शनिवार, १७ जुलै, २०२१

तो , ती आणि अपेक्षा

#तो_ती_आणि_अपेक्षा
"इथे प्रत्येक जण अपेक्षा कुणाकडूनही ठेवू नका हा सल्ला अगदी स्वतः तस वागत असल्याच्या थाटात देतंय." तो जरा वैतागतच म्हणाला. 
"मग?" , तिने एक भुवई उंचावत विचारलं. 
त्यावर अजूनच वैतागत तो म्हणाला, "मग काय अग? अशा सगळ्या महान लोकांपैकी कुणीच अपेक्षा कशा ठेवू नयेत ह्याबद्दल बोलतच नाही. म्हणजे मी काय म्हणतो, एक स्टेप बाय स्टेप गाईड द्या न आणून मला ज्यामध्ये योग्य पद्धतीने इतरांकडून अपेक्षा कशा ठेवू नयेत हे लिहिलेलं असेल. आणि ते मी आयुष्यभर फॉलो करू शकेन." त्याच्या ह्या बोलण्यावर तीही विचारात पडली. 

बरोबरच बोलला न तो? आपण सगळेच जण कुणा ना कुणाकडून कसली तरी अपेक्षा ठेवतच असतो. कधी ती मोकळेपणाने व्यक्त करतो तर कधी मनातल्या मनात ठेवतो.
 
खरंच जमतं का हो अपेक्षा न ठेवता कृती करत राहणं?

मला विचाराल तर नाहीच जमत.आणि का जमाव कारण बऱ्याच वेळेला समोरच्याने फक्त मोजक्या शब्दांत जरी आपण केलेल्या कृतीची दखल घेतली तरी आपल्याला पुन्हा झोकून देऊन काम करण्यासाठी उत्साह वाटतो. 
जर प्रत्येकजण कुठलीही अपेक्षा न ठेवता समोर आलेलं काम करत गेला तर लोकांमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक अशा कुठल्याच भावनेची देवाणघेवाणच होणार नाही. करतोय म्हणून करतोय असंच सगळं होईल. आणि त्यामुळे ना करणाऱ्याला समाधान मिळेल ना ज्याच्यासाठी काही केलं जात आहे त्या जीवाला त्याचा उपयोग होईल. 
No vibes at all. 
 आपण आणि आपलं हे जग देवाणघेवाण ह्या तत्वावर चालतं मग ते व्यावसायिक आयुष्यात असुदे किंवा वैयक्तिक पातळीवर. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कृतीमागे त्या त्या व्यक्तीचा काही तरी हेतू असतो. कधी चांगला कधी वाईट. जर हा हेतूच उरला नाही तर? 
मी अस अजिबात म्हणत नाही की इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा, सुखाचा बळी वगैरे द्या. अहं ते अजिबातच करू नका. कारण सगळ्यात आधी जर कुणाच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर त्या आपल्या असणार आहेत. ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो त्या अपेक्षा पूर्ण करा. बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहात. स्वतःच हित ओळखून तुम्हाला सगळ्यांना वागता येत. आणि नेहमी लक्षात ठेवावे, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला सगळं आयुष्य काढावं लागणार आहे, ती पहिली व्यक्ती आपण स्वतः आहोत. 
तर अगदी सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस अपेक्षांच्या चपला घालूनच चालत असतो. 
कधी ती अपेक्षा फक्त सॉरी, थॅंक्यु, लव यु, मिस यु अशा छोट्या छोट्या गोष्टींपुरती मर्यादित असते तर कधी ती यश, पैसा, प्रसिद्धी, स्टेटस अशा मोठ्या गोष्टींबाबत असते. मोठ्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी कष्टही तेवढेच घ्यावे लागतात आणि ते घेतले गेलेच पाहिजेत तिथे दुमत नाही. 
पण छोट्या छोट्या अपेक्षांचं काय? तिथे तर काही फार कष्ट करण्याची गरज नसते. मग त्या पूर्ण का होत नाहीत? कारण आपण मोकळेपणाने दाद देत नाही. 
मग तुम्ही म्हणाल सगळ्यांना दाद देत सुटायचं का? तर नाही जी गोष्ट, व्यक्ती तुम्हाला मनापासून भावतेय , आवडतंय , तुमच्या आयुष्यात असे सुखद क्षण पुन्हा पुन्हा यावे अशी तुमची इच्छा आहे तिथे मोकळेपणाने दाद द्या, व्यक्त व्हा. समोरच्याने तुमच्यासाठी ज्या अर्थी इतके कष्ट घेतले त्या अर्थी you mean something to him or her बरोबर न? मग ती व्यक्ती कुणीही असुदे, घरातले जवळचे, मित्रमंडळी, सहकारी, ओळखीचे लोक त्याच्यापर्यंत तुम्हाला छान वाटलं हे पोहोचूदे. त्यांच कौतुक  करून एक अपेक्षा तर पूर्ण होईलच न. कोण जाणे कुणीतरी हे सगळं करत असताना तुम्हाला नोटीस करत असेल आणि अनपेक्षितपणे कुणीतरी तुमचीही कुठलीतरी अपेक्षा न सांगता पूर्ण करेल. शेवटी अनपेक्षित गोष्टींमुळे जो आनंद मिळतो तो शब्दात सांगण्यासारखा नसतो बरोबर ना? 
जो आपल्यासाठी काही तरी करतो आपल्याला त्याच्यासाठी काही तरी करायचं आहे. आणि मला नाही वाटत की हे खूप अवघड आहे. 
वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधले आपले लोक कोण आहेत हे लक्षात आलेलं असत. त्यानंतर फक्त आणि फक्त अशा लोकांना जपण्याचं काम करावं लागतं. कारण ही ती लोकं असतात ज्यांनी आपल्या वाईट काळात आपली साथ दिलेली असते. आणि उरलेले त्यांच्याकडून अपेक्षा करणं आपल्या मन आणि मेंदू ह्या दोघांनी कधीच थांबवलेलं असतं. 
ही प्रोसेस आपोआपच घडत राहते जसे फोनमध्ये बॅकग्राऊंडला एप्स अपडेट होत असतात. 
अचानकच कधीतरी आपल्याला लक्षात येतं की आपल्याला अशा साथ सोडून गेलेल्या लोकांच्या वागण्याने काही फरकच पडत नाहीये. त्यांची कुठलीच गोष्ट आपल्या मनात विचार निर्माण करत नाही. आणि तो क्षण म्हणजे एक भारी मोमेंट असतो. 
पूर्ण अपेक्षाविरहीत जगण्यासाठी आपण काही संत लोक नाही,आपण साधे सरळ संसारी लोक आहोत. सो ते गाईड वगैरे काही शोधायच्या भानगडीत पडू नका. 
अपेक्षा आपोआपच निर्माण होतात होऊद्या फक्त त्या इतरांकडूनच पूर्ण व्हाव्यात हा अट्टहास सोडत शक्य तिथे स्वतःच स्वतःला खुश करण्यासाठी प्रयत्न करा. अवघड आहे पण अशक्य नाही. 
हळूहळू का होईना आयुष्याच्या सगळ्या चांगल्या वाईट लाटांवर स्वार होऊन जगण्याची मजा घ्यायला शिकतोच आपण. तोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आपल्या जवळच्या लोकांसोबत वाटून घेत वाढवा.
 मलाही कुठे जमतंय हे सगळं मीही शिकतेय. सगळेच शिकूया. 
ता.क. माझी लाईक आणि कमेंट्स ची अपेक्षा पूर्ण करता येते का ते बघा🤣🤣
१७.७.२०२१
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

मंगळवार, २२ जून, २०२१

खजिना

#खजिना 
नुकताच लॉकडाउन संपला होता त्यामुळे आज बाहेर पडण्याची हिम्मत करत ती घराजवळच असलेल्या छोट्याशा मंदिराच्या आवारात जाऊन बसली. कामाचा दिवस असल्याने मंदिरात कुणीच नव्हतं. सकाळीच पूजा वगैरे करून पुजारीही निघून गेले होते. शांत वातावरणाचा अनुभव घेत ती बाकड्यावर टेकली. अधूनमधून एखादी व्यक्ती येता जाता थांबून नमस्कार करत निघत होती. लोकांचं निरीक्षण करत तीही आपल्या विचारात रमली होती. 
लॉकडाउन मुळे तिच्या परिस्थितीत तसा काही फरक पडला नव्हता. इतर स्त्रियांसारखीच तिचीही घरगुती काम वाढली होती बास. तिची तशी काही तक्रारही नव्हती त्याबद्दल कारण जे वाट्याला आलं आहे ते स्वीकारणं हा तिनं स्वतःच्या आयुष्याचा भागच केला होता. 
मंदिरात शांतपणे बसल्याने तिला आज जरा बरं वाटलं. 
तितक्यात एक चिरपरिचित सुगंध तिच्या आसपास दरवळला. त्याची जाणीव होताच तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. पण आज तो सुगंध लगेच हवेत विरला नाही, जणू तिची विचारपूस करत असल्यासारखा तिच्या सभोवती तो वावरत होता. त्याच्या अस्तित्वाने तिला अगदी भरून आल्यासारखं झालं. थकलेल्या त्या जीवाला कुणीतरी काळजीपोटी विचारावं, दखल घ्यावी एवढीच तिची अपेक्षा होती आयुष्याकडून आणि ती अपेक्षा इथं आलं की पूर्ण व्हायची. कधीही न अनुभवलेली आईबापाची माया तिला त्या सुगंधाच्या दरवळल्याने जाणवायची. तीही तो अनुभव भरभरून श्वासात साठवून घेत राहायची. तिच्यातली लहान मुलगी मनातल्या मनात बागडत खुश व्हायची. कारण तिच्यासाठी त्याने दिलेली अस्तित्वाची प्रचिती म्हणजे तिचे लाड पुरवणेच होतं. 
मंदिरातून घरी परतल्यावर मात्र घरच्यांचं ठरलेलं वाक्य तिला ऐकू यायचं, देवळातुन काय खजिना मिळल्यासारखी खुश होऊन येते काय माहीत? त्या वाक्यावर हलकेच हसत ती आपल्या रोजच्या आयुष्याला तोंड द्यायला सिद्ध होत असे. 
मनात मात्र त्या सुगंधाचा दरवळ तिच्यामधल्या लहान मुलीला गुदगुल्या करून हसवत असायचा. आता असा हा अनुभव सांगून थोडीच कुणाला कळणार होता. म्हणून तर ती तिचा खजिना शोधायला आवर्जून जायची. 
तुम्हाला समजला का हो तिचा खजिना? 😊

#treasures_inside_you
#स्वतःमध्ये_लपलेला_खजिना 
#अनुभवाच्या_पोतडीतून 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 

फोटो सौजन्य - गुगल

गुरुवार, १० जून, २०२१

मातृत्वाचा माज कशासाठी?

आई होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. पण फक्त मूल जन्माला घातलं म्हणूनच आई होता येतं का? मान्य आहे की नैसर्गिकरित्या फक्त स्त्रीच हे अनुभवू शकते पण त्याचा माज करणं कितपत योग्य आहे? आज आजूबाजूला अशी कित्येक उदाहरणं सापडतील जे मूल होण्यासाठी तडफडत आहेत, वाट्टेल ते प्रयत्न करत आहेत मग अशा वेळी एखाद्याला ह्यातलं काही न करता मूल होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्या व्यक्तीला इतरांचं मन दुखवण्याचा हक्क मिळतो का? 
दुर्दैवाने अजूनही आपल्याकडे मूल होणं हे अनुभवण्यापेक्षा स्टेटस म्हणून मिरवण्यातच लोकांना धन्यता वाटते. अशा मुलांवर काय संस्कार होतात ते काळानुसार दिसतच. 
ज्यांनी मूल होण्याच्या मार्गावर खूप काही गमावलं आहे ज्यात न जन्माला आलेले गर्भ, स्वतःची, जोडीदाराची मनस्थिती त्यांना स्वतःच मूल हातात आल्यावरही जर तुम्हाला काय कळणार किती त्रास होतो असे ऐकवले तर आपलीच मनोवृत्ती उघडी पडते. 
आपल्याला मिळालं आहे ते उत्तमरीत्या सांभाळून दाखवावं टोमणे मारू पब्लिकने. तुम्हाला योग्य वयात मुलं झाली म्हणजे तुम्ही काही थोर कार्य केलेलं नाहीये. आणि ज्यांना होत नाहीत त्यांचं काही चुकलेल नाहीये. 
ह्याला नशीब म्हणतात जी गोष्ट माणसाच्या हातात नसते. 
आणि जे दळभद्री आईवडील आपल्या ह्या असल्या नतद्रष्ट कार्ट्याना डोक्यावर बसवून इतरांना हिणवतात त्यांनीही लक्षात घ्याव , जब उसकी लाठी पडती है ना तो आवाज नहीं आती। 

लिहिण्याचा मुद्दा हा की एका मॅडमने मला ऐकवलं (तसं मी हे बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं आधीही )की, "तुला काय कळणार ग मिसकॅरेजच (गर्भपात) दुःख" त्याक्षणी तरी मला दया आली तिची. 
मी काय सोसलं हे मी शक्यतो सांगत नाही पण कधी कधी वाटत हॉस्पिटलच्या फाईल्सची थप्पी अशा लोकांच्या तोंडावर फेकून मारावी.  असो अशा जखमा भरू नयेत ह्याची काळजी घेणारे दुर्दैवाने जवळचेच असतात.

शेवटी एकच सांगेन , वाईट वेळ सगळ्यांचीच येते कुणाची लवकर कुणाची उशिरा. ती किती वाईट असावी हे आपलं कर्म ठरवतं सो watch your own words, actions while hurting others. 
बाकी ज्याचा त्याचा प्रश्न. 
गौरीहर्षल 

रविवार, २५ एप्रिल, २०२१

जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल 2021

 Harry Potter हा माझ्यासाठी प्रचंड जिव्हाळ्याचा विषय❤️❤️❤️ ह्या पुस्तकांनी मला ते दिलं आहे, देत आहेत जे कुठूनही मिळालं नाही. 

आयुष्यातल्या सगळ्या गाळलेल्या जागा ह्या पुस्तकांनी, त्यातील पात्रांनी भरून काढल्या. 

एकटेपणा ही सुखद असू शकतो हे ह्या पुस्तकांनी शिकवलं. 

स्वतःच  पुस्तक लिहिण्याची प्रेरणाही हेच. 

मुख्य शिकलेली गोष्ट ही की इच्छाशक्ती आणि  स्वतःवर विश्वास असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीत तग धरुन राहू शकतो. आणि फक्त तग धरूनच नाही तर उत्तम पद्धतीने स्वतःला घडवू शकतो. 


आयुष्यात कुणीही नसेल तरी आणि भरपूर जवळचे असतील तरी सर्वात जास्त प्रामाणिक दोस्त म्हणजे पुस्तकं❤️❤️त्यांचा हात कधीच सोडू नये. 


आज माझ्याकडे जवळपास 100 + पुस्तकं आहेत. आणि  पुस्तक विकत घेणे ही एकमेव अशी गोष्ट आहे जी करताना मी दोनदा विचार करत नाही. 😊😊


माणसं अनुभव देतात पण पुस्तकं त्या अनुभवातून काय घ्यायचं ते शिकवतात. निसर्ग, प्राणी आणि पुस्तकं हे सगळ्यात उत्तम गुरू आहेत. न बोलता बरंच काही शिकवण्याची कला फक्त त्यांनाच अवगत आहे अस म्हटल तरी चालेल. 


तर पुस्तकं वाचा,उत्तम पुस्तकं वाचा, वाचल्याने आयुष्य समृद्ध होतं. लिहायचाही प्रयत्न करा. लिहिण्याने मनाचा भार हलका होतो. 

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा❤️❤️✍️✍️

#गौरीहर्षल #स्वतःला_शोधताना

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

ʙᴇ ᴜɴɪǫᴜᴇ - वेगळेपण जपताना

ʙᴇ ᴜɴɪǫᴜᴇ - वेगळेपण जपताना

असं म्हणतात की खूप उन्हाळे-पावसाळे पाहून जे शहाणपण येत नाही ते काही अनुभव शिकवून जातात. 
आणि अनुभवातून जे आपण शिकतो ते आपल्या कायम लक्षात राहतं. 
लिझा , एक मेहनती आणि हसतमुख मुलगी. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपलं जन्मगाव सोडून महानगरात येऊन धडपड करत होती. शिक्षणाची बाजू बळकट असल्याने नोकरी मिळण्यात काहीच अडचण आली नाही. अन् हा मुख्य प्रश्न सुटल्याने खाणं, राहणं हेही प्रश्न सुटले होतेच. 
आता प्रश्न होता तो शहरातल्या वेगळ्या वातावरणाशी जुळवून घेत सोबतच स्वतःला हरवू न देण्याचा.
पण इथेच माशी शिंकली, लिझा जरी नावावरून मॉडर्न वाटत असली तरी तिच्यावर तिच्या आजीचे संस्कार होते. त्यामुळे इतरांसारखं पटकन अनोळखी लोकांशी मैत्री करणं, त्यांच्यासोबत मोकळेपणाने वावरण तिला जरा अवघड वाटायचं. तिची स्वतःची अशी एक स्पेस होती आणि त्यात उगाचच कुणी घुसण्याचा प्रयत्न केला तर लिझा अजूनच अलिप्त होत असे. 
पण रियाने मात्र प्रेमाने , हळुवारपणे लिझाच्या ह्या स्पेस मध्ये शिरकाव केला होता. रिया लिझासारखीच छोट्या शहरातून दोन वर्षांपूर्वी इथे आली होती. सध्या लिझा ज्या फेजमधून जात होती त्यातून रियाही गेली होती आणि त्यामुळेच ती लिझासोबत पटकन मैत्री करू शकली. 
लिझाला ऑफिस पार्टीमध्ये ऑकवर्ड वाटतय, त्याचा ताण येतोय हे रियाने ओळखलं होतं. हळूहळू लिझा त्या वातावरणाशी जुळवून घेताना डिप्रेस होतेय हेही रियाच्या लक्षात आलं होतं.

सुदैवाने रिया ऑफिसमध्ये कामानिमित्त आणि घरी रुममेट असल्याने जास्तीत जास्त वेळ लिझाला समजून घेण्यासाठी देत होती. एक महिन्यानंतर मात्र रियाने लिझाला काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत अस ठरवलं. त्यानुसार ती आता लिझाच्या आवडीनिवडी लक्षात घेत पॉझिटिवली कमेंट करू लागली. रियाच्या पॉझिटिव्ह वावरण्या , बोलण्याचा अपेक्षित परिणाम लिझावर दिसू लागला. 

मग हळूच एके दिवशी रियाने तिची ओळख तिच्या ऑफिसव्यतिरिक्त असणाऱ्या ग्रुपशी करून दिली. हा ग्रुपच मुळात सगळ्या स्मॉल टाऊन लोकांचा होता. इथे नवीन येणाऱ्या सगळ्यांना आनंदाने सामावून घेतले जात असे. ग्रुप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असल्याने बऱ्याच ओळखीही वाढत असतं. 
ग्रुपचा उद्देश फक्त एकच होता , स्वतःला हरवू न देता , नवीन ठिकाणी रुळण्यासाठी एकमेकांना मदत करणे. आणि अजून एक होतं हं इथे इतरांनाही एन्ट्री होती. अट फक्त एकच दुसऱ्याला मोटिव्हेट करायचं. आता हे करायचं म्हणजे सतत कौतुक करायचं का ?तर नाही सगळ्या गोष्टी मग त्या चांगल्या असो वा वाईट स्वच्छ आणि स्पष्ट पण समोरच्याला न दुखवता सांगायच्या. जर नसेल जमत तर इतरांची मदत घ्यायची पण शक्यतो दुखवायचं नाही. 
जे लोक लिझासारखे कमी बोलणारे आहेत त्यांना कोषातून बाहेर पडण्यासाठी मदत करायची. 

सध्या तरी ह्या गृपमध्ये 20च जण होते पण हळूहळू संख्या वाढत होती. आता ग्रुपमध्ये वेगवेगळ्या आवडीनुसार छोटे छोटे गट होते. प्रत्येक जण इतरांना हातभार लावत स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करत होता. 

आता कुणी म्हणेल इतका कुटाणा कशासाठी? सांगते ते ही सांगते , लिझाच्या आधी रियाची एक रुममेट होती. तेव्हा रियाही नवीनच होती त्यामुळे त्या रुममेटचं  नैराश्य तिच्या फारसं लक्षात आलं नाही. शेवटी त्या मुलीने न्यूनगंडातून आत्महत्येचा प्रयत्न केला. ती वाचली पण ह्या गोष्टी मुळे रिया मात्र चांगलीच हादरली होती. मग मात्र रियाने स्वतःसोबत अशा अनेक जणांना हेरत मैत्री करत हा ग्रुप तयार केला होता जेणेकरून पुन्हा कुणीही अस वागू नये. 

मित्रमैत्रिणींनो अशी परिस्थिती आयुष्यात सगळ्यांवर कधी न कधी आलेली असते. नवीन नोकरी, नवीन शहर इतकंच काय नवीन नाती जोडली जातानाही प्रत्येक जण थोड्याफार फरकाने स्वतःला कमी समजत असतो. 
ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गरज असते ती थोड्याशा आधाराची आणि तू करू शकशील ह्या विश्वासाची. 
दरवेळी दुसरं कुणी ह्या गोष्टी करू शकेलच असही नसतं, मग अशा वेळी स्वतःच स्वतःची सपोर्ट सिस्टीम व्हायचं. आपण ह्या आधीही आयुष्यात अडचणींना सामोरे गेलेलो असतो. त्या वेळी आपण कसे वागलो, कसे त्यातून बाहेर पडलो हे आठवायचं. 

थोडासा जास्त वेळ लागतो कारण माणसाच्या मनाची एक वाईट खोड आहे ते इतरांवर फार पटकन विश्वास ठेवते. स्वतःवर विश्वास ठेवायला मात्र खूप प्रयत्न करावे लागतात. पण जर एकदा आपला स्वतःवर विश्वास बसला तर मिळणारे अनुभव हे फक्त शिकवतच नाहीत तर आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही मदत करतात. 

सो, Don't lose your real self in search for acceptance by others. Be unique. 

इतरांना आपण आवडो न आवडो हा त्यांचा प्रश्न😜
 पण जर आपण स्वतःला आवडलो तर आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती, गोष्टी, संधीही आपल्या दिशेने स्वतःहून चालत येतात. 
आता आपणच ठरवायचं गर्दीचा एक छोटासा भाग व्हायचं की गर्दीच कारण? 

#quotesकट्टा #be_unique
#वेगळ्या_वाटेचे_प्रवासी
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल


सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना

#स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना
#माझा_प्रवास 
#गौरीहर्षल

गेल्या काही दिवसात लक्षात आलं की खरंच गरज आहे का किंवा असते का इतकं टोकाला जाऊन कुणाचं वागणं, बोलणं मनावर घेण्याची??? आपल्याला दुखावून समोरची व्यक्ती जर काही झालंच नाही अशा थाटात जगत असते तर आपण स्वतःला कोणत्या चुकीची शिक्षा देत असतो??  मग मात्र ठरवलं की राग येणं, वाईट वाटण हे तर होतच राहणार आहे पण दरवेळेस असं झालं की आपल्या मनाचा तो दरवाजा उघडायचा जो आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. ते ठिकाण म्हणजे आपल्या नव्या विचारांचं दालन जे प्रत्येक चुकीची, अयोग्य वाटणारी गोष्ट एका नव्या नजरेतून दाखवेल. हा सगळा प्रवास स्वतःचा स्वतःसोबतच असणार आहे त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे शोधण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. आणि इतर कुणाच्या येण्याची वाट बघत बसण्याचीही गरज नाही.  

ह्याच विचारातून #स्वतःसाठी_बदलताना काय करावं लागेल  ती यादी तयार करायला सुरुवात केली. 
आणि काय सांगू खूप काही सापडलं जे मला सतत जाणवून देत राहील की 
                  "तुझे आहे तुजपाशी, 
                 परि तू जागा चुकलासी"  
मग काय म्हटलं हेही लिहून ठेवूया. कदाचित आपल्यासारखेच रस्ता माहीत असूनही वाट चुकलेले जे आहेत त्यांना उपयोग होईल. 

शेवटी समर्थांनी म्हटलेच आहे न , 
"दिसा माजी काही तरी ते लिहावे | 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||
जे जे आपणासी ठावे | 
ते ते इतरांसी शिकवावे | 
शहाणे करुन सोडावे सकल जन ||"

मधल्या काळात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, विचित्र वागणारी माणसं ह्यांचा त्रास करून घेत स्वतःच्या मनाला जो त्रास दिला तोच आता द्यायचा नाही असा संकल्प उद्या येणाऱ्या #दत्तजयंती च्या निमित्ताने केला आहे. 
बाकी संकल्पच का ? तर पब्लिक न्यू ईयरला संकल्प करते माझ्यासाठी माझं नवीन वर्ष उद्यापासून सुरू होणार अस का कुणास ठाऊक मला वाटलं आणि अर्थातच सगळ्यात जवळच्या मित्राचा वाढदिवस ह्याशिवाय योग्य मुहूर्त कुठला असणार रस्ता चुकलेल्या मनाला मार्गावर आणण्यासाठी? 

ते म्हणतात न , की तुम्ही जर एखाद्या विशिष्ट संकेताची वाट बघत असाल तर तो नक्कीच तुमच्या आसपास असतो. 
सो, बरंच काही पेंडिंग आहे ते मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा स्वतःला शोधण्यासाठी निघायचं आहे. प्रयत्न करण्यात तोटा काहीच नाही झाला तर फायदाच आहे so giving it a chance. 

#स्वतःसाठी_बदलताना ही मी स्वतःसाठी लिहिलेल्या सूचनांची सिरीज आहे असं म्हटलं तरी चालेल. अशा गोष्टी ज्यांचा विसर पडतो आणि मग पुन्हा मन त्याच गल्लीत जाऊन धडकते जिथे जायची गरज नसते. 

बाकी माझा संकल्प तडीस नेण्यासाठी माझा मितवा आहेच माझ्या सोबत तसा तो असतोच. 
तर माझ्यातर्फे #स्वतःला_शोधताना च्या सगळ्या वाचक मित्रमैत्रिणींना दत्तजयंतीच्या शुभेच्छा. 
थोडीशी सकारात्मकता मनात आणून उद्यापासून खूप काही चांगलं घडणार आहे ह्या  विचारावर लक्ष केंद्रित करत बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू करूया. 

https://www.facebook.com/109012627448262/posts/120681526281372/

सगळं काही दत्तात्रेयार्पणमस्तु!!! 🙏🙏
#गौरीहर्षल
२८.१२.२०२०



बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

विषारी सकारात्मकता - गौरीहर्षल

#विषारी_सकारात्मकता
#toxic_positivity

टायटल बरोबरच आहे. आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना कोरोना आपल्या आयुष्यात आला आणि त्याने गेल्या काही महिन्यात यथेच्छ धुमाकूळ घालत आपल्या आयुष्यात नको तितके बदल घडवून आणले. त्यातले काही बदल अर्थातच चांगले आहेत तर काही नाहीत. पण ह्या सगळ्यात ज्या गोष्टीचा गवगवा सोशल मीडियावर जास्त झाला ते म्हणजे सकारात्मकता किंवा positivity. 
जो तो उठला आणि सांगत सुटला की आपण आलेल्या परिस्थितीत सकारात्मक विचार करत कसं जगायला हवं. पण म्हणतात नं अति तिथे माती तसंच काहीसं ह्या सकारात्मकतेच्या दृष्टिकोनाचंही झालंय. आणि त्यातून आता हे नवीन पिल्लू बाहेर पडले आहे ज्याचं नाव आहे 
#विषारी_सकारात्मकता अर्थात #toxic_positivity.

आता प्रश्न आहे की सकारात्मकता सुद्धा घातक ठरू शकते का? तर हो. कशी?
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे नेमकं काय आहे ते आधी बघू. 
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे आयुष्यात कितीही अडचणी,अवघड प्रसंग आले तरीही त्यामुळे होणारा त्रास लपवत सतत आनंदी किंवा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे. 
आता कुणी म्हणेल ह्यात काय चुकीचं आहे? तर आनंदी,सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे ह्यात काहीच चुकीचं नाहीये चुकीचा आहे तो दृष्टीकोन जो मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सतत सकारात्मक राहायला सांगतो. 
माणूस आनंदी कधी होईल जेव्हा त्याला योग्य मनस्थितीच्या  मदतीने आलेल्या वाईट परिस्थितीत ही जगण्याचा मार्ग सापडेल. मग जर आपल्याला एखाद्या गोष्टीने दुःख होत आहे, त्रास होत आहे तर त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधायचं की फक्त आनंदी असल्याचं चित्र उभे करून जगायचं? 
एखादी दुःखी, त्रासदायक भावना जर सतत दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात ती जास्त तीव्रतेने त्रासदायक ठरू शकते. 
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी बाबतही हेच होतं -
वस्तुस्थितीचा स्विकार करून त्यातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बरेच जण ती अमान्य तरी करतात किंवा चक्क दुर्लक्ष करून आहे तेच ठीक आहे असं स्वतःला सांगत राहतात. 
​इतरांना दाखवण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर स्वतःच्या श्रीमंतीचे , आनंदी असण्याचे प्रदर्शन करत असतात. 
सतत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टेटस म्हणून बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह vibes ओन्ली अशा अर्थाचे स्टेटस शेयर करतात. 
जर कुणी प्रॉब्लेम मध्ये असेल आणि त्याने अशा व्यक्ती जवळ ते सांगायचा प्रयत्न केला तर ह्या व्यक्ती त्यात काय एवढं वगैरे म्हणत ऐकून घेण्याआधी तो प्रॉब्लेम किती क्षुल्लक आहे हे सांगतात.

यामागे आपली एक जुनी मानसिकताही घातक ठरते ती म्हणजे आपला त्रास मग तो पुरुष असो किंवा स्त्री कुणालाही कळू द्यायचा नाही. पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर लोक काय म्हणतील? हेच बिंबवले जाते. मग कितीही त्रास होत असला तरी ही तो लपवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे तो त्रास कमी होण्याऐवजी अजून वाढत जातो. 
प्रत्येकाला ह्या गोष्टीचं स्वतःपुरत तरी निरीक्षण करून लक्षात येईल की आपण असे वागत आहोत का? जर ऊत्तर हो असेल तर काय करता येईल? हाही विचार करायला हवा. 
--- आयुष्यात घडलेल्या एखाद्या घटनेने,प्रसंगाने जर आपल्याला वाईट वाटतंय,निराश झाल्यासारखे वाटतेय तर सगळ्यात आधी  त्या भावनेचा स्वीकार करायला शिका.  
--- ती भावना जरी नकारात्मक असली तरी त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका, मनात कुठल्याही प्रकारचा अपराधीपणा येऊ देऊ नका. 
---उलट स्वतःला सांगा की चढउतार, यशापयश हे आयुष्याचा एक भाग असतात  संपूर्ण आयुष्य नाही.
--- सोशल मिडिया वरील जे अकौंटस बघून तुम्हाला स्वतःला बदलावेसे वाटते, स्वतः बद्दल कमीपणा वाटतो ती सगळी अकौंटस अनफॉलो करा. 
--- आपल्या मनातल्या भावना लिहून काढा. लिहून काढल्याने मनातल्या भावनांचा निचरा होण्यास मदत होते. 
--- तुमच्या आयुष्यात खरे पॉझिटिव्ह बदल तेंव्हाच घडतील जेव्हा तुम्ही स्वतःला स्वतःच्या नजरेतून बघाल. स्वतःला आहे तसे स्विकारून जगण्याचा प्रयत्न कराल. 

आता ह्यावरून जर तुम्हाला तुमच्या जवळपास कुणी असं करताना दिसत आहे तर काय कराल? 
तू हे असले स्टेटस का टाकतोस किंवा टाकतेस म्हणून लगेच त्यांना बोलायला सुरुवात करू नका. 
तर त्या व्यक्तीच्या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करा. त्याला काही प्रॉब्लेम आहे का ते शोधून काढण्याचा प्रयत्न करा. 
"तुला काय वाटतंय ते बोलण्याचा प्रयत्न कर, मी ऐकतोय"  ह्याची जाणीव करून दया.  बऱ्याचदा मदतीपेक्षाही कुणीतरी आपलं ऐकावं हीच अपेक्षा असते. 
त्याला किंवा तिला बोलते करण्याचा प्रयत्न करा. 
आवश्यक असल्यास तज्ञांची मदत घ्या. 
आपली एक छोटीशी कृती कुणासाठी तरी खूप महत्त्वाची ठरू शकते हे लक्षात घ्या. 
          वाचक मित्रांनो जग जर फक्त ब्लॅक अँड व्हाईट असते तर आपण इतके आनंदी असतो का ? नाही नं! 
मग तसेच भावनांचेही आहे. सकारात्मक आणि नकारात्मक ह्या भावनाही अशाच आहेत, पण कोणत्या वेळी कुठली भावना मनात येते हे मात्र ओळखणे आपल्या हातात आहे. त्या भावनेला योग्य प्रकारे प्रतिसाद दिला तर प्रश्न सुटण्यासाठी मदतच होते. हे जमत नसेल अवघड जात असेल तर वेळीच योग्य ठिकाणाहून मदत घ्या. 
जाता जाता इतकंच म्हणेन ,
Toxic Positivity is not positive. Face it. 
इतरांच्या दिखाव्याला भुलून स्वतःच्या आयुष्यात विष कालवू नका. चकाकतं ते सगळं सोनच नसतं हे लक्षात ठेवा. 
#गौरीहर्षल