अंतरंगातला देव

गॅलरीत ठेवलेल्या आरामखुर्चीत बसून आप्पा रेडिओवर गाणी ऐकत होते. पुढचं गाणं सुरू झालं तसा त्यांच्या डोळ्यांसमोर एक चेहरा तरळून गेला. 

तो दिवस आठवल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला. 


पावसाने सगळीकडे थैमान घातलं होतं. श्रावण महिना असल्याने त्या दिवशी घरात पूजा केली होती. रजत कुरकुर करतच पुजेला बसला होता. त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण आप्पांचं मन मोडू नये म्हणून तो  करत असे. 

आप्पा त्याला नेहमी समजावत की एक दिवस कुठल्या न कुठल्या रुपात तो नक्की तुला भेटेल. तेंव्हा तूच मला सांगशील. 


अशातच संध्याकाळी मागच्या गल्लीत असणारी चाळ कोसळली अशी बातमी आली. थोड्याच वेळात त्यांच्या इथेही सूचना आल्या गरजेच्या सामानासह दुसरीकडे निघण्याची तयारी सुरु करा अशा. 


आप्पा ही सगळ्यांच्या सोबत ठरलेल्या ठिकाणी आले. 

"काय उपयोग झाला पूजा करून आला का तुमचा देव आपल्याला वाचवायला? उलट घर सोडून आलो आपण." रजत बडबड करू लागला. 


पाण्याचा जोर वाढला होता. सगळ्यांच्याच मनात आता खळबळ माजली होती. सोबत काही लहान मुले,गरोदर स्त्रियाही होत्या. 

हळूहळू त्या सगळ्यांना पुढच्या ठिकाणी पोहोचण्याचं काम सुरू झालं. रजतसोबतच सगळी तरुण मुलं मदतीसाठी पुढे झाली. 

जातपात, वय, स्त्री पुरुष सगळे भेदभाव बाजूला सारून फक्त माणुसकीच्या नात्याने जो तो मदत करत होता. रात्र सरता सरता सगळे टेकडीच्या माथ्यावर असलेल्या मोठ्या मंदिरात जाऊन पोहोचले. 

रजत एका वयोवृद्ध आजोबांना पाठीवर घेऊन आला होता. त्यांना व्यवस्थित जागा बघून त्याने बसविले तसे त्याचे दोन्ही हात घट्ट धरून डोळ्यांना टेकवत आजोबांनी नमस्कार केला. 

"अहो आजोबा हे काय करताय?" असे म्हणत रजत मागे सरकला.

"अरे लेका , तुझ्या रुपात माझा देव धावून आला बघ,  आज त्याचं दर्शन झालं मी भरून पावलो. नाहीतर माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण त्याने तुझ्यामार्फत माझी मदत केली. दगडातला देव भेटला नाही पण माणसातला भेटला अजून काय पाहिजे?" 


रजतने डबडबलेल्या डोळ्यांनी आप्पांकडे बघितलं आणि त्याच वेळी जवळच्याच पायरीवर बसून एक आंधळा भिकारी गाऊ लागला, 


तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो

नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो

तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो

शोध, नाही कुठे या पसाऱ्यात तो

रोज वृंदावनी फोडी जो घागरी

तोच नाथा घरी वाहातो कावडी

गुंतला ना कधी मंदिरी, राउळी

बाप झाला कधी जाहला माऊली

भाव भोळा जिथे धावला तो तिथे

भाव नाही तिथे सांग धावंल का?

बघ उघडुनी दार अंतरंगातला देव घावल का?


गौरी हर्षल कुलकर्णी

२७ जुलै २०२०




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी