गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...

आपण सगळेच जण आपल्या जवळच्या लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. कधी कधी तर अनोळखी लोकांना सुद्धा आपण न मागता मदत करण्यास तयार होतो. 
अशावेळी आपण त्यांना ते सगळे उपाय सांगत असतो जे आपल्याला उपयोगी पडलेले असतात. पण ते उपाय स्विकारण्याची त्यांची तयारी आहे किंवा नाही हे आपल्याला माहित नसतं.
मात्र आपल्याला असा ठाम विश्वास असतो की जे पुस्तकं किंवा औषध, किंवा एखादं मोटिव्हेशनल भाषण जसं आपल्या मनाला, शरीराला उभारी देण्यासाठी उपयोगी पडले तेच त्यांनाही तशीच सकारात्मक ऊर्जा देईल. 
पण आपण हे विसरतो की, आपण ज्या फेजमध्ये आहोत किंवा होतो त्याच फेजमध्ये समोरची व्यक्ती नाहीये. 
त्यामुळे अर्थातच हे उपाय कितीही प्रभावी असले तरीही जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची ते स्विकारण्याची मानसिक तयारी नसते तोपर्यंत त्यांचा काहीही उपयोग होत नाही. 
म्हणूनच मदत करताना ती समोरच्या व्यक्तीवर लादली जात नाही ना हे लक्षात घ्यावं. 
त्रास शारीरिक असो किंवा मानसिक प्रत्येक व्यक्तीची त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा महत्वाची असते नेहमीच. 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
मानसशास्त्रतज्ञ



 

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

कौन्सेलिंग बेसिक ..

Don't judge a book by its cover...
अतिशय साधं वाक्य पण आपण मात्र कुणाला भेटल्यानंतर हीच गोष्ट करत असताॆ ना? 

पहिल्या भेटीत व्यक्ती कशी आहे हे कधीच कळत नाही. त्यामुळे कुणाबद्दलही कुठलेही अडाखे बांधू नयेत हे खरं तर बऱ्याचदा सांगितलं जातं.

 कारण पहिल्या भेटीत शिष्ट, माणूसघाणी वाटणारी व्यक्ती पुढे जाऊन कदाचित तशी नसू शकते...
 आणि तुमच्याशी प्रचंड मोकळेपणाने वागणारी, खूपच आपलेपणा दाखवणारी व्यक्ती आतल्या गाठीचीही असू शकते...

 सगळी माणसं सातत्याने मुखवटे घालूनच वावरत असतात.
 हे मुखवटे कोणासमोरही उतरत नाहीत.
 प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कोण कुठल्या परिस्थितीतून जात आहे हे कोणालाही माहीत नसतं.
 असो तर मुद्दा हा आहे.....
 जेव्हा एखाद्या व्यक्तीला समुपदेशनाच्या क्षेत्रात कार्य करायचे असते, तेव्हा तिला तटस्थपणे इतरांचे निरीक्षण करणे जमायला हवे.
 कुठल्याही व्यक्ती बद्दल कमेंट्स पास करणं, गॉसिपिंग करणे या गोष्टी टाळता येणे जमायला हवं.
 जर या गोष्टी जमत नसतील तर त्या शिकायलाच हव्या.... तर आणि तरच तुम्ही समोर येणाऱ्या क्लायंटचे समुपदेशन उत्तम प्रकारे करू शकता.
कौन्सेलिंग बेसिक ... 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

सोमवार, १ जानेवारी, २०२४

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव
कालाय तस्मै नमः ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे असा उल्लेख त्यामध्ये मी केला होता. 
कालाय तस्मै नमः मधील सगळ्यात महत्वाच्या पात्रांपैकी एक पात्र म्हणजे अरुंधती श्रीपाद कुलकर्णी, कैवल्य ची आई. 
ज्यांनी ही कथा प्रतीलिपीवर किंवा पुस्तकाच्या माध्यमातून ( shopizen ॲप वरून मागवता येईल) वाचली आहे त्यांना त्या पात्राबद्दल माहीत आहे. 
नवीन वाचकांसाठी थोडक्यात सांगते ,
 कालाय तस्मै नमः ही गोष्ट आहे कुलकर्णी कुटुंबाची...
ह्या कुटुंबातील थोरल्या सुनेवर अरुंधतीवर घरातील कुणीतरी अमानवीय शक्तींसोबतच विषप्रयोग करत आहे...
पण अरुंधतीला मिळाली आहे दैवी शक्तींची देणगी...
तिच्या जीवाशी खेळण्याचा परिणाम होतो सगळ्या कुटुंबावर ....
अरुंधतीचा अकाली मृत्यू कुटुंबाला देतो मुलगी जन्माला न येण्याची शिक्षा.....
पण मग अचानक काही वर्षांनी घरात एक मुलगी जन्माला येते आणि ती जगते ....
तिच्या जन्माला येण्यामागे काही रहस्य आहे की अरुंधतीने घेतला आहे पुनर्जन्म? 
अरुंधतीच्या मृत्यूला जबाबदार असणारे पुन्हा एकदा प्रयत्न करतील का? त्या नुकत्याच जन्माला आलेल्या जीवाला संपवण्याचा... 
वरवर सामान्य दिसणाऱ्या ह्या कुटुंबातील लोकांनी अशी काय रहस्य दडवली आहेत आपल्या मनात?  

तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की या कथेतील अरुंधती च्या मृत्यु आधी ती तिच्या सासऱ्याना काही गोष्टी सांगते. त्यातील एक गोष्ट म्हणजे घरातल्या सर्वांसोबत कुलदैवतेच्या दर्शनाला जाणे. ज्यामुळे तिच्या मृत्युने घराला लागलेला दोष कमी किंवा सुसह्य होईल. 

ह्या मुद्द्यावरून माझ्या एका अध्यात्मिक साधक असलेल्या वाचक मैत्रिणीने नुकतीच एक सुंदर अनुभूती अनुभवली. 

ही मैत्रीण स्वतः अध्यात्मिक साधनेत एका उंचीवर आहे. तिचा अनुभव तिच्या शब्दात जेव्हा तिने मला सांगितला तेंव्हा अंगावर उमटलेला शहारा आजही मला आठवतो. 

माझं या मैत्रिणीशी बोलणं नुकतच झालं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातच. त्यामुळे तिला आलेली अनुभूती हा आमच्या दोघींसाठी अध्यात्मिक संकेत आहे असं मला वाटत. 

कालाय तस्मै नमः कथेत ज्याप्रमाणे कुलकर्णी कुटुंब काही अडचणींनी त्रासलेले आहे त्याच प्रमाणे या मैत्रिणीचे माहेरचे कुटुंबीय सुद्धा दीड वर्षांपूर्वी काही गोष्टींना सामोरे जात होते. 
घरात वादविवाद, लग्न न जमणे, जमलेल लग्न मोडणे इतर काही त्रास हे सगळं ही मैत्रीण अनुभवत होती. पण तिला उपाय सापडला तो वर उल्लेख केलेल्या अरुंधतीच्या तोंडी असलेल्या संवादामध्ये तिने तिच्या माहेरच्या घरच्यांना ठामपणे हा उपाय करण्यासाठी सांगितले.
 मी इथे सविस्तर सगळं सांगू शकत नाही. कारण हा त्या कुटुंबाचा वैयक्तिक अनुभव आहे. पण महत्त्वाचा मुद्दा हा की, दीड वर्षांपूर्वी कुलदैवतेच्या दर्शनाला जाऊ लागल्यानंतर या कुटुंबाने विस्कटलेल्या गोष्टी नीट होताना बघितल्या.
यामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी गोष्टी नीट होताना बघितल्या त्याचप्रमाणे आगळीक झाल्यानंतर थोड्या वरून गोष्टी पुन्हा विस्कटताना सुद्धा बघितल्या. 
हे सगळं अनुभवणाऱ्या आपल्या साधक मैत्रिणीने तिच्यावतीने सतत देवीच्या चरणी प्रार्थना करत कुटुंबाला सद्बुद्धी देण्याची विनंती केली. आणि फायनली दीड वर्षानंतर अनेक अडथळे पार करत त्यांच्या घरामध्ये मंगल कार्य छान पद्धतीने पार पडले.
इथे या प्रत्यक्ष अनुभवांमध्ये अनेक गोष्टी होत्या. 
जसं की या घरातील व्यक्तीसुद्धा नको त्या मार्गांचा अवलंब करत होत्या चुकून किंवा हेतुपुरस्सर घरात येणाऱ्या माहेरवाशीणीचा अपमान केला जात होता. कुळधर्म कुळाचार योग्य पद्धतीने केले जात नव्हते. 
जसजसे हे कुटुंब त्यांच्या कुलदैवतेचे दर्शनाला जाऊ लागले, तसतशा हळूहळू गोष्टी मार्गी लागत आहे ते त्यांच्या लक्षात आले. अर्थात या गोष्टींसाठी बराच वेळ जावा लागला आणि तो लागतोच. पण संयमाने या कुटुंबाने एकमेकांची साथ देत त्या अवघड वेळेवरती मात केली.
 आणि देवीच्या इच्छेने आणि कृपाशीर्वादाने ते या सगळ्या दिव्यातून बाहेर पडले. 

ज्या साधक मैत्रिणीने अनुभव शेअर केला तिचे मनापासून आभार मानते आहे कारण मला स्वतःला हे लेखन माझ्याकडुन का करून घेतले जाते याची जाणीव या अशा अनुभवांतून होते. 

या कुटुंबाकडून मिळालेल्या सदिच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. 
माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट ही होती की , मी कधीही न ऐकलेल्या कुलदेवतेची ओळख मला या अनुभवातून झाली. 
श्री गड कालिका माता धार (इंदोर), माहेरची कुलस्वामिनी 🙏
देवीचा फोटो सोबत शेयर करतेय माहिती गुगल वर मिळेल. 
जिथे मी विचार काय कल्पनाही करू शकत नाही तिथून देवाचं माझ्याकडे लक्ष आहे. आणि हे कार्य कुठल्या तरी विशिष्ट हेतून माझ्याकडुन करून घेतले जाते आहे याची जाणीव झाली. 
माझ्यासाठी हा अनुभव करुणात्रिपदीच्या अनुभवाप्रमाणे च एक विलक्षण अनुभूती आहे. 
लिहिताना खरे तर मला शब्द सुचत नव्हते पण " हे श्रेय माझं नाही. ही माझ्या मित्राची, दत्ताची इच्छा. आणि दत्त जयंतीच्याच आधी हा अनुभव कानावर येणं हे माझं रीटर्न गिफ्ट ❤️❤️❤️" 
बाकी? आता बाकी नाही...
सगळंच काही दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
आई राजा उदो उदो
स्वतःला शोधताना - गौरीहर्षल
1 जानेवारी 2024 

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

आज कुछ अच्छा पढते हैं

#आज_कुछ_अच्छा_पढते_हैं 
सकाळी उठल्यावर मनात चांगले विचार आणले तर दिवस चांगला जातो असं आपण ऐकत आलो आहोत. 
पण खरंच असं होतं का? रोज कितीही ठरवलं तरी आजूबाजूच्या वातावरणाचा, परिस्थितीचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो. मग अशा वेळेला काय करायचं? 
असच एक ॲप चाळत असताना मला मॉर्निंग पेजेस ही संकल्पना सापडली. तशी ती बरीच जुनी आहे. 
1992 च्याच आसपास julia कॅमेरॉन ह्या लेखिकेने the artist's way म्हणून एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाची बेसिक संकल्पना होती spiritual path to higher creativity. 
असो तर मुख्यत्वे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेला काय अपेक्षित होतं ते सांगते. 
तिच्या म्हणण्यानुसार सकाळी कमीत कमी 20 मिनिटे स्वतःला देत 3 पानं तरी रोज लिहायची. 
या लिहिण्याला कुठलेही बंधन नाही. मनात येतील ते चांगले, वाईट विचार कागदावर उतरविण्यास सुरुवात करायची. फक्त लिहायचं. लिहायचंच का? कारण लिहिताना आपल्याला विचार करण्यास पुरेसा वाव मिळतो. आपल्या विचारांना सुसूत्रतेने कागदावर लिहून काढण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक विचार करू लागतो. आपल्या भावना आणि विचार यांचा ताळमेळ आपोआपच जुळतो आणि मनातले विचार सुस्पष्ट शब्दात कागदावर येतात. 
त्याउलट टायपिंग करताना आपण बऱ्यापैकी घाईत असतो. अन् मुख्य म्हणजे यांत्रिकपणे काम करत असतो. 
तर क
तर कॅमेरॉन बाईंनी अजून एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे हे लिहिलेलं पुन्हा वाचायचं नाही. त्याला कुठल्याही फुटपट्टीने मोजायच नाही. स्वतःला जज करायचं नाही. 
शांतपणे मनातले खदखणारे विचार लिहीत जायचं. जेणेकरून मन मोकळं होईल आणि त्याला नवीन गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळ मिळेल. 
स्वतःचं लिहिलेलं स्वतःच वाचायचं नसल्याने इतरांना ते दाखवण्याचा प्रश्नच येत नाही.
सुरुवातीला अवघड वाटणारी ही गोष्ट सवय लागल्यावर इंटरेस्टिंग होत जाणार हे नक्की. 
कशी? तेही सांगते. 3 पाने भरून रोज सकाळी लिहायचं म्हणजे खायचं काम नाही. सुरुवातीला जरी मनातल्या वाईट, नकारात्मक विचारांना बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळाला तरी हळूहळू मनात नवीन आणि चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होत जाणार. 
उदाहरण द्यायचं झालं तर, मला भेंडीची भाजी आवडते म्हणून मी जर रोज भेंडीची भाजी खायची म्हटलं तर चालेल का? नाही 2च दिवसात कंटाळा येईल. तसंच मनाचही होणार. लिहिताना खोलवर विचार करायला सुरुवात झाली की आपल्याला काय करतो आहोत, काय घडत आहे याची जाणीव होत जाईल. आणि नकळतच बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. 
आपल्याला जर मनापासून स्वतःसाठी काही करायचे असेल तर हा अतिशय उत्तम आणि स्वस्तातला उपाय आहे. 
पण जर त्या पुढे जाऊन आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला आपल्या मनातला गोंधळ एकट्याने सोडवता येत नाही तर तिथे तज्ञ व्यक्तीची मदत नक्की घ्यावी. 

बाकी? बाकी बरच काही आहे जे आपण आपल्या पातळीवर बदलण्याची गरज असते. 
जे बदलता येत नाही त्यासाठी स्वीकारण्याची गरज असते आणि 
उरलेल्या गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात त्यासाठी "तो " असतो ना. त्या बाबतीत मात्र म्हणायचं,
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 
2 डिसेंबर 2023 

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 19

स्वतःसाठी बदलताना भाग 19
आपल्यासोबत सगळं चांगलं व्हावं असं आपल्याला वाटत असतं. पण चांगलं होण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. म्हणजे नेमकं काय करायचं? तर...
✓ स्वतः वर फोकस करण्याचा प्रयत्न करत राहायचं. 
✓ नाही म्हणायला शिकायचं. 
✓ नात्यांमध्ये मर्यादा निश्चित करायची मॉडर्न भाषेत हेल्दी बाऊंड्री सेट करायच्या. 
✓ स्वतःसाठी उभं रहायचं. 
✓ आपल्या भावना आणि विचार यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करायचे
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे , आपल्यासाठी सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपण असायला हवं हे मान्य करायचं आणि ते फॉलो करण्यासाठी प्रयत्न करायचे. 
हे सगळं स्वतःहून जमत असेल तर उत्तम आहे पण नसेल जमत तर ? 
Stay connected... 
गौरी हर्षल कुलकर्णी, कौन्सेलर 
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 10

#स्वतःसाठी_बदलताना_भाग१०  (गौरीहर्षल)


आपण काय आहोत आणि काय करू शकतो ह्याचा अंदाज आला की बरेच प्रश्न सुटतात. 

कारण त्यानंतर आपण स्वतःचा होणारा अपमान,अवहेलना नाकारू लागतो. आणि आजूबाजूच्या असणाऱ्या बऱ्याच लोकांना ह्याचाच जास्त त्रास होऊ लागतो.

Self respect आणि self acceptance ह्या गोष्टी जशा स्वतःला स्विकारणे अवघड जाते तशाच त्या आपल्या सोबत वर्षानुवर्षे चुकीचं वागणाऱ्यांच्या गळी उतरवतानाही त्रास होतो. पण हे स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी खूप गरजेचे असते. 


You deserve much more than a life you feel pressured to settle for.


“Never apologize for having high standards. People who really want to be in your life will rise up to meet them.”



सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

स्वतःसाठी बदलताना भाग 14

#स्वतःसाठी बदलताना भाग 14 (गौरीहर्षल)
आयुष्यात एक वेळ अशी येते की जेव्हा तुमचे मार्ग अजून जास्त खडतर होतात. आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की आता तुम्ही योग्य मार्गावर आहात आपण ज्या मार्गासाठी निवडले गेलेलो आहोत, तिथे कुठलीही गोष्ट सहज साध्य किंवा सोपी असणार नाहीये. उलट आपण जितके जास्त जोर लावू बघणार तितका जास्त विरोध आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर सहन करावा लागणार. तितका जास्त त्रास आपल्याला सहन करावा लागणार. 
 पण या त्रासाचं फलित म्हणजे पुढे जाऊन मिळणाऱ्या गोष्टी ज्या शब्दातीत नसतात,शब्दात सांगताच येत नाहीत. 
 आणि हीच वेळ असते जेव्हा आपल्याला अजून जास्त प्रयत्न करावे लागतात त्या मार्गावर टिकून राहण्यासाठी. आपण डगमगण्याचे, हरण्याचे अनेक प्रसंग आयुष्यात वारंवार येत राहतात. पण त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो की जे मिळतं ते सगळ्या त्रासाची कष्टाची भरपाई करतं. 

प्रतिकूल परिस्थिती नेहमी आपल्याला अशा संधीसाठी तयार करते जी आयुष्यात एकदाच येते. आणि त्या वेळेला आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं फार जास्त गरजेचं असतं. 

You will know you are on the right path when things stop being easy. 

There is no easy path to greatness, there is no rosy road to success, endure the pain, and you will enjoy the gain.

Don't turn back, It's when the going gets tough that you mustn't quit.