#स्वप्नांची_खिडकी
"पलभर के लिए कोई हमे प्यार कर ले" असं म्हणत देव आनंद हेमा मालिनीच्या मागे स्क्रीनवर धावू लागला. तशी ऋतुजा हातातलं काम टाकून देत लगबगीनं टीव्हीसमोर येऊन बसली. लहानपणापासून तिला हे गाणं प्रचंड आवडत होतं. तुम्ही समजताय तसं हिरोईन, हिरो किंवा गाण्यामुळे नाही तर त्यातल्या खिडक्यांमुळे. जेंव्हा पहिल्यांदा तिने चित्रपट बघितला तेंव्हा ते कळण्याचं तिचं वयही नव्हतं. पण ते गाणं त्या खूप सगळ्या मोठ्या मोठ्या खिडक्यांमुळे तिच्या मनात घर करून राहिलं कायमचं. त्यांचं घर तसं खूपच छोटं होतं त्यामुळे एकच खिडकी तिच्यातून प्रेक्षणीय असं काय दिसणार ना... असो तर त्या बंगल्याच्या खिडक्या तिला आवडल्या लहान असताना लपाछपी खेळायला किती मज्जा येईल तिथे म्हणून आणि मोठी झाल्यावर आणखी गोष्टी लक्षात आल्यामुळे. घरात सगळेच तिची ह्या वेडामुळे चेष्टा करायचे पण तिला काही फरक पडत नव्हता. पुढे मागे माहेरचं घरही मोठ्ठ झालं हवे तसे बदल घरच्यांनी केले पण ती सासरी जाणार असल्याने तिच्या आवडीनिवडी कुणी फारश्या लक्षात घेतल्या नाही. तिचं मन थोडंसं खट्टू झालं पण तिने स्वतःला समजावलं की इथे नाही पण स्वतःच्या हक्काच्या घरात मात्र एक तरी खिडकी अशी बनवून घेणार. त्या हक्काच्या खिडकीत स्वप्नांची माझी भेट नक्की होणार.
काही दिवसांतच तिच्यासाठी तन्मयचं स्थळ तिला सांगून आलं.सगळं काही पटण्यासारखं असल्याने तिनेही होकार दिला. आता ती आणि तन्मय खरेदीच्या निमित्ताने वारंवार भेटुही लागले. त्यातच तन्मयने लवकरच नवीन घर घेणार असल्याचं तिला सांगितलं. आणि त्याला आवडलेल्या एका साईटवर तिला घेऊनही गेला. घर तसं मस्तच होत रो हाऊस असल्याने मोकळी जागा भरपूर होती. अजून बांधकाम सुरू होतं.हळूहळू घराचं निरीक्षण ऋतुजा करत होती आणि तन्मय तिचं. घर आवडल्याच सांगताना तिच्या आनंदात काहीतरी मिसिंग आहे हे त्याला जाणवलं. पण काय ??? त्याचं उत्तरही त्याला घरी आल्यावर मिळालं. तिच्या भावाने घराचा विषय निघताच तिला खिडकीवरून चिडवण चालू केलं. पण तिने त्याला गप्प करत विषय थांबवला. मग तन्मय हळूच नंतर त्याला नेमकं काय गुपित आहे ते विचारलं. नवीन घरातच नवीन सुनेचा गृहप्रवेश करायच ठरलं होतं. इकडे ऋतुजा आपलं स्वप्न मिटून घेत लग्नाच्या धावपळीत गुंतून गेली होती. पण तन्मय मात्र कसल्यातरी खटपटीत होता त्याचा पत्ता त्याने घरात कुणालाच लागू दिला नाही. घराचं थोडं काम राहील आहे असं सांगत तो कुणालाही तिकडे फिरकू देत नव्हता. हा हा म्हणता धुमधडाक्यात लग्न पार पडलं. वरात नवीन घरी आली. वाजतगाजत ऋतुजाचे नवीन आयुष्यात पहिले पाऊल पडले. सगळे विधी, सोपस्कार पार पडल्यानंतर मात्र सगळ्यांनाच बंद असलेल्या तिसऱ्या मजल्यावर जाण्याची घाई झाली होती. तन्मय स्वतः आर्किटेक्ट असल्याने त्याने स्वतःच्या मित्राच्या मदतीने घराचं डिझाइन थोडंसं बदललं आणि एक छानसा कोपरा ऋतुजा साठी स्पेशल तयार केला होता. म्हणायला तो कोपरा पण प्रत्यक्षात त्याने सगळ्यात वरच्या मजल्याचा पूर्ण कायापालट करून टाकला होता. ऋतुजा सोबत सगळेच जण वरचा मजला बघण्यासाठी निघाले वर जाण्यासाठी जिथून पायऱ्या होत्या तिथे पहिल्या पायरीपासून सुरेख अशा दिव्यांची सजावट होती. दरवाजा उघडताच ऋतुजाला अगदी आकाश खाली उतरून आलं आहे असं वाटलं. जास्तीत जास्त काम सूर्यप्रकाशावर होईल अशी रचना केलेली होती. त्यामुळे सगळ्याच गोष्टींना एक वेगळा टच मिळाला होता. अर्ध्या भागात सुरेखशी बाग आणि झोपाळा होता तर उरलेल्या भागात छोटीशी लायब्ररी असणारी एक मोठीशी खिडकी होती. तिथेच लॅपटॉप टेबल आणि इतर गोष्टी मस्तपैकी मांडल्या होत्या. कधीकाळी ऋतुजाने बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी तन्मयने खूपच जास्त प्रयत्न केले होते. त्यांचं प्रतिबिंब तिच्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंमध्ये त्याला दिसत होत. ऋतुजाची स्वप्नांची खिडकी पलभर साठी नाही तर आयुष्यभरासाठी तिच्यावर स्वप्नांची बरसात करायला सजली होती ते ही तिच्या आवडीच्या माणसासोबत.....
#गौरीहर्षल
२८.१०.२०१७
शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७
स्वप्नांची खिडकी
बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७
हुलकावणी
हुलकावणी.......
सकाळी सकाळी ‘ती’ टेस्ट तिच्या चेहऱ्यावर न मावणारं हसू देऊन गेली. उत्साहाने भरून जात दोघेही स्वप्नांत गुंग झाले. अनपेक्षितपणे मिळालेला आनंद खूप काही क्षणार्धात बदलून गेला. कालपरवापर्यंत इतरांसाठी तर सोडाच पण स्वतःसाठीही महत्वाची नसणारी ती खूप महत्वाची असल्याप्रमाणे स्वतःलाच वागवू लागली होती.
पुन्हा एकदा ते सगळं अनुभवताना , मनापासून तो त्रास सहन करताना ती मोहरत होती. पण का कुणास ठाऊक मनातली जुनी भीती नकळतच डोके वर काढू लागली कि तिच्या अंगावर नकोसे शहारे येऊन जायचे. तरीही एकमेकांना सावरत,सांभाळत ते दोघेही परत उभे राहिलेच होते. काही दिवसातच तिला डॉ कडूनही सगळं ठीक आहे असा सिग्नल नक्की मिळणार याची तिला खात्री वाटत होती.
गेली काही वर्षं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असूनही ते दोघे सततच्या या हुलकावणीला वैतागले होते. त्यात नातेवाईक,शेजारी यांच्याकडून काहीही शहानिशा न करता हीन आणि टोमण्यांच्या रुपात होणारी चौकशी भरच घालत असे. आता मात्र असं होऊ नये अशी दोघांनाही आशा वाटत होती , तशी मनोमन प्रार्थनाही ते देवाजवळ करत होते.
अखेर तो दिवस उगवला धडधडत्या हृद्यानेच तिने डॉ च्या केबिनमध्ये प्रवेश केला. डॉ सोनोग्राफी झाल्यावरच काय ते सांगणार होते. ती उत्सुक चेहऱ्याने डॉ कडे बघत होती. डॉक्टर मात्र क्षणाक्षणाला नकारार्थी मान हलवू लागले. तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. डॉ त्या दोघांकडे बघत म्हणाले, “गर्भाची वाढ जरी अपेक्षित अशी असली तरी अजूनही बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नाहीत. तरीही आपल्याकडे काही दिवसांचा वेळ आहे आपण आवश्यक ते प्रयत्न करू.” शेवटचे दोन शब्द तिला खूप जास्त धीर देऊन गेले. पुढचे १५ दिवस गोळ्या, इंजेक्शन आणि वेगवेगळ्या तपासण्या यातच जाणार होते. पण तरीही त्या दोघांनीही कसलीच कमतरता ठेवायची नाही असा निश्चय करत घराचा रस्ता पकडला. घरी पोहोचल्यावर इतक्या वेळ बांधून ठेवलेल्या अश्रूंना तिने त्याच्या कुशीत शिरत मोकळी वाट करून दिली. पुन्हा एकदा देव आपल्याला इतकी वाईट शिक्षा नक्कीच देणार नाही असं तो तिला आणि स्वतःलाही समजावत होता. पुन्हा १५ दिवसांनी काय घडेल याची पुसटशी कल्पना येऊनही दोघेही बोलून दाखवत नव्हते.
त्या १५ दिवसात जवळपासच्या देवळांच्या पायऱ्या झिजवत प्रत्येकाने सांगितलेले उपायही दोघांनी केले. आपल्याकडून कुठलीच चूक होऊ नये म्हणून ते मनापासून समोर येणारा प्रत्येक उपाय करत होते. अशावेळी काहीतरी नक्की चांगल होईल या अपेक्षेने माणूस पटत नसणाऱ्या गोष्टीही करतो असच काहीसं त्यांचंही झालं होत. इकडे तिचे २ महिने संपून ३रा सुरु झाला आणि डॉ कडे जाण्याचा दिवसही उगवला.........
दोघेही डॉक्टरकडे पोहोचले. तिचे बाकीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे बघून डॉक्टरांच्या कपाळावरील आठ्या काहीश्या कमी झाल्या. हे बघून तिलाही जरा हायसं वाटलं. आता पुढची पायरी होती नेहमीप्रमाणे सोनोग्राफीची. सोनोग्राफी करत असताना आज काहीही न बोलता डॉ खूप शांतपणे तिला तपासत होते. क्षणोक्षणी तिचा जीव मात्र कसानुसा होत होता. शेवटी डॉक्टरांनी मौन तोडत तिच्याकडे रोखून बघत तेच शब्द उच्चारले जे तिला ऐकण्याची इच्छा नव्हती. १५ दिवसांपूर्वीची अवस्था न बदलल्याने तिची प्रेग्नन्सी टर्मिनेट करावी लागणार होती. जास्त उशीर केल्यास अर्थातच तिच्याही जीवाला धोका होताच. डॉक्टर आधीपासूनच काहीसे साशंक होते त्यांनी पुढच्या प्रोसिजरची तयारी ठेवली होती. मूकपणे ह्या सगळ्याला ते दोघेही सामोरे जात होते.
काही तासांनी ती जेंव्हा शुद्धीवर आली तो तिच्या उशाशी शांतपणे बसला होता. त्याच्या डोळ्यात खोलवर बघत तिने विचारलं, “मी आई उरले नाही नं रे पुन्हा एकदा?” तितक्यात जवळूनच एक आवाज तिच्या कानावर पडला. जो तिच्यासारख्याच काही प्रॉब्लेम्समुळे नुकतच आपल बाळ गमावणाऱ्या एका आईचा होता.
ती म्हणाली, “भलेही थोड्या काळासाठी का होईना पण तू तुझ्या शरीरात,मनात त्या बाळाला जपलं होतस त्यामुळे तुझं आई असण त्याचं जाणं पुसून टाकत नाही ग. आणि ती आई सगळ्यात जास्त ग्रेट असते जी आपल बाळ त्याला परत देऊनही खंबीरपणे उभी राहते.” तिचे ते शब्द त्या क्षणी तिला खूप काही सांगून गेले आणि गमावण्याचं दुखःही काहीसं सुसह्य झालं.
कुठल्याही आईचं मातृत्व तिचं मूल जन्माला येण्याआधीच गेलं म्हणून संपत नाही. जगातल्या त्या सगळ्याच स्त्रिया ज्यांनी कुठल्या नं कुठल्या कारणामुळे आपल मूल जन्माला येण्याआधीच गमावलं आहे त्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही त्या बाळाला जपत असतात. त्यांच्यामधली आई सदैव कधीही न भेटलेल्या ,न बघितलेल्या त्या पिल्लाला स्पर्श करण्यासाठी तळमळत असते. अर्थातच ह्या सगळ्या फेजमधून काही बाबाही गेलेले असतात मनाने तेही त्याच्याशी जोडलेले असतातच. पण अशा सगळ्याच जणींनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे तुम्ही दुर्दैवी आहात म्हणून असं घडत नाही तर इतरांपेक्षा सहन करण्याची ताकद तुमच्यात कदाचित जास्त आहे म्हणून देवाने तुम्हाला निवडलं. जे बाळ कधीच तुम्हाला दिसणार नाही अशा बाळासाठी नेहमीच एक खास जागा देवाने आपल्या मनात तयार केलेली असते त्यापेक्षा योग्य जागा दुसरी कुठली असूच शकत नाही. नाही का???
#गौरीहर्षल
११.१०.२०१७
शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७
हरलेली पिढी
#हरलेली_पिढी
#वयोगट_१५_ते_४०
हो हरलेय ही पिढी नाती सांभाळताना, आयुष्य जगताना, यशस्वी होताना. मीसुद्धा ह्यांच्यातलीच एक पण वेळोवेळी आपल्या बरोबरीच्याना कोसळताना बघतेय. काय हवंय नेमकं आम्हाला आयुष्यात?? आम्हाला नुसतं शिक्षण नको तर पहिल्या नंबरच्या हव्यासापोटी धावाधाव करायची आहे. नंतरही नुसती नोकरी किंवा बिझनेस नको तिथेही टॉप पोझिशन हवीच आहे. पुढे जोडीदार भेटतो तर त्या नात्यातही आम्हाला खूप काही हवंच आहे. आयुष्याचं कुठलंही क्षेत्र घ्या आम्हाला फक्त जिंकायचं आहे. खरं पाहता ही रॅट रेस कुणी दुसऱ्याने आमच्यावर नाही लादली आम्ही स्वतःच हिच्यात सहभागी आहोत. एखादी वस्तू दुसऱ्याकडे बघितली की जीव तोडून ती मिळवण्यासाठी आम्ही पळतो. आम्हाला सगळं काही हवं आहे पैसा, पॉवर , पोझिशन, स्टेटस आणि ते मिळवण्यासाठी आम्ही जगणं विसरतोय.
आमच्या आधीच्या पिढीनेही हे सगळं मिळवलं आहे नाही असं नाही पण त्याच्याकडे हे मिळवताना एक गोष्ट होती अन् ती म्हणजे "पेशन्स". जे आमच्या पिढीकडे अजिबात नाहीत काही अपवाद असतीलही पण बहुतांश जणांना ती इन्स्टंट ची सवय लागली आहे. मग एखादी गोष्ट नाही मिळाली किंवा ती मिळवताना अपयश आलं तर ते आम्हाला पचवता येत नाही. वास्तविक पाहता जवळचं कुणीतरी प्रत्येक वळणावर उभं असतं मदतीचा, मैत्रीचा हात पुढे करून पण आम्हाला ते स्वीकारण्यात कमीपणा वाटतो. यंग जनरेशन कडे बघत तिचं कौतुक करत मागची पिढी खूप काही आत्मसात करतेय पण ही यंग जनरेशन मात्र स्वतःच स्वतःभोवती उभ्या केलेल्या अपेक्षांच्या काटेरी कुंपणात अडकली आहे.
काय होईल एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली तर??? काय होईल एखाद्या कामात अपयश आलं तर?? काय होईल जर हातात घेतलेलं काम संपवण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर??? फार फार तर पैसा, वेळ आणि क्षणभंगुर असणार ते स्टेटस जाईल पण अशा परिस्थितीतही कुणीतरी आपल्या सोबत उभचं असतं. कुणीतरी नक्की असतं ज्यांची सगळी आस फक्त आपल्या असण्यावर अवलंबून असते मग ते आईवडील असो, जोडीदार असो किंवा इतर कुणी.
मान्य आहे जगात जगण्यासाठी पैसे, पत गरजेची असते पण ती फक्त गरज असते आवश्यकता नाही. त्यांच्या शिवायही समाधानी आणि सुखी होता येतं. कधी कळणार हे आमच्या पिढीला???
का हरतोय आम्ही ??? आमच्या आधीच्या पिढीने शून्यातून संसार उभे केल्याची उदाहरणं समोर असूनही आम्हाला मात्र समोर वाढून ठेवलेल्या भरगच्च ताटाचा आस्वादही घेता येऊ नये??? ताण येतातच पण त्यांना तोंड देण्यासाठी लागणारी आमचीच प्रतिकारशक्ती कुठेतरी कमी पडतेय.
आयुष्य परीक्षा बघणारच आहे पण त्या परीक्षेत पास नापास असं काही नसतं हे कळायला हवं. परीक्षेत येणारे अनुभव घेत जगायला शिकता आलं तर तुम्ही त्या परीक्षेत पास झालात.
आज इतर कुणी मदतीचा हात पुढे करण्याआधी ह्या पिढीने स्वतः स्वतःला मदत करण्याची गरज आहे. नाती, नोकरी, बिजनेस कुठल्याही परिस्थितीत आलेलं अपयश स्वीकारत त्यातून धडा घेत बदल घडवून आणले पाहिजेत तर आणि तरच आयुष्याला जिंकता येईल.
अजून एक छोटंसं काम माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना करता येईल ते म्हणजे स्वतःसोबत दुसऱ्यालाही motivate करण्याचं. आपल्या संपर्कातलं कुणी कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत असेल तर त्याला फक्त तू करू शकतोस हा धीर द्या. आपले दोन समजून घेणारे शब्द आणि आश्वासक स्पर्श मनातल्या नको त्या विचारांना दूर करतील. जवळच्या लोकांना तुम्ही हवे आहात ही जाणीव करून घ्या. आणि हे सगळं करताना स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. तुम्हीही महत्वाचे आहातच की. सुरुवात तर करूया स्वतःपासून, जिवलगांपासून हळूहळू . मीही करतेय तुम्हीही करा.
शुभं भवतु
#गौरीहर्षल
३०.७.२०१७
सेकंड चान्स
#शुभं_भवतु
#सेकंड_चान्स
नवीन दिवस नवी सुरुवात. आयुष्यात असं झालं का कधी काहीतरी कुणालातरी सांगायचं होतं, बोलायचं होतं पण ती संधी मिळण्याआधीच ती व्यक्ती दूर निघून गेली ??? कधी परिस्थितीमुळे तर कधी तिच्या आयुष्यातील बदलांमुळे.
छोट्याश्या गोष्टी असतात पण आपण आपल्या इगोमुळे बऱ्याचदा त्यांना नको इतकं मोठं करतो. नाती तुटतात , माणसं दुरावतात कायमची. कधी कधी एक बाजू प्रयत्न करतेही सगळं नीट ,छान व्हावं म्हणून. पण दुसरी बाजू तसाच रिस्पॉन्स देते का हो?? मग शेवटी प्रयत्न करणारा थकून दूर जाण्याचा निर्णय घेतो. ह्या सगळ्यांवर वेळ हे एकच औषध आहे असं म्हटलं जातं. पण हल्ली आयुष्य इतकं फास्ट झालंय की कोण कधी राहती जागा,गाव,शहर आणि कदाचित जगही सोडून निघून जाईल सांगता येत नाही. अशावेळी नंतर हात चोळत बसणे अन् हळहळणे हेच मागे उरते. मग त्यावर उपाय काय कुणी जर नातं तोडून जात असेल तर तुम्ही प्रयत्न करा त्यांना थांबवण्यासाठी. निदान तुमची बाजू तरी मांडा आणि उलट असेल तर समोरचा काय म्हणतो आहे हे तरी शांत पणे ऐकून घ्या. कदाचित आयुष्यात पुन्हा कधीच तुमची भेट होणार नसेल तेंव्हा मनाला कसलीही चुटपूट नको लागायला. थोडंसं स्वतःला पुश करण्याची गरज आहे सोप्प नसतंच कडू अनुभव विसरुन माफ करणं पण निदान प्रयत्न केलेच नाहीत असं नको वाटायला. मनाला एक समाधान तरी मिळेल की मी पूर्ण प्रयत्न केले. "स्वतःला" पुन्हा संधी द्या. संधी कदाचित जुनी अडकून बसलेली दारं उघडेल किंवा नवीन आयुष्य तुमची वाट बघत असेल. काहीही झालं तरी एक चांगलाच अनुभव पदरात पडेल हे नक्की. आयुष्य खूप छान आहे हे फक्त वाक्य होऊन राहण्यापेक्षा अनुभव आला तर अजून मजा येईल.
प्रयत्न तर करू बाकी समोरच्याची आणि देवाची मर्जी.
बेस्ट लक मलाही आणि तुम्हालाही 😍😍
#गौरीहर्षल
३१.७.२०१७
मनाचे प्रतिबिंब
#मनाचे_प्रतिबिंब
असं म्हणतात आपला चेहरा हा आपल्या मनाचं प्रतिबिंब असतो. खूप सगळे विचार आपण करत असतो सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत. त्या त्या क्षणी मनात जन्माला येणारे विचार क्षणभर का होईना आपल्या चेहऱ्यावर उमटतात. आपण खुश असतो ते आपला चेहरा सांगतो, कधी मनातून वाईट वाटलेल असतं पण ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसतं. असं हे आपलं प्रतिबिंब नेहमी चांगलं दिसावं लोकांवर त्याचा चांगला परिणाम व्हावा अशीच तर आपली इच्छा असते. पण म्हणून आपण किती प्रयत्न करतो? चांगले विचार , चांगल्या पद्धती जगण्यात आणल्या तर प्रतिबिंबही तसच असेल.
जमेल का??? अर्थातच जमणार जसं शरीराचं बाह्य रूप खुलवण्यासाठी प्रयत्न केले जातात तसंच मनासाठीही करावे. मनालाही काही पौष्टीक असे विचार , गोष्टी सांगाव्यात जेणेकरून मनाचं स्वास्थ्य सुधारत राहील. यासाठी फार काही करावं लागणार नाही फक्त आपलं वाचन, आपली संगत , आपली विचारसरणी थोडीशी ग्रुम करावी लागेल. ग्रुम कशी करायची हे आजूबाजूला निरीक्षण केले की समजते. मी तर करून बघणार आहे तुम्हीही ट्राय करा....
प्रत्येकाला आज एक तरी क्षण मनाचं स्वच्छ प्रतिबिंब दाखवणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१२.७.२०१७
इतनीसी खुशी
#इतनीसी_खुशी
जगण्यासाठी काय महत्वाचं असतं?? पैसे की आनंद जो आपण त्या पैशात शोधत असतो? आनंद अगदी लहान मुलांच्या निरागस हसण्यातही असतो आणि वृद्धांच्या समाधानी हसण्यातही.
छोट्या छोट्या गोष्टींमधून फक्त तो टिपता आला पाहिजे अलगद. असं जर झालं तर सगळंच खूप छान होऊन जाईल. आपण जसजसे आनंद टिपत निघू तसा आयुष्याची बाग फुलत राहील. प्रयत्न तर करून बघू फार काही नाही करायचं फक्त डोळे उघडे ठेवून निरीक्षण करायचं. मी तर करणारच आहे तुम्हीही ट्राय करा.
प्रत्येकाला आज खूप सगळ्या छोट्या छोट्या आनंदाचे क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल
१६.७.२०१७
गैरसमज
#गैरसमज
गैरसमज आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. बऱ्याचदा ते आपण स्वतः नकळतच करून घेतलेले असतात. एखादी व्यक्ती तिचं वागणं, बोलणं जाणून घेण्यासाठी वेळ जाऊ द्यायचा असतो. पण आपण इतक्या घाईत असतो की आपल्याला पटकन माणूस कळावा असं वाटतं. आणि मग अर्धवट माहिती, अपुऱ्या संपर्काच्या आधारावरच आपण आपली समजूत पक्की करतो. बरं हे सगळं घडतंय आणि ते कुठेतरी चुकतंय असं आपल्याला जाणवतही असतं. पण आपलं मन इतकं पुढे निघून गेलेलं असत की त्याला पुन्हा मागे ओढून आणून नातं जुळवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. जवळची नाती अशाच गैरसमजांमुळे तुटतात अनेकदा. कधी कधी दोन्हीकडून गैरसमज होतात कधी कधी एका बाजूने. कधी कधी ते दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात तर कधी कुणी ते अजून वाढावे म्हणून प्रयत्न करत राहतात. नातं, माणसं दुरावण्याचं दुःख दोन्ही बाजूंना असतं पण हल्ली तर कुणाकडे वेळच नसतो. किंवा डोळ्यांवर अशी काही झापड असते की ती भविष्यात येणाऱ्या अनुभवांनीच दूर होते. मग प्रयत्न करायचेच नाहीत का? प्रयत्न तर करायचे पूर्ण शक्तीनिशी करायचे पण समोरची व्यक्ती ,तिचा प्रतिसाद याकडेही लक्ष ठेवायचे. जर तिचा प्रतिसाद सकारात्मक असेल तर आपले प्रयत्न योग्य दिशेने होत आहेत हे कळतं. आणि जर नकारात्मक असेल तर कुठे थांबायचं हेही लक्षात येतं. थोडंसं सजग आणि उघड्या डोळ्यांनी नात्याला आणि आजूबाजूच्या व्यक्तींना परखायचं सोबतच स्वतःलाही तराजूत तोलायचं. लगेच नाही जमणार पण हळूहळू निदान गैरसमज टाळण्याचं भान तरी येईल. कोण आपलं कोण परकं हे दाखवण्यासाठी वेळ तत्पर असतेच पण आपण आपलं काम चोख केलं तर आपलंच शारीरिक, मानसिक आणि आर्थिकही नुकसान टाळता येतं.
सो, आजचा मंत्र हाच की गैरसमजाला खतपाणी घालण्याआधी परिस्थिती, व्यक्ती आणि स्वतःची वागणूक या सगळ्यांचे अवलोकन करीन. श्रावणातील नवीन व्रत म्हणूया हवं तर 😊😊 मी तर प्रयत्न करणार आहे तुमचं काय??
आज प्रत्येकाला एक तरी क्षण भान ठेवून रुसलेली मनं वळवण्यासाठी संधी देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल
२४.७.२०१७
-
The Art of Self-Compassion: Being Kind to Yourself in the Face of Adversity संकटाच्या वेळी स्वतःशी दयाळूपणे वागण्याची कला ती मा...
-
How to Deal with Negative People: नकारात्मक लोकांसोबत कसे वागावे? काही लोकांना नकारात्मक वातावरण, नकारात्मक विचारांमध्ये गुंतून पडणे आवडत ...
-
Clearing the Mental Clutter: How the Simple Act of a Brain Dump Can Boost Your Well-being? मनातील गर्दी दूर करणे: 'ब्रेन डं...
Contact form |
Tags |