सोमवार, ४ जानेवारी, २०२१
ʙᴇ ᴜɴɪǫᴜᴇ - वेगळेपण जपताना
सोमवार, २८ डिसेंबर, २०२०
स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना
बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०
विषारी सकारात्मकता - गौरीहर्षल
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
फिरुनी नवी जन्मेन मी
नव्यानेच उमलणारी लाजरी, हसरी , नाचरी बाहुली होती ती. नुकतेच स्वप्नांच्या पावलांनी १६व्या वर्षात पाऊल टाकले होते.
शाळेचे धरलेले बोट सुटून सुटली कॉलेजच्या हातात हात दिला होता. जसे जसे नवे विश्व खुणावत होते तसे तिचे पंख भरारी मारण्यासाठी उत्सुक झाले होते.
अशातच एक दिवस बाबांनी हातात नव्याकोऱ्या स्कुटीची चावी टेकवली. आतातर काय आभाळ ठेंगणे झाले. उत्साहाने आवडीच्या सगळ्या ठिकाणी ती गाडीवर भटकून आली.
गाडीच्या वाढलेल्या वेगासोबत मैत्री करताना शरीर देत असलेली सूचना मात्र तिने धुडकावून लावली. आणि अचानक साध्या सरळ मार्गाने निघालेल्या तिच्या आयुष्याला ब्रेक मिळाला. निमित्त झालं एका छोट्या अपघाताचं. डोक्यावर पडल्याने सुरक्षितता म्हणून काही चाचण्या डॉक्टरांनी करायला सांगितल्या.
निदान - ब्रेन ट्युमर, प्राथमिक सुरुवात होती पण ट्युमर म्हणजे ऑपरेशन.
जवळचे सगळे हवालदिल झालेले. ही मात्र तशी शांत होती. लवकरात लवकर ऑपरेशन केले तर फायदेशीर ठरेल असे डॉक्टर सांगत होते. हो, नाही करत तिने सगळ्यांना तयार केले. डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीख दिली पुढच्याच आठवड्यातली.
तारीख बघताच तिच्या आईवडिलांचे उसने अवसानही ओसरले. तिचा वाढदिवस होता त्या दिवशीच. आपल्या लेकीला ज्या दिवशी पहिल्यांदा हातात घेतले त्याच दिवशी तिच्या ऑपरेशनच्या फॉर्मवर सही करायची हे विचारच त्यांना सहन होत नव्हते.
तिने मात्र धीराने घेत दोघांनाही समजावून सांगितले की, 'देव मला पुन्हा एकदा संधी देतो आहे नव्याने सुरुवात करण्यासाठी म्हणून तर इतका स्पेशल दिवस निवडला आहे.'
ठरलेल्या दिवशी ऑपरेशन करण्यात आले. ती दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आली. डोळे उघडताच समोर आईबाबा दिसले. एवढया त्रासातही चेहऱ्यावर हसू आणून
त्यांना चियर अप करण्यासाठी गाऊ लागली,
"एकाच ह्या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा"
गौरी हर्षल कुलकर्णी
२६ जुलै २०२०
जरा विसावू या वळणावर....
"भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर"
ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले.
खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले.
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर
लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले.
त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.
माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला.
जुनी खेळातली नावं, लुटुपुटूची भांडणं, रुसवे, फुगवे, भातुकली सगळं कसं आत्ता घडत असल्यासारखं नजरेसमोर नाचलं. हातातली कामं आवरत तिने आज जुने अल्बम काढले. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण आणि खूप दिवस टिकेल, पुरेल असं समाधानाचं हसू देऊन गेला तिला. खूप काही आहे आपल्याजवळ पण आपण उगाचच नवीन काहीतरी शोधत फिरतो असा विचार मनात येताच ती स्वतःशीच हसली.
संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि मुलंही तिचं हे रूप पाहून खुश झाली. तितक्यात तिच्या जुन्या घराजवळचे कुणीतरी काका काकू भेटले आणि काय काय मस्त आठवणी सांगत होते असं नवरा म्हणू लागला. चला, मनातली तगमग योग्य मनापर्यंत पोचली ह्या विचाराने तिला अजूनच छान वाटलं. पुन्हा एकदा ती गुणगुणू लागली.....
खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर
जरा विसावू ह्या वळणावर
गौरी हर्षल कुलकर्णी
२६ जुलै २०२०
कितीदा नव्याने
"कितीदा नव्याने तुला आठवावे,
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे"
गाणं ऐकलं आणि त्याला नकळतच हसू आलं. स्मृतींची पाने उलटून तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाही.
नकळत्या वयात तिच्या प्रेमात पडला होता तो. ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हेही समजत नव्हते.
ती वर्षं त्याच्या आयुष्याच्या, करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षं होती. पण मधेच ती भेटली आणि एका क्षणात त्याच्या मनात खळबळ माजली.
अभ्यास एके अभ्यास करत जगणारा मुलगा सगळं काही सोडून तिच्या स्वप्नांमध्ये रमू लागला. रात्रंदिवस सतत तीच दुसरं काही त्याला सुचेना. ती दिसली की तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या अवतीभवती घुटमळत राहू लागला.
आजूबाजूला सर्वांनाच जसं हे समजलं तसं तिलाही समजलं होतच.इतर मुलींसारखं तिलाही ते आवडत होतं,पण तीही त्याच्यासारखीच होती करियर वगैरे गोष्टीना पहिली प्रायोरीटी देणारी त्यामुळे इतक्या हुशार मुलाने असं वागलेल तिला आवडलं नव्हतं. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ.
शेवटी एक दिवस त्याने तिला त्याच्या भावना सांगितल्या, तिला कदाचित अंदाज आला होताच. दोन दिवस मागून घेत ती निघून गेली.
तिच्या वागण्याने गोंधळून गेलेला तो तिला पाठमोरी जाताना बघत होता. दोन दिवसानंतर तिच्या मैत्रिणीने एक पत्र आणून त्याला दिले. ती त्या दिवशी भेटली ती परत आलीच नाही.
तिच्या न येण्याने तो पुरता कोलमडून गेला होता. पुढचे काही दिवस फक्त आणि फक्त निराशेत, उदास गाणी ऐकण्यात गेले. ते पत्र अजून उघडून बघितलेही नव्हते त्याने.
शेवटी कसाबसा मनाचा हिय्या करत त्याने ते पत्र उघडले. त्यात लिहिलेलं वाचल्यावर जे काही घडलं ते कुणालाही अनपेक्षित अस होतं. त्या दिवसानंतर तो आमूलाग्र बदलला.
एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस.
आयुष्यात ठरवलेल्या सर्व गोष्टी त्याने प्रचंड कष्ट करून मिळवल्या होत्या. आज जेव्हा त्याला त्यासाठी पुरस्कार मिळत होता तेव्हा तो मात्र त्याच श्रेय तिला देत होता.
ते पत्र त्याने एक क्षणभरही स्वतःपासून दूर केले नव्हते.
त्यांचं एकत्र येणं कधीच शक्य होणार नव्हते पण ते तिने इतक्या छान पद्धतीने सांगितले की त्याला तिला गमावूनही मिळवल्याची जाणीव झाली.
त्या समजूतदार पत्राने त्याला प्रेमाचा नवा मार्ग दाखवत सोबतीची उणीव भरून काढली होती. ती आज नसूनही त्याच्यासोबतच होती.
गौरी हर्षल कुलकर्णी
२७ जुलै २०२०
अंतरंगातला देव
गॅलरीत ठेवलेल्या आरामखुर्चीत बसून आप्पा रेडिओवर गाणी ऐकत होते. पुढचं गाणं सुरू झालं तसा त्यांच्या डोळ्यांसमोर एक चेहरा तरळून गेला.
तो दिवस आठवल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला.
पावसाने सगळीकडे थैमान घातलं होतं. श्रावण महिना असल्याने त्या दिवशी घरात पूजा केली होती. रजत कुरकुर करतच पुजेला बसला होता. त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण आप्पांचं मन मोडू नये म्हणून तो करत असे.
आप्पा त्याला नेहमी समजावत की एक दिवस कुठल्या न कुठल्या रुपात तो नक्की तुला भेटेल. तेंव्हा तूच मला सांगशील.
अशातच संध्याकाळी मागच्या गल्लीत असणारी चाळ कोसळली अशी बातमी आली. थोड्याच वेळात त्यांच्या इथेही सूचना आल्या गरजेच्या सामानासह दुसरीकडे निघण्याची तयारी सुरु करा अशा.
आप्पा ही सगळ्यांच्या सोबत ठरलेल्या ठिकाणी आले.
"काय उपयोग झाला पूजा करून आला का तुमचा देव आपल्याला वाचवायला? उलट घर सोडून आलो आपण." रजत बडबड करू लागला.
पाण्याचा जोर वाढला होता. सगळ्यांच्याच मनात आता खळबळ माजली होती. सोबत काही लहान मुले,गरोदर स्त्रियाही होत्या.
हळूहळू त्या सगळ्यांना पुढच्या ठिकाणी पोहोचण्याचं काम सुरू झालं. रजतसोबतच सगळी तरुण मुलं मदतीसाठी पुढे झाली.
जातपात, वय, स्त्री पुरुष सगळे भेदभाव बाजूला सारून फक्त माणुसकीच्या नात्याने जो तो मदत करत होता. रात्र सरता सरता सगळे टेकडीच्या माथ्यावर असलेल्या मोठ्या मंदिरात जाऊन पोहोचले.
रजत एका वयोवृद्ध आजोबांना पाठीवर घेऊन आला होता. त्यांना व्यवस्थित जागा बघून त्याने बसविले तसे त्याचे दोन्ही हात घट्ट धरून डोळ्यांना टेकवत आजोबांनी नमस्कार केला.
"अहो आजोबा हे काय करताय?" असे म्हणत रजत मागे सरकला.
"अरे लेका , तुझ्या रुपात माझा देव धावून आला बघ, आज त्याचं दर्शन झालं मी भरून पावलो. नाहीतर माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण त्याने तुझ्यामार्फत माझी मदत केली. दगडातला देव भेटला नाही पण माणसातला भेटला अजून काय पाहिजे?"
रजतने डबडबलेल्या डोळ्यांनी आप्पांकडे बघितलं आणि त्याच वेळी जवळच्याच पायरीवर बसून एक आंधळा भिकारी गाऊ लागला,
तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो
नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो
तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो
शोध, नाही कुठे या पसाऱ्यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहातो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी, राउळी
बाप झाला कधी जाहला माऊली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग धावंल का?
बघ उघडुनी दार अंतरंगातला देव घावल का?
गौरी हर्षल कुलकर्णी
२७ जुलै २०२०
-
The Art of Self-Compassion: Being Kind to Yourself in the Face of Adversity संकटाच्या वेळी स्वतःशी दयाळूपणे वागण्याची कला ती मा...
-
How to Deal with Negative People: नकारात्मक लोकांसोबत कसे वागावे? काही लोकांना नकारात्मक वातावरण, नकारात्मक विचारांमध्ये गुंतून पडणे आवडत ...
-
Clearing the Mental Clutter: How the Simple Act of a Brain Dump Can Boost Your Well-being? मनातील गर्दी दूर करणे: 'ब्रेन डं...
Contact form |
Tags |