★मैत्री★➡️टर्म्स अँड कंडिशन अप्लाय ⬅️
★मैत्री★
➡️टर्म्स अँड कंडिशन अप्लाय ⬅️
मैत्री - टर्म्स अँड कंडिशन अप्लाय
जवळपास ७० सेल्फी काढून झाल्यावर ७१ व्या सेल्फीला २० वर्षांची कुल्फी आयमिन कलिका खुश झाली. मग बरेच हॅशटॅग वापरत सगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर ती सेल्फी शेयर करण्यात आली. मग सुरू झाली लांबलचक प्रक्रिया म्हणजे प्रोसेस हो लाईक, कमेंटच्या देवाणघेवाणीची. अधूनमधून आपल्या सो कॉल्ड सोशल मिडिया प्रतिस्पर्धी लोकांचे खाते तपासणीही सुरू होती. पण जसजसे हिचे लाईक,कमेंट कमी होऊन इतरांचे वाढू लागले तशी ती अस्वस्थ झाली.
घरात काम करत असणाऱ्या रचनाचा एक डोळा लेकीकडेही होता. नुकताच लेकीचा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाचा रिझल्ट लागला होता. रचनाच्या अपेक्षेपेक्षा जरा २,४ टक्के जास्तच मिळाले होते कलिकाला. त्यामुळे तर हवा तसा फोन घेऊन दिला होता. तशी कलिका करियर वगैरे बाबत प्रचंड फोकस्ड होती. पण हल्ली हल्लीच हे सोशल मिडिया वेड जरा जास्तच वाढलं होतं. आणि अचानक झालेला हा बदल चाणाक्ष आईच्या नजरेने टिपला होता.
रचना स्वतःही स्मार्टफोन छान प्रकारे वापरत असल्याने त्यातल्या खाचाखोचा तिलाही आता कळत होत्या.
कलिकासोबतही तिचे नाते मैत्रीचे होते पण त्याचबरोबर आईबद्दल वाटणारी एक आदरयुक्त भीतीही लेकीच्या मनात होती.
आपली आई आपल्यासाठी काय वाट्टेल ते करू शकते पण ते तिला योग्य वाटले तरच ह्याची जाणीव कलिकाला होती. कलिकानेही वेळोवेळी रचनाचा विश्वास सार्थ ठरवला होता. हे रचनाचेच संस्कार होते जे आजच्या जगातही कलिकाला वेडवाकडं पाऊल टाकण्याआधी विचार करायला भाग पाडत होते.
अचानकच कलिकाच्या खोलीतून मोठमोठ्याने फोनवर बोलण्याचा आवाज ऐकू आला. रचनाने डोकावून बघितले तर फोनवर कुणाशी तरी बोलणं सुरू होत.
"अग पण हे असं केलंच पाहिजे का? मला आणि माझ्या आईलाही नाही आवडणार अस वागलेलं." कलिका
पलीकडून बोलणारी मैत्रीण काही तरी बोलली.
त्यावर कलिका अजूनच उसळून म्हणाली, " नो वे मला तुमच्याशी मैत्री निभावण्यासाठी हे सगळं करावं लागणार असेल तर मला जमणार नाही. 𝚈𝚘𝚞 𝚌𝚊𝚗 𝚏𝚒𝚗𝚒𝚜𝚑 𝚢𝚘𝚞𝚛 𝚏𝚛𝚒𝚎𝚗𝚍𝚜𝚑𝚒𝚙 𝚠𝚒𝚝𝚑 𝚖𝚎. 𝙱𝚞𝚝 𝚒 𝚌𝚊𝚗𝚝 𝚋𝚛𝚎𝚊𝚔 𝚖𝚢 𝚖𝚘𝚖𝚜 𝚝𝚛𝚞𝚜𝚝. "
फोन कट करत कलिकाने रागाने बेडवर भिरकावला.
तिला थोडं शांत होऊ देऊन काही वेळाने पाणी घेऊन रचना तिच्या खोलीत गेली. बेडवर भिरकवलेला फोन अजूनही तसाच होतात अधूनमधून काही मेसेज आणि फोन येत असल्याने व्हायब्रेट होत होता. पण फोनकडे पूर्ण दुर्लक्ष करून कलिका खिडकीतून बाहेर बघत बसली होती.
ग्लास तिच्या समोर धरत रचनाने हळुवारपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
आईच्या कमरेला विळखा घालत कलिका काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण तोंडातून शब्द फुटण्याऐवजी हुंदका बाहेर पडला.
"अग वेडाबाई, रडतेस कशासाठी?" रचनाने कलिकाला शांत करत विचारले.
"बरं एक काम कर आधी पोटभर रडून घे, मोकळी हो.मग बोल.",पाच दहा मिनिटांनी कलिका रडायची थांबली.
मग उठून गेली आणि फ्रेश होऊन येत आईच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी पडली.
"आई मैत्री किंवा कुठल्याही नात्यात स्वतःला सतत सिद्ध करावं लागतं का गं? म्हणजे आपण त्या नात्याला, त्या व्यक्तीला बांधील आहोत हे सारखं सगळ्या जगासमोर दाखवलं तरच ते नातं खरं असतं का? ", कलिका पुढे बोलत होती, " माझ्या मैत्रिणी हल्ली खूप वेगळ्या वागतात. म्हणजे कॉलेज लाईफ एन्जॉय करायचं असतं मान्य आहे आणि मलाही ते आवडत. पण एन्जॉय करायचं म्हणजे कसंही वागायचं नसत न?
आमचा जसा ग्रुप आहे तसा एक ऑपोझिट ग्रुप आहे. इतके दिवस अभ्यासाबाबत स्पर्धा सुरू होती पण आता मात्र सगळंच त्या ग्रुपसारखं करायचं ठरवलं आहे. सुरुवातीला मजा म्हणून मीही सामील झाले ग खोटं नाही बोलणार मी तुझ्याशी पण हळूहळू मला अस दुसरे करतात म्हणून आपणही करायचं हे नाही पटलं.
त्या ग्रुपमधील सगळेजण कपल्स आहेत आणि म्हणून आता माझ्या ग्रुपमध्ये सगळ्यांना ते रिलेशनशिप वगैरे करायचं आहे. आय मिन आई जस तू म्हणाली होतीस की आतून कुणी आवडलं तर ठीक आहे पण मला अजूनतरी अस काहीच कुणाबद्दल वाटलं नाही. मी त्या गोष्टीला विरोध केला तर सगळे म्हणत आहेत की आता तू आमच्यात मिक्स होऊ नकोस. तुला जर ग्रुपमध्ये राहायचं असेल तर आम्ही म्हणू तसच करावं लागेल. म्हणूनच आज माझं रियाशी भांडण झालं.अशाने मला कुणीच फ्रेंड्स उरणार नाहीत का ग आई?" कलिकाने बोलणं संपलं तस रचनाकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.
क्षणभर स्वतःशीच विचार करत रचना म्हणाली, " नाही असं काही होणार नाही. हे बघ पिल्लू जसजसे आपण मोठे होतो आपल्या आवडीनिवडी बदलत जातात हे तर तुला माहिती आहे. पण त्या बदलतात कशामुळे? तर आपण कुणासोबत किती वेळ घालवतो त्यामुळे हे बदल घडतात. आता तुझंच बघ तुझी रिया आधी समिरा फार चांगली मैत्रीण होती. हळूहळू समिरा आणि तू वेगळ्या झालात का? कारण समिराला आऊटिंग वगैरे आवडत नव्हतं उलट तुला ट्रेक करण्यात जास्त इंटरेस्ट आला तू रियाच्या ग्रुपकडे वळलीस. पण एक ट्रेकिंग सोडलं तर रियाच्या ग्रुपबरोबर तू कम्फर्टेबल असतेस का? त्यांच्याशी तुझं पटत का? तर नाही आणि ह्याच कारण आता तुलाही कळालं आहे.
कलिका मित्र असावेत सगळ्या प्रकारचे असले तरी हरकत नाही पण कुणाकडून काय घ्यायचं आणि मैत्री कितपत जवळची असावी हे कळायला हवं ना?
समिराने नंतरही तुझ्याशी मैत्री कायम ठेवायचा प्रयत्न केला पण तू तुझ्या धुंदीत होतीस. ह्या सगळ्या नवीन गोष्टी तुला आवडत होत्या. आणि मला तुझ्यावर मी केलेल्या संस्कारावर विश्वास होता म्हणूनच मीही तुला अडवत नव्हते. म्हणूनच मी फक्त समिराच्या मदतीने तुझं काय चाललंय त्यावर लक्ष ठेवून होते. बाकी तुझं तुला बऱ्यापैकी लवकरच लक्षात आलच. पण एक सांगू समिरा, राहुल , ईशा आणि बाकी सगळे तुला खूप मिस करतात बघ अजूनसुद्धा. एकदा बोल त्यांच्याशी. रियाशी मैत्री तोडून टाक अस मी म्हणत नाही पण त्याबाबतचे लिमिट तू ठरव. आम्ही सगळे आहोतच तुझ्यासोबत नेहमीच. डोन्ट वरी. तुला माहितेय
माझी आजी म्हणजे तुझी लाडकी आऊ म्हणायची, मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होत. आणि तुला असे मित्रमैत्रिणी मिळाले आहेत सो होल्ड देम."
"आई कसलं भारी समजून सांगतेस ग तू! तू माझं सगळं कन्फ्युजनच दूर केलंस. मी लगेच सम्याला जाऊन भेटते आणि सॉरी पण म्हणते." , अस म्हणत पुढे गेलेली कलिका परत मागे वळून आली आणि आईच्या गालावर हळूच ओठ टेकवत म्हणाली," पण सगळ्यात आधी माझ्या परिसाला थॅंक्यु❤️"
#quotesकट्टा #truefriends
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
टिप्पण्या