गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

गंडांतर

गंडांतर 


वर्ष २०१८ चा जानेवारी महिना, उत्तरायण सुरू झालेले होते. 

१२ जानेवारी २०१८ ला माझ्या सासूबाईंचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. 


ही घटना आमच्यासाठी अक्षरशः प्रचंड अनपेक्षित होती. कारण त्या दिवशी( शुक्रवार ,१२ जानेवारी २०१८ ) संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आई अगदी चालत्या फिरत्या होत्या. 

माझाही दोन दिवस आधीच गाडी चालवताना छोटासा अपघात झाला होता आणि त्यामुळेच त्या दोन तीन दिवसात आमचं बऱ्याचदा फोनवर बोलणं झालं होतं. 

शेजारच्या सगळ्या मैत्रिणींसोबत बसून त्यांनी दुसऱ्या दिवशीची भोगीची भाजी निवडून ठेवली होती. रविवारी संक्रातीच्या दिवशीच हळदीकुंकू आवरून त्या सोमवारी सकाळी माझ्याकडे येण्यासाठी निघणार होत्या. तसं आमचं गुरुवारी फोनवर बोलणं झालं असल्याने आम्ही दोघेही निश्चिन्त होतो. 


पण अचानकच शुक्रवारी रात्री साडे आठ च्या सुमारास मला फोन आला आणि शेजारच्या ताईने फोनवर आधी आई सिरीयस असल्याचे सांगितले आणि मग पुन्हा दहा मिनिटांनी दुसऱ्यांदा फोन करून त्या आता ह्या जगात नाहीत असं सांगितलं. आधीतर मी त्यांना काहीही काय सांगता म्हणत उडवूनच लावले पण जे घडलं होतं ते खरं होतं. 


शेवटी स्वतःला सावरत इकडे तिकडे कळवत आम्ही खाजगी वाहनाने गावी जाण्यासाठी निघालो. 

कालपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी करू म्हणणारी व्यक्ती आज अचानक फक्त एक निर्जीव देह म्हणून समोर होती. माणसाच्या आयुष्यात कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते ह्याची प्रचिती आम्हाला तेंव्हा आली. जसं आपलं जन्माला येणं आपल्या हातात नसतं तसच आपलं मरणही आपल्या हातात नसतं. 

त्यांचे पुढील कार्य करण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबीय लासलगाव, जिल्हा -नाशिक  इथे एकत्र आलो होतो. 

बातमी कळल्यानंतर आम्ही अक्षरशः हाताला लागतील ते दोन तीन ड्रेस आणि नाशिकच्या थंडीचा विचार आल्याने एकेक स्वेटर एवढंच सामान घेऊन आलो होतो. आणि ती वेळही अशी होती की शिस्तीत बॅग वगैरे भरून निघावं असं काही डोक्यात आलं नाही. 


दहाव्या आणि तेराव्याच्या कार्यासाठी २१ जानेवारीला संध्याकाळी आम्ही सर्वजण नाशिकला मोठ्या दिरांकडे गेलो. 


दहाव्याचे कार्य घाटावर आटोपून आम्ही घरी परतलो होतो. 

दिरांना घराबाहेर जाता येत नसल्याने माझे मिस्टरच दिवसभर सगळ्या धावपळीत होते. त्यातच आलेल्या पाहुण्यांची सोय अजून एका जवळच्या नातेवाइकांकडे केली असल्याने त्यांना तिथेही लक्ष द्यावे लागत होते. 


दुसऱ्या दिवशी मात्र माझे मिस्टर जेवतानाही जरा जास्तच शांत होते. कार्य तसं व्यवस्थित पार पडलं होतं त्यामुळे आता कशाची काळजी आहे हे माझ्या लक्षात येत नव्हतं.


दुपारी एका कामासाठी बाहेर जात आहोत असं सांगून ते बाहेर पडले. मग थोड्या वेळाने मला त्यांचा फोन आला की तुझ्या फोनमध्ये माझ्या पॅनकार्ड, आधार कार्ड ची फोटोकॉपी असेल तर मला पाठव. माझ्याकडे नसल्याने मी त्यांना सांगितलं की तुमच्याच फोनमध्ये दोन्हीही फोटो आहेत पण उगाच हं हं करत त्यांनी फोन ठेवला. आता मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 


संध्याकाळी अगदी जेवणाच्या वेळेला ते आणि नणंदबाईंचे मिस्टर घरी आले. काही क्षणातच जेवणं न करताच ते दोघेही परत बाहेर जातो म्हणत निघाले. 

मला कळताच मी धावत जाऊन दोघानाही जिन्यात गाठलं आणि मग मला दिवसभर सुरू असलेल्या धावपळीच्या मागचं खरं कारण कळाल. 


आमच्या ज्या नातेवाइकांकडे जास्तीचे लोक थांबले होते. त्यांच्या शेजारच्या एका बाईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्या बाईंचे कितीतरी लाखांचे दागिने जे त्यांनी नवऱ्याला कळू न देता बँकेतून काढून आणले होते, ते एका चोराने पाळत ठेवून बँकेतून बाहेर पडल्यावर अर्थातच हिसकावून पळवले होते. त्या बाईंचे म्हणणं होतं की माझे मिस्टरच ते चोर आहेत आणि त्यांनीच ते दागिने पळवले आहेत. 

दुर्दैवाने आपल्याकडे पोलीस तक्रार करणारी स्त्री असली की काहीही विचारपूस न करता आधी पकडून नेण्यासाठी येतात. आमच्या केसमध्येही तेच झालं होतं आणि माझ्या मिस्टरांचं काही म्हणणं ऐकू न घेता त्यांना पोलीस ठाण्यात बसवून घेतले होते. 

ही घटना घडली होती १६ जानेवारीला आणि १६ जानेवारीला आम्ही सगळेजण लासलगाव इथे होतो. माझे मिस्टर कळकळीची विनंती करत सांगत होते की माझं फोन लोकेशन चेक करा, तुम्हाला लगेच कळेल मी कुठं होतो. मी अहमदनगर इथे एका रेप्युटेड बँकेत मॅनेजर आहे आणि मी स्वतः तिथल्या कित्येक पोलिसांना बँकेच्या सोयी उपलब्ध करून देतो. नाशिकमध्ये मी माझ्या दिवंगत आईच्या कार्यासाठी आलो आहे आणि ते ही बऱ्याच वर्षानंतर. ह्या बाईंना मी कधी बघितलंही नाही तर बाकी सगळं तर लांबच राहील. पण त्या हवालदाराला काय झालं होतं माहीत नाही तो काहीही ऐकण्यासाठी तयार नव्हता.


ज्या हवालदाराने त्यांना पोलीस ठाण्यात नेलं होतं काही वेळाने त्याची ड्युटी संपली, तो घरी गेला. मग पुढच्या व्यक्तीने काही वेळासाठी घरी जाऊन येण्याची परवानगी देत पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलवले होते.  नेमकं त्या वेळी मला हे सगळं कळलं होतं. आता हे माहीत असणारे घरात आम्ही फक्त पाच व्यक्ती होतो. मी, माझे मिस्टर, नणंदेचे मिस्टर, माझे चुलत सासरे आणि एक दीर. 

जे घडलं आहे ते कुणालाही कळू देऊ नकोस अस सांगत ते चौघे बाहेर पडले. 


तसं बघायला गेलं तर आमची काही चूक नसल्याने आम्हाला घाबरण्याचे काही कारणंच नव्हते, पण म्हणतात ना संकटं आली की सगळ्या दिशांनी येतात. आमचंही असंच काहीसं झालं होतं, आधीच ध्यानीमनी नसताना आईंच्या जाण्याचं दुःख त्यातच ही गोष्ट घडली होती. त्यातच मध्यमवर्गीय माणसाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं म्हटलं की ब्रह्मांडच आठवतं. इथे तर ती स्त्री आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो हवालदार अगदी ठामपणे आरोप करत होते. माझ्या मिस्टरांनीही मात्र तितक्याच ठामपणे स्वतःचं म्हणणं लावून धरलं होतं. 

पुढचा हवालदार  ड्युटीला  येईपर्यंत ते स्टेशनमध्ये वाट बघत बसणार होतो खरं तर बसावंच लागणार होतं. 


त्यातही आमचं दुर्दैवी नशीब काही आमची पाठ सोडायला तयार नव्हतं. ती चोरीची घटना जिथे घडली तिथलं सीसीटीव्ही फुटेज आलं होतं. आणि त्या फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर सेम तसेच कपडे होते जसे माझ्या मिस्टरांनी घातले होते. पण फरक एकच होता त्या व्यक्तीला दाढीमिशा होत्या आणि मिस्टरांचं मात्र 13 तारखेलाच मुंडन झालं होतं. ही आमच्यासाठी जमेची बाजू होती. 

 

संध्याकाळी सात वाजता हे लोक स्टेशनमध्ये गेले होते. मला मात्र अशा वेळी काही सुचत नव्हतं. आणि एका क्षणी मला ‘घोरकष्टोद्धारणस्तोत्र’आठवलं. आठवल्या मिनिटापासून मी स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. काहीही करून ह्या संकटातून आमची कुठल्याही आरोपशिवाय सुटका व्हावी एवढी एकच इच्छा माझ्या मनात होती. 


जवळपास रात्री साडे अकरा वाजता सगळेजण परत आले तोपर्यंत कुणीही फोन लावला तर उचलत नव्हतं. त्यामुळे स्टेशनमध्ये पुढे काय घडलं हे कळायला काही मार्ग नव्हता. तीन साडे तीन तासात मी कितीवेळा स्तोत्राचे पठण केले हेही माझ्या लक्षात नव्हते. 


मला असं करताना बघून घरातल्या इतरांना बरेच प्रश्न पडत  होते पण मी पठण सुरु करण्याआधीच सगळं झाल्यावर सांगते अस सांगितल्याने सगळे गप्प बसले. आणि बाकीची काम बघू लागले. 


मिस्टरांना रात्री दारात सुखरूप बघितल्यानंतर माझ्या जिवात जीव आला. मनापासून देवाचे आभार मानून मी पठण संपवले. 


जेवायला बसल्यानंतर त्यांनी आधी सगळ्यांना सकाळपासून जे जे घडले ते सांगितले. सगळ्यांना अजून एक धक्का बसला होता. मग पुढे ड्युटी बदलल्यावर काय झाले हे सांगायला सुरुवात केली. 


ड्युटी बदलल्यानंतर स्टेशनमध्ये दुसरे लोक आले होते. चार्ज घेतलेल्या हवालदारानेही आधीप्रमाणेच बसायला सांगितले होते. 


पण तेवढ्यात तिथे एक ओळखीचा चेहरा दिसला. ती व्यक्ती म्हणजे माझ्या मिस्टरांच्या गावातल्या फार जुन्या घराजवळचे शेजारी आणि वर्गमित्राचे थोरले बंधू होते. त्यांनी चेहरा बघताच मिस्टरांना ओळखले आणि विचारपूस केली. 


माझ्या सासूबाईंचे निधन झाल्याची बातमी त्यांच्याही कानावर आली असल्याने ह्या सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बघून त्यांना आश्चर्य वाटले होते. मग त्यांनी स्वतः पुढे होऊन केस बघितली आणि त्या हवालदाराला जरा दबाव देऊन विचारलं तर त्या बाईने काहीतरी देण्याचे कबूल केल्याने तो तिचं ऐकत होता. भरीस भर पडली ती त्या बाईंच्या नवऱ्याच्या येण्याने खरा प्रकार आमच्या नातेवाईकांकडून कळल्याने त्यांनी स्टेशनमध्ये धाव घेतली होती.  माझ्या मिस्टरांची माफी मागत त्यांनी मिस्टरांचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही हे लिहून दिले. 


आणि अशा रीतीने सकाळपासून सुरू झालेल्या गंडांतराची सांगता झाली. सगळी कागदपत्रे, मोबाईल ताब्यात घेऊन सगळेजण घरी परत आले. 


बऱ्याचदा काय होतं आपण खरे असतो, आपलं कर्म चांगलं असतं पण आपली वेळ चांगली नसते. अशावेळी गरज असते ती त्या शक्तीने आपल्याला फक्त पाठीशी असल्याची जाणीव करून देण्याची. आणि आमच्याबरोबर असंच काहीसं घडलं बाजू खरी असूनही वेळ वाईट असल्याने आमचं खरं बोलणंही खोट समजलं जात होतं. 

पण अचानकच चमत्कार घडावा असं सगळं जुळून आलं आणि त्या खोट्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. 


आम्ही दोघेही पहिल्यापासून एका गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो आणि ती म्हणजे देवाचं अस्तित्व, तो असतो सतत आपल्या आजूबाजूला , गरज असते ती फक्त त्याला मनापासून हाक मारण्याची. आणि आपली हाक नक्की ऐकली जाते. 


घोरकष्टोद्धारणस्तोस्त्राचा आम्हाला आलेला हा पहिला अनुभव. पण हा अनुभव आम्हाला बरच काही शिकवून गेला. 


वाचकांच्या माहितीसाठी घोरकष्टोद्धारणस्तोत्राची  संपूर्ण माहिती खाली देत आहे.


सार्थ घोरकष्टोद्धारणस्तोत्र

‘घोरकष्टोद्धारणस्तोत्र’ या नावामध्येच या स्तोत्राचे फलीत आहे. ‘घोर+कष्ट+उद्धार’ अशी याची फोड केल्यास, असे लक्षात येते की मनुष्य जन्म हाच मुळी, पाप आणि पुण्य याच्या संमिश्रणातून साकार होतो. अशा ‘मनुष्य’ जन्माला आल्यानंतर. या ‘जन्म आणि मृत्यू’ या चक्रात अखंडपणे फिरताना होणार्‍या ‘घोर’ कष्टाची जाणीव झाल्यामूळे आणि यातून सुटण्याची जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामूळे होणारी जीवाची ‘तडफड’ पाहून अतिशय करूणा आल्यामूळे स्वतः प. पू. श्री सदगुरु भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप प. प. श्री वासूदेवानंद सरस्वती, श्री टेंब्येस्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे.


श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।

भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥

त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।

त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥

पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।

त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥

कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥

धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।

भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥

॥श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥

॥प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥

श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम्


।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।


या दृष्टीने पाहू गेल्यास या स्तोत्राचे फलीत अगोदर पाहू यात.


धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं |

सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं

भावासक्तिंचाखिलानन्दमूर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||५||


श्रीगुरूमुखातून मिळालेल्या या स्तोत्राच्या पठणाने सद-धर्माविषयी प्रेम, सु-मति (सद्-बुद्धी), भक्ति, सत्-संगती याची प्राप्ति होते. त्यामूळे याच देहात भुक्तिं म्हणजेच सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पुर्तता झाल्यामूळे, अंतिमतः ‘मुक्तिं’ या चतुर्थ पुरुषार्थाचा लाभ होतो. म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची पुर्तता होऊन “भाव आसक्तिं च आखिल आनंद मूर्ते” रुपी, श्रीदत्तात्रेय-आनंद स्वरुपाची, म्हणजेच ‘भक्ति’ या पंचम पुरुषार्थाची निश्चितपणे प्राप्ती होते.


आता थोडक्यात अर्थ पाहू,


श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव |

श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव |

भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||


हे प. पू. प. प. श्रीपाद श्रीवल्लभा, देवाधीदेवा, ‘मी’ आपणास शरण आलो आहे. हा माझा भाव लक्षात (ग्राह्य मानून) घेऊन, आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.


त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं |

त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम |

त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||


हे प्रभो, विश्वमूर्ते, माझे माता-पिता-बांधव-त्राता आपणच आहात. आपणच सर्वाचे ‘योग-क्षेम’ पहाता. माझे सर्वस्व आपणच आहात. म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररुपी-भवसागररुपी घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो.


पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम |

भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्व दैन्यम |

त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||


आपण आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, अशा पापयुक्त त्रिविधतापातून माझी सुटका करावी. माझ्या शारिरीक-मानसिक व्याधी, माझे दैन्य, भीति इ. क्लेश दूर करावेत आणि या घोर-कलीकाळापासून या घोरसंकटातून माझा उद्धार करावा. हे श्री दत्तात्रेया, आपणास माझा नमस्कार असो.


नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता |

त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता |

कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||


हे श्री अत्रिनंदना, आपणाशिवाय मला अन्य कोणी समर्थ ‘त्राता’ नाही. आपणासम दानशूर ‘दाता’ ही नाही. आपणासम भरण-पोषण करणारा ‘भर्ता’ ही नाही. हे आपण लक्षात घेऊन, हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणार्‍या देवाधिदेवा, आपण माझा या ‘घोर’ संकटातून, माझ्यावर ‘पुर्ण-अनुग्रह’ करून उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.


धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् ।

सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।

भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते ।

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५॥


श्लोकपंचकमेतधो लोक मंगलवर्धनम् ।

प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥


“धर्मे प्रीतीम सन्मतिं” सर्व प्रकारच्या कष्टातून, हे प्रभो, तू मला सोडव. त्या सगळ्यातून का सोडव, तर मला “धर्मा बद्दल प्रीती, सन्मती, विवेकपूर्ण चांगली बुद्धी (वरील कष्ट दूर झाल्या नंतर) उत्पन्न होण्यास मदत होईल आणि  तुझ्याबद्दलचा (पूज्य) भाव प्राप्त होईल. म्हणून मला वर दिलेल्या सर्व आपत्तीतून सोडव. पहिल्या ४ श्लोकांमध्ये व्यावहारिक गोष्टी आहेत, पण खरे इंगित म्हणजे व्यावहारिक कष्टातून सुटका झाल्याशिवाय सर्वसामान्य माणूस परमार्थात नीट लक्ष घालू शकणार नाही.


श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम |

प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत || ६ ||


अशा प्रकारे या पाच श्लोकाचे ‘नित्य’ पठण करणार्‍या कर्त्याचे, सर्वार्थाने ‘मंगल’ होते. असा अनन्य भक्त, प्रभु श्री दत्तात्रेयाना अतिप्रिय होतो.


इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं 

घोरकष्टोद्धरण स्तोत्र सम्पूर्णम् ||


|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिंगबरा ||

#स्वतःला शोधताना

#गौरीहर्षल




बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

ती , तो आणि माईंड रिडींग

ती , तो आणि माईंड रिडींग 

ती (एक्साईट होऊन) - " लोकांच्या मनात काय सुरू आहे हे कळलं तर काय मज्जा येईल न? "

तो (सुस्कारा सोडत नकारार्थी मान हालवत) - "सगळ्यात वाईट फॅन्टसी आहे ही तुझी." 

ती (अजून स्वप्नाळू स्वरात) - " का? विचार करून बघ की जरा न बोलता, न सांगता प्रत्येकाला काय हवंय ते कळेल. किती तरी इच्छा पूर्ण करता येतील." 

तो (कसं होणार हिचं अशा अर्थाने तिच्याकडे बघत) - "स्वप्नांच्या राज्यातून जमिनीवर या मॅडम. ह्या सगळ्यांच्या जोडीने अजून बरंच काही घडेल ते तुमच्या अजून लक्षात आलं नाहीये." 

आता मात्र ह्याच सगळं आधी ऐकून मगच आपण बोलू असं ठरवून ती छानपैकी टेबलावर दोन्ही कोपरे टेकवून स्वतःच्या दोन्ही हाताच्या मधोमध स्वतःचा चेहरा धरत त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यातले भाव ओळखून त्यानेही हातातला फोन बाजूला ठेवला. 
आणि सावरून बसत तो बोलू लागला. 
तो - "म्हणजे बघ हे तुझं गुडी गुडी कल्पना वगैरे ठीक आहे, पण जर खरच लोकांच्या मनात कुठल्या क्षणी काय विचार सुरू आहे हे कळू लागलं तर बरीच नाती जुळायच्या आधीच तुटून जातील. कारण बऱ्याच वेळेला माणूस मनात विचार वेगळाच करत असतो आणि बोलत वेगळंच असतो. उदाहरण द्यायचंच झालं तर बघ हं , एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मदत मागितली. मदत मागणारा सध्या फक्त विवंचनेत आहे म्हणून त्याच्या डोक्यात तेच सुरू आहे. पण ज्याला मदत मागितली आहे त्याला जर ती करायची नसेल तर? त्याच्या मनात ह्याला कसं टाळू, काय कारण देऊ असे विविध प्रकारचे विचार आले आणि ते समोरच्याला ऐकू आले तर तो किती दुखावला जाईल? 
बरं हे झालं अडचणीच्या वेळेचं."

"इतर नॉर्मल वेळी आपल्या आजूबाजूला आपण किंवा परिस्थितीने निवडलेली बरीच माणसं असतात. ही सगळी माणसंच काय आपण स्वतःसुद्धा जनरली आपल्या चेहऱ्यावर एक मुखवटा ओढून वावरत असतो. आपण मनातून कुणाबद्दल ,कशाबद्दल खरोखरच कसा विचार करतो हे फक्त आणि फक्त आपल्याला माहीत असतं. 
मग आता तूच सांग समजा तू जिला किंवा ज्याला तुझा बेस्टफ्रेंड समजतेस ती व्यक्ती मनातून तुला जवळचं समजतच नाही हे कळलं तर तुला काय वाटेल?"

आता मात्र ती विचारात पडली. 
अरेच्चा खरंय की हे. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ते हेच असेल का? माणसाचे खरं रूप हळूहळू उलगडण्यात जे थ्रिल आहे ते मनातलं जाणून घेण्यात नाही. माणसं कधी कधी अचानक जे अनप्रेडिक्टेबल वागतात त्यामुळे मिळणारे अनपेक्षित धक्के कधी आनंद देतात तर कधी दुःख आणि ह्या सगळ्यावर तर आयुष्य सुरू राहतं. 

" हं ,बरोबर आहे तुझं, अनपेक्षित गोष्टी जास्त चांगला अनुभव देतात. त्या अनुभवातून तर माणूस घडतो. " 

तुम्हाला काय वाटतं? माणसांना कळायला हवं का एकमेकांच्या मनातलं? कळलं तर काय होईल नाती अजून घट्ट होतील की विखरून जातील? 

#असंच_सुचलेलं
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

शनिवार, १७ जुलै, २०२१

तो , ती आणि अपेक्षा

#तो_ती_आणि_अपेक्षा
"इथे प्रत्येक जण अपेक्षा कुणाकडूनही ठेवू नका हा सल्ला अगदी स्वतः तस वागत असल्याच्या थाटात देतंय." तो जरा वैतागतच म्हणाला. 
"मग?" , तिने एक भुवई उंचावत विचारलं. 
त्यावर अजूनच वैतागत तो म्हणाला, "मग काय अग? अशा सगळ्या महान लोकांपैकी कुणीच अपेक्षा कशा ठेवू नयेत ह्याबद्दल बोलतच नाही. म्हणजे मी काय म्हणतो, एक स्टेप बाय स्टेप गाईड द्या न आणून मला ज्यामध्ये योग्य पद्धतीने इतरांकडून अपेक्षा कशा ठेवू नयेत हे लिहिलेलं असेल. आणि ते मी आयुष्यभर फॉलो करू शकेन." त्याच्या ह्या बोलण्यावर तीही विचारात पडली. 

बरोबरच बोलला न तो? आपण सगळेच जण कुणा ना कुणाकडून कसली तरी अपेक्षा ठेवतच असतो. कधी ती मोकळेपणाने व्यक्त करतो तर कधी मनातल्या मनात ठेवतो.
 
खरंच जमतं का हो अपेक्षा न ठेवता कृती करत राहणं?

मला विचाराल तर नाहीच जमत.आणि का जमाव कारण बऱ्याच वेळेला समोरच्याने फक्त मोजक्या शब्दांत जरी आपण केलेल्या कृतीची दखल घेतली तरी आपल्याला पुन्हा झोकून देऊन काम करण्यासाठी उत्साह वाटतो. 
जर प्रत्येकजण कुठलीही अपेक्षा न ठेवता समोर आलेलं काम करत गेला तर लोकांमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक अशा कुठल्याच भावनेची देवाणघेवाणच होणार नाही. करतोय म्हणून करतोय असंच सगळं होईल. आणि त्यामुळे ना करणाऱ्याला समाधान मिळेल ना ज्याच्यासाठी काही केलं जात आहे त्या जीवाला त्याचा उपयोग होईल. 
No vibes at all. 
 आपण आणि आपलं हे जग देवाणघेवाण ह्या तत्वावर चालतं मग ते व्यावसायिक आयुष्यात असुदे किंवा वैयक्तिक पातळीवर. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कृतीमागे त्या त्या व्यक्तीचा काही तरी हेतू असतो. कधी चांगला कधी वाईट. जर हा हेतूच उरला नाही तर? 
मी अस अजिबात म्हणत नाही की इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा, सुखाचा बळी वगैरे द्या. अहं ते अजिबातच करू नका. कारण सगळ्यात आधी जर कुणाच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर त्या आपल्या असणार आहेत. ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो त्या अपेक्षा पूर्ण करा. बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहात. स्वतःच हित ओळखून तुम्हाला सगळ्यांना वागता येत. आणि नेहमी लक्षात ठेवावे, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला सगळं आयुष्य काढावं लागणार आहे, ती पहिली व्यक्ती आपण स्वतः आहोत. 
तर अगदी सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस अपेक्षांच्या चपला घालूनच चालत असतो. 
कधी ती अपेक्षा फक्त सॉरी, थॅंक्यु, लव यु, मिस यु अशा छोट्या छोट्या गोष्टींपुरती मर्यादित असते तर कधी ती यश, पैसा, प्रसिद्धी, स्टेटस अशा मोठ्या गोष्टींबाबत असते. मोठ्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी कष्टही तेवढेच घ्यावे लागतात आणि ते घेतले गेलेच पाहिजेत तिथे दुमत नाही. 
पण छोट्या छोट्या अपेक्षांचं काय? तिथे तर काही फार कष्ट करण्याची गरज नसते. मग त्या पूर्ण का होत नाहीत? कारण आपण मोकळेपणाने दाद देत नाही. 
मग तुम्ही म्हणाल सगळ्यांना दाद देत सुटायचं का? तर नाही जी गोष्ट, व्यक्ती तुम्हाला मनापासून भावतेय , आवडतंय , तुमच्या आयुष्यात असे सुखद क्षण पुन्हा पुन्हा यावे अशी तुमची इच्छा आहे तिथे मोकळेपणाने दाद द्या, व्यक्त व्हा. समोरच्याने तुमच्यासाठी ज्या अर्थी इतके कष्ट घेतले त्या अर्थी you mean something to him or her बरोबर न? मग ती व्यक्ती कुणीही असुदे, घरातले जवळचे, मित्रमंडळी, सहकारी, ओळखीचे लोक त्याच्यापर्यंत तुम्हाला छान वाटलं हे पोहोचूदे. त्यांच कौतुक  करून एक अपेक्षा तर पूर्ण होईलच न. कोण जाणे कुणीतरी हे सगळं करत असताना तुम्हाला नोटीस करत असेल आणि अनपेक्षितपणे कुणीतरी तुमचीही कुठलीतरी अपेक्षा न सांगता पूर्ण करेल. शेवटी अनपेक्षित गोष्टींमुळे जो आनंद मिळतो तो शब्दात सांगण्यासारखा नसतो बरोबर ना? 
जो आपल्यासाठी काही तरी करतो आपल्याला त्याच्यासाठी काही तरी करायचं आहे. आणि मला नाही वाटत की हे खूप अवघड आहे. 
वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधले आपले लोक कोण आहेत हे लक्षात आलेलं असत. त्यानंतर फक्त आणि फक्त अशा लोकांना जपण्याचं काम करावं लागतं. कारण ही ती लोकं असतात ज्यांनी आपल्या वाईट काळात आपली साथ दिलेली असते. आणि उरलेले त्यांच्याकडून अपेक्षा करणं आपल्या मन आणि मेंदू ह्या दोघांनी कधीच थांबवलेलं असतं. 
ही प्रोसेस आपोआपच घडत राहते जसे फोनमध्ये बॅकग्राऊंडला एप्स अपडेट होत असतात. 
अचानकच कधीतरी आपल्याला लक्षात येतं की आपल्याला अशा साथ सोडून गेलेल्या लोकांच्या वागण्याने काही फरकच पडत नाहीये. त्यांची कुठलीच गोष्ट आपल्या मनात विचार निर्माण करत नाही. आणि तो क्षण म्हणजे एक भारी मोमेंट असतो. 
पूर्ण अपेक्षाविरहीत जगण्यासाठी आपण काही संत लोक नाही,आपण साधे सरळ संसारी लोक आहोत. सो ते गाईड वगैरे काही शोधायच्या भानगडीत पडू नका. 
अपेक्षा आपोआपच निर्माण होतात होऊद्या फक्त त्या इतरांकडूनच पूर्ण व्हाव्यात हा अट्टहास सोडत शक्य तिथे स्वतःच स्वतःला खुश करण्यासाठी प्रयत्न करा. अवघड आहे पण अशक्य नाही. 
हळूहळू का होईना आयुष्याच्या सगळ्या चांगल्या वाईट लाटांवर स्वार होऊन जगण्याची मजा घ्यायला शिकतोच आपण. तोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आपल्या जवळच्या लोकांसोबत वाटून घेत वाढवा.
 मलाही कुठे जमतंय हे सगळं मीही शिकतेय. सगळेच शिकूया. 
ता.क. माझी लाईक आणि कमेंट्स ची अपेक्षा पूर्ण करता येते का ते बघा🤣🤣
१७.७.२०२१
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

मंगळवार, २२ जून, २०२१

खजिना

#खजिना 
नुकताच लॉकडाउन संपला होता त्यामुळे आज बाहेर पडण्याची हिम्मत करत ती घराजवळच असलेल्या छोट्याशा मंदिराच्या आवारात जाऊन बसली. कामाचा दिवस असल्याने मंदिरात कुणीच नव्हतं. सकाळीच पूजा वगैरे करून पुजारीही निघून गेले होते. शांत वातावरणाचा अनुभव घेत ती बाकड्यावर टेकली. अधूनमधून एखादी व्यक्ती येता जाता थांबून नमस्कार करत निघत होती. लोकांचं निरीक्षण करत तीही आपल्या विचारात रमली होती. 
लॉकडाउन मुळे तिच्या परिस्थितीत तसा काही फरक पडला नव्हता. इतर स्त्रियांसारखीच तिचीही घरगुती काम वाढली होती बास. तिची तशी काही तक्रारही नव्हती त्याबद्दल कारण जे वाट्याला आलं आहे ते स्वीकारणं हा तिनं स्वतःच्या आयुष्याचा भागच केला होता. 
मंदिरात शांतपणे बसल्याने तिला आज जरा बरं वाटलं. 
तितक्यात एक चिरपरिचित सुगंध तिच्या आसपास दरवळला. त्याची जाणीव होताच तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. पण आज तो सुगंध लगेच हवेत विरला नाही, जणू तिची विचारपूस करत असल्यासारखा तिच्या सभोवती तो वावरत होता. त्याच्या अस्तित्वाने तिला अगदी भरून आल्यासारखं झालं. थकलेल्या त्या जीवाला कुणीतरी काळजीपोटी विचारावं, दखल घ्यावी एवढीच तिची अपेक्षा होती आयुष्याकडून आणि ती अपेक्षा इथं आलं की पूर्ण व्हायची. कधीही न अनुभवलेली आईबापाची माया तिला त्या सुगंधाच्या दरवळल्याने जाणवायची. तीही तो अनुभव भरभरून श्वासात साठवून घेत राहायची. तिच्यातली लहान मुलगी मनातल्या मनात बागडत खुश व्हायची. कारण तिच्यासाठी त्याने दिलेली अस्तित्वाची प्रचिती म्हणजे तिचे लाड पुरवणेच होतं. 
मंदिरातून घरी परतल्यावर मात्र घरच्यांचं ठरलेलं वाक्य तिला ऐकू यायचं, देवळातुन काय खजिना मिळल्यासारखी खुश होऊन येते काय माहीत? त्या वाक्यावर हलकेच हसत ती आपल्या रोजच्या आयुष्याला तोंड द्यायला सिद्ध होत असे. 
मनात मात्र त्या सुगंधाचा दरवळ तिच्यामधल्या लहान मुलीला गुदगुल्या करून हसवत असायचा. आता असा हा अनुभव सांगून थोडीच कुणाला कळणार होता. म्हणून तर ती तिचा खजिना शोधायला आवर्जून जायची. 
तुम्हाला समजला का हो तिचा खजिना? 😊

#treasures_inside_you
#स्वतःमध्ये_लपलेला_खजिना 
#अनुभवाच्या_पोतडीतून 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 

फोटो सौजन्य - गुगल

गुरुवार, १० जून, २०२१

मातृत्वाचा माज कशासाठी?

आई होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. पण फक्त मूल जन्माला घातलं म्हणूनच आई होता येतं का? मान्य आहे की नैसर्गिकरित्या फक्त स्त्रीच हे अनुभवू शकते पण त्याचा माज करणं कितपत योग्य आहे? आज आजूबाजूला अशी कित्येक उदाहरणं सापडतील जे मूल होण्यासाठी तडफडत आहेत, वाट्टेल ते प्रयत्न करत आहेत मग अशा वेळी एखाद्याला ह्यातलं काही न करता मूल होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्या व्यक्तीला इतरांचं मन दुखवण्याचा हक्क मिळतो का? 
दुर्दैवाने अजूनही आपल्याकडे मूल होणं हे अनुभवण्यापेक्षा स्टेटस म्हणून मिरवण्यातच लोकांना धन्यता वाटते. अशा मुलांवर काय संस्कार होतात ते काळानुसार दिसतच. 
ज्यांनी मूल होण्याच्या मार्गावर खूप काही गमावलं आहे ज्यात न जन्माला आलेले गर्भ, स्वतःची, जोडीदाराची मनस्थिती त्यांना स्वतःच मूल हातात आल्यावरही जर तुम्हाला काय कळणार किती त्रास होतो असे ऐकवले तर आपलीच मनोवृत्ती उघडी पडते. 
आपल्याला मिळालं आहे ते उत्तमरीत्या सांभाळून दाखवावं टोमणे मारू पब्लिकने. तुम्हाला योग्य वयात मुलं झाली म्हणजे तुम्ही काही थोर कार्य केलेलं नाहीये. आणि ज्यांना होत नाहीत त्यांचं काही चुकलेल नाहीये. 
ह्याला नशीब म्हणतात जी गोष्ट माणसाच्या हातात नसते. 
आणि जे दळभद्री आईवडील आपल्या ह्या असल्या नतद्रष्ट कार्ट्याना डोक्यावर बसवून इतरांना हिणवतात त्यांनीही लक्षात घ्याव , जब उसकी लाठी पडती है ना तो आवाज नहीं आती। 

लिहिण्याचा मुद्दा हा की एका मॅडमने मला ऐकवलं (तसं मी हे बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं आधीही )की, "तुला काय कळणार ग मिसकॅरेजच (गर्भपात) दुःख" त्याक्षणी तरी मला दया आली तिची. 
मी काय सोसलं हे मी शक्यतो सांगत नाही पण कधी कधी वाटत हॉस्पिटलच्या फाईल्सची थप्पी अशा लोकांच्या तोंडावर फेकून मारावी.  असो अशा जखमा भरू नयेत ह्याची काळजी घेणारे दुर्दैवाने जवळचेच असतात.

शेवटी एकच सांगेन , वाईट वेळ सगळ्यांचीच येते कुणाची लवकर कुणाची उशिरा. ती किती वाईट असावी हे आपलं कर्म ठरवतं सो watch your own words, actions while hurting others. 
बाकी ज्याचा त्याचा प्रश्न. 
गौरीहर्षल 

रविवार, २५ एप्रिल, २०२१

जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल 2021

 Harry Potter हा माझ्यासाठी प्रचंड जिव्हाळ्याचा विषय❤️❤️❤️ ह्या पुस्तकांनी मला ते दिलं आहे, देत आहेत जे कुठूनही मिळालं नाही. 

आयुष्यातल्या सगळ्या गाळलेल्या जागा ह्या पुस्तकांनी, त्यातील पात्रांनी भरून काढल्या. 

एकटेपणा ही सुखद असू शकतो हे ह्या पुस्तकांनी शिकवलं. 

स्वतःच  पुस्तक लिहिण्याची प्रेरणाही हेच. 

मुख्य शिकलेली गोष्ट ही की इच्छाशक्ती आणि  स्वतःवर विश्वास असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीत तग धरुन राहू शकतो. आणि फक्त तग धरूनच नाही तर उत्तम पद्धतीने स्वतःला घडवू शकतो. 


आयुष्यात कुणीही नसेल तरी आणि भरपूर जवळचे असतील तरी सर्वात जास्त प्रामाणिक दोस्त म्हणजे पुस्तकं❤️❤️त्यांचा हात कधीच सोडू नये. 


आज माझ्याकडे जवळपास 100 + पुस्तकं आहेत. आणि  पुस्तक विकत घेणे ही एकमेव अशी गोष्ट आहे जी करताना मी दोनदा विचार करत नाही. 😊😊


माणसं अनुभव देतात पण पुस्तकं त्या अनुभवातून काय घ्यायचं ते शिकवतात. निसर्ग, प्राणी आणि पुस्तकं हे सगळ्यात उत्तम गुरू आहेत. न बोलता बरंच काही शिकवण्याची कला फक्त त्यांनाच अवगत आहे अस म्हटल तरी चालेल. 


तर पुस्तकं वाचा,उत्तम पुस्तकं वाचा, वाचल्याने आयुष्य समृद्ध होतं. लिहायचाही प्रयत्न करा. लिहिण्याने मनाचा भार हलका होतो. 

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा❤️❤️✍️✍️

#गौरीहर्षल #स्वतःला_शोधताना

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

ʙᴇ ᴜɴɪǫᴜᴇ - वेगळेपण जपताना

ʙᴇ ᴜɴɪǫᴜᴇ - वेगळेपण जपताना

असं म्हणतात की खूप उन्हाळे-पावसाळे पाहून जे शहाणपण येत नाही ते काही अनुभव शिकवून जातात. 
आणि अनुभवातून जे आपण शिकतो ते आपल्या कायम लक्षात राहतं. 
लिझा , एक मेहनती आणि हसतमुख मुलगी. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपलं जन्मगाव सोडून महानगरात येऊन धडपड करत होती. शिक्षणाची बाजू बळकट असल्याने नोकरी मिळण्यात काहीच अडचण आली नाही. अन् हा मुख्य प्रश्न सुटल्याने खाणं, राहणं हेही प्रश्न सुटले होतेच. 
आता प्रश्न होता तो शहरातल्या वेगळ्या वातावरणाशी जुळवून घेत सोबतच स्वतःला हरवू न देण्याचा.
पण इथेच माशी शिंकली, लिझा जरी नावावरून मॉडर्न वाटत असली तरी तिच्यावर तिच्या आजीचे संस्कार होते. त्यामुळे इतरांसारखं पटकन अनोळखी लोकांशी मैत्री करणं, त्यांच्यासोबत मोकळेपणाने वावरण तिला जरा अवघड वाटायचं. तिची स्वतःची अशी एक स्पेस होती आणि त्यात उगाचच कुणी घुसण्याचा प्रयत्न केला तर लिझा अजूनच अलिप्त होत असे. 
पण रियाने मात्र प्रेमाने , हळुवारपणे लिझाच्या ह्या स्पेस मध्ये शिरकाव केला होता. रिया लिझासारखीच छोट्या शहरातून दोन वर्षांपूर्वी इथे आली होती. सध्या लिझा ज्या फेजमधून जात होती त्यातून रियाही गेली होती आणि त्यामुळेच ती लिझासोबत पटकन मैत्री करू शकली. 
लिझाला ऑफिस पार्टीमध्ये ऑकवर्ड वाटतय, त्याचा ताण येतोय हे रियाने ओळखलं होतं. हळूहळू लिझा त्या वातावरणाशी जुळवून घेताना डिप्रेस होतेय हेही रियाच्या लक्षात आलं होतं.

सुदैवाने रिया ऑफिसमध्ये कामानिमित्त आणि घरी रुममेट असल्याने जास्तीत जास्त वेळ लिझाला समजून घेण्यासाठी देत होती. एक महिन्यानंतर मात्र रियाने लिझाला काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत अस ठरवलं. त्यानुसार ती आता लिझाच्या आवडीनिवडी लक्षात घेत पॉझिटिवली कमेंट करू लागली. रियाच्या पॉझिटिव्ह वावरण्या , बोलण्याचा अपेक्षित परिणाम लिझावर दिसू लागला. 

मग हळूच एके दिवशी रियाने तिची ओळख तिच्या ऑफिसव्यतिरिक्त असणाऱ्या ग्रुपशी करून दिली. हा ग्रुपच मुळात सगळ्या स्मॉल टाऊन लोकांचा होता. इथे नवीन येणाऱ्या सगळ्यांना आनंदाने सामावून घेतले जात असे. ग्रुप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असल्याने बऱ्याच ओळखीही वाढत असतं. 
ग्रुपचा उद्देश फक्त एकच होता , स्वतःला हरवू न देता , नवीन ठिकाणी रुळण्यासाठी एकमेकांना मदत करणे. आणि अजून एक होतं हं इथे इतरांनाही एन्ट्री होती. अट फक्त एकच दुसऱ्याला मोटिव्हेट करायचं. आता हे करायचं म्हणजे सतत कौतुक करायचं का ?तर नाही सगळ्या गोष्टी मग त्या चांगल्या असो वा वाईट स्वच्छ आणि स्पष्ट पण समोरच्याला न दुखवता सांगायच्या. जर नसेल जमत तर इतरांची मदत घ्यायची पण शक्यतो दुखवायचं नाही. 
जे लोक लिझासारखे कमी बोलणारे आहेत त्यांना कोषातून बाहेर पडण्यासाठी मदत करायची. 

सध्या तरी ह्या गृपमध्ये 20च जण होते पण हळूहळू संख्या वाढत होती. आता ग्रुपमध्ये वेगवेगळ्या आवडीनुसार छोटे छोटे गट होते. प्रत्येक जण इतरांना हातभार लावत स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करत होता. 

आता कुणी म्हणेल इतका कुटाणा कशासाठी? सांगते ते ही सांगते , लिझाच्या आधी रियाची एक रुममेट होती. तेव्हा रियाही नवीनच होती त्यामुळे त्या रुममेटचं  नैराश्य तिच्या फारसं लक्षात आलं नाही. शेवटी त्या मुलीने न्यूनगंडातून आत्महत्येचा प्रयत्न केला. ती वाचली पण ह्या गोष्टी मुळे रिया मात्र चांगलीच हादरली होती. मग मात्र रियाने स्वतःसोबत अशा अनेक जणांना हेरत मैत्री करत हा ग्रुप तयार केला होता जेणेकरून पुन्हा कुणीही अस वागू नये. 

मित्रमैत्रिणींनो अशी परिस्थिती आयुष्यात सगळ्यांवर कधी न कधी आलेली असते. नवीन नोकरी, नवीन शहर इतकंच काय नवीन नाती जोडली जातानाही प्रत्येक जण थोड्याफार फरकाने स्वतःला कमी समजत असतो. 
ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गरज असते ती थोड्याशा आधाराची आणि तू करू शकशील ह्या विश्वासाची. 
दरवेळी दुसरं कुणी ह्या गोष्टी करू शकेलच असही नसतं, मग अशा वेळी स्वतःच स्वतःची सपोर्ट सिस्टीम व्हायचं. आपण ह्या आधीही आयुष्यात अडचणींना सामोरे गेलेलो असतो. त्या वेळी आपण कसे वागलो, कसे त्यातून बाहेर पडलो हे आठवायचं. 

थोडासा जास्त वेळ लागतो कारण माणसाच्या मनाची एक वाईट खोड आहे ते इतरांवर फार पटकन विश्वास ठेवते. स्वतःवर विश्वास ठेवायला मात्र खूप प्रयत्न करावे लागतात. पण जर एकदा आपला स्वतःवर विश्वास बसला तर मिळणारे अनुभव हे फक्त शिकवतच नाहीत तर आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही मदत करतात. 

सो, Don't lose your real self in search for acceptance by others. Be unique. 

इतरांना आपण आवडो न आवडो हा त्यांचा प्रश्न😜
 पण जर आपण स्वतःला आवडलो तर आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती, गोष्टी, संधीही आपल्या दिशेने स्वतःहून चालत येतात. 
आता आपणच ठरवायचं गर्दीचा एक छोटासा भाग व्हायचं की गर्दीच कारण? 

#quotesकट्टा #be_unique
#वेगळ्या_वाटेचे_प्रवासी
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल