गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

Quote of the day 12

#Quote_of_the_day12

वैभव घरात मधला होता मोठा भाऊ होता आणि धाकटी बहीण. मोठा भाऊ पहिला म्हणून घरात प्रचंड लाडका तर बहीण एकुलती एक म्हणून. अशात वैभवकडे कधीतरी चुकून दुर्लक्ष होत असे. पण तो तसा समजूतदार होता. त्यामुळे ते आपल्या मनावर न घेता तो स्वतःच्या पायावर लवकर उभा राहिला. जिद्दीने शिक्षण ही पूर्ण केले. त्या उलट घरात इतर दोघांची अवस्था वेगळी होती. भाऊ अति लाडामुळे हट्टी बनला होता, एका नोकरीत फार काळ टिकत नसे. तर बहिणीला हुशार असूनही नटणे मुरडणे ह्यातून अभ्यासासाठी वेळ नव्हता. त्यामानाने वैभव लवकर सेटल झाल्याने घरीदारी सगळ्यांच्या तोंडी आता वैभव असे. त्याचे उदाहरण सतत इतरांना ऐकायला मिळत होते. जो मुलगा इतके दिवस कुणाला दिसतही नव्हता तोच आता प्रकाशझोतात होता. वैभव मात्र ह्या सगळ्याने हुरळून जाणाऱ्यातला नव्हता तो आपला स्वतःच्या विश्वात बिझी राहत असे. घरात पैसे देत असतानाच तो स्वतःसाठीही इन्व्हेस्टमेंट करत होता. काही दिवसांनी बहिणीचे लग्न झाले वैभवने स्वतःच्या सेविंगमधून मदत केली. वडिलांना त्याचा अभिमान वाटला पण त्यांनी बोलून दाखवल नाही. वैभवच्या तर अशा काही अपेक्षा नव्हत्याच त्यामुळे तो मदत करून बाजूला होई. भाऊ सुद्धा बऱ्यापैकी नोकरीत स्थिर झाला त्याचेही लग्न झाले. वैभवची बायको आल्यावर जबाबदारी आहे असं सांगत भाऊ कुटुंबासह वेगळा झाला आणि घरात लक्षही देणं बंद केलं. वैभव बायकोसोबत सगळं निभावत होता. पण आईवडिलांचा ओढा थोरल्या कडे जास्त होता. ते त्याच्याकडेच राहू लागले. खटकले तरी वैभवने फारसं मनावर घेतले नाही. तो आपल्या कुटुंबात खुश होता. अशातच त्याचे प्रमोशन झाले. आनंद साजरा करण्यासाठी त्याने सगळ्यांना आमंत्रण दिले. सगळे आले पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता कसातरी कार्यक्रम झाला आणि सगळे निघून गेले. त्या दिवशी त्याला प्रकर्षाने जे जाणवलं त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. पण त्याचवेळी त्याच्या हातावर हलकेच थोपटत त्याचा जिवलग मित्र त्याच्या जवळ बसला. तो वैभवकडे बघत म्हणाला, माणसं आपलीच आहेत ह्यात शंका नाही. पण परिस्थिती आपली नाही. तू पहिल्यांदा यशस्वी झालास तेंव्हाच मला हे जाणवलं होत पण मी तुझं तुला समजावं म्हणून काही बोललो नाही. जेंव्हा लोकांना आपल्या यशाने त्रास होतो तेंव्हा समजून जावं की ते यश खूप अनमोल आहे. त्यांना ते मिळवण शक्य नाही म्हणून त्यांना त्रास होतो आहे. आणि सोबतच आपला पाय खेचला जाणार ह्याच भानही असू द्यावं. माणसाला कुणी गेलं तर जेवढा त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास जवळच्या व्यक्तीच्या यशस्वी होण्याने होतो. मानवी स्वभाव आहे हा.अरे सुखात आनंदाने सहभागी होणाऱ्या लोकांना काय रडवतो रे तू अस मित्र म्हणाला तसा वैभव मनापासून हसला आणि सगळ्यामध्ये सहभागी झाला.
       आपण आपल्या मार्गावर जात राहावे लोकांना चूक कळली तर ठीक नाहीतर त्यांना गेट वेल सून म्हणत शुभेच्छा द्या आणि पुढे चला. 
Anyone that can pull you down is already below you.
कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. 
थॅंक्यु. #गौरीहर्षल

Quote of the day 11

#Quote_of_the_day11

काही लोकांना विज्ञानातले नियम खऱ्या आयुष्यात ही वापरायचे असतात. म्हणजे ह्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया हवी असते. त्यांना अस वाटतं की न्यूटनच्या नियमाचा वापर जसाच्या तसा झाला पाहिजे 😂 कोणता नियम तोच तो,
Every action has an equal and opposite reaction. 
पण प्रत्येक जण असच वागेल अस नसत न. काही लोक असतात शांतताप्रिय माझ्यासारखी😜😜. अस अजिबातच नाहीये पण तरीही जेंव्हा कुणीतरी आपल्याला राग यावा म्हणून माकडचाळे करत असतात तेंव्हा शांत बसून गंमत बघण्यात जी मज्जा असते ना ती दुसऱ्या कशात नाही. 
          तर असाच एक किस्सा राजवी चा. राजवी आपलं काम भलं आपण भले ह्या कॅटेगरी मधील. तिला फारसं कुणाच्या खाजगी गोष्टीत,  कामात लक्ष घालणं आवडत नसे. पण हाताची पाच बोटं जशी सारखी नसतात तसच एका ठिकाणी काम करणारी लोकही नसतात. राजवीच्या काही सहकारी होत्या ज्या नोकरी फक्त घरातून बाहेर पडणे ह्या एकाच हेतूने करत होत्या. त्यामुळे कामापेक्षा इतर भानगडीमध्ये जास्त लक्ष असणे साहजिकच होते. गॉसिप करणे मज्जा करणे आणि कधीतरी जमलं तर थोडस काम नाहीतर काम करणाऱ्या लोकांना त्रास देणे. अशा एका स्वघोषित ग्रुपची लीडर होती तनिशा. त्यात ती कंपनीच्या वरिष्ठांची नातेवाईक असल्याने तिचे उपद्व्याप त्यांच्या पर्यंत जात नसत. राजवी बदली होऊन आल्यापासून तनिशाच्या लिस्टमध्ये होती. तिने मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण राजवीने इंटरेस्ट दाखवला नाही. तिला स्वतःच्या जबाबदारीतून इतका वेळ मिळणार नाही असं सांगत राजवीने तनिशाच्या ट्रीपला नकार दिला. ह्यात खर तर अपमान वगैरे नव्हता पण तनिशाच्या मनाने तेच घेतलं. आता ती उठता बसता राजवीला त्रास देण्यासाठी प्रयत्न करू लागली. कधी तिचा डेस्क खराब कर, कधी अजून काही कर . तिला वाटत होते की हे कुणालाही कळणार नाही कारण राजवी लक्ष देत नव्हती. पण ह्या सिनियरच्या जीवावर तनिशाचे उद्योग सुरु होते नेमकं त्यांच्याच हे सगळं लक्षात आलं. त्यांनी काही ऍक्शन घेण्याआधी निरीक्षण करायचे ठरवले. तनिशाच्या तक्रारी उडत उडत त्यांच्याही कानावर आल्याचं होत्या. 
अशातच राजवीकडे एक महत्त्वाच्या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशन चे काम दिले गेले. ऐन वेळी तनिशाने अजून एकाची मदत घेत ते प्रेझेंटेशन राजवीच्या लॅपटॉप मधून डिलीट केले. राजवी प्रेझेंटेशन देण्यासाठी समोर आली तेंव्हा तिच्या हे लक्षात आले पण तिने प्रसंगावधान राखत पटकन स्वतःचा पेन ड्राईव्ह जोडून प्रेझेंटेशन पूर्ण केले. सगळ्यांनीच राजवीच्या कार्य तत्परतेचे खूप कौतुक केले. शेवटी फक्त ती आणि तनिशा कॉन्फरन्स रूममध्ये होत्या तिला वाटले की आता राजवी चिडेल पण राजवीने शांत हसून तेथून निघून जाणे पसंत केले. तनिशाला अर्थातच अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण आता तिच्यासाठी एक एक्शन वाट बघत होती सिनियरच्या केबिनमध्ये. असो तनिशाच्या बाबतीत जे झाले असेल ते त्याचा अंदाज आपण लावू शकतो. पण राजवीने ज्या पद्धतीने स्वतःला हाताळले तसे करणे गरजेचे असते काही ठिकाणी. प्रत्येक घटनेला आपल्या प्रतिक्रियांची गरज असतेच असे नाही. विशेषतः अशा ठिकाणी जिथे आपल्याला राग येईल. त्यामुळे कोणी कुठे कधी कस वागायचं हे ठरवावं. 
कारण,
How beautiful is to stay silent when someone expects you to be enraged. 
जगात सगळ्यात जास्त काही अवघड असेल तर ते म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे. पण ते अशक्य नक्कीच नसते.
कसा वाटला हा #Quote of the day नक्की कळवा. 
#गौरीहर्षल

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

Quote of the day 10

#Quote_of_the_day10

सकाळी सकाळीच डॉ. पटेलांचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव बघितल्यावर त्यांना थोडं आश्चर्यच वाटलं. पण फोन उचलून ते म्हणाले, बोल रे गाढवा आज सकाळी सकाळी माझी आठवण कशी आली तुला?? इतक्या प्रेमाने डॉ कुणाशी बोलत आहेत हे त्यांच्या सौभाग्यवतीना लगेच कळालं. डॉक्टर त्यांचा जिवलग मित्राशी म्हणजेच मि. नाईकांशी बोलत होते. दोघे अगदी जीवश्चकंठश्च मित्र शाळेपासूनचे मधल्या काळात फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग मुळे एकमेकांपासून दूर होते. ते कामाच्या ठिकाणामुळे पुन्हा एकदा एकत्र आले. त्यात योगायोगाने बायकाही मैत्रिणी निघाल्याने त्यांची मैत्री मैत्री न राहता अगदी एकच कुटुंब असल्यासारखी झाली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या मैत्रीचा 50वा वाढदिवस साजरा केला होता. असो तर विषय हा की नाईकांनी पटेलांना जे की एक psychiatrist आहेत त्यांना सकाळी सकाळी फोन का केला??? 
समोरून नाईक बोलू लागले , मला तुझी अपॉइंटमेंट हवी आहे रे? पटेलांना अजूनच विचित्र वाटलं अरे हो देतो की पण कशासाठी आणि कुणासाठी?? 
ते आपण भेटलो की बोलू न,इति नाईक.
ठीक आहे , तुला शक्य असेल तर उद्या सकाळी 11 वाजता ये क्लिनिकमध्ये किंवा घरीच ये. -डॉ.पटेल
घरी नको रे क्लिनिकमध्येच येतो,चल भेटू उद्या मग बोलू. सगळा सस्पेन्स राखून ठेवत नाईक म्हणाले.  
दुसऱ्या दिवशी डॉ. बाकीचे पेशंट,त्यांचे डिटेल्स बघत असतानाच त्यांचा फोन वाजला. रिसेप्शन वरून नाईक आल्याची बातमी दिली गेली. डॉ नी त्यांना आत पाठवायला सांगितलं. नाईक पती पत्नी त्यांच्या धाकट्या लेकिसोबत स्वरा सोबत आत आले. डॉ नी हसत हसत तिघांनाही वेलकम केलं. स्वराकडे वळून पाहिलं आणि तिला विचारलं काय म्हणतीय माझी अँग्री बर्ड?? स्वराने थोड्याश्या नर्व्हस मूड मधेच उत्तर दिलं, काही नाही ठीक आहे. 
तिच्या आवाजावरून काहीतरी गडबड झाली आहे हे डॉ च्या लक्षात आलं. 
इकडच्या तिकडच्या गप्प न मारता डॉ नि सरळ विषयाला हात घालत विचारलं , काय बोलायच आहे? 
तस हातांची अस्वस्थ चुळबुळ करत नाईक बोलू लागले , स्वराबद्दलच आहे. तिला कस समजवायच आम्हाला कळत नाहीये. 
म्हणजे काय झालं आहे असं?? डॉ बुचकाळ्यात पडले. 
कारण स्वरा प्रचंड प्रॅक्टिकली विचार करणारी मुलगी होती. मुलं वगैरे मित्र म्हणून होते पण त्या पलीकडे तिच्या मनात काहीही नसे. त्यातून ती आईबाबांशी सगळं काही शेयर करत असे. मग काय ??
तेवढ्यात नाईक बोलू लागले, तुला तर माहीतच आहे समीर आता युकेतच सेटल होणार आहे. त्याला तिथे जॉब ऑफरही आहे. आम्हाला वाटतं की स्वरानेही तिच्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत करियर निवडून पुढे जावं.  पण हिच्या डोक्यात मात्र ते वाइल्ड लाईफ फोटोग्राफी आलं आहे. हिला ट्रेकिंग वगैरे आवडत प्रवास आवडतो विशेष म्हणजे मार्कावर परिणाम न करता ती ते करते म्हणून आम्ही परवानगी दिली. पण त्यातच करियर म्हणजे? बरं करायचंच आहे न मग आत्ता जस सुट्टीत करते तस करायचं पण नाही हिला फुल टाइम तेच हवं आहे. पुढे जाऊन कस होणार हीच हेच मला कळत नाही. नाईक प्रचंड हताश होऊन बोलत होते. साहजिकच होते ते कारण आईवडील म्हणून ते ज्या शक्यता बघत होते त्यातून त्यांना काही चांगले आहे हे पटत नव्हते. 
डॉ जरासे विचार करत म्हणाले, तुझा नेमका मुद्दा काय आहे हे मला थोडं थोडं कळतंय पण त्याच बरोबर मला स्वराशीही बोलायच आहे. आधी आपण स्वरा काय म्हणते ते बघू. 
स्वरा-- काका , मला पटतात ह्यांचे काही मुद्दे नाही असं नाही. आणि माझं आयुष्य आहे मी काहीतरी विचार केला असेलच न? मला ह्या गोष्टीत करियर करायचं आहे हे मला आधीपासूनच जाणवत होतं. पण मी स्वतःला वेळ दिला नक्की काय हवंय हे ठरविण्यासाठी. माझ्या सुदैवाने मला ही कॅम्पस प्लेसमेंट मध्ये जॉब मिळत आहेच की आणि तो ही योग्य वेळी. राहिली गोष्ट दादासारखं पोस्ट ग्रॅज्युएशन करून वगैरे सगळं करण्याची तर मला नाही करायचं ते. सगळे एका ठराविक मार्गाने जातात म्हणून मी ही तेच का करू? दादाला ज्या गोष्टी आवडतात त्याच मलाही आवडायला हव्यात असा नियम आहे का? मला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत फोटोग्राफी करताना जो आनंद मिळतो तो ऑफिसमध्ये लॅपटॉप वर सतत बोट आपटून नाही मिळणार हे मला ज्या क्षणी समजलं त्या क्षणी मी माझा मार्ग निवडायचं ठरवलं. बर मी हा निर्णय काही शिक्षण अर्धवट सोडून घेणार आहे का तर नाही. माझं अजून हे वर्ष पूर्ण व्हायचं आहे आणि ते मी उत्तम प्रकारे करणार आहे. आणि इतर कुठलीही तयारी न करता मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात उतरणार नाहीये. बेसिक माहिती जरी माझ्याकडे असली तरी महत्वाचे कोर्स , सेफ्टी साठी अजून काही टेक्निकच शिक्षण  घ्यायचं आहे मला. हे सगळं मला ह्या दोघांशी बोलायच होत पण हे ऐकूनच घेत नाहीत. शेवटी तुम्हाला भेटून बोलायच हे त्यांनी सांगितले जे मला अर्थातच मान्य होतं. कारण तूमच्यासमोर हे माझं ऐकून तरी घेतील ही अपेक्षा होती. 
अग पण, तिला मधेच थांबवत नाईक बोलले, पूर्ण वेळ कशासाठी?? छंद म्हणून कर ना. 
पुढे जाऊन तुझं लग्न वगैरे गोष्टींच्या वेळी हे कसं सांगणार की मुलीला भटकायला आवडतं?? आता मिसेस नाईक बोलल्या. 
आई अग लग्न कुठून आलं मधेच ?? स्वरा जरा हायपर होते आहे हे बघितल्यावर डॉ मध्ये पडले. 
एक मिनिट सगळे थांबा , डॉ बोलले तसे तिघेही त्यांच्याकडे बघू लागले , हे बघा सुरेश आणि वहिनी तुमचे मुद्दे तुमची काळजी तुमच्या जागी योग्यच आहे. पण आजकालच्या पिढीला म्हातारं होण्याची वाट बघत आयुष्य जगायला नाही आवडत. आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी हातात वेळ आणि पैसे दोन्ही असताना वाट का बघायची असा विचार ते करतात. आता स्वरा जे बोलली तिने तिच्या पातळीवर ह्या गोष्टीचा खूप नीट विचार केला आहे आणि ते कौतुकास्पद आहे. नोकरी करत स्वतःच्या पैशांनी हवं ते करायची सोय असताना ती एक अशी वाट निवडते आहे जी वेगळी आहे पण चुकीची नक्कीच नाही. बर तुमचं एक स्वप्न ती पूर्ण ही करत आहे ते म्हणजे समीर सारख परदेशात जाण्याचं. फक्त तिला त्याच पायवाटेने नाही जायचं. स्वराची भटकंतीची आवड कुणाकडून आली आहे हे तुम्ही ही नीट जाणता हो न वहिनी? आपल्याला आपले मार्ग निवडायचं स्वातंत्र्य नव्हतं पण मुलांना ते देऊ शकतो न आपण? आणि तुम्ही दोघेही ह्या गोष्टीचा विचार करा जिथे मुलं पैसा हातात आला की कसा उडवायचा हा विचार करतात तिथे आपली मुलं वेगळ्या वाटेने जात आहेत. जी वाट सोपी नक्कीच नाही पण ते प्रयत्न करत आहे हे काय कमी आहे. स्वरा सुशिक्षित आहे विशेष म्हणजे सेल्फ डिफेन्स बद्दल जागरूक आहे अशा ठिकाणी जाताना आपल्याला अजून तयारी करावी लागेल हे तिला माहीत आहे. अजून काय हवं? तुम्ही तिला वेळ द्यावा अस मला वाटतं आणि हे मी डॉ म्हणून नाही तर तिचा काका म्हणून सांगतो. आपल्याला फक्त कुठल्याही परिस्थितीत आपण तिच्या सोबत आहोत एवढा विश्वास मुलांना द्यायचा आहे बाकी तुम्हाला माहित आहे तुमचे संस्कार त्यांना कधीही वाकडे पाऊल टाकू देणार नाहीत. हो न?? डॉ नी विचारलं तसं मि आणि मिसेस नाईकांनी समाधानाने मान डोलावली. 
करियर निवडताना अजूनही आपल्याकडे त्याच त्याच वाटेने जाण्याचा अट्टहास असतो. कारण नोकरी म्हणजेच सेटल असणे हे समीकरण समाजाच्या मानसिकतेमध्ये फिट्ट आहे. हळूहळू आजूबाजूला त्या चौकटीला धक्के देणारी पब्लिक वाढताना दिसत आहे जे की सुखावह आहे. पण तरीही घरच्यांचा सपोर्ट बऱ्याचदा कमी असतो. 
एखादी व्यक्ती ठराविक मार्ग सोडून वेगळ्या वाटेने जातेय म्हणजे ती हरवेलच अस नसतं कदाचित त्या वाटेवर तिला बरच काही नवीन सापडू शकत. 
So just wait and watch. And please don't force your children to participate in the rat race.  
Just because their path is different does not means they are lost. #गौरीहर्षल
कसा होता हा #Quote_of_the_day नक्की कळवा. 
थॅंक्यु

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

Quote of the day 9

#Quote_of_the_day9

रजनी अगदी चिडखोर स्वभावाची होती पण कुणाला मदत करायची म्हटली की वेगळीच रजनी समोर यायची. थोडीशी ओळख असणाऱ्या लोकांनाही गरजेच्या वेळी स्वतःहून पुढे येऊन मदत करणार मग ते करताना तिला कितीही त्रास झाला तरी तिची तक्रार नसे. चिडखोर नव्हती ती पण सतत येणाऱ्या अनुभवांनी तिची रिएक्ट करण्याची पद्धत तशी झाली होती. मूळ स्वभाव मात्र सहनशील आणि मदतीला तत्पर असा असल्याने तो उफाळून वर येईच. पण जेव्हा मदत घेतल्यानंतर लोक वळूनही बघत नसत ओळखही दाखवत नसत तेंव्हा तिला खूप मनस्ताप होऊ लागला. मदत करताना तिला तशी अपेक्षाही नसे पण लोक चक्क जेंव्हा ओळख नाकारत तेंव्हा वाईट वाटण स्वाभाविक होतं.
जे काही जवळचे लोक होते ते तिला समजावत की तू जशास तशी वागत जा शब्दात, भावनांमध्ये अडकून वाहवत जात जाऊ नकोस. तिलाही ते पटत असे पण पुन्हा कुणी रडकुंडीला येऊन मदत मागितली की ती व्यक्ती मागच्या वेळी कशी वागली ह्याचा विसर पडून रजनी मदत करे. 
हळूहळू मात्र जशी तिची चिडचिड जवळच्या लोकांना त्रासदायक होऊ लागली तेंव्हा तिचा मित्र रोहितने तिला समजवण्याचे ठरवले. कारण ह्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान रजनीचेच होत होते. झोकून देऊन मदत करताना ती मानसिक आणि शारीरिक दृष्टीने थकतच असे पण सगळ्यात जास्त परिणाम नंतरच्या वाईट अनुभवांमुळे होऊ लागला.सतत हसतमुख , टवटवीत दिसणारी रजनी आता सुकल्यासारखी दिसू लागली. नकळतच तिचे वजनही कमी होऊ लागले होते. तिला पुन्हा चियर अप करून ताळ्यावर आणण्यासाठी तिच्या जवळच्या 4,5 मित्रमंडळीनी ज्यात रोहितही होता छोटीशी ट्रिप काढायचं ठरवलं. जोडून 3 दिवस सुट्ट्या आल्या आणि ते सगळे जण फिरायला निघाले. तिथे गेल्यावर मजा मस्ती करण्यात सगळेच रमले. रिसॉर्ट अतिशय सुंदर होतं निसर्गनिर्मित तलावाच्या भोवतीने चालण्यासाठी वाट तयार केली होती. रजनीला मोकळं करण्यासाठी रोहित सगळ्यांपासून दूर घेऊन तिथे आला. जुन्या आठवणी ताज्या करत दोघेही मस्त हसत होते. हळूहळू गाडी रजनीला काय खटकत आहे त्याकडे वळली. मग ती बोलू लागली, खटकत अस नाही रे मला मदत करणं आवडत , खर तर आवडत म्हणण्यापेक्षा ती गोष्ट मला जगण्याचं बळ देते. आपण कुणाला तरी उपयोगी पडतो आहोत हेच खूप महत्वाचे असत मला , मी परतफेड म्हणून अपेक्षा ही ठेवत नाही. पण हल्ली काही अनुभव असे आले की मी चुकीची होते का अस मला वाटू लागलं.  गरज संपली तसं लोकांनी झिडकारल रे मला. म्हणजे मी काही आवर्जून पुन्हा कुणाला ओळख दाखवत नाही तो माझा पिंड नाही. पण समोरासमोर आल्यावर एक smile द्या आणि जा आपापल्या वाटेने बास. पण उलट केलं रे लोकांनी नको नको ते ऐकू आल मला स्वतःबद्दल की मी कुणाची तरी संपत्ती बघून, कुणाच स्टेटस बघून मदत केली म्हणे. तुला तर माहीत आहे ना मला स्वतःला तस काहीच कमी नाहीये मग मी अस का करेन?? 
आता हळूहळू रोहितला रजनीचा प्रश्न कळू लागला , ती दुखावली गेली होती लोकांच्या स्वार्थी आणि इनसिक्युर वागण्याने. त्यामुळेच ती इतके दिवस जे मनापासून स्वतःच्या आनंदासाठी करत होती त्याबद्दल तिच्याच मनात शंका आली होती. त्याने रजनीच्या हातावर थोपटल आणि तो बोलू लागला, रजु तू खूप हळवी आहेस, कुणी त्रासात, दुःखात असेल तर तू स्वतःहून मदतीला धावतेस. हा खूप चांगला गुण आहे ह्यात वादच नाही पण आजकाल हे दुर्मिळ होत चालल आहे. कारणे खूप आहेत त्यातली काही मला जी वाटतात ती सांगतो, पहिलं म्हणजे लोकांना ना हल्ली फुकट मिळणाऱ्या गोष्टींची किंमत राहिली नाही. मदतही मग ती कुठल्या का रुपात असेना विकत घ्यावी लागली तरच ती त्यांना पचते. तू तर स्वतःहून आणि फुकट देत असतेस. हो न? कळलं अस समजून रजनीने मान डोलावली. 
कारण नंबर दोन हे खरं तर खूप महत्त्वाचे कारण. रजू हल्लीच्या काळात कुणीही कुणाचं कोणतंही काम असंच करत नाही. अगदी छोट्यात छोट्या कामातही लोक आपला काय फायदा होतो आहे हे आधी बघतात. नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे सगळेच असे वागतात. पण भरीस भर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आईबाप अन् मुलंही तुला फक्त फायद्यासाठी एकत्र दिसतील. फायदा कुठल्याही स्वरूपात असला तरी. मग तुझ्यासारखी एक तोंडओळख असणारी व्यक्ती प्रेमाने, आपुलकीने, न मागता मदत करतेय म्हणजे त्यात काहीतरी चुकीचेच असणार हा प्रश्न लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. ह्यात तू चुकतेस अस नाही तर चूक परिस्थिती आणि बदललेल्या मानसिकतेची आहे. 
पण मग मला जे करावंसं वाटतं किंवा जे होत माझ्याकडून त्याच काय? रजनीने न राहवून प्रश्न विचारला. 
हलकेच हसत रोहित म्हटला, तू कर न तुला जे योग्य वाटत ते पण त्याचा त्रास तुला होऊ देऊ नकोस. म्हणजे बघ तू फायदा बघत आहेस अशी कुणाला जर शंका आहे तर त्यांना मदत करताना स्वतःला झोकून द्यायची गरज नाही. जेवढ्यास तेवढं करत जा. तू जशी इतर कशाचीही अपेक्षा ठेवत नाहीस तशीच परतून पुन्हा त्या वाटेवरही जाऊ नकोस. स्वतःहून संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नकोस. थोडक्यात काय तर तू ही आपलं काम झालं आता सिनियर लोक म्हणजे बाप्पा ग बघेल काय ते अस म्हणत बाजूला हो.  जितक्या लवकर तू स्वतःला त्या परिस्थिती आणि लोकांपासून अलिप्त करशील तितक्याच लवकर तुला मनशांती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला available करू नकोस म्हणजे कुणीही आलं मदत कर म्हणून की लगेच धावलीस अस करू नकोस. परिस्थिती लक्षात घेऊन योग्य ती गोष्ट कर. 
गेल्या काही अनुभवांमुळे काय बदल झाला आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच न ?? तुझ्या स्वतःकडे बघ पूर्वी तू कशी फ्रेश असायचीस आता मात्र सतत चिडचिड होते तुझी का?? कारण लोकांनी लावलेली लेबल्स तू स्विकारलीस जे तुझ्या मनाविरुद्ध होतं. कुठेतरी तुझं मन आणि शरीरही विरोध करतच होत त्यामुळे त्यावरही परिणाम झाला. सो, एक गोष्ट लक्षात घे इतरांची मदत कर, काळजी घे पण त्या आधी स्वतःची मदत कर , स्वतःची काळजी घे. 
Don't just be good to others. Be good to yourself too.
You can't pour from an empty cup. Take care of yourself first.  #गौरीहर्षल

रजनीला कळलं की नाही माहीत नाही पण तुम्हाला कळलं न ??? ☺️☺️☺️ कसा वाटला हा #Quote_of_the_day नक्की सांगा 

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

Quote of the day 8

#Quote_of_the_day8

घरी खूप मस्का मारल्यावर नेहाला हव्या त्या डान्सच्या कोर्सला बाबांनी एडमिशन घेऊ दिली होती. कारण तिचं रेग्युलर कॉलेज क्लासेस ह्या सगळ्यात खूप कमी वेळ तिच्याकडे उरत असे. तिला नाही म्हणण्यामागे तिचीच दमणूक होऊ नये असा त्यांचा विचार होता. पण नेहाच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही. उत्साहाने क्लास सुरू झाला होता. बडबड्या स्वभावाने तिने इथेही भरपूर मैत्रिणी जमवल्या. ह्या सगळ्यात एक जण होती स्मिता. नेहा आल्यापासून सगळ्या तिच्याभोवती असतात हे ती सुद्धा बघत होती. द्वेष किंवा इर्षेने नाही तर कुतूहलाने कारण स्मिताला अस मोकळं बोलणं वागणं जमतच नसे का कुणास ठाऊक पण ती शांत शांतच असायची. घरीही सगळे तिला समजावत की अग हेच वय आहे मजा मस्ती करण्याचं पण स्मिता आपली स्वतःच्याच विश्वात असे. नेहा मात्र इतरांच्या सोबत स्मितालाही आपल्या मस्तीमध्ये घेत असे. हळूहळू स्मितालाही स्वतःहून ओळख करून घेणं, बोलणं जमू लागलं. 
अशातच एके दिवशी क्लासमध्ये लवकरच मोठ्या कार्यक्रमात स्टेजवर परफॉर्मन्स करण्यासाठी तयारी सुरू झाली. 
सगळ्याच जणी उत्साहात होत्या. फ्युजन प्रकार निवडून काहीतरी नवीन सादर करावं असं ठरलं. मग विषय सुचवणे, त्यावर चर्चा सुरू झाल्या. सगळ्याबाबतीत उत्साही असणारी नेहा इथेही होतीच. तिनेच विषयही सुचवला आयुष्यातील अपयश किंवा वाईट घटनेमुळे खचलेला व्यक्ती आणि मग कशी त्याला प्रेरणा मिळून तो नव्याने उभा राहण्याचा प्रयत्न करतो. विषय पटण्यासारखाच होता. मग काय गाणी , संगीत वगैरे निवडत छोटे छोटे गट करत गोष्ट गुंफली जाऊ लागली. 
प्रॅक्टिस करता करता एक महिना उलटला. आणि तो दिवसही उजाडला. एक एक करत सगळ्या जणी कार्यक्रमाच्या ठिकाणी जमल्या तयारी सुरू झाली. आधी त्यांचा परफॉर्मन्स आणि मग बाकी सगळे अस नवीनच प्रकार होता. स्मिता आणि नेहा सुरुवात करणार असल्याने त्या पुढे होत्या. गार पडलेल्या हातानी स्मिताने नेहाचा हात धरला. ती नर्व्हस झाली आहे हे नेहाच्या लक्षात आलं तिने तसाच तिचा हात हातात ठेवत डोळ्यांनी सांगितलं आपण मस्तच करणार आहोत काळजी नको करुस. स्मिता थोडी रिलॅक्स झाली. नाव पुकारले जाताच दोघीही स्टेजवर गेल्या म्युझिक सुरू झाले आणि अगदी स्टेज ओळखीचं असल्याप्रमाणे दोघींची पावले टाकली जाऊ लागली. हळूहळू गोष्ट पुढे सरकत गेली 15 मिनिटांचा तो परफॉर्मन्स जेंव्हा संपला तेंव्हा सगळं सभागृह उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करत होतं. कौतुकाचा स्वीकार करत सगळ्या जणी जाऊन ठरलेल्या जागी बसल्या. मग कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली जाऊ लागली. 
तो कार्यक्रम आयोजित केला होता दुर्धर रोग, भयंकर अपघात ह्यातून बरच काही गमावूनही पुन्हा नव्या दृष्टीने आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी. हा एक छोटासा क्लब होता जिथे अशा घटनांमधून जाणाऱ्या लोकांना वाईट मनस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली जात असे. 
कारण कस असत न माणसाकडे जेव्हा सगळं काही असत तेंव्हा त्याला त्याची किंमत नसते पण जेव्हा एखादी घटना आयुष्यात अशी उलथापालथ घडवते तेंव्हा माणूस कोसळतो. तिथे त्याला सगळ्यात जास्त गरज असते ती मानसिक आधार आणि पाठिंब्याची. तोच देण्याचा प्रयत्न ह्या क्लबचे मेम्बर करत होते जे सर्व कधी न कधी त्यामधून गेले होते आणि काही जण जात होते. 
अशातच नेहाचं नाव घेतलं गेलं आणि तिला स्टेजवर बोलाविले गेले. सगळ्या जणी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागल्या. हलकेसे हसत ती स्टेजवर गेली आणि जे बोलली त्यामुळे प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं. नेहा आणि तिची आई ह्या क्लबच्या सगळ्यात जुन्या सभासद होत्या. होत्या कारण नेहाची आई कॅन्सरशी लढा देत होती. त्याच ट्रीटमेंट च्या वेळी ह्या क्लबची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि मग हळूहळू समविचारी लोक जोडले गेले. नेहाची आई तर ह्या जगात नव्हती पण नेहा मात्र आईचं व्रत हसतखेळत पूर्ण करत होती. हसतखेळत अशासाठी कारण आई गेल्यानंतर काही दिवसातच नेहाचा भयानक अपघात झाला होता आणि त्यात तिचे दोन्ही पाय तिला गमवावे लागले होते. एकामागे एक धक्के कुणालाही मोडून गेले असते पण नेहा तिच्या आईची लेक होती. जिद्दीने ट्रिटमेंटला प्रतिसाद देत तिने कृत्रिम पायांच्या मदतीने सगळ्यावर मात केली होती. सतत सगळ्यांना हसवताना जगण्यासाठी बळ देताना कुणालाही तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागचे हे रहस्य कळत नसे. 
आज मात्र ते समोर आले तेंव्हा स्मिताला ही गोष्ट सगळ्यात जास्त जाणवली कारण खुश रहा ग अस सतत तिला नेहा सांगायची आणि स्मिताला मात्र आपले छोटे छोटे प्रॉब्लेम तिला ऐकवायचे असायचे. नेहाने नकळतच स्मिताला आयुष्यातील एक महत्वाचा धडा दिला होता तो म्हणजे आपल्याला देवाच्या कृपेने जे धडधाकट शरीर मिळाले आहे त्याचा आदर करत आनंदाने जगावं. 
म्हणतात न आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही न काही शिकवत असते त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून. बऱ्याचदा खूप कमी वेळासाठी आयुष्यात आलेली माणसं खूप छान अस काहीतरी मनावर उमटवून जातात. 
Temperory people teach permanent lessons. फक्त ही लेसन्स कोणती आहेत हे कळायला हवं. 
हा होता माझा स्वतःसाठी lesson म्हणजेच #Quote_of_the_day #गौरीहर्षल

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

Quote of the day 7

Quote of the day 7

ऋतुजा 4 दिवसाच्या सुट्टीनंतर ऑफीसला आली होती. ती आली तसे सगळेच तिच्या आसपास गोळा झाले. कशी झाली ट्रिप वगैरे विचारू लागले. ऋतुजा अगदी मनमोकळी वागणारी आतलं बाहेरचं अस काही नसायचं तिचं त्यामुळे भरपूर मित्रमंडळी जमवलेली. आजही तेच झालं होतं ती आली तसे सगळे बोलण्यासाठी धावले. गर्दीच्या मागे कुणीतरी तिला बघत होते. तिचंही बोलता बोलता त्या व्यक्तीकडे लक्ष गेले. तो चेहरा बघताच ऋतुजाचा चेहरा पडला. कोण होती ती व्यक्ती???

ती होती नयन ऋतुजाची कॉलेजमधली मैत्रीण. ऋतुजा आणि नीरजा ही बेस्ट फ्रेंडची जोडी कॉलेजमध्ये फेमस होती. सगळ्या गोष्टी करताना दोघी सोबत अभ्यासातही आणि मस्ती करताना सुद्धा. अशातच सेकंड इयरला नयनची कॉलेजमध्ये एन्ट्री झाली नवीनच असल्याने ती फारशी कुणामध्ये मिसळत नव्हती. मग हळूहळू तिची ऋतुजा, निरजाशी ओळख झाली. त्याही ती एकटी पडू नये म्हणून मदत करायच्या. पण नयनला मात्र त्यांची मैत्री खटकू लागली होती. कारण तिला असं जिवाभावाचे कुणीच नव्हतं. नयन सतत त्या दोघींचं निरीक्षण करत असायची.काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की ऋतुजा बॅलन्सड आहे पण नीरजा मात्र जरा भोळसट आणि पटकन विश्वास टाकणारी आहे. मग नयनने निरजाबरोबर मैत्री वाढवणं सुरू केलं. तस ते फारसं सोपं नव्हतं पण कॉलेजमध्ये येण्याजण्याचा  दोघींचा रस्ता एकच असल्याने तिला तशी संधी मिळाली.  इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तिने नीरजाला बोलतं करायला सुरुवात केली. मग त्यातून तिला एक नवीन माहिती मिळाली. नीरजाचा एक बालमित्र होता जो तिला आवडायचा त्यानेही तिला तस कबूल केलं होतं. पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरी काही बोलायचं नाही असं त्यांनी ठरवल्याने दोघेही भेटणं बोलणं सगळं एका लिमिटपर्यंत करायचे.  त्या दोघांव्यतिरिक्त हे फक्त ऋतुजा ला माहीत होतं आणि आता नयनला. अशातच कॉलेजचं ते वर्ष संपत आलं. सगळे परीक्षा, अभ्यास ह्यामध्ये बिझी झाले. त्यांनतर मोठया सुट्ट्या असल्याने फिरायला जायचं अस ग्रुपमध्ये ठरलं ग्रुपमध्ये म्हणजे ह्या तिघी आणि निरजाचा मित्र आणि त्याचे काही मित्रमैत्रिणी. 8,10 जण झाले ट्रेकिंग वगैरे चा प्लॅन ठरला. 2 दिवसाचा. हो, नाही करत घरून परवानगी मिळवली आणि सगळे गेले. त्या दोन दिवसात नयनच्या वागण्याबद्दल काही गोष्टी ऋतुजाला खटकू लागल्या तसं तिने निरजाशी बोलून दाखवल पण अस काही नाही ग अस ती म्हणाली. पहिल्यांदा ऋतुजा ला जाणवलं की निरजाच्या मनात वेगळं काही सुरू आहे आणि ती ते मला कळू देत नाहीये. काय सुरू होतं निरजाच्या मनात??
 नयनने तिला सतत भरीला घालुन तिचं आणि अर्णवच नातं पुढे नेण्याबद्दल विचार करायला लावला होता. जेव्हा ती ऋतुजाला आवडणार नाही असलं काही अस म्हणाली तेंव्हा ऋतुजाला बॉयफ्रेंड नाही म्हणून ती जळते तुझ्यावर आणि म्हणून तुला पुढे जाऊ देत नाही असं सांगितलं. सतत हे बोललं गेल्याने निरजाचा तिच्यावर विश्वास बसत गेला. ती नकळतच ऋतुजापासून दूर होऊ लागली. आणि वेगळ्याच दृष्टीने तिला बघू लागली. अर्णव त्या दोघींचाही मित्र होता पण तो ऋतुजाला बहिणीच्या जागी बघतो हे नीरजा विसरली. 2 दिवसांनी सगळे परत आले. ऋतुजा ने निरजाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती आता तिला टाळू लागली होती. तिने अर्णवला सुद्धा सांगितले की आमच्या दोघींपैकी एकीला निवड. नयनसोबत फिरणं आता निरजाला आवडत होतं. तिच्या आणि अर्णव बद्दलच्या सगळ्या गोष्टी ती बिनधास्त नयनला सांगू लागली. अशातच कॉलेजमधल्या काही मैत्रिणी निरजाला एकदा भेटल्या. त्यातल्या एकीने सहज हसत हसत अर्णवचा उल्लेख करत तिला टोमणा मारला. तुम्हाला कस माहीत अस विचारल्यावर तुझ्याच बेस्ट फ़्रेंड ने सांगितलं अस म्हणत कुणाचंही नाव न घेता त्या निघून गेल्या. निरजाच्या डोक्यात फक्त ऋतुजा आली. ती तशीच तडक ऋतुजाकडे आली. तिला समोर बघताच ऋतुजाला खूप आनंद झाला. पण निरजाने मात्र पुढचा मागचा विचार न करता तिला धारेवर धरलं. ऋतुजाने शांतपणे तिला बोलू देत सगळं ऐकून घेतलं. मग ती तिला म्हणाली हे जे प्रसंग तू सांगितले ते जेव्हा घडले तेव्हा आपण संपर्कात होतो का??हा प्रश्न ऐकताच नीरजा पटकन खुर्चीवर बसली. तिला समजावत ऋतुजा पुढे म्हणाली मी तुला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तिच्यावर इतका विश्वास टाकू नकोस पण तुझ्या डोक्यावर संशयाचे भूत स्वार होते. असो झाले ते झाले  ह्या गोष्टींवर मी आणि अर्णवने आधीच विचार केला होता. हे सगळं बाहेरून घरी कळण्याआधी तो बोलणार आहे तू काळजी नको करुस. ऋतुजाचं बोलणं ऐकून निरजाच्या डोळ्यात पाणी आले,ती तिची माफी मागत गळ्यात पडून रडू लागली. तिला शांत करत ऋतुजा म्हणाली, वेडाबाई आता तरी शहाणी हो आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवणार नाही असं ठरव. नीरजा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव ,
ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं, ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. #गौरीहर्षल
गोड बोलणारा प्रत्येक माणूस आपला हितचिंतक असतोच अस नाही. काही विघ्नसंतोषी असतात तर काही प्रत्येक गोष्टीत स्वतःचा काय फायदा होतो हे बघत असतात. अशी लोकं आपल्या वागण्याने समोरच्याला काय त्रास होईल ह्याचा विचार करत नाहीत. आपण मात्र सगळं गुपित उघड करून नंतर पश्चाताप करत बसतो. म्हणूनच आपल्याला इतरांबद्दल काय वाटत , चांगलं की वाईट हे फक्त आणि फक्त योग्य व्यक्तीशी बोलावं जो खरंच आपला जवळचा आहे. नाही तर सरळ गप्प बसावं. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न.  

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

Quote of the day 6

#Quote_of_the_day6

सारिकाच्या लग्नाला 5 वर्षं झाली होती. त्या निमित्ताने घरातच पूजा आणि छोटंसं गेट टुगेदर करावं असं तिने आणि तिच्या नवऱ्याने सचिन ने ठरवलं. त्यानुसार एक छान सोयीचा मुहूर्त निवडत तयारी सुरू झाली. हवापालट म्हणून गावी  गेलेल्या माई आणि आबांना आणण्यासाठी गाडीही दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचे ठरले. माई आबा म्हणजे सचिनचे आईवडील. गावी सचिनचा भाऊ सुरेश त्याची पत्नी  सुनीता आणि मुलगा राहत होते. गावी राहणं हा त्या दोघांचा निर्णय होता कारण तिथे राहून काहीतरी करावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. त्यात सुनीतालाही तिथलं वातावरण आवडल्याने तिने तिथंच राहू अस ठरवलं. त्या हेतूने गावाकडच्या घरातही सगळ्या सोयीसुविधा करून घेतल्या गेल्या. सचिन आणि सुरेशला एक बहीण ही होती सपना तिचं लग्न जवळच्या गावातच झालं होतं पण ते नवराबायको नोकरीनिमित्त वेगळ्या शहरात होते आणि सासुसासरे गावी असायचे.  असा आपापल्या विश्वात रमलेल्या तरीही जिवलगांचा हा गोतावळा सुखी होता.  गेट टूगेदरच्या निमित्ताने सगळेच सचिन-सारिका कडे जमले होते.
 ह्या सगळ्यात अजून एक व्यक्ती ही आपल्या कुटुंबासह सहभागी झाली होती. ती म्हणजे सपनाची जाऊ रेश्मा. ती तिच्या मुलांसह आणि नवऱ्यासह आदल्या दिवशीच आली होती. सपना आपल्या माहेरच्या शिकवणुकी मुळे आणि आपल्या दोन्ही भाऊ वहिनीच्या तालमीत नाती जोडायला शिकली होती. ह्या सगळ्यामुळे ती लांब रहात असूनही सासुसासरे तिचं कौतुक करत असत. रेश्माही लांबच होती पण गावातच आणि भांडून वेगळी झालेली त्यामुळे थोडासा मनाने दुरावा होताच. सपनाच्या कौतुकाने रेश्माला खूप त्रास होऊ लागला आपण तसे वागू शकत नाही हे तिला चांगलं माहीत होतं. मग आता काय सतत संधी मिळाली की सपनाला टोचुन बोलणं , अपमान करणं सुरू झाले. सुरुवातीला सपनाने दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्रास देण्याचं प्रमाण वाढलं तसं कुणाशीच बोलत नसल्याने सपना आतूनच खंगु लागली. त्याचा तिच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ लागला. 
आज समोर आलेल्या सपनाला बघताच सारिका आणि सुनीता दोघींनाही काहीतरी गडबड आहे हे कळलं. पूजा वगैरे आटोपल्यावर सगळे निघाले तसे त्या दोघींनि आग्रह करून आराम करण्यासाठी म्हणून सपनाला ठेवून घेतले. वेळ मिळताच दोघीही सपनाशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागल्या. आणि हळूहळू काय होतंय हे ही काढून घेतले. मुद्दा लक्षात येताच त्यांनी आधी सपनाला रडून मोकळे होऊ दिले. मग कुठल्याही परिस्थितीत माहेरचे सगळे तुझ्या बाजूने असतील हे सांगितलं. सपना थोडी स्थिर झाली. मग सारिका तिला म्हणाली की हे बघ सपना आपली चूक नसताना तू हे सगळं सहन केलं हे तुझं चुकलंच. मान्य आहे ती मोठी आहे पण तुझा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तू वेळीच गोष्टी सासुसासर्यांना , नवऱ्याला नाही तर आम्हाला तरी सांगायच्या होत्या. असो आता जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही पण इथून पुढे जशास तसे उत्तर न घाबरता दे. आणि सगळ्यात आधी तिच्या आरशात स्वतःला बघणं बंद कर. ती जे करते वागते ते तिचं प्रतिबिंब आहे तुझं नाही. तू जशी आहेस तशीच सगळ्यांना आवडतेस अगदी तुला स्वतःलाही. नवीन नाती जोडून ठेवताना स्वतःलाही जपायला शिक.  आयुष्यात अशी खूप लोकं भेटतील जी तू कशी आहेस हे तुलाच सांगायचा प्रयत्न करतील. पण तुला स्वतःला माहीत आहे न तू कशी आहेस मग बास त्यावर विश्वास ठेव. आणि इतरांच्या वाईट वागण्याचा परिणाम तुझ्या आरोग्यावर नको करून घेऊ. नाहीतर येणाऱ्या बाळाचं काय होईल हळूच हसत सुनीता म्हणाली. सपनाने चमकून दोघींकडे बघितलं तशा त्या म्हणे लाडकी आहेस तू आमची आम्हाला तुला बघतानाच जाणवलं होतं म्हणून तर तुला ठेवून घेतलं. आता 7,8 दिवस मस्त लाड करून घे मग जा तुझ्या काळजीवाहू नवऱ्याकडे. तिघीही समाधानाने हसू लागल्या. 
आपल्या बद्दल जेंव्हा कुणी काही बोलत तेंव्हा बऱ्याचदा आपण स्वतःला दोष देऊ लागतो. स्वतःवर बोट ठेवतो. पण अस करण्याआधी हा विचार करत नाही की अरे माझ्यासोबत माझ्याशिवाय जास्त वेळ कुणीही घालवलेला नाहीये. म्हणजे हे म्हणतात तशी मी नक्कीच नाहीये.  लोकं नकळतच आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आपण स्वतः कसे आहोत हे दाखवत असतात. त्याचं योग्य निरीक्षण करायचं आणि आपण कसे होऊ नये हे ठरवायचं😜  After all, 
The way people treat you is a statement about who they are as a human being. It is not a statement about you. #गौरीहर्षल

कसा वाटला हा #Quote_of_the_day नक्की सांगा ?? थॅंक्यु ❤️❤️