तो , ती आणि अपेक्षा
#तो_ती_आणि_अपेक्षा
"इथे प्रत्येक जण अपेक्षा कुणाकडूनही ठेवू नका हा सल्ला अगदी स्वतः तस वागत असल्याच्या थाटात देतंय." तो जरा वैतागतच म्हणाला.
"मग?" , तिने एक भुवई उंचावत विचारलं.
त्यावर अजूनच वैतागत तो म्हणाला, "मग काय अग? अशा सगळ्या महान लोकांपैकी कुणीच अपेक्षा कशा ठेवू नयेत ह्याबद्दल बोलतच नाही. म्हणजे मी काय म्हणतो, एक स्टेप बाय स्टेप गाईड द्या न आणून मला ज्यामध्ये योग्य पद्धतीने इतरांकडून अपेक्षा कशा ठेवू नयेत हे लिहिलेलं असेल. आणि ते मी आयुष्यभर फॉलो करू शकेन." त्याच्या ह्या बोलण्यावर तीही विचारात पडली.
बरोबरच बोलला न तो? आपण सगळेच जण कुणा ना कुणाकडून कसली तरी अपेक्षा ठेवतच असतो. कधी ती मोकळेपणाने व्यक्त करतो तर कधी मनातल्या मनात ठेवतो.
खरंच जमतं का हो अपेक्षा न ठेवता कृती करत राहणं?
मला विचाराल तर नाहीच जमत.आणि का जमाव कारण बऱ्याच वेळेला समोरच्याने फक्त मोजक्या शब्दांत जरी आपण केलेल्या कृतीची दखल घेतली तरी आपल्याला पुन्हा झोकून देऊन काम करण्यासाठी उत्साह वाटतो.
जर प्रत्येकजण कुठलीही अपेक्षा न ठेवता समोर आलेलं काम करत गेला तर लोकांमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक अशा कुठल्याच भावनेची देवाणघेवाणच होणार नाही. करतोय म्हणून करतोय असंच सगळं होईल. आणि त्यामुळे ना करणाऱ्याला समाधान मिळेल ना ज्याच्यासाठी काही केलं जात आहे त्या जीवाला त्याचा उपयोग होईल.
No vibes at all.
आपण आणि आपलं हे जग देवाणघेवाण ह्या तत्वावर चालतं मग ते व्यावसायिक आयुष्यात असुदे किंवा वैयक्तिक पातळीवर. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कृतीमागे त्या त्या व्यक्तीचा काही तरी हेतू असतो. कधी चांगला कधी वाईट. जर हा हेतूच उरला नाही तर?
मी अस अजिबात म्हणत नाही की इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा, सुखाचा बळी वगैरे द्या. अहं ते अजिबातच करू नका. कारण सगळ्यात आधी जर कुणाच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर त्या आपल्या असणार आहेत. ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो त्या अपेक्षा पूर्ण करा. बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहात. स्वतःच हित ओळखून तुम्हाला सगळ्यांना वागता येत. आणि नेहमी लक्षात ठेवावे, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला सगळं आयुष्य काढावं लागणार आहे, ती पहिली व्यक्ती आपण स्वतः आहोत.
तर अगदी सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस अपेक्षांच्या चपला घालूनच चालत असतो.
कधी ती अपेक्षा फक्त सॉरी, थॅंक्यु, लव यु, मिस यु अशा छोट्या छोट्या गोष्टींपुरती मर्यादित असते तर कधी ती यश, पैसा, प्रसिद्धी, स्टेटस अशा मोठ्या गोष्टींबाबत असते. मोठ्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी कष्टही तेवढेच घ्यावे लागतात आणि ते घेतले गेलेच पाहिजेत तिथे दुमत नाही.
पण छोट्या छोट्या अपेक्षांचं काय? तिथे तर काही फार कष्ट करण्याची गरज नसते. मग त्या पूर्ण का होत नाहीत? कारण आपण मोकळेपणाने दाद देत नाही.
मग तुम्ही म्हणाल सगळ्यांना दाद देत सुटायचं का? तर नाही जी गोष्ट, व्यक्ती तुम्हाला मनापासून भावतेय , आवडतंय , तुमच्या आयुष्यात असे सुखद क्षण पुन्हा पुन्हा यावे अशी तुमची इच्छा आहे तिथे मोकळेपणाने दाद द्या, व्यक्त व्हा. समोरच्याने तुमच्यासाठी ज्या अर्थी इतके कष्ट घेतले त्या अर्थी you mean something to him or her बरोबर न? मग ती व्यक्ती कुणीही असुदे, घरातले जवळचे, मित्रमंडळी, सहकारी, ओळखीचे लोक त्याच्यापर्यंत तुम्हाला छान वाटलं हे पोहोचूदे. त्यांच कौतुक करून एक अपेक्षा तर पूर्ण होईलच न. कोण जाणे कुणीतरी हे सगळं करत असताना तुम्हाला नोटीस करत असेल आणि अनपेक्षितपणे कुणीतरी तुमचीही कुठलीतरी अपेक्षा न सांगता पूर्ण करेल. शेवटी अनपेक्षित गोष्टींमुळे जो आनंद मिळतो तो शब्दात सांगण्यासारखा नसतो बरोबर ना?
जो आपल्यासाठी काही तरी करतो आपल्याला त्याच्यासाठी काही तरी करायचं आहे. आणि मला नाही वाटत की हे खूप अवघड आहे.
वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधले आपले लोक कोण आहेत हे लक्षात आलेलं असत. त्यानंतर फक्त आणि फक्त अशा लोकांना जपण्याचं काम करावं लागतं. कारण ही ती लोकं असतात ज्यांनी आपल्या वाईट काळात आपली साथ दिलेली असते. आणि उरलेले त्यांच्याकडून अपेक्षा करणं आपल्या मन आणि मेंदू ह्या दोघांनी कधीच थांबवलेलं असतं.
ही प्रोसेस आपोआपच घडत राहते जसे फोनमध्ये बॅकग्राऊंडला एप्स अपडेट होत असतात.
अचानकच कधीतरी आपल्याला लक्षात येतं की आपल्याला अशा साथ सोडून गेलेल्या लोकांच्या वागण्याने काही फरकच पडत नाहीये. त्यांची कुठलीच गोष्ट आपल्या मनात विचार निर्माण करत नाही. आणि तो क्षण म्हणजे एक भारी मोमेंट असतो.
पूर्ण अपेक्षाविरहीत जगण्यासाठी आपण काही संत लोक नाही,आपण साधे सरळ संसारी लोक आहोत. सो ते गाईड वगैरे काही शोधायच्या भानगडीत पडू नका.
अपेक्षा आपोआपच निर्माण होतात होऊद्या फक्त त्या इतरांकडूनच पूर्ण व्हाव्यात हा अट्टहास सोडत शक्य तिथे स्वतःच स्वतःला खुश करण्यासाठी प्रयत्न करा. अवघड आहे पण अशक्य नाही.
हळूहळू का होईना आयुष्याच्या सगळ्या चांगल्या वाईट लाटांवर स्वार होऊन जगण्याची मजा घ्यायला शिकतोच आपण. तोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आपल्या जवळच्या लोकांसोबत वाटून घेत वाढवा.
मलाही कुठे जमतंय हे सगळं मीही शिकतेय. सगळेच शिकूया.
ता.क. माझी लाईक आणि कमेंट्स ची अपेक्षा पूर्ण करता येते का ते बघा🤣🤣
१७.७.२०२१
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल
टिप्पण्या