दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
#दत्त_दत्त_ऐसे_लागले_ध्यान
#संक्षिप्त_गुरुचरित्र
२१ दिवस चॅलेंज
एखादा मानसिक त्रास सुध्दा तुम्हाला योग्य मार्गावर नेऊन सोडू शकतो. कस? मन:शांती हवी आहे म्हणून मी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण सुरु केले. आणि हळूहळू मन:शांती सोबत अजून बरच काही पदरात अलगद येवुन पडलं.
अनुभव पहिला
अचानक तंद्री लागली आणि एक 5 वर्षांची मुलगी समोर आली. आधी साधं असलेलं तिचं रूप एका क्षणांत पालटलं आणि ती काली मातेच्या रूपात दिसू लागली. खोडकर हसून मला फक्त एकच गोष्ट ती म्हणत होती आणि ती म्हणजे मी येऊ का तुझ्याशी खेळायला? तुला खेळायला घेत नाही न कुणी? मी आले की बघ सगळे कसे पळून जातील. तिच्या डोळ्यातले ते खट्याळ भाव माझ्या मनावर असलेला ताण कमी करण्यासाठी पुरेसे होते.
अनुभव दुसरा
काही कारणांमुळे सतत भीती वाटत होती पण वाचन सुरू केलं आणि मनात एक १४ व्या अध्यायातील त्या ओळी सतत डोळ्यासमोर नाचू लागल्या. कोणत्या?
न करा चिंता असाल सुखे
सकळ आरिष्टे गेली दुःखे
म्हणोनी हस्त ठेवती मस्तके
भाक देती तयेवेळी ||४४||
असं काही घडण्याची ही काही माझी पहिली वेळ नव्हती पण आपल्या हळव्या मनाला त्याने स्वतःचं अस्तित्व दाखवून उभारी देण्यासारखा आधार दुसरा कुठलाच नाही.
अनुभव तिसरा
ज्याचे हृदयीं श्रीगुरु स्मरण
त्यासी कैंचे भय दारुण
काळमृत्यू न बाधे जाण
अपमृत्यू काय करी||२७||
त्या दिवशी तिघांच्याही जीवावर आलेलं परस्पर टळल आणि पहाटे पासून मिळणाऱ्या संकेतांचा अर्थ लक्षात आला.
अनुभव चौथा
अडथळा हा प्रकार मला वाचन करायचं म्हटल्यावर कधीच आलेला नाही. उलट सगळं अस काही जुळून येत की मनापासून वाचन करता येत. ह्या वेळी वाचताना तर इतकी अनुकूल परिस्थिती निर्माण होत होती की नकळतच दिवसभर तोंडातून त्याच वाचलेल्या ओळी बाहेर पडत.
सतत आपण एका वेगळ्या विश्वात वावरत असल्याची जाणीव होत होती.
अनुभव पाचवा
घोरकष्टोद्धरण स्तोत्र सुद्धा रोज ठराविक पटीत सुरू होते. त्यामुळे एक होत होत कुणी आपलं असो किंवा नसो. एकदा आपण त्याला आपलं सगळ काही मानलं की झालं अस सातत्याने घडून आपोआपच ओठातून हे बाहेर पडायचं.
त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं ।
त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥
अशाच काही स्मरणीय अनुभवांना ओंजळीत देत दत्तजयंतीच्या दिवशी संकल्प पूर्ण करून घेतला गेला. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात त्यामुळे एकच सांगेन हे कस घडत? अशी शंका जर मनात येत असेल न तर आयुष्यात एकदा तरी आपल्या श्रद्धास्थान असलेल्या ईष्ट देवतेला मनापासून शरण जाऊन बघा.
ह्या गोष्टीतली गंमत, जादू तुम्हाला ही कळेल.
आणि आता 21 दिवसांच फलित म्हणजे हे सगळं माझ्या सवयीचा भाग झालं आहे.
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!!
शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल
टिप्पण्या