विषारी सकारात्मकता - गौरीहर्षल

#विषारी_सकारात्मकता
#toxic_positivity

टायटल बरोबरच आहे. आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना कोरोना आपल्या आयुष्यात आला आणि त्याने गेल्या काही महिन्यात यथेच्छ धुमाकूळ घालत आपल्या आयुष्यात नको तितके बदल घडवून आणले. त्यातले काही बदल अर्थातच चांगले आहेत तर काही नाहीत. पण ह्या सगळ्यात ज्या गोष्टीचा गवगवा सोशल मीडियावर जास्त झाला ते म्हणजे सकारात्मकता किंवा positivity. 
जो तो उठला आणि सांगत सुटला की आपण आलेल्या परिस्थितीत सकारात्मक विचार करत कसं जगायला हवं. पण म्हणतात नं अति तिथे माती तसंच काहीसं ह्या सकारात्मकतेच्या दृष्टिकोनाचंही झालंय. आणि त्यातून आता हे नवीन पिल्लू बाहेर पडले आहे ज्याचं नाव आहे 
#विषारी_सकारात्मकता अर्थात #toxic_positivity.

आता प्रश्न आहे की सकारात्मकता सुद्धा घातक ठरू शकते का? तर हो. कशी?
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे नेमकं काय आहे ते आधी बघू. 
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे आयुष्यात कितीही अडचणी,अवघड प्रसंग आले तरीही त्यामुळे होणारा त्रास लपवत सतत आनंदी किंवा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे. 
आता कुणी म्हणेल ह्यात काय चुकीचं आहे? तर आनंदी,सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे ह्यात काहीच चुकीचं नाहीये चुकीचा आहे तो दृष्टीकोन जो मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सतत सकारात्मक राहायला सांगतो. 
माणूस आनंदी कधी होईल जेव्हा त्याला योग्य मनस्थितीच्या  मदतीने आलेल्या वाईट परिस्थितीत ही जगण्याचा मार्ग सापडेल. मग जर आपल्याला एखाद्या गोष्टीने दुःख होत आहे, त्रास होत आहे तर त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधायचं की फक्त आनंदी असल्याचं चित्र उभे करून जगायचं? 
एखादी दुःखी, त्रासदायक भावना जर सतत दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात ती जास्त तीव्रतेने त्रासदायक ठरू शकते. 
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी बाबतही हेच होतं -
वस्तुस्थितीचा स्विकार करून त्यातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बरेच जण ती अमान्य तरी करतात किंवा चक्क दुर्लक्ष करून आहे तेच ठीक आहे असं स्वतःला सांगत राहतात. 
​इतरांना दाखवण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर स्वतःच्या श्रीमंतीचे , आनंदी असण्याचे प्रदर्शन करत असतात. 
सतत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टेटस म्हणून बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह vibes ओन्ली अशा अर्थाचे स्टेटस शेयर करतात. 
जर कुणी प्रॉब्लेम मध्ये असेल आणि त्याने अशा व्यक्ती जवळ ते सांगायचा प्रयत्न केला तर ह्या व्यक्ती त्यात काय एवढं वगैरे म्हणत ऐकून घेण्याआधी तो प्रॉब्लेम किती क्षुल्लक आहे हे सांगतात.

यामागे आपली एक जुनी मानसिकताही घातक ठरते ती म्हणजे आपला त्रास मग तो पुरुष असो किंवा स्त्री कुणालाही कळू द्यायचा नाही. पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर लोक काय म्हणतील? हेच बिंबवले जाते. मग कितीही त्रास होत असला तरी ही तो लपवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे तो त्रास कमी होण्याऐवजी अजून वाढत जातो. 
प्रत्येकाला ह्या गोष्टीचं स्वतःपुरत तरी निरीक्षण करून लक्षात येईल की आपण असे वागत आहोत का? जर ऊत्तर हो असेल तर काय करता येईल? हाही विचार करायला हवा. 
--- आयुष्यात घडलेल्या एखाद्या घटनेने,प्रसंगाने जर आपल्याला वाईट वाटतंय,निराश झाल्यासारखे वाटतेय तर सगळ्यात आधी  त्या भावनेचा स्वीकार करायला शिका.  
--- ती भावना जरी नकारात्मक असली तरी त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका, मनात कुठल्याही प्रकारचा अपराधीपणा येऊ देऊ नका. 
---उलट स्वतःला सांगा की चढउतार, यशापयश हे आयुष्याचा एक भाग असतात  संपूर्ण आयुष्य नाही.
--- सोशल मिडिया वरील जे अकौंटस बघून तुम्हाला स्वतःला बदलावेसे वाटते, स्वतः बद्दल कमीपणा वाटतो ती सगळी अकौंटस अनफॉलो करा. 
--- आपल्या मनातल्या भावना लिहून काढा. लिहून काढल्याने मनातल्या भावनांचा निचरा होण्यास मदत होते. 
--- तुमच्या आयुष्यात खरे पॉझिटिव्ह बदल तेंव्हाच घडतील जेव्हा तुम्ही स्वतःला स्वतःच्या नजरेतून बघाल. स्वतःला आहे तसे स्विकारून जगण्याचा प्रयत्न कराल. 

आता ह्यावरून जर तुम्हाला तुमच्या जवळपास कुणी असं करताना दिसत आहे तर काय कराल? 
तू हे असले स्टेटस का टाकतोस किंवा टाकतेस म्हणून लगेच त्यांना बोलायला सुरुवात करू नका. 
तर त्या व्यक्तीच्या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करा. त्याला काही प्रॉब्लेम आहे का ते शोधून काढण्याचा प्रयत्न करा. 
"तुला काय वाटतंय ते बोलण्याचा प्रयत्न कर, मी ऐकतोय"  ह्याची जाणीव करून दया.  बऱ्याचदा मदतीपेक्षाही कुणीतरी आपलं ऐकावं हीच अपेक्षा असते. 
त्याला किंवा तिला बोलते करण्याचा प्रयत्न करा. 
आवश्यक असल्यास तज्ञांची मदत घ्या. 
आपली एक छोटीशी कृती कुणासाठी तरी खूप महत्त्वाची ठरू शकते हे लक्षात घ्या. 
          वाचक मित्रांनो जग जर फक्त ब्लॅक अँड व्हाईट असते तर आपण इतके आनंदी असतो का ? नाही नं! 
मग तसेच भावनांचेही आहे. सकारात्मक आणि नकारात्मक ह्या भावनाही अशाच आहेत, पण कोणत्या वेळी कुठली भावना मनात येते हे मात्र ओळखणे आपल्या हातात आहे. त्या भावनेला योग्य प्रकारे प्रतिसाद दिला तर प्रश्न सुटण्यासाठी मदतच होते. हे जमत नसेल अवघड जात असेल तर वेळीच योग्य ठिकाणाहून मदत घ्या. 
जाता जाता इतकंच म्हणेन ,
Toxic Positivity is not positive. Face it. 
इतरांच्या दिखाव्याला भुलून स्वतःच्या आयुष्यात विष कालवू नका. चकाकतं ते सगळं सोनच नसतं हे लक्षात ठेवा. 
#गौरीहर्षल



टिप्पण्या

Shweta karkare म्हणाले…
#Toxic positive lokancha blood group pan positive asto.
Kahisa vegla, ani navin vishay...
Thanks

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी