायण 

पहाटेच साधना आवरून श्रीपाद खोलीबाहेर आला. माई आणि संगीताची तयारी करून झाली होती. अरुंधतीला थोडंसं बरं वाटत असल्याने ती आज लवकर उठून आवरून बसली होती. 

घरात वेगवेगळ्या पूजा , पारायणे सतत होत असत त्यामुळे त्यासाठी एक विशिष्ट जागा तयार केली होती, जिथून संपूर्ण घराकडे नजर टाकणे शक्य होत असे. आणि वाचनाचा आवाजही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जात असे. 

ह्या जागेच्या अगदी समोर एक खोली होती, जिथे अरुंधतीच्या बसण्याची व्यवस्था केली होती. तिला खूप वेळ बसून राहून ऐकणे शक्य नसल्याने झोपून ऐकता येईल अशी सोय होती. तसेच मधल्या जागेत इतरांसाठी बसण्याची सोय होती. 
           
 देवाला नमस्कार करून श्रीपादने संकल्प सोडत वाचनास सुरुवात केली. वाचनाच्या दरम्यान अरुंधतीला त्रास होऊ लागला, पण त्याची कल्पना त्याला आणि तिला स्वतःला आधीपासूनच होती. माई पूर्ण वेळ तिच्याजवळच बसून होत्या. तिच्या जीवाची होणारी तगमग त्यांना बघवत नव्हती पण दुसरा पर्याय नव्हता. 

खरे तर शक्य तेवढी नकारात्मक ऊर्जा घरातून आणि सगळ्यांमधून बाहेर पडावी म्हणून अरुंधतीनेच हा मार्ग श्रीपादला सुचवला होता. श्रीपादनेही साधना करताना त्याच्या गुरूंना साद घातली, तेव्हा त्यांनीही त्याला संमती देत असं केल्यास होणारा त्रास कमी होईल असं सुचवलं. 


शक्य तेवढं स्वतःला शांत ठेवत अरुंधती सहन करत होती. काही वेळातच वाचन पूर्ण झालं. बाकी सर्व आवरून श्रीपादही अरुंधती जवळ आला. आज तिला खूप त्रास झाला होता, पण पारायण पूर्ण होईपर्यंत हा त्रास कमी होईल अशी अपेक्षा होती. तिचा चेहरा खूप थकल्यासारखा दिसत होता पण तरीही ती समाधानी वाटत होती. थकव्यामुळे तिला झोप लागली तसा तो बाहेर पडला. 

घरातच काही गोष्टी त्याला शोधायच्या होत्या. अडगळीच्या खोलीत बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याला जे अपेक्षित होतं ते सापडलं. आज पहिलाच दिवस असूनही घरातील वातावरणात बराच फरक पडल्याचं जाणवत होतं. संध्याकाळी विजय, अशोक त्यांच्या कुटुंबासह आले.
नुकतेच बाहेरून आल्यामुळे सगळेजण आधी हातपाय धुवून मगच अरुंधतीच्या खोलीकडे आले. ती जराशी ग्लानीतच होती. तिची अवस्था बघून ललिता आणि अश्विनीला रडू आवरलं नाही, त्यांना शांत करत सर्वचजण बाहेर आले. 

विषप्रयोग केल्याची माहिती इतर कुणालाही द्यायची नाही हे आधीच ठरल्याने ह्या सगळ्यांना असाच काहीतरी आजार झाल्याचं सांगितलं होतं. सगळेचजण झालेल्या घटनेने कुठेतरी हादरले होते. सकाळ होता होता श्रीधर आणि मंदाही पोहोचले. 

आज पारायणाचा दुसरा दिवस होता. पण आज घरातील सर्व व्यक्ती हजर होत्या. काका , श्रीपाद दोघांचंही वाचताना बारीक लक्ष सगळ्यांवर असणार होतं. जरी योग्य वेळ आल्यावर ती व्यक्ती कळणार असली तरी मानवी मनाला एकदा एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण झाली की ते त्याला शांत बसू देत नाही हे इथे कळते. श्रीपादने वाचन सुरू केले तसे सगळेचजण एकेक करून येऊन बसले. माई अरुंधतीचा हात हातात घेऊन कालच्यासारख्याच आजही तिच्याजवळ बसल्या होत्या. जसाजसा एकेक अध्याय पूर्ण होत होता, आज अरुंधतीला जास्त त्रास होत होता.

 एक क्षण असा आला की अरुंधतीची शुध्द हरपली. माई आणि संगीताचा एकच गोंधळ उडाला. श्रीपाद वाचन थांबवू शकत नव्हता, पण फक्त एक सेकंदासाठी थांबत त्याने अरुंधतीकडे बघितले. तो पुन्हा वाचू लागला. सगळ्यांचं लक्ष विचलित झालं होतं. पण ह्या गोष्टीचा फायदा घेत त्या व्यक्ती तिथून निसटल्या होत्या. पण कुणीतरी त्यांना जाताना बघितलं होतं. त्यांच्या मध्ये एका बाजूला बोलणं सुरू होतं. 

पहिली व्यक्ती-- बरं झालं तिला चक्कर आली, मला बसवत नव्हतं तिथे. 

दुसरी -- हो न. हा पारायणाचा घाट का घातला ह्या लोकांनी? आधीच माहित असतं तर आपण आलोच नसतो. 

पहिली-- मग काय आता इतक्या दिवसांची मेहनत पाण्यात जाणार आपली. जाऊ दे आपल्या वाटेतला मोठा अडसर दूर होतो आहे हे काही कमी आहे का?

दुसरी--- श्रीपादचे काय करायचं? तो येईलच ना आडवा? 

पहिली-- हं बघू, त्याचंही करू काहीतरी. आता चला पटकन नाहीतर कुणाला तरी शंका येईल. 

इकडे कुणीतरी माईंसमोर पाण्याचा ग्लास धरला. माईनी तो घेत अरुंधतीला पाणी पाजून बसतं केलं. आता तिला बऱ्यापैकी शुद्ध आली होती. 

पाण्याचा ग्लास घेऊन आलेली व्यक्ती मात्र अजूनही आपण जे ऐकलं ते खरं होतं की आपला भास होता ह्या संभ्रमात होती. 


श्रीपादचं वाचन सुरूच होतं. हळूहळू पुन्हा सगळे स्थिर झाले. ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. त्या दोन व्यक्ती ही स्वतःला होणाऱ्या त्रासावर नियंत्रण ठेवत बसण्याचा प्रयत्न करत होत्या. कुणीतरी त्यांना लक्षात येऊ नये अशा पद्धतीने त्यांचे निरीक्षण करत होते. पण श्रीपाद आणि काकांना मात्र ती व्यक्ती सापडलीच नव्हती. 


नकारात्मक गोष्टी किती आणि कोणत्या थराला जाऊन व्यक्तीकडून काय काय करून घेतात हे आता लक्षात आलंच असेल. आपण जेव्हा काहीतरी बाहेरचं आहे वगैरे ऐकतो तेव्हा काय करतो? काही जण विश्वास ठेवतात, काही जण खिल्ली उडवतात. 

हा प्रत्येकाचा अनुभव आणि दृष्टीकोन असतो. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर जितका वाईट प्रभाव तंत्र मंत्र अशा गोष्टींचा असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तो विचारांचा असतो. 
चांगले विचार चांगलं वर्तन घडवून आणतात आणि त्यांचे परिणामही चांगलेच होतात. त्याउलट वाईट विचार वाईट कृतींना प्रोत्साहन देतात त्यामुळे होतं काय वाईट गोष्टी घडतात. आपण मात्र दोष त्याला देत राहतो. 


हल्लीच्याच नाही आधीच्या काळापासून हे असं होत आहे. का? कारण वाईट विचार हे आपली पाठ सहजासहजी सोडत नाहीत, चांगले विचार मनात टिकवण्यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करत रहावे लागते. 

अध्यात्म आणि विज्ञान जर हातात हात घालून आपल्या मदतीला सिद्ध असतील तर त्यांचा योग्य ठिकाणी योग्य पध्दतीने वापर करणं आपल्याला शिकलं पाहिजे. 
उदाहरण द्यायचं तर आपल्याला कधी कधी वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे असा विचार दूर सारण्याऐवजी मन अजून त्यावरच विचार करू लागतं. होतं काय? आपल्याकडूनच नकळत त्या नकारात्मक उर्जेला खतपाणी मिळतं. त्यामुळे सकारात्मक असणं आणि त्यावर टिकून राहणं खूप गरजेचं आहे. 

खूपच तात्त्विक झालं ना? पण काय करणार कथेचा गाभा असाच आहे. माणसाला जोपर्यंत स्वतःमध्ये असणाऱ्या सकारात्मक शक्तीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो कालचक्रात भरडला जातो.

चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माणसाची निवड ठरवते तो चांगला आहे की वाईट. इतरांच्या नजरेत चांगले होण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत चांगले होण्यासाठी प्रयत्न करत रहावे.
_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग ६

अरुंधतीला निरोप

पारायण सात दिवसांचं होतं. सगळा त्रास सहन करत अरुंधती रोज हट्टाने बसण्याचा प्रयत्न करत होती. आज सातवा दिवस होता. उद्यापन ही असणार होतं. 

घरातील सगळ्या स्त्रिया उद्यापनासाठी लागणाऱ्या तयारीत गुंतल्या होत्या. माई अरुंधतीच्या जवळ राहूनच छोटी छोटी मदत करत होत्या. सात दिवसात तिची तब्येत जरा नाजूकच झाली होती. पण चेहऱ्यावर असणारं तेज मात्र काहीतरी वेगळीच जाणीव करून देत होते.
 
त्या दोन्ही व्यक्तींनी आपलं काम आता काही काळासाठी थांबवलं होतं. कारण घरात सुरू झालेल्या परायणामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास काय फटका बसेल ह्याची कल्पना त्यांना त्यांच्या मार्गात मदत करणाऱ्या ‘त्या’ साधकाने दिली होती. 


सध्या तरी शांत राहून जे होत आहे त्याचं निरीक्षण करत रहा आणि मला कळवा असे त्याने सांगितलं होतं. ही व्यक्ती वयाने बरीच वृद्ध होती. आणि अघोरी तंत्र मंत्र साधनेसहच विशिष्ट औषधांचं ज्ञानही तिला होतं. तिनेच ते विष पुरवलं होतं पण ते कुणावर वापरलं जाणार आहे हे तेव्हा त्या व्यक्तीलाही माहित नव्हते. जेव्हा तिला ते कळलं तेव्हा आपण नकळतच एका दैवी शक्तीला त्रास दिला आहे हे तिला जाणवलं. म्हणूनच आता ती त्या सगळ्यांमधून अंग काढून घेत होती. ह्या दोघांना शांत राहण्यास सांगणं हे त्याचं पहिलं पाऊल होतं. 


पण जसं आधीही मी नमूद केलं आहे की खेळ सुरू जरी ह्यांच्या हातून झाला असला तरी तो किती आणि कशी वळणं घेत जाईल हे कुणाच्याही हातात उरणार नाही. 
त्या साधकाने आपल्या परीने प्रायश्चित्त करण्यासाठी सुरुवात केली होती. वाट अर्थातच खडतर असणार होती. त्याचे परिणामही त्याला दिसू लागले होते. वाड्यातले पारायण संपताच तेथील त्या दोघांना ह्या गोष्टीची कल्पना द्यायची आणि हा नाद सोडून द्या असं सांगायचं त्याने ठरविलं. 

इकडे पारायणाची सांगता झाली होती. आरती पूर्ण होऊन नैवेद्य दाखवला जात असतानाच दारावर कुणीतरी आल्याची जाणीव काकांना झाली. 

एक अत्यंत दयनीय अवस्थेतील माणूस दारात उभा होता. एका बाजूला जिथे ब्राम्हणांची पंगत बसणार होती त्या शेजारीच पण वेगळं असं आसन तात्काळ श्रीपादने मांडलं. 

माईंनी लगबगीने तिथे रांगोळीची चार बोटे ओढत ताट मांडलं. काका त्या माणसाला घेऊन आत आले. त्याला हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं आणि त्या आसनावर बसण्यास सांगितलं. तो बसताच इतरांनाही बसण्यासाठी विनंती केली. पहिला घास घेताच त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं. जेवण झाल्यानंतर श्रीपाद सर्वांना दक्षिणा देत नमस्कार करत होता. तो त्याच्या जवळ आला तसे त्याने श्रीपादला अर्ध्यातूनच उठवून मिठी मारली. त्या व्यक्तीच्या शरीराला येत असणारा सुगंध क्षणार्धात श्रीपादला जाणवला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. त्या अश्रूंचा अर्थ फक्त काकांना कळला. 


पारायण सफल झालं होतं. “कुठे आहे ती?,” त्या व्यक्तीने विचारले. श्रीपाद त्यांना घेऊन अरुंधतीच्या खोलीत गेला. आत जाताच त्याने दरवाजा बंद केला. काही वेळाने ते बाहेर पडले. काका त्यांना सामोरे गेले, तसे त्यांनी काकांकडे अत्यंत प्रेमपूर्वक बघितले. ते म्हणाले, “मला माहित आहे की हे सगळं सावरणं जमेल की नाही अशी शंका तुमच्या मनात आहे. पण काळजी करू नका. कितीही अवघड परिस्थिती निर्माण झाली तरी मी सदैव तुमच्या पाठीशी असेन. माझ्या अस्तित्वाची जाणीव वेळोवेळी तुम्हाला होत राहील. अरुंधती आणि श्रीपाद ह्या कुटुंबात आहेत ही सुध्दा माझ्या अस्तित्वाची एक खूणच आहे." काकांच्या मनातले भाव ओळखत ते पुढे म्हणाले, 


“ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या आहेत त्या घडणारच. कालचक्रात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हेच तर कालचक्राचे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यातून जर देवाची सुटका झाली नाही तर मग माणसाची कशी होणार?” 
काकांना जणू काही ते काय बोलत आहेत ते समजले. त्यांनी होकारार्थी मान डोलावली. तेवढ्यात लहानसा कैवल्य तिथे आला.

 त्यांनी त्याला उचलून घेतले तसे त्याने विचारले, “तुम्ही माझ्या बाबांचे मित्र आहात?” त्यांनी हसून उत्तर दिले, “हो आणि तुझाही मित्र आहे. पुन्हा भेटशील न मला?” त्याला खाली ठेवत त्यांनी विचारले. त्यानेही निरागसपणे “हो” असे उत्तर दिले. तसे त्याच्या डोक्यावर हात ठेवत ते काहीतरी पुटपुटले, ते कुणालाही ऐकू आले नाही. 

फक्त शेवटचे कल्याणमस्तु तेवढे श्रीपादला ऐकू आले. 

निरोप घेऊन ते घराच्या बाहेर पडले. आत येताना जी पिशवी हातात होती ती विसरलेली श्रीधरच्या लक्षात आली तसा तो ती देण्यासाठी बाहेरच्या दिशेने गेला. पण वाड्याच्या समोरची वाट पूर्ण रिकामी होती तिथे कुणीही नव्हते. वाड्यापासून मूळ रस्त्यापर्यंत जाण्यासाठी कमीतकमी पाच मिनिटांचा सरळ रस्ता होता त्याला कुठेही फाटे फुटत नव्हते. त्यामुळे तो माणूस कुठे गायब झाला ह्या विचारातच श्रीधर पिशवी घेऊन परत आला.

 प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याने काका आणि श्रीपादला बघितले. त्यांनी त्यालाच ती पिशवी उघडण्यास सांगितले. त्या पिशवीतून दोन छोट्या पादुका त्याच्या हातात आल्या. पण जशा त्या त्याच्या हातात पडल्या तसे त्याला चटका बसल्याची जाणीव झाली. त्याने पटकन त्या श्रीपादच्या हातात दिल्या. आणि तो लगबगीने आत निघून गेला. आत गेल्यानंतर त्याने थंड पाण्यात आपले हात बुडवले. मग त्या हाताकडे बघितले त्यावर एका पादुकेचा आकार हुबेहूब उमटला होता. जणू काही ते त्याला जाणीव करून देत होते की तू जे काही करायचे ठरवत आहेस ते विचारपूर्वक ठरव. त्याचे परिणाम ह्यापेक्षा भयंकर असतील. 


श्रीधरच ती व्यक्ती होता ज्याने त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. पण मग त्याला चटका का बसला? कारण ते बोलणे ऐकल्यानंतर हळूहळू श्रीधरच्या मनातही तसेच विचार येऊ लागले होते. आणि तो त्या व्यक्तींना सामील होण्याच्या मार्गावर होता. म्हणूनच त्याला ही सूचना मिळाली होती. आता त्यातून तो काय धडा घेणार की तो त्या मार्गाने जाणार हे तर येणारा काळच ठरवणार होता. 


दुसरीकडे त्या दोन व्यक्ती तशा अस्वस्थच होत्या. पण त्याचं कारण वेगळं होतं. त्या साधकाने त्यांना रात्री उशीरा भेटण्यासाठी बोलावलं होतं. घरातून निसटायचं कसं ह्यावर त्यांच्या डोक्यात विचार सुरू होते. 

रात्री निजानीज झाल्यानंतर त्या दोन्ही व्यक्ती घराबाहेर पडल्या आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या. 

तो साधक आधीच तिथे येऊन बसला होता. त्याला बघताच नकळत त्यांच्या दोघांच्या मनात चर्र झालं. त्याची अवस्थाच अशी झाली होती. 


तो बोलू लागला, “तुम्ही मला फसवून माझी मदत घेतलीत. मला दैवी शक्ती विरुद्ध वापरले म्हणून आज माझी ही अवस्था झाली आहे. नीट बघून घ्या, मी आता काही दिवसांचाच सोबती आहे. तुम्हीही हा मार्ग सोडून द्या अन्यथा तुमचे हाल माझ्यापेक्षा वाईट होतील.” 


तसे त्या दोघांच्या मधील एक जण बोलला, “इतक्या फालतू गोष्टीसाठी तू आम्हाला बोलावलंस? आम्हाला चांगलंच माहिती आहे आम्ही काय करत आहोत आणि कुणाच्या विरोधात करत आहोत. तुला नसेल मदत करायची तर नको करुस आता आम्हाला इतकं ज्ञान नक्कीच मिळालं आहे की आम्ही स्वतः पुढच्या गोष्टी करू शकतो.” 


तो फिकटसा हसला आणि म्हणाला, “अर्धवट ज्ञान नेहमीच भयंकर परिणाम करतं. पण काय करणार विनाशकाले विपरीत बुद्धी.” आणि निघून गेला. 


तो गेला त्या दिशेने बघत त्या व्यक्तीही क्षणभर तिथे थांबल्या आणि वाड्यावर निघून आल्या. त्यांना परत येताना श्रीधरने बघितले होते. पण सध्या तरी तो गोंधळात पडला होता. 

एकीकडे त्याला फायदे दिसत होते तर दुसरीकडे होणारे तोटे. 

श्रीपाद मात्र ह्या सगळ्यांमधून लक्ष काढून घेऊन अरुंधतीच्या उशाशी बसला होता. खोलीत आल्यावर त्याने त्याचे खरे रूप प्रकट केले होते. 


तो अरुंधतीच्या भेटीला आला म्हणजेच आता अरुंधतीची जाण्याची वेळ जवळ आली हे नक्की होते. जाता जाता त्याने पादुकाही दिल्या होत्या. त्याचाच अर्थ श्रीपादच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण होत आले होते. आता नवीन अध्यायाला सुरुवात होणार होती. हा अध्याय किती आणि काय काय रहस्य घेऊन येणार होता हे एक रहस्यच होते. 

हातात असणारा अरुंधतीचा हात थंड पडलेला श्रीपादला जाणवले. त्याच वेळी काकांच्या गंभीर स्वरातला तारक मंत्र त्याच्या कानावर पडला, काकांना जेव्हा जेव्हा भीती वाटत असे किंवा वाईट घटना घडणार आहे असे वाटे तेव्हा ते मनाला शांत करण्यासाठी तारक मंत्र म्हणत असत. 

नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,

जिथे स्वामीपाय तिथे न्यून काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,

उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा.

खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगू स्वामी देतील साथ,

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

काकांच्या मनातली भीती खरी ठरलेली त्यांना कशी सांगावी हेच त्याला सुचेना. 

श्रीपाद शांतपणे काकांच्या समोर येऊन पायाजवळ बसला. त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू त्यांच्या पायांवर पडले. तसे त्यांनी अरुंधतीच्या खोलीकडे धाव घेतली. थोड्याच वेळात बातमी सगळीकडे गेली. 

सगळेजण दुःखात बुडाले होते. त्या व्यक्तीही वाईट वाटल्याचे दाखवत होत्या पण मनोमन मात्र त्यांना आनंद झाला होता. असतात अशीही माणसं. 

फक्त टीव्ही मालिकेत नाही तर ह्या खऱ्या खऱ्या जगात असतात. पण खऱ्या आयुष्यात त्यांचे मुखवटे सहजासहजी उतरत नाहीत त्यामुळे समजून येत नाही. असो. 

तोपर्यंत मनाला सकारात्मक विचारांकडे वळवत रहा. कितीही दुःखं, संकटं आली तरी खचून जाऊ नका माणसाने मदत नाही केली तरी आपल्या स्वतःमध्ये वास करणारी ती शक्ती आपल्याला नेहमीच योग्य मार्ग दाखवते. तेव्हा आपल्या आतल्या आवाजाला ऐकण्याचा प्रयत्न करा. 

अवघड आहे अशक्य नक्कीच नाही. आणि स्वामी आहेत ना अशक्य ते शक्य करण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी त्यांची नावं जरी वेगळी असली तरी ते कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या मदतीला नक्की येतात. गरज असते ती स्वतःवर आणि त्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची.

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु !!! 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

कालाय तस्मै नमः (भाग १ - ३)

मनोगत 
कालाय तस्मै नमः ही माझी पहिलीच दीर्घ कथा. ह्या कथेला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळाला. 

कालाय तस्मै नमः लिहिताना एका कुटुंबाची प्रत्यक्ष कथा डोळ्यासमोर होती. पण कथास्वरुपात मांडत असताना मला अंधश्रध्देला खतपाणी घालणारी कथा नको होती. 
रहस्य कथा, भयकथा म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर जनरली जी दृश्य येतात तस काही तुम्हाला या कथेत सापडणार नाही. मग काय सापडेल? 
माणसाच्याच आत दडलेली एक वृत्ती... कधी ती चांगली असेल तर कधी वाईट किंवा अगदी दुसऱ्याचा जीव घेण्याइतकी क्रूर. 

जिथे ह्या जगात वाईट गोष्टी आहेत तिथेच चांगल्या गोष्टी ही अस्तित्वात आहेत हे मला ह्या कथेच्या माध्यमातून मांडायच होतं आणि कुठेतरी त्यामध्ये मी सफल झाले आहे अस मला वाटतं. 

कालाय तस्मै नमः ह्या कथेचा विषयच मुळात वेगळा होता. अध्यात्मिक रहस्यकथा... खरे तर अध्यात्म या विषयात इतकी रहस्य दडलेली आहेत की माणसाला एक आयुष्य पुरणार नाही. 
ह्याच वळणाने जाणाऱ्या अजूनही काही कथा लवकरच तुमच्या भेटीला आणत आहे. 
आजपर्यंत माझ्या लेखनावर तुम्ही वाचक मित्रमैत्रिणींनी जो विश्वास दाखवला तो असाच पुढेही असुदे. 

गौरीहर्षल 
सौ. गौरी हर्षल कुलकर्णी 
____________________________________

कालाय तस्मै नमः
अनुक्रमणिका (पर्व पहिले)  
   प्रस्तावना
१. आनंदाचे डोही
२. सुखाच्या हिंदोळ्यावर
३. अरुंधती आणि श्रीपादची गोष्ट
४. आस्तनीतले साप 
५. पारायण
६. अरुंधतीला निरोप
७. भूतकाळात फेरफटका
८. संमोहन
९. सरप्राइज
१०. खेळ मनाचे
११. ललिताच्या अचानक येण्यामागचे रहस्य
१२. जाणीव स्व- अस्तित्वाची
१३. कैवल्यचे आगमन
१४. साधनेतील संकेत 
१५. शेवट
१६. वाचकांशी हितगुज
१७. स्वरा आणि कैवल्य ह्या बहिणभावाच्या जोडीचा नवीन प्रवास
____________________________________


कालाय तस्मै नमः| 

प्रस्तावना 

जगात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. खरं तर वाईट असतं म्हणूनच चांगल्या गोष्टी, व्यक्ती ह्यांची किंमत माणसाला कळते.

 युगानुयुगे चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींच्या अलिखित चढाओढीवर तर जग चालते. कधी चांगल्याची सरशी होते तर कधी वाईटाची. माणसाची मनोवृत्तीही ह्या दोन्ही रंगांना दाखवते. जसं एखादा माणूस पूर्णपणे चांगला नसतो तसाच तो पूर्णपणे वाईटही नसतो. मनस्थिती कशी आहे हे नेहमी त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. 


प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणती बाजू कधी वरचढ ठरणार हे प्रत्यक्ष त्या व्यक्तीलाही सांगता येणार नाही. 
आता माणूस म्हटलं की भावनांची गुंतागुंत तर असणारच. एका बाजूला प्रेम,माया,आपुलकी,जिव्हाळा आहे तर दुसरीकडे द्वेष, राग, तिरस्कार, वैरभावनाही आहे. कुणाला तरी आजूबाजूचं सगळं जग सुंदर दिसतं तर कुणाला मात्र त्या जगाबद्दल खूप तक्रार आहे. हा प्रश्न आहे मनोवृत्तीने निर्माण केलेला. 

चांगल्यातून वाईट शोधायचं की वाईटातून चांगलं हे ठरवणं फक्त माणसाच्या हातात आहे.असो
 तर अशाच काही गोंधळातून एक दिर्घकथा साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिलाच प्रयत्न आहे पण आवडेल ह्याबद्दल खात्री आहे. 

वरती म्हटल्याप्रमाणे सुष्ट आणि दुष्ट दोन्ही शक्ती त्यांच्या वेगवेगळ्या रुपात ह्या कथेत भेटतील. प्रसंगी त्या एकमेकांना हरवण्याचा प्रयत्नही करतील. 
कालचक्रात अव्याहत सुरू असणारा खेळ इथेही खेळला जाणार आहे. फक्त तो खेळ ज्यांनी सुरू केला आहे तो संपवणे आता त्यांच्या हातात उरले नाहीये तर ते त्या "काळाच्या" हातात आहे. 

ह्या खेळात निष्पाप जीवांचे बळी जातील की तेच आपल्यामधील चांगल्या शक्तीला जागे करून खेळात उतरतील ते तर वाचल्यावरच कळेल. अर्थात ते ही त्या काळाच्याच हातात आहे.
म्हणूनच तर म्हटले जाते न "कालाय तस्मै नमः" 

म्हणजेच सगळं जग या काळाच्या अमलाखाली असतं. काळ जसा सुखाची आस लावतो तसा दु:ख विसरायलाही मदत करतो. प्रत्येकाचं आयुष्य काळाशी बांधलेलं आहे. काळ विकता किंवा विकत घेता येत नाही. काळाला दुसरा पर्याय नाही. काळ देतो आणि नेतोही. 

हिंदीत एक म्हण आहे “समय से पहले और जरुरत से ज्यादा कुछ नाही मिलता“, म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीची वेळ येईल तेव्हाच ती घडेल. वेळेच्या आधी नाही आणि नंतरही नाही. केवळ ती योग्य वेळ येण्याची वाट बघणं आपल्या हातात असतं. जेव्हा अशी वाट बघण्याची पाळी येते तेव्हा म्हणावंच लागतं “कालाय तस्मै नम:”

वाचत रहा आणि साक्षीदार व्हा सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या अतर्क्य घटनांचे. 
____________________________________
कालाय तस्मै नमः| भाग १

आनंदाचे डोही 

आज गायत्रीच्या मागे भरपूर कामं होती. असणारच कुलकर्णींच्या घरातली मोठी लेक होती ती आणि आता तिचं हवंहवंसं प्रमोशनही झालं होतं. एका गोंडस परीची आत्या झाली होती ती. गायत्री आणि तिच्या सगळ्या भावंडांच्या पिढीनंतरच्या पिढीत जन्माला आलेली पहिली मुलगी. 

खूप नवस सायास केले गेले होते मुलगी जन्माला येऊन जगावी ह्यासाठी त्यांच्या घरात सगळ्यांनीच.कारण घरात मुली जन्माला येत होत्या पण महिन्याभराच्या आतच त्या पुढच्या प्रवासाला निघून जात होत्या. शेवटी कुलदेवतेच्या आशीर्वादाने घरात मुलगी जन्माला आली आणि ती जिवंतही राहिली. आज तिच्याच बारश्याची लगबग सुरू होती. जवळपास सगळे जण आपापल्या कामातून वेळ काढून हजर झाले होते, तरीही त्यांची उणीव आज सगळ्यांनाच भासत होती.  

माई आणि काका म्हणजेच सरस्वती आणि रामचंद्र कुलकर्णी. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुलकर्णी वाड्याचे मालक. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही परंपरागत गोष्टींचे वंशज. कुटुंब तसे सुशिक्षित आणि सधन होते. माई अन् काकांना एकूण आठ मुले - ५ मुलगे ३ मुली.

माईंना म्हणजे सरस्वतीला गावात सगळेच जण माई म्हणूनच ओळखत होते. 
काकांशी लग्न करून त्या ह्या गावात आल्या आणि इथल्याच झाल्या. सासरच्यांनाच नाही तर सासरच्या गावाला आणि गावातल्या लोकांनाही त्यांनी आपलंसं केलं. स्वतःच्या सासुसासऱ्यांच्या पावलांवर पाऊल टाकत माईंनी कुलकर्णी वाड्याची माणसं जोडण्याची परंपरा कायम ठेवली होती. 
त्याही अगदी पहिल्यापासून सगळ्यांशी गोड हसून मायेने बोलणार, दारात आल्यागेलेल्या प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करणार, गावात नवीन लग्न करून आलेली कुठली सून जर माईंना भेटली तर तिला त्यांच्यात स्वतःच्या माहेरचं माणूस भेटल्याचा भास व्हायचा. गावातल्या कितीतरी बायबापड्या घरात कुरबुरी वाढल्या की गाऱ्हाणं घेऊन माईंकडे येत होत्या. 

माईसुद्धा सासुसूनेच ऐकून घेत दोघींनाही योग्य ते मार्गदर्शन करत. त्यांची बोलण्याची पद्धतच अशी होती की सासूला वाटे आपलं म्हणणं सुनेला पटवून दिलं माईंनी अन् सुनेला वाटायची सासूला समजावून सांगितले. समाधानाने एकमेकींसोबत घरी जाणाऱ्या त्या दोघींना बघणाऱ्या माईंच्या चेहऱ्यावर अजून एक घर मोडताना वाचवल्याचा आनंद असे. आणि तो आनंद त्यांना अजूनच जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा देत असे. तर अशा ह्या माई अगदी काकांना अनुरूप होत्या. काकांच्या सगळ्या चांगल्या वाईट परिस्थितीत त्या काकांच्या सोबतीने खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या आणि त्यामुळेच काका प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला आवर्जून घेत असत. 

दुसरीकडे काका म्हणजे रामचंद्र कुलकर्णी , आपल्या छोट्याशा गावात आणि नोकरीत अगदी समाधानी वृत्तीने जगणारा स्वाभिमानी माणूस. अडीअडचणीला कुणी मदत मागितली तर धावून जाणार आणि यथाशक्ती त्या व्यक्तीला मदतही करणार हे संस्कार त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केले होते आणि तेच त्यांनी आपल्या मुलांना भरभरून दिले होते. आठही मुलांना आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे करावं लागलं ते सगळं काकांनी केलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज सगळी मुलं आपापल्या क्षेत्रात कार्यरत होती. त्यांचे संसारही काकांनी योग्य वयात मांडून दिले होते. आणि काळानुसार मुलांचं लांब जाणंही मान्य केलं होतं. कारण संपत्तीच्या नावावर काकांकडे फक्त वाडा आणि त्यांची पेन्शन एवढंच होतं. त्यामुळे मुलांना जेव्हा उडण्याची संधी मिळाली त्यांनी आणि माईंनी स्वखुशीने मुलांना जाऊ दिलं होतं. 

माई-काकांचा चार नंबरचा मुलगा भास्करने मात्र पत्नी संगीता आणि मुलगा समीरसह गावातच रहाण्याचा निर्णय घेतला होता. गावातल्या शाळेतच तो शिक्षक होता. त्यामुळे त्याला माई-काकांसोबत राहून त्यांची काळजी घेणे शक्य होते. संगीताही एकत्र कुटुंबातील असल्याने इथेही माणसं सांभाळणं तिला जड जाणार नव्हतंच. उलट नवऱ्याचा निर्णय हसत हसत स्वीकारून ती त्याच्या जोडीने सगळं मनापासून निभावत होती. माईंच्या तालमीत संसाराचे धडेही गिरवत होती. माई काकांच्या सोबत असल्याने तिला समीरची कधी काळजीच करावी लागत नव्हती. कारण बाकीची नातवंडे फक्त सुट्टीत भेटत असल्याने त्या सगळ्यांच्या वाट्याची माया इतरवेळी फक्त समीरला मिळत असे. पण फक्त मायाच नाही त्याच्यावर उत्तम संस्कारही आपसूकच होत होते. 

एकूणच काय चारचौघांसारखं हे कुटुंबही सुखदुःखात एकत्र येऊन,थोड्याफार रुसव्याफुगव्यांसह पुन्हा आपापल्या मार्गाने जात आयुष्याशी जुळवून घेत होतं. पण ....

सगळी मुलं जरी लौकिकार्थाने आपापल्या संसारात रमली असली तरी काकांना मात्र कुठेतरी काहीतरी सतत राहून जातंय असं वाटत होतं. कारण कुलकर्णी कुटुंबाच्या ह्या तिसऱ्या पिढीत मुलगीच जन्माला आली नव्हती. अशातच संगीताला पुन्हा दिवस गेल्याची बातमी माईंनी ज्या दिवशी त्यांच्या कानावर घातली. नकळतच त्यांचा चेहरा इच्छापूर्ती होणार असल्याच्या आशेने उजळला. देव्हाऱ्याकडे बघून मनोमनच त्यांनी देवाचे आभार मानले. दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने सरत होते. आणि आज तो दिवस आला होता.....
मुलगी जन्माला येणं हे काकांसाठी खूपच विशेष होतं. का ते कळेलच हळूहळू. 

बारशाच्या निमित्ताने काकांची सगळी मुलं एकेक करून वाड्यावर आली होती. आता इतकं मोठं कुटुंब म्हटलं की रुसवेफुगवे भांड्याला भांडं लागणं हे ओघाने आलंच. 
त्यात ज्या गोष्टीची माई आणि काका इतकी वर्षे वाट बघत होते ती नेमकी संगीतामुळे घडली. ती गावात राहत होती म्हणून तसं त्यावरून तिला इतरांचे टोमणे ऐकावे लागतच होते. बाकीच्यांना आता मुलं होणारच नाहीत अशी काही अवस्था नव्हती पण तरीही परीक्षेत पहिल्या येणाऱ्यावर जळणं स्वाभाविकच असतं. असो.

एकीकडे बारश्याची जय्यत तयारी सुरू होती. दुसरीकडे कुणीतरी सगळ्यात विघ्न आणण्यासाठी तयारी करत होतं. 
हे सगळं झालं, पण उत्सवमूर्ती कुठे आहेत ते बघू आपण. जिच्याबद्दल सगळं होत होतं ती मात्र मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ करून झोळीत गुडूप झाली होती. तशी आता ती २ महिन्यांची झाली होती. त्यामुळे आवाज आला की कान लगेच टवकारले जात आणि मग काय एकेक कार्यक्रम सुरू. तिची आजी म्हणजे माई तिच्या अवतीभवतीच होती. 

सगळं छान घडत असताना मात्र माईंनी काकांना आपल्या मनातली हुरहूर बोलून दाखवली होती. 
बाकीचे सगळे आपल्या कुटुंबासह आले असले तरी त्यांना मात्र अजून कुणाच्या तरी येण्याची आस होती. ती व्यक्ती येईल की नाही त्यांना काहीच कळत नव्हतं. पण आजच्या दिवशी त्या व्यक्तीने इथं हजर असावं असं मात्र त्यांना राहून राहून वाटत होतं. 

आज मोठे तर मोठे पण घरातल्या लहानांचा उत्साहही ओसंडून वाहत होता. 
वाड्यात मध्यभागी जी मोकळी जागा होती तिथे बारश्याची तयारी केली होती. मध्यभागी छानसा सजवलेला पाळणा होता. आजुबाजुला सगळ्या आलेल्या पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था होती. हळूहळू लोक यायला सुरुवात झाली. काकांचा आणि माईंचा गोतावळा भरपूर होता. त्यामुळे बारसं नाही म्हटलं तरी दणक्यात होत होतं त्या काळच्या मानाने.

बाळालाही तयार करून बाहेर आणलं होतं. सगळेजण कौतुकाने तिला न्याहाळत होते. तीही टपोऱ्या डोळ्यांनी टुकुटुकु इकडे तिकडे बघत होती. बाळाच्या मोठ्या आत्याने गायत्रीने बाळाला पाळण्यात घातले. आणि सुरू करू का म्हणून विचारण्यासाठी ती माईंकडे वळली. तर माई एकटक वाड्याच्या दरवाज्याकडे बघत होत्या. माई काय बघत आहेत म्हणून सगळ्यांच्याच माना तिकडे वळल्या. 

वाड्याच्या दरवाज्यात दोन जण उभे होते. 

"श्रीपाद",माईंच्या तोंडून नकळतच हाक बाहेर पडली. 

 सहा फूट वगैरे उंच, मध्यम शरीरयष्टी, गोरापान पण रापलेला वर्ण पण वेगळ्याच तेजाने उजळलेला चेहरा आणि डोळे अगदी मनाचा ठाव घेणारे. त्यांच्या हातात हात धरून त्यांचीच छोटीशी प्रतिकृती उभी होती. माई काका दोघेही डोळ्यात येणाऱ्या अश्रूंना कसेबसे थोपवत होते. शेवटी दोघेही त्याच्या दिशेने चालू लागले. ह्या सगळ्या मध्ये एक व्यक्ती अशीही होती जिला त्या दोघांचं येणं आवडलं नव्हतं. 

कोण आहेत हे दोघे ?? ज्यांच्या येण्याने घरात जणू काही उत्साहच भरला होता. त्या दोघांच्या येण्याने वातावरणात तयार झालेली सकारात्मक ऊर्जा बाहेरून आलेल्या लोकांना ही जाणवत होती. का कुणास ठाऊक पण प्रत्येकाला असं वाटत होतं की आता आपल्या आयुष्यात खूप काहीतरी छान घडणार आहे.


कालाय तस्मै नमः| भाग २

सुखाच्या हिंदोळ्यावर

माई आणि काका त्या दोघांना डोळे भरून बघत होते. तेव्हढ्यात संगीताने आत जाऊन ओवळण्यासाठी भाकरी तुकडा आणि पाणी आणलं. माईंनी तिलाच ते करायला लावलं. आनंदाने तुकडा ओवाळून दोघांच्या पायावर पाणी घालत ती बाहेरच्या दिशेने गेली. ती परत आली तरीही ते तसेच उभे होते कारण माईंना आनंदाच्या भरात काही सुचतच नव्हते. 

भास्कर ज्याच्या लेकीचं बारसं आहे तो मागून येत म्हणाला, “दादा ये ना रे आत. तुझीच उणीव भासत होती. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय.” हसून त्याच्याकडे बघत त्याने मुलाचा हात धरूनच आत उजवा पाय टाकला. तसेच समोरच उभ्या असलेल्या माई आणि काकांना वाकून नमस्कार केला. त्या छोट्यानेही तसंच केलं तसं काकांनी त्याला पटकन उचलून घेत छातीशी कवटाळलं. 

सगळीच भावंडं आसपास गोळा झाली होती. सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू होते. का असणार नाहीत तब्बल चार वर्षांनी तो परत आला होता. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत माई जणूकाही तो खरोखरच आला आहे ह्याची खात्री करून घेत होत्या. तसा गोड हसत तो माईंना म्हणाला, “माई, अगं मी खरंच आलो आहे. तुला दिलेला शब्द कसा मोडेन मी?”
तशा त्या समाधानाने हसल्या. तरीही एक अश्रू गालावर ओघळलाच. एका हाताने माईंना जवळ घेत तो त्यांना आश्वस्त करत होता. 
 
तो ‘श्रीपाद’ माई काकांचा थोरला मुलगा. नावापुरता मुलगा होता तो त्यांचा. कारण समजूतदारपणा इतका होता की त्यांना कधीही त्याला काहीच सांगावे लागत नसे. त्याच्या वेगळेपणाची चुणूक त्याने वेळोवेळी दाखवून दिली होती. जन्मजात काही गुण त्याच्या अंगी होते. तो जसजसा मोठा होत गेला तसतसे त्याचं वेगळं असणं जास्तच प्रकर्षाने जाणवू लागलं. त्याच्या चेहऱ्यावर असणारं तेज, धीरगंभीर भाव, बघताच समोरच्याला आश्वस्त करणारा स्वभाव, फार कमी शब्दात योग्य ते मांडण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टींमुळे वयाने मोठया असणाऱ्या व्यक्तीलाही एखाद्या गोष्टीसाठी त्याचा सल्ला घ्यायची गरज वाटत असे. कुणी विचारलं तर तो सांगतही असे. पण ह्या सगळ्यामधून शक्यतो अलिप्त राहण्याचा त्याचा प्रयत्न असे. असो. 

 श्रीपादच्या आयुष्यात पुढे एक वादळ आलं, ज्याचा परिणाम त्याच्या बरोबरच बाकी सगळ्यांच्या आयुष्यावरही थोडाफार झालाच. त्यामुळेच तो गेली चार वर्षे घरापासून दूर गेला होता. सोबत त्याचा मुलगाही होता. ज्याचं नाव होतं ‘कैवल्य’. जो अगदी हुबेहूब श्रीपादची प्रतिकृती होता, पण त्याचे डोळे मात्र त्याच्या आईची आठवण करून देणारे होते अगदी प्रेमळ. जो कोणी बघेल त्याचे सगळे त्रास, दुःख सगळं एका क्षणात विसरेल असं. 

काकांचा असा ठाम विश्वास होता की ही बापलेकाची जोडी काहीतरी वेगळी आहे. आणि त्यामुळेच त्यांनी श्रीपादला कधीही बांधून ठेवलं नाही. 

कैवल्यच्या आईच्या जाण्यानंतर श्रीपादने जेव्हा छोट्याश्या कैवल्य सोबत दूर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा काका आणि माईंनी त्याला मूक संमती दिली होती. पण श्रीपादनेही परत येण्याचं आश्वासन देत निरोप घेतला होता. आणि आज खूप महत्त्वाच्या दिवशी तो परत ही आला होता. 

सगळेच आठवणींच्या विश्वात हरवले होते. तेव्हा गायत्रीने सगळ्यांना आठवण करून दिली की बारश्याचा कार्यक्रम सुरू करायचा का? हसून मान डोलवत सगळे हो म्हणाले. बाळाला पाळण्यात घालून नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा गायत्रीने श्रीपादकडे बघितलं आणि त्यानेही मूक हसत नजरेने संमती दिली. तिने बाळाच्या कानात कुर्रss आवाज करत नाव सांगितलं. 

सगळ्यांनी उत्सुकतेने विचारलं, “काय नाव ठेवलं?” तसं तिने मोठयाने सांगितलं, “बाळाचं नाव आहे ‘स्वरा’. पण ह्या नावाचं विशेष महत्त्व म्हणजे हे तिच्या आजीआजोबांच्या नावातून तयार केलेलं आहे.” असं म्हणत तिने माई आणि काकांकडे बघितलं. सरस्वती आणि रामचंद्र ह्यांची पहिली नात म्हणून स्वरा. सगळ्यांनाच नाव खूप आवडलं. 

अल्पोपाहार झाला आणि हळूहळू आलेली पाहुणे मंडळीही आपापल्या घरी गेली. 

अचानक आलेल्या श्रीपाद मुळे आनंदात विघ्न आणण्याचा प्रयत्न सध्या तरी फसला होता. आपली निराशा लपवत ती व्यक्तीही खुश असल्याचे दाखवत सगळ्यांमध्ये मिसळून गेली. पण कुठेतरी तिच्या मनात अजून काही घोळत होते. 
तिच्या हातात वेळही कमी होता. त्यामुळे कुणाचं लक्ष नाही हे बघत ती व्यक्ती गुपचूप आतल्या बाजूला निघून गेली. 
बाकीचे सगळेजण खूप दिवसांनी भेटत होते आणि त्यातही कैवल्य बऱ्याच वर्षांनी आला होता. त्यामुळे त्याच्या मागे मागे होते. 

स्वरा मॅडम मात्र आजुबाजुला काय घडतंय ह्याच्याशी काही देणंघेणं नसल्यासारख्या पाळण्यात हातपाय आपटत स्वतःच स्वतःचं मनोरंजन करून घेत होत्या. 

श्रीपाद पाळण्याजवळ आला आणि त्याने तिला उचलून घेतले. माई काकाही जवळच उभे होते. त्यांच्याकडे बघत तो म्हणाला, “तिला दिलेलं वचन मी पूर्ण केलं काका. ह्या घरात जन्माला आलेल्या पहिल्या मुलीचं नाव तुमच्या दोघांच्या नावाने ठेवलं.” 

श्रीपाद कडून तिचा उल्लेख झाला आणि सगळ्यांनाच तिची आठवण आली. क्षणभर सगळेच हळवे झाले पण मुलांच्या गोंधळात पुन्हा सावरलेही. 

स्वराच्या निमित्ताने श्रीपाद आणि कैवल्य पुन्हा एकदा वाड्यात आले होते. आणि भविष्यातही स्वराच त्या दोघांना कुलकर्णी वाड्याशी जोडून ठेवणारा दुवा असणार होती. पण अजून तरी सगळे ह्या गोष्टी पासून अनभिज्ञ होते. आणि म्हणतात न अज्ञानात सुख असतं त्यामुळे श्रीपादसुध्दा बऱ्याच गोष्टींची कल्पना असूनही त्या सांगणं टाळत असे. शेवटी भविष्यात घडणारी गोष्ट चांगली असो किंवा वाईट ती तिच्या योग्य वेळेला उलगडण्यातच मजा असते. 

चांगल्या वाईट घटनांचे अनपेक्षित सरप्राईज नेहमीच्या मिळमिळीत आयुष्यात एक इसेन्स एड करत असतात. त्यामुळे तर माणूस आशेचा दोर धरून सगळ्या गोष्टींना सामोरा जातो. 

तर कैवल्य जरी माई आणि काकांचा पहिला नातू असला तरी त्याला घरातल्या लोकांचा सहवास फार कमी मिळाला होता. त्यामुळे बर्‍याच दिवसांनी आपल्या माणसांमध्ये येऊन त्याची कळी खुलली होती. खरंतर तिथे त्याने आईविना मुलगा अशा सहानुभूतीच्या छायेत वाढू नये म्हणूनच त्याच्या आईने म्हणजे श्रीपादच्या पत्नीने त्याच्याकडून शेवटच्या क्षणी त्याला दूर नेण्याचे वचन घेतले होते. 

कैवल्यला मानसिकदृष्ट्या हळवे होऊन चालणार नव्हते, त्यामुळे त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून घेतला गेलेला हा निर्णय अत्यंत योग्य होता. शिवाय आई नसल्यामुळे तिथे त्याच्याकडे फार व्यवस्थित लक्ष दिले जाण्याची शक्यताही कमी होती. माई काका असले तरी इतरांची मुलं घरात होती अशा वेळेला कैवल्यला झुकतं माप दिलं गेलं म्हणून घरात कलह होण्याची शक्यता होती. 

श्रीपादसोबत कैवल्य लवकरच सगळ्यातून बाहेर पडला होता . आईच नसूनही सतत सोबत असणारं अस्तित्व त्याचं व्यक्तिमत्त्व उत्तमप्रकारे घडवत होतं. 

बऱ्याच वर्षांनी भेट होत असल्याने कैवल्य सध्या घरात सगळ्यांकडून मनसोक्त लाड करून घेत होता. इनमिन 7,8 वर्षांचं लेकरू ते त्याला कुणाच्याही मनात काय विचार आहेत ह्याबद्दल काही अंदाज असण्याचा प्रश्नच नसल्याने तो आपल्या सगळ्या भावंडांमध्ये रमला होता. 

पण तिथे असणाऱ्या त्या व्यक्तीची नजर त्याच्यावर होती. त्यात कैवल्यच्या हुबेहूब त्याच्या आईसारख्या असणाऱ्या डोळ्यांमुळे त्या व्यक्तीला आपल्या कृत्याची आठवण सतत होत होती. त्या व्यक्तीला ही गोष्ट मात्र अजून कळली नव्हती की जशी ती कैवल्यावर लक्ष ठेवून आहे तसंच कुणीतरी तिच्याही हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. ज्या क्षणी त्या व्यक्तीला आपल्याकडे कुणीतरी रोखून बघतंय अशी जाणीव झाली त्या क्षणी त्या व्यक्तीने पुन्हा कामाचा बहाणा करत सगळ्यामधून काढता पाय घेतला. 

‘ती’ कोण? कैवल्यच्या आईसोबत असं काय घडलं की श्रीपाद घर सोडून निघून गेला होता? ती व्यक्ती कोण आहे आणि आता ती काय करणार? 

मिळतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं, नक्की मिळतील. पण हळूहळू - क्योंकि सब्र का फल मिठा होता है। तोपर्यंत वाचत रहा...
आणि आपल्या कथेची टॅगलाईन आहे ती विसरू नका "trust me, you get what you give" तेव्हा चांगले विचार आजुबाजुला पसरवत रहा म्हणजे चांगल्याच गोष्टी आपल्याला शोधत येतील. शुभं भवतु!!!
*******************************************
कालाय तस्मै नमः| भाग ३

अरुंधती आणि श्रीपादची गोष्ट

स्वराचं बारसं फक्त थाटामाटातच नाही तर कुठलंही विघ्न न येता पार पडलं म्हणून माई काका दोघेही समाधानी होते. त्यात श्रीपाद आणि कैवल्यच्या येण्यानेही भरच पडली होती. बारसं तसं सुट्टीच्या काळातच असल्याने सगळेजण अजून काही दिवस वाड्यातच असणार होते. त्या काळात फोन इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हते. 

मोबाईल तर अस्तित्वातच नसल्याने सगळे जण मस्त गप्पा मारत एकत्र बसले होते. बच्चेकंपनी धुडगूस घालण्यात गुंग होती. 

काका आणि श्रीपाद एका बाजूला बोलत होते. काका त्याला विचारत होते की तो आता इथेच राहणार आहे ना? त्यावर श्रीपाद म्हणाला, “काका, मी महत्त्वाच्या वेळी आपल्या लोकांसाठी नक्की येईन असा शब्द दिला होता माईला म्हणून आलो होतो. पण सध्या तरी मी इथे राहू शकत नाही. 

कैवल्य पुढच्या शिक्षणासाठी जाणार आहे पुढच्या वर्षी. त्यानंतर कदाचित २-३ वर्षांनी मी इथे कायमचा येईन. पण नक्की काहीच सांगू शकत नाही. हो पण काही गोष्टींची जबाबदारी फक्त माझ्यावर आहे. त्यामुळे वेळोवेळी मी हजर होईनच. खरं तर अरुंधती गेल्यानंतर इथे येण्याची माझी इच्छाच होत नाही पण काय करू तिनेच मला शब्दांत बांधलं आहे.” 

काकांनी त्याच्या हातावर थोपटले आणि हळूच स्वतःचेही डोळे टिपले. 

रात्री उशीरापर्यंत काका विचार करत होते श्रीपादच्या बोलण्याचा. बऱ्याच गोष्टी त्यांच्या नजरेसमोरून आत्ता घडत असल्यासारख्या सरकत होत्या.
     
‘अरुंधती’ - काकांचे जिवलग मित्र श्यामकांत जोशी ह्यांची एकुलती एक मुलगी. तीही श्रीपाद सारखीच किंबहुना जास्तच विलक्षण. भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल तिला लागते असं लोक म्हणायचे. पण ती श्रीपाद सारखी अलिप्त राहत नसे तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना मदत करत असे. तिच्या मनमिळाऊ स्वभावाला बघूनच काकांनी जोशींना गळ घातली होती तिला सून करून घेण्यासाठी. जोशींनी मात्र त्या काळातही अरुंधतीचाच निर्णय शेवटचा असेल असं सांगितलं होतं. मग तिलाच विचारलं गेलं, त्यावर तिने काकांना हो सांगितलं.

पण त्यासोबतच अत्यंत नम्रपणे हेही सांगितलं की भविष्यात तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तशाच कराव्या लागतील, काय ते मी आत्ता सांगू शकत नाही; वेळ आली की सांगेन. पण तेव्हा तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. काकांना श्रीपादच्या अशा बोलण्याची सवय होतीच त्यामुळे त्यांनी अरुंधती जे म्हणत होती त्यावर होकारार्थी मान डोलावली. 

थोड्याच दिवसांत चांगल्या मुहूर्तावर श्रीपाद आणि अरुंधतीचं लग्न झालं. अरुंधतीच्या गृहप्रवेशाने घरात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या. गायत्री, काकांची मोठी मुलगी, तिला दिवस गेल्याच कळलं. तिचं लग्न होऊन तशी दोन वर्षे उलटली होती त्यामुळे सगळ्यांना हा अरुंधतीचा पायगुण वाटला.

 श्रीधरसाठीही एक चांगलं स्थळ आलं. त्याचंही लग्न जमलं. दोन महिन्यांत लग्न झालंसुद्धा. श्रीधरनंतरच्या भास्करला गावातल्या शाळेतच नोकरी मिळाली होती. त्याच्यासाठी अरुंधतीच्याच मावसबहिणीचं स्थळ आलं, संगीताचं. ते लग्नही पक्कं झालं. अरुंधती तिच्या वागण्याने आधीच घरातल्या लहानमोठ्या सगळ्यांची आवडती झाली होती. त्यात घडत गेलेल्या घटनांनी नकळतच भर घातली. पण म्हणतात न सगळे दिवस सारखे नसतात. 
भविष्याच्या गर्भात ज्या गोष्टी होत्या त्यांची कल्पना इतरांना नसली तरी श्रीपाद अरुंधतीला मात्र होती. पण त्यांचं मात्र एकच धोरण होतं, कालाय तस्मै नमः
ही एकच गोष्ट लक्षात ठेवून ते दोघेही संसार करत होते. 
हळूहळू माई काकांची सगळी मुलं मार्गी लागत होती. पहिल्या चौघांचे संसार सुरू होत होते. त्यानंतरचे चौघेही शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात होते. 

गायत्री तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती. यथावकाश तिला मुलगा झाला. 

काही दिवसातच अरुंधतीला दिवस गेल्याची बातमी घरात कळली तसे सगळेच खुश झाले. श्रीपादचा संसार मार्गी लागला म्हणून माई काका देवाचे आभार मानताना थकत नव्हते. अरुंधतीनंतर घरात आलेल्या मंदाकडे, श्रीधरच्या बायकोकडे नाही म्हटलं तरी थोडं दुर्लक्ष झालं अस मंदाचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच तिचीही बातमी कळली. तसं माईंना काय करू नि काय नको अस झालं. 

मंदाला पटलं माई दोघींनाही सारखंच वागवतात. बाळंतपणासाठी अरुंधती आणि मंदा दोघीही माहेरी निघून गेल्या. आता माई आणि काकांचा वेळ नात होईल की नातू असे तर्क लावण्यात सरू लागला. 

काही दिवसांनी अरुंधतीच्या घरून बातमी आली मुलगा झाला अशी. माई काकांनी उत्साहात सगळीकडे पेढे वाटले. मंदानेही लवकरच अजून एक नातू त्यांना दिला. तेवढ्याच उत्साहाने पुन्हा पेढे वाटले गेले. काही महिन्यात दोन्ही नातवांसह सुना घरी आल्या. घराचे गोकुळ झाले होते.
हळूहळू दोन्ही मुलं मोठी होत होती. 

काकांना अजून एक जावईही आला होता. मैथिलीचं लग्न झालं होतं. त्याचबरोबर इतर दोन मुलं विजय आणि अशोकही नोकरीत स्थिरस्थावर झाले होते. त्यांची लग्नं ठरत होती. आता फक्त रोहिणी राहिली होती कारण ती शिकत होती. 

लवकरच रोहिणीचेही लग्न ठरले. घरातले त्या पिढीतले शेवटचे लग्न त्यामुळे भरपूर उत्साहाने सगळे आले होते. मधल्या काळात भास्कर-संगीताही आईबाबा झाले होते.

लग्नाच्या काळात अरुंधतीचा चेहरा सुकल्यासारखाच दिसत होता माईंनी विचारलंही तिला पण तिने दगदगीचे कारण पुढे केले. तीच मोठी असल्याने तसंही तिच्यावर जबाबदारी जास्त होती. 

लग्न निर्विघ्नपणे पार पडले. ४-५ दिवसांत सगळे पाहुणेही पांगले. गायत्री आणि मैथिलीही सासरी निघून गेल्या. आता माई-काका, हे ५ भाऊ आणि त्यांची कुटुंबं होते. श्रीपाद आणि भास्कर गावातच राहत होते. श्रीधर नोकरीमुळे लवकरच दुसऱ्या राज्यात जाणार होता. विजय आणि अशोक दोघांनीही आपापल्या शिक्षणाचा उपयोग करून एकत्रित बिझनेस सुरू केला होता. त्यांचं दोघांचंही एकमेकांशी बऱ्यापैकी पटत होतं. त्यात त्यांच्या बायका ललिता आणि अश्विनी दूरच्या नातेवाईक असल्याने तर अजूनच भर पडली. एकाच शहरात पण जवळपासच ते दोघेही राहत होते. मुलंही नीट रहात आहेत म्हटल्यावर माई काकांना तशी काहीच हरकत नव्हती. वाडा सोडला तर त्यांची तशी काही संपत्ती नव्हती की जिच्यासाठी मुलांमध्ये वाद व्हावेत. एकूणच सगळं आलबेल होतं. 


पण म्हणतात ना की माणसाला सुखही टोचू लागतं. तसंच काहीसं झालं. छोट्या छोट्या कुरबुरींना सुरुवात झाली आणि त्यांचं रूपांतर कधी मोठ्या भांडणात झालं कुणालाच कळलं नाही. श्रीपाद आणि अरुंधतीने सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. श्रीधर त्याच्या मार्गाने तर विजय आणि अशोक त्यांच्या मार्गाने निघून गेले. ते तिघे तर निघून गेले पण त्यांच्या जाण्याने माई काकांना खूप त्रास झाला. 

सगळेजण सावरत असतानाच अरुंधती घरात चक्कर येऊन पडली. जेव्हा सगळ्या तपासण्या झाल्या तरीही काही कळेना तेव्हा तिच्या माहेरहून तिचे वडील एका वृद्ध वैद्यांना घेऊन आले. त्यांनी अगदी कसून तिची नाडीपरीक्षा केली आणि जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं. तिचा गर्भपात होऊन गर्भाशय निकामी व्हावं म्हणून एक अत्यंत दुर्मिळ प्रकारचं औषध तिला नकळतच दिलं जात होतं. जवळजवळ वर्षभरापासून हे सुरू होतं आणि आता त्याचे परिणाम शरीरावर ठळकपणे दिसू लागले होते. हे का कुणी केलं ह्यावर काहीच उत्तर कुणालाच सापडेना. हे सगळं ऐकल्यावर काका मात्र हवालदिल झाले होते. 

त्यांनी आपल्या मित्राकडे बघून नकळतच हात जोडले. पुढे ते काही बोलणार इतक्यात जोशी म्हणाले,“राम तू माफी मागू नकोस. जे घडलं आहे ते भयंकर आहे, पण असं काहीतरी होणार ह्याची कल्पना अरुने आम्हाला आधीच दिली होती.”

“धक्का तर आम्हालाही बसला आहे. पण ह्या घरात सगळे आपलेच आहेत कुणावर संशय घेणार? मुळात आता आपण त्यावर उपाय काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू.” तेवढ्यात वैद्य बाहेर आले दोघांचेही प्रश्नार्थक चेहरे त्यांनी वाचले अन् हलकेच नकारार्थी मान हलवली. इतका वेळ शांत असणाऱ्या श्रीपादने विचारले, “नाही म्हणजे काय वैद्यबुवा?”
   
 वैद्यांनी बोलायला सुरुवात केली, “अरुंधतीवर फक्त औषधांचाच परिणाम झाला नाहीये श्रीपादराव. मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला तरी स्पष्ट सांगण्याची गरज नाही. औषध कसलं विषच होतं जे दिलं होतं. पण त्या बरोबर आणखीही काही अघोरी तंत्राचा उपयोग केला गेला आहे. हे का केलं, कुणी केलं ते शोधण्याचा काही उपयोग होणार नाही. अरुंधती आता काही दिवसांची पाहुणी आहे पण तिचा प्रवास इथेच संपणार नाहीये हे तिला जितकं माहीत आहे तितकंच तुम्हाला ही माहिती आहे. बाकी काही गोष्टी फक्त अरुंधतीच तुम्हाला सांगू शकेल. तिचे उरलेले दिवस सुसह्य व्हावेत म्हणून काही गोष्टी मी सांगितल्या आहेत तेवढया मात्र नक्की करा. निघतो मी आता.” 

श्रीपाद तिरीमिरीतच आतमध्ये गेला. माई आणि संगीता अरुंधतीच्या उशाशी बसलेल्या होत्या. त्याचा आवेश बघून काही न बोलता त्या दोघीही निघून गेल्या. इतक्या वेळ थांबवलेले अश्रू आवरणे आता श्रीपादला शक्य नव्हते. नकळतच एक अश्रू अरुंधतीच्या हातावर पडला. तिने डोळे उघडून त्याच्याकडे बघितले. अन् ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. तसं तिला थांबवत त्याने पुन्हा आडवे व्हायला लावले. 
आणि तो काही बोलणार इतक्यात ती बोलू लागली, 

“थांबा आधी माझं ऐकून घ्या. तुमचा राग मान्य आहे मला, पण आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना होती. आपण फक्त संसार करण्यासाठी एकत्र आलो नव्हतो ना? हे घर, ही माणसं आपलीच आहेत, पण काहीजण चुकीच्या मार्गावर जात आहेत. त्याचा परिणाम हा होणारच होता. असो. मला तुमच्याकडे काही मागायचे आहे द्याल?” असे म्हणत ती थांबली. श्रीपादने होकारार्थी मान हलवताच ती पुढे बोलू लागली, “तुम्ही कैवल्यला हया वातावरणापासून दूर ठेवून भविष्यासाठी तयार करायचे. तसेच माझ्या अनैसर्गिक मृत्यूमुळे ह्या घरात सहजासहजी मुलगी जन्माला येणार नाही. ज्यांनी माझ्यासोबत हे कृत्य केले त्याच व्यक्तींना कुलदैवताला साकडे घालून स्वतःचे अपराध मान्य करावे लागतील मगच काहीतरी होईल.

 पण तसं झालं तरीही ते लोक सुधारतील असं नाही. त्यामुळे घरात जन्माला आलेल्या पहिल्या मुलीला तुम्ही माई आणि काकांच्या नावावरून नाव द्यायचं. कारण ते दोघेही पुण्यवान आहेत. त्यांची पुण्याई त्या नावामुळे त्यांच्यानंतरही तिच्यासोबत असेल. आणि तिला भविष्यात येणाऱ्या संकटांशी सामना करण्यासाठी बळ देत राहील. मी माझी साधना वापरून काही उपाय केले आहेत त्यातलाच हा एक आहे. तेव्हा मला वचन द्या योग्य वेळी येऊन तुम्ही हे काम नक्की कराल. काही गोष्टी मी काकांना स्वतंत्रपणे सांगणार आहे पण त्या तुम्हाला योग्य वेळीच त्यांच्याकडून समजतील. तोपर्यंत माझ्या कैवल्यला जपा. भविष्यात त्याला त्याच्या बहिणीला खूप मदत करावी लागणार आहे.”

 बराच वेळ बोलल्यामुळे अरुंधतीला धाप लागली. तसं तिला आराम मिळावा म्हणून श्रीपाद खोलीबाहेर निघाला आणि कुणाशीही न बोलता शांतपणे त्या खोलीत येऊन बसला. जिथे समोर एक मोठी तसबीर होती तिच्याकडे बघतच त्याने पद्मासन घातले आणि डोळे मिटले. 
अरुंधतीला दिलेले वचन तर श्रीपादने पूर्ण केले, पण त्या व्यक्तींबद्दल अजूनही ते दोघे कुणाला सांगत नव्हते. अरुंधतीला असं काय सांगायचं असेल काकांना त्या व्यक्तींबद्दल की अजून काही रहस्य? 

कळेल पुढच्या काही भागात तोपर्यंत वाचत रहा, तर्क लावत रहा.
_____________________________________

दररोज 3 भाग प्रकाशित होतील. तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. लवकरच नवीन भाग प्रकाशित करण्यात येतील. 

ब्लॉग लिंक शेयर करायला हरकत नाही. तुम्हीही वाचा इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु !!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

अनुभवाच्या पोतडीतून

When someone asks me what is your biggest lesson from the past year? 
Me 👉🏼 2024 ने शिकवलेला धडा, समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल जाणवलेल्या intuitions मग त्या सकारात्मक असो किंवा नकारात्मक त्या स्वतः पुरत्या मर्यादित ठेवायला शिकणे.  
Its like you have to be 
ठेविले अनंते तैसेचि रहावे 
चित्ती असू द्यावे समाधान 
जेंव्हा शिकवणारा तो असतो तेंव्हा विद्यार्थ्याची परीक्षा अवघड असते... काही वेळा खूप जास्त अवघड... 
#एक_वेगळ्या_प्रकारची_अस्वस्थता 
#एक_वेगळा_अनुभव
Trust yourself....
Trust your vibes....
Trust your intuitions....
#अनुभवाच्या_पोतडीतून
#स्वतःमध्ये_लपलेला_खजिना
#treasures_inside_you
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

boundaries style quiz


आपण जेंव्हा म्हणतो की आसपासची लोकं मला गृहीत धरतात किंवा मला ठरवून सुद्धा त्रासदायक लोकांपासून अंतर ठेवून वागता येत नाही तेंव्हा आपल्याला त्या नात्यात अपेक्षित मर्यादा स्पष्ट करता येत नाही हे नक्की. 
पण जर आपल्याला आपल्या मर्यादा किंवा boundaries चा अंदाज आला किंवा त्याबद्दल नेमक्या काही गोष्टी समजल्या तर?? 
म्हणूनच तर ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. लक्षात घ्या ही कोणतीही मानसशास्त्रीय चाचणी नाही. हे काही साधे सोपे प्रश्न आहेत जे आपल्याला आपल्याच वागण्याचे प्रतिबिंब दाखवतील. ज्यावरून आपण नेमके काय बदल करायला हवेत हे आपल्याला समजेल. 
Boundaries चे चार प्रकार असतात आपण त्यापैकी कोणत्या प्रकारात मोडतो हे जाणून घ्यायचे असेल तर या प्रश्नांची प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 
सूचना - खाली दिलेल्या प्रश्नांच्या पर्यायांपैकी जो पर्याय तुमच्या स्वभावाचे अचूक किंवा साधर्म्य दाखवणारे वर्णन करतो तो निवडा. 
1. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला मदत मागते तेव्हा तुम्ही काय करता?
a) ते काम तुम्हाला जमणार आहे की नाही याची खात्री नसताना सुद्धा लगेच होकार देता. 
b) होकार देण्याआधी काही प्रश्न विचारून सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करता. 
c) नकार देता किंवा विचार करून सांगतो असं कळवता. 
d) त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता किंवा त्या व्यक्तीला टाळता. 
2. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्ही स्पष्ट करून सुद्धा तुमच्या ठरवलेल्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या गरजांचा अनादर करते तेव्हा तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? 
a) तुम्ही रागावता किंवा बचावात्मक पवित्रा घेता, पण शेवटी हार मानता. 
b) तुम्ही शांतपणे आणि ठामपणे तुमच्या गरजा आणि मर्यादा स्पष्ट सांगत संवाद साधता. 
c) तुम्ही वादविवाद टाळता आणि गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करता. 
d) तुम्ही आक्रमक पवित्रा घेता. 
3. जर एखादे काम समूहासोबत करण्याची वेळ आली तर...
a) तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन सर्व काही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता. 
b) इतरांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करता, पण सोबतच स्वतःच्या गरजा आणि मर्यादा आधीच स्पष्ट करून सांगता. 
c) इतरांना पुढाकार घेऊ देता आणि स्वतःच्या गरजा स्पष्ट करून सांगणे टाळता. 
d) कामामध्ये दिरंगाई करता किंवा जबाबदारी घेण्याचे टाळत इतरांना गोष्टी करू देण्याकडे तुमचा कल असतो. 
4. तुम्ही स्वतःच्या गरजा आणि इच्छा यांची प्रायोरिटी कशी ठरवता?
a) तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत नेहमीच इतरांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही स्वतःच्या गरजा आणि इच्छा यांना प्राधान्य देता पण बरोबरीने इतरांना सुद्धा मदत करता. 
c) तुम्ही स्वतःच्या गरजा आणि इच्छा यांना प्राधान्य देता पण त्याचवेळी तुम्ही इतरांकडे मात्र दुर्लक्ष करता. 
d) आपल्या महत्त्वाच्या गरजा आणि इच्छा काय आहेत हेच तुम्हाला माहीत नाही. 
5. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला गरज नसताना सल्ला देते किंवा तुमच्याविषयी अतिशय टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करते तेव्हा तुम्ही काय करता?? 
a) ती गोष्ट मनाला लावून घेत आक्रमक पवित्रा स्वीकारता. 
b) समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करता. 
c) अतिशय नम्रपणे त्या व्यक्तीचे आभार मानता पण स्वतःच्या मतांना आणि गरजांना प्राधान्य देता. 
d) त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करता आणि त्यांचा सल्ला उडवून लावता. 
6. आपण बऱ्याचदा अति आश्वासन देऊन अंगावर जास्तीच्या जबाबदाऱ्या ओढवून घेत आहोत असं तुम्हाला वाटतं का??
a) Yes, all the time हो नेहमीच
b) Sometimes कधीतरी
c) Rarely कमी वेळेला
d) Never कधीच नाही
7. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला इच्छा नसतानाही एखादे काम करण्यासाठी सांगते तेव्हा ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळता? 
a) तुम्ही मनात नसताना सुद्धा ते काम करण्यासाठी तयार होता. आणि ते काम करता. 
b) तुम्ही दुसरा एखादा मार्ग शोधण्याचा किंवा तडजोड करण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही स्पष्टपणे नकार कळवता पण नंतर तुम्हाला अपराधी किंवा अस्वस्थ वाटत राहते. 
d) तुम्ही स्पष्टपणे नकार कळवता आणि त्यानंतरही तुम्ही आत्मविश्वासाने आणि सकारात्मक पद्धतीने गोष्टी हाताळता. 
8. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना, सहकाऱ्यांना नकार देणे जीवावर येते का?? 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
9. तुम्ही स्वतःच्या मानसिक आणि भावनिक गरजांची प्राथमिकता किंवा प्रायोरिटी कशी ठरवता? 
a) तुम्ही स्वतः पेक्षा नेहमीच इतरांना जास्त प्राधान्य देता. 
b) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देत स्वतःसाठी आवर्जून वेळ काढता. 
c) तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनिक गरजांना प्राधान्य देता, परंतु काहीवेळा इतरांच्यावर अवलंबून राहता. 
d) तुम्हाला तुमच्या भावनिक गरजा नेमक्या काय आहेत हेच स्पष्ट झालेले नाही. 
10. जेव्हा कोणी तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तुम्ही:
 a) स्वतःची हार मान्य करत त्या व्यक्तीला हवे तसे वागू देता. 
 b) खंबीरपणे उभे राहता आणि आपल्या गरजा ठामपणे सांगता 
 c) तडजोड करता आणि मध्य साधण्याचा प्रयत्न करता
 ड) परिस्थिती पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करता
11. जेव्हा इतर लोक तुमच्या सीमांचा आदर करत नाहीत तेव्हा तुम्हाला अनेकदा नाराजी वाटते किंवा राग येतो का?
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
12. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला अपराधीपणा जाणवून देत एखादे काम करून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्ही परिस्थिती कशी हाताळता?? 
a) तुम्ही स्वतःची हार मान्य करत ते जे सांगत आहेत तसं करण्याचा प्रयत्न करता. 
b) तुम्ही त्यांच्याशी बोलून तडजोड करण्याचा किंवा दुसरा एखादा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही तुमच्या गरजा आणि मर्यादा अतिशय ठामपणे सांगता. 
d) तुम्ही ती परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करता. 
13. तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर नात्यांमधली मर्यादा किंवा सीमा निश्चित करणे अवघड जाते का?? 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
14. तुम्ही स्वतःच्या शारीरिक गरजांना किती प्राधान्य देता? 
a) तुम्ही स्वतः ऐवजी इतरांच्या शारीरिक गरजांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देत स्वतःसाठी आवर्जून वेळ काढता. 
c) तुम्ही तुमच्या स्वतःच्या शारीरिक गरजांना प्राधान्य देता, परंतु काहीवेळा इतरांच्यावर अवलंबून राहता. 
d) तुम्हाला तुमच्या शारीरिक गरजा नेमक्या काय आहेत हेच स्पष्ट झालेले नाही. 
15. जेव्हा कोणी तुम्हाला पैसे उसने मागते, तेव्हा तुम्ही:
a) तुम्ही तुम्हाला शक्य नसताना सुद्धा होकार देता. 
b) तुम्ही दुसरा एखादा मार्ग शोधण्याचा किंवा तडजोड करण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने आणि ठामपणे नकार देता. 
d) तुम्ही नकार देता पण त्यानंतर तुम्हाला अपराधीपणाची किंवा अस्वस्थतेची भावना जाणवू लागते. 
16. इतरांच्या गरजा पूर्ण करत असताना तुम्ही बऱ्याचदा थकून जाता का?? 
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
17. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या वागण्या बोलण्यावरून तुम्हाला जज करते तेव्हा तुम्ही परिस्थिती कशी हाताळता? 
 a) ती गोष्ट मनाला लावून घेत आक्रमक पवित्रा स्वीकारता. 
b) समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करता. 
c) अतिशय नम्रपणे त्या व्यक्तीचे आभार मानता पण स्वतःच्या मतांना आणि गरजांना प्राधान्य देता. 
d) त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करता आणि त्यांचा सल्ला उडवून लावता. 
18. तुम्हाला तुमच्या अतिशय जवळच्या कुटुंबीयांसोबत नात्यांमध्ये सीमा ठरवणे अवघड जाते का?? 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
19. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला बोलताना मध्येच थांबवते किंवा तुमचे मत तडकाफडकी उडवून लावते तेव्हा तुम्ही काय करता? 
a) तुम्ही रागावता किंवा बचावात्मक पवित्रा घेता. 
b) तुम्ही शांतपणे आणि ठामपणे तुमच्या गरजा आणि मर्यादा स्पष्ट सांगत संवाद साधता. 
c) तुम्ही वादविवाद टाळता आणि गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करता. 
d) तुम्ही आक्रमक पवित्रा घेता. 
20. इतरांसोबत वावरताना तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक वावरावे लागते असे वाटते का?? 
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
21. इतरांच्या विरोधी मागण्यांचा सामना करताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या गरजांना प्राधान्य कसे देता?
a) तुम्ही नेहमीच इतरांच्या गरजांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही तडजोड करून मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देता पण सोबतीने इतरांकडे सुद्धा लक्ष देता. 
d) आपल्या गरजांची प्रायोरिटी कशी ठरवावी हेच तुम्हाला माहीत नाही. 
22. तुम्हाला तुमच्या पेक्षा वरिष्ठ ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना नकार देताना अडचण जाणवते का?? उदा. घरात वयाने मोठे आणि ऑफिस मध्ये सिनिऑरिटीने 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
23. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करण्याचा किंवा तुमचे वागणे ठरवण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता?? 
a) तुम्ही स्वतःची हार मान्य करत ते जे सांगत आहेत तसं करण्याचा प्रयत्न करता. 
b) तुम्ही त्यांच्याशी बोलून तडजोड करण्याचा किंवा दुसरा एखादा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही तुमच्या गरजा आणि मर्यादा अतिशय ठामपणे सांगता. 
d) तुम्ही ती परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करता. 
24. कधी कधी एखाद्या नात्यामध्ये तडजोड करताना आपण स्वतःलाच हरवून बसत आहोत असं तुम्हाला वाटतं का?? 
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
25. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनिक स्वास्थ्याला प्राधान्य कसे देता?
a) तुम्ही नेहमीच इतरांच्या गरजांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही तडजोड करून मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देता पण त्यासाठी इतरांवर अवलंबून राहता. 
d) आपल्या भावनिक गरजांची प्रायोरिटी कशी ठरवावी हेच तुम्हाला माहीत नाही. 
26. तुमचा वेळ आणि उर्जेच्या बाबतीत सीमा निश्चित करण्यात तुम्हाला अडचण येत आहे का?
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
27. जेव्हा वारंवार सांगूनही एखादी व्यक्ती नात्यांमध्ये मर्यादेचे उल्लंघन करते तेव्हा तुम्ही परिस्थिती कशी हाताळता?? 
a) तुम्हाला राग अनावर होतो.
b) तुम्ही अतिशय शांतपणे आणि ठामपणे स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही वादविवाद टाळून परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करता.
d) तुम्ही नाराज होता.
28. एखाद्या नात्यामध्ये जबाबदारीचे सर्व ओझे आपल्याच खांद्यावर आले आहे असे तुम्हाला नेहमी वाटते का?? 
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
29. तुम्ही स्वतःच्या शरीराच्या गरजा आणि शारीरिक स्वास्थ्याची प्रायोरिटी कशी ठरवता? 
a) तुम्ही नेहमीच इतरांच्या गरजांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही स्वतःच्या गरजा ओळखून स्वतःची काळजी घेण्यासाठी आवर्जून वेळ काढता. 
c) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देता पण त्यासाठी इतरांवर अवलंबून राहता. 
d) आपल्या गरजांची प्रायोरिटी कशी ठरवावी हेच तुम्हाला माहीत नाही. 
30. स्वतःच्या मर्यादा ठामपणे आणि आत्मविश्वासाने सांगण्याबाबत तुम्हाला अडचण जाणवते का? 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never

स्वतःला शोधताना गौरी हर्षल 

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

Change your story...


 #change_your_story
माणसाला बदलाची भीती कायम वाटत असते. कारण कुठलाही बदल घडताना काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात तर काही गोष्टी नव्याने अंगिकाराव्या लागतात. आणि या प्रवासात आपण हमखास मागे सुटलेल्या गोष्टींचा विचार करत असतो. बऱ्याचदा त्या टप्प्यापर्यंत पोहोचताना आपण काय कमावलं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. 
Read that again.

दुर्दैवाने ज्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागल्या आहेत किंवा ज्या आपल्या आयुष्यातून आपोआप वजा झाले आहेत आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. पण तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष आपण आयुष्यात काय मिळवू शकतो किंवा आपल्याला काय मिळायला हवे याकडे नसते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण काय डिझर्व्ह करतो हेच आपल्याला माहीत नसते. 

कधी कधी आपल्या हातात असलेली छोटीशी गोष्ट आपण घट्ट धरून ठेवलेली असते. ती घट्ट धरून ठेवण्यामागे अर्थातच आपल्या मनात गमावण्याची भीती असते. पण त्या भीतीच्या दुसऱ्या टोकाला बऱ्याचदा काहीतरी खूप मोठं आणि आपल्याला अनपेक्षित असणार सुखद सरप्राईज असतं. अर्थात जोपर्यंत ती गोष्ट आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपला तिच्यावर विश्वास बसत नाही हे मात्र नक्की.‌

पण एक गंमत सांगू का? ही मनात असलेली भीती नकळतच आपल्या मनाचे, हृदयाचे नवीन काहीही स्वीकारण्याचे सगळे दरवाजे बंद करून टाकते. मग या बंद दरवाजांपर्यंत दुर्दैवाने काहीच पोहोचू शकत नाही. 
मग अशा वेळेला काय करायचं? तर काही साध्या सोप्या गोष्टी असतात त्या प्रामाणिकपणे स्वतःला विचारायच्या आणि त्यांची मनाशी संवाद साधल्यानंतर मिळणारी उत्तर स्वीकारण्याचा प्रयत्न करायचा. 
मी स्वतः वापरते अशा काही छोट्याशा टिप्स - 
👉🏼 माझ्यासोबत ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या स्वीकारण्याची संधी मी स्वतःला देते आहे का? 
How much am I ALLOWING myself to receive at this moment?

हा प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर स्वतःचे नीट निरीक्षण करा.‌ आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये काय बदल घडत आहेत ते बारकाईने तपासा. 
👉🏼तुम्ही आत्ता ज्या स्थितीमध्ये आहात तिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही याचा विचार करा. 
👉🏼 दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना आपण पुरेसा ऑक्सिजन आत मध्ये घेत आहोत की नाही याकडे लक्ष द्या. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा. 
👉🏼 या अतिशय आपसूक घडणाऱ्या गोष्टी आहेत. आपण आवर्जून कधीही यांच्यावर लक्ष केंद्रित करत नाही. 
👉🏼हीच गोष्ट आपल्याकडून आपल्या बाबतीत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा होते. आपण बऱ्याचदा चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती ह्यांना गृहीत धरत असतो. आणि त्यामुळे आपल्या विचारांचा फोकस हा आपल्याला काय मिळालेलं नाही यावर जास्त असतो. 

गोष्टी हातातून निघून गेल्यानंतर त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यापेक्षा त्या हातात असताना कृतज्ञता व्यक्त करणे कधीही चांगलंच असतं. त्यामुळे नकळतच आपण आपल्याकडे येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी वाट करून देत असतो. "आपण जे देतो ते दाम दुपटीने आपल्याकडे परत येतं" हे नेहमी आपण दुसऱ्याच्या बाबतीतच का म्हणतो?? स्वतःसाठी का नाही?? जर आपण आपल्यासाठी चांगले विचार केले, आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तर नकळतच आपल्या दिशेने येणाऱ्या चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या अनुभवांमध्ये भर पडू शकते. 

गरज असते ती फक्त आपल्या दृष्टिकोनाला पुन्हा पुन्हा रिसेट करण्याची... हे काही फार अवघड नसतं. पण ते करण्यासाठी आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं हे मात्र नक्की. 

शेवटी म्हणतात ना, आपण जर कधी गोष्टी संपवण्याचा विचार करत असो तर एकदा आपण एवढा टप्पा पूर्ण करून इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत याचा सुद्धा विचार करावा. कारण आपण आज जिथे उभे आहोत तिथे येण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागले आहेत. आणि त्या कष्टांचे चीज तेव्हाच होईल जेव्हा आपण स्वतःसाठी निवडलेल्या मार्गावर सातत्याने चालत राहू. 
सो, आजचा हा रिमाइंडर ज्याला तुम्ही affirmation सुद्धा म्हणू शकता, नक्कीच लक्षात ठेवा, 
I am always a work in progress. I am never done. I am constantly improving, upgrading, expanding, growing, experimenting, exploring and discovering a better version of myself. 
बाकी? बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
लेखन - गौरी हर्षल कुलकर्णी 
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन )