गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

एकटेपणा की गोल्डन पिरियड?

एकटेपणा की गोल्डन पिरियड
खूप जण तक्रार करत असतात की तुम्हाला काय कळणार आहे?आम्ही आयुष्यात काय भोगलं आहे?आम्ही किती एकटे आहोत? आमच्या सोबत कसं कोणीच नाही आहे. 
अशा सगळ्यांना मला एक सांगावसं वाटतं एकटेपणा....मग तो तुम्ही स्वीकारलेला असू दे किंवा तुमच्यावर लादलेला असू दे. जेव्हा तुम्हाला त्या एकटेपणाचा सदुपयोग कसा करायचा हे कळतं ना तेव्हा तुम्हाला तो एकटेपणा किंवा आपलं कोणीच नाहीये ही भावना कधीच छळत नाही. 

 आता कुणी म्हणेल की हे कसं काय करायचं आहे? 
तुमचा आनंद, तुम्हाला कशात आहे हे माहित असतं ती गोष्ट करण्यासाठी सुरुवात करायची. 
 सुरुवातीला मन विरोधच करतं. मग टंगळमंगळ करायला सुरुवात करतं. पण जेव्हा तुम्ही सातत्याने ती गोष्ट करायला सुरुवात करतात. तेव्हा हळूहळू मनाला सवय लागते ते इकडे तिकडे भटकत नाही. व्यवस्थित लक्ष देऊन काही गोष्टी करायला सुरुवात करत. 

 आणि मग अशा वेळेला आपल्या लक्षात येतं की अरे इतके दिवस आपण इतरांच्या सहवासासाठी जे गळे काढून रडत होतो, आता त्या गोष्टीवरून आपली जरा सुद्धा चिडचिड होत नाहीये. 
 माझ्या आयुष्यातही अशा गोष्टी झालेल्या आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात जिथे तुम्हाला कधी ना कधीतरी एकटं राहावं लागतं, एकटं राहण्याची वेळ येते. 
अशा वेळेला स्वतःला एकटं फील करून घ्यायचं की त्या मिळालेल्या एकटेपणाचा फायदा करून घ्यायचा हे आपण ठरवायचं असतं. 

काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की तू ह्या गोष्टीला कसं डिस्क्राइब करतेस?म्हणजे तू सातत्याने सांगत असतेस की मला दत्तगुरूंचा सहवास मिळतो, ते माझ्याशी बोलतात किंवा त्यांच्याकडून मला संकेत मिळतात. तेव्हा मी एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नच बर का ... कारण काय होतं माहितीये का? जी गोष्ट तुम्ही ऑक्सिजन सारखी अनुभवत असता ती गोष्ट शब्दात नाही मांडता येत. 

 मी दिलेलं उत्तर असं होतं,जसं मी एखाद्या व्यक्तीशी समोर बसून बोलते, एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलते, अगदी त्याच पद्धतीने मी त्यांच अस्तित्व माझ्या आयुष्यात मान्य केलेल आहे. त्यासाठी ते मला दिसलेच पाहिजेत, कुठल्या ना कुठल्या प्रकारे मला त्यांचं अस्तित्व जाणवलंच पाहिजे हा माझा अट्टाहास अजिबात नसतो. दिवसातले 24 तास, आठवड्याचे सातही दिवस, महिन्याचे तीस दिवस ते सातत्याने माझ्या आजूबाजूला आहेत एवढा विश्वास मला त्यांच्याशी नॉन स्टॉप बडबड करण्यासाठी पुरेसा असतो.  

पण म्हणून मी सतत बोलत असते का? तर नाही बऱ्याच वेळेला हा संवाद मनातल्या मनात सुरू असतो. काही गोष्टी असतात ज्यांची उत्तरं सातत्याने विचारली जातात. प्रश्न मी विचारत असते, कधी मला उत्तर मिळतं,कधी कधी मिळत नाही. 
 कधी कधी एक शांतता असते. जी मला कुठेतरी सुरुवातीला खूप जास्त इरिटेट करून जायची. पण हळूहळू लक्षात आलं जेव्हा शांतता असते तेव्हा आपल्याला वेळ दिली जाते आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी की आधी तू अभ्यास कर, तू कष्ट घे, अगदीच तुला उत्तर नाही सापडलं तर मी देतो,मी कुठे पळून चाललोय? 
आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येक बाबतीत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची सवय नकळत माझ्या मनाला लागली. आज मला जेव्हा कोणी प्रश्न विचारतो तेव्हा नकळत माझ्या तोंडून काही गोष्टी बाहेर पडतात, उत्तर बाहेर पडतात, हे सगळं काही त्यांचं क्रेडिट आहे. 
 त्यांनी माझ्याकडून माझ्या एकटेपणाला अक्षरशः गोल्डन पिरीयड करत जो काही अभ्यास करून घेतलेला आहे त्याचा मला फायदा होतो.

आता तुम्हीच ठरवा तुम्हाला मिळालेल्या एकट्या वेळेचा तुम्ही गोल्डन पिरियड बनवणार की अजून काही? 
5.1.2023
#गुरूवार #संकल्पदिन 
बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

सुखसंवाद १

#ध्यानसंकेत५ 

#सुखसंवाद 

माझा मित्र - आज का फुगली आहेस तू?

मी - फुगू नाही तर काय करू? लोकांना प्रत्येक गोष्टीत कशी शंका येते?

मित्र - म्हणजे? आता कुणी शंका घेतली?

मी - कुणी स्पेसिफिक अस नाही पण की गोष्ट आपण कधी अनुभवली नाही, जीच्याबद्दल आपल्याला फक्त वरवर माहीत आहे. त्या गोष्टीला फक्त समोरचा व्यक्ती चांगल म्हणतोय म्हणून विरोध करायचा ही कुठली पद्धत?

मित्र - इथलीच पद्धत... माणसाचं कस आहे माहीत आहे का? त्याला स्वतः ला भलेही काही येत नसेल, माहीत नसेल, करायचं नसेल पण समोरचा करतोय न मग आपण खुसपट काढून त्याला विरोध करायचा. आणि समोरची व्यक्ती वैतागली की मग परिस्थितीचा फायदा घेऊन ती व्यक्ती कशी वाईट आहे असं बोंबलत सुटायचं.

मी - हे इन जनरल ठीक आहे म्हणजे मान्यच आहे मला. पण जी शक्ती या सगळ्या जगाला चालवते तिलाही अशीच वागणूक? माणूस खरच इतका मोठा झाला आहे?

मित्र - वागणूक? तुला खरच अस वाटत का की आम्ही अशा कुणाला खिजगणतीतही धरतो? तुझा आवडता कर्म सिद्धांत आहे की त्यांच्याकडे नीट लक्ष देण्यासाठी.
हे बघ प्रत्येक चांगल्या गोष्टीला जितके जास्त विरोधक तितकं जास्त ते काम प्रभावी होतं.
आणि आम्हाला सरसकट सगळ्यांसाठी सगळ नसतच द्यायचं, प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ द्यायचं म्हणजे कमीत कमी लोक आम्ही ठरवलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार हे नक्की.

मी - हं... कळतय थोडफार. पण कुणी निरर्थक शंका व्यक्त केल्या की चिडचिड होतेच.

मित्र - ती तुझी कधी होत नाही? ते सांग...,🥴 सगळ्यात जास्त वेळा तर तुला माझ्याविषयी नको ते प्रश्न विचारूनच चिडवल जातं 😆 पण कुणी काहीही म्हंटल तरी तू मात्र तशीच आहेस म्हणून तर आम्ही आहोत तुझ्यासोबत. ते तुझ्या स्नेप सारखं After all this time "always". 

आणि मी आपली मनात आलेल्या ओळी गुणगुणत बसले,
शांत माया मूर्ती पहाटेसारखी....

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!!
शुभं भवतु !!!
१२.१२.२०२२

#दत्तात्रेयार्पणमस्तू
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

मॉर्निंग मंत्रा भाग 3

#मॉर्निंग_मंत्रा ३ 

२२ डिसेंबर  २०२२

#थॉट्स_पॅटर्न  (आपला focus कुठे आहे? )

संकल्प आणि नवीन वर्ष ह्यांचा फारच जवळचा संबंध असतो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी हे करायला सुरुवात करणार आहे अस आपण बऱ्याचदा ठरवतो पण आपण ते तडीस नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो का? 
तर त्यासाठी काही गोष्टी आपण स्वतःला विचारू शकतो. 

शेवटी ज्यामध्ये बदल घडवायचे आहेत ते आपलं आयुष्य आहे आणि ज्याने बदल घडवायचे आहेत ते आपण स्वतः आहोत. 

काय करता येईल? 
तर सगळ्यात आधी स्वतःचं निरीक्षण करायचं आहे. 

खाली दिलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत आणि ती सुद्धा स्वतःला. 

लिहून ठेवा हं उत्तरं....

हुश्श्श.... सुस्कारा सोडला हो न?
 दुसऱ्याशी खर बोलायचं म्हणजे किती खोटं बोलावं लागतं. पण चुकत आहात तुम्ही. कारण माणूस ह्या जगात सगळ्यांशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःला उत्तर द्यायची आहेत. 

प्रश्न
1. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं पूर्णपणे थांबवायचं आहे, पण जमत नाही........

2. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं कमी करायचं आहे,पण जमत नाही.........

3. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही सवय लावून घेतली पाहिजे हे कळत पण जमत नाही.......

4. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात आधीपासूनच करत असलेली ही गोष्ट सातत्याने करत राहायची आहे पण जमत नाही.....

5. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ह्या काही चांगल्या गोष्टी करणं वाढवणं गरजेचं आहे पण जमत नाही.....

ज्या व्यक्ती, वस्तू , गोष्टी , प्रसंग मला प्रगती करण्यासाठी अडवत आहेत त्यांना टाळणं मला जमायला हवं. 
आणि ज्या व्यक्ती वस्तू गोष्टी प्रसंग मला प्रगती करण्यासाठी उपयोगाच्या आहेत त्या कडे मी हेतुपुरस्सर लक्ष केंद्रित करायला हवं. 

तर मंडळी आपणच ठरवलं आणि झालं अस होत का? नाही होत न? का? कारण आपण आपल्या मनाच्या तालावर नाचत असतो. त्याने म्हटले कंटाळा आलाय,आज नको हे काम करायला झालं .....आपण लगेच ते शब्द पडत्या  फळाची आज्ञा म्हणून मान्य करतो.  आणि हातातलं काम बाजूला सरकवून सोशल मीडियावर स्क्रोल करायला सुरुवात करतो. 

हे टाळायचं आहे? पण कस? 

ते ही सांगेन. पण आत्ता साठी एवढे वरचे प्रश्न स्वतःला विचारून बघा. आणि उत्तरे लिहून ठेवा. 

सो लोक्स, 
आयुष्यात भरायचे असतील हवेहवेसे रंग 
त्यासाठी करावा लागेल चांगल्या विचारांशी संग

हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत? 

सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु

#आई_राजा_उदे_उदे 
#गुरूवार
#संकल्पदिन 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

बंधनापासून उकलल्या गाठी

बंधनापासुनी उकलल्या गाठी

आजही तेच , ती जितकी प्रयत्न करत होती, तितके तिच्या वाट्याला येणारे अनुभव रिपीट होत होते. 
शेवटी शेवटचा उपाय म्हणून तिने डोळे मिटून घेतले आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली. 
कोण आहे मी? का म्हणून पुन्हा पुन्हा तेच घडत आहे माझ्यासोबत? हव्यास, अट्टहास हा माझा पिंड नाही आणि कधीही नव्हता. मग पुन्हा तेच का? 

मनात उमटणारे सगळे प्रश्न धडा वाचत असल्यासारखे विचारून ती मोकळी झाली. 

काही वेळ आजूबाजूला आणि मनातही एक निशब्द शांतता पसरली. ती शांतपणे त्या शांततेला शरण गेली. पट्टीचा पोहोणारा कसा आधी पाण्यात भरपूर हातपाय मारून शरीराला थकवतो आणि मग नंतर शांतपणे शरीर सैल सोडून पाण्यावर तरंगत राहतो. तसंच काहीसं......

हळूहळू मनाच्या पाटीवर अलगद शब्द उमटू लागले. 

- अनुभव फक्त शिकवण्यासाठी असतात हे तुझं अनुमान अगदी बरोबर आहे. आणि ते सुद्धा अनुभवातूनच आलेलं आहे. तुला असं वाटतंय की तुझे अनुभव सतत रिपीट होत आहेत. पण तू नक्की सगळे मार्ग चाचपडून बघितलेस का? तर नाही.
हे अनुभव असे आहेत, जिथे तू स्वतःची तुलना इतरांशी करतेस. आणि आमच्या दृष्टीने बघितलं तर ती तुलना अतिशय अयोग्य आहे. 

-आता ती गोंधळात पडली. म्हणजे माझं काही तरी चुकलं आहे का? असा प्रश्न तिच्या मनात आला. 

-पुन्हा चुकीचा विचार करत आहेस. तू कुठेही चुकली नाहीस. फक्त ती तुलना सोडली तर. तू शक्यतो त्या गोष्टींची अपेक्षा ठेवतच नाहीस ज्या ह्या जगात सगळ्यांना हव्या असतात. पण कधी कधी हळव्या क्षणी तुझ्या मनाला त्या गोष्टींची , त्या आयुष्याची भुरळ पडतेच. आणि साहजिकच आहे ते. मनुष्यजन्म आहे तो भुरळ पडणं हा त्याचा स्थायीभाव आहे. 

पण तुला ती भुरळ पडल्यावर हे लक्षात येत नाही की तुला त्या दिशेने जायचंच नाहीये. तुझं स्थान, तुझी जागा ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे कधीच तयार झाली आहे. 

भुरळ पडून होणारा त्रागा आणि येणारे अनुभव हे तुला हे शिकवण्यासाठी आहेत की तुला ह्या चक्रात आता पुन्हा अडकायचे नाहीये. 

त्यामुळे थोड्याशा गोष्टींवरून कधीतरी once in a while ढळणारा तोल सावरायला शिक.

एकांताला , एकटेपणाला सहजपणे स्विकारलं तर आहेस पण आता तो अजून explore करायला शिक. 

खूप काही अगम्य ,अद्भुत तुझी वाट बघत तुझ्या वाटेवर येऊन थांबलं आहे तुला फक्त त्याचं बोट पडकून पुढे पुढे चालत राहायचं आहे. 

बरंच काही शिकली आहेस पण तरीही खूप काही शिकायचं बाकी आहे. 

तुझ्या त्या आवडत्या हॅरी पॉटरच्या पहिल्या भागात बघ हॅरी डंबलडोरला विचारतो की ,परीस तर वॉल्डमॉर्ट ला हवा आहे, मग माझ्याकडे कसा आला? 
तेव्हा ते काय उत्तर देतात तेच उत्तर तुझ्या परिस्थिती ला सूट होतं
"परीस त्याला हवा आहे मान्य त्याला तो कसा आणि कुठे वापरायचा हे माहीत आहे हे सुद्धा मान्य. पण परीस कसा आणि कुठे वापरायचा हे ज्याला माहीत असूनही तो त्या परिसाचा वापर करायची इच्छाही मनात ठेवत नाही तोच खऱ्या अर्थाने त्या परिसाचा मालक आहे."

शेवटी एवढंच सांगतो last but not least,
जगाच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा अट्टहास करू नकोस. तू वेगळी होतीस, आहेस आणि राहशील. 
Accept it ,after all हे तू कमावलेलं आहेस. 

असं म्हणत तो सुखसंवाद थांबला. 

आणि तिच्या कानात एक सुमधुर स्वर ऐकू येऊ लागला 

येणे सोसे मन झाले हावभरी 
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

(अभंग - संत तुकाराम
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
गायिका (स्वतंत्र वेगळी चाल) - किशोरी अमोणकर ) 
कुणाच्याही आवाजातील ऐका दोन्हीही अप्रतिम🤗❤️

बाकी? बाकी काय आनंदाचे डोही आनंदतरंग!!!

#अनुभवाच्या_पोतडीतून
#treasures_inside_you 
#स्वतःमध्ये_लपलेला_खजिना
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान

#दत्त_दत्त_ऐसे_लागले_ध्यान

#संक्षिप्त_गुरुचरित्र 

 २१ दिवस चॅलेंज 

एखादा मानसिक त्रास सुध्दा तुम्हाला योग्य मार्गावर नेऊन सोडू शकतो. कस? मन:शांती हवी आहे म्हणून मी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण सुरु केले. आणि हळूहळू मन:शांती सोबत अजून बरच काही पदरात अलगद येवुन पडलं. 

अनुभव पहिला
अचानक तंद्री लागली आणि एक 5 वर्षांची मुलगी समोर आली. आधी साधं असलेलं तिचं रूप एका क्षणांत पालटलं आणि ती काली मातेच्या रूपात दिसू लागली. खोडकर हसून मला फक्त एकच गोष्ट ती म्हणत होती आणि ती म्हणजे मी येऊ का तुझ्याशी खेळायला? तुला खेळायला घेत नाही न कुणी? मी आले की बघ सगळे कसे पळून जातील. तिच्या डोळ्यातले ते खट्याळ भाव माझ्या मनावर असलेला ताण कमी करण्यासाठी पुरेसे होते. 

अनुभव दुसरा
काही कारणांमुळे सतत भीती वाटत होती पण वाचन सुरू केलं आणि मनात एक १४ व्या अध्यायातील त्या ओळी सतत डोळ्यासमोर नाचू लागल्या. कोणत्या? 
न करा चिंता असाल सुखे
सकळ आरिष्टे गेली दुःखे
म्हणोनी हस्त ठेवती मस्तके
भाक देती तयेवेळी ||४४||
असं काही घडण्याची ही काही माझी पहिली वेळ नव्हती पण आपल्या हळव्या मनाला त्याने स्वतःचं अस्तित्व दाखवून उभारी देण्यासारखा आधार दुसरा कुठलाच नाही. 

अनुभव तिसरा
ज्याचे हृदयीं श्रीगुरु स्मरण 
त्यासी कैंचे भय दारुण
काळमृत्यू न बाधे जाण 
अपमृत्यू काय करी||२७||
त्या दिवशी तिघांच्याही जीवावर आलेलं परस्पर टळल आणि पहाटे पासून मिळणाऱ्या संकेतांचा अर्थ लक्षात आला. 

अनुभव चौथा
अडथळा हा प्रकार मला वाचन करायचं म्हटल्यावर कधीच आलेला नाही. उलट सगळं अस काही जुळून येत की मनापासून वाचन करता येत. ह्या वेळी वाचताना तर इतकी अनुकूल परिस्थिती निर्माण होत होती की नकळतच दिवसभर तोंडातून त्याच वाचलेल्या ओळी बाहेर पडत. 
सतत आपण एका वेगळ्या विश्वात वावरत असल्याची जाणीव होत होती. 

अनुभव पाचवा
घोरकष्टोद्धरण स्तोत्र सुद्धा रोज ठराविक पटीत सुरू होते. त्यामुळे  एक होत होत कुणी आपलं असो किंवा नसो. एकदा आपण त्याला आपलं सगळ काही मानलं की झालं अस सातत्याने घडून आपोआपच ओठातून हे बाहेर पडायचं. 
त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं ।
 त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । 
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥

अशाच काही स्मरणीय अनुभवांना ओंजळीत देत दत्तजयंतीच्या दिवशी संकल्प पूर्ण करून घेतला गेला. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात त्यामुळे एकच सांगेन हे कस घडत? अशी शंका जर मनात येत असेल न तर आयुष्यात एकदा तरी आपल्या श्रद्धास्थान असलेल्या ईष्ट देवतेला मनापासून शरण जाऊन बघा. 
ह्या गोष्टीतली गंमत, जादू तुम्हाला ही कळेल. 
आणि आता 21 दिवसांच फलित म्हणजे हे सगळं माझ्या सवयीचा भाग झालं आहे. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!!
शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

दत्तजयंती विशेष ७ डिसेंबर २०२२

#दत्तजयंती_विशेष ७ डिसेंबर २०२२

यावर्षीची दत्तजयंती माझ्यासाठी बऱ्याच अर्थांनी विशेष ठरली. एक म्हणजे अगदी दत्त जयंती तोंडावर आलेली असताना करुणात्रीपदीच्या अध्ययन वर्गांबद्दल मला संकेत मिळाले.
 आणि पंधरा दिवसांपूर्वी ते सुरूही झाले. 

 बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की अध्ययन करण्यासारखं यामध्ये काय आहे? पण कुठेतरी मला ह्या गोष्टीची खात्री होती की जर आपल्याला ही गोष्ट करण्यासाठी सांगण्यात आलेल आहे ,तर त्यामागे त्यांची काहीतरी खूप महत्त्वाची योजना आहे. आणि मी फक्त त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मला दिलेलं काम करण्याचा प्रयत्न केला.
  आपण म्हणतो ना की काही गोष्टी योग्य वेळ आल्यानंतर त्या घडतातच तुम्ही त्या थांबवू नाही शकत. 
 तसंच काहीसं या बाबतीत झालं जेव्हा पहिला वर्ग घेणार असं मी 22, 23 नोव्हेंबरच्या दरम्यान सांगितलं त्यानंतर बऱ्याच स्तरांमधून बरेच रिस्पॉन्स आले आणि जवळपास पहिली बॅच 24 तारखेपासून सुरू सुद्धा झाली.

 गुरुवारी... मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि करुणात्रिपदीचा अध्ययन वर्ग सुरू करणे हा खरंतर दुग्ध शर्करा योग होता. 
 24 ला सुरू झालेली पहिली बॅच काल सात डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी पूर्ण झाली आणि बाकीच्या ज्या दोन बॅचेस होत्या ज्या एक ते सात डिसेंबरच्या दरम्यान घेतल्या गेल्या. 
त्याही काल संपन्न झाल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या सोबतीने अनेक जण नव्याने जोडले गेले.  काही जण आधीपासून सोबत होते काही जण नव्याने या मार्गावर सोबत आले.

 पण मी आधी जसं म्हटले होते की जेव्हा माणूस एकट्यासाठी काही करतो तेव्हा जर त्याला फायदा होत असेल तर समूहाने ती गोष्ट केल्यानंतर काय फायदा होईल कुठेतरी हा प्रश्न मी त्यांना विचारला होता आणि करून बघ असे उत्तर मला आलं होतं. 
 आणि काल मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळालं जे सगळे जवळपास 23, 24 जण या सगळ्यांमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचे चेहरे त्यांच्या चेहऱ्यावर असणारा ते समाधानाच हसू,तो आनंद आणि ह्या दिवसात त्यांना जे काही गवसलं ते म्हणजे शब्दात मांडण्यासारखं नाहीये. 

 भरभरून जेव्हा लोक आपल्याला आलेल्या अनुभूती बद्दल बोलतात.  आणि तुम्ही कुठेतरी त्या गोष्टीचा भाग असतात तेव्हा असं होतं की बापरे देव आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी टाकतोय.  आणि मग नकळतच त्या गोष्टींचा दडपण सुद्धा येत.  पण ज्यांनी ही काम आपल्या हातात सोपवलेली असतात तेच ती कामे पूर्ण करून घेतात.  अगदी व्यवस्थित आपलं बोट धरून सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे त्या गोष्टी करून घेतात, याची प्रचिती मला काल आली .

कोणाला काय काय अनुभव आले हे खरंतर सांगूच नये कारण ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याचे अनुभव अनुभवावेत अशा मताची मी आहे.  पण एक सांगेन की त्या माझ्या विश्वासावर सगळ्यांनी दाखवलेला विश्वास हा माझ्या मित्राने सार्थ केला आणि कुठेतरी दाखवून दिलं की माणसाने आमच्यावर विश्वास दाखवला की आम्ही सुद्धा तेवढ्याच तत्परतेने काही गोष्टी करतो. 

आणि खरं सांगते की या तीन वर्गांकडून आलेला रिस्पॉन्स हा भविष्यात अजून अशीच काही काम करण्यासाठी मिळालेले बळ आहे. 

 खरं तर इथे थँक्यू म्हणून अजिबात मी कोणासोबतच असलेल नातं फॉर्मल करणार नाही. 
 मी त्या सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे आणि कायम राहीन.  पण  ज्या व्यक्ती मला या प्रवासात आता भेटल्या आहेत त्या सगळ्या व्यक्ती कायमस्वरूपी माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत सुरेख आणि अविस्मरणीय अशा अनुभवांचे साक्षीदार झालेल्या आहेत. 

 पहिल्या वहिल्या गोष्टी ज्या असतात ना त्यांचा आनंद हा खूप वेगळा असतो. माझ्यासाठी करुणात्रीपदीच्या पहिल्या तिन्ही वर्गांचा अनुभव हा असाच आनंदाच्या गाठोडे  झाला आहे. 

आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की ह्यावेळी मला त्याच्या बड्डेच मोठं रिटर्न गिफ्ट मित्राने ह्या सगळ्या अनुभूतीच्या स्वरूपात दिलं आहे. अजून काय पाहिजे? 

#फिलिंग_लाईक_आनंदाचे_डोही_आनंद_तरंग 

बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!

#दत्तात्रेयार्पणमस्तू #करुणात्रिपदी 
#गुरूवार #संकल्पदिन
#स्वत:ला_शोधताना
#गौरीहर्षल 

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

दुर्गे दुर्घट भारी भाग 3

#दुर्गे_दुर्घट_भारी भाग ३ 

ध्यानाला बसायचं म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक अवघड काम असत. पण माझ्या लेकाने पोटात असल्यापासून ही गोष्ट माझ्याकडून करून घेतली. 
जसं आमचा शेरू (बोका) अगदी थोरल्या मुलासारखा माझ्या हालचाली वर लक्ष ठेवायचा तसच लेकानेही सुरू केलं. आधी आपण शेरूचा अनुभव ऐकुया. 
शेरु म्हणायला फक्त बोका होता. पण बाकी सगळं वागणं अगदी घरातल्या मोठ्या माणसासारख. 
रोज तिन्ही सांजेला दिवा लावला की रामरक्षा आणि हनुमान चालीसा हे झालच पाहिजे असा त्याचा नियम होता. आता कुणी म्हणेल त्याला काय कळत होतं? पण त्याला कळायचं. ही दोन्ही स्तोत्रं आणि अजून काही स्तोत्रं खंड न पडता ऐकता यावीत म्हणून एका वापरात नसलेल्या फोनमध्ये सेव्ह करून मी ठेवली होती. तो फोन जिथे ठेवलेला असायचा शेरा बरोबर ठराविक वेळी तिथे जाऊन ओरडायला सुरुवात करायचा. आणि एकदा त्याला रिपीट मोडवर सगळ लावून दिलं की स्वतःच्या ठरलेल्या जागी बसून ऐकायचा. 
अमावस्या, पौर्णिमा वगैरेच्या दिवशी ते दिवसभर आमच्या घरात हळू आवाजात दोन्ही स्तोत्रं सुरू असायची. 
एक ,दोन वेळा हयगय केली तेंव्हा त्याला आणि इतर लेकरांना त्रास झाला. त्यानंतर मात्र माझी हिंमत झाली नाही. 
मंडळी एक साधी गोष्ट आहे , शेरुला काय कळत होतं हा भाग जर बाजूला ठेवला , तर रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकल्याने माझं जर काही नुकसान होत नाही तर मग उगाचच खुसपट काढून त्याला विरोध करणं हे मी टाळलं.मला काही हातातली कामं सोडून करावं लागणार होत का? तर नाही मग झालं. जस आपण गाणे ऐकतो तसच ऐकायचं. हळूहळू आपोआपच गोडी लागते आणि ती गोष्ट सवयीचा भाग होऊन जाते. 

जनरली बरेच जण विरोध करतात हे मी ऐकल. पण कॉमन सेन्स असलेली कुठलीही व्यक्ती सांगू शकते , ज्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो ते अशा गोष्टींमुळे अस्वस्थ होतात. 
शेरा ने हे सगळ माझ्या पहिल्या गर्भपाताच्या नंतर सुरू केलं होतं. आणि खर सांगू का तुम्ही जर 9 महिने फक्त ही दोन स्तोत्रं जरी ऐकली तरी तुमचं मूल अत्यंत हुशार, चपळ आणि निरोगी जन्माला येतं. 
बाकी करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेतच. 
मी स्वतः कुठेतरी अनुभव वाचून गुरूचरित्रामधला चौदावा अध्याय रोज  सहा वेळा वाचायला सुरुवात केली होती. नंतर जेंव्हा तो पाठ झाला तेंव्हा तर मी मोजत ही नसायचे की कितीवेळा म्हणतेय. 
त्या अनुभवामध्ये अस लिहिलं होतं की सहा वेळा अध्याय वाचल्याने होणारी संतती बुद्धिमान, तेजस्वी असते. बस...खरच अस होत की नाही हे बघण्यापेक्षा संतती होण्यासाठी हा उपाय करता येईल एवढच माझ्या मनात होत. आज मला त्याचे परिणाम दिसत आहेत अस मी नक्कीच म्हणू शकते. 

ह्या जगात प्रत्येक समस्येवर उपाय असतात आणि थोडेसे कष्ट घेऊन ते अमलात आणले तर त्यांचं योग्य ते फळही मिळतं. पण आपण काय करतो रडत बसतो, दुसऱ्याकडे बघत बसतो, त्यापेक्षा आपल्याला काय करता येईल हे बघितल तर तुम्हाला स्वतःला स्वतःची मदत करता येईल. 

आता वळूया ध्यान करणे ह्या गोष्टीकडे...
मी काही कुठे जाऊन ह्या गोष्टी शिकले नाही. माझ्या मनाला ज्या गोष्टी पटल्या त्या मी करण्यास सुरुवात केली. 
सुरुवातीला फक्त पाच मिनिटे मी बसायचे. साधारणपणे चौथ्या महिन्या नंतर मी जवळपास जमेल तसं करू लागले. 
त्या दरम्यान काही अनुभव आले त्यातले आजपासून शेयर करत आहे. 

२३जुलै२०१८ आषाढी एकादशी
आजपासून ध्यानधारणा करायला सुरुवात केली. येणारे अनुभव नुसतेच बोलण्यापेक्षा लिहीण्याचं ठरवलं.

साधारणतः 20 मिनिटे बसायचं ह्या हिशोबाने टायमर सेट केला होता. पहिली काही मिनिटे पूर्ण शांततेत गेली. मला फक्त माझा श्वास आणि हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्यानंतर अधूनमधून काहीतरी विचार मनात येत. मग मात्र मी अचानक कुणाच्या तरी मागे चालत निघाले. बोलत होतो आम्ही म्हणजे खरं तर मी बोलत होते , आणि ती व्यक्ती जी पुरुष होता की स्त्री माहीत नाही फक्त हुंकार देत होती. 
थोड्या वेळाने मी एका गुहेसारख्या ठिकाणी पोहोचले. मंद पण अगदी स्पष्ट दिसेल सगळं इतका प्रकाश होता आतमध्ये. समोरच थोड्याश्या उंच अशा ठिकाणी एक धूसर आकृती होती उदाहरण द्यायचे तर शंकराच्या मूर्तीची जी आऊट लाईन असेल तशी. पण तिथे फक्त वलय होतं तेजस्वी. मग माझी नजर अवतीभवती फिरली मी अक्षरशः शॉक झाले. अर्धगोलाकार जागेत जवळपास ९ माझ्या सारख्या दिसणाऱ्या स्त्रिया होत्या. सगळ्यांची वयं 30च्या आसपास. पण चेहरे प्रचंड तेजस्वी, सात्विक, शांत इन शॉर्ट मी जशी आहे त्या विरुद्ध एकदम. प्रत्येकजण ध्यानात मग्न होती  त्यामुळे डोळे कुणाचेही बघायला मिळाले नाहीत. 

दुसरीकडे माझे प्रश्न नॉनस्टॉप सुरू होते. "मी कोण आहे? ह्या कोण आहेत? मी ह्यांच्यासारखी दिसते की ह्या माझ्यासारख्या? पण मी अशी नाहीये इतकी शांत, संयमी वगैरे मग अस कसा?  मला इथे का आणलेत?"

उत्तर आलं,  
"समोर उंचावर असलेल्या मुख्य वलयातून फक्त तूच आहेस, कशाला हवीत सगळी उत्तरं लगेच, वेळ आली की कळेल, खूपच घाई करतेस"

 मग मी त्यांचं निरीक्षण करू लागले त्यामध्ये एकजण होती जी पूर्ण ९महिन्याचं पोट घेऊन बसली होती. मला मी 2 हात अंतरावर असूनही तिच्या पोटात हालचाल करणारं बाळ स्पष्ट दिसत होतं. ते सतत हालचाल करत असूनही ती मात्र ध्यानात मग्न होती. अलिप्त, शांत आणि चेहऱ्यावर इतकं कम्फर्टिंग हसू की बघणारा माणूस रिलॅक्स होईल. मी तिला विचारणार इतक्यात एकजण माझ्याजवळून चालत गेली तिच्या कडेवर बाळ होतं, पण चेहऱ्यावरचे भाव सेम. ह्या सगळ्यात एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे त्यांचे डोळे खूप प्रयत्न करूनही मला कुणाचेच डोळे बघता आले नाहीत किंवा दिसले नाहीत. हे इतकं सगळं होईपर्यंत अर्थातच माझ्यासारख्या उतावळा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीचा पेशन्स संपला होता मी वळून त्या मुख्य वलयाला काही विचारणार इतक्यात तेच म्हणे मी चाललोय योग्य वेळी सगळी उत्तरं देईन. 
झालं माझ्या तोंडून हट्टीपणे निघालं,"काहीच सांगायचं नव्हतं तर इतक्या लांब आणता कशासाठी? मी चालले परत". आणि बरोबर 16 व्या मिनिटाला माझे डोळे उघडले. #गौरीहर्षल

मंडळी , अशा छोट्या छोट्या अनुभूती मधून मला त्यांनी जे काही शिकवलं तेच आज माझी ताकद आहे. 
 
आज एकच सांगेन, भक्ती, नामजप, पूजा , ध्यान ह्या गोष्टी काही तरी मिळावं म्हणून करण्यापेक्षा त्यातून नवीन काही तरी शिकता येईल म्हणून आनंद घेत करावं. 

आणि एकदा का ती गंमत कळली की ते आपोआपच आपला हात धरून आपल्याला फिरवून आणतात. 

मी लवकरच येतेय पुढचा अनुभव घेऊन तोपर्यंत? 

तोपर्यंत सगळं काही जगदंबार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 

#आई_राजा_उदे_उदे !!!  २२ नोव्हेंबर २०२२ मंगळवार 

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल