हुलकावणी

हुलकावणी.......
सकाळी सकाळी ‘ती’ टेस्ट तिच्या चेहऱ्यावर न मावणारं हसू देऊन गेली. उत्साहाने भरून जात दोघेही स्वप्नांत गुंग झाले. अनपेक्षितपणे मिळालेला आनंद खूप काही क्षणार्धात बदलून गेला. कालपरवापर्यंत इतरांसाठी तर सोडाच पण स्वतःसाठीही महत्वाची नसणारी ती खूप महत्वाची असल्याप्रमाणे स्वतःलाच वागवू लागली होती.
पुन्हा एकदा ते सगळं अनुभवताना , मनापासून तो त्रास सहन करताना ती मोहरत होती. पण का कुणास ठाऊक मनातली जुनी भीती नकळतच डोके वर काढू लागली कि तिच्या अंगावर नकोसे शहारे येऊन जायचे. तरीही एकमेकांना सावरत,सांभाळत ते दोघेही परत उभे राहिलेच होते. काही दिवसातच तिला डॉ कडूनही सगळं ठीक आहे असा सिग्नल नक्की मिळणार याची तिला खात्री वाटत होती.
गेली काही वर्षं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असूनही ते दोघे सततच्या या हुलकावणीला वैतागले होते. त्यात नातेवाईक,शेजारी यांच्याकडून काहीही शहानिशा न करता हीन आणि टोमण्यांच्या रुपात होणारी चौकशी भरच घालत असे. आता मात्र असं होऊ नये अशी दोघांनाही आशा वाटत होती , तशी मनोमन प्रार्थनाही ते देवाजवळ करत होते.
अखेर तो दिवस उगवला धडधडत्या हृद्यानेच तिने डॉ च्या केबिनमध्ये प्रवेश केला. डॉ सोनोग्राफी झाल्यावरच काय ते सांगणार होते. ती उत्सुक चेहऱ्याने डॉ कडे बघत होती. डॉक्टर मात्र क्षणाक्षणाला नकारार्थी मान हलवू लागले. तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. डॉ त्या दोघांकडे बघत म्हणाले, “गर्भाची वाढ जरी अपेक्षित अशी असली तरी अजूनही बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नाहीत. तरीही आपल्याकडे काही दिवसांचा वेळ आहे आपण आवश्यक ते प्रयत्न करू.” शेवटचे दोन शब्द तिला खूप जास्त धीर देऊन गेले. पुढचे १५ दिवस गोळ्या, इंजेक्शन आणि वेगवेगळ्या तपासण्या यातच जाणार होते. पण तरीही त्या दोघांनीही कसलीच कमतरता ठेवायची नाही असा निश्चय करत घराचा रस्ता पकडला. घरी पोहोचल्यावर इतक्या वेळ बांधून ठेवलेल्या अश्रूंना तिने त्याच्या कुशीत शिरत मोकळी वाट करून दिली. पुन्हा एकदा देव आपल्याला इतकी वाईट शिक्षा नक्कीच देणार नाही असं तो तिला आणि स्वतःलाही समजावत होता. पुन्हा १५ दिवसांनी काय घडेल याची पुसटशी कल्पना येऊनही दोघेही बोलून दाखवत नव्हते.
त्या १५ दिवसात जवळपासच्या देवळांच्या पायऱ्या झिजवत प्रत्येकाने सांगितलेले उपायही दोघांनी केले. आपल्याकडून कुठलीच चूक होऊ नये म्हणून ते मनापासून समोर येणारा प्रत्येक उपाय करत होते. अशावेळी काहीतरी नक्की चांगल होईल या अपेक्षेने माणूस पटत नसणाऱ्या गोष्टीही करतो असच काहीसं त्यांचंही झालं होत. इकडे तिचे २ महिने संपून ३रा सुरु झाला आणि डॉ कडे जाण्याचा दिवसही उगवला.........

दोघेही डॉक्टरकडे पोहोचले. तिचे बाकीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे बघून डॉक्टरांच्या कपाळावरील आठ्या काहीश्या कमी झाल्या. हे बघून तिलाही जरा हायसं वाटलं. आता पुढची पायरी होती नेहमीप्रमाणे सोनोग्राफीची. सोनोग्राफी करत असताना आज काहीही न बोलता डॉ खूप शांतपणे तिला तपासत होते. क्षणोक्षणी तिचा जीव मात्र कसानुसा होत होता. शेवटी डॉक्टरांनी मौन तोडत तिच्याकडे रोखून बघत तेच शब्द उच्चारले जे तिला ऐकण्याची इच्छा नव्हती. १५ दिवसांपूर्वीची अवस्था न बदलल्याने तिची प्रेग्नन्सी टर्मिनेट करावी लागणार होती. जास्त उशीर केल्यास अर्थातच तिच्याही जीवाला धोका होताच. डॉक्टर आधीपासूनच काहीसे साशंक होते त्यांनी पुढच्या प्रोसिजरची तयारी ठेवली होती. मूकपणे ह्या सगळ्याला ते दोघेही सामोरे जात होते.
काही तासांनी ती जेंव्हा शुद्धीवर आली तो तिच्या उशाशी शांतपणे बसला होता. त्याच्या डोळ्यात खोलवर बघत तिने विचारलं, “मी आई उरले नाही नं रे पुन्हा एकदा?” तितक्यात जवळूनच एक आवाज तिच्या कानावर पडला. जो तिच्यासारख्याच काही प्रॉब्लेम्समुळे नुकतच आपल बाळ गमावणाऱ्या एका आईचा होता.
ती म्हणाली, “भलेही थोड्या काळासाठी का होईना पण तू तुझ्या शरीरात,मनात त्या बाळाला जपलं होतस त्यामुळे तुझं आई असण त्याचं जाणं पुसून टाकत नाही ग. आणि ती  आई सगळ्यात जास्त ग्रेट असते जी आपल बाळ त्याला परत देऊनही खंबीरपणे उभी राहते.” तिचे ते शब्द त्या क्षणी तिला खूप काही सांगून गेले आणि गमावण्याचं दुखःही काहीसं सुसह्य झालं.
कुठल्याही आईचं मातृत्व तिचं मूल जन्माला येण्याआधीच गेलं म्हणून संपत नाही. जगातल्या त्या सगळ्याच स्त्रिया ज्यांनी कुठल्या नं कुठल्या कारणामुळे आपल मूल जन्माला येण्याआधीच गमावलं आहे त्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही त्या बाळाला जपत असतात. त्यांच्यामधली आई सदैव कधीही न भेटलेल्या ,न बघितलेल्या त्या पिल्लाला स्पर्श करण्यासाठी तळमळत असते. अर्थातच ह्या सगळ्या फेजमधून काही बाबाही गेलेले असतात मनाने तेही त्याच्याशी जोडलेले असतातच. पण अशा सगळ्याच जणींनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे तुम्ही दुर्दैवी आहात म्हणून असं घडत नाही तर इतरांपेक्षा सहन करण्याची ताकद तुमच्यात कदाचित जास्त आहे म्हणून देवाने तुम्हाला निवडलं. जे बाळ कधीच तुम्हाला दिसणार नाही अशा बाळासाठी नेहमीच एक खास जागा देवाने आपल्या मनात तयार केलेली असते त्यापेक्षा योग्य जागा दुसरी कुठली असूच शकत नाही. नाही का???
#गौरीहर्षल
११.१०.२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी