शुक्रवार, २७ मार्च, २०२०

सुरुवात तर करूया

सुरुवात तर करूया
जमलं नाही तर काय
चुकलं सगळंच तर काय
ह्या सगळ्यातून बाहेर पडून नवं काही करूया

सुरुवात तर करूया
राहून गेलेलं करण्यासाठी
पुन्हा एकदा जगण्यासाठी

सुरुवात तर करूया
स्वतःला समजून घेण्यासाठी
स्वतःला वेळ देण्यासाठी

सुरुवात तर करूया 
दुःखातुन उभं राहण्यासाठी
सुखातही जमिनीवर असण्यासाठी

खूप काही नाही करायचं
मिळालेलं आयुष्य भरभरून जगायचं
पण त्यासाठी
सुरुवात तर करूयाव
#गौरीहर्षल
#११.१.२०१९

गोडवा

गोडवा मनांचा हळव्या भावनांचा
न कळेना कुठे हरवून गेला
साद घालणारा ओलावा आवाजाचा
स्मार्टफोनच्या गर्दीत गायब झाला

माणूस अजून जिवंत आहे 
लास्ट सीन सांगू लागले
कुणाला नि कुठे भेटायचं 
स्टेटसवरून कळू लागले

जवळची आणि लांबची नाती 
लाईक वरून ठरू लागली
जन्म,मृत्यू, प्रत्येक बातमी
फेसबुकवर शेयर झाली

पूर्वीच्या काळी माणसांच्या गर्दीत 
शोधावे लागायचे आपले परके 
आता मात्र फ्रेंड लिस्टमध्ये
आपलेच झाले असतात परके 

अशीही ही अधोगती प्रगती म्हणून मिरवतेय
सगळं काही पब्लिक करण्यात माणुसकी मात्र हरवतेय 
#गौरीहर्षल #९.२.२०१९




अवघड

अवघड असतं ना स्वतःला समजावणं
प्रत्येकाच्या चौकटीत सामावून जगणं
तरीही करतात काहीजण अशी कसरत
आयुष्य जगतात स्वतःच्या मनाला मारत
जग देतं त्याला गोंडस नाव चांगुलपणाचं
मग अखंड जगावं लागतं जीवन त्यागाचं
त्यांचा त्रास कुणाला समजत नाही
समजला तरी जाणून कुणी घेत नाही
हळूहळू सवय होते अलिप्त राहून सुखी होण्याची
अन् तीही कधी कधी बळी ठरते स्वार्थी असण्याची
चांगलं वागणं इतकं अवघड होईल हे आता कळू लागतं
पण रक्तात भिनलेलं हे व्रत सोडणं आता शक्य नसतं
गौरी हर्षल

स्वतःला शोधताना

स्वतःला शोधताना
आपल्या आजूबाजूला जिवंत माणसंच राहतात हे विसरतोय का आपण? विशेष असं काही नाही पण सहजच फोनच्या गॅलरीकडे आज नजर टाकली. जास्त प्रमाणात निराश, दुःखी मनस्थिती असताना सेव्ह केलेल्या वाक्यांच्या इमेजेस सापडल्या. त्या उडवत असतानाच जाणवत राहीलं की मी एकटीच अशी नाहीये बरेच जण हेच करत आहेत. राग आला म्हणून, वाईट वाटलं म्हणून अशा इमेजेस फेसबुक किंवा वॉट्सएप च्या स्टेटसवर अडकवायच्या. ह्या मागे इच्छा एकच असते ज्याचा राग आला आहे त्याला ते समजावं आणि जगालाही कळावं की आपण वाईट मनस्थितीत आहोत. मी तर गेले कित्येक दिवस हे सगळं करतेय मलाही ठाऊक नाही. पण कुठेतरी असं वाटलं की असं केल्याने मला किंवा त्या परिस्थितीत माझ्या मते दोषी असणाऱ्या व्यक्तीला फरक पडला आहे का? तर उत्तर अर्थातच नाही असं मिळालं. का?? कारण 
१. मी किंवा समोरच्याने संवादच साधला नाही. त्यामुळे प्रश्न आहे तिथेच राहिला आणि गैरसमजांचा घडा मात्र भरत गेला. परिणामी नातं फक्त तोंडावर हसून वेळ मारुन नेण्याइतक जिवंत राहिलं. 
२. समोरच्याला माझ्या मनात काय आहे हे न कळल्याने मला मात्र जास्तच त्रास झाला. त्याचा परिणाम माझं खाणंपिणं, विचार करणं आणि एकंदरीत रुटीन लाइफ हे बिघडण्यात झाला. 
मग यावर उपाय काय??? उपाय नेहमीचा जो खूपच चावून चोथा झाला आहे तोच दुर्लक्ष करणे😝😝 हो पण यात एक गंमत मी स्वतःसाठी शोधली ती म्हणजे जेंव्हा जेंव्हा असे वाईट,दुःखी विचार मनात आले मी त्याच्या उलट विचार सगळीकडे शोधू लागले. म्हणजे सकारात्मक विचार जे मला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. फक्त एवढंच नाही तर प्रत्येकवेळी त्या मनस्थितीच्या उलट विचार शोधला आणि तो समोर आल्यावर मनात काय काय विचार येतात ते कागदावर उतरवत गेले. बदल अर्थातच लगेच नाही घडला कारण सुरुवातीला फक्त मनातली खदखद बाहेर पडत असे. पण तेही होऊ दिलं हळूहळू मात्र खदखद संपून खरंच त्या प्रसंगातून स्वतःला काय शिकायला मिळालं ते लिहिलं जाऊ लागलं. हे सगळं फक्त स्वतःपुरत बरका😝😝 पण मग 15 दिवसात लक्षात आलं की खरंच गरज आहे का किंवा असते का इतकं टोकाला जाऊन कुणाचं वागणं, बोलणं मनावर घेण्याची??? आपल्याला दुखावून समोरची व्यक्ती जर काही झालंच नाही अशा थाटात जगत असते तर आपण स्वतःला कोणत्या चुकीची शिक्षा देत असतो??  मग मात्र ठरवलं की राग येणं, वाईट वाटण हे तर होतच राहणार आहे पण दरवेळेस असं झालं की आपल्या मनाचा तो दरवाजा उघडायचा जो आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. ते ठिकाण म्हणजे आपल्या नव्या विचारांचं दालन जे प्रत्येक चुकीची, अयोग्य वाटणारी गोष्ट एका नव्या नजरेतून दाखवेल. हा सगळा प्रवास स्वतःचा स्वतःसोबतच असणार आहे त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे शोधण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. आणि इतर कुणाच्या येण्याची वाट बघत बसण्याचीही गरज नाही.  
मला तरी सापडतय बरच काही बघा तुम्हाला काही सापडतय का ?? कदाचित रोजच्या व्यवहारात हरवून गेलेले तुम्हीच सापडताल. प्रयत्न करण्यात तोटा काहीच नाही झाला तर फायदाच आहे so give it a chance. 
बाकी दत्तात्रेयार्पणमस्तु!!! 
#गौरीहर्षल
१४.७.२०१८

रिते रिते

कधी रिते रिते होऊन हरवून जाते
कधी भरलेल्या आभाळासारखे बरसते
मनाचे तर असेच असते...

कधी धरते फेर आठवणींच्या घोळक्यात
कधी शांत बसून राहते आपल्याच नादात
स्वतःच्या तालावर सगळ्यांना नाचवते
मनाचे तर असेच असते...

कधी भिजते चिंब पावसात
कधी रात्र रात्र सरते आसवात
हरवलेल्या क्षणांना आठवत राहते 
मनाचे तर असेच असते...

कधी होते लहान मूल
कधी निर्माल्यातले फूल
कोमेजूनही टवटवीत असण्याचा प्रयत्न करते 
मनाचे तर असेच असते...

©गौरी हर्षल ११.७.२०१९

पॉझिटिव्ह रहा

पॉझिटिव्ह रहा, जगा, विचार करा म्हणणं किती सोपं असतं
प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाचं मन जगण्यासाठी झगडत असतं
त्रास होतोच , वाईटही वाटत आणि रडूही येतच सर्वानाच
पण उघडपणे व्यक्त होण्यासाठी हिंमत नसते कुणालाच
जग म्हणजे कोण ?? २,४जवळचे नातेवाईक नी मित्र
कळवावं का त्यांना मनातलं सगळं लिहून खरमरीत पत्र??
प्रेम, माया, काळजी ,आपुलकी हे सगळे अनुभवायचे असते
त्यासाठी कुणाजवळ तरी व्यक्त होण्याची गरज असते
इथेच मात्र सगळं कसं झाकलं जातं बुरख्याखाली इगोच्या 
वरून दिसतो स्ट्रॉंगपणा आतून मात्र प्रचंड केमिकल लोच्या
विचारणारं कुणीच नाही भेटत तेव्हा लहान व्हावं स्वतःसाठी
स्वतःच्या सगळ्या चुका माफ करत घालावं स्वतःलाच पाठी
आपल्यासाठी इतर कुणी अस काही का करावं??
ज्याचं त्याचं सुख ज्याने त्यानेमनापासून घडवावं
बळजबरीने ओढून ताणून सुख कधी येत नसतं
प्रयत्न केला तर आपल्याच मनात सुखाचं गाव वसतं
इतरांच्या वागण्यातून सतत आनंद वेचायला शिकावं
चिडचिड आणि रागातही मनातलं मूल अलगद जपावं
करावी लागत नाही उगाच धडपड पॉझिटिव्ह होण्यासाठी
मनातल्या मनात सापडते जागा रुसल्यावर बसण्यासाठी
साधा सोपा मंत्र असतो स्वतःला स्वतःच जपण्यात
आपण मात्र वेळ गमावतो नको तिकडे धावण्यात
#गौरीहर्षल #२७.३.२०१९











गुरुवार, २६ मार्च, २०२०

खरंच अस कधी


खरंच असं कधी झालं तर 
सकाळच्या पहिल्या किरणांपासून
पसरत गेला हवाहवासा वाटणारा प्रकाश 
आनंदाचा, चैतन्याचा आणि मन शांत करणारा

खरंच असं कधी झालं तर 
भरून घेताना नवासा श्वास नवीन दिवसात
सोडून गेले सगळे दुःखाचे अडकलेले क्षण
मनातून, स्मृतींतून आणि भरलेल्या त्या डोळ्यांतुन

खरंच असं कधी झालं तर 
आयुष्यात उरलीच नाही जागा
सतत दुःख वाटण्यासाठी आसुसलेल्या
नकोशा गोष्टींना, वस्तुंना आणि माणसांनाही

खरंच असं कधी झालं तर 
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला 
मिळाली एक नवी दिशा
बदलणारी, हसवणारी आणि नकळतच मळभ दूर करणारी 

खरंच असं कधी झालं तर 
जगण्याचा होऊन जाईल उत्सव
सुखा-समाधानाच्या हातात हात घालून
मनाला मिळेल उभारी पुन्हा पुन्हा आशेने जगवणारी.......

#गौरीहर्षल #२०/९/२०१८