बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

और तुम

#और_तुम 

इन्स्टाग्राम रिल्सवर मध्यंतरी काही दिवसांपूर्वी सतत अमितकुमारांच्या आवाजातील बडे अच्छे लगते हैं गाण्याचं एकच कडवं ट्रेंडिंग होतं. 

हम तुम कितने पास हैं कितने दूर है चाँद सितारे
सच पुछो तो मन को झूठे लगते है ये सारे 
मगर सच्चे लगते है, ये धरती, ये नादिया, ये रैना,
और तुम

गाणं आवडतं असल्याने मीही काम करताना गुणगुणत होते. लेकाच्या कानावरही पडत होतं. 

दोन दिवसांपासून मात्र एक दोन वेळा लक्षात आलं की छोटे कुलकर्णी हळू आवाजात काहीतरी म्हणत असतात. 
मला वाटलं असेल नेहमीप्रमाणे अशक्य ही शक्य करतील स्वामी कारण ते त्याचं 24×7 आवडतं वाक्य, गाणं, मंत्र आहे . कारण त्याचे बजोबा (स्वामींना तो लाडाने आजोबा ऐवजी बजोबा म्हणतो ❤️) ,तर बजोबा आपले ऑल टाइम आवडते दोस्त आहेत. 

पण आज मात्र सकाळी आगावपणा केला सायकल घेऊन ओट्यावर चढण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मग अम्माकडून ओरडा खाल्ला, दोन फटकेही खाल्ले. शेवटी अम्मा काही ऐकत नाही हे लक्षात आलं मग एक कोपरा पकडला आणि बसून घेतलं. 

माझं लक्ष होतंच पण लगेच राग सोडला की मग अर्थ नसतो आधीच्या रागावण्याला. सो मी गप्प बसले. 


हळूहळू जवळ येऊन मागून गळ्यात हात टाकून तोंडाने पुटपुटणे सुरू झाले. आधी काही कळेना, मग विचारलंच म्हटलं काय म्हणतो आहेस? 

मग छानपैकी कपाळावर हात मारून घेत म्हणे , अग और तुम ,और तुम. 

आता मात्र मला कळलं की अय्या (हे माझंच संबोधन) रागावली म्हणून तिला मस्का मारण्यासाठी गाणं म्हणत होता. 

चंगोंची माफी मागून,

इतकं गोड कुणी मस्का मारणार असेल तर 
रागावण्याला ही अर्थ आहे
तोडक्यामोडक्या भाषेतलं मनवणं ऐकण्यात तर 
आयुष्याचं सार्थक आहे 

#वयवर्षेपावणेतीन
#पद्माक्ष_गौरीहर्षल_कुलकर्णी
#गौरीहर्षल 

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

यु टर्न (भाग 5) ©®गौरीहर्षल ( 31/12/2016)

यु टर्न (part ५) 

सकाळी उठल्यापासून नेहाची चाललेली गडबड पाहून तिच्या नवऱ्याने राघवने न राहवून तिला विचारलच कि काय शिजतंय तिच्या डोक्यात? आपल्या प्लानचा त्याला थोडक्यात अंदाज देत ती आवरत होती. गरज पडलीच तर तुला फोन करेन असं त्याला हक्काने सांगून ती निघाली. आज वातावरण किती छान आहे असं स्वतःशीच म्हणत तिने गाडी चालू केली  आणि ती थेट ऑफिसला आली. तिकडे सारंग स्वतःसुद्धा सानिकाला कसं मनवायच याचा विचार करत होता. त्यासाठी त्याने नेहाचीच मदत घ्यायची असं ठरवलं. सारंगचा सकाळी सकाळी आलेला मेसेज पाहून नेहाला आश्चर्य वाटलं. त्याने तिला भेटायला बोलावलं होतं.
संध्याकाळी सारंग तिला भेटला आणि त्याने तिला सानिकाबाबत सांगून एक सुखद धक्काच दिला. जी गोष्ट कशी करायची याचा विचार नेहा दिवसभर करत होती तिचं करण्यासाठी सारंग स्वतः तिची मदत  मागत होता. सारंगच्या म्हणण्यानुसार नेहाला फक्त सानिकाला कॅफे यु टर्न मध्ये दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणायचं होतं. त्यासाठी नेहाने लगेच सानिकाला फोन केला आणि तिने केलेल्या सगळ्या मदतीसाठी तिला एकदा भेटून बोलायचं आहे असं सांगीतल. सानिकाने सुरुवातीला नको म्हणत टाळायचा प्रयत्न केला पण नेहाचा आग्रह ती मोडू शकली नाही आणि संध्याकाळी कॅफेमध्ये येण्यास तयार झाली. सारंग मनापासून नेहाला थॅँक्स म्हणत ते दोघे निघाले. 
इकडे सानिका क्लीनिकमधून गाडीवर घरी निघाली होती “अभी न जाओ छोडकर कि दिल अभी भरा नही” असे शब्द कानावर पडताच सानिका थबकली. तिला तिची आणि सारंगची ती भेट आठवली जेंव्हा त्याने तिला हे गाणे चालू असताना खूप रोमॅन्टिक पद्धतीने प्रपोज केले होते. ते क्षण आठवताच नकळत तिचा चेहरा उजळला. आणि हे अचानक आपल्याला काय होतंय याचा विचार करत ती घरात निघाली. पण नेहमीप्रमाणे समोरून कोण आलाय याकडे लक्ष नसल्याने ती अमेयला जाऊन धडकली. तिचा ब्लश करणारा चेहरा पाहून त्याने तिला चिडवायला सुरुवात केली. कशीबशी त्याच्या तावडीतून तिने स्वतःला सोडवले. पण आज सारंग आणि त्याच्या आठवणी मात्र तिचा पिच्छा सोडत नव्हत्या. त्या आठवणींच्या ताब्यातून स्वतःला सोडवत असतानाच तिला झोप लागली. आकाशातला चंद्रहि उद्या भेटणाऱ्या पौर्णिमेच्या आठवणीत अडकला होता. तशीच काहीशी अवस्था सारंगची सुद्धा होती.
दुसऱ्या दिवशी सानिका खूप काम असल्याने बिझी इतकी होती कि तिला संध्याकाळ बद्दल नेहाने आठवण करून दिली. तर तिकडे सारंगला मात्र खूप काम असूनही संध्याकाळ शिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. संध्याकाळी ठीक ७ वाजता सानिका कॅफे यु टर्न च्या पार्किंग मध्ये आली आज कॅफेचं वातावरण तिला काहीसं ओळखीचं वाटत होतं शिवाय विकेंड असूनही तिथे फारशी गर्दी नव्हती. हे पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं. तिने नेहाला ती कुठे आहे हे विचारण्यासाठी फोन केला तर तिला अजून १५ मिनिटे लागतील असं कळाल. तोपर्यंत काय हा विचार करत ती उभी असताना कॅफेच्या मॅनेजरने तिला नेहमीच्या टेबलवर बसायला सांगितलं. ती तिथे बसली आणि काही सेकंदातच कॅफेमधले लाईट गेले. आणि कुणी काही बोलायच्या आत समोर असणाऱ्या मोठ्या स्क्रिनवर एका खूप सुंदर कपलचे फोटो दिसू लागले ते सगळं बघून सानिका थक्क झाली. कारण ते फोटो तिचे आणि सारंगचे होते. त्यांच्या सुंदरश्या आठवणी आणि प्रत्येक आठवणीसोबत एक मेसेज. सानिकाची माफी मागणारा झालं गेलं ते विसरून जायचं प्रयत्न कर असं म्हणणारा. सानिकाची भिरभिरती नजर आता फक्त त्या व्यक्तीला शोधत होती. क्षणार्धात सगळा कॅफे उजळला आणि सरप्राईज असं म्हणत तिच्या, सारंगच्या घरचे , त्यांचे सगळे फ्रेंड्स यांचा गराडा सानिकाभोवती पडला. सगळ्यांशी बोलत असतानाच तिला बॅकग्राऊंडला तेच गाणं ऐकू आलं 

“ अधुरी आस छोडके, अधुरी प्यास छोडके 
       जो रोज युंही जाओगी तो किस तरह निभाओगी,
        के जिंदगी कि राह में जवा दिलोंकी चाह में ,
 कई मकाम आयेंगे जो हमको आजमायेंगे...........” 
पुढचं सगळं गाणं तिच्या समोर सारंगला बघताच तिच्या डोळ्यातून वाहणार पाणीच म्हणत होतं. तो हळूच तिच्यासमोर आला आणि दोघांनी सॉरी म्हणण्यासाठी एकत्रच एकमेकांचे कान धरले. तसा अख्खा हॉल हसण्यात बुडला.............................
समाप्त
गौरी हर्षल



सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

#कु:संतानापेक्षा_नि:संतान_बरे ©®गौरीहर्षल

#कु:संतानापेक्षा_नि:संतान_बरे ©®गौरीहर्षल

(सत्य अनुभवावर आधारित ही छोटीशी कथा)

"हुश्श ,आले बाई एकदाची सगळं निस्तारून.", असं म्हणत समिता घरी येऊन सोफ्यावर बसली. 

तिचं हे वाक्य ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि वडिलांच्या कपाळावर एक सूक्ष्म त्रासिक आठी उमटली. 

त्याला कारणही तसंच होतं, समिता वय वर्षे 30 च्या आसपास, लग्न झाल्यावर नको त्या टोकाला जाऊन सासरी भांडण करून कायमची माहेरी आलेली अत्यंत उद्धट, उर्मट मुलगी. कोर्टातली केस अजून मार्गीही लागली नव्हती तोवरच समिताचं उच्शृंखल आणि व्यभिचारी वागणं आईवडिलांच्या समोर आलं. 

त्यांनी तिला समजावण्यासाठी साम, दाम ,दंड ,भेद सगळे मार्ग वापरून बघितले पण परिणाम शून्य. शिक्षण यथातथाच असल्याने अक्कल आणि बाहेरचं जग समजण्याची कुवत जवळपास नव्हतीच. पण आपल्या अशा वागण्याने आपलंच नाव सगळीकडे खराब होणार हेही तिला कळत नव्हतं. असो

तर आत्ता जे निस्तारून आले असं ती म्हणत होती ती गोष्ट होती तिच्या उदरात वाढणारा गर्भ, जो तिच्या नको त्या संबंधांची खूण होता. ही गोष्ट आईवडिलांच्या लक्षात येताच त्यांना ब्रह्मांड आठवले होते. बातमी बाहेर पडली तर समिताच्या सासरचे लोक अर्थातच त्या गोष्टीचा फायदा घेणार होते. त्यामुळे शेवटी पुन्हा एकदा आपल्या रागाला आवर घालत वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेले. कॉम्प्लिकेशन असल्याने डॉक्टरांनी आधी नकारच दिला पण शेवटी मात्र समिताच्या वडिलांवर दया येऊन त्यांनी प्रोसिजर पूर्ण केली. ओळखीचे डॉक्टर असल्याने गोष्टी गुप्तपणे उरकल्या गेल्या. 

पण ज्या गोष्टींमुळे आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती ती गोष्ट समिताच्या दृष्टीने अतिशय फालतू होती. ना तिला स्वतःच्या चुकीची जाणीव होती आणि ना ही इतरांना होणाऱ्या त्रासाची काळजी. इथे एक गोष्ट हीसुद्धा होती ती म्हणजे समिताच्या पोटातील मूल ज्या व्यक्तीचे होते तो त्याच्या संसारात अगदी आनंदात होता आणि ते समिताला माहिती  असूनही तिने नाते इतके पुढे नेले होते. हे सगळं कळल्यानंतर तर आपलंच नाणं खोटं आहे दुसऱ्याला काय बोलणार असं तिच्या आईला तिचे वडील म्हणाले. त्या दोघांची अवस्था खरंच अवघड झाली होती. 

त्यामुळेच घरी आल्यावर जेव्हा ती म्हणाली, आले निस्तारून ,तेव्हा आईवडिलांच्या मनात कु:संतानापेक्षा नि:संतान बरे हा विचार आल्याशिवाय राहिला नाही. 

अशा कितीतरी समिता हल्ली आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात ज्यांना स्वतःच्या चुकीच्या वागण्याची लाज वाटणं तर दूर त्या चुका पुन्हा पुन्हा करायला काही वाटत नाही. 

हल्ली समाजात ही अप्पलपोटी,स्वार्थी प्रवृत्ती वाढण्याची काय कारणे असू शकतात ? तुम्हाला काय वाटतं?

#स्वतःला शोधताना
#गौरीहर्षल



सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

तुम्ही काय फॉलो करत आहात हल्ली?


#तुम्ही_काय_फॉलो_करत_आहात_हल्ली?©®गौरीहर्षल

आपण आपल्या मनाला, मेंदूला कुठली माहिती पुरवतो ह्यावर आपला दिवस कसा जाणार हे अवलंबून असतं. कसं ते वाचा ह्या ओळखीच्या गोष्टीत......

मानसी आज जास्तच गडबडीत होती. लॉकडाउन वगैरे मुळे आधीच कामाचा भार वाढला होता आणि त्यात आज तिचं एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं. सकाळी लवकर उठून घरातील बाकीची कामं जमेल तेवढी आवरून घेत तिने स्वतःसाठी मस्त आलं घालून चहा केला. चहाचा वाफाळता मग घेऊन ती शांतपणे बाल्कनीत येऊन बसली. तिची बाल्कनी तिच्यासाठी स्ट्रेस बस्टर होती. 

सासूबाईंनी कौतुकाने लावलेली चार रोपं, लेकीच्या बालहट्टामुळे टांगलेले बर्डफिडर, आणि तिची आवड म्हणून बसवलेला छोटासा झोपाळा ह्या सगळ्या गोष्टी बाल्कनीला एक जिवंतपणा देत असत. छोट्या छोट्या पक्ष्यांची नाजूक आवाजात सुरू असलेली बडबड मनावर कितीही ताण असला तरी सुखावून जात असे. त्यामुळेच महत्वाच्या कामाच्या दिवशी मानसी ठरवून थोडासा वेळ तरी का होईना बाल्कनीत  फक्त स्वतःसाठी राखून ठेवत होती. 

घरात अजून कुणाला जाग आली नव्हती सो तिला आज सगळं आवरल्या नंतर बराच निवांत वेळ मिळाला होता. तो मी टाईम ती स्वतःसोबत छानपैकी एन्जॉय करत होती. 
अजून काही क्षण असे घालवल्यावर तिने लॅपटॉप घेत प्रेझेंटेशनची सगळी तयारी चेक केली. आणि मग ऑल ओके 👍 असा मेसेज टीमच्या वॉट्सअप्प ग्रुपवर पाठवून दिला. 

तिने सहजच इतर वॉट्सअप्प मेसेज, स्टेटस चेक करायला सुरुवात केली. मेसेज बऱ्यापैकी फॉरवर्डच होते. मग तिने आपला मोर्चा कधी नव्हे ते स्टेटस बघण्याकडे वळवला. कुणी कसल्या शुभेच्छा दिल्या होत्या, कुणी श्रद्धांजली वाहत होत, कुणी प्राण्यांचे व्हिडीओ शेयर केले होते तर कुणी काय. सगळं बघता बघता तिची नजर रश्मीच्या स्टेट्सवर येऊन थांबली. 

रश्मी मानसीची शाळेपासूनची जिवलग मैत्रीण. स्वभावाने अतिशय चंचल पण मनाने खूप चांगली. लग्न झाल्यावरही  दोघींच्या मैत्रीत काही फरक पडला नव्हता ह्याचं कारण होती रश्मी. तिने तिच्या स्वभावाने मानसीच्या सासरीही स्वतःसाठी जागा तयार केली होती. तशा काही दोघी आता सतत भेटत नव्हत्या पण काही नात्यांना सतत भेटण्याची, बोलण्याची गरज नसते ना तसच त्यांचंही नातं होतं. 

पण आज रश्मीचं नकारात्मक आणि डिप्रेशन दाखवणारं स्टेटस बघून का कुणास ठाऊक मानसीला जाणवलं की आपण रश्मीशी बोलायला हवं.
दुपारी ऑफिसच्या कामातून फ्री होताच तिने रश्मीला फोन लावला. पहिल्यांदा तर फोन लागला नाही आणि मग चौथ्यांदा केल्यावर तो उचलला गेला. 

पलीकडून त्रासिक आवाजात रश्मी बोलत होती. 

"हॅलो, बोल ग मनु. ", तिचा असा आळसावलेला, चिडखोर आवाज ऐकून क्षणभर मानसीला वाटलं की आपण चुकून दुसऱ्या कुणाला तरी फोन लावला. पण रश्मीलाच फोन लावला होता. 


"अग काय हे? तू ह्यावेळी झोपली होतीस की काय?", मानसीने विचारलं. 

रश्मी - " नाही ग झोपतेय कसली, आधीच डबल काम करून पिट्टा पडला आहे. इथे पाच मिनिटं निवांत बसायला वेळ मिळत नाही आणि तू म्हण झोपली होतीस का? "

मानसी - " रशु काही बिनसलं आहे का? म्हणजे घरात, आईंसोबत, जिजूंसोबत किंवा कामावर? नाही म्हणजे तू इतकी फ्रस्ट्रेटेड का वाटत आहेस?"

रश्मी - " नाही ग , अस काही नाही. पण सध्या न माझी खूप चिडचिड होतेय. का ते कळत नाहीये. रुटीन तर सगळं तेच आहे पण असं का होतंय काय माहीत?"

मानसी -" हं, मला एक सांग ,हल्ली नवीन काय करते आहेस? म्हणजे लिहिते, वाचते की बघते आहेस?"

रश्मी - "नवीन अरे हो ,तुला सांगायचंच राहील की! ऑफिसमध्ये एका नवीन वेबसिरीजवर चर्चा सुरू होती त्या xyz अँपवर आहे बघ ती abc वेबसिरीज, मग मागचे दहा,बारा दिवस झाले तीच बघते आहे. त्यामुळे दुसरं काही सुचतच नाही ग." 

रश्मीच्या उत्तरावर मानसीला काही तरी सापडल्यासारखं वाटलं. 

मानसी आता रश्मीचं बोलणं ऐकत होती. रश्मी भरभरून त्या वेबसिरीजबद्दल, त्यातल्या गोष्टींबद्दल बोलत होती. रश्मीला पहिल्यापासूनच अशा गोष्टींमध्ये रस होता. पण ती त्या सगळ्यात कधी कधी इतकी गुंगून जात असे की त्या गोष्टींचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावरही होतो हे तिच्या लक्षात येत नसे. 


"......तर असं आहे बघ. त्या वेबसिरीजमध्ये त्या माझ्या आवडत्या अभिनेत्रीने डिप्रेस व्यक्तीचा रोल इतका छान केला आहे की आपल्याला सुद्धा ते फील होतं.तू नक्की बघ." आता रश्मीचं बोलून झालं होतं.

"तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? नाही ते फील होणं वगैरे त्या व्यक्तीसाठी त्याच्या कामाची पावती असेलही पण तुझ्यावर त्याचा काय परिणाम होत आहे दिसत नाही का तुला? त्या सगळ्याला तू तुझ्या आयुष्यात का आमंत्रण देत आहेस? तुला आवडतं तू बघ पण आपण काय बघतोय , त्याने आपली मनस्थिती तर बिघडत नाही ना ह्याकडे पण जरा लक्ष दे. तुला आठवतंय मी प्रेग्नंट असताना मला खूप मूड स्विंग व्हायचे तेंव्हा मी डिप्रेस होऊन तुला फोन करायचे तर तू मला काय सांगायचीस? 

तू नेहमी मला फ्रेश वाटेल, आनंदी वाटेल अशा गोष्टी माझ्याशी बोलत होतीस. मला सगळी उत्तम पुस्तक, त्या काळात मनस्थिती छान राहील अशा वेबसिरीज, जुन्या सिरीयल, चित्रपट अगदी शोधून शोधून आणले होतेस. 

आपण त्यानंतरही कितीतरी वेळा उत्तम कलाकृतींचा आस्वाद घेतला. अगदी आपल्या कुटुंबासोबतही. पण इतकं फ्रस्ट्रेशन ,चिडचिड करताना मी तुला कधीच बघितल नव्हतं. 

एकदा नीट समजून घे कधी कधी काही गोष्टी खरोखरच निगेटिव्ह वाईब्ज देत असतात. एखादं पुस्तक, एखादा सिनेमा ,एखादं गाणं किंवा अगदी जाहिरातही आपल्या मनातल्या अशा दुखऱ्या नसेवर बोट ठेवते की आपण चिडचिड करू लागतो. अशा गोष्टींचा आहारी जायचं की आपल्या मनाला, मेंदूला आणि पर्यायाने शरीराला आनंदी, उत्साही , फ्रेश वाटेल अशा गोष्टी पुरवायच्या हे आपण ठरवायचं असतं. 

आपल्याला स्वयंपाक शिकवताना काकू म्हणायची बघ, एखादी स्त्री जेव्हा तिच्या कुटुंबासाठी मन लावून स्वयंपाक करते न तेव्हा ती तिच्या मनातलं प्रेम , माया त्यात ओतत असते. त्यामुळे ते अन्न तिच्या माणसांना समाधान देतं आणि त्यांचा आत्माही तृप्त होतो. म्हणून ....."

".....रागारागात कधीही स्वयंपाक करू नये आपले नकारात्मक विचार आपल्याच माणसांना त्रास देऊ शकतात." हसत हसत रश्मीने मानसीचं वाक्य पूर्ण केलं. 

"पाय कुठे आहेत तुमचे माते!" , असं पुढे म्हणताच मानसी म्हणाली," पाय जागेवरच आहेत , पण तू पाय लाव माझ्या घराला ह्या विकेंडला, मुलांना घेऊन ये आईबाबा आणि नवरा जाणार आहेत एका कामासाठी गावी, मला काही ह्यावेळी जाता येणार नाही. सो, तुम्ही तिघे मायलेकर या आम्हीही तिघे आहोत मस्तपैकी हॅरी पॉटर नाईट करूया. आपल्याला ही ब्रेक मिळेल." 

"डन बॉस, आणि थँक्स मला कळण्याआधीच माझा प्रॉब्लेम सोडवल्याबद्दल." असं म्हणत रश्मीने फोन ठेवला. 


मित्रमैत्रिणींनो तुम्हालाही होतं असेलना असं? माध्यम कुठलंही असो जर ते आपल्या मनात निगेटिव्ह विचार निर्माण करून आपली मनस्थिती खराब करत असेल तर त्याचा एक्सेस आपल्यापरीने आपण कंट्रोल करायला हवा. 

बाकी ज्याचा त्याचा प्रश्न. 

#स्वतःला शोधताना
#गौरीहर्षल

तळटीप - कथा कशी वाटतेय ह्यावर चर्चात्मक किंवा तुमच्या अनुभवाच्या प्रतिक्रिया नक्की द्या. 

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

दैव देतं आणि कर्म नेतं

#दैव_देतं_आणि_कर्म_नेतं ©®गौरीहर्षल

#सत्यघटनेवर_आधारित

(काही वर्षांपूर्वी मी ज्या डॉक्टरांकडे प्रॅक्टिस करत होते तिथे समुपदेशनासाठी एक कुटुंब आलं होतं. कुटुंब म्हणण्यापेक्षा एक भाऊ आपल्या बहिणीला घेऊन आला होता. त्या कुटुंबाचा अनुभव मी कथास्वरूपात शेयर करत आहे. 
कथा रूपांतर करताना व्यक्तींची नावे,घटना,प्रसंगात आवश्यक ते बदल केले आहेत.)


महाराष्ट्रातल्या एका गावात राहणारे एक सुखी,सधन चौकोनी कुटुंब. 
सुलेखा आणि पांडुरंग देशमुखांना दोन मुलं थोरला दिलीप,धाकटी शैलजा. इमानेइतबारे आपलं शेत सांभाळत सरळमार्गाने संसार करणाऱ्या देशमुखांनी दोन्ही मुलांवर अतिशय उत्तम संस्कार केले होते. मुलगा दिलीप शिकून सवरून नुकताच एका कंपनीत नोकरीला लागला होता. मुलगी शैलजा आत्ता कुठे पदवीच्या पहिल्या वर्षांत होती. 

दिलीप चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला होता आणि ही बातमी समाजात पसरण्यास फारसा वेळ लागला नाही. कधी उघडपणे तर कधी आडून आडून वधुपित्यांकडून चौकशी केली जाऊ लागली. पण दिलीपला पर्मनंट झाल्याशिवाय लग्न करायचे नव्हते. मुलाचा विचार योग्य आहे हे लक्षात आल्याने देशमुखांनीही फारसा जोर लावला नाही. 

वर्षभरात दिलीपला त्याचं काम बघून कंपनीकडून पर्मनंट झाल्याची ऑर्डर दिली गेली. आता मात्र त्यानेही वडिलांच्या इच्छेचा मान राखत लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी संमती दिली. वधुसंशोधनाला सुरुवात केली गेली. एकामागून एक स्थळं बघणे सुरू झाले. नेहमीप्रमाणे काही मुलींना एकत्र कुटुंब नको होतं,तर काहींना शहरातच राहायचं होतं. ह्या आणि अशा कारणांमुळे होकार- नकार सत्राचा अनुभवही देशमुख कुटुंबाने घेतला. 

शेवटी त्यांचा शोध शेजारच्या गावातून आलेल्या पाटील कुटुंबातील सवितावर येऊन थांबला. 

जसा दिलीप तशीच सविताही दिसायला चारचौघींसारखीच होती आणि शिक्षणही जेमतेमच होते. दिलीपच्या मानाने सविता त्याच्यासाठी योग्यच होती. दोन्ही कुटुंबाचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच असल्याने लवकरच सुपारी फोडली गेली. आणि दोन महिन्यांनी लग्न करून सविता पाटीलची सविता दिलीप देशमुख होत सविताने गृहप्रवेश केला. 

सुलेखाताई आणि शैलजाने अगदी उत्साहाने घरात सविताचे स्वागत केले. शैलजाला वाटले की वहिनी आली म्हणजे आता आपल्याला एक जवळची मैत्रीण मिळाली. 
शैलजा तशी स्वभावाने फार बुजरी आणि लाजाळू असल्याने बाहेरच्या जगाशी तिचा फारसा संबंध आला नव्हता. घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर एवढंच काय ते ती बाहेर पडत असे. आईबाबा आणि दादा म्हणजे दिलीप हेच तिचं विश्व. तीही घरात सगळ्यांची लाडकी होती. आता तिने सवितालाही आपल्या भावविश्वात जवळची जागा दिली होती. 

पण हा पणच सगळ्या गोष्टींच्या मध्ये आडवा येतो न.....

सविताच्या माहेरी तिच्याव्यतिरिक्त अजून तिची थोरली बहीण आणि धाकटा भाऊ होते. बहिणीचं लग्न सविताच्या सहा महिने आधी झालं होतं. आणि भाऊ नोकरीच्या खटपटीत होता. आर्थिक परिस्थिती बरी असली तरी खाणारी तोंड पाच असल्याने थोडीफार ओढाताण होतच होती. त्यातच सविता जरा जास्तच हट्टी होती. मनासारखं झालं नाही तर तिचा थयथयाट ठरलेला असे. पण इतक्या वर्षात तिला किती महत्व द्यायचं ते माहेरच्यांना कळून चुकलं होतं. 

दिलीपच्या स्थळाबद्दल सगळी चौकशी केल्यानंतरच सविताला घरच्यांनी लग्नासाठी तयार केलं होतं. छोटं कुटुंब,फारशी जबाबदारी नाही हे बघितल्यावरच सविताने लग्नाला होकार दिला होता. नाहीतर तिच्या आडमुठ्या स्वभावामुळे वैतागून आधी आणलेल्या सगळ्या स्थळांनी समोरून नकार कळवला होता. 

ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी वरती बांधलेल्या असतात तसच काहीसं दिलीप आणि सविताच्या बाबतीत झालं होतं. सविताच्या स्वभावाचा वरवर अंदाज देशमुख कुटुंबालाही देण्यात आला होता पण बाकी सगळ्या गोष्टी अनुकूल असल्याने नवीन ठिकाणी नवीन माणसात आल्यावर स्वभावही बदलेल असं वाटून त्यांनी होकार कळवला होता. 

पहिले काही महिने सविताने आणि घरातही सगळ्यानी एकमेकांना समजून घेत काढले. इतर कुणाला नाही पण दिलीपला मात्र सविता प्रचंड हट्टी आहे हे लक्षात आले होते. पण आपल्यामुळे आणि आपल्या बायकोमुळे घरात इतरांना त्रास नको म्हणून तो बऱ्याचदा सविताची बाजू सावरून घेत असे. 

पण एके दिवशी मात्र सविताच्या खऱ्या स्वभावाची झलक त्याला आणि इतर तिघांनाही बघायला मिळाली. आणि त्यांना आपण कशाला आमंत्रण दिले आहे ह्याचा अंदाज आला. 

शैलजा आणि दिलीपने त्यांच्या आईला वाढदिवसानिमित्त सरप्राईज द्यायचे ठरवले होते आणि त्यामुळे त्यांची घरात इतर कुणालाही न सांगता गुपचूप तयारी सुरू होती. काही तरी कामानिमित्त सासूबाई सोबत बाजारात गेलेल्या सविताने दिलीप आणि शैलजाला बाजारात बघितले पण ती हाक मारणार तोपर्यंत ते दोघेही दिसेनासे झाले. तिने लगेच दिलीपला फोन लावला आणि विचारले. जसे तिने त्या दोघांना बघितले होते तसे शैलजानेही त्या दोघींना बघितले होते. सविताला आत्ता कळले तर आईलाही सरप्राईज कळेल म्हणून दिलीपने काही तरी कारण सांगून वेळ मारून नेली. पण दुसरीकडे सविताच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू झालं होतं. 

घरी आल्यावरही दिलीपच्या डोक्यातून बाजाराचा विषय निघून गेला असल्याने सविताला सांगण्याचा विसर पडला. 
दुसऱ्या दिवशी आईबाबांना बाहेर पाठवून दिलीप आणि शैलजा वाढदिवसाची तयारी करू लागले. शैलजाने वहिनीला सगळं सांगून तयारीसाठी मदत करायला बोलावले होते. 
सविताला आता सगळे समजले होते पण तिला वगळल्याचा राग तिच्या मनात घर करून बसला होता. दिलीपने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा त्याला तो दिवस साजरा करणे महत्त्वाचे वाटले. शेवटी त्याने सविताला विनंती केली आणि तो तयारी करू लागला. 

संध्याकाळी घरी आल्यावर मुलांनी केलेली तयारी बघून सुलेखताईना खूप आनंद झाला. मन मारून सविताही सगळ्या गोष्टींत सहभागी झाली होती. 

पण दिलीप आणि शैलजाच्या नात्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे बदलला होता. 

सगळेजण आनंदाने जेवणासाठी बसणार तोच सविता कडाडली," शैलजा, कसं वागायचं हेपण मी तुला शिकवायचं का? बाहेर तर एकत्र फिरताच तुम्ही पण आता घरातपण तू सतत माझ्या नवऱ्याच्या आसपास घुटमळत असतेस. मी किती दिवस झाले सगळं बघतेय पण इतर कुणालाच तुझं वागणं ,बोलणं खटकत नाही. त्यांना चालत असेल पण मला नाही चालणार हे असलं वागणं.", सविताचं बोलणं ऐकून दिलीपसहित सगळ्यांनाच धक्का बसला. 

शैलजाला तर काय बोलावं तेच सुचेना कळायला लागल्यापासून ज्या भावाचं बोट धरून चालायला सुरुवात केली त्या आपल्या दादाबद्दल आणि आपल्याबद्दल वहिनी असा विचार करते हे तिला पटतच नव्हतं. 

शेवटी प्रसंग बघून पांडुरंगराव मध्ये बोलले,"सुनबाई , शब्द सांभाळून बोलत जा. आपण कधी ,कुठे कुणावर कसले आरोप करत आहोत ह्याच भान ठेवा. आमच्या मुलांवर आम्ही उत्तम संस्कार केले आहेत त्यामुळे ते असलं काही वागू शकतात ह्यावर आमचा विश्वास नाही. तुमचा कदाचित गैरसमज झाला असेल असं आम्हाला वाटत त्यामुळे आता ह्या दोघांशी बोलून तुम्ही हे सगळं मिटवा. परत असल्या खालच्या थराला गाठून काही बोलू नका. आल्या दिवसापासून तुमचं तुसड वागणंही आम्हाला दिसत आहे पण आम्ही तुम्हाला सतत संधी दिली. त्यामुळे असल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा संसारात लक्ष घाला.सगळ्यानी जेवणं उरका आणि मगच ताटावरून उठा.", त्यांच्या ह्या शब्दापुढे बोलण्याची हिम्मत कुणातही नव्हती. सगळ्यानी खाली मान घालून दुखावल्या मनानेच जेवणं केली. जेवण होताच कशालाही हात न लावता सविता फणकाऱ्याने खोलीत निघून गेली. ती गेली तसा इतका वेळ आवरून धरलेला शैलजाचा बांध फुटला ती आईच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडू लागली. 

दिलीपने कसंबसं आई आणि बहिणीची माफी मागितली तो वडिलांच्या दिशेने वळला तर त्यांनी त्याला खड्या शब्दांत सविताला नीट समजावून सांगायला सांगितले. 

तो स्वतःला सावरत खोलीत आला आणि सविताशी एकही शब्द न बोलता भिंतीकडे तोंड करून झोपला. पुढचा पूर्ण आठवडा घरात कुणीही कुणाशी बोलत नव्हते पण सविताला त्यामुळे काही फरक पडत नव्हता. 

मग एके दिवशी तिच्या वडिलांचा सासरी फोन आला आणि त्यांनी सविताला कुठल्या तरी सणासाठी माहेरी पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार तिचा भाऊ येऊन तिला घेऊन गेला. बहिणीच्या सासरच्यांनी केलेलं थंड स्वागत बघून त्याला शंका आली पण वयाने लहान असल्याने त्याने काही विचारलं नाही. घरी आल्यावर मात्र त्याने ही माहिती आईच्या कानावर घातली. आईने मात्र सविताला खोदून खोदून विचारलं तेंव्हा तिने झालेली गोष्ट सांगितली. आईने कपाळावर हात मारून घेत सविताला चार गोष्टी सुनावल्या आणि सोबतच तिच्या संशयी स्वभावाला आवर घालण्याचा सल्लाही दिला. सवितानेही आईच्या हो ला हो करत मान डोलावली. 

काही दिवस माहेरी राहून सविता सासरी परत आली. ह्यावेळीही दिलीपने सुट्टी न मिळाल्याचे सांगत आणून सोडायला सांगितले. शेवटी भाऊच सोडायला तयार झाला. मस्त माहेरपण एन्जॉय करून सविता भावासोबत सासरी पोहोचली. 

दारातच घरातून हसण्याखिदळण्याचे आवाज कानावर पडले. दारात बऱ्याच चपलाही होत्या. आत गेल्यावर कळलं की सुलेखताईंच्या दोन भाच्या कुटुंबासह जाता जाता धावती भेट घेण्यासाठी अचानक आलेल्या होत्या. त्या आल्याचे कळल्यावर दिलीपही सुट्टी घेऊन घरी आला. दिलीपला कामावरून घरात आल्याचे बघताच सविताला पुन्हा एकदा राग आला. सगळ्या पाहुण्यांकडे दुर्लक्ष करून ती खोलीत निघून गेली. बिचाऱ्या भावाला काहीच न सुचल्याने तो तसाच एका कोपऱ्यात उभा राहिला होता. शेवटी शैलजाने त्याला बसायला सांगितले. दिलीपने पुन्हा एकदा सविताच्या हातापाया पडत तिला पाहुण्यांसमोर नीट वागण्याची विनंती केली. सविताचा अहंकार सुखावला पाहुणे आणि तिचा भाऊ पाहुणचार घेऊन निघून गेले. 

रात्री दिलीपच्या खोलीतून वाढलेले आवाज ऐकू आले तसं सुलेखताईंनी दार वाजवलं. सविताने रागातच दार उघडलं आणि ती बाहेर आली. ह्यावेळी तिने पुन्हा तेच सगळे आरोप दिलीप आणि शैलजावर केले. 


सुलेखताईंनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करताच तिने त्यांच्यावरही आवाज चढवला आणि शैलजा आणि तिच्या बाबांबद्दलही नको नको ते बरळू लागली. हे सगळं ऐकल्यावर आता मात्र देशमुखांपैकी कुणालाही काहीच सुधरेना. सुलेखाताई उभ्या जागीच डोकं धरून बसल्या. पांडुरंगराव सुन्नपणे सगळ्यांकडे बघत होते. तेवढ्यात दिलीपने मात्र पुढे होत जोरदारपणे सविताच्या कानाखाली मारली आणि मागून शैलजाचा आवाज त्याला ऐकू आला. ती अस्ताव्यस्तपणे फरशीवर कोसळली होती. तो तिच्या दिशेने धावला. 

शेजाऱ्यांना मदतीला घेऊन आईबाबांना सोबत घेत दिलीपने शैलजाला दवाखान्यात एडमीट केले. तिथे तिच्या काही तपासण्या करण्यात आल्या. जबरदस्त मानसिक ताण आणि धक्का बसल्याने शैलजा बेशुद्ध पडली होती. 

ती शुद्धीत आल्यावरच अजून काही प्रॉब्लेम आहे का ते कळू शकत होते. दुसऱ्या दिवशी शैलजा शुद्धीवर आली पण तिची मनस्थिती पूर्णपणे बिघडली होती. भाऊ आणि वडिलांना ती आपल्या जवळपासही फिरकू देत नव्हती. शेवटी सुलेखाताईनी शेजारच्या एका मुलीच्या मदतीने तिचं सगळं आवरलं. ती इतर कुणाशीही काही बोलायला तयार नव्हती. मुलीची अवस्था बघून आईवडिलांनाही धक्का बसला होता पण आत्ता तिला सावरणे गरजेचे होते. 

दिलीपने बहिणीची अवस्था बघितली आणि त्याला सविताचा प्रचंड राग आला. त्याने तिरिमिरीतच तिच्या वडिलांना फोन लावला आणि तिला घेऊन जायला सांगितलं. 

फोनवरचा दिलीपचा आवाज ऐकून पाटील कुटुंबीय हादरले होते ते दोघेही सविताच्या सासरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसले ते आपल्या मुलीच्या वागण्याने उध्वस्त झालेले एक सुखी कुटुंब. 

सविताच्या आईला सगळं खरं कळताच त्यांनी सगळ्यांच्या समोर तिच्या कानाखाली वाजवली. कारण आपल्या मुलीच्या स्वभावाचा त्यांना पूर्णपणे अंदाज होता. त्यांनी तिला तशी जाणीवही सतत करून दिली होती पण आज सविताने स्वतःच्या हाताने सगळं उध्वस्त केलं होतं. 

सविताला तिच्या आईवडिलांनी कायमचं माहेरी आणलं होतं. दिलीपच्या घरच्यांनी डिव्होर्ससाठी कोर्टात केस दाखल केली. केस बरेच वर्ष चालणार होती कारण कोर्टातही सविताने तेच घाणेरडे आरोप लावले होते. 

ह्या सगळ्या गोष्टींचा खोलवर आणि जास्त वाईट परिणाम मात्र शैलजाच्या आयुष्यावर झाला. तिला त्या सगळ्यातून सावरण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली. तिचा नात्यांवर आणि माणसांवर आता पुन्हा सहजपणे विश्वास बसत नव्हता. 

सांगायचं तात्पर्य हे की माणसाची मनोवृत्ती त्याच्या सोबतच इतरांचेही न भरून येणारं नुकसान करत असते. 

तुम्हाला काय वाटतं?

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

तळटीप - कथा कशी वाटतेय ह्यावर चर्चात्मक किंवा तुमच्या अनुभवाच्या प्रतिक्रिया नक्की द्या. 


सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

★मैत्री★➡️टर्म्स अँड कंडिशन अप्लाय ⬅️

★मैत्री★
➡️टर्म्स अँड कंडिशन अप्लाय ⬅️

मैत्री - टर्म्स अँड कंडिशन अप्लाय 
जवळपास ७० सेल्फी काढून झाल्यावर ७१ व्या सेल्फीला २० वर्षांची कुल्फी आयमिन कलिका खुश झाली. मग बरेच हॅशटॅग वापरत सगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर ती सेल्फी शेयर करण्यात आली. मग सुरू झाली लांबलचक प्रक्रिया म्हणजे प्रोसेस हो लाईक, कमेंटच्या देवाणघेवाणीची. अधूनमधून आपल्या सो कॉल्ड सोशल मिडिया प्रतिस्पर्धी लोकांचे खाते तपासणीही सुरू होती. पण जसजसे हिचे लाईक,कमेंट कमी होऊन इतरांचे वाढू लागले तशी ती अस्वस्थ झाली. 

घरात काम करत असणाऱ्या रचनाचा एक डोळा लेकीकडेही होता. नुकताच लेकीचा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाचा रिझल्ट लागला होता. रचनाच्या अपेक्षेपेक्षा जरा २,४ टक्के जास्तच मिळाले होते कलिकाला. त्यामुळे तर हवा तसा फोन घेऊन दिला होता. तशी कलिका करियर वगैरे बाबत प्रचंड फोकस्ड होती. पण हल्ली हल्लीच हे सोशल मिडिया वेड जरा जास्तच वाढलं होतं. आणि अचानक झालेला हा बदल चाणाक्ष आईच्या नजरेने टिपला होता. 
रचना स्वतःही स्मार्टफोन छान प्रकारे वापरत असल्याने त्यातल्या खाचाखोचा तिलाही आता कळत होत्या. 
कलिकासोबतही तिचे नाते मैत्रीचे होते पण त्याचबरोबर आईबद्दल वाटणारी एक आदरयुक्त भीतीही लेकीच्या मनात होती. 
आपली आई आपल्यासाठी काय वाट्टेल ते करू शकते पण ते तिला योग्य वाटले तरच ह्याची जाणीव कलिकाला होती. कलिकानेही वेळोवेळी रचनाचा विश्वास सार्थ ठरवला होता. हे रचनाचेच संस्कार होते जे आजच्या जगातही कलिकाला वेडवाकडं पाऊल टाकण्याआधी विचार करायला भाग पाडत होते. 
अचानकच कलिकाच्या खोलीतून मोठमोठ्याने फोनवर बोलण्याचा आवाज ऐकू आला. रचनाने डोकावून बघितले तर फोनवर कुणाशी तरी बोलणं सुरू होत. 
"अग पण हे असं केलंच पाहिजे का? मला आणि माझ्या आईलाही नाही आवडणार अस वागलेलं." कलिका
पलीकडून बोलणारी मैत्रीण काही तरी बोलली. 
त्यावर कलिका अजूनच उसळून म्हणाली, " नो वे मला तुमच्याशी मैत्री निभावण्यासाठी हे सगळं करावं लागणार असेल तर मला जमणार नाही. 𝚈𝚘𝚞 𝚌𝚊𝚗 𝚏𝚒𝚗𝚒𝚜𝚑 𝚢𝚘𝚞𝚛 𝚏𝚛𝚒𝚎𝚗𝚍𝚜𝚑𝚒𝚙 𝚠𝚒𝚝𝚑 𝚖𝚎. 𝙱𝚞𝚝 𝚒 𝚌𝚊𝚗𝚝 𝚋𝚛𝚎𝚊𝚔 𝚖𝚢 𝚖𝚘𝚖𝚜 𝚝𝚛𝚞𝚜𝚝. " 
फोन कट करत कलिकाने रागाने बेडवर भिरकावला. 
तिला थोडं शांत होऊ देऊन काही वेळाने पाणी घेऊन रचना तिच्या खोलीत गेली. बेडवर भिरकवलेला फोन अजूनही तसाच होतात अधूनमधून काही मेसेज आणि फोन येत असल्याने व्हायब्रेट होत होता. पण फोनकडे पूर्ण दुर्लक्ष करून कलिका खिडकीतून बाहेर बघत बसली होती. 
ग्लास तिच्या समोर धरत रचनाने हळुवारपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला. 
आईच्या कमरेला विळखा घालत कलिका काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण तोंडातून शब्द फुटण्याऐवजी हुंदका बाहेर पडला. 
"अग वेडाबाई, रडतेस कशासाठी?" रचनाने कलिकाला शांत करत विचारले. 
"बरं एक काम कर आधी पोटभर रडून घे, मोकळी हो.मग बोल.",पाच दहा मिनिटांनी कलिका रडायची थांबली. 
मग उठून गेली आणि फ्रेश होऊन येत आईच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी पडली. 
"आई मैत्री किंवा कुठल्याही नात्यात स्वतःला सतत सिद्ध करावं लागतं का गं? म्हणजे आपण त्या नात्याला, त्या व्यक्तीला बांधील आहोत हे सारखं सगळ्या जगासमोर दाखवलं तरच ते नातं खरं असतं का? ", कलिका पुढे बोलत होती, " माझ्या मैत्रिणी हल्ली खूप वेगळ्या वागतात. म्हणजे कॉलेज लाईफ एन्जॉय करायचं असतं मान्य आहे आणि मलाही ते आवडत. पण एन्जॉय करायचं म्हणजे कसंही वागायचं नसत न? 
आमचा जसा ग्रुप आहे तसा एक ऑपोझिट ग्रुप आहे. इतके दिवस अभ्यासाबाबत स्पर्धा सुरू होती पण आता मात्र सगळंच त्या ग्रुपसारखं करायचं ठरवलं आहे. सुरुवातीला मजा म्हणून मीही सामील झाले ग खोटं नाही बोलणार मी तुझ्याशी पण हळूहळू मला अस दुसरे करतात म्हणून आपणही करायचं हे नाही पटलं. 
त्या ग्रुपमधील सगळेजण कपल्स आहेत आणि म्हणून आता माझ्या ग्रुपमध्ये सगळ्यांना ते रिलेशनशिप वगैरे करायचं आहे. आय मिन आई जस तू म्हणाली होतीस की आतून कुणी आवडलं तर ठीक आहे पण मला अजूनतरी अस काहीच कुणाबद्दल वाटलं नाही.  मी त्या गोष्टीला विरोध केला तर सगळे म्हणत आहेत की आता तू आमच्यात मिक्स होऊ नकोस. तुला जर ग्रुपमध्ये राहायचं असेल तर आम्ही म्हणू तसच करावं लागेल. म्हणूनच आज माझं रियाशी भांडण झालं.अशाने मला कुणीच फ्रेंड्स उरणार नाहीत का ग आई?" कलिकाने बोलणं संपलं तस रचनाकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. 
क्षणभर स्वतःशीच विचार करत रचना म्हणाली, " नाही असं काही होणार नाही. हे बघ पिल्लू जसजसे आपण मोठे होतो आपल्या आवडीनिवडी बदलत जातात हे तर तुला माहिती आहे. पण त्या बदलतात कशामुळे? तर आपण कुणासोबत किती वेळ घालवतो त्यामुळे हे बदल घडतात. आता तुझंच बघ तुझी रिया आधी समिरा फार चांगली मैत्रीण होती. हळूहळू समिरा आणि तू वेगळ्या झालात का? कारण समिराला आऊटिंग वगैरे आवडत नव्हतं उलट तुला ट्रेक करण्यात जास्त इंटरेस्ट आला तू रियाच्या ग्रुपकडे वळलीस. पण एक ट्रेकिंग सोडलं तर रियाच्या ग्रुपबरोबर तू कम्फर्टेबल असतेस का? त्यांच्याशी तुझं पटत का? तर नाही आणि ह्याच कारण आता तुलाही कळालं आहे. 
कलिका मित्र असावेत सगळ्या प्रकारचे असले तरी हरकत नाही पण कुणाकडून काय घ्यायचं आणि मैत्री कितपत जवळची असावी हे कळायला हवं ना? 
समिराने नंतरही तुझ्याशी मैत्री कायम ठेवायचा प्रयत्न केला पण तू तुझ्या धुंदीत होतीस. ह्या सगळ्या नवीन गोष्टी तुला आवडत होत्या. आणि मला तुझ्यावर मी केलेल्या संस्कारावर विश्वास होता म्हणूनच मीही तुला अडवत नव्हते. म्हणूनच मी फक्त समिराच्या मदतीने तुझं काय चाललंय त्यावर लक्ष ठेवून होते. बाकी तुझं तुला बऱ्यापैकी लवकरच लक्षात आलच. पण एक सांगू समिरा, राहुल , ईशा आणि बाकी सगळे तुला खूप मिस करतात बघ अजूनसुद्धा. एकदा बोल त्यांच्याशी. रियाशी मैत्री तोडून टाक अस मी म्हणत नाही पण त्याबाबतचे लिमिट तू ठरव. आम्ही सगळे आहोतच तुझ्यासोबत नेहमीच. डोन्ट वरी. तुला माहितेय
माझी आजी म्हणजे तुझी लाडकी आऊ म्हणायची, मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होत. आणि तुला असे मित्रमैत्रिणी मिळाले आहेत सो होल्ड देम." 

"आई कसलं भारी समजून सांगतेस ग तू! तू माझं सगळं कन्फ्युजनच दूर केलंस. मी लगेच सम्याला जाऊन भेटते आणि सॉरी पण म्हणते." , अस म्हणत पुढे गेलेली कलिका परत मागे वळून आली आणि आईच्या गालावर हळूच ओठ टेकवत म्हणाली," पण सगळ्यात आधी माझ्या परिसाला थॅंक्यु❤️" 

#quotesकट्टा #truefriends
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

गंडांतर

गंडांतर 


वर्ष २०१८ चा जानेवारी महिना, उत्तरायण सुरू झालेले होते. 

१२ जानेवारी २०१८ ला माझ्या सासूबाईंचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. 


ही घटना आमच्यासाठी अक्षरशः प्रचंड अनपेक्षित होती. कारण त्या दिवशी( शुक्रवार ,१२ जानेवारी २०१८ ) संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आई अगदी चालत्या फिरत्या होत्या. 

माझाही दोन दिवस आधीच गाडी चालवताना छोटासा अपघात झाला होता आणि त्यामुळेच त्या दोन तीन दिवसात आमचं बऱ्याचदा फोनवर बोलणं झालं होतं. 

शेजारच्या सगळ्या मैत्रिणींसोबत बसून त्यांनी दुसऱ्या दिवशीची भोगीची भाजी निवडून ठेवली होती. रविवारी संक्रातीच्या दिवशीच हळदीकुंकू आवरून त्या सोमवारी सकाळी माझ्याकडे येण्यासाठी निघणार होत्या. तसं आमचं गुरुवारी फोनवर बोलणं झालं असल्याने आम्ही दोघेही निश्चिन्त होतो. 


पण अचानकच शुक्रवारी रात्री साडे आठ च्या सुमारास मला फोन आला आणि शेजारच्या ताईने फोनवर आधी आई सिरीयस असल्याचे सांगितले आणि मग पुन्हा दहा मिनिटांनी दुसऱ्यांदा फोन करून त्या आता ह्या जगात नाहीत असं सांगितलं. आधीतर मी त्यांना काहीही काय सांगता म्हणत उडवूनच लावले पण जे घडलं होतं ते खरं होतं. 


शेवटी स्वतःला सावरत इकडे तिकडे कळवत आम्ही खाजगी वाहनाने गावी जाण्यासाठी निघालो. 

कालपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी करू म्हणणारी व्यक्ती आज अचानक फक्त एक निर्जीव देह म्हणून समोर होती. माणसाच्या आयुष्यात कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते ह्याची प्रचिती आम्हाला तेंव्हा आली. जसं आपलं जन्माला येणं आपल्या हातात नसतं तसच आपलं मरणही आपल्या हातात नसतं. 

त्यांचे पुढील कार्य करण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबीय लासलगाव, जिल्हा -नाशिक  इथे एकत्र आलो होतो. 

बातमी कळल्यानंतर आम्ही अक्षरशः हाताला लागतील ते दोन तीन ड्रेस आणि नाशिकच्या थंडीचा विचार आल्याने एकेक स्वेटर एवढंच सामान घेऊन आलो होतो. आणि ती वेळही अशी होती की शिस्तीत बॅग वगैरे भरून निघावं असं काही डोक्यात आलं नाही. 


दहाव्या आणि तेराव्याच्या कार्यासाठी २१ जानेवारीला संध्याकाळी आम्ही सर्वजण नाशिकला मोठ्या दिरांकडे गेलो. 


दहाव्याचे कार्य घाटावर आटोपून आम्ही घरी परतलो होतो. 

दिरांना घराबाहेर जाता येत नसल्याने माझे मिस्टरच दिवसभर सगळ्या धावपळीत होते. त्यातच आलेल्या पाहुण्यांची सोय अजून एका जवळच्या नातेवाइकांकडे केली असल्याने त्यांना तिथेही लक्ष द्यावे लागत होते. 


दुसऱ्या दिवशी मात्र माझे मिस्टर जेवतानाही जरा जास्तच शांत होते. कार्य तसं व्यवस्थित पार पडलं होतं त्यामुळे आता कशाची काळजी आहे हे माझ्या लक्षात येत नव्हतं.


दुपारी एका कामासाठी बाहेर जात आहोत असं सांगून ते बाहेर पडले. मग थोड्या वेळाने मला त्यांचा फोन आला की तुझ्या फोनमध्ये माझ्या पॅनकार्ड, आधार कार्ड ची फोटोकॉपी असेल तर मला पाठव. माझ्याकडे नसल्याने मी त्यांना सांगितलं की तुमच्याच फोनमध्ये दोन्हीही फोटो आहेत पण उगाच हं हं करत त्यांनी फोन ठेवला. आता मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 


संध्याकाळी अगदी जेवणाच्या वेळेला ते आणि नणंदबाईंचे मिस्टर घरी आले. काही क्षणातच जेवणं न करताच ते दोघेही परत बाहेर जातो म्हणत निघाले. 

मला कळताच मी धावत जाऊन दोघानाही जिन्यात गाठलं आणि मग मला दिवसभर सुरू असलेल्या धावपळीच्या मागचं खरं कारण कळाल. 


आमच्या ज्या नातेवाइकांकडे जास्तीचे लोक थांबले होते. त्यांच्या शेजारच्या एका बाईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्या बाईंचे कितीतरी लाखांचे दागिने जे त्यांनी नवऱ्याला कळू न देता बँकेतून काढून आणले होते, ते एका चोराने पाळत ठेवून बँकेतून बाहेर पडल्यावर अर्थातच हिसकावून पळवले होते. त्या बाईंचे म्हणणं होतं की माझे मिस्टरच ते चोर आहेत आणि त्यांनीच ते दागिने पळवले आहेत. 

दुर्दैवाने आपल्याकडे पोलीस तक्रार करणारी स्त्री असली की काहीही विचारपूस न करता आधी पकडून नेण्यासाठी येतात. आमच्या केसमध्येही तेच झालं होतं आणि माझ्या मिस्टरांचं काही म्हणणं ऐकू न घेता त्यांना पोलीस ठाण्यात बसवून घेतले होते. 

ही घटना घडली होती १६ जानेवारीला आणि १६ जानेवारीला आम्ही सगळेजण लासलगाव इथे होतो. माझे मिस्टर कळकळीची विनंती करत सांगत होते की माझं फोन लोकेशन चेक करा, तुम्हाला लगेच कळेल मी कुठं होतो. मी अहमदनगर इथे एका रेप्युटेड बँकेत मॅनेजर आहे आणि मी स्वतः तिथल्या कित्येक पोलिसांना बँकेच्या सोयी उपलब्ध करून देतो. नाशिकमध्ये मी माझ्या दिवंगत आईच्या कार्यासाठी आलो आहे आणि ते ही बऱ्याच वर्षानंतर. ह्या बाईंना मी कधी बघितलंही नाही तर बाकी सगळं तर लांबच राहील. पण त्या हवालदाराला काय झालं होतं माहीत नाही तो काहीही ऐकण्यासाठी तयार नव्हता.


ज्या हवालदाराने त्यांना पोलीस ठाण्यात नेलं होतं काही वेळाने त्याची ड्युटी संपली, तो घरी गेला. मग पुढच्या व्यक्तीने काही वेळासाठी घरी जाऊन येण्याची परवानगी देत पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलवले होते.  नेमकं त्या वेळी मला हे सगळं कळलं होतं. आता हे माहीत असणारे घरात आम्ही फक्त पाच व्यक्ती होतो. मी, माझे मिस्टर, नणंदेचे मिस्टर, माझे चुलत सासरे आणि एक दीर. 

जे घडलं आहे ते कुणालाही कळू देऊ नकोस अस सांगत ते चौघे बाहेर पडले. 


तसं बघायला गेलं तर आमची काही चूक नसल्याने आम्हाला घाबरण्याचे काही कारणंच नव्हते, पण म्हणतात ना संकटं आली की सगळ्या दिशांनी येतात. आमचंही असंच काहीसं झालं होतं, आधीच ध्यानीमनी नसताना आईंच्या जाण्याचं दुःख त्यातच ही गोष्ट घडली होती. त्यातच मध्यमवर्गीय माणसाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं म्हटलं की ब्रह्मांडच आठवतं. इथे तर ती स्त्री आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो हवालदार अगदी ठामपणे आरोप करत होते. माझ्या मिस्टरांनीही मात्र तितक्याच ठामपणे स्वतःचं म्हणणं लावून धरलं होतं. 

पुढचा हवालदार  ड्युटीला  येईपर्यंत ते स्टेशनमध्ये वाट बघत बसणार होतो खरं तर बसावंच लागणार होतं. 


त्यातही आमचं दुर्दैवी नशीब काही आमची पाठ सोडायला तयार नव्हतं. ती चोरीची घटना जिथे घडली तिथलं सीसीटीव्ही फुटेज आलं होतं. आणि त्या फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर सेम तसेच कपडे होते जसे माझ्या मिस्टरांनी घातले होते. पण फरक एकच होता त्या व्यक्तीला दाढीमिशा होत्या आणि मिस्टरांचं मात्र 13 तारखेलाच मुंडन झालं होतं. ही आमच्यासाठी जमेची बाजू होती. 

 

संध्याकाळी सात वाजता हे लोक स्टेशनमध्ये गेले होते. मला मात्र अशा वेळी काही सुचत नव्हतं. आणि एका क्षणी मला ‘घोरकष्टोद्धारणस्तोत्र’आठवलं. आठवल्या मिनिटापासून मी स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. काहीही करून ह्या संकटातून आमची कुठल्याही आरोपशिवाय सुटका व्हावी एवढी एकच इच्छा माझ्या मनात होती. 


जवळपास रात्री साडे अकरा वाजता सगळेजण परत आले तोपर्यंत कुणीही फोन लावला तर उचलत नव्हतं. त्यामुळे स्टेशनमध्ये पुढे काय घडलं हे कळायला काही मार्ग नव्हता. तीन साडे तीन तासात मी कितीवेळा स्तोत्राचे पठण केले हेही माझ्या लक्षात नव्हते. 


मला असं करताना बघून घरातल्या इतरांना बरेच प्रश्न पडत  होते पण मी पठण सुरु करण्याआधीच सगळं झाल्यावर सांगते अस सांगितल्याने सगळे गप्प बसले. आणि बाकीची काम बघू लागले. 


मिस्टरांना रात्री दारात सुखरूप बघितल्यानंतर माझ्या जिवात जीव आला. मनापासून देवाचे आभार मानून मी पठण संपवले. 


जेवायला बसल्यानंतर त्यांनी आधी सगळ्यांना सकाळपासून जे जे घडले ते सांगितले. सगळ्यांना अजून एक धक्का बसला होता. मग पुढे ड्युटी बदलल्यावर काय झाले हे सांगायला सुरुवात केली. 


ड्युटी बदलल्यानंतर स्टेशनमध्ये दुसरे लोक आले होते. चार्ज घेतलेल्या हवालदारानेही आधीप्रमाणेच बसायला सांगितले होते. 


पण तेवढ्यात तिथे एक ओळखीचा चेहरा दिसला. ती व्यक्ती म्हणजे माझ्या मिस्टरांच्या गावातल्या फार जुन्या घराजवळचे शेजारी आणि वर्गमित्राचे थोरले बंधू होते. त्यांनी चेहरा बघताच मिस्टरांना ओळखले आणि विचारपूस केली. 


माझ्या सासूबाईंचे निधन झाल्याची बातमी त्यांच्याही कानावर आली असल्याने ह्या सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बघून त्यांना आश्चर्य वाटले होते. मग त्यांनी स्वतः पुढे होऊन केस बघितली आणि त्या हवालदाराला जरा दबाव देऊन विचारलं तर त्या बाईने काहीतरी देण्याचे कबूल केल्याने तो तिचं ऐकत होता. भरीस भर पडली ती त्या बाईंच्या नवऱ्याच्या येण्याने खरा प्रकार आमच्या नातेवाईकांकडून कळल्याने त्यांनी स्टेशनमध्ये धाव घेतली होती.  माझ्या मिस्टरांची माफी मागत त्यांनी मिस्टरांचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही हे लिहून दिले. 


आणि अशा रीतीने सकाळपासून सुरू झालेल्या गंडांतराची सांगता झाली. सगळी कागदपत्रे, मोबाईल ताब्यात घेऊन सगळेजण घरी परत आले. 


बऱ्याचदा काय होतं आपण खरे असतो, आपलं कर्म चांगलं असतं पण आपली वेळ चांगली नसते. अशावेळी गरज असते ती त्या शक्तीने आपल्याला फक्त पाठीशी असल्याची जाणीव करून देण्याची. आणि आमच्याबरोबर असंच काहीसं घडलं बाजू खरी असूनही वेळ वाईट असल्याने आमचं खरं बोलणंही खोट समजलं जात होतं. 

पण अचानकच चमत्कार घडावा असं सगळं जुळून आलं आणि त्या खोट्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. 


आम्ही दोघेही पहिल्यापासून एका गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो आणि ती म्हणजे देवाचं अस्तित्व, तो असतो सतत आपल्या आजूबाजूला , गरज असते ती फक्त त्याला मनापासून हाक मारण्याची. आणि आपली हाक नक्की ऐकली जाते. 


घोरकष्टोद्धारणस्तोस्त्राचा आम्हाला आलेला हा पहिला अनुभव. पण हा अनुभव आम्हाला बरच काही शिकवून गेला. 


वाचकांच्या माहितीसाठी घोरकष्टोद्धारणस्तोत्राची  संपूर्ण माहिती खाली देत आहे.


सार्थ घोरकष्टोद्धारणस्तोत्र

‘घोरकष्टोद्धारणस्तोत्र’ या नावामध्येच या स्तोत्राचे फलीत आहे. ‘घोर+कष्ट+उद्धार’ अशी याची फोड केल्यास, असे लक्षात येते की मनुष्य जन्म हाच मुळी, पाप आणि पुण्य याच्या संमिश्रणातून साकार होतो. अशा ‘मनुष्य’ जन्माला आल्यानंतर. या ‘जन्म आणि मृत्यू’ या चक्रात अखंडपणे फिरताना होणार्‍या ‘घोर’ कष्टाची जाणीव झाल्यामूळे आणि यातून सुटण्याची जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामूळे होणारी जीवाची ‘तडफड’ पाहून अतिशय करूणा आल्यामूळे स्वतः प. पू. श्री सदगुरु भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप प. प. श्री वासूदेवानंद सरस्वती, श्री टेंब्येस्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे.


श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।

भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥

त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।

त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥

पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।

त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥

कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥

धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।

भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥

॥श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥

॥प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥

श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम्


।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।


या दृष्टीने पाहू गेल्यास या स्तोत्राचे फलीत अगोदर पाहू यात.


धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं |

सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं

भावासक्तिंचाखिलानन्दमूर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||५||


श्रीगुरूमुखातून मिळालेल्या या स्तोत्राच्या पठणाने सद-धर्माविषयी प्रेम, सु-मति (सद्-बुद्धी), भक्ति, सत्-संगती याची प्राप्ति होते. त्यामूळे याच देहात भुक्तिं म्हणजेच सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पुर्तता झाल्यामूळे, अंतिमतः ‘मुक्तिं’ या चतुर्थ पुरुषार्थाचा लाभ होतो. म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची पुर्तता होऊन “भाव आसक्तिं च आखिल आनंद मूर्ते” रुपी, श्रीदत्तात्रेय-आनंद स्वरुपाची, म्हणजेच ‘भक्ति’ या पंचम पुरुषार्थाची निश्चितपणे प्राप्ती होते.


आता थोडक्यात अर्थ पाहू,


श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव |

श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव |

भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||


हे प. पू. प. प. श्रीपाद श्रीवल्लभा, देवाधीदेवा, ‘मी’ आपणास शरण आलो आहे. हा माझा भाव लक्षात (ग्राह्य मानून) घेऊन, आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.


त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं |

त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम |

त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||


हे प्रभो, विश्वमूर्ते, माझे माता-पिता-बांधव-त्राता आपणच आहात. आपणच सर्वाचे ‘योग-क्षेम’ पहाता. माझे सर्वस्व आपणच आहात. म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररुपी-भवसागररुपी घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो.


पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम |

भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्व दैन्यम |

त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||


आपण आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, अशा पापयुक्त त्रिविधतापातून माझी सुटका करावी. माझ्या शारिरीक-मानसिक व्याधी, माझे दैन्य, भीति इ. क्लेश दूर करावेत आणि या घोर-कलीकाळापासून या घोरसंकटातून माझा उद्धार करावा. हे श्री दत्तात्रेया, आपणास माझा नमस्कार असो.


नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता |

त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता |

कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||


हे श्री अत्रिनंदना, आपणाशिवाय मला अन्य कोणी समर्थ ‘त्राता’ नाही. आपणासम दानशूर ‘दाता’ ही नाही. आपणासम भरण-पोषण करणारा ‘भर्ता’ ही नाही. हे आपण लक्षात घेऊन, हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणार्‍या देवाधिदेवा, आपण माझा या ‘घोर’ संकटातून, माझ्यावर ‘पुर्ण-अनुग्रह’ करून उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.


धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् ।

सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।

भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते ।

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५॥


श्लोकपंचकमेतधो लोक मंगलवर्धनम् ।

प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥


“धर्मे प्रीतीम सन्मतिं” सर्व प्रकारच्या कष्टातून, हे प्रभो, तू मला सोडव. त्या सगळ्यातून का सोडव, तर मला “धर्मा बद्दल प्रीती, सन्मती, विवेकपूर्ण चांगली बुद्धी (वरील कष्ट दूर झाल्या नंतर) उत्पन्न होण्यास मदत होईल आणि  तुझ्याबद्दलचा (पूज्य) भाव प्राप्त होईल. म्हणून मला वर दिलेल्या सर्व आपत्तीतून सोडव. पहिल्या ४ श्लोकांमध्ये व्यावहारिक गोष्टी आहेत, पण खरे इंगित म्हणजे व्यावहारिक कष्टातून सुटका झाल्याशिवाय सर्वसामान्य माणूस परमार्थात नीट लक्ष घालू शकणार नाही.


श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम |

प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत || ६ ||


अशा प्रकारे या पाच श्लोकाचे ‘नित्य’ पठण करणार्‍या कर्त्याचे, सर्वार्थाने ‘मंगल’ होते. असा अनन्य भक्त, प्रभु श्री दत्तात्रेयाना अतिप्रिय होतो.


इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं 

घोरकष्टोद्धरण स्तोत्र सम्पूर्णम् ||


|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिंगबरा ||

#स्वतःला शोधताना

#गौरीहर्षल