गुरुवार, १३ जुलै, २०१७

व्यक्त होऊया

#व्यक्त होऊया
     व्यक्त होणं सगळ्यांत अवघड आहे आपल्याकडे.  मग ते बोलून,हसून,रडून, लिहून कसं का होईना पण मनातलं व्यक्त झालं पाहिजे. आपण कुठलीही भावना व्यक्त करण्याआधी नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी काय म्हणतील असा विचार करतो.आणि मग या सगळया पायऱ्या पार करून जेंव्हा ती भावना व्यक्त होते तोपर्यंत तिच्यातला जिवंतपणा निघून गेलेला असतो बऱ्याचदा.त्यामानाने पुढची पिढी दोन पावले पुढे आहे मनात असेल ते सांगून मोकळे होतात ते. पण आपण त्यांना दटावतो.
      खूप छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात आपल्याला. कधी काहीतरी आवडलेलं असतं मग ते कुणाला सांगायचं , कसं सांगायचं हा मोठ्ठा प्रश्न आपण घेऊन बसतो स्वतःशीच. खरंतर त्याची गरज नसते आणि तो प्रश्न आपल्याव्यतिरिक्त कुणालाच पडलेलाही नसतो. मग अशावेळी उगाच का स्वतःला थांबवायचं?? कुणीच नाही सापडलं सांगायला तर लिहून ठेवायचा तो अनुभव. पण आपल्याला भावलेली, आवडलेली प्रत्येक चांगली गोष्ट करून बघण्याचा नक्की प्रयत्न करायचा.
           ज्यांना खूप मोकळेपणाने व्यक्त होता येतं किंवा जमतं त्यांचं मला खूप कौतुक वाटतं. ते म्हणतात ना आयुष्यात शेवटी काही करायचं राहिलं आहे असं नको वाटायला. म्हणून तर व्यक्त व्हा, बोला, लिहा , वाचा, गा,जगा मनापासून, मोकळे व्हा. मस्त अनुभव येतो एकदा घेऊन तर पहा.
आज प्रत्येकाला एक तरी क्षण मनापासून व्यक्त होण्याचा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१४.७.२०१७

ब्रेक

#ब्रेक
ब्रेक सगळ्यांनाच हवा असतो आणि खरं तर गरजेचा असतो. निसर्गसुद्धा ब्रेक घेतच असतो की, सूर्य पावसाळ्यात अधूनमधून ब्रेक घेतो, चंद्राला तर दर १५ दिवसांनी सुट्टी मिळते. आपण मात्र कधी कधी नोकरी आणि बाकीचे व्याप यांमध्ये इतके गुंतून जातो की ब्रेक घ्यायचंच विसरतो.
मनाच्या बॅकग्राउंडला मेंदू सतत विचार करत असतो, त्याला तर ब्रेक हा शब्दच सापडत नाही.
ब्रेक तर घ्यायलाच हवा पण तो कसा घ्यायचा??? काम करत असताना, विचारात असताना कधी असं वाटलं की आपण खूप दमलो आहोत, तर हळूच काही क्षण स्वतःसोबत घालवायचे. त्या वेळेत स्वतःला जे आवडतं ते करायचं. गाणं ऐकायचं, काहीतरी वाचन करायचं , किंवा नुसतं डोळे मिटून शांत बसायचं पण चुकूनही फोन हातात नाही घ्यायचा. दिवसातला तो काही मिनिटांचा वेळ फक्त आणि फक्त मन , मेंदू आणि शरीराला ब्रेक देण्यासाठी वापरायचा. या वेळेत स्वतःला जाणीव करून द्यायची स्वतःसाठी स्पेशल असण्याची. थोडासा वेळ स्वतःला दिला तर जगात काही बिघडणार नाही फक्त ही वेळ प्रत्येकाला ठरवता आणि पाळता आली पाहिजे. मीही करणार आहे ट्राय तुमचं काय??
प्रत्येकाला आज हवाहवासा ब्रेक काही मिनिटं तरी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१३.७.२०१७

सोमवार, १० जुलै, २०१७

नात्यांचा रिचार्ज

नात्याचं_रिचार्ज
माणूस जन्माला येणार अशी चाहूल लागली की नाती त्याला चिकटतात. काही नाती रक्ताची, काही मनाची, काही स्वतः स्वीकारलेली तर काही आपसूकच येऊन गळ्यात पडलेली. या सगळ्या नात्यांच्या गुंत्यात काही नाती तरी नक्कीच असतात जी खूप महत्त्वाची असतात, स्पेशल असतात. अशा नात्यांना जपणं खूप गरजेचं असतं. व्यक्तिसापेक्ष ही नातीही वेगवेगळी असतात.
माणूस नात्यांकडून मिळणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुभवांमधून खूप काही शिकत असतो. शिकता शिकता घडत असतो. बरेवाईट अनुभव तर येतातच . पण आपण स्वतः कधी लक्ष देतो का की त्या त्या नात्याची नेमकी गरज काय आहे? उदाहरणार्थ एखाद्या नात्यात आधी खूप सामंजस्य होते पण जसजसे सहवास वाढला त्याची जागा गृहीत धरण्याने घेतली. एखादं नातं आधी खूप खोडकर होतं पण वयानुसार त्यात फक्त गंभीर गोष्टीच उगळल्या जात असतील.
खूप छोट्याश्या गरजा असतात नात्यांच्याही आणि माणसांच्याही.  त्या पूर्ण करण्यासाठी पैश्यांपेक्षा काळजीपूर्वक एकमेकांना नात्याला ओब्जार्व करण्याची गरज असते. हळूहळू राग व्यक्त करण्याऐवजी प्रेम व्यक्त करावे. आवर्जून ते नातं, ती व्यक्ती किती गरजेची आणि मुख्य म्हणजे हवीहवीशी आहे हे सांगावे. हा नियम आईमुलांपासून ते मित्रमैत्रिणी मध्येही लागू पडतो. आपण फक्त कुणाला हवेसे आहोत ही भावनाच व्यक्तीला आत्मविश्वास देते. हल्ली सतत जाणवणारे ताणतणाव माणसाला कुठेतरी आतून एकटं करत असतात. अशावेळी गरज असते ती एकमेकांना ओळखून नात्यांना एक नवा रिचार्ज देण्याची. हे रिचार्ज आपला एक आश्वासक स्पर्श, प्रेमळ नजर, दोन गोड शब्द आणि सोबत असण्याची खात्री देऊ शकतात. फक्त आपण वेळोवेळी आपल्या जवळच्या नात्यांना ते दिलं पाहिजे. 
नात्याचं रिचार्ज नात्यात बांधल्या गेलेल्या सगळ्यांनाच एक रिफ्रेशमेंट देतं. त्याचा खूप चांगला आणि लॉंग टर्म प्रभाव आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात टिकून राहतो.
प्रत्येकाला असंच एक रिफ्रेशिंग रिचार्ज आज मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
#११.७.२०१७

रविवार, ९ जुलै, २०१७

मुड्स

#सुप्रभात_स.न.वि.वि.
#मूड
सकाळी सकाळी मस्त सूर्यप्रकाश आहे आभाळही मोकळं आहे असं वातावरण असलं की किती छान वाटत राहतं न दिवसभर??? मूड बन जाता है अगदीच!!! आणि मग पुढचा सगळा दिवस एकदम झकास जाणार याची मनाला खात्री वाटते.
       या मुड्स वर आपलं आयुष्य किती अवलंबून असत ना? कुणाच्या तरी छानशा बोलण्यानेही आपला मूड एक लय पकडतो. ती लय मग पुढे हातात येणाऱ्या सगळ्या कामांवर आपला चांगला प्रभाव पाडत राहते.
     नकळतच होणाऱ्या कृतीने जर इतकं चांगलं होत असेल, तर जाणूनबुजून मूड का नाही सांभाळत आपण ?  खूप लांब जायची काही गरज नाही स्वतःपासूनच सुरुवात करायची. सकाळी उठल्यावर इतर कुणाला गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा स्वतःच स्वतःला म्हणायचं तेही एकदम प्रेमाने. हो आपण इतरांचे मूड सांभाळताना कसे प्रेमाने वागतो मग स्वतःशीही तसच वागायला हवं की नई? स्वतःच स्वतःला आवडतील रुचतील आणि विशेष म्हणजे ज्यामुळे आपलं शरीर, मन प्रसन्न राहील अशा गोष्टींचा आनंद घ्यायचा. अगदी मनापासून जर आपल्याला छानसे बदल घडवून आणायचे असतील तर एवढं तर करायलाच हवं ना?  मुड्स मुळे आपण नाही नाचायचं तर मुड्स ना नाचवायचं. यासाठी फक्त स्वतःवर प्रेम करत असतानाच स्वतःला थोडासा आदर देण्याची गरज असते. आयुष्यात चढउतार तर येतच असतात पण त्यामुळे आपण बऱ्याचदा स्वतःला हरवत असतो. आपले धावपळ करणारे मुड्स तेच तर आपल्याला सुचवत असतात, की बाबा रे तू आम्हाला सांभाळ नाहीतर आम्ही तुम्हाला सळो की पळो करू 😉😙
मग मी तर प्रयत्न करतेय स्वतः मुड्स बदलण्याचा तुम्ही???
#गौरीहर्षल
१०.७.२०१७

शनिवार, ८ जुलै, २०१७

गुरुपौर्णिमा

#गुरुपौर्णिमा
आज गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपोर्णिमा. आपण आईच्या गर्भात असल्यापासूनच शिकत असतो असे म्हटले जाते. त्या अर्थाने आई ही आपली पहिली गुरू. पुढे आयुष्यात शिक्षण, नोकरी, आवडीनिवडीचं क्षेत्र अशा अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे गुरू भेटतच असतात. ते आपलं आयुष्य घडवताना खूप मोलाची जबाबदारीही उचलतात. आपल्यापैकी बरेच जण आजच्या दिवशी ह्या आपल्या सगळ्या गुरूंची कदाचित आठवणही काढत असतील कदाचित कृतज्ञता ही व्यक्त करत असतील. पण आपण गुरुपौर्णिमा फक्त एक सण म्हणून साजरी तर करत नाही न हेही बघायला हवं. आपले आईवडील, गुरू हे जसे सदैव आपल्या चांगल्याचाच विचार करत असतात तसंच आपणही इतरांच्या बाबतीत करतो का?
    गुरुपौर्णिमा त्या दिवशी खऱ्या अर्थाने सफल होईल ज्या दिवशी आपण आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून चांगला गुण घेऊनही अहंकार बाळगणार नाही. आणि आपल्याकडे आधीपासूनच असणारं ज्ञान ज्यांना खूप गरज असते अशांपर्यंत कुठलाही गवगवा न करता पोचवू. तरच आपल्या गुरूंनी आपल्यावर केलेले संस्कार आपल्याला समजले असं म्हणता येईल.
तर या गुरुपौर्णिमेला एक छोटासा संकल्प करू.......प्रत्येकाला स्वतःहून मदत करण्याचा आणि प्रत्यक्ष कृतीतून आपल्या गुरूंना वंदन करण्याचा. ही कृती प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते बर का!! मीही प्रयत्न करणारच आहे तुम्हीही बघा जमतंय का.....
       आजच्या गुरुपौर्णिमेला प्रत्येकाला एक तरी क्षण चांगली कृती करण्याची संधी देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु 🙏🙏 शुभं भवतु!!!!
#गौरीहर्षल
९.७.२०१७

थँक यु

#थँक यु
सकाळी सकाळी येणाऱ्या सूर्याच्या किरणाने सगळी पृथ्वी नुसती न्हाऊन निघत नाही तर जणू काही प्रभावित होते. सूर्याचं आगमन सगळ्यांमध्ये चैतन्य आणि उत्साह भरतं.  आपल्या आयुष्यात अशीच अनेक माणसं येत असतात. त्यांचा प्रभाव आपलं आयुष्य घडवत असतो. आपले आईवडील, गुरू, मित्र , नातेवाईक, शेजारी सगळेच त्यांच्या परीने आणि पद्धतीने आपल्या जडणघडणीत सहभागी असतात. यापैकी कुणाचा प्रभाव आनंददायक असतो कुणाचा नसतो. पण दोनहीं प्रसंगात आपल्याला काही न काही शिकायला मिळतच. नकळतच आपण कुणाकडून एखादी गोष्ट कशी करावी हे शिकतो तर कुणी जाणूनबुजून कसं वागू नये हे स्वतःच्या कृतीतून शिकवत असतं. आपल्याला गरज असते ती सजग आणि स्वच्छ नजरेने सगळं बघण्याची.  फक्त माणसाचं नाही तर निसर्गही आपल्याला शिकवत असतो. निरपेक्ष वृत्तीने देत राहावं हे आपल्याला तो शिकवतो. प्राणीही न बोलता खूप काही शिकवत असतात. जमतं का पण आपल्याला सगळ्यांकडून सगळं घेणं??? नाहीच जमत सगळं घेणं पण त्यातलं थोडं जरी घेता आलं तरी पुरतं आयुष्यभर.
मग आता या विकएंड ला जरा आळस झटकून खऱ्याखुऱ्या प्रभावी गुरूंना शोधू ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य सुकर आणि सोप्प झालं आहे. शोधून काय करायचं तर फक्त छानसं स्माइल आणि २ शब्द थँक यु / धन्यवाद म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करू. एक अजून एक गोष्ट करता येईल ती म्हणजे त्या व्यक्तीचा एक चांगला गुण टिपून तो नक्की वापरण्याचा प्रयत्न करायचा. मी पण प्रयत्न करणार आहेच तुम्हीही बघा जमतंय का ??
प्रत्येकाला आज एक तरी क्षण प्रयत्नांना यश देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
८.७.२०१७

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

जाणीव

#जाणीव
सकाळी सकाळी लगबगीने सूर्य किरणांना पसरवत जाणीव करून देत असतो नवा दिवस उगवल्याची. नव्या दिवसासोबत नवी पहाट, नवी स्वप्न घेऊन जगा असंच तर सांगत नसतो ना? पण आपल्याला होते का खरंच जाणीव? आपलं आयुष्य रसरशीत आहे अशी. बऱ्याचदा उगाच आपण नको त्या दुःखांना कवटाळून समोर आलेले सुरेख क्षण वाया घालवतो.
जाणीव असायला हवी स्वतःच्या जिवंत असण्याची, चांगलं वागण्याची. फक्त रुटीन फॉलो करण्यापेक्षा त्यात एक उत्स्फूर्तता भरण्याची जाणीव . ती कशी समोर येणार काम, व्यक्ती आपल्या आवडीची असो व नसो आपल्याला आपलं काम इमानेइतबारे करायचं आहे. कुठलं काम ? छानसा प्रतिसाद देत संवाद सुरू करण्याचं. मनात कितीही कटुता असली तरी आपल्या आवडत्या / नावडत्या ठिकाणी ती येऊ न देण्याची जाणीव सतत ठेवावी.ही जाणीव खूप काही सोप्प करेल. तुमचा सदैव हसरा चेहरा लोकांना कोड्यात पाडत चांगलं वागायला भाग पाडेल. लगेच नाहीच होणार कुणाकडूनच ना आपल्याकडून ना समोरच्याकडून पण सुरुवात तर करून  बघावी. आपण सदैव ह्या जाणिवेत असलो की त्याचं सुरेख रिफ्लेक्शन आपल्या नजरेत येईल. आणि तुम्हाला माहित आहेच डोळे न बोलता ही खूप काही बोलतात. मग ठेवायची न जाणीव छान प्रतिसाद देत राहण्याची???
प्रत्येकाला आज एक तरी क्षण सुरेख साद प्रतिसाद असलेला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
७.७.२०१७