मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

Quote of the day 17

#Quote_of_the_day17


अमेय अगदीच शांत मुलगा. नाही म्हणायला ओळखीच्या लोकांमध्ये थोडा फार मिसळत असे पण बाकी अगदीच अबोल. अभ्यासात मात्र बऱ्यापैकी हुशार. त्यामुळेच तर कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन झालं आणि चांगली नोकरीही मिळाली. एकूणच काय निवांत आयुष्य चाललं होतं त्याचं. थोडया वर्षात लग्नाचं वय झालं म्हणून आईवडिलांनी मुली बघायला सुरुवात केली. अबोल असणाऱ्या अमेयला मात्र अत्यंत बडबड्या सखीने पसंत केले. हो तिनेच पसंत केले कारण हा पठ्ठया मुलगी कशी वाटली विचारलं की नुसता लाजत असे. मग शेवटी तिनेच होकार कळवला. योग्य मुहूर्त बघून लग्नही झालं. 
    अमेयच्या अबोल स्वभावाशी सखी जुळवून घेत होती. पण तिच्या येण्याने त्याच्या आईबाबांना मात्र घर भरल्यासारखं वाटत होतं. सतत तिची चिवचिव , वावरणं त्यांना आवडलं होतं. आवडलं तर अमेयला पण होत पण बोलणार कोण? असो असा त्यांचा संसार छान सुरू होता. वर्ष होत आल होत त्यातच नवीन पाहुण्याची चाहूल लागली.  सगळेच आनंदले. विचारले तरच बोलणारा अमेय आता मात्र हळूहळू बोलू लागला होता, सखीची जास्त काळजी घेत होता. बाळाशी गप्पा मारत होता. त्याच्यातले बदल सगळ्यांनाच सुखावणारे होते. आता सखीला सातवा महिना लागला होता डिलिव्हरी साठी ती माहेरी जाणार होती. त्यातच अमेयला परदेशी जाण्याची संधी आली. एक प्रकारे ते त्याच प्रमोशनच होतं, कारण सहा महिने तिथे जाऊन आल्यानंतर प्रमोशन फिक्स होतं. पण जर ही संधी नाकारली तर पुन्हा मिळणार की नाही ह्याची खात्री नव्हती. अमेयला कळत नव्हतं काय करावं जायचं ठरवावं तर सखीची अवस्था अशी आणि नाही म्हणावं तर भविष्यातल्या काही गोष्टी लांबणार आता तर कुठे त्या गोष्टींची खरी गरज पडणार होती. त्याने विचार करण्यासाठी 3 दिवसाचा वेळ मागितला. कारण निर्णय कळवल्यानंतर पुढच्या महिन्यात जावे लागणार होते. एक महिना वेळ तयारीसाठी दिला होता. 
थोडासा विचारातच तो घरी आला. त्याचा उदास चेहरा बघताच सखीला अंदाज आला होता की काहीतरी बिनसले आहे. फ्रेश झाल्यावर तो सगळ्यांसोबत चहा घेण्यासाठी आला. हळूच तिने विषय काढला काय झालं आहे ? 
दोन सेकंद थांबून अमेयने सगळी परिस्थिती सांगितली. मग प्रश्नार्थक चेहऱ्याने त्या तिघांकडे बघू लागला. आई बाबा दोघेही म्हणाले तुम्ही दोघे मिळून जो निर्णय घ्याल त्यात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्याची काळजी करू नका. 
मग सखी त्याच्या हातावर थोपटत म्हणाली, मला माहीत आहे तू माझ्यामुळे कन्फ्युज होतो आहेस. आणि माझीही इच्छा होती की बाळाच्या जन्माच्या वेळी तू सोबत असावस. पण बघ प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्याकडे नोकरी हेच उत्पनाचे साधन आहे. आणि सध्या काही वर्षे मी पुन्हा नोकरीचा विचार करू शकत नाही,खर तर मला करायचा नाही कारण बाळाच्या महत्वाच्या दिवसात मला त्याच्यासोबत राहायचे आहे. आपली बऱ्यापैकी सेविंग जरी असली तरी तुझ्यावर जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे तू ही संधी सोडू नये असं मला वाटतं. आपण हे सगळं बाळाच्या भविष्यासाठी तर करत आहोत न मग त्यासाठी आता तडजोड केली तर काय बिघडलं. आणि राहिली गोष्ट सोबत असण्याची तर आता इंटरनेट मुळे आपण कधीही एकमेकांना बघू शकतो. तेंव्हा तू बिनधास्त जा, दोन्ही आईबाबा आहेत माझ्यासाठी. आणि सहा महिन्यांचा तर प्रश्न आहे असे संपतील. अमेयच्या डोळ्यात नकळतच पाणी आलं. ऑफिसमध्ये होकार कळवत अमेय तयारीला लागला आणि गेलाही. पुढे ठराविक दिवसांनी सखीची डिलिव्हरी झाली आणि गोंडस असा मुलगा झाला. अमेयने व्हिडीओ कॉलवरच समाधान मानले पण मन मात्र आता तयार नव्हते थांबण्यासाठी. लवकरच तो परतला अपेक्षित यश मिळाले. 
काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की काय निर्णय घ्यावा तेच कळत नाही. त्या क्षणी समोर असणाऱ्या गोष्टींचा विचार करावा की भविष्याचा. आपल्या जवळच्या माणसांचं मत नक्की विचारात घ्यावं. कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो कदाचित आपल्याला जास्त योग्य उत्तर मिळू शकते. कुठल्याही निर्णयाचा भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो हा विचार नक्की करावा 
Because,
The decisions you make today will determine the stories you tell tomorrow.
कसा वाटला Quote of the day नक्की कळवा.
थॅंक्यु❤️❤️ #गौरीहर्षल

Quote of the day 16

#Quote_of_the_day16


स्टेजवर मुलीचा सत्कार करण्यात येत होता. पण रजनीचे डोळे मात्र सतत भरून येत होते. कारणही तसंच होत रजनी आणि  तिच्या दोन्ही मुलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्यातून मार्ग काढत आजचे यश मिळवले होते. इथे मुलीचा सत्कार बेस्ट बिझनेसवुमन म्हणून होत होता तर दोन दिवसांनी मुलाला त्याच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी सुवर्णपदक मिळाले म्हणून नावाजले जाणार होते. ह्या सगळ्यात जर कुणी त्यांच्यासोबत होते तर तो म्हणजे फक्त आणि फक्त त्यांचा आत्मविश्वास. 
रजनीच्या नवऱ्याने अगदी मोक्याच्या क्षणी तिची आणि मुलांची साथ सोडून दिली होती ते ही नको त्या लोकांवर विश्वास ठेवून. तिने खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. नोकरी होती म्हणून रजनीला तशी काही आर्थिक काळजी नव्हती. पण अचानक आलेल्या या संकटाने ती नाही म्हटलं तरी कोलमडली. तिच्या मनस्थितीला समजून घेत वरिष्ठांनी काही  दिवस  तिला ब्रेक घ्यायला लावला. मुलं शाळेत गेली की रजनी तासनतास रडत असे. अशीच एके दिवशी ती विचार करत असताना तिची जवळची मैत्रीण स्मिता तिला भेटायला आली. रजनीला बघताच तिला अंदाज आला की ती काय करत होती.  तिने तिच्या ओळखीच्या एका बाईना सोबत आणले होते त्यांना घरकाम समजावून सांगत तिने आपला मोर्चा रजनिकडे वळवला. हे बघ रजनी जे झालं ते झालं, तू शक्य तेवढे प्रयत्न ही केलेस पण जर नाही समोरचा ऐकत तर काय करणार? तुझ्या सुदैवाने तू आर्थिक बाबतीत कुणावरही अवलंबून नाहीस. त्यामुळे तू आणि मुलं ह्या घरात निवांत राहू शकता. पण ज्या माणसाची लायकीच नाही त्याच्यासाठी तू अजून किती दिवस अश्रू ढाळत बसणार आहेस. विसरलीस का ती रजनी जी स्वतःबरोबर दुसऱ्यांसाठीही खंबीरपणे उभी असायची?  बाहेर पड ह्या सगळ्यामधून तुझी मुलं तुझ्याकडे आशेने बघत आहेत. तू कालही त्यांची हिरो होतीस आणि आजही आहेस. अस बघू नकोस मला आज इथे मुलांनीच यायला लावलं. मुलं मोठी झाली आहेत रजनी तुला आता अजून खंबीरपणे त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठीही उभं राहावं लागणार आहे. आम्ही सतत सोबत आहोतच पण वाट मात्र तुझी तुलाच चालायची आहे हो न?? 
ह्यानंतरही असे कमकुवत क्षण आले रजनीच्या आयुष्यात नाही असं नाही. पण मुलं आणि जवळच्या लोकांच्या मदतीने ती त्यातून बाहेर पडली. आज दोन्ही मुलांचं जस स्वतंत्र अस्तित्व होत तसच रजनीचही होतं. ह्या सगळ्या गोष्टींचा अजून एक साक्षीदार होता तो म्हणजे स्मिताने कामासाठी आणलेल्या सखुबाई. त्या सतत निरीक्षण करत होत्या की कस रजनीने सगळं स्वीकारले. हे सगळं नुसतं बघतच नव्हत्या तर त्यातून धडा घेत त्यांनी स्वतःच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकवलं होतं.  आणि जमेल तसं त्या रजनीला अशाच काही स्त्रियांना समजून सांगण्यासाठी भेटायची गळ घालत असत.
ह्या सगळ्या गोष्टींचा काही जणींना फायदा नक्कीच झाला होता. 
परिस्थिती नेहमीच एकसारखी राहत नाही. ती कधी चांगली असते तर कधी वाईट. वाईट परिस्थितीतही खंबीरपणे उभं रहात जो स्वतःला सावरतो. त्याचं आयुष्य नक्कीच पुढे जाऊन एक उदाहरण म्हणून दिल जातं. परिस्थितीशी दिन हात करताना आपल्याला हे माहीत नसतं की कोण आपल्याला बघत आहे. पण जेव्हा आपण काही मिळवतो एका पदावर पोहोचतो. अन् कुणी कधीतरी येऊन सांगत की ही गोष्ट तुमच्याकडे बघून आम्ही शिकलो तेव्हा नकळतच जबाबदारी कळते. कदाचित ती गोष्ट छोटीशीही असू शकते पण समोरच्या व्यक्तीला जर त्याचा उपयोग झाला आहे तर ती नक्कीच महत्वाची आहे. 
So folks , 
Be strong...
You never know who you are inspiring.

कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. 
प्रतिक्रिया द्या. थॅंक्यु❤️❤️#गौरीहर्षल

शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

Quote of the day 15

#Quote of the day 15

यश आणि जय दोघे सख्खे भाऊ. यश थोरला तर जय धाकटा. यश जरा अभ्यासू त्यातच जास्त रमणारा अगदी आदर्श टाईप. त्याउलट जयला मात्र शेंडेफळ असल्याने सगळं काही स्वतःला आवडेल तेच करायला आवडत असे. जय लहान असल्यापासून जरा आईच्या मागेच जास्त वेळ असायचा. त्यामुळे त्याला स्वयंपाकाची गोडी कधी लागली त्यालाही कळालं नाही. आधी अगदी इमर्जन्सी किंवा फारच मूड आला तर एखादा पदार्थ करणारा जय हळूहळू जास्त रस घेऊन सगळं बघत असे. आईने आपल्या टिपिकल स्वभावधर्माला धरून विरोध केला पण थोडासाच. मुलांनी स्वयंपाक करू नये वगैरे काही तिचे विचार नव्हते पण जयने काहीतरी वेगळं करावं असं तिला वाटायचं. जसं चार लोक यशच कौतुक करतात जयच सुद्धा करावं अशी तिची इच्छा होती. 
      जयच्या आवडीला गृहीत धरून आईबाबा आणि यश नेहमीच त्याला प्रोत्साहन देत. पण जयला अजून स्वतःबद्दल तेवढा विश्वास वाटत नव्हता. ह्यावर उपाय म्हणून यश सतत त्याला नवनवीन प्रयोग करायला लावत असे. अभ्यासात फारशी गती नसल्याने हॉटेल मॅनेजमेंट करणं शक्यच नव्हतं. पण म्हणून जे कौशल्य आहे ते का वाया घालवायचे? मग बाहेरून ग्रॅज्युएशन करता करता यशच्या मदतीने जय वेगवेगळ्या ठिकाणच्या पदार्थांची खासियत शिकण्याचा प्रयत्न करू लागला. यशही स्वतःचे व्याप सांभाळून जमेल तेवढी मदत करत असे. आई आणि आजीच्या हाताखाली तयार झाल्याने त्याला पारंपरिक पद्धतीचे पदार्थ अगदी छान जमत होते. मग यशने त्याला फ्युजन करता येईल का ते बघ असा सल्ला दिला. घाबरतच जयने सुरुवात केली. पहिली ऑर्डर छोटीशीच होती पण त्या ठिकाणी दिलेले पदार्थ सगळ्यांना फार आवडले. त्यासोबतच अजून तीन ठिकाणी ऑर्डरही मिळाली. पहिली कमाई जयने यशच्या हातात ठेवली. ती पुन्हा त्याच्याच हातात टेकवत यश त्याला म्हणाला, सुरुवात केली तर सगळं जमत बघ पण आपण सुरुवातीला कच खातो. मला रुटीन लाईफ आवडतं पण ह्याचा अर्थ असा नाही की तुलाही तेच आवडावं. तुला स्वतःवर विश्वास असेल तर सगळं शक्य आहे. इथून पुढेही ते नक्कीच होईल.
गोष्ट साधीशीच पण खरा अर्थ सांगते. आपल्याला खूप काही येत असत पण चार लोकांसमोर ते आत्मविश्वासाने मांडणं जमत नाही. किंवा भीती वाटते. जर आपणच स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जगात कुणीही ठेवणार नाही. ते म्हणतात न बोलणाऱ्याची मातीही खपते पण न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही. 
So If you do not believe in yourself....
chances are nobody else will. 
कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. थॅंक्यु❤️❤️#गौरीहर्षल


 

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

Quote of the day 14

#Quote of the day 14

निकिता आणि निखिलचं अरेंज मॅरेज. निकिताच्या माहेरी जशी जॉइंट फॅमिली होती तशी निखीलकडे नव्हती. निखिलच्या घरात तो , त्याचे आईबाबा आणि बहीण एवढेच लोक. बाकी नातेवाईक येऊन जाऊन असत पण ते कधीतरी  निमित्तापुरते. त्यामुळे घरातील व्यवस्था आईच्या हातात होती. आणि इतक्या वर्षांची एकटीने सगळं करण्याची सवय त्यांनाही लागली होती. त्यात सुनेच्या येण्याने बदल होणार हे जरी गृहीत धरले होते तरी तसा अनुभव दोघींचाही पहिलाच असणार होता. इतर घरात जस होत असे तस त्यांच्या घरातही होई भांड्याला भांडं लागलं की आवाज होणारच. 
निकिताला मिळून मिसळून गोष्टी कराव्या वाटत तर सासूबाई ची एक पद्धत ठरली होती त्यांना ते तस हवं असे. ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण निखिल आणि त्याचे बाबा करत होते. पण सोल्युशन काय काढावं त्यांना समजेना. वयानुसार आईही नमतं घ्यायला तयार नाही मग शेवटी निखिलने वेगळं व्हायचं ठरवलं. त्याच सोसायटीमध्ये पण दुसऱ्या विंगमध्ये त्यांचा एक फ्लॅट होता तो आणि निकिता तिथे राहू लागले. हळूहळू गाडी रुळावर आली. दोघीही आपल्या आवडीच्या कामात मन रमवू लागल्या. आई आणि निकिता दोघींनाही चूक कळली होती. पण आता बाबा आणि निखिल दोघांचंही म्हणणं होतं जे जस आहे ते तसच राहूदे. आपल्या सगळ्यांना एका स्पेसची गरज असते ती आपल्याला वेगवेगळ्या घरात राहून मिळतेय. कमी काम असल्याने दोघींनाही स्वतःच्या इतर गोष्टींना वेळ देता येतो आहे. आई इतकी वर्ष जे  करू करू म्हणत होती पण एकटीने घर सांभाळताना ते शक्यच नव्हतं आता तिला ते सगळं करता येईल. गरज पडली तर जवळच असल्याने आपण लगेच एकमेकांना बघू शकतो. त्यामुळे उगाच एकत्र राहण्याचा अट्टहास नको. ते दोघींनाही म्हणाले, तुम्ही बायका घरासाठी जगताना स्वतःला विसरता. तुमच्या आवडीनिवडी, छंद हे सगळं कुठेतरी हरवून जातं. आणि मग एका काळाने जेव्हा आयुष्यात तोचतोचपणा येतो तेव्हा साहजिकच चिडचिड सुरू होते. आम्हाला काय घरी आल्यावर तुमचे हसरे चेहरे बघितले की बरं वाटतं पण जेव्हा चिडचिड होते तेव्हा एकामागे एक सगळेच त्यात ओढले जातात. रुटीनमधून ब्रेक घेणं, स्वतःच्या आवडीनिवडी जपणं हेही तितकंच महत्वाचं असतं कारण त्यामुळे तुमचा दिवस चांगला जातो. आणि अर्थातच तुम्ही हे का विसरता की, You are someone's reason to smile.
छोटे छोटे प्रॉब्लेम असतात आयुष्यात पण आपण त्यांना मोठं करतो उगाचच आणि मग आपलं हसणंच हरवत जातं. एक गोष्ट नोटीस करा कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीला ही खळखळून हसताना बघून नकळतच आपल्याही चेहऱ्यावर हसू येतं. मग जवळच्या लोकांना आनंदी बघितल्यावर तर नक्कीच जास्त आनंद मिळेल न?? 
So all readers keep smiling, stay happy always. You never know who is getting his/her reason to smile😊😊. 

कसा वाटला हा Quote of the day नक्की सांगा. 
2020 येतंय मग काय काय संकल्प करायचे आहेत आणि त्यातले पूर्ण किती करायचे आहेत ते ठरवलं की नाही?? मग ठरवा. 
ब्लॉगबद्दल प्रतिक्रिया नक्की द्या थॅंक्यु ❤️❤️#गौरीहर्षल

Quote of the day 13

#Quote_of_the_day13

रिद्धी आणि सिद्धी दोघी जुळ्या बहिणी. स्वभाव सोडले तर दिसणं, वागणं, बोलणं सगळं तंतोतंत सारखं होतं दोघींचं. रिद्धी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून कुढत बसे तर सिद्धी मात्र अगदी उलट होती नाही पटलं तर स्पष्ट नकार देऊन आपला मुद्दा नीट पटवून देणार. नुकतंच दोघींचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. दोघींचे मार्ग तसे बारावी नंतरच वेगळे झाले होते. सिद्धीला कम्प्युटर मध्ये रस असल्याने तिने त्यात शिक्षण घेतलं तर रिद्धी होम सायन्स शिकली. कॉलेज तर पूर्ण झालं. आता पुढे शिकायचं की अजून काही प्लॅन आहे ह्यावर विचार करून ठेवा मग आपण बोलू अस त्यांचे बाबा सकाळी ऑफिसला जातानाच सांगून गेले होते. 
पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं अस सिद्धीच ठरलं होतं. रिद्धीला मात्र कळत नव्हतं काय करावं. शेवटी तुला सगळ्यात जास्त काम कुठल्या फिल्डमध्ये करायला आवडेल त्यावर विचार करून मग ठरव अस सिद्धीने सुचविल्यावर तिला आपल्याला dietician व्हायला आवडेल अस जाणवलं. मग त्यात अजून काय करता येईल. त्यावर सर्च करून बरीच माहिती तिने मिळवली. 
यथावकाश दोघींचे एडमिशन झाले त्या आपापल्या नवीन विश्वात रमू लागल्या. लहान लहान गोष्टी शेयर करायला येणारी रिद्धी हल्ली फारशी बोलत नाही हे सिद्धीला जाणवलं होत. मग तीच काहीही कारण काढून रिद्धीला बोलत करण्याचा प्रयत्न करू लागली. त्यातून तिला समजलं की तिच्या परफेक्ट असण्याचं कौतुक कॉलेजमध्ये एक दोन वेळा झालं. फार काही मोठी गोष्ट नव्हती पण तिच्या मैत्रिणी मात्र आता तिच्याशी हातचं राखून वागू लागल्या. प्रोजेक्ट वगैरे करताना त्या रिद्धी सोबत असायच्या पण जेव्हा बाहेर जाण्याचा प्लॅन ठरत असे त्या तिला कळू देत नसत. मग उडत उडत तिला कुठून तरी समजले की त्यांना तिचं साधं असणं आवडत नसे. रिद्धी जरी मॉडर्न असली तरी फार मॉडर्न कपडे घालणं तिला जमत नसे. बॉयफ्रेंड वगैरे तर लांबचीच गोष्ट. त्यामुळे सोबत बाहेर जाण्यासाठी तिच्या मैत्रिणी तिला टाळू लागल्या. आपण हुशार आहोत पण साधे राहतो म्हणून एकटे पडतोय हे रिद्धीला पचवताच येत नव्हते. काय करावे हेही तिला सुचत नव्हते. त्यामुळे ती गप्प गप्प राहू लागली होती. बास एवढंच सगळं ऐकून घेतल्यावर सिद्धी म्हणाली तस रिद्धीला वाटलं ती आपली चेष्टा करते आहे. पण सिद्धी पुढे म्हणाली अग वेडे तू जशी आहेस तशीच खूप चांगली आहेस. राहीली गोष्ट मॉडर्न होण्याची तर ते विचारात हवं कपड्यात नको. आणि तू सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घे एखादी गोष्ट जर आपल्या बाबतीत सतत सतत घडतेय म्हणजे ह्याचा अर्थ काय?? ह्याचा अर्थ तुला काहीतरी बदल घडवणं गरजेचे आहे. म्हणजे काय करायचं तर फार काही नाही. थोडंस स्वतःचा लूक चेंज कर,फ्रेश रंगाचे कपडे घाल, स्वतःला ग्रुम कर. थोडक्यात काय तर किंचित बदल कर. हो पण हे करताना कुणाला कॉपी नको करुस तुला जे रुचतं आवडत मुख्य म्हणजे कम्फर्टेबल वाटतं ते कर. लोकांना आवडण्यासाठी नको बदलू . तुझ्या मैत्रिणी आधीही तुला टाळत होत्या पण तुला आता ते कळतंय. ह्यातून एक मुख्य गोष्ट शिक ती म्हणजे स्वतःला रिस्पेक्ट दे. तू जर स्वतःला रिस्पेक्ट दिलास तर लोक तुला देतील नाहीतर हे सतत असच होईल. 

Don't feel bad if someone reject you.
People usually reject expensive things because they can't afford them.  आणि तुला तर माहितीच आहे आपण दोघी खूप expensive आहोत हो ना? सिद्धी अस विचारताच रिद्धी खळखळून हसली. 
पडद्याआड दोघींचा संवाद ऐकणाऱ्या आईबाबांना आपल्या संस्कारांची पुन्हा एकदा खात्री पटली. 

अस खूपदा होत कारण नसताना कुणी आपल्याला टाळतो, दुर्लक्ष करतो. समोरच्याकडे कदाचित कारणही असतील पण आपण मात्र दुखावले जातो. त्यातून हे नक्की शिकावं कारण आपण , आपले मूड ही आपली जबाबदारी आहे इतरांची नाही. आपण स्वतःला जितकी छान ट्रिटमेंट देऊ तशीच आपल्याला मिळणार. म्हणून सेल्फ रिस्पेक्ट ही गोष्ट लक्षात ठेवावी. 
बाकी ही सिरीज तुम्हाला कशी वाटतेय. आवडतेय, की कंटाळा येतो आहे वाचताना नवनवीन अनुभव पटतात का? तुमच्याकडेही असतील तर कळवा त्यांना कथेच्या रुपात वाचायला आवडेल का ते ही कळवा. 
हा एक छोटासा प्रयत्न आहे स्वतः सोबतच इतरांना काहीतरी छान पॉझिटिव्ह देण्याचा.
नक्की प्रतिक्रिया द्या. थॅंक्यु❤️❤️#गौरीहर्षल

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

Quote of the day 12

#Quote_of_the_day12

वैभव घरात मधला होता मोठा भाऊ होता आणि धाकटी बहीण. मोठा भाऊ पहिला म्हणून घरात प्रचंड लाडका तर बहीण एकुलती एक म्हणून. अशात वैभवकडे कधीतरी चुकून दुर्लक्ष होत असे. पण तो तसा समजूतदार होता. त्यामुळे ते आपल्या मनावर न घेता तो स्वतःच्या पायावर लवकर उभा राहिला. जिद्दीने शिक्षण ही पूर्ण केले. त्या उलट घरात इतर दोघांची अवस्था वेगळी होती. भाऊ अति लाडामुळे हट्टी बनला होता, एका नोकरीत फार काळ टिकत नसे. तर बहिणीला हुशार असूनही नटणे मुरडणे ह्यातून अभ्यासासाठी वेळ नव्हता. त्यामानाने वैभव लवकर सेटल झाल्याने घरीदारी सगळ्यांच्या तोंडी आता वैभव असे. त्याचे उदाहरण सतत इतरांना ऐकायला मिळत होते. जो मुलगा इतके दिवस कुणाला दिसतही नव्हता तोच आता प्रकाशझोतात होता. वैभव मात्र ह्या सगळ्याने हुरळून जाणाऱ्यातला नव्हता तो आपला स्वतःच्या विश्वात बिझी राहत असे. घरात पैसे देत असतानाच तो स्वतःसाठीही इन्व्हेस्टमेंट करत होता. काही दिवसांनी बहिणीचे लग्न झाले वैभवने स्वतःच्या सेविंगमधून मदत केली. वडिलांना त्याचा अभिमान वाटला पण त्यांनी बोलून दाखवल नाही. वैभवच्या तर अशा काही अपेक्षा नव्हत्याच त्यामुळे तो मदत करून बाजूला होई. भाऊ सुद्धा बऱ्यापैकी नोकरीत स्थिर झाला त्याचेही लग्न झाले. वैभवची बायको आल्यावर जबाबदारी आहे असं सांगत भाऊ कुटुंबासह वेगळा झाला आणि घरात लक्षही देणं बंद केलं. वैभव बायकोसोबत सगळं निभावत होता. पण आईवडिलांचा ओढा थोरल्या कडे जास्त होता. ते त्याच्याकडेच राहू लागले. खटकले तरी वैभवने फारसं मनावर घेतले नाही. तो आपल्या कुटुंबात खुश होता. अशातच त्याचे प्रमोशन झाले. आनंद साजरा करण्यासाठी त्याने सगळ्यांना आमंत्रण दिले. सगळे आले पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता कसातरी कार्यक्रम झाला आणि सगळे निघून गेले. त्या दिवशी त्याला प्रकर्षाने जे जाणवलं त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. पण त्याचवेळी त्याच्या हातावर हलकेच थोपटत त्याचा जिवलग मित्र त्याच्या जवळ बसला. तो वैभवकडे बघत म्हणाला, माणसं आपलीच आहेत ह्यात शंका नाही. पण परिस्थिती आपली नाही. तू पहिल्यांदा यशस्वी झालास तेंव्हाच मला हे जाणवलं होत पण मी तुझं तुला समजावं म्हणून काही बोललो नाही. जेंव्हा लोकांना आपल्या यशाने त्रास होतो तेंव्हा समजून जावं की ते यश खूप अनमोल आहे. त्यांना ते मिळवण शक्य नाही म्हणून त्यांना त्रास होतो आहे. आणि सोबतच आपला पाय खेचला जाणार ह्याच भानही असू द्यावं. माणसाला कुणी गेलं तर जेवढा त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास जवळच्या व्यक्तीच्या यशस्वी होण्याने होतो. मानवी स्वभाव आहे हा.अरे सुखात आनंदाने सहभागी होणाऱ्या लोकांना काय रडवतो रे तू अस मित्र म्हणाला तसा वैभव मनापासून हसला आणि सगळ्यामध्ये सहभागी झाला.
       आपण आपल्या मार्गावर जात राहावे लोकांना चूक कळली तर ठीक नाहीतर त्यांना गेट वेल सून म्हणत शुभेच्छा द्या आणि पुढे चला. 
Anyone that can pull you down is already below you.
कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. 
थॅंक्यु. #गौरीहर्षल

Quote of the day 11

#Quote_of_the_day11

काही लोकांना विज्ञानातले नियम खऱ्या आयुष्यात ही वापरायचे असतात. म्हणजे ह्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया हवी असते. त्यांना अस वाटतं की न्यूटनच्या नियमाचा वापर जसाच्या तसा झाला पाहिजे 😂 कोणता नियम तोच तो,
Every action has an equal and opposite reaction. 
पण प्रत्येक जण असच वागेल अस नसत न. काही लोक असतात शांतताप्रिय माझ्यासारखी😜😜. अस अजिबातच नाहीये पण तरीही जेंव्हा कुणीतरी आपल्याला राग यावा म्हणून माकडचाळे करत असतात तेंव्हा शांत बसून गंमत बघण्यात जी मज्जा असते ना ती दुसऱ्या कशात नाही. 
          तर असाच एक किस्सा राजवी चा. राजवी आपलं काम भलं आपण भले ह्या कॅटेगरी मधील. तिला फारसं कुणाच्या खाजगी गोष्टीत,  कामात लक्ष घालणं आवडत नसे. पण हाताची पाच बोटं जशी सारखी नसतात तसच एका ठिकाणी काम करणारी लोकही नसतात. राजवीच्या काही सहकारी होत्या ज्या नोकरी फक्त घरातून बाहेर पडणे ह्या एकाच हेतूने करत होत्या. त्यामुळे कामापेक्षा इतर भानगडीमध्ये जास्त लक्ष असणे साहजिकच होते. गॉसिप करणे मज्जा करणे आणि कधीतरी जमलं तर थोडस काम नाहीतर काम करणाऱ्या लोकांना त्रास देणे. अशा एका स्वघोषित ग्रुपची लीडर होती तनिशा. त्यात ती कंपनीच्या वरिष्ठांची नातेवाईक असल्याने तिचे उपद्व्याप त्यांच्या पर्यंत जात नसत. राजवी बदली होऊन आल्यापासून तनिशाच्या लिस्टमध्ये होती. तिने मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण राजवीने इंटरेस्ट दाखवला नाही. तिला स्वतःच्या जबाबदारीतून इतका वेळ मिळणार नाही असं सांगत राजवीने तनिशाच्या ट्रीपला नकार दिला. ह्यात खर तर अपमान वगैरे नव्हता पण तनिशाच्या मनाने तेच घेतलं. आता ती उठता बसता राजवीला त्रास देण्यासाठी प्रयत्न करू लागली. कधी तिचा डेस्क खराब कर, कधी अजून काही कर . तिला वाटत होते की हे कुणालाही कळणार नाही कारण राजवी लक्ष देत नव्हती. पण ह्या सिनियरच्या जीवावर तनिशाचे उद्योग सुरु होते नेमकं त्यांच्याच हे सगळं लक्षात आलं. त्यांनी काही ऍक्शन घेण्याआधी निरीक्षण करायचे ठरवले. तनिशाच्या तक्रारी उडत उडत त्यांच्याही कानावर आल्याचं होत्या. 
अशातच राजवीकडे एक महत्त्वाच्या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशन चे काम दिले गेले. ऐन वेळी तनिशाने अजून एकाची मदत घेत ते प्रेझेंटेशन राजवीच्या लॅपटॉप मधून डिलीट केले. राजवी प्रेझेंटेशन देण्यासाठी समोर आली तेंव्हा तिच्या हे लक्षात आले पण तिने प्रसंगावधान राखत पटकन स्वतःचा पेन ड्राईव्ह जोडून प्रेझेंटेशन पूर्ण केले. सगळ्यांनीच राजवीच्या कार्य तत्परतेचे खूप कौतुक केले. शेवटी फक्त ती आणि तनिशा कॉन्फरन्स रूममध्ये होत्या तिला वाटले की आता राजवी चिडेल पण राजवीने शांत हसून तेथून निघून जाणे पसंत केले. तनिशाला अर्थातच अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण आता तिच्यासाठी एक एक्शन वाट बघत होती सिनियरच्या केबिनमध्ये. असो तनिशाच्या बाबतीत जे झाले असेल ते त्याचा अंदाज आपण लावू शकतो. पण राजवीने ज्या पद्धतीने स्वतःला हाताळले तसे करणे गरजेचे असते काही ठिकाणी. प्रत्येक घटनेला आपल्या प्रतिक्रियांची गरज असतेच असे नाही. विशेषतः अशा ठिकाणी जिथे आपल्याला राग येईल. त्यामुळे कोणी कुठे कधी कस वागायचं हे ठरवावं. 
कारण,
How beautiful is to stay silent when someone expects you to be enraged. 
जगात सगळ्यात जास्त काही अवघड असेल तर ते म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे. पण ते अशक्य नक्कीच नसते.
कसा वाटला हा #Quote of the day नक्की कळवा. 
#गौरीहर्षल