गुरुवार, ११ मे, २०२३

स्मरणगामी

"अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी"
फक्त दोनच ओळी मनात घोळवत ती शांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसली होती. 
आणि अचानक तिला जाणवलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळं दृश्य साकार होतंय. ते काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जितका तिचा मेंदू करत होता, तितक्याच उत्कटतेने तिच्या मनाला आपण काय अनुभवत आहोत ह्याची खात्री पटत होती. 
क्षणार्धात मेंदूकडून येणाऱ्या सगळ्या सूचना धुडकावून लावत तिने मनाचा कौल स्विकारला. आणि डोळ्यांनी ते दृश्य तिच्यासमोर पूर्ण करून उभं केलं. 
खिडकीतून बाहेर बघताना दिसणाऱ्या आकाशाच्या , ढगांच्या बॅकग्राऊंडवर ते डोळे उमटले होते. 
ज्या डोळ्यांना बघितलं की माणसाची सगळी दुखः, त्रास ,यातना एका क्षणात नाहीशा होतील असे ते डोळे. 

ती त्या दृश्याकडे भान हरपून पाहत होती. 
नकळतच तिला जाणीव झाली की ही अशी गोष्ट आहे जी अनुभवण्यासाठी माणसं जंगजंग पछाडतात आणि त्यांनी आपल्यासारख्या वेडीसाठी ती गोष्ट सहजसाध्य करून टाकली का? कारण मनात अजूनही अशक्य ही शक्य करतील स्वामी सुरूच होतं. 

 हल्ली तिला सवयच लागली होती काहीही घडो चांगल किंवा वाईट तोंडात हे वाक्य हमखास येणार. आणि समोरच्या व्यक्तीने समजा चिडून विचारलं की काय सुरू आहे हे तुझं??? की मग तोंडातून स्पष्टीकरण म्हणून पुन्हा त्याच दोन्ही ओळी बाहेर पडणार... कोणत्या??? अहो त्या काय पुढे लिहिलेल्या 
"अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी" 
तसं बघायला गेलं तर त्यात चुकीचं काही नव्हतच. जगात काहीही घडतं ते त्यांच्याच इच्छेने. 
कधी कधी वाईट प्रसंगात आपण प्रचंड त्रागा करतो , त्यांना वाट्टेल ते बोलतो पण काही दिवसानंतर अचानक आपल्याला जाणीव होते की तो वाईट प्रसंग घडणही गरजेचं होतं. जर तो प्रसंग घडला नसता तर आज जे चांगलं घडत आहे ते घडलं नसतं. 
मला तर हमखास असा अनुभव येतो म्हणून तर मी आपली माझ्या मित्राशी मनापासून भांडते कारण मला पूर्ण खात्री आहे जगात कुणीही माझ्या बाजूने असो किंवा नसो तो मात्र असणार आहे. तसाच कायम after all this time.... Always म्हणत. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! ११ मे २०२३
#गुरूवार #अनुभवाच्या_पोतडीतून #संकल्पदिन
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

शनिवार, ८ एप्रिल, २०२३

स्वतःसाठी बदलताना लेख 18

#स्वतःसाठी_बदलताना लेख 18 
आपण काय शिकलो? (थॉट अँड बिहेवियर पॅटर्न )
लहानपणी आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये धड्याच्या शेवटी सारांश असायचा.त्याला वरती नाव असायचं आपण काय शिकलो? आणि पूर्ण धड्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंदणी तिथे असायची. 

समुपदेशन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या समस्येत खूपदा हा प्रश्न समोर येतो की "मॅडम सतत तेच तेच अनुभव का येतात?" 

आणि जेंव्हा सरासरी सगळ्या केसेसचा विचार केला जातो तेंव्हा 
त्यामध्ये लक्षात यावा इतका कॉमन पॉइंट हा असतो की बऱ्याच जणांनी आयुष्यात अक्षरशः भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती अनुभवलेली असते. पण तरीही त्यातून जे शिकायचं असतं ते ते  शिकलेले नसतात त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या जातात. 
 चुका कशा प्रकारच्या? तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचं.  पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा देत आपल्या आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं. 
 हे सगळं पुन्हा पुन्हा घडत असल्यामुळे ज्या गोष्टी त्यांनी भूतकाळात अनुभवलेल्या असतात, ज्या संकटांचा सामना केलेला असतो, ते पुन्हा कुठल्या ना कुठल्या वस्तू, व्यक्ती, घटना त्यांच्या रूपात त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात. 
 आणि मग माणसं विचारतात हे सगळं परत परत का घडतंय? यावर एक साधं सोप्प उत्तर असतं....कारण पहिल्यांदा जेव्हा ती गोष्ट तुमच्याबरोबर घडली तेव्हा तिच्यामधून जे शिकायचं होतं ते तुम्ही शिकलाच नाहीत. 
म्हणून परिस्थिती तुमच्याबरोबर त्याच त्याच गोष्टी कोणामार्फत तरी  घडवून आणत राहते. 
 आणि त्याला बऱ्याच अंशी तुमचं स्वतःचं वागणं हे कारणीभूत असतं.  त्याच त्याच चुका रिपीट होतात म्हणून त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत राहतात. 

 यावर उपाय काय? आपण शांतपणे आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याचं निरीक्षण करायचं, त्यामध्ये घडलेल्या चांगल्या वाईट घटनांची विभागणी करायची. 

चांगल्या घटना म्हणजे त्या की ज्या घटनेमध्ये तुम्ही तावून सुलखून बाहेर पडलात. 
 तुम्हाला तुमची आपली जवळची माणसं लक्षात आली, ओळखू आली.  आणि त्यातून तुम्ही योग्य तो धडा शिकून पुन्हा त्या गोष्टी करणं टाळलं. 

 अन् वाईट गोष्टी अशा की ज्या पुन्हा पुन्हा तुमच्याबरोबर घडत राहिल्या. 
 तुमच्या एक लक्षात येईल की ह्या गोष्टींमध्ये प्रसंग कॉमन असतील.  प्रसंगांमध्ये जसं साम्य आहे तसंच त्या घटना घडत असताना तुमच्या संपर्कात आलेली माणसेही आधीच्या माणसांशी साधर्म्य दाखवणारे असतात. किंवा बऱ्याचदा आधीचीच माणसे परत आलेली असतात. 
 ***मग यामधून आपल्याला काय शिकायचं असतं? 
तर अशा घटनांमधून आपल्याला हे शिकायचं आहे की हा पॅटर्न जर सतत रिपीट होत आहे तर आपल्याला आपल्या आयुष्यात काही योग्य आणि ठोस बदल करण्याची गरज आहे. 
 हे बदल कसे आणि कुठल्या प्रकारचे असतात , हे तुम्ही स्वतः ठरवू शकता.  त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की घ्या. पण ती व्यक्ती तज्ञ असावी. 
आणि आधी वर सांगितल्याप्रमाणे ते प्रसंग त्यावेळेस घडलेल्या घटना डिटेल्स मध्ये आठवा. 
 त्या वेळेला तुमच्या आजूबाजूला नव्याने , पहिल्यांदा तुम्हाला मदत करणारी माणसं कोण होती? आणि मदत करतोय असं दाखवणारी माणसं कोण होती? ते बघा आणि त्यानुसार गोष्टी ठरवा. 
3 एप्रिल 2023 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

वॉलपेपर, चालढकल आणि ती

#वॉलपेपर_चालढकल_आणि_ती 
आपल्या फोनचा वॉलपेपर आपण सगळे अगदी मनापासून निवडत असतो न? मीही ठेवते. माझा सापडेल तुम्हाला इमेजमध्ये. 
त्या दिवशी मात्र गंमत झाली. रिक्षामधून येत असताना मी कामामुळे फोनवर होते. थोड्या वेळाने माझ्या शेजारी एक मुलगी येऊन बसली.कॉलेजकन्या होती.
 माझा फोन सतत फ्लॅश होत असल्याने वॉलपेपर दिसत होता. तिचं एकदा लक्ष गेलं कदाचित नंतर मात्र ती प्रयत्न करून काय आहे हे वाचण्याचा प्रयत्न करू लागली. आणि शेवटी एकदाचं तिला ते जमलं. हुश्श... मग विजयी मुद्रेने माझ्याकडे बघितलं आणि अचानक म्हणाली,"हे मस्तच आहे, मला आवडलं."
मी त्या प्रतिक्रियेने गोंधळून विचारलं की,"काय आवडलं वॉलपेपर?"होकारार्थी मान हलली. मग सुरू झाल्या गप्पा. 
"ताई, हे अस सतत समोर राहणार म्हणून ठेवलं आहेस न? ", ती 
"हो , त्यामुळे काम करताना आळस, चाल ढकल होऊ लागली की लगेच लक्षात येतं. आणि मन पुन्हा कामाकडे वळवता येतं. ", मी 
"मी पण आता असच करेन. लवकरच माझ्या लास्ट सेमीस्टर चे पेपर आहेत. पण एकदा फोन हातात घेतला की नुसता टाईमपास होत राहतो. आता असा काही वॉलपेपर ठेवते की अभ्यास करायची आठवण झाली पाहिजे. ", ती 
" मस्तच , पण नुसता वॉलपेपर ठेऊन होईल का? त्याशिवाय तुला ठरवून अभ्यासाला बसावं लागेल. फोनचा वापर कमी करावा लागेल. वेळापत्रक केलं तर जास्त सोपं जाईल. रोजच्या दिवसाचं कर आणि त्याचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेव. ", माझा फुकटचा सल्ला. 
"हे तर बेस्ट होईल. ", ती आनंदात म्हणाली. आणि लगेच स्वतःच्या फोनमध्ये काहीतरी खुडबुड करू लागली. 
पाच मिनिटांनी डोकं वर केलं आणि माझ्या समोर फोन धरून मला लिस्ट दाखवली. फोनमध्ये लगेच लिस्ट तयार केली होती. 
मला तिचा उत्साह आवडला आणि विशेष म्हणजे तत्परतेने गोष्ट करणं आवडलं. आपल्याला काय हव आहे आणि ते मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे तिला लक्षात आलं होत. तिच्या प्रयत्नात तिला यश मिळणार हे ही नक्कीच आहे हो न? 
बाकी तुमच्याकडून सुद्धा #चालढकल (#procrastination) होते आहे का?  वर लिहिलेली साधीशी टीप वापरून बघा. 
बाकी ? बाकी सगळं तुमच्याच हातात आहे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी साठी दत्तगुरुंना कशाला त्रास द्यायचा? बरोबर ना?
2 एप्रिल 2023 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 




  

शनिवार, १ एप्रिल, २०२३

स्वतःसाठी बदलताना लेख 17

#स्वतःसाठी_बदलताना लेख 17
Planning and implementing
हातात घेतलेली काम वेळेवर व्हावी तसं सगळ्यांनाच वाटतं पण ते होतं का? आपल्याकडून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी 100 टक्के प्रयत्न केले जातात का? की आपण कुठेतरी कमी पडतो? चालढकल होते का? प्रत्येक वेळी कोणीतरी बाहेरची व्यक्ती आपल्या मदतीसाठी तत्पर असणार आहे का? किंवा प्रत्येक वेळी त्या व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे का?
आयुष्यात एक वेळा अशी कधीतरी नक्की येणार आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःची मदत स्वतः करावी लागणार आहे .
मग त्या वेळेची वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या गोष्टींचे नियोजन करून स्वतः चे सगळ्यात जवळचे मित्र होण्याचा प्रयत्न केला तर???
यासाठी काय करायचं? काही वेगळं करायचं नाहीये तर आपल्याला आपल्या प्रत्येक महिन्याचं विशिष्ट पद्धतीने नियोजन करायच आहे. आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपणच स्वतःच्या मागे लागायच आहे.
१. मागच्या महिन्याचा आढावा घ्या.

मागच्या महिन्यात आपली किती काम पेंडिंग होती?
त्यातली किती काम आपल्याकडून पूर्ण झाली?
आणि किती काम पुन्हा करू किंवा नंतर करू म्हणून पुढे ढकलली गेली?
जी काम पुढे ढकलली गेली त्या कामांमध्ये नेमके काय अडथळे होते?
अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे ते काम पूर्ण करण्यात आपल्याला निरुत्साह वाटत होता?
​या सगळ्या गोष्टींची एक व्यवस्थित पद्धतीने यादी करत तुम्हाला स्वतःला ते लिहून काढावे लागणार आहे.
​त्यासाठी तुम्ही एखादी वही वापरू शकता किंवा फोनमध्ये सुद्धा लिहू शकता.


२. नवीन महिन्यासाठी ध्येय ठरवून घ्या.

पूर्ण महिन्याभरात पूर्ण करण्यासाठी असलेल्या कामांची यादी करा
​त्यानंतर त्यातील महत्वाच्या कामांची यादी करा.
​रोज ठरवून त्या यादीतील एक तरी काम काही अंशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
​दिवसाचे, आठवड्याचे आणि महिन्याचे गोल्स लिहून काढा.
​ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा अभ्यास करा. तयारी करा.
​सुरुवात केल्याशिवाय कुठलेही काम पुढे जाऊन पूर्ण होऊ शकत नाही. सो त्यासाठी आधी सुरुवात करा.


३. रोजचे रूटीन/ वेळापत्रक आखून घ्या.

​एखादी सवय लावण्यासाठी रोज ती आचरणात आणणे आवश्यक असते.
​त्यामुळे रोजच्या दिवसाचे वेळापत्रक आखून घ्या. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचा वेळ कुठे नि कसा खर्च होतो.
​वेळापत्रक केल्याने हे ही लक्षात येईल की कुठली कामं आधी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
​वेळापत्रक फक्त तयार करून चालणार नाही तर तुम्हाला ते कटाक्षाने पाळावे लागणार आहे.
​तर आणि तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणणे शक्य होईल.


चला मग वाट कसली पाहताय? ह्या आठवड्याचे प्लॅनिंग करत स्वतःला ऑन अ गुड नोट एप्रिल फूल करा. 1 एप्रिल 2023
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

 

शनिवार, २५ मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना लेख 16

#स्वतःसाठी_बदलताना_लेख16
स्वतःला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यातून वाचण्यासाठी ,बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण अशावेळी बऱ्याचदा आपल्याला इतर व्यक्तींकडून नकारात्मक वागणुकीचा सामना करावा लागतो. मग काय करायचं? तर अशा परिस्थितीत स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे आणि त्याच वेळी स्वतःची मन:शांती ढळू न देणं हेही गरजेचं असतं. 
त्याबद्दल काही टिप्स...
1. स्वतःचे जागरूकतेने निरीक्षण करा. Self awareness 
नकारात्मक विचार, भावना ह्या कशामुळे ट्रिगर होतात हे ओळखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. एकदा ते लक्षात आलं की त्या विचारांना कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची हे लक्षात येतं. 
स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रियांबद्दल जागरूकता निर्माण झाली की आपण दोन पावले मागे येऊन योग्य पद्धतीने विचार करून व्यक्त होऊ शकतो. 
2. स्वतःसाठी मर्यादा आखून घ्या. Setting healthy boundaries. 
बऱ्याचदा आपण आपल्या गरजा आणि अपेक्षा योग्य पद्धतीने, योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून जी वागणूक मिळते त्यामुळे कुठेतरी आपणच दुखावले जातो. म्हणून योग्य वेळी योग्य शब्दात आपल्या गरजा आणि अपेक्षा स्पष्ट करणे गरजेचे असते. जेंव्हा आपण असे करायला सुरुवात करतो तेव्हा अर्थातच आपल्याला आपल्या सोबतच इतरांकडून ही विरोध होतो. पण हळूहळू गोष्टी बदलतात हे नक्की. 
मनाविरुद्ध एखादी गोष्ट करावी लागणार असेल तर ठामपणे नकार देणं किंवा एखाद्या त्रासदायक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वतःसाठी बाऊंड्री सेट करण्याचे उत्तम उदाहरण आहेत. 
३.  स्वतःला/ इतरांना माफ करा. Practice forgiveness. 
चूक मग ती स्वतःकडून झालेली असू दे किंवा इतरांकडून त्यासाठी आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. 
नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीला, तिच्या वागण्यालाही माफ करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. 
आपण कितीही ठरवलं तरी कुठलीही गोष्ट पूर्णपणे विसरू शकत नाही , तसेच कुणालाही माफ करणं सुद्धा सोपी गोष्ट नसते. माफ करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करणे. असं केल्याने आपल्याला आपोआपच मनाचा फोकस महत्वाच्या गोष्टींकडे वळवता येऊ लागतो. आणि हळूहळू त्या नकारात्मक भावना बोथट व्हायला सुरुवात होते. त्यांचा आपल्या मनावर तितकासा परिणाम होत नाही. 
४. वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा. Focus on the present moment. 
भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर ,किंवा भविष्य काळात काय घडेल ह्यावर विचार करत राहण्याची सवय बऱ्याच जणांना असते. त्या सवयींपासून प्रयत्नांनी दूर राहत वर्तमान काळात जगण्याची सवय मनाला लावावी लागते. 
आपली बाजू ठामपणे, आत्मविश्वासाने मांडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याची किंवा आक्रस्ताळेपणा करण्याची गरज नसते. 
वर उल्लेख केलेल्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवल्या की हळूहळू बदल घडू लागतात. 
25 मार्च 2023
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 
(ह्या आधीचे लेख खालील लिंक वर मिळतील. https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02mZny1jqEDk8rHPuMkwTgc6At6LRB9GMGh7kJ2vzkDofgZHuj9sSw8Kdu6oKm9zWhl&id=100000197780430&mibextid=Nif5oz)

गुरुवार, २३ मार्च, २०२३

स्वामींचा प्रगट दिन आणि शेरुचा स्मृतिदिन

#स्वामींचा_प्रगटदिन_आणि_शेरूचा_स्मृतीदिन
लॉकडाऊन लागलं आणि दोन दिवसात आमच्या शेरूची तब्येत जरा जास्तच बिघडली. त्याच्याबद्दल मी हनुमान जयंती आणि हार्ट बीट या लेखामध्ये लिहिलेल आहे. शेरुला रामरक्षा आणि हनुमान चालीसाच प्रचंड वेड होत.  कोणी म्हणेल की कसं काय? पण ही खरंतर खूप आश्चर्याची गोष्ट होती. त्याला घरात अखंड रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकायला हवी असायची. 
 आणि त्यासाठी एक सेपरेट मोबाईल, त्याच्यामध्ये ते दोन्ही स्तोत्र सतत चालू ठेवावे लागायचे. 
 कधी जर चुकून बॅटरी संपून मोबाईल स्विच ऑफ झाला तर त्याच्यावर पंजा आपटून फोन माझ्यापर्यंत आणून  सांगणं की चार्ज कर आणि लाव माझे गाणे. 
याचा अर्थ  फक्त रामरक्षा आणि हनुमान चालीसा एवढे दोनच गोष्टींशी संबंध होता.  बाकी शक्यतो फारसा काही त्याला लागायचं नाही. 
जेव्हा मी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा काही वाचायला बसायचे की शेरू महाराज समोर येऊन मस्तपैकी ऐटीत बसणार अन् ऐकणार. अजिबात हलणार नाही, तास दोन तास त्याची समाधी लागलेली असायची.  ते म्हणतात ना, की प्राण्यांना त्यांच्या जाण्याचा दिवस कळतो किंवा ते खूप संयतपणे स्वतःचा मृत्यू स्वीकारतात असंच काहीसं माझ्या शेरुनी केलं.  जेव्हा त्याला लक्षात आलं की आता आपण बरे होणार नाही आहोत. 
 डॉक्टरकडे जाणं सलाईन लावून घेणे हे तीन, चार दिवस झाल्यानंतर मात्र त्याने अन्न पाणी सोडून दिलं. जवळपास 15 दिवस तो थोडाफार काहीतरी बळजबरीने खाऊन त्यावरती असायचा.  पण शेवटी मात्र त्याने एक दिवशी माझ्याकडे बघितलं डोळ्यात पाणी होतं.  मी म्हटलं ठीक आहे बाबा तुला जे योग्य वाटतं ते तू कर. 
दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाला काय वाटलं माहित नाही. त्याने मला सांगितलं की मला शेरू साठी संक्षिप्त गुरुचरित्राची पोथी वाचायची.  एक दीड तासाचे पारायण असतं ते मी करणार आहे.  त्याप्रमाणे पहाटे उठून शेरुला मांडीवर घेऊन त्याने ती गोष्ट केली.  त्यानंतर तो ऑफिसला निघून गेला.  आणि साधारणतः दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान शेरू शांतपणे गेलेला होता.  त्याला कुठलाही त्रास झाला नाही असे भाव चेहऱ्यावर होते. 
 कुठेतरी असं आम्हालाही वाटलं की शेरूने  एक गोष्ट जाता जाता सांगितली.  माणसं सगळ्याचा मोह बाळगतात. 
 पण हे पिल्लं मात्र जीव लावतात, आपल्यापेक्षा कैकपटीने जास्त प्रेम आपल्याला देतात आणि जायची वेळ आली की एक एक गोष्ट सोडत, सगळं काही इथेच त्यागून पुढच्या प्रवासाला निघून जातात  
स्वामींच्या प्रकटदिनी शेरू ने संक्षिप्त गुरुचरित्राचा पारायण करून घेऊन त्यानंतर स्वतः या सगळ्या गोष्टी स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट किंवा हा एक खूप वेगळा योगायोग होता. 
शेरु मुळे रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणण्याची, ऐकण्याची सवय इतकी सहज लागली की रोज ते आपोआपच होतं. 
त्याच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असली तरीही त्याचं असणं जाणवतं ते  पद्माक्ष च्या कडून रामरक्षा आणि हनुमान चालीसा साठी केल्या जाणाऱ्या हट्टामुळे. 
कुणी कितीही नाकारलं तरी माझ्या मनीमाऊनी नेहमीच त्या स्पेशल आहेत हे सिद्ध केलं. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

सोमवार, २० मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना 15

#स्वतःसाठी_बदलताना 15
 कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते ना की प्रचंड उलथापालथ सुरू असते. काहीही नीट घडत नसते, मन अस्थिर असतं, आपण सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतो, असं वाटत असतं की कुठून तरी एखादा तरी आशेचा किरण दिसावा.
आणि ॲट द सेम टाइम या सगळ्यांमध्ये आपण स्वतः सुद्धा स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न करत असतो. 
माझ एक प्रामाणिक मत आहे की अगदी आत्महत्या करणारे व्यक्ती असू दे किंवा डिप्रेशनमध्ये जाणारी व्यक्ती... पहिल्या स्टेज पासून ते शेवटच्या स्टेजला पोहोचेपर्यंत व्यक्ती हात पाय मारत असते, प्रयत्न करते डायरेक्ट असं कोणीच या सगळ्या चक्रात जाऊन अडकत नाही. 
पण  जेव्हा ती व्यक्ती हातपाय मारायचा प्रयत्न करत असते, बाहेर पडायचा प्रयत्न करत असते, तेव्हा जर तिच्या जवळच्या लोकांनी तिला शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर??? कित्येक जीव तिथेच सावरले जाऊ शकतात. 
पण दुर्दैवाने आपल्याकडे याबाबतीत अवेअरनेसही कमी आहे आणि शक्यतो जर कोणी असं बोलायला लागलं तर त्याला टोचून टोचून बोलण्याचा प्रमाण खूप जास्त आहे. 
 उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती जिच्या आयुष्यात नुकतंच काहीतरी घडून गेलेल आहे. घटस्फोट झालेला आहे किंवा तिचा आयुष्यात कोणीतरी मृत्यू पावलेल आहे त्या परिस्थितीतून सावरताना ती व्यक्ती बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला जाते. 
कुठलेही प्रयत्न... स्वतःला जिवंत असण्याची खूण पटवून देण्यासाठी... ती व्यक्ती चांगले कपडे घालून बघते तर तिला ऐकायला मिळतं, "अरे लगेच सावरलात? Xyz या गोष्टी झाल्या त्याला अजून फार वेळ नाही झाला एवढं कसं कोणी पटकन गोष्टी बदलू शकतो? तुम्हाला दुःख नाही होत?".
 अशाच काही गोष्टी अगदी नोकरी किंवा व्यवसायात फटका पडलेल्या माणसांच्या बाबतीतही होतात. चुकून ती व्यक्ती कुठे बाहेर गेलेली दिसली,  काही गोष्टी केलेल्या दिसल्या. रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलीये, काहीतरी वस्तू विकत घेताना दिसते.
" अरे आत्ता एवढा सगळा खर्च झालाय. तुम्ही कर्जात बुडलेले आहात तुम्ही हे सगळं कसं काय करू शकता???"
 हे त्या व्यक्तीला ऐकवलं जातं. ऐकवणाऱ्या व्यक्तीला जनरली गोष्टींच बॅकग्राऊंड माहीत नसतं. तिला फक्त तिच्या मनात जे आले ते फडकन बोलून मोकळं व्हायचं असतं.
समोरच्या व्यक्तीसोबत जे काही घडलं आहे त्याबद्दल सगळंच आपल्याला माहित असतं का? 
 जी व्यक्ती वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतीये की त्यासाठी पहिली स्टेपच ही घेत असते की मी माझ्या वातावरणातून बाहेर येऊन काही क्षण जगून बघावं मला पुन्हा तो आत्मविश्वास मिळतोय का? दुर्दैवाने हे केलं जात नाही की अशा गोष्टी ऐकायला मिळतात आणि लोक आतल्या आत घुसमटत राहतात. 
 सो इथे एक सांगणं आहे की समोरच्यावर वाईट वेळ आली आहे, तो त्या परिस्थितीतून जातो आहे, ती परिस्थिती किती बिकट आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर कुठलेही जजमेंट पास करू नये. 
 आपल्याला कुणाचं चांगलं करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नये. 
आणि जे अशा परिस्थितीतून जात आहेत त्यांनी मात्र एक गोष्ट नक्की करावी जर आपलं बाहेर निघायचं ठरलेल आहे तर आजूबाजूचा वातावरण,त्यामध्ये असणारी माणसं यांचा आपल्या मनस्थितीवर कितपत परिणाम होऊ द्यायचा हे आपण ठरवायचं. आपल्याला एकट्याच्या जीवावरती गोष्टी करता येत नसतील तर शक्य तिथे न लाजता "योग्य लोकांकडे" मदत मागायची. इथे मी योग्य लोकांकडे म्हणत आहे सरसकट सगळ्यांसमोर आपली परिस्थिती सांगून स्वतःच हसू करून घ्यायचं नाही.
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
20.3.2023
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल