शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

कितीदा नव्याने

"कितीदा नव्याने तुला आठवावे,

डोळ्यातले पाणी नव्याने वहावे"


गाणं ऐकलं आणि त्याला नकळतच हसू आलं. स्मृतींची पाने उलटून तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाही. 


नकळत्या वयात तिच्या प्रेमात पडला होता तो. ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हेही समजत नव्हते.


 ती वर्षं त्याच्या आयुष्याच्या, करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षं होती. पण मधेच ती भेटली आणि एका क्षणात त्याच्या मनात खळबळ माजली. 


अभ्यास एके अभ्यास करत जगणारा मुलगा सगळं काही सोडून तिच्या स्वप्नांमध्ये रमू लागला. रात्रंदिवस सतत तीच दुसरं काही त्याला सुचेना. ती दिसली की तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या अवतीभवती घुटमळत राहू लागला. 


आजूबाजूला सर्वांनाच जसं हे समजलं तसं तिलाही समजलं होतच.इतर मुलींसारखं तिलाही ते आवडत होतं,पण तीही त्याच्यासारखीच होती करियर वगैरे गोष्टीना पहिली प्रायोरीटी देणारी त्यामुळे इतक्या हुशार मुलाने असं वागलेल तिला आवडलं नव्हतं. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. 


शेवटी एक दिवस त्याने तिला त्याच्या भावना सांगितल्या, तिला कदाचित अंदाज आला होताच. दोन दिवस मागून घेत ती निघून गेली. 


तिच्या वागण्याने गोंधळून गेलेला तो तिला पाठमोरी जाताना बघत होता. दोन दिवसानंतर तिच्या मैत्रिणीने एक पत्र आणून त्याला दिले. ती त्या दिवशी भेटली ती परत आलीच नाही. 


तिच्या न येण्याने तो पुरता कोलमडून गेला होता. पुढचे काही दिवस फक्त आणि फक्त निराशेत, उदास गाणी ऐकण्यात गेले.  ते पत्र अजून उघडून बघितलेही नव्हते त्याने. 


शेवटी कसाबसा मनाचा हिय्या करत त्याने ते पत्र उघडले. त्यात लिहिलेलं वाचल्यावर जे काही घडलं ते कुणालाही अनपेक्षित अस होतं. त्या दिवसानंतर तो आमूलाग्र बदलला. 


एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस. 


आयुष्यात ठरवलेल्या सर्व गोष्टी त्याने प्रचंड कष्ट करून मिळवल्या होत्या. आज जेव्हा त्याला त्यासाठी पुरस्कार मिळत होता तेव्हा तो मात्र त्याच श्रेय तिला देत होता. 


ते पत्र त्याने एक क्षणभरही स्वतःपासून दूर केले नव्हते.


त्यांचं एकत्र येणं कधीच शक्य होणार नव्हते पण ते तिने इतक्या छान पद्धतीने सांगितले की त्याला तिला गमावूनही मिळवल्याची जाणीव झाली. 


त्या समजूतदार पत्राने त्याला प्रेमाचा नवा मार्ग दाखवत सोबतीची उणीव भरून काढली होती. ती आज नसूनही त्याच्यासोबतच होती. 

गौरी हर्षल कुलकर्णी

२७ जुलै २०२०






अंतरंगातला देव

गॅलरीत ठेवलेल्या आरामखुर्चीत बसून आप्पा रेडिओवर गाणी ऐकत होते. पुढचं गाणं सुरू झालं तसा त्यांच्या डोळ्यांसमोर एक चेहरा तरळून गेला. 

तो दिवस आठवल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला. 


पावसाने सगळीकडे थैमान घातलं होतं. श्रावण महिना असल्याने त्या दिवशी घरात पूजा केली होती. रजत कुरकुर करतच पुजेला बसला होता. त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण आप्पांचं मन मोडू नये म्हणून तो  करत असे. 

आप्पा त्याला नेहमी समजावत की एक दिवस कुठल्या न कुठल्या रुपात तो नक्की तुला भेटेल. तेंव्हा तूच मला सांगशील. 


अशातच संध्याकाळी मागच्या गल्लीत असणारी चाळ कोसळली अशी बातमी आली. थोड्याच वेळात त्यांच्या इथेही सूचना आल्या गरजेच्या सामानासह दुसरीकडे निघण्याची तयारी सुरु करा अशा. 


आप्पा ही सगळ्यांच्या सोबत ठरलेल्या ठिकाणी आले. 

"काय उपयोग झाला पूजा करून आला का तुमचा देव आपल्याला वाचवायला? उलट घर सोडून आलो आपण." रजत बडबड करू लागला. 


पाण्याचा जोर वाढला होता. सगळ्यांच्याच मनात आता खळबळ माजली होती. सोबत काही लहान मुले,गरोदर स्त्रियाही होत्या. 

हळूहळू त्या सगळ्यांना पुढच्या ठिकाणी पोहोचण्याचं काम सुरू झालं. रजतसोबतच सगळी तरुण मुलं मदतीसाठी पुढे झाली. 

जातपात, वय, स्त्री पुरुष सगळे भेदभाव बाजूला सारून फक्त माणुसकीच्या नात्याने जो तो मदत करत होता. रात्र सरता सरता सगळे टेकडीच्या माथ्यावर असलेल्या मोठ्या मंदिरात जाऊन पोहोचले. 

रजत एका वयोवृद्ध आजोबांना पाठीवर घेऊन आला होता. त्यांना व्यवस्थित जागा बघून त्याने बसविले तसे त्याचे दोन्ही हात घट्ट धरून डोळ्यांना टेकवत आजोबांनी नमस्कार केला. 

"अहो आजोबा हे काय करताय?" असे म्हणत रजत मागे सरकला.

"अरे लेका , तुझ्या रुपात माझा देव धावून आला बघ,  आज त्याचं दर्शन झालं मी भरून पावलो. नाहीतर माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण त्याने तुझ्यामार्फत माझी मदत केली. दगडातला देव भेटला नाही पण माणसातला भेटला अजून काय पाहिजे?" 


रजतने डबडबलेल्या डोळ्यांनी आप्पांकडे बघितलं आणि त्याच वेळी जवळच्याच पायरीवर बसून एक आंधळा भिकारी गाऊ लागला, 


तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो

नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो

तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो

शोध, नाही कुठे या पसाऱ्यात तो

रोज वृंदावनी फोडी जो घागरी

तोच नाथा घरी वाहातो कावडी

गुंतला ना कधी मंदिरी, राउळी

बाप झाला कधी जाहला माऊली

भाव भोळा जिथे धावला तो तिथे

भाव नाही तिथे सांग धावंल का?

बघ उघडुनी दार अंतरंगातला देव घावल का?


गौरी हर्षल कुलकर्णी

२७ जुलै २०२०




लग जा गले

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


तिच्या आवाजातली व्याकुळता तो आपल्या मनात नकळतच साठवून ठेवण्याची धडपड करत होता. ड्युटी पुन्हा जॉईन करा असा तडकाफडकी निरोप आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी तिचा चेहरा आला होता. दोनच दिवसांनी असणारा त्याचा वाढदिवस ह्यावेळी तरी एकत्र साजरा करता येईल म्हणून किती प्लॅन करत होती ती. काही त्याला सांगून तर काही लपून छपून. पण आता मात्र ते शक्य नव्हतं. 


शेवटी मनाचा हिय्या करत त्याने तिला सांगितलंच. क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत ती त्याला म्हणाली, "बरं झालं माझी सगळी तयारी झाली होती ते. तुझे सगळे गिफ्ट्स तरी तुला प्रत्यक्ष देता येतील. आणि तुला अजून काही हवं असेल तर ते ही आणता येईल. उद्या दुपारी जाणार न तू?"


तिचं वागणं बघून तो थक्क झाला होता. आपल्याला कस कळलं नाही कधी एवढी स्ट्रॉंग झाली ही? सायन्सच्या प्रॅक्टिकलला डिसेक्शन करताना घाबरलेली ती आणि आत्ताची ही केवढा फरक पडला. 

ते काहीही असलं तरी मी मात्र अजूनच प्रेमात पडतोय हिच्या. माझ्यासोबत माझी स्वप्नं भरभरून जगतानाही तिने स्वतःच्या स्वप्नांना जिवंत ठेवलं आहे. सोबतच घरच्यांनाही सांभाळते. तो स्वतःशीच विचार करत असतानाच ती आली आणि म्हणाली, चल रे सगळे जमले आहेत टेरेसवर आज मस्त पोटभर गप्पा मारू. 


त्या गप्पाच्या ओघातच त्याने तिला गाणं म्हणायला लावलं होतं आणि रेकॉर्ड पण करून घेतलं होतं. 

ती हसली तेंव्हा तो म्हणाला होता, "आठवणीच जगण्यासाठी मदत करतात ग. अवघड क्षणी डोळे मिटून एक छानशी आठवण जगून घेतो मी कारण ती मला बळ देते समोर आलेल्या संकटाला परतवून लावण्यासाठी. मी एकवेळ माणसाचे चेहरे विसरेन पण आठवण मात्र मनाच्या एका कप्प्यात सुरक्षित असेल. आणि तीच मला नव्याने सुरुवात करताना सोबत करेल." 

तेच गाणं तो ड्युटीवर परत जाताना रिपीट मोडवर ऐकत होता. पण प्रत्येक वेळी त्याला तिची नवीन आठवण हसवून जात होती. 


काही दिवसानंतर

इकडे आता त्याचा संपर्क तुटल्यापासून पंधरा दिवस झाले होते. 

शोध जरी सुरू असला तरी तो कधी सापडणार? कशा अवस्थेत ह्याची काही कल्पना नव्हती.मनातून मात्र  प्रत्येकाला आपल्या शंका खोट्या ठराव्यात असच वाटत होतं. 

 शेवटी शोध लागेल कधीतरी अस म्हणत सगळेच आपापल्या मार्गाला लागले. तीही आशेच्या हिंदोळ्यावर झुलत त्याची वाट बघत होती. पण मन मानेल तर ना? 


आणि एक दिवस तिला अपेक्षित बातमी आली. तो सापडला होता. बेशुद्ध अवस्थेत पण जिवंत होता. ती मिळेल त्या वाहनाने त्याच्या जवळ पोहोचली. पण त्याच्या डोळ्यात ओळखीची खूण नव्हती. बऱ्याच उंचावरून पडल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने आठवणी धूसर झाल्या होत्या. 


जखमा ताज्या असल्याने मेंदूवर ताण देऊन चालणार नव्हते. तेव्हा फक्त जुजबी ओळख पटवून देत तिने त्याला घरी येण्यासाठी तयार केले होते. 

सगळे सोपस्कार पार करून त्याने स्वतःच्याच घरी गृहप्रवेश केला. माणसं जरी त्याला अनोळखी वाटत असली तरी त्यांचे डोळे त्याला सतत काहीतरी वेगळं दाखवत होते. 


आईवडिलांसाहित सगळ्यांनी मिळून आधी त्याच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. तो मान्य करून तो ही आता त्यांच्यामध्ये मिसळू लागला होता. 

तिचीच कल्पना होती ती पण ती स्वतः मात्र जरा जपून त्याच्या आसपास वावरत होती. कारण तो तिच्याकडे बघितलं की अस्वस्थ व्हायचा. ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्याला जाणवत होते पण तिचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे हेच त्याला आठवत नव्हते. इतरांना त्रास नको म्हणून त्याने वरवर जरी नवराबायको आहोत हे मान्य केले होते तरी एकांतात मात्र त्याने तिला वेळ मागितला होता. तिनेही त्याला तो दिला होता कारण त्याच्या आठवणींच्या थियरीवर तिचा पूर्ण विश्वास होता. 


अशातच एके दिवशी तिला सहज गाणं म्हणायची हुक्की आली तो घरात नव्हता त्यामुळे ती मस्त मोकळ्या आवाजात मनापासून सूरांना आळवत होती. 


पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार

बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार

आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


मनातलं सगळं दुःख तिच्या आवाजात स्पष्ट जाणवत होतं. शेवटची ओळ म्हणत असताना ती मागे वळाली आणि जागेवरच थबकली. समोर तो उभा होता डोळ्यात अश्रू पण ओठांवर मात्र आज ओळखीचं हसू आलं होतं. त्याच्या आठवणीनी अखेर त्याला तिची ओळख पटवून दिली होती. 

गौरी हर्षल 




बुधवार, २२ जुलै, २०२०

मला आवडलेलं पुस्तक भाग १

#मला_आवडलेलं_पुस्तक
जिवात्म जगाचे कायदे / laws of spiritual world 
लेखिका - खोरशीद भावनगरी

मागच्या वर्षी एका ग्रुपवर अशीच पुस्तकावर चर्चा सुरू होती तिथे ह्या पुस्तकाचा विषय निघाला. कुणाला आवडले होते कुणाला नाही. 

चर्चा वाचून शेवटी पुस्तक मागवलं. हे पुस्तक मात्र नेहमीप्रमाणे एका बैठकीत वाचून संपवलं नाही. निवांत वेळ काढत एकेक प्रकरण वाचलं. आणि मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. 

पुस्तक लिहिले आहे खोरशीद भावनगरी ह्यांनी. पुस्तकाच्या नावावरून विषयाचा अंदाज येतोच पण तरीही सांगते. हे पुस्तक हा त्यांच्या दोन दिवंगत मुलांच्या आत्म्यांशी असलेला संवाद आहे. असा संवाद जो व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील बऱ्याच सवयी, पद्धती ह्यांच्यावर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतो. 

पुस्तक कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाही कारण तसं काहीच ह्या पुस्तकात नाही. ह्या आत्म्यांशी संवाद हा विशिष्ट पद्धतीने साधला गेला आहे. त्या पद्धतीही त्याचं उत्तम ज्ञान घेऊनच वापरल्या आहेत. (Planchet वगैरे फालतू प्रकार नाहीत? )

मला हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे एक तर वयाच्या मानाने बऱ्यापैकी लवकर ते माझ्या हातात पडले आहे. आणि दुसरे म्हणजे जेव्हा आयुष्यात एखादी वाईट किंवा चुकीची गोष्ट घडते तेव्हा आपण आपलं नशीब, देव किंवा इतरांना बोल लावत बसतो. पण हा विचार कधीच करत नाही की अरे मी कधी न कधी कळत नकळत त्या व्यक्तीचं, प्राण्याचं काही नुकसान केलं आहे का? 

कारण हे पुस्तक पूर्वजन्मापासून ते मृत्यूनंतर घडणाऱ्या अनेक गोष्टी साध्या सोप्या भाषेत सांगते. अर्थात  ज्या मला पटल्या आहेत. 


छोटी छोटी उदाहरणे देत सत्यकथेवर आधारित हे पुस्तक वाचताना आयुष्याची एक नवीन बाजू सांगते हे मात्र नक्की. 

(वाचायचे असल्यास पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे.)
#गौरीहर्षल
#पुस्तकवाचन


मंगळवार, २१ जुलै, २०२०

रंजीश ही सही🎶🎶 भाग १

रंजीश ही सही 🎶🎶

भाग १ 

आपल्या छोटयाशा घरात असणाऱ्या मोठ्या खिडकीत टांगलेल्या झोपाळ्यावर झोके ती बाहेर कोसळणारा पाऊस बघत होती. 

मागे बॅकग्राऊंडला रुना लैलाच्या आवाजात तिची आवडती गझल बरसत होती अगदी रिपीट मोडवर. 
(Lyrics By: अहमद फ़राज़)

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
रंजिश ही सही...

इक उम्र से हूँ लज्ज़त-ए-गिरया से भी महरूम
ऐ राहत-ए-जां मुझको रुलाने के लिये आ
रंजिश ही सही...

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ
रंजिश ही सही...

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...

पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही...

एका क्षणी तिला मनावरचा भार इतका नकोसा झाला की मेंदूचं न ऐकता डोळे पाझरू लागले. 

का इतक्या हतबल झालो आपण? ती स्वतःलाच विचारू लागली. का आपण एकदाही प्रयत्न केला नाही स्वतःच्या समाधानासाठी? जी मुलगी स्वतःच्या सुखासाठी तडजोड करत नव्हती ती त्या व्यक्तीच्या एका शब्दाखातर सगळं सोडून कशी काय निघून आली? 

दुसरीकडे तिच्याच मनाने त्या प्रश्नांची उत्तरे दिली, मग काय करू शकणार होतीस तू? त्या क्षणी तुझ्या सुखापेक्षा इतरांची आयुष्य जास्त महत्वाची होती. 
    आणि आफ्टर ऑल द ग्रेट पौरवी देशमुख ह्यांना त्याग करून मोठ्ठं व्हायचं होतं न? शेवटचं वाक्य ऐकताच तिच्या अंगावर काटा आला. 

खरंच अस होतं सगळ्यांच्या नजरेत मोठेपणा हवा म्हणून मी अशी वागले की मला त्या सगळ्यांचं सुख महत्वाचं वाटलं? 
मोठेपणाच हवा होता तर घरच्यांना हव्या असलेल्या मुलाशी लग्न करूनही मिळवता आला असता की.
 पण मला ते नव्हतं करायचं मला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि त्यालाही दाखवून द्यायचं होतं की पौरवी देशमुख काय चीज आहे. 
जिने एकदा नातं जोडलं की मग ती त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकते. आणि जर नातं तोडलं तर त्याचं लोकांना कायमचं विसरून जगुही शकते. 

काय म्हणाला होता तो मला? तू जळतेस माझ्यावर! अरे हट मी जर तुझ्यावर जळले असते न तर तुझ्या हातात माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचा हात कधीच दिला नसता. 

आरुषी , तिचं नाव ओठांवर आणि चेहरा क्षणार्धात पौरवीच्या नजरेसमोर येऊन गेला. लग्नाच्या वेळी आरु च्या चेहऱ्यावर असणारा तो आनंद बघण्यासाठी तर पौरवीने आयुष्यभरासाठी वनवास स्विकारला होता. 

मुंबईत असणारे सरळसोट पण जीव की प्राण आयुष्य सोडून  ती  ह्या मनालीजवळ असणाऱ्या गावात येऊन राहिली होती. सगळ्या सुखसोयी सोडून स्वतःच्या जीवावर मागच्या दोन वर्षात तिने बरीच प्रगती केली होती. 

आज तिच्याकडे छोटंसं घर, गाडी तर होतीच पण अहोरात्र मेहनत करून तिने तिच्या बुटीकच्या दोन शाखा तिने मनालीत उभ्या केल्या होत्या. पण तिला शांत वातावरण खूप आवडतं असल्याने तिने घर घेताना ते गाव निवडलं होतं. तिथून मनालीला  जाण्यास फारसा वेळ लागत नव्हता त्यामुळे तिला ते सोयीचं होतं. 

आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच की ही नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी कथा आहे. 
तर ही गोष्ट आहे एका अशा मुलीची जिचा प्रवास सुरू झाला मुंबई मध्ये आणि सध्या तो येऊन थांबला आहे हिमाचल प्रदेशात असणाऱ्या मनालीत. 
पौरवी देशमुख , एका नाकासमोर चालणाऱ्या मराठी कुटुंबात जन्माला आलेली ज्येष्ठ कन्या. अभ्यासात प्रचंड हुशार असायलाच हवी न कारण मध्यमवर्गीय लोकांना त्याशिवाय पर्यायच नसतो. पण तरीही तिने फॅशन डिझायनिंगचं क्षेत्र निवडलं आहे. 

त्या क्षेत्रात ती थोडीफार धडपडत उभी रहातच होती पण तेवढ्यात तिच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की तिला सगळं काही सोडून द्यावे लागले. 

आता अस काय घडलं होत ते कळेलच हळूहळू तोपर्यंत पहिला भाग कसा वाटला नक्की कळवा. 
क्रमशः
#गौरीहर्षल

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

ट्विस्ट अँड टर्न

#ट्विस्ट_अँड_टर्न 
सिरियल्सना कितीही नाव ठेवली तरी आपण सगळे सिरियल्स, डेली सोप बघतो. त्यात रमतो, कुणी चेष्टा करण्यासाठी बघतात तर काही जण आपापल्या दुःखाना विसरण्यासाठी बघतात. पण इथे तो विषयच नाहीये. 

इथे सिरियलच्या गोष्टीतली गोष्ट आहे. म्हणजे बघा ना सगळ्या सिरियलमध्ये त्या हिरो हिरोईनला इतर पात्रांना दोन ते तीन वेळा चान्स मिळतो नव्याने आयुष्य सुरू करण्याचा. आणि तेही मेक ओव्हर सहित.

बऱ्याच जणांना हे बघायलाच जास्त आवडतं.
कारण खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही न. 

पण सध्या घडतंय की , आपल्या सगळ्यांचं आयुष्य स्थिर झालं आहे एका ठिकाणी येऊन कुणीही पुढे जात नाहीये कुणीही मागे रहात नाहीये. 

सगळे फक्त जगण्याची उमेद धरून ठेवण्याची धडपड करत आहेत. 
प्रत्येक जण आपापल्या परीने कसल्या न कसल्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करतोय.
ह्यात कधी कधी चिडचिड होतेय भांडणं, वादही होताहेत.

पण ते सगळं बाहेरच्या नकारात्मक परिस्थितीशी जुळवून घेताना होणारच. 
 
असो तर आपण बोलत होतो सिरियलसारख्या खऱ्या आयुष्यात आलेल्या ट्विस्ट आणि टर्न बद्दल. 

हा ट्विस्ट सध्या भरपूर बदल घडवतोय. 
काही गोष्टी काही माणसं नव्याने भेटत आहेत , कळत आहेत. 
स्वतःबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत.
आपल्या माणसांना पारखण्याची , ओळखण्याची एक संधीच आपल्याला मिळाली आहे.

आणि आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे मागे रेलून बसत शांतपणे फक्त निरीक्षण करायचं आहे. 

सिरीयलसारखे एकामागे एक सीन समोर येत जाणार आपण मात्र त्यातून निरीक्षण करत हवं ते घ्यायचं आहे.

आता कुणाला काय हवं हे तर जो तो ठरवणार त्यामुळे ते काही मी सांगत नाही.

पण एक सल्ला मात्र देते सिरियलमध्ये कस चांगलं घडावं म्हणून आपण वाट बघतो तसच इथेही व्हावं ही एक इच्छा आपल्याला मनात सतत जागी ठेवावी लागेल. 

आणि मग कदाचित आपल्या आयुष्याच्या डेली सोपची स्टोरी आपल्या मनाप्रमाणे लिहिली जाईल.

अन् ह्या ट्विस्ट नंतर जो टर्न येईल न तो अनपेक्षित असे चांगले अनुभव घेऊन येईल.

बघूया कितपत जमतंय ते.
तोपर्यंत मनाला गुंतवा स्वतःच्या कथेत. 
बेस्ट लक शुभं भवतु!!!
©®गौरीहर्षल

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

जिंदगी धूप तुम घना साया

#जिंदगी_धूप_तुम_घना_साया

तसे ते दोघेही कानसेन सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायचं मग त्यातल्या आवडलेल्या आणि न आवडलेल्याही गाण्यांवर चर्चा करायची. हा दोघांचा आवडता छंद सोबतीला चहा असायचाच कधी वाफाळणारा तर कधी iced टी सुद्धा पण ते मुडवर अवलंबून असे. 

आताशा दोघेही व्यापातून निवांत झाले होते. पिल्लं अजून घरट्यातून उडाली नव्हती,पण आता त्यांची विश्व निर्माण झाली होती. त्यामुळेच ह्या दोघांना स्वतःला आणि एकमेकांना देण्यासाठी हवा तसा अन् तेवढा वेळ काढता येत होता. ते ही धडपड करतच होते कारण इतक्या वर्षांच्या काळात त्यांना एकमेकांना दिलेलं पहिलं वचन निभवायचं होतं. कोणत? मनापासून जगण्याचा आनंद घेण्याचं. 

लग्नाआधी जेव्हा ते एकदाच एकमेकांना भेटले होते तेंव्हाही दोघांची चर्चा गाण्यावरच झाली होती. ते भेटले त्या हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला जगजितच्या गझल सुरू होत्या. हॉटेल मालकच फॅन होता वाटतं कारण एकसे एक गझल , गाणी कानावर पडत होती. 

त्यातच तुमको देखा तो ये खयाल आया सुरू झालं आणि एकाचवेळी दोघांनी एकमेकांकडे बघितलं. मनाची मनाला खूण पटली आणि अवघडलेपण गळून पडले. 
"मला हे गाणं प्रचंड आवडतं" दोघेही एकत्रच बोलले आणि हसलेही. 
"आपल्या आत्ताच्या प्रसंगात अगदी फिट झालं ना हे ?"
त्याचा आवाज हळवा झाला होता.
तिचेही डोळे नकळतच भरून आले. 
आपापल्या घरी दोघेही मोठे होते. दोघांचंही नशीब इतकं सारख होत की थोड्याफार फरकाने घरादाराची जबाबदारी दोघांच्याही खांद्यावर फार लवकर आली होती. मग त्यातून वाट काढताना त्यांना स्वतःसाठी वेळच उरला नव्हता. सगळ्यांचं सगळं मार्गी लावल्यावर मग त्यांचा विचार करावा अस कुणालातरी सुचलं होत तेही म्हातारपणी त्यांच्या जबाबदाऱ्या नको म्हणून. 
कुणी प्रत्यक्ष बोललं नसलं तरी त्या दोघांनाही ते जाणवलं होतं. त्या काळच्या मानाने उशीर झाला असला तरी दोघेही संसार थाटायला तयार झाले. 
आवडीनिवडी कधीच बाजूला पडून गेल्या होत्या पण एकमेकांशी मैत्री मात्र निभवायची अस ठरवत ते एकत्र आले. 
पहिल्या रात्री तो तिला बघून त्याच गझलच्या दोन ओळी गुणगुणला होता, 
तुमको देखा तो ये खयाल आया,
जिंदगी धूप तुम घना साया.....

त्याला जेव्हा जेव्हा भरून येत असे तो ह्या दोनच ओळी गुणगुणत असे हे तिला आता सरावाने कळलं होतं. तिचीही अवस्था काही वेगळी नसायची.
तशातच तिचं कॅलेंडरकडे लक्ष गेलं आजच्याच दिवशी ते भेटले होते. Iced टी घेऊन ती तो बसला होता तिथे येऊन बसली. त्याच्या हातावर हात ठेवून त्याला डोळ्यांनी आश्वस्त करत तिने म्युझिक प्लेयर सुरू केला. 
आपापल्या आवडीच्या जागी बसत दोघेही सुरात कधी गुंतले त्यांनाही कळलं नाही. 

आयुष्याच्या वेगळ्या वळणावर एकत्र आलेल्या त्या दोन जिवांसाठी सावलीची उणीव त्या शब्दांनीच तर भरून काढली होती. नकळतच ते एकमेकांसाठी घना साया कधी झाले ते त्यांनाही कळलं नव्हतं.
©गौरीहर्षल