शुक्रवार, ७ जुलै, २०१७

जाणीव

#जाणीव
सकाळी सकाळी लगबगीने सूर्य किरणांना पसरवत जाणीव करून देत असतो नवा दिवस उगवल्याची. नव्या दिवसासोबत नवी पहाट, नवी स्वप्न घेऊन जगा असंच तर सांगत नसतो ना? पण आपल्याला होते का खरंच जाणीव? आपलं आयुष्य रसरशीत आहे अशी. बऱ्याचदा उगाच आपण नको त्या दुःखांना कवटाळून समोर आलेले सुरेख क्षण वाया घालवतो.
जाणीव असायला हवी स्वतःच्या जिवंत असण्याची, चांगलं वागण्याची. फक्त रुटीन फॉलो करण्यापेक्षा त्यात एक उत्स्फूर्तता भरण्याची जाणीव . ती कशी समोर येणार काम, व्यक्ती आपल्या आवडीची असो व नसो आपल्याला आपलं काम इमानेइतबारे करायचं आहे. कुठलं काम ? छानसा प्रतिसाद देत संवाद सुरू करण्याचं. मनात कितीही कटुता असली तरी आपल्या आवडत्या / नावडत्या ठिकाणी ती येऊ न देण्याची जाणीव सतत ठेवावी.ही जाणीव खूप काही सोप्प करेल. तुमचा सदैव हसरा चेहरा लोकांना कोड्यात पाडत चांगलं वागायला भाग पाडेल. लगेच नाहीच होणार कुणाकडूनच ना आपल्याकडून ना समोरच्याकडून पण सुरुवात तर करून  बघावी. आपण सदैव ह्या जाणिवेत असलो की त्याचं सुरेख रिफ्लेक्शन आपल्या नजरेत येईल. आणि तुम्हाला माहित आहेच डोळे न बोलता ही खूप काही बोलतात. मग ठेवायची न जाणीव छान प्रतिसाद देत राहण्याची???
प्रत्येकाला आज एक तरी क्षण सुरेख साद प्रतिसाद असलेला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
७.७.२०१७

गुरुवार, ६ जुलै, २०१७

प्रॉब्लेम

#प्रॉब्लेम
खूप काही बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं. पण बऱ्याचदा योग्य व्यक्तीच सापडत नसते. किंवा आपण जिला योग्य समजतो ती खरं तर फक्त गॉसिप करण्याचा विषय म्हणून आपल्याकडे बघत असते. अशावेळेस एक तर आपण अलिप्त होऊन जातो त्या गोष्टीपासून किंवा त्या व्यक्तीपासून. मनातल्या भावना मात्र तशाच राहतात. हळूहळू अशा भावनांचा ढिगारा साचतच राहतो. त्यांचा योग्य पद्धतीने निचरा करणं खूप गरजेचं असतं. ते करण्यासाठी खुप काही करावं लागतं नाही फक्त एकदा तटस्थ दृष्टीने स्वतःकडे आणि त्या त्रास देणाऱ्या प्रॉब्लेमकडे बघायचं. त्याची तीव्रता काय आहे, तो कशामुळे प्रॉब्लेम वाटतोय , खूप सारी एनर्जी खर्च करावी असा आहे का? लगेच नाही पण हळूहळू काही उत्तरं आपोआप सापडतील, काही शोधावी लागतील. सुरुवातीला मन दुःखाला कवटाळून बसण्याचा प्रयत्न करेल पण आपणच त्याला समजावून लाडिगोडी लावून दुसरीकडे वळवायचं. प्रॉब्लेम तर येतातच मुळी आपल्याला तावून सुलाखून तयार करण्यासाठी. गरज असते ती फक्त त्यांना ओळीने उभं करून स्वतःशी सावकाश वागत सोडवण्याची.
मीही प्रयत्नच करतेय तुम्हीही बघा ट्राय करून. बेस्ट लक
शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल
६.७.२०१७

देण्यातला आनंद

#देण्यातला_आनंद
#सुप्रभात
मस्त चाललंय ना सगळं? चालूच असणार पावसामुळे सगळं कसं छान टवटवीत दिसतंय. निसर्ग किती भरभरून देतो न आपल्याला. कधी कधी कमी जास्त होतं पण ती माणसाची चूक निसर्गाची नाही. तो त्याच देण्याचं काम अगदी आनंदाने सढळ हाताने करत राहतो.
देण्यातला आनंदच काही वेगळा असतो त्यातही निरपेक्ष, काही देतो आहोत ही भावना मनात न ठेवता दिलं तर त्यातुन एक वेगळंच बक्षीस मिळतं. हे बक्षीस आपल्या मनात रेंगाळत राहतं खूप वेळ आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्याला एक वेगळीच लकाकी देऊन जातं.
आता कुणी म्हणेल की मग सारख देतच रहावं का? पण मुळात देतच असतो की आपण सारख काहीतरी फक्त ते आपल्या लक्षात येत नाही. कधी कधी नकळत आपण हसतो अनोळखी माणसाकडे पाहून तेंव्हा आपण त्याला एक छान क्षण देतो. कधी सहजच कुणाला मदतीचा हात देतो अगदी बस, लोकल मध्ये चढताना जरी दिला तरी ती व्यक्ती मनोमन सुखावतेच की.
हल्लीच एक गोष्ट वाचली फेसबुक आणि वॉट्सअप्प वर त्यात लेखिका(माझ्या माहितीनुसार) सांगते की ती  मैत्रिणीला पिकअप करण्यासाठी जात असताना तिला रस्त्यावर राहणार कुटुंबातलं लहान मूल रस्त्यावर खेळताना रोज दिसत असतं. मनात असूनही त्यांना मदत काही तिच्याकडून होत नाही. पण तिच्यासमोर एक भंगार गोळा करणारी व्यक्ती मात्र स्वतः कफल्लक असूनही हातात असलेलं सफरचंद सहज त्या मुलाला देऊन हसत हसत निघून जाते. देण्याचा आनंद मिळवून.
तात्पर्य काय मंडळी, माणसाने आयुष्य जगण्यासाठी धडपड करत असताना असा छोटासा "देण्यातला आनंद" मिळवायला काय हरकत आहे. फार काही लागत नाही हो फक्त सुरुवात करायला हवी. ती सुरुवात आपण कुठूनही करु शकतो अगदी बायकोला सरप्राइज सकाळचा चहा देऊनही😝😝 . पटलं तर करून बघा खूप छान छान रिटर्न गिफ्ट्स मिळतील ज्यांची सर पैशाने विकत घेतलेल्या वस्तुंना कधीच येणार नाही.
प्रत्येकाला आज या सुरेख देवाण घेवणीतला आनंदाचा एक तरी क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु !!
#गौरीहर्षल
६.७.२०१७

मंगळवार, ४ जुलै, २०१७

मनाचे व्रत

#मनाचं व्रत
कधी कधी आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याचं अजिबातच दर्शन होत नाही. आपल्या मनावरही असंच विचारांचे ढग दाटून मळभ येते. अशा परिस्थितीत सगळंच बिनसल्यासारखं होतं. हे मळभ दूर करणे सर्वस्वी आपल्याच हातात असतं.  ते कसं? साध्या सोप्या पद्धतीने करता येतं ते म्हणजे विचारांचा , मनाचा उपवास.
मनाचा उपवास करायचा,कसा? जसं आपण उपवास करताना मनाला खाण्याच्या बाबतीत यावर घालतो तसंच वाईट  विचार मनात आले की मनाला बजावत राहायचं. 
खरं तर याला उपवास म्हणण्यापेक्षा व्रत म्हणता येईल.
आयुष्य अजून थोडंसं मधुर करण्याचं व्रत. कधीही कुठेही करता येईल असं. गरज आहे ती फक्त मनावरचं मळभ दूर करून दृष्टिकोन स्वछ राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची.
मलाही कुठे जमतंय अजून पण करतेय अडखळत प्रयत्न. जरासं अवघड आहे पण अशक्य नाही.  पटलं तर ट्राय करून बघा.
प्रत्येकाला आज एक तरी क्षण व्रतस्थ ,मानासिक समाधान देणारा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
#गौरीहर्षल
४.७.२०१७

सोमवार, ३ जुलै, २०१७

रंग

पहाटे उठून कधी आकाश बघितलं ? हळूहळू आगमन करणारा सूर्य आणि त्याच्यासाठी असंख्य रंगांच्या पायघड्या घालणारे ढग. मुक्तहस्ताने निसर्ग रंगांची उधळण करत असतो. नकळत जरी लक्ष वेधलं तरी मन प्रसन्न होतं.
        आपला दिवसच काय पूर्ण आयुष्यच असं रंगीबेरंगी असतं. रंग मनाचे, रंग माणसांचे, रंग स्वभावांचे रंगच रंग सगळीकडे. काही रंग आवडते तर काही नावडते. पण रंग हवेतच रंगांमुळे एक जिवंतपणा रसरशीतपणा असतो जगण्यात.
            आपणही भरू शकतो ना रंग?  भरतोच खरंतर कळत नकळत. स्वतःच्या आयुष्यातले रंग टिकवण्यासाठी आपली सतत धडपड सुरू असते. या सगळया गडबडीत कधी ना कधी दुसऱ्यांच्या रंगांना आपला धक्का लागतो लागणारच. पण मग काय करायचं ?थोडंसं थांबून मागे वळून पाहत त्या व्यक्तीला एक रंग द्यायचा आश्वासक असा नजरेतून, हसण्यातून ज्यामुळे तिचं नुकसान जरी भरून येणार नसलं तरी निदान तिला बळ मिळेल पुन्हा रंग भरण्याचं. बाकी सगळी चित्र आणि त्यातले रंग तो वर बसलेला आहे ना तो छान ठरवतच असतो. आपण फक्त आपला कुंचला घेऊन तयार राहायचं. योग्य वेळी योग्य रंग योग्य प्रमाणात उतरेल याची काळजी घेतली की झालं.
प्रत्येकाला आज एक तरी क्षण मनासारखा रंगवायला मिळुदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
गौरी हर्षल
३.७.२०१७

रविवार, २ जुलै, २०१७

चांगलं वागण्याचं काम

#चांगलं_वागण्याचं_काम
कधी कधी सूर्य आणि चंद्र एकाचवेळी आकाशात असतात. एकजण आपलं कार्य संपवून परतीच्या प्रवासात असतो , तर दुसरा आपलं कार्यस्थळ गाठण्यासाठी लगबगीने निघालेला असतो. माणसांचंही असंच होतं ना? काही माणसं आपल्या आयुष्यात एक छानसं काम आयुष्यभर करण्यासाठी येतात. मग ते छोटंसं काम का असेना. पण त्यांच्या क्षणभराच्या पाउलखुणाही आपल्याला सुरेख अनुभव देत राहतात. जशी चांगली माणसं येतात तशी वाईटही येतातच. वाईट माणसं आपल्याला कसं वागू नये हेच शिकवत असतात त्यांच्या कृतीतून. पण आपण दुःखात इतके मश्गुल होतो की ते लक्षातच येत नाही आपल्या. आता कुणी म्हणेल काय तत्वज्ञान आहे हे?? पण तसंच तर असतं नीट विचार केला की समजतं चांगलं वागणं हा जसा आपला गुण आहे तसं वाईट वागणं हा त्यांचा. मग ते त्यांचं काम जर इमानेइतबारे करत आहेत तर आपण का नाही करायचं. ज्याला त्याला कामाचा मोबदला ईश्वर देतोच की त्याचं टेन्शन नाही घ्यायचं.
आज दुःख आहे तर उद्या सुख येण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. आणि त्यासाठी चांगलं वागण्याचं काम करणं गरजेचं आहे. थोडंसं अवघड आहे पण ट्राय तर करून बघा.
प्रत्येकाला आज एक तरी छोटासा इच्छापूर्तीचा क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु.
#गौरी_हर्षल
२.७.२०१७

शनिवार, १ जुलै, २०१७

निवांत क्षण

रात्रीचा पडदा दूर सारत सूर्यदेव रोज नव्याने पृथ्वीवर येतात.
कधी कधी ढगांच्या आड लपत हळूच गायब होतात.  आयुष्यही असंच असतं आशेच्या ढगांवर नकळत पडणारी निराशेची सावली. आशा निराशेचा खेळ रोजचाच अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर आपण निराश होतो चिडचिड करतो.  मग त्या चिडचिडीने आपला आणि पर्यायाने आपल्या जवळच्या लोकांचा दिवस खराब होऊ शकतो. आता कुणी म्हणेल काम बिघडणं कुठे आपल्या हातात असतं? बरोबर आहे आपल्या हातात नसतंच काम बिघडणं पण बिघडलेल्या कामाला सुधारणं तर असतं. दोन सेकंद थांबून जरा श्वास घेऊन विचार केला तर उत्तरही सापडतच. गरज असते ती स्वतःला वेळ देण्याची आपण काही शर्यतीत नाही आहोत. आणि असलो तरी आयुष्याची शर्यत सगळ्यात मोठी असते. ती जिंकण्यासाठी आधी आपण तर टिकायला हवं. म्हणूनच चिडचिड होत असताना थोडंसं थांबून स्वतःला विचारायचं की इतकी धावपळ इतका त्रागा आत्ता या क्षणी करण्याची गरज आहे का? उत्तर स्वतःकडूनच मिळेल आणि योग्य मिळेल.
      आयुष्य भरभरून जगण्यासाठी फक्त थोडं निवांत विचार करण्याची गरज आहे बास. हे जर जमलं तर आपलं आणि आपल्या जवळच्या सगळ्यांचंच आयुष्य खूप बदलेल. अवघड असेल कदाचित पण अशक्य नाही. पटलं तर ट्राय करा.
प्रत्येकाला आज एक तरी निवांत असा विचारी क्षण लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
गौरी हर्षल
१.७.२०१७