शुक्रवार, २७ मार्च, २०२०

सुखाची व्याख्या

सुखाची व्याख्या असते प्रत्येकाची वेगळी
भौतिक, आत्मिक आणि निरनिराळी
कुणीतरी आनंदी असतं आनंदाच्या कल्पनेत
कुणालातरी सुख गवसतं पैश्याच्या दुनियेत
सुखाच्या शोधात सगळे धडपडत असतात
त्यातले किती जण स्वतःला सापडतात??
दुसऱ्याला आनंदात बघतात आणि होतात दुःखी
असे कसे हे जीव इतरांवर जळून होतील सुखी??
मनापासून सुखात साद हल्ली कुणी घालत नाही
दुःखात मात्र इतरांच्या सोबतीची हवी ग्वाही
सुख म्हणजे काय असतं? 
हाती न लागणारं मृगजळ
सुख म्हणजे काय असतं?
हातातलं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावपळ
सुख म्हणजे काय असत? 
कुणालाही अजूनही सापडलं नाही
तरी त्याच्या मागे आयुष्य खर्ची करणं 
माणसाने सोडलं नाही.
सुख असतं समाधानाने जगण्यात,
आपल्यासोबत इतरांना सुखी असुदे म्हणण्यात.
सुख असत लहान मुलांच्या निरागस हसण्यात, 
नको नको म्हणताना मायेने भरवलेल्या घासात.
सुख असत आपल्या माणसाच्या सहवासात,
कसलीही जाहिरात न करता घालवलेल्या क्षणात.
सुख असत आपल्याच हातात, मनात आणि विचारात,
छोटया छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्यात. 
लिस्ट तशी मोठी सुख सापडणाऱ्या जागांची 
पण 
प्रत्येकाची वेगळी असते न व्याख्या सुखाची......
#गौरीहर्षल
४.१.२०२०





दोन शब्द कौतुकाचे

#दोन_शब्द_कौतुकाचे

       निखिलने लहानपणापासून आईवडील,आजीआजोबा सगळ्यांनाच दुसऱ्याचं भरभरून कौतुक करताना बघितलं होतं. म्हणजे ते उठसुठ कुणाचंही कौतुक करायचे अस नाही. पण जो खरंच काहीतरी छोटीशी का होईना कृती करतोय त्याचं ते कौतुक करायचे. पण ते सुद्धा अस की समोरच्याच्या डोक्यात हवा न जाता तो अजून अजून चांगलं वागण्यासाठी प्रयत्न करेल.
 निखिलला कळू लागलं तसा तो सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा की," समोरचा तर आपल्या बाबतीत चांगलं बोलत नाही किंवा खूप कमी बोलतो मग आपणच अस का करायचं???"
 तेंव्हा त्याचे आजोबा त्याला समजावून सांगत की,"समोरचा आणि आपण ह्यात हाच तर फरक आहे. आपण आपल्या डोळ्यांना, कानांना, मनाला फक्त चांगलं बघण्याची, ऐकण्याची आणि करण्याची सवय लावली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला काही न काही चांगलं नक्की सापडतं. त्याचा खूप फायदा होतो बघ निखिल. आपण जेव्हा समोरच्या व्यक्ती मधून चांगलंच वाचतो न तेंव्हा आपल्याकडे फक्त चांगलंच येतं. मग त्याच्यात नी आपल्यात बाकी पातळ्यांवर किती का फरक असेना आपल्या मनात त्याच्याविषयी नको ते विचार येतच नाहीत. सो आपण खुश राहतो हा झाला आपला फायदा. आता जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टी साठी त्या व्यक्तींचं मनापासून कौतुक करतो तेव्हा नकळत का होईना ती व्यक्ती सुखावते. त्यामुळे होत काय तिच्याही मनात आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होते. आणि त्याबरोबर ती अजून चांगलं काम करण्यासाठी तयार होते आपोआपच. अर्थात हे सगळं सगळ्यांच्या बाबतीत लागू होईलच अस नाही पण आपण मात्र आपलं काम करायचं. काही जणांना आपण जेन्यूईन आहोत हे लगेच कळतं काहींना उशिरा. पण कळतं हे नक्की आणि ह्या कौतुक ट्रॅकवर राहिल्याने  आपल्या आयुष्याची गाडी मस्त चालते. कधी कधी ना माणसाला फक्त कौतुकाची गरज असते आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी. आपण फक्त न मागता देत राहायचं त्याला कुठे खर्च येतो??? तुला एक गंमतही सांगतो कौतुक करण्याची सवय लागली की तू पुढे विसरूनही जाशील कुणाला कौतुकाने काय बोलला होतास, पण हे समोरची व्यक्ती मात्र कधीच विसरणार नाही बघ. आणि कधीतरी अचानक आलेल्या वळणावर तुला ह्या कामाची फळं मिळत जातील न मागता." 
        ह्यातल्या काही गोष्टी निखिलला समजल्या काही नाही, पण आजोबांनी जे काही सांगितलं ते मात्र त्याच्या मनावर कोरलं गेलं होतं. 
जसं आपण म्हणतो की मुलं अनुकरणप्रिय असतात तसच काहीस पुढे निखिलच्या बाबतीत घडत गेलं. घरच्यांनी केलेले हे संस्कार त्याला उत्तम माणूस म्हणून उपयोगीपडत राहिले. पण आजोबांचं एक वाक्य मात्र त्याला अजूनही पटलं नव्हतं ते म्हणजे की,"अचानक आलेल्या वळणावर तुला ह्या कामाची फळं मिळत जातील न मागता."  ते कसं होणार ह्याचा विचार कधीतरी त्याच्या मनात डोकवायचाच. त्याचीही प्रचिती त्याला आलीच लवकर. काही दिवसांनी तो ऑफिसमध्ये असताना त्याला एक फोन आला की तुमच्या आजोबांना चक्कर आल्याने ते फिरायला गेले असताना पडले आणि लोकांनी त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. नेमके आईबाबा आणि आजी नसताना हे झाल्याने निखिलच्या लक्षात येईना काय करावे. तो तसाच हॉस्पिटलमध्ये पोहोचला पण तिथे जाऊन बघतो तर काय आजोबांवर आधीच उपचार सुरू केले होते. काहीतरी गुंतागुंत झाल्याने अर्जंट ऑपरेशनही करणे गरजेचे होते. त्याची प्रोसिजर पूर्ण करून डॉ फक्त निखिलच्या सहीसाठी थांबले होते. निखिल डॉ च्या केबिनमध्ये गेला आणि डॉ ना बघताच त्याला आठवले की हा तर गावी आपल्या शेजारी राहणारा सूरज तो दहावीत नको त्या मुलांच्या नादी लागला होता. हे जेंव्हा त्याच्या घरी कळालं तेंव्हा खूप मारलं होतं त्याच्या बाबानी त्याला. पण निखिलच्या आजोबांनी मध्ये पडत त्याच्या बाबांना समजावलं आणि एक संधी दे मुलाला असही सांगितलं. आजोबांच्या शब्दाखातर सुरजचे वडील तयार झाले. मग आजोबांनी सुरजला वेगळे घेऊन प्रेमाने समजावून सांगितले.काही दिवस सतत आजोबा त्याच्याशी बोलत. आजोबांच्या बोलण्याची पद्धतच अशी होती की सूरजच मन बदलून गेले. त्याने मन लावून अभ्यास केला अर्थातच मार्कही उत्तम मिळाले आणि त्याच  वर्षी बदली झाल्याने ते सगळे दुसरीकडे शिफ्ट झाले. त्यानंतर आजच तो निखिलला भेटत होता आणि तेही एका निष्णात सर्जनच्या रूपात. 
आजोबांचं ऑपरेशन उत्तमरीत्या पार पडले. निखीलसह सगळेच चिंतेत डॉ ची वाट बघत होते. डॉ सूरज समोर येताच सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तसं त्याने हसत हसत सांगितले की,"आजोबा आता ठीक आहेत काळजी करू नका. फक्त शुद्धीवर येण्यासाठी वेळ लागेल."
त्यानंतर मात्र तो आजीकडे वळला धीर गोळा करून इतका वेळ आजी कशीबशी शांत उभी होती. सूरज त्यांचे हात हातात घेऊन म्हटला, "आजी...आज मी जो काही आहे तो फक्त तुम्हा दोघांमुळे त्यावेळेस मला सावरत, वेळोवेळी कौतुक करत तुम्ही जर मला योग्य मार्गावर आणले नसते तर मी आज कुठेतरी हरवलेला असतो. मग अशा आजोबांना मी कसं बरं काही होऊ दिलं असतं?"
सगळ्यांच्याच मनाला ह्या कृतीने खूप आधार मिळाला. 
काही वेळाने आजोबा शुद्धीवर आले हे एक चांगल लक्षण होतं त्यांच्या रिकव्हरीच. थोड्याच दिवसात ते नीट फिरूही लागल्याने घरी आले. एक दिवस असच शांत बसलेले असताना त्यांनी निखिलला विचारलं, "काय रे मग मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर???" तसा निखील हसू लागला. 
      तात्पर्य काय, तर कुणी कसही असुदे, वागुदे आपण मात्र आपल्या मनाला लागलेली चांगली सवय सोडायची नाही. कळत नकळतपणे होत गेलेल्या चांगल्या कृतींचं फळ योग्य वेळी योग्य स्वरूपात मिळतच हे नक्की. 

कौतुक केलं जाणं ही खूप महत्त्वाची भावना असते प्रत्येक व्यक्तीसाठी.  कौतुक करताना ते अर्थातच मनापासून असेल तर समोरच्या माणसाला त्यातला खरेपणा जाणवतोच. तर थोडंस ट्राय करून बघू इतरांचं , त्यांच्या योग्य कामाचं कौतुक करू आणि ते ही वेळेवर. कोण जाणे कधीतरी तो वर बसलेला आपल्या नावाचा कौतुकाचा ब्लॅंक चेक कुणाहाती पाठवेल😄😄 बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! 
शुभं भवतु..
#गौरीहर्षल.  ©Gauri Harshal Kulkarni
१८.७.२०१८

नवी सुरुवात

प्रत्येक नव्या सुरुवातीला जुन्याची काळसर किनार असते
जरी पाटी कोरी केली तरी आधीच्या खुणा दाखवत राहते
पुसत राहण्याचा अट्टहास माणूस सतत करत असतो
कारण पुढे गेल्यावर परत फिरण्यासाठी मार्गच नसतो

तरीही सुरूच असतो नव्याने आयुष्य लिहिण्याचा प्रयत्न
धडपड, धावपळ , निरनिराळ्या उपायांची होतात आवर्तन
कधी कधी ही भट्टी मस्तपैकी जमून येते
त्या काळ्या किनारीची सुंदरशी नक्षी होते

लिहिणं, पुसणं हा खेळ युगानुयुगे चालणारा
माणूस मात्र  होतो फक्त तालावर नाचणारा
खेळतं कोण खेळवतं कोण हे प्रश्न विचारू नयेत असे
प्रत्येक डावाला एकच इच्छा मनासारखे पडावेत फासे

#गौरीहर्षल #१५.११.२०१८

नवीन वर्ष



जीवनातलं अजून एक वर्ष कमी होतंय
काही जुन्या आठवणींना मन मागे सारतंय

काही इच्छा न मागता आपोआप पूर्ण झाल्या
तर काही मात्र ओठांवरही नाही आल्या

काही हात सुटून गेले नकळतच काळाच्या ओघात
काही बंध नव्याने जुळले घेऊन हात हातात

कुठे कुणी उगाचच अडकलं गैरसमजाच्या विळख्यात
कुणाकुणाला मात्र सुख गवसलं नात्यांच्या घट्ट बंधनात

काही जण अजूनही गोंधळात आहेत हवं की नकोच्या
तर काहींना जमलं आहे न्हायला झऱ्यात समाधानाच्या

कुणीतरी जुन्या आठवणीत सुख शोधत बसले आहेत
काहीजण मात्र नव्या आठवणी जोडण्यात गुंतले आहेत

बरंच काही हरवूनही कुणी खूप खुश आहेत
सगळं काही असूनही कुणी खूप दुःखी आहेत

सरत्या वर्षाचा हिशोब प्रत्येक जण मांडत आहे
हात जोडून त्याच्याकडे मनातलं मागत आहे

दिवसांमगून दिवस वर्षांनंतर वर्षं अशीच सरत आहेत
माणसांमधून माणसं नकळतपणे हरवत आहेत 

सुख आणि समाधानाने भरावी ओंजळ हेच आहे साकडे
प्रत्येकाला मिळो योग्य ते मागणे येत्या प्रत्येक क्षणाकडे

#गौरीहर्षल #३०.१२.२०१८




सुरुवात तर करूया

सुरुवात तर करूया
जमलं नाही तर काय
चुकलं सगळंच तर काय
ह्या सगळ्यातून बाहेर पडून नवं काही करूया

सुरुवात तर करूया
राहून गेलेलं करण्यासाठी
पुन्हा एकदा जगण्यासाठी

सुरुवात तर करूया
स्वतःला समजून घेण्यासाठी
स्वतःला वेळ देण्यासाठी

सुरुवात तर करूया 
दुःखातुन उभं राहण्यासाठी
सुखातही जमिनीवर असण्यासाठी

खूप काही नाही करायचं
मिळालेलं आयुष्य भरभरून जगायचं
पण त्यासाठी
सुरुवात तर करूयाव
#गौरीहर्षल
#११.१.२०१९

गोडवा

गोडवा मनांचा हळव्या भावनांचा
न कळेना कुठे हरवून गेला
साद घालणारा ओलावा आवाजाचा
स्मार्टफोनच्या गर्दीत गायब झाला

माणूस अजून जिवंत आहे 
लास्ट सीन सांगू लागले
कुणाला नि कुठे भेटायचं 
स्टेटसवरून कळू लागले

जवळची आणि लांबची नाती 
लाईक वरून ठरू लागली
जन्म,मृत्यू, प्रत्येक बातमी
फेसबुकवर शेयर झाली

पूर्वीच्या काळी माणसांच्या गर्दीत 
शोधावे लागायचे आपले परके 
आता मात्र फ्रेंड लिस्टमध्ये
आपलेच झाले असतात परके 

अशीही ही अधोगती प्रगती म्हणून मिरवतेय
सगळं काही पब्लिक करण्यात माणुसकी मात्र हरवतेय 
#गौरीहर्षल #९.२.२०१९




अवघड

अवघड असतं ना स्वतःला समजावणं
प्रत्येकाच्या चौकटीत सामावून जगणं
तरीही करतात काहीजण अशी कसरत
आयुष्य जगतात स्वतःच्या मनाला मारत
जग देतं त्याला गोंडस नाव चांगुलपणाचं
मग अखंड जगावं लागतं जीवन त्यागाचं
त्यांचा त्रास कुणाला समजत नाही
समजला तरी जाणून कुणी घेत नाही
हळूहळू सवय होते अलिप्त राहून सुखी होण्याची
अन् तीही कधी कधी बळी ठरते स्वार्थी असण्याची
चांगलं वागणं इतकं अवघड होईल हे आता कळू लागतं
पण रक्तात भिनलेलं हे व्रत सोडणं आता शक्य नसतं
गौरी हर्षल