लग जा गले

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


तिच्या आवाजातली व्याकुळता तो आपल्या मनात नकळतच साठवून ठेवण्याची धडपड करत होता. ड्युटी पुन्हा जॉईन करा असा तडकाफडकी निरोप आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी तिचा चेहरा आला होता. दोनच दिवसांनी असणारा त्याचा वाढदिवस ह्यावेळी तरी एकत्र साजरा करता येईल म्हणून किती प्लॅन करत होती ती. काही त्याला सांगून तर काही लपून छपून. पण आता मात्र ते शक्य नव्हतं. 


शेवटी मनाचा हिय्या करत त्याने तिला सांगितलंच. क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत ती त्याला म्हणाली, "बरं झालं माझी सगळी तयारी झाली होती ते. तुझे सगळे गिफ्ट्स तरी तुला प्रत्यक्ष देता येतील. आणि तुला अजून काही हवं असेल तर ते ही आणता येईल. उद्या दुपारी जाणार न तू?"


तिचं वागणं बघून तो थक्क झाला होता. आपल्याला कस कळलं नाही कधी एवढी स्ट्रॉंग झाली ही? सायन्सच्या प्रॅक्टिकलला डिसेक्शन करताना घाबरलेली ती आणि आत्ताची ही केवढा फरक पडला. 

ते काहीही असलं तरी मी मात्र अजूनच प्रेमात पडतोय हिच्या. माझ्यासोबत माझी स्वप्नं भरभरून जगतानाही तिने स्वतःच्या स्वप्नांना जिवंत ठेवलं आहे. सोबतच घरच्यांनाही सांभाळते. तो स्वतःशीच विचार करत असतानाच ती आली आणि म्हणाली, चल रे सगळे जमले आहेत टेरेसवर आज मस्त पोटभर गप्पा मारू. 


त्या गप्पाच्या ओघातच त्याने तिला गाणं म्हणायला लावलं होतं आणि रेकॉर्ड पण करून घेतलं होतं. 

ती हसली तेंव्हा तो म्हणाला होता, "आठवणीच जगण्यासाठी मदत करतात ग. अवघड क्षणी डोळे मिटून एक छानशी आठवण जगून घेतो मी कारण ती मला बळ देते समोर आलेल्या संकटाला परतवून लावण्यासाठी. मी एकवेळ माणसाचे चेहरे विसरेन पण आठवण मात्र मनाच्या एका कप्प्यात सुरक्षित असेल. आणि तीच मला नव्याने सुरुवात करताना सोबत करेल." 

तेच गाणं तो ड्युटीवर परत जाताना रिपीट मोडवर ऐकत होता. पण प्रत्येक वेळी त्याला तिची नवीन आठवण हसवून जात होती. 


काही दिवसानंतर

इकडे आता त्याचा संपर्क तुटल्यापासून पंधरा दिवस झाले होते. 

शोध जरी सुरू असला तरी तो कधी सापडणार? कशा अवस्थेत ह्याची काही कल्पना नव्हती.मनातून मात्र  प्रत्येकाला आपल्या शंका खोट्या ठराव्यात असच वाटत होतं. 

 शेवटी शोध लागेल कधीतरी अस म्हणत सगळेच आपापल्या मार्गाला लागले. तीही आशेच्या हिंदोळ्यावर झुलत त्याची वाट बघत होती. पण मन मानेल तर ना? 


आणि एक दिवस तिला अपेक्षित बातमी आली. तो सापडला होता. बेशुद्ध अवस्थेत पण जिवंत होता. ती मिळेल त्या वाहनाने त्याच्या जवळ पोहोचली. पण त्याच्या डोळ्यात ओळखीची खूण नव्हती. बऱ्याच उंचावरून पडल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने आठवणी धूसर झाल्या होत्या. 


जखमा ताज्या असल्याने मेंदूवर ताण देऊन चालणार नव्हते. तेव्हा फक्त जुजबी ओळख पटवून देत तिने त्याला घरी येण्यासाठी तयार केले होते. 

सगळे सोपस्कार पार करून त्याने स्वतःच्याच घरी गृहप्रवेश केला. माणसं जरी त्याला अनोळखी वाटत असली तरी त्यांचे डोळे त्याला सतत काहीतरी वेगळं दाखवत होते. 


आईवडिलांसाहित सगळ्यांनी मिळून आधी त्याच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. तो मान्य करून तो ही आता त्यांच्यामध्ये मिसळू लागला होता. 

तिचीच कल्पना होती ती पण ती स्वतः मात्र जरा जपून त्याच्या आसपास वावरत होती. कारण तो तिच्याकडे बघितलं की अस्वस्थ व्हायचा. ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्याला जाणवत होते पण तिचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे हेच त्याला आठवत नव्हते. इतरांना त्रास नको म्हणून त्याने वरवर जरी नवराबायको आहोत हे मान्य केले होते तरी एकांतात मात्र त्याने तिला वेळ मागितला होता. तिनेही त्याला तो दिला होता कारण त्याच्या आठवणींच्या थियरीवर तिचा पूर्ण विश्वास होता. 


अशातच एके दिवशी तिला सहज गाणं म्हणायची हुक्की आली तो घरात नव्हता त्यामुळे ती मस्त मोकळ्या आवाजात मनापासून सूरांना आळवत होती. 


पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार

बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार

आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


मनातलं सगळं दुःख तिच्या आवाजात स्पष्ट जाणवत होतं. शेवटची ओळ म्हणत असताना ती मागे वळाली आणि जागेवरच थबकली. समोर तो उभा होता डोळ्यात अश्रू पण ओठांवर मात्र आज ओळखीचं हसू आलं होतं. त्याच्या आठवणीनी अखेर त्याला तिची ओळख पटवून दिली होती. 

गौरी हर्षल 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव