दुर्गे दुर्घट भारी भाग 3

#दुर्गे_दुर्घट_भारी भाग ३ 

ध्यानाला बसायचं म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक अवघड काम असत. पण माझ्या लेकाने पोटात असल्यापासून ही गोष्ट माझ्याकडून करून घेतली. 
जसं आमचा शेरू (बोका) अगदी थोरल्या मुलासारखा माझ्या हालचाली वर लक्ष ठेवायचा तसच लेकानेही सुरू केलं. आधी आपण शेरूचा अनुभव ऐकुया. 
शेरु म्हणायला फक्त बोका होता. पण बाकी सगळं वागणं अगदी घरातल्या मोठ्या माणसासारख. 
रोज तिन्ही सांजेला दिवा लावला की रामरक्षा आणि हनुमान चालीसा हे झालच पाहिजे असा त्याचा नियम होता. आता कुणी म्हणेल त्याला काय कळत होतं? पण त्याला कळायचं. ही दोन्ही स्तोत्रं आणि अजून काही स्तोत्रं खंड न पडता ऐकता यावीत म्हणून एका वापरात नसलेल्या फोनमध्ये सेव्ह करून मी ठेवली होती. तो फोन जिथे ठेवलेला असायचा शेरा बरोबर ठराविक वेळी तिथे जाऊन ओरडायला सुरुवात करायचा. आणि एकदा त्याला रिपीट मोडवर सगळ लावून दिलं की स्वतःच्या ठरलेल्या जागी बसून ऐकायचा. 
अमावस्या, पौर्णिमा वगैरेच्या दिवशी ते दिवसभर आमच्या घरात हळू आवाजात दोन्ही स्तोत्रं सुरू असायची. 
एक ,दोन वेळा हयगय केली तेंव्हा त्याला आणि इतर लेकरांना त्रास झाला. त्यानंतर मात्र माझी हिंमत झाली नाही. 
मंडळी एक साधी गोष्ट आहे , शेरुला काय कळत होतं हा भाग जर बाजूला ठेवला , तर रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकल्याने माझं जर काही नुकसान होत नाही तर मग उगाचच खुसपट काढून त्याला विरोध करणं हे मी टाळलं.मला काही हातातली कामं सोडून करावं लागणार होत का? तर नाही मग झालं. जस आपण गाणे ऐकतो तसच ऐकायचं. हळूहळू आपोआपच गोडी लागते आणि ती गोष्ट सवयीचा भाग होऊन जाते. 

जनरली बरेच जण विरोध करतात हे मी ऐकल. पण कॉमन सेन्स असलेली कुठलीही व्यक्ती सांगू शकते , ज्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो ते अशा गोष्टींमुळे अस्वस्थ होतात. 
शेरा ने हे सगळ माझ्या पहिल्या गर्भपाताच्या नंतर सुरू केलं होतं. आणि खर सांगू का तुम्ही जर 9 महिने फक्त ही दोन स्तोत्रं जरी ऐकली तरी तुमचं मूल अत्यंत हुशार, चपळ आणि निरोगी जन्माला येतं. 
बाकी करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेतच. 
मी स्वतः कुठेतरी अनुभव वाचून गुरूचरित्रामधला चौदावा अध्याय रोज  सहा वेळा वाचायला सुरुवात केली होती. नंतर जेंव्हा तो पाठ झाला तेंव्हा तर मी मोजत ही नसायचे की कितीवेळा म्हणतेय. 
त्या अनुभवामध्ये अस लिहिलं होतं की सहा वेळा अध्याय वाचल्याने होणारी संतती बुद्धिमान, तेजस्वी असते. बस...खरच अस होत की नाही हे बघण्यापेक्षा संतती होण्यासाठी हा उपाय करता येईल एवढच माझ्या मनात होत. आज मला त्याचे परिणाम दिसत आहेत अस मी नक्कीच म्हणू शकते. 

ह्या जगात प्रत्येक समस्येवर उपाय असतात आणि थोडेसे कष्ट घेऊन ते अमलात आणले तर त्यांचं योग्य ते फळही मिळतं. पण आपण काय करतो रडत बसतो, दुसऱ्याकडे बघत बसतो, त्यापेक्षा आपल्याला काय करता येईल हे बघितल तर तुम्हाला स्वतःला स्वतःची मदत करता येईल. 

आता वळूया ध्यान करणे ह्या गोष्टीकडे...
मी काही कुठे जाऊन ह्या गोष्टी शिकले नाही. माझ्या मनाला ज्या गोष्टी पटल्या त्या मी करण्यास सुरुवात केली. 
सुरुवातीला फक्त पाच मिनिटे मी बसायचे. साधारणपणे चौथ्या महिन्या नंतर मी जवळपास जमेल तसं करू लागले. 
त्या दरम्यान काही अनुभव आले त्यातले आजपासून शेयर करत आहे. 

२३जुलै२०१८ आषाढी एकादशी
आजपासून ध्यानधारणा करायला सुरुवात केली. येणारे अनुभव नुसतेच बोलण्यापेक्षा लिहीण्याचं ठरवलं.

साधारणतः 20 मिनिटे बसायचं ह्या हिशोबाने टायमर सेट केला होता. पहिली काही मिनिटे पूर्ण शांततेत गेली. मला फक्त माझा श्वास आणि हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्यानंतर अधूनमधून काहीतरी विचार मनात येत. मग मात्र मी अचानक कुणाच्या तरी मागे चालत निघाले. बोलत होतो आम्ही म्हणजे खरं तर मी बोलत होते , आणि ती व्यक्ती जी पुरुष होता की स्त्री माहीत नाही फक्त हुंकार देत होती. 
थोड्या वेळाने मी एका गुहेसारख्या ठिकाणी पोहोचले. मंद पण अगदी स्पष्ट दिसेल सगळं इतका प्रकाश होता आतमध्ये. समोरच थोड्याश्या उंच अशा ठिकाणी एक धूसर आकृती होती उदाहरण द्यायचे तर शंकराच्या मूर्तीची जी आऊट लाईन असेल तशी. पण तिथे फक्त वलय होतं तेजस्वी. मग माझी नजर अवतीभवती फिरली मी अक्षरशः शॉक झाले. अर्धगोलाकार जागेत जवळपास ९ माझ्या सारख्या दिसणाऱ्या स्त्रिया होत्या. सगळ्यांची वयं 30च्या आसपास. पण चेहरे प्रचंड तेजस्वी, सात्विक, शांत इन शॉर्ट मी जशी आहे त्या विरुद्ध एकदम. प्रत्येकजण ध्यानात मग्न होती  त्यामुळे डोळे कुणाचेही बघायला मिळाले नाहीत. 

दुसरीकडे माझे प्रश्न नॉनस्टॉप सुरू होते. "मी कोण आहे? ह्या कोण आहेत? मी ह्यांच्यासारखी दिसते की ह्या माझ्यासारख्या? पण मी अशी नाहीये इतकी शांत, संयमी वगैरे मग अस कसा?  मला इथे का आणलेत?"

उत्तर आलं,  
"समोर उंचावर असलेल्या मुख्य वलयातून फक्त तूच आहेस, कशाला हवीत सगळी उत्तरं लगेच, वेळ आली की कळेल, खूपच घाई करतेस"

 मग मी त्यांचं निरीक्षण करू लागले त्यामध्ये एकजण होती जी पूर्ण ९महिन्याचं पोट घेऊन बसली होती. मला मी 2 हात अंतरावर असूनही तिच्या पोटात हालचाल करणारं बाळ स्पष्ट दिसत होतं. ते सतत हालचाल करत असूनही ती मात्र ध्यानात मग्न होती. अलिप्त, शांत आणि चेहऱ्यावर इतकं कम्फर्टिंग हसू की बघणारा माणूस रिलॅक्स होईल. मी तिला विचारणार इतक्यात एकजण माझ्याजवळून चालत गेली तिच्या कडेवर बाळ होतं, पण चेहऱ्यावरचे भाव सेम. ह्या सगळ्यात एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे त्यांचे डोळे खूप प्रयत्न करूनही मला कुणाचेच डोळे बघता आले नाहीत किंवा दिसले नाहीत. हे इतकं सगळं होईपर्यंत अर्थातच माझ्यासारख्या उतावळा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीचा पेशन्स संपला होता मी वळून त्या मुख्य वलयाला काही विचारणार इतक्यात तेच म्हणे मी चाललोय योग्य वेळी सगळी उत्तरं देईन. 
झालं माझ्या तोंडून हट्टीपणे निघालं,"काहीच सांगायचं नव्हतं तर इतक्या लांब आणता कशासाठी? मी चालले परत". आणि बरोबर 16 व्या मिनिटाला माझे डोळे उघडले. #गौरीहर्षल

मंडळी , अशा छोट्या छोट्या अनुभूती मधून मला त्यांनी जे काही शिकवलं तेच आज माझी ताकद आहे. 
 
आज एकच सांगेन, भक्ती, नामजप, पूजा , ध्यान ह्या गोष्टी काही तरी मिळावं म्हणून करण्यापेक्षा त्यातून नवीन काही तरी शिकता येईल म्हणून आनंद घेत करावं. 

आणि एकदा का ती गंमत कळली की ते आपोआपच आपला हात धरून आपल्याला फिरवून आणतात. 

मी लवकरच येतेय पुढचा अनुभव घेऊन तोपर्यंत? 

तोपर्यंत सगळं काही जगदंबार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 

#आई_राजा_उदे_उदे !!!  २२ नोव्हेंबर २०२२ मंगळवार 

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी