फिरुनी नवी जन्मेन मी

नव्यानेच उमलणारी लाजरी, हसरी , नाचरी बाहुली होती ती.  नुकतेच स्वप्नांच्या पावलांनी १६व्या वर्षात पाऊल टाकले होते. 

   शाळेचे धरलेले बोट सुटून सुटली कॉलेजच्या हातात हात दिला होता. जसे जसे नवे विश्व खुणावत होते तसे तिचे पंख भरारी मारण्यासाठी उत्सुक झाले होते. 

 

अशातच एक दिवस बाबांनी हातात नव्याकोऱ्या स्कुटीची चावी टेकवली. आतातर काय आभाळ ठेंगणे झाले. उत्साहाने आवडीच्या सगळ्या ठिकाणी ती गाडीवर भटकून आली. 

  

गाडीच्या वाढलेल्या वेगासोबत मैत्री करताना शरीर देत असलेली सूचना मात्र तिने धुडकावून लावली. आणि अचानक साध्या सरळ मार्गाने निघालेल्या तिच्या आयुष्याला ब्रेक मिळाला. निमित्त झालं एका छोट्या अपघाताचं. डोक्यावर पडल्याने सुरक्षितता म्हणून काही चाचण्या डॉक्टरांनी करायला सांगितल्या. 


निदान - ब्रेन ट्युमर, प्राथमिक सुरुवात होती पण ट्युमर म्हणजे ऑपरेशन. 

जवळचे सगळे हवालदिल झालेले. ही मात्र तशी शांत होती. लवकरात लवकर ऑपरेशन केले तर फायदेशीर ठरेल असे डॉक्टर सांगत होते. हो, नाही करत तिने सगळ्यांना तयार केले. डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीख दिली पुढच्याच आठवड्यातली. 


तारीख बघताच तिच्या आईवडिलांचे उसने अवसानही ओसरले. तिचा वाढदिवस होता त्या दिवशीच. आपल्या लेकीला ज्या दिवशी पहिल्यांदा हातात घेतले त्याच दिवशी तिच्या ऑपरेशनच्या फॉर्मवर सही करायची हे विचारच त्यांना सहन होत नव्हते. 


तिने मात्र धीराने घेत दोघांनाही समजावून सांगितले की, 'देव मला पुन्हा एकदा संधी देतो आहे नव्याने सुरुवात करण्यासाठी म्हणून तर इतका स्पेशल दिवस निवडला आहे.' 


ठरलेल्या दिवशी ऑपरेशन करण्यात आले. ती दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आली. डोळे उघडताच समोर आईबाबा दिसले. एवढया त्रासातही चेहऱ्यावर हसू आणून 

त्यांना चियर अप करण्यासाठी गाऊ लागली, 

"एकाच ह्या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा"

गौरी हर्षल कुलकर्णी

२६ जुलै २०२०




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव