The Art of Self-Compassion: Being Kind to Yourself in the Face of Adversity
संकटाच्या वेळी स्वतःशी दयाळूपणे वागण्याची कला
ती माझ्याकडे आली तेव्हा प्रचंड दुःखात होती. शिवाय छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःला दोष देणे हे तिचे आवडते काम झाले होते. आमचं सेशन ऑनलाईन झालं. कारण तिला त्या क्षणी घरातून बाहेर पडणे शक्य नव्हतं. सेशन कनेक्ट होताना काही तांत्रिक अडचणी आल्या जसं की आधी आवाज येत नव्हता मग पिक्चर दिसत नव्हतं. या गोष्टींचा सुद्धा दोष तिने स्वतःला लावला. मला नीट कनेक्ट करता येत नाही मला लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरता येत नाही म्हणून ती स्वतःला दोष देऊ लागली.
काही वेळ मी सुद्धा तिला ती बडबड करू दिली. पण जेव्हा लक्षात आलं की आता हे सगळं थांबणार नाही. तेव्हा तिला त्या गोष्टीची जाणीव करून दिली.
जाणीव झाल्यानंतर तिचं पहिल्या वाक्य काय होतं माहिती आहे?
ती - सॉरी मॅडम मी पुन्हा तेच बडबडत बसले. आपण कशासाठी भेटलो आहोत हेच विसरले.
मी- इट्स ओके. आता आपण ज्या गोष्टीसाठी भेटलो आहोत त्या विषयाकडे वळायचं का?
ती - हो. आज मला अजिबात चांगलं वाटत नाहीये मॅडम. घरात पुन्हा तोच विषय निघाला. त्यामुळे तेच विचार मनात येत आहेत... त्या नात्याबद्दल... माझ्यामुळेच सगळे बिघडले.
मी - तुम्हाला अजूनही घडून गेलेल्या गोष्टींचा प्रचंड त्रास होतो आहे. पण कळत नकळत तुम्ही स्वतःला जरा जास्तच दोष देत आहात असं तुम्हाला वाटतं का?
ती - हो ना! शेवटी चूक माझीच होती... मी पुरेशी चांगली नव्हते. म्हणूनच तो मला सोडून गेला. माझ्यातच काहीतरी कमी आहे. मी कायम गोष्टी बिघडवते.
मी - आणि तुम्हाला असं का वाटतं?
ती - पण... पण यात माझीच चूक होती ना? ( स्वतःला सातत्याने दोष देण्याची सवय लागल्यामुळे तिला आपणच चुकीचे आहोत असा विश्वास बसला होता.)
मी - तुम्ही स्वतः सोबत जरा जास्तच कठोरपणे वागत आहात. या सगळ्या प्रसंगांमध्ये कोण चूक कोण बरोबर ही चर्चा खरंतर पुढेही चालू शकते पण आज आपण तुमच्या मनस्थितीबद्दल बोलण्यासाठी भेटलो आहोत. त्यामुळे आपण आता तुम्हाला होणारा त्रास कसा कमी करता येईल त्याकडे वळूया.
आपल्याला होणारा त्रास कमी होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर नकळतच तिचे डोळे आनंदाने लुकलुकले.
लक्षात घ्या माझी ही क्लायंट गेली काही वर्षे सेपरेशन, आणि घटस्फोटाच्या प्रक्रियेतून गेल्यामुळे प्रचंड मानसिक ताणतणाव, गमावलेला आत्मविश्वास, आणि या दोन्हीमुळे सुरू झालेल्या बऱ्याच छोट्या-मोठ्या शारीरिक तक्रारी यांची शिकार आहे.
त्यामुळे जेव्हा अशा व्यक्तीला एखादा आशेचा किरण दिसतो तेव्हा नकळतच तिची मनस्थिती बदलते.
मी - आजपासून आपण काही सोप्या सोप्या गोष्टी स्वतःसाठी करायला शिकणार आहोत. त्यातला पहिला टप्पा म्हणजे सेल्फ compassion म्हणजे आत्म करुणा.
ती - म्हणजे स्वतःची कीव करणे का?
मी -नाही, अजिबात नाही. आत्म-करुणा म्हणजे कठीण प्रसंगी, जेव्हा आपल्याला त्रास होत असतो किंवा आपल्या हातून काही चूक होते, तेव्हा स्वतःशी त्याच दयाळूपणाने वागणे जसे आपण आपल्या चांगल्या मित्राशी वागतो. यामध्ये तीन टप्पे आहेत.
ती: कोणते
मी - पहिला टप्पा आहे सजगता (Mindfulness). म्हणजे आत्ता तुम्हाला काय वाटत आहे, तुमच्या मनात कोणते विचार येत आहेत, हे शांतपणे ओळखणे. त्यांना चांगले किंवा वाईट न म्हणता, फक्त 'आहे हे असे आहे' हे स्वीकारणे. आत्ता तुम्हाला दुःख, निराशा, स्वतःबद्दल नकारात्मक विचार येत आहेत, त्यांना फक्त ओळखा. त्यांना दाबून टाकू नका, पण त्यांच्यात पूर्णपणे वाहूनही जाऊ नका.
ती - (थोडा विचार करून) म्हणजे... मला आत्ता खूप वाईट वाटत आहे... आणि मी विचार करत आहे की मी नालायक आहे... हे फक्त ओळखायचे?
मी - अगदी बरोबर. फक्त 'हे आत्ता घडत आहे' हे स्वीकारायचे. दुसरा भाग आहे स्वतःला माणूस म्हणून स्वीकारणे . हे लक्षात घ्या की आयुष्यात कठीण प्रसंग येणे, नात्यांमध्ये अपयश येणे, किंवा आपल्या हातून चुका होणे हे फक्त तुमच्यासोबत घडत नाहीये. जगात प्रत्येक माणूस कधी ना कधी अशा परिस्थितीतून जातो. दुःख, वेदना, अपयश हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. तुम्ही यात एकट्या नाही आहात.
ती: म्हणजे... फक्त माझ्यासोबतच असे होत नाही?
मी - नाही, नक्कीच नाही. प्रत्येक माणसाच्या बाबतीत थोडेफार फरकाने असे घडते. हे ओळखल्याने तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा भाग आहे स्वतःशी दयाळूपणा (Self-Kindness). जेव्हा तुम्हाला त्रास होत असतो, तेव्हा स्वतःवर कठोर टीका करण्याऐवजी स्वतःशी प्रेमळ आणि समजूतदारपणे वागा.
ती - हे तर तुम्ही सगळ्यात अवघड काम सांगितलं मॅडम? स्वतःशी प्रेमळपणे कसे वागायचे? माझे मन तर सतत मला दोष देत असते.
मी - त्याचाच तर सराव करायचा आहे. कल्पना करा, तुमची सर्वात जवळची मैत्रीण याच परिस्थितीत आहे, ती स्वतःला खूप दोष देत आहे. तुम्ही तिला काय म्हणाल? तुम्ही तिला धीर द्याल ना? तुम्ही तिला समजावून सांगाल की यात फक्त तिची चूक नाही, किंवा अपयश आले म्हणजे ती वाईट व्यक्ती नाही. बरोबर?
ती - हो, नक्कीच सांगेन. तिला आधार देईन.
मी- मग स्वतःलाही तोच आधार द्या ना. जेव्हा तुमच्या मनात स्वतःबद्दल नकारात्मक विचार येतील, तेव्हा तिथेच थांबा आणि स्वतःला म्हणा, "तुला आत्ता खूप त्रास होत आहे हे मला समजतंय. तू खूप प्रयत्न केलेस. आयुष्यात अशा गोष्टी घडतात. तू यात एकटी नाहीयेस. स्वतःशी थोडं प्रेमळ वाग. तू यासाठी पात्र आहेस."
ती - असे... स्वतःलाच असे बोलायचे? हे थोडे विचित्र वाटत आहे.
मी - सुरुवातीला थोडे विचित्र वाटू शकते, कारण आपल्याला स्वतःवर टीका करण्याची सवय झालेली असते. पण हा एक सराव आहे. हळू हळू तो जमेल. जेव्हा तुम्हाला खूप त्रास होईल, तेव्हा स्वतःच्या छातीवर हात ठेवा किंवा स्वतःला हलकी मिठी मारा आणि स्वतःला धीर द्या. जसे आपण एखाद्या रडणाऱ्या लहान मुलाला शांत करतो, तसेच स्वतःच्या आतल्या या दुःखी भागाला शांत करण्याचा प्रयत्न करा.
ती - प्रयत्न करून बघेन. पण... याचा खरोखर उपयोग होईल का?
मी - नक्कीच उपयोग होईल. आत्म-करुणा ही दुबळेपणा नाहीये, ती एक आंतरिक शक्ती आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांना स्वीकारायला आणि त्यातून बाहेर पडायला मदत मिळेल. स्वतःला दोष देत राहण्याने फक्त त्रास वाढतो. स्वतःशी दयाळूपणे वागल्याने तुम्ही या परिस्थितीतून अधिक चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकाल आणि स्वतःचा स्वीकार करू शकाल. आपण पुढच्या सेशनमध्ये याचा अधिक सराव करूया. आत्ता फक्त लक्षात ठेवा, जेव्हा वाईट वाटेल, तेव्हा स्वतःशी थोडे दयाळूपणे वागा.
ती - ठीक आहे मॅडम. प्रयत्न करते. धन्यवाद.
हा माझ्या सेशनचा एक छोटासा भाग होता. पण प्रत्यक्षात हा विषय समजून घेण्यासारखा आणि जास्त प्रभावीपणे काम करणारा आहे. त्यातल्या काही मोजक्या गोष्टी आजच्या लेखामध्ये मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे.
Self-Compassion -
संकटाच्या वेळी स्वतःशी दयाळूपणे वागण्याची कला
आपण सहसा इतरांशी खूप दयाळूपणे वागतो. जेव्हा आपल्या मित्र किंवा कुटुंबातील व्यक्ती अडचणीत असतात, तेव्हा आपण त्यांना समजून घेतो, त्यांना धीर देतो आणि त्यांच्याशी सहानुभूतीने बोलतो. पण जेव्हा आपण स्वतः अडचणीत असतो, एखादी चूक करतो किंवा आपल्याला अपयश येते, तेव्हा आपण स्वतःशी कसे वागतो? अनेकदा आपण स्वतःवर खूप कठोर टीका करतो, स्वतःला दोष देतो आणि स्वतःला कमी लेखतो.
इथेच 'आत्म-करुणा' (Self-Compassion) म्हणजेच स्वतःबद्दल करुणा बाळगण्याची कला महत्त्वाची ठरते.
आत्म-करुणा / self compassion म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे तर, आत्म-करुणा म्हणजे कठीण प्रसंगी किंवा जेव्हा आपल्याला त्रास होत असेल, तेव्हा स्वतःशी त्याच दयाळूपणे वागणे जसे आपण एखाद्या चांगल्या मित्राशी वागतो. डॉ. क्रिस्टिन नेफ (Dr. Kristin Neff) या आत्म-करुणा क्षेत्रातील अग्रणी संशोधक आहेत. त्यांच्या मते, आत्म-करुणेचे तीन मुख्य घटक आहेत:
👉🏻 स्वतःशी दयाळूपणा (Self-Kindness): जेव्हा आपल्याला त्रास होतो किंवा अपयश येते, तेव्हा स्वतःवर कठोर टीका करण्याऐवजी स्वतःशी प्रेमळ आणि समजून घेण्याच्या दृष्टीने वागणे.
👉🏻सामान्य माणुसकी (Common Humanity): हे ओळखणे की दुःख, वेदना आणि अपयश हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे फक्त आपल्यासोबत घडत नाही, तर प्रत्येक माणूस कधी ना कधी यातून जातो. यामुळे आपल्याला एकटेपणा जाणवत नाही.
👉🏻सजगता (Mindfulness): आपल्या भावना आणि अनुभवांबद्दल सजग असणे. त्या भावनांना दाबून टाकण्याऐवजी किंवा त्यांच्यात पूर्णपणे वाहून जाण्याऐवजी, त्या आहेत तशा स्वीकारणे आणि त्यांचे निरीक्षण करणे.
आत्म-करुणा म्हणजे स्वतःची कीव करणे (Self-Pity) नव्हे, किंवा स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करणेही नाही. याचा अर्थ आहे की आपण आपल्या दुःखाला आणि अपयशाला स्वीकारतो, पण त्यासोबत स्वतःशी अधिक प्रेमळ आणि चांगला दृष्टिकोन ठेवतो.
👉🏻संकटाच्या वेळी आत्म-करुणा का महत्त्वाची आहे?
जेव्हा आपण संकटात असतो, आपल्याला मानसिक किंवा शारीरिक त्रास होत असतो, तेव्हा आपण खूप असुरक्षित आणि एकटे असतो. अशा वेळी स्वतःवर कठोर टीका करणे खूप नुकसानदायक ठरू शकते. यामुळे तणाव (Stress) वाढतो, चिंता (Anxiety) वाढते आणि आपण अधिक नकारात्मक होतो.
याउलट, आत्म-करुणा आपल्याला या कठीण भावनांना अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत करते.
* हे आपल्याला शांत आणि स्थिर ठेवते.
* आपण आपल्या चुकांमधून शिकू शकतो, कारण आपण स्वतःला दोष देण्याऐवजी परिस्थितीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करू शकतो.
* हे आपल्याला लवचिक (Resilient) बनवते, ज्यामुळे आपण अपयशानंतर पुन्हा उभे राहू शकतो.
* हे आपले मानसिक आरोग्य सुधारते.
🤗How to practice self compassion?
आत्म-करुणा ही एक कला आहे आणि सरावाने ती विकसित करता येते. इथे काही सोपे मार्ग आहेत:
💫आपल्या भावना ओळखा: जेव्हा तुम्हाला त्रास होत असेल, तेव्हा तुमची भावना काय आहे हे शांतपणे ओळखा. तिला नाव द्या (उदा. दुःख, निराशा, भीती).
💫 स्वतःशी दयाळूपणे बोला: कल्पना करा की तुमचा सर्वात चांगला मित्र याच परिस्थितीत आहे. तुम्ही त्याला काय म्हणाल? आता तेच शब्द स्वतःला म्हणा.
💫हे माणूस असण्याचे लक्षण आहे हे स्वीकारा: स्वतःला आठवण करून द्या की चुका करणे, दुःखी होणे किंवा अपयशी होणे हे माणूस असण्याचे लक्षण आहे. जगात प्रत्येक माणूस कधी ना कधी अशा परिस्थितीतून जातो. तुम्ही एकटे नाही आहात.
💫 स्वतःच्या शरीराला आराम द्या: कठीण प्रसंगी स्वतःला शांत करण्यासाठी काही सोप्या गोष्टी करा. उदा. स्वतःच्या हाताने स्वतःला मिठी मारा, छातीवर हात ठेवा, शांतपणे दीर्घ श्वास घ्या.
💫 स्वतःसाठी काहीतरी चांगले करा: ज्यामुळे तुम्हाला आराम वाटेल किंवा आनंद मिळेल अशी एखादी गोष्ट करा, अगदी छोटीशी का असेना. उदा. गरम चहा प्या, शांत संगीत ऐका, फिरायला जा.
💫 Self-Compassion Meditation : आत्म-करुणा वाढवण्यासाठी खास तयार केलेल्या ध्यान पद्धतींचा सराव करा.
निष्कर्ष
आत्म-करुणा (Self-Compassion) ही दुर्बळता नाही, ती एक शक्ती आहे. विशेषतः संकटाच्या काळात ही शक्ती आपल्याला आधार देते. स्वतःशी दयाळूपणे वागणे शिकणे म्हणजे आपल्या भावनांना आणि अनुभवांना स्वीकारणे आणि त्यासोबत स्वतःवर प्रेम करणे. यामुळे आपण केवळ कठीण प्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जात नाही, तर आपले आयुष्य अधिक शांत आणि आनंदी बनवतो.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला अडचणीत किंवा दुःखी अवस्थेत पहाल, तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःशी दयाळूपणे वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही यासाठी पात्र आहात!
तुम्हाला काही शंका असतील किंवा आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये जी तंत्रे सांगण्यात आली आहेत त्यापैकी काही तुम्हाला स्वतःसाठी वापरायचे असेल तर कमेंट मध्ये सांगा.
तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
😊लेख आवडल्यास नावासहीत शेयर करू शकता. किंवा ब्लॉग लिंक सुद्धा शेयर करू शकता. ♾️
This article is also available at - 👇🏻
http://gauriharshal.blogspot.com/2025/05/the-art-of-self-compassion.html
Copyright © 2017। All Rights Reserved.
गौरी हर्षल कुलकर्णी
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन )
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
ह्या ग्रुप वर सोमवार पासून पुढील काही दिवस एक नवीन टास्क सुरू करण्यात येणार आहे. ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी लवकर जॉईन करा. इट्स फ्री , तुमच्या जवळच्या आणि खात्रीशीर लोकांना तुम्ही सहभागी करू शकता.
https://chat.whatsapp.com/Ku16BVwA1oXAqEKndfmuTC
WhatsApp channel link
https://whatsapp.com/channel/0029Va4upbh0G0Xn2Q2tpK3K